॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय अठ्ठेचाळिसावा ॥
सीतेचा आक्रोश

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥


लक्ष्मणाचे निष्ठुर वचन । ऎकोनि जानकी खेदें खिन्न ।
थोर विषाद पावोन । मूर्छागत पैं झाली ॥१॥
सुकुमार जैसी कर्पूरजननी । अनिळ झगटें येवोनी ।
मग ती डोले हादरोनी । तैसें अवनिजेसि जाहलें ॥२॥
ते पडे धरणीं मूर्छागत । भ्रमें व्याकुळ झालें चित्त ।
क्षण एक होवोनि सावचित्त । लक्ष्मणा बोले दीन वचनें ॥३॥
जनकात्मजा म्हणे सुमित्रासुता । माझें शरीर दुःखाते तत्वतां ।
ऎसें जाणोनि कीं विधाता । दुःखासी पात्र मज केलें ॥४॥
पूर्वी जैसें आपण केलें । कोणां स्त्रीपुरूषां असे विघडलें ।
तरी मज हें प्राप्त झालें । वनवासासी सांडीलें श्रीरामें ॥५॥
ऎसा जाणोनियां वृत्तांत । वनी मज त्यागी श्रीरघुनाथ ।
माझे पाप मजचि फळत । वियोग होत श्रीरामीं ॥६॥
जन्मापासोनियां जाणा । हेंचि मज प्राप्त उर्मिलारमणा ।
तरी अदॄष्टचि प्रमाणा । बोल कवणा ठेवावा ॥७॥
पूर्वी मी श्रीरामभवनीं । करीत असतां सेवा चरणीं ।
मज गृहीं अनुदिनीं । दुःख थोर जाहलें ॥८॥
पुढें आतां ॠषिआश्रमस्थानीं । वसतां मज पुसतील मुनी ।
काय कारण तुजलागोनी । श्रीरामें वनीं सांडिलें ॥९॥
मज पुसतील ॠषीश्वर । काय कारणें तुज रघुवीर ।
वनीं सांडी हें प्रश्नोत्तर । आम्हांप्रति सांगिजे ॥१०॥
तुज कोण्या दुःखास्तव श्रीरामें । त्यजिलें वनीं अवो रामे ।
काय दुष्कर्म कोण्या अधर्मे । तुज वनीं सांडीले ॥११॥
काय सांगू मुनींप्रती । जरी मुनिपत्न्या मज पुसती ।
तूं सुंदर सुकुमार श्रीरघुपतीं । कां वों तुज सांडीलें ॥१२॥
निश्चयें जाण लक्ष्मणा । जान्हवीतीरीं आपुली प्राणां ।
त्यजीन मी आतां वाचेंना । काहीं कारण मज नाहीं ॥१३॥

सीतेने लक्ष्मणाला अयोध्येस जाण्यास सांगितले :

मज सांडोनियां सुमित्रासुता । करीं रघुनाथाज्ञेतें तत्वतां ।
मज दुःखी वनस्थळीं सांडोनि आतां । अयोध्येसि गमन करावें ॥१४॥
आतां लक्ष्मणा माझें वचन । तुवां करावें अवश्य जाण ।
माझिया सासवांसि विशेषेकरून । नमन माझें सांगावें ॥१५॥
तुमचें दीन वनवासीं । वास करितें तुमचें आज्ञेसीं ।
जळावेगळी शफरी जैसी । तैसी वनवासीं तुम्हांवीण ॥१६॥
दोनी करकमळें जोडून । श्रीरामा माझें साष्टांग नमन ।
जाणसी तैसें लक्ष्मणा आपण । विनंती माझी सांगावी ॥१७॥
तुझिया चरणांचा वियोग । तोचि माझा प्राणभंग ।
जैसा चातक मेघउद्वेग । जळ असोनि पैं करी ॥१८॥
भक्तकृपाळू श्रावणारीनंदनें । मज सांडीलें लोकलज्जेभेणें ।
लौकीकासारखें वर्तिज जेणें । तोचि एक पुरुषर्थी ॥१९॥
पिता राज्यीं स्थापितां जेणें । सापत्न मातेचेनि वचनें ।
राज्य सांडोनि वना जाणें । तोचि एक पुरुषार्थी ॥२०॥
अहंकामादिक राक्षस । मारोनि पावला जो यश ।
सुरवर पूजिती जयास । तोचि एक पुरुषार्थी ॥२१॥
लोकलज्जेसि भिवोनी । ममता योषितेसी सांडिली ज्यांनी ।
ये जनीं वनीं त्रिभुवनीं । तोचि एक पुरूषार्थी ॥२२॥
सर्व कर्मी कुशळपण । समता दया सेवी जयाची आंगवण ।
जया अहं ममता नाहीं जाण । तोचि एक पुरूषार्थी ॥२३॥
सद्गुरुवचनीं द्रुढ भाव । गुरू म्हणे तें करी निःसंदेह ।
म्हणोनि भजनीं जयाचा उत्सव । तोचि एक पुरूषार्थी ॥२४॥
गृहकृत्यीं उदासभूत । तयांत असोनि जो अलिप्त ।
कामिनीकामातें नातळत । तोचि एक पुरुषार्थी ॥२५॥
ऐसिया श्रीरामासी जाण । करितें मी साष्टांग नमन ।
हें लक्ष्मणा अवश्य सांगोन । कृपा कीजे मजवरी ॥२६॥
पौरजनांची बरवी मात । ऐकोनि मज त्यागी श्रीरघुनाथ ।
ऐसें जाणोनियां मी येथ । शोक न करीं सर्वथा ॥२७।
पुरवासियांचे मनोगत । जाणोनि राजा तैसें वर्तत ।
याकारणें मी शोक येथ । काय कारणें पैं करूं ॥२८॥
भ्रताराच्या जें मनीचें । तेंचि स्त्रियेनें कीजे साचें ।
आन करितां दोष पृथ्वीचे । बैसतील मज माथां ॥२९॥
इतुकें हें माझे वचन । सांगावें श्रीरामासि आपण ।
दयासागर तूं उर्मिलामरण । यदर्थी आळस न करावा ॥३०॥
ऐसी जानकीची करुणामात । अति पराक्रमी सुमित्रासुत ।
ऐकोनि प्रदक्षिणा करित । दीर्घस्वरें रुदन करोनी ॥३१॥
क्षणैक सौमित्रें धरोनि ध्यान । माते तुज पाहतां नये जाण ।
पूर्वी तुझें देखिले चरण । रूप नाहीं देखिलें ॥३२॥
श्रीराम नसतां येथें जाण । केंवी मी पाहूं तुझे वदन ।
म्हणोनि अधोमुखें आपण । चरणध्यान केलेंसे ॥३३॥
सीतेला वंदन करून लक्ष्मण अयोध्येला निघाला ः
ऐसा धरणिजेस नमस्कारू । नावे बैसला शक्रजितशत्रू ।
नावाडियासि म्हणे सत्वरू । उत्तरपारीं पाववीं ॥३४॥
ऐसा उतरोनि पैलपारीं । शोकें संतप्त हृदयभीतरीं ।
भ्रांत होवोनि रथावरी । बैसता झाला ते काळीं ॥३५॥
पुजःफ़िरोनि पाहे लक्ष्मण । परतीरीं सीता दीनवदन ।
सीताही अवलोकी लक्ष्मण । कळाहीन देखिला ॥३६॥
परतीरींहूनि जोपर्यंत । सीता पाहे रथ दिसत ।
रथ न देखतां मूर्च्छागत । धरणिजा धरणीवरी पडली ॥३७॥
ते सीता दुःखेंकरुन । अत्यंत आरंबळे त्यजूं पाहे प्राण ।
सर्वेचि मूर्च्छा सांवरून । रुदनधर्म मांडिला ॥३८॥


सा दुःखभारावनता यशस्विनी यशोधना नाथमपश्यती सती ।
रुदोद सा बर्हिणनादिते वने महास्वरां दुःखपरा च जानकी ॥१॥

जानकीचा विलाप :

ते जानकी पतिव्रता यशस्विनी । दुःखभारें वनीं आक्रंदोनी ।
धराधर श्रीरामलागूनी । पाहतसे ते सती ॥३९॥
अनाथबंधो अनाथनाथा । अनाथा जना तूं रघुनाथा ।
कां न पावसी कृपानाथा । मज ये वनीं सांडोनी ॥४०॥
म्हणोनि करितें रुदन । हें भयानक अत्यंत वन ।
मयूर गर्जना करिती गहन । तेणें भय दुःख वाटतसे ॥४१॥
काय म्यां तुमचा अपराध केला । कोणें माझा अन्याय देखिला ।
काय कारणें त्यागून गेला । वनवासीं सौमित्र ॥४२॥
कां स्वामी मज सांडिलें । मीं काय अन्याय आचरलें ।
की माझी अभक्ती देखोनि अव्हेरिलें । वनवासीं निरंजनी ॥४३॥
कीं पंचवटिकेमाजी लक्ष्मणा । अति दुरुक्ती केलें छळणा ।
तेणॆं रागें श्रीरघुनंदना । मज वनवासी सांडिलें ॥४४॥
ऐसा शोक अत्यद्भुत । वनीं जनकात्मजा असे करित ।
तिच्या शोकाची वर्णना येथ । काय म्हणोनि करावी ॥४५॥
मुळींच शोक मिथ्या जाण । तयाचें मिथ्या करितां वर्णन ।
जानकी अशोक आपण । शोकरुदन लैकिकीं ॥४६॥
एका जनार्दना शरण । सीता शोकें अति दीन ।
वनींचे पक्षी करिती रुदन । धरनिजादुःख देखोनी ॥४७॥
पुढें वाल्मीकमुनि येविनि । करील सीतेची संबोखिणी ।
तें परिसावें संतज्जनीं । दत्तचित्त होवोनी ॥४८॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तराकांडे एकाकारटीकायां
सीताशोकनिरुपणं नाम अष्टचत्वारिंशोऽध्यायः ॥४८॥
ओव्यां ॥४८॥ श्लोक ॥१॥ एवं ॥४९॥

GO TOP