॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
सुंदरकांड
॥ अध्याय आठवा ॥
रावण सीता संवाद
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
रावणाच्या आगमनाने सीतेची झालेली स्थिती :
पूर्वप्रसंग संपतां तेथ । रावण होऊनि पंचोन्मत्त ।
येवोनि अशोकवनांआंत । सीता पाहत भोगेच्छा ॥ १ ॥
रावणें ऐसी देखिली सीता । कंपायमान अति भयार्ता ।
जेंवी कदली वायुघाता । श्रीरामकांता तेंवी कांपे ॥ २ ॥
देखोनियां दशानन । ऊरूउदरबाहुभूषण ।
पीतांबर अति जीर्ण । तेणेंचि आपणा आच्छादी ॥ ३ ॥
पीतांबर तो अति जीर्ण । तेणें अवयव आच्छादून ।
जानकी अति लज्जायमान । अधोवदन राहिली ॥ ४ ॥
नाहीं अभ्यंग ना स्नान । सर्वांग मलिन मळकण ।
नाहीं आच्छादन आस्तरण । नाहीं आसन बैसावया ॥ ५ ॥
सीता धरणिजा आपण । धरासनीं सुखसंपन्न ।
बैसली असे सावधान । लज्जायमान दशवक्त्र ॥ ६ ॥
अंतर्यामी रामचिंतन :
धनलोही खतेली असे । तीमाजी निजनिधान वसे ।
सीता बाह्य मलिन भासे । अंतरीं वसे श्रीराम ॥ ७ ॥
सीता बाह्य भासे भयमान । अंतरीं निःशंक सावधान ।
हें नेणोनि दशानन । करी प्रार्थना भोगार्थ ॥ ८ ॥
रावणाची स्वमुखाने आत्मश्लाघा :
स्वमुखें रावण म्हणे सीते । मज भिऊं नको प्रियकांते ।
मज देखोनि निजांगातें । वृक्षा आपणियातें गुप्त करिसी ॥ ९ ॥
मी प्रार्थितों दशानन । मजला व्हावें सुप्रसन्न ।
सकल लज्जेसी सांडोन । सुखसंपन्न रम मजसीं ॥ १० ॥
सांडीं श्रीरामाची आस । हे घे माझी सत्य भाष ।
मज तुज जालिया आश्लेष । भोगीं अशेष निजराज्य ॥ ११ ॥
ऐशीं सहस्त्र माझ्या नारी । तयांत मुख्य जे कां मंदोदरी ।
तुझी करीन ते किंकरी । अवघ्यांवरी तूं श्रेष्ठ ॥ १२ ॥
इंद्रादिक देव समग्र । तुझे करीन वो किंकर ।
मी ही होईन आज्ञाधर । साक्ष शंकर प्रमाण ॥ १३ ॥
स्वर्गमृत्युपाताळींची । संपत्ति आणिली त्रिभुवनींची ।
ते ही अर्पीन मी तुजची । घे आमुची निजभाक ॥ १४ ॥
सवेग मलिनांबरें फेडीं । माझी दिव्यांबरें वेढी ।
सांडोनि श्रीरामाची ओढी । भोगीं आवडीं तूं मज ॥ १५ ॥
मस्तक दिसताहे मलिन । करी जवादीचे मंगळस्नान ।
तुज मी चर्चीन चंदन । घनस्तन निववावया ॥ १६ ॥
रत्नजडित अलंकार । रत्नकुंडले पदक हार ।
कंकणें बाहुवटे मनोहर । अर्धचंद्र रत्नांचे ॥ १७ ॥
सहित किंकिणीज्वाळामाळा । कटीं विराजे मेखळा ।
वांकी अंदुवांचा खळाळा । कळिकाळा भिऊं नको ॥ १८ ॥
तुझें देखानि रूप यौवन । ब्रह्मा पडे मूर्च्छापन्न ।
माझे उतावेळ मन । दे आलिंगन जानकी ॥ १९ ॥
त्रिदशा न खालवीं मान । तो मी येतों लोटांगण ।
तुझे धरितों चरण । पाणिग्रहण करीं सीते ॥ २० ॥
कुंभकर्ण दारवंटेकर । इंद्रजित करीन फुलधर ।
अखयादि समग्र कुमर । करीन किंकर आज्ञांकित ॥ २१ ॥
मंदोदरी स्वयें आपण । नित्य करील चरणक्षालन ।
मी करीन संवाहन । अंगस्पर्शनसुखार्थ ॥ २२ ॥
तुझा अंगस्पर्श सहज । घडावया भाग्य कैचें मज ।
माझी सांडोनिया लाज । भोगीं निर्लज्ज भोग माझे ॥ २३ ॥
सिद्ध कामगविमानीं । दोघें एकत्र बैसोनीं ।
चैत्रवनीं नंदनवनीं । अशोकवनीं क्रीडू पैं ॥ २४ ॥
सांडोनियां श्रीरामचंद्र । माझा करीं अंगीकार ।
राम बापुडें कोण किंकर । मजसमोर यावया ॥ २५ ॥
श्रीरामांची रावणाकडून निंदा :
राम बापुडें तें किती । तूं कां त्याची करिसी खंती ।
ऐक त्या रामाची स्थिती । ते मी तुजप्रती सांगेन ॥ २६ ॥
वनवासी चीरवासी । अन्नावीण तो उपवासी ।
काय तूं त्यातें भोगिसी । भोगीं मजसीं त्रिविध भोग ॥ २७ ॥
गतविजयों श्रीरामचंद्र । गतश्रीक वनगोचर ।
त्यासी तूं काय भोगिसी सुंदर । भोगीं निरंतर भोग माझे ॥ २८ ॥
रामसी नाहीं शौर्यसाटोप । स्त्री हारविली अल्पतप ।
नाहीं परमकर्मप्रताप । धैर्यही स्वल्प श्रीरामा ॥ २९ ॥
धैर्येराम निधडा असता । तरी कां स्त्रीलागीं रडत पडता ।
झाडोझाडीं कां खेंव देतां । सीता सीता म्हणोनि ॥ ३० ॥
नाहीं धैर्य मजसमान । नाहीं राज्य मजसमान ।
नाहीं मजसीं समान धन । हीन दीन श्रीराम ॥ ३१ ॥
नाहीं यश मजसमान । नाहीं समान सेनाधन ।
न चले मजसीं आंगवण । हीन दीन श्रीराम ॥ ३२ ॥
नाहीं ज्ञान मजसमान । स्त्री हारविली अपेश गहन ।
वनोवनीं करी रूदन । हींन दीन श्रीराम ॥ ३३ ॥
श्रीरामाची कथावार्ता । तुज मी ऐकों नेंदी सर्वथा ।
मजपासुनि सुटलिया आतां । केंवी रघुनाथा पावसी ॥ ३४ ॥
व्यर्थ जातें तुझें यौवन । तें तंव नये वो परतोन ।
सेजे भोगीं दशानन । सुखसंपन्न तूं होसी ॥ ३५ ॥
परदारा स्वयें भोगितां । पाप लागेल लंकानाथा ।
राक्षसांची स्वधर्मता । ऐक आतां जानकीये ॥ ३६ ॥
आम्हीं हरोनि परनारी । बळेंचि भोगाव्या निजघरीं ।
परराज्याची थोरी । बळेंचि करी हरावी ॥ ३७ ॥
देव दैत्य दानव मानव । बळेंचि विभांडोनि सर्व ।
स्त्रियादि अपूर्व वैभव । आम्हीं स्वयमेव भोगावें ॥ ३८ ॥
आग्रह सांडोनि आपुला । सीते ऐक माझ्या बोला ।
राम अति दुःखे निमाला । प्राण दिधला लक्ष्मणें ॥ ३९ ॥
राम लक्ष्मण आहे कीं नाहीं । हा संदेह फिटला पाहवी ।
सुखें अनुसरें माझे ठायीं । म्हणोनि पायीं लागला ॥ ४० ॥
तुझी भीड म्यां धरिली भारी । राखिलीसे षण्मासांवरी ।
आंता भोगीन बलात्कारी । अंगीकारीं मज सीते ॥ ४१ ॥
आणा पालखी धरा छत्र । सीतेनें वरिला दशवक्त्र ।
निशाणें त्राहाटा रें सर्वत्र । करा गजर वाद्यांचा ॥ ४२ ॥
सीतेचा रोष :
ऐसे रावणाचें वचन । सीतेनें टाकिलें उपेक्षून ।
गजापासीं भुकें श्वान । दशानन तेवीं भुंके ॥ ४३ ॥
देखोनि उत्तम पक्क्वान । स्वयें वसवसिजे श्वान ।
रावण दहा तोंडाचें शुन । सीतेकारणें वसवसी ॥ ४४ ॥
देखोनि दहींभाताचा गोळा । झडपूं धांवे जेंवी कावळा ।
तेंवी देखोनि जनकबाळा । रावण काळा डोंबकाग ॥ ४५ ॥
रावणा देखोनियां सीता । अल्पही बाधा न बाधे चित्ता ।
बैसली असें निःशंकता । श्रीरघुनाथाचेनि नेटें ॥ ४६ ॥
सीता पतिव्रता आपण । सबाह्य श्रीराम परिपूर्ण ।
हें स्मरणेंवीण नित्यस्मरण । मानी रावण तृणप्राय ॥ ४७ ॥
ऐकोनि रावणाचें वचन । प्रलोभयुक्त समाधान ।
साधूपुढे भुंके श्वान । तत्समान मानी सीता ॥ ४८ ॥
जेंवी दहा तोंडाचें घुबड । तैसी रावणाची बडबड ।
ते सीतेसी न लागे गोड । तद्विधि चाड अपवित्र ॥ ४९ ॥
आभिषालागीं तळपे मासा । परदाराभोगीं रावण तैसा ।
श्रीरामबाणांचा पडेल फांसा । हें लंकेशा लक्षेना ॥ ५० ॥
कामसर्प लागला रावणासीं । कडू परदारा गोड होय त्यासी ।
लहरी येतां रामबाणेंसीं । क्षणार्धेंसीं निमेल ॥ ५१ ॥
असो हें सावधान सीता । लोकलज्जेच्या लौकिकार्था ।
आडकाडी करोनि हाता । लंकानाथा शिकवितसे ॥ ५२ ॥
सीतेचे परखड उत्तर, रावणाचा धिक्कार व अधिक्षेप :
जन्मोनि ब्रह्मयाचे वंशीं । रावणा भाग्यें वेद विभागिसी ।
तो तूं परदारा अभिलाषिसी । वृथा मरसी अधर्में ॥ ५३ ॥
जेंवी अशुची विकल्पवंता । ऋद्धि सिद्धी नये हाता ।
तेंवी मी सती श्रीरामकांता । तुज लंकानाथा अपवित्रा ॥ ५४ ॥
साळी भोज्य त्या शुकासी । सांडोनि जातां नारळीसी ।
तें फळ भक्षूं म्हणतां त्यासी । चंचुभंगेसीं तळमळी ॥ ५५ ॥
तेंवीं तूं त्यजूनि स्वदारा । भोगूं जातां परदारा ।
दुःखी होशील गा दशशिरा । बाणधारा श्रीरामाच्या ॥ ५६ ॥
तुझ्याचि स्त्रिया लंकानाथा । स्वइच्छे परपुरूषासीं रमतां ।
त्यांची तुज न मानें पवित्रता । दोहींच्या घाता तूं करिसी ॥ ५७ ॥
तेंवी मी श्रीरामांची कांता । तुजसी बोलणें अपवित्रता ।
कैंची अंगसंगाची कथा । मरसी वृथा अभिलाषें ॥ ५८ ॥
आत्मौपम्येन सर्वत्र । जो पाहे तो ज्ञाता नर ।
जैसी रक्षावी स्वदार । तैसी परदारा संरक्षीं ॥ ५९ ॥
म्हणसी श्रीराम जरी दूरी । परी तो तुज मजमाझारीं ।
नांदताहे निरंतरीं । त्याचि चोरी चालेना ॥ ६० ॥
भोईभेणें जो पळोनि जाये । जिकडे पाहे तिकडे भोये ।
तैसाचि श्रीराम माझा पाहें । सबाह्य आहे परिपूर्ण ॥ ६१ ॥
त्यासीं न चले चोरी मारी । तयाची भोगितां पैं नारी ।
घसा निवटील सेजेवरी । संसारा उरी उरों नेदी ॥ ६२ ॥
मजपासोनि न सुटे सीता । ऐसें बोलसी तें वृथा ।
रामें गिळिलासी लंकानाथा । सबाह्यता निवटोनि ॥ ६३ ॥
जोचि भोग स्वदारेंसीं । तोचि भोग परदारेंसीं ।
एकें पाविजे स्वधर्मासी । एकें नरकासी जाइजे ॥ ६४ ॥
जो भोग सूकरासूकरीसीं । तो भोग इंद्राउर्वसीसीं ।
भोगसमता सर्वांसी । परदारेपासीं अधःपात ॥ ६५ ॥
हित सांगे ते दशशिरा । सुखें भोगावी स्वदारा ।
मज अर्पावें श्रीरामचंद्रा । कुळगोत्ररक्षणार्थ ॥ ६६ ॥
परदारा ते तंव माता । सकळ संमत वेदशास्त्रार्था ।
मातृगामी परदारभोक्ता । अधः पाता जाशील ॥ ६७ ॥
ऐसें बोलोनि सीता सुंदरी । रावण महापापी भारी ।
त्याचें अवलोकन न करी । जाली पाठमोरी जानकी ॥ ६८ ॥
सीता होतांचि विमुख । जालें रावणा परमदुःख ।
क्रोधलोभशांतवनपूर्वक । दशमुख अनुवादे ॥ ६९ ॥
रावणाचा क्रोध व सीतेला धमकी :
ऐकोनि सीतेचें दुष्ट चिन्ह । क्रोधाविष्ट दशानन ।
सर्वांगेसीं कंपायमान । काय आपण बोलत ॥ ७० ॥
मी तंव स्वयें राक्षसराजा । देव दानव माझ्या प्रजा ।
दुष्ट वचनें अपमान माझा । श्रीरामभार्या तूं करिसी ॥ ७१ ॥
मज रावणा देखतां दृष्टीं । देव दानव कांपती पोटीं ।
तूं तंव धीट आहेस मोठी । वदसी गोष्टी अपमानें ॥ ७२ ॥
माझ्या स्त्रीपुत्रादेखतां । मज निर्भर्त्सिलें लंकानाथा ।
तुझ्या करावें म्यां घाता । परी स्त्री वधितां निषिद्ध ॥ ७३ ॥
तुझे अंगसंगाची आर्ती । कामक्रोधांची करीन शांती ।
तुझी मज अति प्रिती । वध तदर्थीं न करवे ॥ ७४ ॥
शेखीं तूं न देशी अंगसंग । तुझ्या करीन अंगभंग ।
वेगवेगळाले विभाग । तुझें सर्वांग छेदीन ॥ ७५ ॥
वानिसी श्रीरामाची शक्ती । तें तंव मनुष्य बापुडें किती ।
केंवी येईल लंकेप्रती । विचार चित्तीं न करिसी ॥ ७६ ॥
श्रीरामाच्या दैन्यावस्थेचे चित्रण :
सीता नेली लंकेसी । हें कोण सांगेल रामापासीं ।
दुर्घट मार्ग न कंठे त्यासीं । समुद्रासी काय करी ॥ ७७ ॥
श्रीराम बापुडें चरणचाली । सीताविरहें भुललें भुली ।
अगाध समुद्राची खोली । उतरवली केंवी जाय ॥ ७८ ॥
श्रीराम राक्षसां भातुकें । तें मी भक्षीन महाकौतुकें ।
लक्ष्मण गिळीन चुळोदकें । यथानुसुखें मज भजें ॥ ७९ ॥
तुज सीतेसी रामसंगती । कदा न घडे कल्पांतीं ।
मज अनुसरें अनन्यप्रीतीं । सांडी आसक्ती रामाची ॥ ८० ॥
पित्यानें दिधला दवडून । राज्यहीन स्वधर्महीन ।
नाहीं अन्न नाहीं धन । अति दीन श्रीराम ॥ ८१ ॥
नित्य तृणाचें शयन । मुखीं घालावया न मिळे पान ।
वनवासीं न मिळे अन्न । अति दीन श्रीराम ॥ ८२ ॥
नाहीं वस्त्र नाहीं भूषण । नाहीं अभ्यंग तैलमर्दन ।
जटा वळिल्या वल्कल परिधान । अति दान श्रीराम ॥ ८३ ॥
श्रीरामासी बळ असतें । तरी कां वनीं रडत राहतें ।
तयासी येववेना पैं येथें । राम निश्चितें अति दीन ॥ ८४ ॥
मजसमान नाहीं बळ । मजसमान नाहीं दळ ।
मजसी न करवे सळ । राम केवळ अति दीन ॥ ८५ ॥
बैसोनियां वनवासीं । जुंझावया राक्षसांसीं ।
रामे मेळविलें वानरांसी । तेही आम्हांसी निजभुक्ति ॥ ८६ ॥
श्रीराम होवोनि वनचर । वनीं मेळविले वानर ।
त्यांते गिळती निशाचर । भक्ष्य साचार ते आम्हां ॥ ८७ ॥
डमरूपुराणातील ऋषिभाष्य :
रावण सांगे साक्षेपूनी । ऋषिभाष्य डमरूपुराणीं ।
जें भाष्य ऐकिलें कानीं । तें सीते सावधानीं अवधारीं ॥ ८८ ॥
भवित्री रंभोरू त्रिदशवदनग्लानिरधुना
स ते रामः स्थाता न युधि पुरतो लक्ष्मणसखः ।
इयं यास्यत्युच्चैर्विपदमधुना वानरचमूः
लधिष्ठेदं षष्ठाक्षरविपरीलोपात्पठ पुन: ॥ १ ॥
रंभास्तंभगर्भ अति सुकुरू । त्याहूनि अरूवार तुझा ऊरू ।
यालागीं बोलिजें रंभोरू । श्लोकार्थ सादर अवलोकीं ॥ ८९ ॥
त्रिदशवदन जे का देव । थोर आपत्ती पावती सर्व ।
माझें रणीं भंगेल राघव । विमुख स्वयमेव लक्ष्मणेंसीं ॥ ९० ॥
माझिया कंदनाआंत । रणीं भंगलिया रघुनाथ ।
वानरें होतां वाताहत । राक्षस समस्त भक्षितील ॥ ९१ ॥
सीता सज्ञान बोले सुंदर । रावणा श्लोक हा साचार ।
लोपोनियां तिन्ही सप्ताक्षर । करी उच्चार श्लोकाचा ॥ ९२ ॥
रावणा तूं अति लघिष्ठ । मूर्खत्वें वाहसी दाही कंठ ।
सातवें अक्षर लोपोनि स्पष्ट । वाचीं घडघडाट श्लोकार्थ ॥ ९३ ॥
ऐकोनि भाष्य लंकानाथा । असत्य वचन न वदे सीता ।
श्लोकाचिया भविष्यार्था । सावधानता अवधारीं ॥ ९४ ॥
भविष्यार्थ आहे अति गहन । ग्लानि पावेल दशवदन ।
रणीं विजयी रघुनंदन । सखा लक्ष्मणसमवेत ॥ ९५ ॥
वानरसेना आघवी । उंचावेल विजयीगौरवीं ।
रावण निर्दळोनि राघवीं । रामराज्यपदवी तिहीं लोकीं ॥ ९६ ॥
सीतेनें कथिता श्लोकार्थ । कोपें तिचा करावया घात ।
रावणें उचलिला हात । वृक्षीं हनुमंत कोपला ॥ ९७ ॥
त्यामुळे रावण क्रोधायमान होऊन सीतेचा उपहास व निर्भर्त्सना :
रावणें उचलितां हात । सीता निर्भर्त्सी लंकानाथ ।
कामोन्मत्त गर्वोन्मत्त । मरणोन्मत्त जाहलासी ॥ ९८ ॥
कोपला देखोनि लंकानाथ । सीता मशकप्राय मानित ।
श्रीरामस्मरण अति समर्थ । निःशंक नित्य जानकी ॥ ९९ ॥
दुःखदायक रावणवचन । अखंडधारा वर्षे घन ।
तेणें डळमळेना सीतेचें मन । जेंवी कां गगन तिंबेना ॥ १०० ॥
रावणाचीं वचनें लाघवें । मानी मृगजळहेलावे ।
त्याचीं झाडावया गर्वपर्वें । निजानुभवें बोलत ॥ १०१ ॥
सीतेचें वचन अति गुह्यार्थ । स्वहित आणि परहित ।
दोहीं अर्थीं असतां समर्थ । शुद्ध शब्दार्थ अनुवादें ॥ १०२ ॥
जेंवी कां शुद्ध पुण्यकीर्ती । तीस नातळे अपकीर्ती ।
तैसी रावणाची दुष्ट दुरूक्ती । सीता सती स्पर्शेना ॥ १०३ ॥
देव दानव सेवा करिती । लंकाराज्य यश : कीर्ती ।
यावरी जोडिली अपकीर्ती । सीता सती चोरोनि ॥ १०४ ॥
शिवाचा सेवक प्रसिद्धू । चोरितां श्रीरामाची वधू ।
ऐसा रावण बुद्धिमंदू । पापबाद्ध जालासी ॥ १०५ ॥
चोरी करोनि लंकानाथा । पळूं पाहसी तूं केउता ।
श्रीराम बाणाचे आघाता । तुज कोण आतां राखील ॥ १०६ ॥
धाता पिता सोम सविता । अनळ यम विधाता ।
कोपलिया श्रीरघुनाथा । हे सर्वथा न राखिती ॥ १०७ ॥
लपों जातां शिवपुरीं । शिव मारील त्रिशूळेंकरी ।
माझिया स्वामीची चोरिली नारी । प्रत्यक्ष वैरी तूं माझा ॥ १०८ ॥
श्रीरामकांता जगत्त्रयजननी । विशेषे माझी गुरूपत्नी ।
कां चोरिली हे अभिलाषोनी । तृतीयनयनीं जाळील ॥ १०९ ॥
यापरी गा लंकानाथा । चोरिलिया श्रीरामकांता ।
कोणी नाहीं गा रक्षिता । तुज तत्वतां मारील ॥ ११० ॥
म्हणसी मज आहे दळबळ । श्रीराम एकाकी निर्बळ ।
श्रीरामांचें बळ प्रबळ । ऐक प्रांजळ सांगेन ॥ १११ ॥
ताटका मारिली आणि सुबाहु । मारीच मारिला त्याचा भाऊ ।
विरोध करितां गर्व बहु । रणगौरवु बाणें एकें ॥ ११२ ॥
एकलेनि बाणें रामें जाण । चवदा सहस्त्र राक्षसगण ।
त्रिशिरा मारिला खर दूषण । रणकंदन जनस्थानीं ॥ ११३ ॥
लाज नाहीं तुजलागूनी । शूर्पणखा सखी भगिनी ।
तिचें नाक कान कापूनी । विटंबोनी धाडिली ॥ ११४ ॥
तुज येतां तिच्या कैवारी । प्रथम जाहलासी भिकारी ।
चोरोनि श्रीरामाची अंतुरी । भयेंकरीं पळालासी ॥ ११५ ॥
मुख न दावितां रामासी । बाणभये पळालासी ।
धाकें लंकेमाजि लपसी । आणि जल्पसी वाढिव ॥ ११६ ॥
जटायूसीं करितां रण । मजदेखतां आपण ।
दांती तुवां धरिलें तृण । काय आंगवण वानिसी ॥ ११७ ॥
मारूतीचा विस्मय :
सीता निर्भत्सी लंकानाथ । हनुमान हांसे वृक्षावरूतें ।
देखोनि जानकीचा पुरूषार्थ । अति विस्मित वानर ॥ ११८ ॥
श्रीरामें मारूनि खर दूषण । दोघे बंधु स्वयें बैसोन ।
वांटा केला आपणा आपण । सावधान अवधारीं ॥ ११९ ॥
ज्येष्ठ वांटा श्रीराम द्विगुण । रावण आणि कुंभकर्ण ।
कनिष्ठ वांटा लक्ष्मण । इंद्रजित जाण एकाकी ॥ १२० ॥
उद्भट वीर वाढिवेंसी । वांटा दिधला हनुमंतासी ।
शिष्टाई दिधली अंगदासी । नळनीळांसी सेतुबंध ॥ १२१ ॥
येर समस्त सैन्यासी । श्रीरामें दिधलें सुग्रीवासीं ।
वीरवृतिविभागांसी । वानरांसी समजावी ॥ १२२ ॥
श्रीराममाहात्म्य
श्रीराम स्वयें सच्चिदानंदघन । त्यासीं तूं म्हणसी अति दीन ।
श्रीरामाचे महिमान । सावधान अवधारीं ॥ १२३ ॥
श्रीरामनाम नित्यस्मरणीं । शिव वंदित पायवणी ।
ब्रह्मा घाली लोटांगणी । देवां शिरोमणि श्रीराम ॥ १२४ ॥
एकांतीं बैसोनि चंद्रचूडे । नित्य श्रीरामनाम पढे ।
त्यांतें निंदिजे तुवां मूढें । मरण रोकडें तुज आलें ॥ १२५ ॥
जो जो श्रीरामाची निंदा करी । शिव साक्षेपें त्यातें मारी ।
आपुला स्वामी तुंवा केला वैरी । मूर्ख संसारीं तूं एक ॥ १२६ ॥
श्रीरामनिंदेमुळे सीता क्रुद्ध होते :
श्रीराम निंदितां जाणा । जिव्हा झडेल गा रावणा ।
होसिल नरकाचा पाहुणा । आंदणा महादुःखा ॥ १२७ ॥
निंदिता देखानि रघुनंदन । सीता जाली कोपायमान ।
रावणा तुझें भस्म करीन । अर्ध क्षण न लागतां ॥ १२८ ॥
बळेंचि भोगीन म्हणसी सीता । आणि निंदिता श्रीरघुनाथा ।
तुझें भस्म करीन आतां । क्षण न लागतां रावणा ॥ १२९ ॥
क्रोधाचा संयम, कामक्रोधाचे परिणाम :
परी आज्ञा समर्थ रघुनाथा । लागलिया अति आघाता ।
कोप न यावा सर्वथा । केंवी लंकानाथा भस्म करूं ॥ १३० ॥
आंगा येतां क्रोधसंग । अपवित्र होय सर्वांग ।
ब्रह्मचर्या होय भंग । तपा संहार होय क्रोधे ॥ १३१ ॥
यज्ञदानव्रतदक्षिणा । कोप येतांचि पैं जाणा ।
सर्व क्रियाकर्म व्यर्थ जाणा । करी उगाणा तपाचा ॥ १३२ ॥
छिद्र पडतां घट गळे । क्रोधानळें तप जळे ।
योगी संन्यासी पडती मैळे । क्रोधें निजबळें गांजिले पैं ॥ १३३ ॥
बाह्य मांगाचा विटाळ । जलमार्जनें फिटे मळ ।
क्रोध अतिशयें चांडाळ । नव्हे निर्मळ प्रयागीं ॥ १३४ ॥
करितां काशीवासस्नान । तंव क्रोध खवळे गहन ।
क्रोधाऐसा पापी पूर्ण । नाहीं आन संसारीं ॥ १३५ ॥
काम क्रोध लोभ जाणें । हे नरकाचें पाहुणे ।
तिन्ही त्यजावे आपणें । आज्ञा संपूर्ण रामाची ॥ १३६ ॥
श्रीरामाज्ञा प्रतिपाळितां । क्रोध आतळों नेदी चित्ता ।
तेणें वांचलासी लंकानाथा । अपघाता चुकलासी ॥ १३७ ॥
रावणाला भावी घटनांचे कथन :
आतां मी वांचलों तत्वतां । ऐसें न मानीं लंकानाथा ।
करील श्रीराम तुझ्या घाता । हेही कथा अवधारीं ॥ १३८ ॥
श्रीरामधनुष्याचा ध्वनी । पडतांचि लंकाभुवनीं ।
राक्षस पडती मूर्च्छापन्नीं । त्रिकूट खचोनी पडें धाकें ॥ १३९ ॥
पायीं उतरोनी अपांपती । शरवृष्यिसंपातीं ।
वीरें वीर पडती क्षितीं । अश्वगजरथीसमवेत ॥ १४० ॥
इंद्रजित लक्ष्मणाचा भाग जाण । तो निकुंबळे घालील खाण ।
मेघनादाचा घेईल प्राण । शस्त्रें दारूण वर्षोनी ॥ १४१ ॥
श्रीराम विंधोनियां जाण । बाणीं फोडील कुंभकर्ण ।
रावणा तुझा घेईल प्राण । अर्ध क्षण न लागतां ॥ १४२ ॥
जेंवी थिल्लरी अल्प जळ । रवि शोषितां न लगे वेळ ।
तेंवी श्रीरामाचे बाण प्रबळ । प्राण तत्काळ घेतील ॥ १४३ ॥
राजया उन्माद कामासक्तीं । तोहि काम अधर्मरतीं ।
त्याचीं राष्ट्रें पुरें नासती । राज्यसंपत्ती समवेत ॥ १४४ ॥
लंका रत्नाढ्य कनकगिरी । रावणा तुझी परदारचोरी ।
भस्म होईल क्षणामाझारी । सहपरिवारीं सहपुत्र ॥ १४५ ॥
रामबाणाचा महिमा :
निवारेल वज्रधार । निवारेल काळचक्र ।
परी श्रीरामाचा बाण अनिवार । दशशिरवधार्थ ॥ १४६ ॥
पाठीं लागलिया काका । ज्याचे हातींची दर्भशिखा ।
नावरेचि तिंहीं लोका । शिवादिकांसमवेत ॥ १४७ ॥
त्या रामाचे सकोप बाण । येथें निवारूं शकेल कोण ।
घेतील राक्षसांचा प्राण । मुख्य रावणा लक्षूनी ॥ १४८ ॥
म्हणसी सबळ दशानन । राम नव्हे मजसमान ।
श्रीराम सिंह तूं श्वान । पलायमान होसी चोरा ॥ १४९ ॥
रावणाची निर्भर्त्सना :
मुखीं धरोनि पक्वान्न । हडहड करितां पळे श्वान ।
सीता चोरून चिद्रत्न । पलायमान तूं तैसा ॥ १५० ॥
श्रीराम चिन्मात्र गजेन्द्रु । रावण विषयाचा काळेन्द्रु ।
घरींचियांवरी करी कुरूकुरू । श्रीरामासामोरू न राहवे ॥ १५१ ॥
तूं तंव शूर्पणखेसमान । चोरी करोनि शूर पूर्ण ।
त्यावरीही बुचाट आंगवण । काळें वदन रावणा ॥ १५२ ॥
रावणाचा क्रोध :
ऐकोनि सीतेचा अनुवाद । रावणा आला सुबद्ध क्रोध ।
तिचा करावया वध । जाहला सिद्ध साटोपें ॥ १५३ ॥
सीतावचनाचे बाणाग्रीं । रावण खोंचला जिव्हारीं ।
दांत खांवोनियां करकरीं । नेत्र वटारीं अति क्रोधें ॥ १५४ ॥
संतापक्रोधे उचंबळे । फोडा इचे दोन्ही डोळे ।
वेगें मोडा रे सिसाळें । अंत्रमाळा काढा इच्या ॥ १५५ ॥
जिव्हा छेदा रे सवेग । वेगीं करा अंगभंग ।
विदारोनियां अष्टांग । भिन्न भाग करा इचे ॥ १५६ ॥
मारूतीचा आवेश :
तिचा करावया घात । रावण शस्त्रेंसीं धांवत ।
तें दिखोनियां हनुमंत । रागें कांपत थरथरां ॥ १५७ ॥
हात दोनी कुसकरी । पुच्छ भोवंडी चक्राकारीं ।
शेंडी माथेवरी थरारी । वृक्षावरी पिलंगत ॥ १५८ ॥
डोळे भोवंडित गरगरां । दांत खातसे करकरां ।
रोमें थरकती थरथरां । आला वानरा अति कोप ॥ १५९ ॥
सीतेसी लावितां हात । करीन रावणाचा घात ।
येणें साटोपें हनुमंत । घुलकावित वृक्षेंसीं ॥ १६० ॥
कोपला देखोनि वानरा । हाहाकार सुरवरां ।
कोपला देखोनि दशशिरा । स्त्रिया समग्र कांपती ॥ १६१ ॥
मंदोदरीचे आगमन :
सीता गांजिता रोकडी । हनुमंत जंव न घाली उडी ।
मंदोदरीची प्रज्ञा गाढी । आली तांतडी ते संधी ॥ १६२ ॥
खड्ग घेवोनि लंकानाथ । करितां सीतेचा पैं घात ।
मंदोदरी धांवोनि तेथ । धरिला हात खड्गाचा ॥ १६३ ॥
मंदोदरी धरितां हात । दचकलासें लंकानाथ ।
हनुमान वृक्षीं राहे गुप्त । पुढील कथार्थ अवधारा ॥ १६४ ॥
ऋषिरामायणाआंत । सीतारावणशब्दोन्मथित ।
कथा आहे अत्यद्भुत । तितका ग्रंध न धरेचि ॥ १६५ ॥
कथा सांगतां संकळित । इतका वाढला पैं ग्रंथ ।
वदनीं वदविता श्रीरघुनाथ । गुह्य गुह्यार्थ तो जाणें ॥ १६६ ॥
श्रीराम आणि जनार्दन । दोहींमाजी ब्रह्म परिपूर्ण ।
एकाजनार्दना शरण । कथा पावन श्रीरामें ॥ १६७ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणें सुंदरकांडे एकाकारटीकायां सीतारावणसंभाषणं नाम अष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥
॥ ओव्यां १६७ ॥ श्लोक १ ॥ एवं संख्या १६८ ॥
GO TOP
|