[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। षण्णवतितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
त्रस्तानां वन्यमृगाणां पलायनहेतुमभिज्ञातुं श्रीरामस्य सौमित्रिं प्रत्यादेशः, लक्ष्मणेन शालवृक्षमारुह्य भरतसैन्यनिरीक्षणं तं प्रति
स्वरोषपूर्णोद्‌गारस्य प्रकटनम् -
वन-जंतूंच्या पळून जाण्याचे कारण जाणण्यासाठी श्रीरामाच्या आज्ञेने लक्ष्मणांचे शालवृक्षावर चढून भरताची सेना पाहणे आणि त्यांच्या प्रति आपले रोषपूर्ण उद्‌गार प्रकट करणे -
तां तदा दर्शयित्वा तु मैथिलीं गिरिनिम्नगाम् ।
निषसाद गिरिप्रस्थे सीतां मांसेन छन्दयन् ॥ १ ॥
याप्रकारे मैथिली सीतेला मंदाकिनी नदीचे दर्शन करवून त्या समयी श्रीराम पर्वताच्या समतल प्रदेशात तिच्यासह बसले आणि तपस्वी जनांच्या उपभोगात आणण्यायोग्य फलमूलाच्या गराने तिची मानसिक प्रसन्नता वाढविण्याचा प्रयत्‍न - तिचे लालन करू लागले. ॥ १ ॥
इदं मेध्यमिदं स्वादु निष्टप्तमिदमग्निना ।
एवमास्ते स धर्मात्मा सीतया सह राघवः ॥ २ ॥
धर्मात्मा राघव सीतेसह या प्रकारे गोष्टी करीत होते - 'प्रिये ! हे फळ परम पवित्र आहे. ते खूप स्वादिष्ट आहे. तसेच हा कंद विस्तवावर चांगल्या प्रकारे भाजला गेला आहे. ॥ २ ॥
तथा तत्रासतस्तस्य भरतस्योपयायिनः ।
सैन्यरेणुश्च शब्दश्च प्रादुरास्तां नभस्पृशौ ॥ ३ ॥
या प्रकारे ते त्या पर्वतीय प्रदेशात बसलेलेच होते की इतक्यात त्यांच्याजवळ येणारी भरताची सेना धूळ उडवत आणि कोलाहल करीत एकदमच प्रकट करून आकाशात पसरवू लागली. ॥ ३ ॥
एतस्मिन्नन्तरे त्रस्ताः शब्देन महता ततः ।
अर्दिता यूथपा मत्ताः सयूथाद् दुद्रुवुर्दिशः ॥ ४ ॥
याच अवधीत सेनेच्या महान् कोलाहलाने भयभीत आणि पीडित होऊन हत्तींचे कित्येक मत्त यूथपति आपल्या कळपांसह संपूर्ण दिशांना पळू लागले. ॥ ४ ॥
स तं सैन्यसमुद्धूतं शब्दं शुश्राव राघवः ।
तांश्च विप्रद्रुतान् सर्वान् यूथपानन्ववैक्षत ॥ ५ ॥
राघवांनी सेनेपासून प्रकट झालेला तो महान कोलाहल ऐकला आणि पळून जाणार्‍या त्या समस्त यूथपतिंनाही पाहिले. ॥ ५ ॥
तांश्च विप्रद्रुतान् दृष्ट्‍वा तं च श्रुत्वा महास्वनम् ।
उवाच रामः सौमित्रिं लक्ष्मणं दीप्ततेजसम् ॥ ६ ॥
त्या पळून जाणार्‍या हत्तींना पाहून आणि तो महाभयंकर शब्द ऐकून श्रीराम उद्दीप्त तेजसंपन्न सौमित्री लक्ष्मणास म्हणाले - ॥ ६ ॥
हन्त लक्ष्मण पश्येह सुमित्रा सुप्रजास्त्वया ।
भीमस्तनितगम्भीरं तुमुलः श्रूयते स्वनः ॥ ७ ॥
'लक्ष्मण ! या जगात तुझ्यामुळेच माता सौमित्रा श्रेष्ठ पुत्रवती झाली आहे. पहा तर खरे ! या भयंकर गर्जनेबरोबर कसा गंभीर तुमुल नाद ऐकू येत आहे. ॥ ७ ॥
गजयूथानि वारण्ये महिषा वा महावने ।
वित्रासिता मृगाः सिंहैः सहसा प्रद्रुता दिशः ॥ ८ ॥

राजा वा राजपुत्रो वा मृगयामटते वने ।
अन्यद्वा श्वापदं किञ्चित् सौमित्रे ज्ञातुमर्हसि ॥ ९ ॥
सौमित्र ! या विशाल वनात ह्या हत्तींच्या झुंडी अथवा रेडे अथवा मृग जे एकाएकी सर्व दिशांना पळून चालले आहेत त्याचे कारण तरी काय आहे याचा जरा पत्ता लाव बरे. यांना सिंहाने तर भयभीत केलेले नाही ना ? अथवा कोणी राजा किंवा राजकुमार या वनात येऊन शिकार तर खेळत नाही ना ? अथवा दुसरा कोणी हिंस्र जंतु तर प्रकट झालेला नाही ना ? ॥ ८-९ ॥
सुदुश्चरो गिरिश्चायं पक्षिणामपि लक्ष्मण ।
सर्वमेतद् यथातत्त्वमभिज्ञातुमिहार्हसि ॥ १० ॥
'लक्ष्मणा ! या पर्वतावर अपरिचित पक्ष्यांचे येणे जाणेही अत्यं कठीण आहे, मग येथे कुणा हिंस्र जंतुचे किंवा राजाचे आक्रमण होणे कसे संभव आहे ? म्हणून या सर्व गोष्टींची यथावत् माहिती मिळव'. ॥ १० ॥
स लक्ष्मणः संत्वरितः सालमारुह्य पुष्पितम् ।
प्रेक्षमाणो दिशः सर्वाः पूर्वां दिशमवैक्षत ॥ ११ ॥
भगवान् श्रीरामांची आज्ञा मिळताच लक्ष्मण तात्काळच फुलांनी डवरलेल्या एका विशाल वृक्षावर चढले आणि संपूर्ण दिशांकडे पहात त्यांनी पूर्व दिशेकडे दृष्टिपात केला. ॥ ११ ॥
उदङ्‌मुखः प्रेक्षमाणो ददर्श महतीं चमूम् ।
रथाश्वगजसम्बाधां यत्तैर्युक्तां पदातिभिः ॥ १२ ॥
त्यानंतर त्यांनी उत्तरेकडे तोंड करून पाहिल्यावर त्यांना एक विशाल सेना दिसून आली, जी हत्ती, घोडे आणि रथांनी परिपूर्ण तसेच प्रयत्‍नशील पायदळांतील सैनिकांनी संयुक्त होती. ॥ १२ ॥
तामश्वरथसम्पूर्णां रथध्वजविभूषिताम् ।
शशंस सेनां रामाय वचनं चेदमब्रीत् ॥ १३ ॥
घोडे आणि रथांनी भरलेल्या तसेच रथाच्या ध्वजाने विभूषित त्या सेनेची सूचना त्यांनी रामांना दिली आणि ही गोष्ट सांगितली - ॥ १३ ॥
अग्निं संशमयत्वार्यः सीता च भजतां गुहाम् ।
सज्यं कुरुष्व चापं च शरांश्च कवचं तथा ॥ १४ ॥
'आर्य ! आता आपण अग्नि विझवून टाका. (नाहीतर धूर पाहून ती सेना येथे चालून येईल). देवी सीता गुफेत बसू दे. आपण आपल्या धनुष्यावर प्रत्यंचा चढवा आणि बाण आणि कवच धारण करावे'. ॥ १४ ॥
तं रामः पुरुषव्याघ्रो लक्ष्मणं प्रत्युवाच ह ।
अङ्‌गावेक्षस्व सौमित्रे कस्येमां मन्यसे चमूम् ॥ १५ ॥

एवमुक्तस्तु रामेण लक्ष्मणो वाक्यमब्रवीत् ।
दिधक्षन्निव तां सेनां रुषितः पावको यथा ॥ १६ ॥
हे ऐकून पुरुषसिंह रामांनी लक्ष्मणास म्हटले - 'प्रिय सौमित्र ! चांगल्या रितीने पहा तर खरे ! तुमच्या समजुतीप्रमाणे ही कोणाची सेना असू शकेल ? श्रीरामांनी असे म्हटल्यावर लक्ष्मण अग्निदेवाप्रमाणे त्या सेनेकडे अशा तर्‍हेने पाहू लागला की जणू तिला जाळून भस्म करू इच्छित आहेत, आणि या प्रकारे म्हणाले - ॥ १५-१६ ॥
सम्पन्नं राज्यमिच्छंस्तु व्यक्तं प्राप्याभिषेचनम् ।
आवां हन्तुं समभ्येति कैकेय्या भरतः सुतः ॥ १७ ॥
बंधु ! निश्चितच हा कैकयीचा पुत्र भरत आहे, जो अयोध्येत अभिषिक्त होऊन आपल्या राज्याला निष्कंटक बनविण्याच्या इच्छेने आपल्या दोघांना ठार मारण्यासाठी येथे येत आहे. ॥ १७ ॥
एष वै सुमहाञ्छ्रीमान् विटपी सम्प्रकाशते ।
विराजत्युज्ज्वलस्कन्धः कोविदारध्वजो रथे ॥ १८ ॥
'समोरच्या बाजूला हा जो फार मोठा शोभासंपन्न वृक्ष दिसून येत आहे त्याच्याजवळ जो रथ आहे, त्यावर उज्ज्वल झाडाच्या खोडाने युक्त कोविदार वृक्षाने चिन्हीत ध्वज शोभत आहे. ॥ १८ ॥
भजन्त्येते यथा काममश्वानारुह्य शीघ्रगान् ।
एते भ्राजन्ति संहृष्टा गजानारुह्य सादिनः ॥ १९ ॥
'हे घोडेस्वार सैनिक इच्छेनुसार शीघ्रगामी घोड्यांवर आरूढ होऊन इकडेच येत आहेत. आणि हे हत्तीस्वारही मोठ्या हर्षाने हत्तींच्या वर चढून येताना प्रकाशित होत आहेत. ॥ १९ ॥
गृहीतधनुषावावां गिरिं वीर श्रयावहे ।
अथवेहैव तिष्ठावः सन्नद्धावुद्यतायुधौ ॥ २० ॥
'वीरा ! आपण दोघांनी धनुष्य घेऊन पर्वत शिखरावर गेले पाहिजे. अथवा कवच बांधून अस्त्र-शस्त्र धारण करून येथेच खिळून राहिले पाहिजे. ॥ २० ॥
अपि नौ वशमागच्छेत् कोविदारध्वजो रणे ।
अपि द्रक्ष्यामि भरतं यत्कृते व्यसनं महत् ॥ २१ ॥

त्वया राघव सम्प्राप्तं सीतया च मया तथा ।
यन्निमित्तं भवान् राज्याच्च्युतो राघव शाश्वतात् ॥ २२ ॥
'राघव ! आज हा कोविदार चिन्हांनी युक्त ध्वजा असणारा रथ रणभूमीमध्ये आपल्या दोघांच्या अधिकारात येऊन जाईल. आणि आज मी आपल्या इच्छेनुसार त्या भरतालाही समोर पाहीन; ज्याच्यामुळे आपल्याला, सीतेला आणि मलाही महान संकटाशी सामना करावा लागत आहे. तसेच ज्याच्यामुळे आपण आपल्या सनातन राज्याधिकारापासून वंचित केले गेले आहात. ॥ २१-२२ ॥
सम्प्राप्तोऽयमरिर्वीर भरतो वध्य एव हि ।
भरतस्य वधे दोषं नाहं पश्यामि राघव ॥ २३ ॥
'वीर राघव ! हा भरत आमचा शत्रु आहे आणि समोर आलेला आहे म्हणून वधासच योग्य आहे. भरताचा वध करण्यात मला काहीही दोष दिसून येत नाही. ॥ २३ ॥
पूर्वापकारिणं हत्वा न ह्यधर्मेण युज्यते ।
पूर्वापकारी भरतस्त्यागेऽधर्मश्च राघव ॥ २४ ॥
'राघवा ! जो पहिल्यापासून अपकारी राहिलेला असेल त्याला मारून कोणी अधर्माचा भागी होत नाही. भरताने प्रथम आपला अपकार केला आहे, म्हणून त्याला मारण्यात नव्हे तर जिवंत सोडण्यातच अधर्म आहे. ॥ २४ ॥
एतस्मिन् निहते कृत्स्नामनुशाधि वसुंधराम् ।
अद्य पुत्रं हतं सङ्‌ख्ये कैकेयी राज्यकामुका ॥ २५ ॥

मया पश्येत् सुदुःखार्ता हस्तिभिन्नमिव द्रुमम् ।
'भरत मारला गेला की आपण समस्त वसुधेचे शासन करावे. ज्याप्रमाणे हत्ती एखाद्या वृक्षाला मोडून टाकतो, त्याप्रकारे राज्याचा लोभ करणारी कैकेयी आज अत्यंत दुःखाने आर्त होऊन त्याला माझ्याद्वारे युद्धात मारला गेलेला पाहील. ॥ २५ १/२ ॥
कैकेयीं च वधिष्यामि सानुबन्धां सबान्धवाम् ॥ २६ ॥

कलुषेणाद्य महता मेदिनी परिमुच्यताम् ।
'मी कैकेयीचाही तिच्या सगे-सोयर्‍यांसकट आणि बंधु-बांधवांसह वध करून टाकीन. आज ही पृथ्वी कैकेयीरूपी महान पापापासून मुक्त होऊन जाईल. ॥ २६ १/२ ॥
अद्येमं संयतं क्रोधमसत्कारं च मानद ॥ २७ ॥

मोक्ष्यामि शत्रुसैन्येषु कक्षेष्विव हुताशनम् ।
'मानद ! आज मी आपल्या रोखून धरलेल्या क्रोधाला आणि तिरस्काराला शत्रुच्या सेनेवर अशा प्रकारे सोडेन; जशी वाळलेल्या गवताच्या ढीगाला आग लावून दिली जावी. ॥ २७ १/२ ॥
अद्यैव चित्रकूटस्य काननं निशितैः शरैः ॥ २८ ॥

छिन्दञ्छत्रुशरीराणि करिष्ये शोणितोक्षितम् ।
'आपल्या तीक्ष्ण बाणांनी शत्रुपक्षातील योद्ध्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून मी आत्ताच या चित्रकूट वनाला रक्ताने माखून टाकतो. ॥ २८ १/२ ॥
शरैर्निर्भिन्नहृदयान् कुञ्जरांस्तुरगांस्तथा ॥ २९ ॥

श्वापदाः परिकर्षन्तु नरांश्च निहतान् मया ।
'आपल्या तीक्ष्ण बाणांनी विदीर्ण झालेल्या हृदयाच्या हत्ती आणि घोड्यांना तसेच माझ्या हाताने मारल्या गेलेल्या मनुष्यांनाही गिधाडे आदि मांसभक्षी जंतू इकडे तिकडे ओढून नेवोत. ॥ २९ १/२ ॥
शराणां धनुषश्चाहमनृणोऽस्मिन् महावने ।
ससैन्यं भरतं हत्वा भविष्यामि न संशयः ॥ ३० ॥
'या महान वनात सेनेसहित भरताचा वध करून मी धनुष्य आणि बाणांच्या ऋणातून मुक्त होऊन जाईन यात संशय नाही. ॥ ३० ॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे षण्णवतितमः सर्गः ॥ ९६ ॥
या प्रकारे श्रीवाल्मिकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा शहाण्णवावा सर्ग पूरा झाला ॥ ९६ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP