[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ एकोनविंश: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
रावणं दृष्ट्‍वा दुःखभयचिन्तासु मग्नायाः सीताया अवस्था -
रावणास पाहून दु:ख, भय आणि चिन्तेत बुडलेल्या सीतेच्या अवस्थेचे वर्णन -
तस्मिन्नेव ततः काले राजपुत्री त्वनिन्दिता ।
रूपयौवनसम्पन्नं भूषणोत्तमभूषितम् ॥ १ ॥

ततो दृष्ट्‍वैव वैदेही रावणं राक्षसाधिपम् ।
प्रावेपत वरारोहा प्रवाते कदली यथा ॥ २ ॥
त्या समयी अनिन्दिता अशा सुन्दर राजकुमारी सीतेने जेव्हा उत्तमोत्तम आभूषणांनी विभूषित तथा रूपयौवन संपन्न अशा राक्षसराज रावणास येतांना पाहिले तेव्हा झंझावाताने थरथर कांपणार्‍या कर्दळीप्रमाणे ती भयाने थरथर कापू लागली. ॥१-२॥
ऊरुभ्यामुदरं छाद्य बाहुभ्यां च पयोधरौ ।
उपविष्टा विशालाक्षी रुदती वरवर्णिनी ॥ ३ ॥
सुन्दर कान्ति असणार्‍या विशाललोचना जानकीने आपल्या मांड्यानी उदर आणि दोन्ही भुजांनी आपले स्तन झांकून घेतले आणि ती तेथे बसल्या बसल्या रडू लागली. ॥३॥
दशग्रीवस्तु वैदेहीं रक्षितां राक्षसीगणैः ।
ददर्श सीतां दुःखार्तां नावं सन्नामिवार्णवे ॥ ४ ॥

असंवृतायामासीनां धरण्यां संशितव्रताम् ।
छिन्नां प्रपतितां भूमौ शाखामिव वनस्पतेः ॥ ५ ॥
राक्षसीणींच्या पहार्‍यात राहणारी विदेहराजकुमारी सीता अत्यन्त दीन आणि दु:खी झाली होती. समुद्रात जीर्ण शीर्ण होऊन बुडणार्‍या नौकेप्रमाणे ती दु:खसागरात निमग्न झाली होती. अशा अवस्थेत दशग्रीव रावणाने तिला पाहिले. ती आसनाखेरिज उघड्या जमिनीवर बसलेली होती आणि वृक्षाच्या तोडून जमिनीवर पडलेल्या फान्दीप्रमाणे दिसत होती. तिच्या द्वारे अत्यन्त कठोर व्रताचे पालन केले जात होते. ॥४-५॥
मलमण्डनदिग्धाङ्‌गीं मण्डनार्हाममण्डनाम् ।
मृणाली पङ्‌कदिग्धेव विभाति न विभाति च ॥ ६ ॥
तिच्या अंगावर अंगरागा ऐवजी मळ जमा झालेला होता. ती आभूषणे आणि शृंगार धारण करण्यास योग्य असूनही त्या सर्वांपासून वंचित झाली होती आणि चिखलाने लडबडलेल्या कमळनालाप्रमाणे शोभत होतीही आणि नव्हतीही. (कमळनाल ज्याप्रमाणे सुकुमारतेमुळे शोभून दिसतो पण चिखलाने बरबटल्यामुळे शोभत नाही, त्याप्रमाणे ती आपल्या सहज सौन्दर्याने सुशोभित असूनही मलीनतेमुळे शोभून दिसत नव्हती.) ॥६॥
समीपं राजसिंहस्य रामस्य विदितात्मनः ।
सङ्‌कल्पहयसंयुक्तैर्यान्तीमिव मनोरथैः ॥ ७ ॥
संकल्परूपी घोडे ज्यास जोडलेले आहेत अशा मनोमय रथावर आरूढ होऊन आत्मज्ञानी राजसिंह भगवान श्रीरामांच्या समीप जात असल्याप्रमाणे ती प्रतीत होत होती. ॥७॥
शुष्यन्तीं रुदतीमेकां ध्यानशोकपरायणाम् ।
दुःखस्यान्तमपश्यन्तीं रामां राममनुव्रताम् ॥ ८ ॥
तिचे शरीर सुकून चालले होते. ती एकटीच बसून रडत होती आणि श्रीरामचन्द्रांच्या ध्यानात आणि त्यांच्या वियोगजनित शोकात निमग्न होत होती, बुडून जात होती. आपल्या दु:खाचा कधी शेवट होईल असे तिला वाटत नव्हते. ती श्रीरामचन्द्रांच्या ठिकाणी अनुराग असणारी त्यांची रमणीय भार्या होती. ॥८॥
चेष्टमानामथाविष्टां पन्नगेन्द्रवधूमिव ।
धूप्यमानां ग्रहेणेव रोहिणीं धूमकेतुना ॥ ९ ॥
ज्याप्रमाणे नागराजाची वधू (नागीण) मणीमन्त्रादिंनी अभिभूत होऊन तडफडू लागते, त्याप्रमाणेच सीताही पति वियोगाने तळमळत होती तथा धूम्र वर्णाच्या केतु ग्रहाने ग्रस्त झालेल्या रोहिणी प्रमाणे सन्तप्त झाली होती. ॥९॥
वृत्तशीलकुले जातामाचारवति धार्मिके ।
पुनःसंस्कारमापन्नां जातामिव च दुष्कुले ॥ १० ॥
जरी ती सदाचारी आणि सुशील कुळात जन्मली होती आणि नन्तर धार्मिक आणि उत्तम आचार विचारशील कुळान्त दिली गेली होती (विवाह संस्काराने संपन्न झाली होती) तरी यासमयी दूषित कुळात उत्पन्न झालेल्या स्त्रीप्रमाणे मलीन दिसत होती. ॥१०॥
सन्नामिव महाकीर्तिं श्रधामिव विमानिताम् ।
प्रज्ञामिव परिक्षीणां आशां प्रतिहतामिव ॥ ११ ॥

आयतीमिव विध्वस्तां आज्ञां प्रतिहतामिव ।
दीप्तामिव दिशं काले पूजामपहतामिव ॥ १२ ॥

पौर्णमासीमिव निशां तमोग्रस्तेन्दुमण्डलाम् ।
पद्मिनीमिव विध्वस्तां हतशूरां चमूमिव ॥ १३ ॥

प्रभामिव तमोध्वस्तामुपक्षीणामिवापगाम् ।
वेदीमिव परामृष्टां शान्तामग्निशिखामिव ॥ १४ ॥
ती क्षीण झालेल्या महाकीर्तीप्रमाणे, तिरस्कृत झालेल्या श्रद्धेप्रमाणे, सर्वथा ह्रास पावलेल्या पूजाद्रव्याप्रमाणे, भग्न झालेल्या आशेप्रमाणे, नष्ट झालेल्या भविष्याप्रमाणे अथवा लाथाडलेल्या देवपूजेप्रमाणे, हिमपाताने उध्वस्त कमलिनीप्रमाणे, जिच्यान्तील शूरवीर मारले गेले आहेत अशा सेनेप्रमाणे, अन्ध:काराने नष्ट झालेल्या प्रभेप्रमाणे, क्षीण म्हणजे अल्पजल असलेल्या नदीप्रमाणे, पतितांच्या स्पर्शाने अशुद्ध झालेल्या वेदीप्रमाणे, विझलेल्या दीपशिखे (अग्निशिखे) प्रमाणे आणि चन्द्र ग्रहणामुळे मलीन झालेल्या पौर्णिमेच्या रात्रीप्रमाणे भासत होती. ॥११-१४॥
उत्कृष्टपर्णकमलां वित्रासितविहङ्‌गमाम् ।
हस्तिहस्तपरामृष्टामाकुलामिव पद्मिनीम् ॥ १५ ॥
जिला हत्तीने आपल्या सोंडेने उपटून टाकले आहे आणि म्हणून जिची पाने आणि कमलपुष्पे उखडली गेली आहेत तथा भयामुळे जलपक्षीही त्रस्त झालेले आहेत अशा मलिन आणि मथित पद्मिनी (पुष्करिणी) प्रमाणे सीता दिसत होती. ॥१५॥
पतिशोकातुरां शुष्कां नदीं विस्रावितामिव ।
परया मृजया हीनां कृष्णपक्षे निशामिव ॥ १६ ॥
पतिच्या विरह शोकामुळे तिचे हृदय अत्यन्त व्याकुळ झाले होते. त्यामुळे जिचे जल कालवे आदि द्वारा अन्यत्र इकडे तिकडे वळविले गेले आहे अशा नदी प्रमाणे ती सुकून गेली होती आणि उत्तम उटणे (अंगराग) आदिंच्या अभावामुळे कृष्णपक्षाच्या रात्रीप्रमाणे मलीन झाली होती. ॥१६॥
सुकुमारीं सुजाताङ्‌गीं रत्‍नगर्भगृहोचिताम् ।
तप्यमानामिवोष्णेन मृणालीमचिरोद्धृताम् ॥ १७ ॥
तिचे अंग अत्यन्त सुकुमार आणि सुन्दर होते. ती रत्‍नजडित राजमहालात राहण्यास योग्य होती परन्तु उन्हामुळे तप्त झालेल्या आणि त्वरित उपटून फेकून दिल्या गेलेल्या कमलिनी प्रमाणे दयनीय अवस्थेप्रत पोहोचली होती. ॥१७॥
गृहीतामालितां स्तंभे यूथपेन विनाकृताम् ।
निःश्वसन्तीं सुदुःखार्तां गजराजवधूमिव ॥ १८ ॥
जिला यूथपतिपासून विलग करून पकडून खांबास बान्धून ठेवलेले असावे अशा हत्तीणीप्रमाणे ती दु:खाने अत्यन्त आर्त होऊन दीर्घ श्वास घेत होती (सुस्कारे टाकीत होती). ॥१८॥
एकया दीर्घया वेण्या शोभमानामयत्‍नतः ।
नीलया नीरदापाये वनराज्या महीमिव ॥ १९ ॥
प्रयत्‍नाशिवाय बान्धल्या गेलेल्या एका लांबलचक वेणीमुळे सीता अशी शोभून दिसत होती की जणु वर्षा ऋतु सरल्यावर दूरवर पसरलेल्या हिरव्यागार वनश्रेणीने पृथ्वीच सुशोभित व्हावी. ॥१९॥
उपवासेन शोकेन ध्यानेन च भयेन च ।
परिक्षीणां कृशां दीनां अल्पाहारां तपोधनाम् ॥ २० ॥
ती उपवास, शोक, चिन्ता आणि भय यामुळे अत्यन्त क्षीण, कृशतनु आणि दीन झाली होती. तिचा आहार अत्यन्त कमी झाला होता आणि एकमात्र तप हेच तिचे धन होते. ॥२०॥
आयाचमानां दुःखार्तां प्राञ्जलिं देवतामिव ।
भावेन रघुमुख्यस्य दशग्रीवपराभवम् ॥ २१ ॥
ती दु:खाने आर्त होऊन आपल्या कुलदेवतेची हात जोडून मनातल्या मनात अशी प्रार्थनाच जणु करित होती की श्रीरामचन्द्रांच्या हाताने दशमुख रावणाचा पराजय होऊ दे. ॥२१॥
समीक्षमाणां रुदतीमनिन्दितां
सुपक्ष्मताम्रायतशुक्ललोचनाम् ।
अनुव्रतां राममतीव मैथिलीं
प्रलोभयामास वधाय रावणः ॥ २३ ॥
उत्कृष्ट पापण्यांनी युक्त असलेले तिचे विशाल आणि स्वच्छ नेत्र, तांबूस झाले होते. ती स्वत: निर्दोष असून इकडे तिकडे पहात रडत बसलेली होती आणि श्रीरामांच्या ठिकाणी अत्यन्त अनुरक्त होती. अशा अवस्थेत असलेया सती साध्वी मिथिलेशकुमारी सीतेस पाहून राक्षसराज रावण जणु आपला स्वत:चा वध करून घेण्यासाठीच तिला लोभ उत्पन्न करण्याचा प्रयत्‍न करू लागला. ॥२२॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये सुन्दरकाण्डे एकोनविंशः सर्गः ।
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा एकोणीसावा सर्ग पूरा झाला. ॥१९॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP