श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ षट्सप्ततितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

अङ्‌गदेन कम्पनप्रजङ्‌घयोर्द्विविदेन, शोणिताक्षस्य मैन्देन, यूपाक्षस्य सुग्रीवेण कुम्भस्य वधश्च -
अंगदाचे द्वारा कंपन आणि प्रजङ्‌घाचा, द्विविदाच्या द्वारा शोणिताक्षाचा, मैंदच्या द्वारा यूपाक्षाचा आणि सुग्रीवाच्या द्वारा कुम्भाचा वध -
प्रवृत्ते सङ्‌कुले तस्मिन् घोरे वीरजनक्षये ।
अङ्‌गदः कम्पनं वीरं आससाद रणोत्सुकः ॥ १ ॥
जेव्हा वीरजनांचा विनाश करणारा तो घोर तुमुल संग्राम चालला होता त्या समयी अंगद संग्रामासाठी उत्सुक होऊन वीर कंपनाचा सामना करण्यासाठी आले. ॥१॥
आहूय सोऽङ्‌गदं कोपात् ताडयामास वेगितः ।
गदया कम्पनः पूर्वं स चचाल भृशाहतः ॥ २ ॥
कंपनाने अंगदांना क्रोधपूर्वक आव्हान देऊन मोठ्‍या वेगाने त्यांच्यावर प्रथम गदेचा प्रहार केला. त्यामुळे त्यांना मोठी इजा झाली आणि ते बेधुद्ध होऊन पडले. ॥२॥
स संज्ञां प्राप्य तेजस्वी चिक्षेप शिखरं गिरेः ।
अर्दितश्च प्रहारेण कम्पनः पतितो भुवि ॥ ३ ॥
परत शुद्धिवर आल्यावर तेजस्वी वीर अंगदांनी एका पर्वताचे शिखर उचलून फेकून त्या राक्षसावर मारले. त्या प्रहारांनी पीडित होऊन कंपन पृथ्वीवर कोसळला - त्याचे प्राणपाखरू उडून गेले. ॥३॥
ततस्तु कम्पनं दृष्ट्‍वा शोणिताक्षो हतं रणे ।
रथेनाभ्यपतत् क्षिप्रं तत्राङ्‌गदमभीतवत् ॥ ४ ॥
कंपन युद्धात मारला गेलेला पाहून शोणिताक्षाने रथावर आरूढ होऊन तात्काळच निर्भय होऊन अंगदावर हल्ला चढविला. ॥४॥
सो ऽङ्‌गदं निशितैर्बाणैः तदा विव्याध वेगितः ।
शरीरदारणैस्तीक्ष्णैः कालाग्निसमविग्रहैः ॥ ५ ॥
त्याने शरीराला विदीर्ण करण्यास समर्थ आणि काळाग्निसमान आकाशाच्या तीक्ष्ण बाणांच्या द्वारा अत्यंत वेगाने त्यासमयी अंगदास जखमी केले. ॥५॥
क्षुरक्षुरप्रनाराचैः वत्सदन्तैः शिलीमुखैः ।
कर्णिशल्यविपाठैश्च बहुभिर्निशितैः शरैः ॥ ६ ॥

अङ्‌गदः प्रतिविद्धाङ्‌गो वालिपुत्रः प्रतापवान् ।
धनुरग्रं रथं बाणान् ममर्द तरसा बली ॥ ७ ॥
त्याने सोडलेल्या क्षुर, क्षुरप्र, नाराच, वत्सदंत, शिलीमुख, कर्णी, शल्य आणी विपाठ नामक बहुसंख्य तीक्ष्ण बाणांनी जेव्हा प्रतापी वालिपुत्र अंगदांचे सारे अंग विंधले गेले, तेव्हा त्या बलवान्‌ वीराने मोठ्‍या वेगाने त्या राक्षसाचे भयंकर धनुष्य, रथ आणि बाणांना नष्ट करून टाकले. ॥६-७॥
शोणिताक्षस्ततः क्षिप्रं असिचर्म समाददे ।
उत्पपात दिवं क्रुद्धो वेगवान् अविचारयन् ॥ ८ ॥
त्यानंतर वेगवान्‌ निशाचर शोणिताक्षाने कुपित होऊन तात्काळच ढाल आणि तलवार हातात घेतली आणि त्याने जराही विचार न करता रथांतून खाली उडी मारली. ॥८॥
तं क्षिप्रतरमाप्लुत्य परामृश्याङ्‌गदो बली ।
करेण तस्य तं खड्गं समाच्छिद्य ननाद च ॥ ९ ॥
इतक्यातच बलवान्‌ अंगदांनी शीघ्रतापूर्वक उडी मारून त्याला पकडले आणि आपल्या हाताने त्याची ती तलवार ओढून घेतली आणि खूप मोठ्‍याने सिंहनाद केला. ॥९॥
तस्यांसफलके खड्गं निजघान ततोऽङ्‌गदः ।
यज्ञोपवीतवच्चैनं चिच्छेद कपिकुञ्जरः ॥ १० ॥
नंतर कपिकुंजर अंगदांनी त्याच्या खांद्यावर तलवारीने वार केला आणि त्याने जणु यज्ञोपवित धारण केले असावे अशा प्रकारे त्याचे शरीर चिरून टाकले. ॥१०॥
तं प्रगृह्य महाखड्गं विनद्य च पुनः पुनः ।
वालिपुत्रोऽभिदुद्राव रणशीर्षे परानरीन् ॥ ११ ॥
त्यानंतर वालिपुत्राने ते विशाल खड्ग घेऊन वारंवार गर्जना करीत युद्धाच्या तोंडावरच दुसर्‍या शत्रूंवर हल्ला चढवला. ॥११॥
प्रजङ्‌घसहितो वीरो यूपाक्षस्तु ततो बली ।
रथेनाभिययौ क्रुद्धो वालिपुत्रं महाबलम् ॥ १२ ॥
इतक्यातच प्रजङ्‌घास बरोबर घेऊन बलवान्‌ वीर यूपाक्षाने कुपित होऊन रथाच्या द्वारा महाबली वालिकुमारवर आक्रमण केले. ॥१२॥
आयसीं तु गदां गृह्य स वीरः कनकाङ्‌गदः ।
शोणिताक्षः समाविध्य तमेवानुपपात ह ॥ १३ ॥
एवढ्‍यात सोन्याचे बाजूबंद धारण केलेल्या वीर शोणिताक्षाने आपल्या स्वतःस सावरून लोखंडाची गदा उचलली आणि अंगदाचाच पाठलाग केला. ॥१३॥
प्रजङ्‌घस्तु महावीरो यूपाक्षसहितो बली ।
गदयाभिययौ क्रुद्धो वालिपुत्रं महाबलम् ॥ १४ ॥
नंतर यूपाक्षासहित बलवान्‌ महावीर प्रजङ्‌घ कुपित होऊन महाबली वालिपुत्रावर गदा घेऊन चालून आला. ॥१४॥
तयोर्मध्ये कपिश्रेष्ठः शोणिताक्षप्रजङ्‌घयोः ।
विशाखयोर्मध्यगतः पूर्णचन्द्र इवाबभौ ॥ १५ ॥
शोणिताक्ष आणि प्रजङ्‌घ दोन्ही राक्षसांच्या मध्ये कपिश्रेष्ठ अंगद जणु दोन विशाखा नक्षत्रांच्या मध्ये पूर्ण चंद्रमा सुशोभित व्हावा तसे शोभत होते. ॥१५॥
अङ्‌गदं परिरक्षान्तौ मैन्दो द्विविद एव च ।
तस्य तस्थातुरभ्याशे परस्परदिदृक्षया ॥ १६ ॥
त्यासमयी मैंद आणि द्विविद अंगदांचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या निकट येऊन उभे राहिले. ते दोघे आपापल्या योग्य विपक्षी योद्ध्याचा शोध करत होते. ॥१६॥
अभिपेतुर्महाकायाः प्रतियत्ता महाबलाः ।
राक्षसा वानरान् रोषाद् असिचर्मगदाधराः ॥ १७ ॥
इतक्यातच तलवार, बाण आणि गदा धारण केलेले बरेचसे महाबली विशालकाय राक्षस रोषपूर्वक वानरांच्यावर तुटून पडले. ॥१७॥
त्रयाणां वानरेन्द्राणां त्रिभी राक्षसपुङ्‌गवैः ।
संसक्तानां महद् युद्धं अभवद् रोमहर्षणम् ॥ १८ ॥
हे तीन वानर-सेनापति त्या तीन प्रमुख राक्षसांच्या बरोबर लढण्यात गुंतलेले होते. त्यासमयी त्यांच्यात अंगावर काटा आणणारे महान्‌ युद्ध सुरू झाले. ॥१८॥
ते तु वृक्षान् समादाय सम्प्रचिक्षिपुराहवे ।
खड्गेन प्रतिचिक्षेप तान् प्रजङ्‌घो महाबलः ॥ १९ ॥
त्या तीन्ही वानरांनी रणभूमीमध्ये वृक्ष घेऊन युद्धात निशाचरांच्यावर फेकले; परंतु महाबली पजङ्‌घाने आपल्या तलवारीने त्या सर्व वृक्षांना तोडून टाकले. ॥१९॥
रथानश्वान् द्रुमान् शैलान् प्रचिक्षिपुराहवे ।
शरौधैः प्रतिचिच्छेद तान् यूपाक्षो महाबलः ॥ २० ॥
त्यानंतर त्यांनी रणभूमीमध्ये त्या राक्षसांचे रथ आणि घोड्‍यांच्यावर वृक्ष तसेच पर्वतशिखरे फेकली परंतु महाबली यूपाक्षाने आपल्या बाण समूहांनी त्यांचे तुकडे तुकडे करून टाकले. ॥२०॥
सृष्टान् द्विविदमैन्दाभ्यां द्रुमानुत्पाट्य वीर्यवान् ।
बभञ्ज गदया मध्ये शोणिताक्षः प्रतापवान् ॥ २१ ॥
मैंद आणि द्विविदाने ज्या ज्या वृक्षांना उपटून त्या राक्षसांवर फेकले होते त्या सर्वांना बल-विक्रमशाली आणि प्रतापी शोणिताक्षाने गदा मारून मध्येच तोडून टाकले. ॥२१॥
उद्यम्य विपुलं खड्गं परमर्मविदारणम् ।
प्रजङ्‌घो वालिपुत्राय अभिदुद्राव वेगितः ॥ २२ ॥
त्यानंतर प्रजङ्‌घाने शत्रूंचे मर्म विदारण करणारी एक फार मोठी तलवार उचलून वालिपुत्र अंगदावर वेगपूर्वक आक्रमण केले. ॥२२॥
तमभ्याशगतं दृष्ट्‍वा वानरेन्द्रो महाबलः ।
आजघानाश्वकर्णेन द्रुमेणातिबलस्तदा ॥ २३ ॥

बाहुं चास्य सनिस्त्रिंशं आजघान स मुष्टिना ।
वालिपुत्रस्य घातेन स पपात क्षितावसिः ॥ २४ ॥
त्याला निकट आलेला पाहून अतिशय शक्तिशाली महाबली वानरराज अंगदांनी अश्वकर्ण नामक वृक्षाने त्यास मारले. त्याच वेळी त्याच्या बाहुवर ज्याच्यात तलवार होती त्यांनी एक घुस्सा मारला. वालिपुत्राच्या त्या आघाताने ती तलवार सुटून पृथ्वीवर पडली. ॥२३-२४॥
तं दृष्ट्‍वा पतितं भूमौ खड्गं मुसलसन्निभम् ।
मुष्टिं संवर्तयामास वज्रकल्पं महाबलः ॥ २५ ॥
मुसळासारखी ती तलवार पृथ्वीवर पडलेली पाहून महाबली प्रजङ्‌घाने आपली वज्रासमान भयंकर मूठ फिरविण्यास आरंभ केला. ॥२५॥
ललाटे स महावीर्यं अङ्‌गदं वानरर्षभम् ।
आजघान महातेजाः स मुहूर्तं चचाल ह ॥ २६ ॥
त्या महातेजस्वी निशाचराने महापराक्रमी वानरश्रेष्ठ अंगदाच्या ललाटावर फार जोराने मुठीने बुक्का मारला, ज्यामुळे अंगदाला एक मुहूर्तपर्यंत चक्कर येत राहिली. ॥२६॥
स संज्ञां प्राप्य तेजस्वी वालिपुत्रः प्रतापवान् ।
प्रजङ्‌घस्य शिरः कायात् पातयामास मुष्टिना ॥ २७ ॥
यानंतर शुद्धिवर आल्यावर तेजस्वी आणि प्रतापी वालिकुमारांनी प्रजङ्‌घाला असा गुद्दा मारला की त्याचे शिर धडापासून वेगळे झाले. ॥२७॥
स यूपाक्षोऽश्रुपूर्णाक्षः पितृव्ये निहते रणे ।
अवरुह्य रथात् क्षिप्रं क्षीणेषुः खड्गमाददे ॥ २८ ॥
रणभूमीमध्ये आपला काका चुलता प्रजङ्‌घ मारला गेल्याचे पाहून यूपाक्षाच्या डोळ्यांत अश्रु आले. त्याचे बाण नष्ट झाले होते म्हणून त्याने तात्काळ रथातून उतरून तलवार हातात घेतली. ॥२८॥
तमापतन्तं सम्प्रेक्ष्य यूपाक्षं द्विविदस्त्वरन् ।
आजघानोरसि क्रुद्धो जाग्राह च बलाद् बली ॥ २९ ॥
यूपाक्षाला आक्रमण करतांना पाहून बलवान्‌ वीर द्विविदाने कुपित होऊन मोठ्‍या चपळाईने त्याच्या छातीवर प्रहार केला आणि त्याला बलपूर्वक पकडले. ॥२९॥
गृहीतं भ्रातरं दृष्ट्‍वा शोणिताक्षो महाबलः ।
आजघान महातेजा वक्षसि द्विविदं ततः ॥ ३० ॥
भावाला पकडलेले पाहून महातेजस्वी आणि महाबली शोणिताक्षाने द्विविदाच्या छातीवर गदा मारली. ॥३०॥
स गदाभिहतस्तेन चचाल च महाबलः ।
उद्यतां च पुनस्तस्य जहार द्विविदो गदाम् ॥ ३१ ॥
शोणिताक्षाचा मार खाऊन महाबली द्विविद विचलित झाले. त्यानंतर त्याने परत जेव्हा गदा उचलली तेव्हा द्विविदानी झपाट्‍याने ती हिसकावून घेतली. ॥३१॥
एतस्मिण् अंतरे मैन्दो द्विविदाभ्याशमागमत् ।
यूपाक्षं ताडयामास तलेनोरसि वीर्यवान् ॥ ३२ ॥
इतक्यात पराक्रमी मैंदही द्विविदाच्या जवळ आले आणि त्यांनी यूपाक्षाच्या छातीवर एक थप्पड मारली. ॥३२॥
तौ शोणिताक्षयूपाक्षौ प्लवङ्‌गाभ्यां तरस्विनौ ।
चक्रुतुः समरे तीव्रं आकर्षोत्पाटनं भृशम् ॥ ३३ ॥
ते दोघे वेगशाली वीर शोणिताक्ष आणि यूपाक्ष त्या दोन्ही वानरांबरोबर - मैंद आणि द्विविदाबरोबर समरांगणात अत्यंत वेगाने हिसकावून घेणे, झडप घालणे, एकमेकांस आपटणे आदि करू लागले. ॥३३॥
द्विविदः शोणिताक्षं तु विददार नखैर्मुखे ।
निष्पिपेष च वीर्येण क्षितावाविध्य वीर्यवान् ॥ ३४ ॥
पराक्रमी द्विविदाने आपल्या नखांनी शोणिताक्षाच्या तोंडावर ओरबाडले आणि त्याला बलपूर्वक पृथ्वीवर आपटून रगडून टाकले. ॥३४॥
यूपाक्षमभिसङ्‌क्रुद्धो मैन्दो वानरपुंगवः ।
पीडयामास बाहुभ्यां स पपात हतः क्षितौ ॥ ३५ ॥
त्यानंतर अत्यंत क्रोधाविष्ट झालेल्या वानरपुंगव मैंदाने यूपाक्षाला आपल्या दोन्ही बाहुमध्ये अशा प्रकारे आवळले की तो निष्प्राण होऊन पृथ्वीवर पडला. ॥३५॥
हतप्रवीरा व्यथिता राक्षसेन्द्रचमूस्तथा ।
जगामाभिमुखी सा तु कुम्भकर्णसुतो यतः ॥ ३६ ॥
हे प्रमुख वीर मारले गेल्यावर राक्षसराजाची सेना व्यथित झाली आणि जेथे कुंभकर्णाचा पुत्र युद्ध करत होता तिकडे पळून गेली. ॥३६॥
आपतन्तीं च वेगेन कुम्भस्तां सान्त्वयच्चमूम् ।
अथोत्कृष्टं महावीर्यैः लब्धलक्षैः प्लवङ्‌गमैः ॥ ३७ ॥
वेगाने पळत येणार्‍या त्या सेनेला कुंभाने सांत्वना दिली. दुसरीकडे महापराक्रमी वानर युद्धात सफल झाल्याकारणाने जोरजोराने गर्जना करू लागले. ॥३७॥
निपातितमहावीरां दृष्ट्‍वा रक्षश्चमूं तदा ।
कुम्भः प्रचक्रे तेजस्वी रणे कर्म सुदुष्करम् ॥ ३८ ॥
राक्षससेनेतील मोठ मोठे वीर मारले गेलेले पाहून तेजस्वी कुंभाने रणभूमीमध्ये अत्यंत दुष्कर कर्म करण्यास आरंभ केला. ॥३८॥
स धनुर्धन्विनां श्रेष्ठः प्रगृह्य सुसमाहितः ।
मुमोचाशीविषप्रख्यान् शरान् देहविदारणान् ॥ ३९ ॥
तो धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ होता आणि युद्धात चित्ताला अत्यंत एकाग्र करून ठेवत होता. त्याने धनुष्य उचलले आणि शरीरास विदीर्ण करण्यास समर्थ आणि सर्पासमान विषारी बाणांची वृष्टि करण्यास आरंभ केला. ॥३९॥
तस्य तच्छुशुभे भूयः सशरं धनुरुत्तमम् ।
विद्युदैरावतार्चिष्माद् द्वितीयेन्द्रधनुर्यथा ॥ ४० ॥
त्याचे ते बाणासहित उत्तम धनुष्य विद्युत आणि ऐरावताच्या प्रभेने युक्त दुसर्‍या इंद्रधनुष्यासमान अधिक शोभा प्राप्त करत होते. ॥४०॥
आकर्णाकृष्टमुक्तेन जघान द्विविदं तदा ।
तेन हाटकपुङ्‌खेन पत्रिणा पत्रवाससा ॥ ४१ ॥
त्याने सोन्याचे पंख लावलेल्या पत्रयुक्त बाणाच्या द्वारे, जो धनुष्यास आकर्ण खेंचून सोडला गेला होता, द्विविदाला घायाळ करून टाकले. ॥४१॥
सहसाभिहतस्तेन विप्रमुक्तपदः स्फुरन् ।
निपपात त्रिकूटाभो विह्वलः प्लवगोत्तमः ॥ ४२ ॥
त्याच्या बाणाने आहत होऊन त्रिकूट पर्वतासमान विशालकाय वानरश्रेष्ठ द्विविद व्याकुळ झाले आणि तडफडत पाय पसरून पृथ्वीवर पडले. ॥४२॥
मैन्दस्तु भ्रातरं तत्र भग्नं दृष्ट्‍वा महाहवे ।
अभिदुद्राव वेगेन प्रगृह्य विपुलां शिलाम् ॥ ४३ ॥
त्या महासमरात आपला भाऊ घायाळ होऊन पडलेला पाहून मैंद फार मोठी शिला उचलून वेगपूर्वक धावले. ॥४३॥
तां शिलां तु प्रचिक्षेप राक्षसाय महाबलः ।
बिभेद तां शिलां कुम्भः प्रसन्नैः पञ्चभिः शरैः ॥ ४४ ॥
त्या महाबली वीराने ती शिला त्या राक्षसावर फेकली परंतु कुम्भाने पाच चमकदार बाणांच्याद्वारे त्या शिलेचे तुकडे तुकडे केले. ॥४४॥
सन्धाय चान्यं सुमुखं शरमाशीविषोपमम् ।
आजघान महातेजा वक्षसि द्विविदाग्रजम् ॥ ४५ ॥
नंतर विषधर सर्पासमान भयंकर आणि सुंदर अग्रभाग असणारा दुसरा बाण धनुष्यावर ठेवला आणि त्याच्या द्वारा त्या महातेजस्वी वीराने द्विविदाच्या मोठ्‍या भावाच्या छातीवर जबरदस्त आघात केला. ॥४५॥
स तु तेन प्रहारेण मैन्दो वानरयूथपः ।
मर्मण्यभिहतस्तेन पपात भुवि मूर्च्छितः ॥ ४६ ॥
त्याच्या त्या प्रहाराने वानर यूथपति मैंदाच्या मर्मस्थानावर भारी आघात झाला आणि ते मूर्छित होऊन पृथ्वीवर पडले. ॥४६॥
अङ्‌गदो मातुलौ दृष्ट्‍वा मथितौ तु महाबलौ ।
अभिदुद्राव वेगेन कुम्भमुद्यतकार्मुकम् ॥ ४७ ॥
मैंद आणि द्विविद अंगदाचे मामा होते. त्या दोन्ही महाबली वीरांना घायाळ झालेले पाहून अंगद धनुष्य घेऊन उभे राहून कुंभावर अत्यंत वेगाने तुटून पडले. ॥४७॥
तमापतन्तं विव्याध कुम्भः पञ्चभिरायसैः ।
त्रिभिश्चान्यैः शितैर्बाणैः मातङ्‌गमिव तोमरैः
सोऽङ्‌गदं विविधैर्बाणैः कुम्भो विव्याध वीर्यवान् ॥ ४८ ॥
त्यांना येतांना पाहून कुंभाने लोखंडाच्या बनविलेल्या पाच बाणांनी घायाळ करून टाकले. नंतर तीन तीक्ष्ण बाण आणखी मारले. जसा महावत अंकुशाने मत्त हत्तीला मारतो, त्याच प्रकारे पराक्रमी कुंभाने बर्‍याचशा बाणांद्वारा अंगदाला बांधून टाकले. ॥४८॥
अकुण्ठधारैर्निशितैः तीक्ष्णैः कनकभूषणैः ।
अङ्‌गदः प्रतिविद्धाङ्‌गो वालिपुत्रो न कम्पते ॥ ४९ ॥
ज्यांची धार कुण्ठित होत नाही तसेच जे सुवर्णानी विभूषित होते अशा तेज आणि तीक्ष्ण बाणांनी वालिपुत्र अंगदाचे सारे शरीर छेदले गेले होते तरीही ते कंपित झाले नाहीत. ॥४९॥
शिलापादपवर्षाणि तस्य मूर्ध्नि ववर्ष ह ।
स प्रचिच्छेद तान् सर्वान् बिभेद च पुनः शिलाः ॥ ५० ॥

कुम्भकर्णात्मजः श्रीमान् वालिपुत्रसमीरितान् ।
त्यांनी त्या राक्षसाच्या मस्तकावर शिलांची आणि वृक्षांची वृष्टी करण्यास आरंभ केला, परंतु कुंभकर्णकुमार श्रीमान्‌ कुंभाने वालिपुत्राने सोडलेल्या समस्त वृक्षांना तोडून टाकले आणि शिलांनाही तोडून फोडून टाकले. ॥५० १/२॥
आपतन्तं च सम्प्रेक्ष्य कुम्भो वानरयूथपम् ॥ ५१ ॥

भ्रुवौ विव्याध बाणाभ्यां उल्काभ्यामिव कुञ्जरम् ।
त्यानंतर वानरयूथपति अंगदाला आपल्याकडे येतांना पाहून कुंभाने दोन बाणांनी त्यांच्या भुंवयामध्ये प्रहार केला, जणु दोन उल्कांच्या द्वारा कुणा हत्तीला मारले गेले असावे. ॥५१ १/२॥
तस्य सुस्राव रुधिरं पिहिते चास्य लोचने ॥ ५२ ॥

अङ्‌गदः पाणिना नेत्रे पिधाय रुधिरोक्षिते ।
सालमासन्नमेकेन परिजग्राह पाणिना ॥ ५३ ॥

सम्पीड्योरसि सस्कन्धं करेणाभिनिवेश्य च ।
किञ्चिदभ्यवनम्यैनं उन्ममाथ यथा गजः ॥ ५४ ॥
अंगदांच्या भुवयांच्या मधून रक्त वाहू लागले आणि त्यांचे डोळे बंद होऊन गेले. तेव्हा त्यांनी एका हाताने रक्तांनी भिजलेले आपले दोन्ही डोळे झाकले आणि दुसर्‍या हाताने जवळच उभा असलेल्या एका साल वृक्षास पकडले. नंतर छातीने दाबून फाद्यांसहित त्या वृक्षाला थोडे वाकवले आणि एकाच हाताने त्यास उपटून टाकले. ॥५२-५४॥
तमिन्द्रकेतुप्रतिमं वृक्षं मन्दरसन्निभम् ।
समुत्सृजत वेगेन पश्यतां सर्वरक्षसाम् ॥ ५५ ॥
तो वृक्ष इंद्रध्वज अथवा मंदराचलांप्रमाणे उंच होता. त्याला अंगदाने सर्व राक्षसांच्या देखत मोठ्‍या वेगाने कुंभावर फेकले. ॥५५॥
स बिभेद शितैर्बाणैः सप्तभिः कायभेदनैः ।
अङ्‌गदो विव्यथेऽभीक्ष्णं ससाद च मुमोह च ॥ ५६ ॥
परंतु शरीरास विदीर्ण करणारे सात तीक्ष्ण बाण मारून कुम्भाने त्या साल वृक्षाचे तुकडे तुकडे केले, यामुळे अंगदाला फार व्यथा झाली. ते घायाळ तर झालेलेच होते, त्यामुळे पडले आणि मूर्च्छित झाले. ॥५६॥
अङ्‌गदं पतितं दृष्ट्‍वा सीदन्तमिव सागरे ।
दुरासदं हरिश्रेष्ठा राघवाय न्यवेदयन् ॥ ५७ ॥
दुर्जय वीर अंगदाला समुद्रात बुडणार्‍याप्रमाणे पृथ्वीवर पडलेला पाहून श्रेष्ठ वानरांनी श्रीरघुनाथांना ही वार्ता दिली. ॥ ५७ ॥
रामस्तु व्यथितं श्रुत्वा वालिपुत्रं महाहवे ।
व्यादिदेश हरिश्रेष्ठान् जाम्बवत्प्रमुखांस्ततः ॥ ५८ ॥
श्रीरामांनी जेव्हा ऐकले की वालिपुत्र अंगद महासमरात मूर्च्छित होऊन पडले आहेत तेव्हा त्यांनी जांबवान्‌ आदि प्रमुख वानर वीरांना युद्धासाठी जाण्याची आज्ञा दिली. ॥५८॥
ते तु वानरशार्दूलाः श्रुत्वा रामस्य शासनम् ।
अभिपेतुः सुसङ्‌क्रुद्धाः कुम्भमुद्यतकार्मुकम् ॥ ५९ ॥
श्रीरामचंद्रांचा आदेश ऐकून श्रेष्ठ वानरवीर अत्यंत कुपित होऊन धनुष्य उचलून उभा असलेल्या कुम्भावर सर्व बाजुनी तुटून पडले. ॥५९॥
ततो द्रुमशिलाहस्ताः कोपसंरक्तलोचनाः ।
रिरक्षिषन्तोऽभ्यपतन् अङ्‌गदं वानरर्षभाः ॥ ६० ॥
ते सर्व प्रमुख वानर अंगदाचे रक्षण करू इच्छित होते. म्हणून क्रोधाने लाल डोळे करून हातात वृक्ष आणि शिला घेऊन त्या राक्षसाकडे धावले. ॥६०॥
जाम्बवांश्च सुषेणश्च वेगदर्शी च वानरः ।
कुम्भकर्णात्मजं वीरं क्रुद्धाः समभिदुद्रुवुः ॥ ६१ ॥
जांबवान्‌, सुषेण आणि वेगदर्शीने कुपित होऊन वीर कुंभकर्ण -कुमारावर हल्ला केला. ॥६१॥
समीक्ष्यापततस्तांस्तु वानरेन्द्रान् महाबलान् ।
आववार शरौघेण नगेनेव जलाशयम् ॥ ६२ ॥
त्या महाबली वानर यूथपतिंना आक्रमण करतांना पाहून कुंभाने आपल्या बाणसमूहांच्या द्वारा त्या सर्वांना, ज्याप्रमाणे पुढे पुढे येणार्‍या जलप्रवाहाला मार्गात उभा असलेला पर्वत रोखून धरतो त्याप्रमाणे रोखून धरले. ॥६२॥
तस्य बाणपथं प्राप्य न शोकुररपि वीक्षितुम् ।
वानरेन्द्रा महात्मानो वेलामिव महोदधिः ॥ ६३ ॥
त्याचे बाण मार्गात येण्यामुळे ते महामनस्वी वानरयूथपति पुढे येणे तर दूरच राहिले त्याच्याकडे डोळे उचलून बघूही शकत नव्हते. जसे महासागर आपल्या तटभूमीला उल्लंघून पुढे जाऊ शकत नाही, ठीक त्याप्रमाणे. ॥६३॥
तांस्तु दृष्ट्‍वा हरिगणान् शरवृष्टिभिरर्दितान् ।
अङ्‌गदं पृष्ठतः कृत्वा भ्रातृजं प्लवगेश्वरः ॥ ६४ ॥

अभिदुद्राव सुग्रीवः कुम्भकर्णात्मजं रणे ।
शैलसानुचरं नागं वेगवानिव केसरी ॥ ६५ ॥
त्या सर्व वानरसमूहांना कुंभाच्या बाणांच्या वृष्टिने पीडित झालेले पाहून वानरराज सुग्रीवाने आपल्या पुतण्याला अंगदाला पाठीमागे घालून स्वतःच रणभूमीमध्ये कुंभकर्ण-कुमारावर, जसे पर्वतशिखरावर विचरण करणार्‍या हत्तीवर वेगवान्‌ सिंह आक्रमण करतो त्याप्रमाणे हल्ला केला. ॥६४-६५॥
उत्पाट्य च महावृक्षान् अश्वकर्णादिकान् बहून् ।
अन्यांश्च विविधान् वृक्षान् चिक्षेप च महाकपिः ॥ ६६ ॥
महाकपि सुग्रीव अश्वकर्ण आदि मोठ मोठे वृक्ष तसेच दुसरेही नाना प्रकारचे वृक्ष उपटून त्या राक्षसावर फेकू लागले. ॥६६॥
तां छादयन्तीमाकाशं वृक्षवृष्टिं दुरासदाम् ।
कुम्भकर्णात्मजः श्रीमान् चिच्छेद स्वशरैः शितैः ॥ ६७ ॥
वृक्षांची ही वृष्टि आकाशाला आच्छादित करून टाकत होती. ती टाळणे अत्यंत कठीण होत होते; परंतु श्रीमान्‌ कुंभकर्णपुत्राने आपल्या तीक्ष्ण बाणांनी त्या सर्व वृक्षांना छाटून टाकले. ॥६७॥
अभिलक्ष्येण तीव्रेण कुम्भेन निशितैः शरैः ।
आचितास्ते द्रुमा रेजुर्यथा घोराः शतघ्नयः ।
द्रुमवर्षं तु तच्छिन्नं दृष्ट्‍वा कुम्भेन वीर्यवान् ॥ ६८ ॥
लक्ष्य वेधण्यांत सफल, तीव्र वेगशाली कुंभाच्या तीक्ष्ण बाणांनी व्याप्त झालेले ते वृक्ष भयानक शतघ्निंप्रमाणे सुशोभित होत होते. त्या वृक्ष वृष्टिला कुंभद्वारा खण्डित झालेली पाहून महान्‌ शक्तिशाली पराक्रमी वानरराज सुग्रीव व्यथित झाले नाहीत. ॥६८॥
वानराधिपतिः श्रीमान् महासत्त्वो न विव्यथे ।
स विध्यमानः सहसा सहमानश्च तान् शरान् ॥ ६९ ॥

कुम्भस्य धनुराक्षिप्य बभञ्जेन्द्रधनुष्प्रभम् ।
अवप्लुत्य ततः शीघ्रं कृत्वा कर्म सुदुष्करम् ॥ ७० ॥

अब्रवीत् कुपितः कुम्भं भग्नशृङ्‌गमिव द्विपम् ।
ते त्याच्या बाणांचे आघात खात आणि सहन करीत एकाएकी उडी मारून त्याच्या रथावर चढले आणि कुंभाचे इंद्रधनुष्यासमान तेजस्वी धनुष्यास हिसकावून घेऊन त्यांनी त्याचे तुकडे तुकडे करून टाकले. त्यानंतर शीघ्रच तेथून त्यांनी खाली उडी मारली. हे दुष्कर कर्म करण्याच्या पश्चात्‌ त्यांनी दात तुटलेल्या हत्तीप्रमाणे कुपित झालेल्या कुंभास म्हटले - ॥६९-७० १/२॥
निकुम्भाग्रज वीर्यं ते बाणवेगं तदद्‌भु्तम् ॥ ७१ ॥

सन्नतिश्च प्रभावश्च तव वा रावणस्य वा ।
प्रह्लादबलिवृत्रघ्न कुबेरवरुणोपम ॥ ७२ ॥
निकुंभाच्या मोठ्‍या भावा कुंभा ! तुझा पराक्रम आणि तुझ्या बाणांचा वेग अद्‍भुत आहे. राक्षसांमध्ये विनय अथवा प्रवणता तसेच प्रभाव एकतर तुझ्या ठिकाणी आहे अथवा रावणामध्ये. तू प्रल्हाद, बलि, इंद्र, कुबेर आणि वरूणासमान आहेस. ॥७१-७२॥
एकस्त्वमनुजातोऽसि पितरं बलवत्तरम् ।
त्वामेवैकं महाबाहुं शूलहस्तमरिन्दमम् ॥ ७३ ॥

त्रिदशा नातिवर्तन्ते जितेन्द्रियमिवाधयः ।
विक्रमस्व महाबुद्धे कर्माणि मम पश्य च ॥ ७४ ॥
केवळ तूच आपल्या अत्यंत बलशाली पित्याचे अनुसरण केले आहेस. ज्याप्रमाणे जितेन्द्रिय पुरूषाला मानसिक व्यथा अभिभूत करत नाहीत, त्याचप्रकारे शत्रूंचे दमन करणार्‍या एकमात्र शूलधारी तुला महाबाहु वीरालाच देवता युद्धात परास्त करू शकत नाहीत. महामते ! पराक्रम प्रकट कर आणि आता माझे बळ ही तू पहा. ॥७३-७४॥
वरदानात् पितृव्यस्ते सहते देवदानवान् ।
कुम्भकर्णस्तु वीर्येण सहते च सुरासुरान् ॥ ७५ ॥
तुझे पितृव्य रावण केवळ वरदानाच्या प्रभावाने देवतांचा आणि दानवांचा वेग सहन करत आहे. तुझा पिता कुंभकर्ण आपल्या बळ, पराक्रमाने देवतांचा आणि असुरांचा सामना करत होता. (परंतु तू वरदान आणि पराक्रम दोन्हीनी संपन्न आहेस.) ॥७५॥
धनुषीन्द्रजितस्तुल्यः प्रतापे रावणस्य च ।
त्वमद्य रक्षसां लोके श्रेष्ठोऽसि बलवीर्यतः ॥ ७६ ॥
तू धनुर्विद्येत इंद्रजिता समान आणि प्रतापात रावणतुल्य आहेस. राक्षसांच्या लोकात आता बळ आणि पराक्रमाच्या दृष्टिने केवळ तूच श्रेष्ठ आहेस. ॥७६॥
महाविमर्दं समरे मया सह तवाद्‌भुणतम् ।
अद्य भूतानि पश्यन्तु शक्रशम्बरयोरिव ॥ ७७ ॥
आज सर्व प्राणी रणभूमीमध्ये इंद्र आणि शंबरासुराप्रमाणे माझ्यासह तुझे अद्‍भुत महायुद्ध पाहोत. ॥७७॥
कृतमप्रतिमं कर्म दर्शितं चास्त्रकौशलम् ।
पातिता हरिवीराश्च त्वया वै भीमविक्रमाः ॥ ७८ ॥
तू असा पराक्रम केला आहेस की ज्याची कोठे तुलना नाही. तू आपले अस्त्र-कौशल्य दाखविले आहेस. तुझ्या बरोबर युद्ध करून हे भयंकर पराक्रमी वानर वीर धराशायी होऊन गेले. ॥७८॥
उपालम्भभयाच्चैव नासि वीर मया हतः ।
कृतकर्मपरिश्रान्तो विश्रान्तः पश्य मे बलम् ॥ ७९ ॥
वीरा ! आतापर्यंत मी तुझा वध केला नाही यात लोकांच्या उपालंभाचे भय हे कारण आहे- लोकांनी असे म्हणून माझी निंदा केली असती की कुम्भ बर्‍याचशा वीरांशी युद्ध करून थकून गेला होता अशा स्थितिमध्ये सुग्रीवाने त्याला मारला आहे, म्हणून आता तू थोडी विश्रांति घे आणि नंतर माझे बळ पहा. ॥७९॥
तेन सुग्रीववाक्येन सावमानेन मानितः ।
अग्नेराज्याहुतस्येव तेजस्तस्याभ्यवर्धत ॥ ८० ॥
सुग्रीवाच्या या अपमानयुक्त वचनांनी सन्मानित होऊन तुपाची आहुति मिळालेल्या अग्निदेवाप्रमाणे कुंभाचे तेज वाढले. ॥८०॥
ततः कुम्भस्तु सुग्रीवं बाहुभ्यां जगृहे तदा ।
गजाविवातीतमदौ निश्वसन्तौ मुहुर्मुहुः ॥ ८१ ॥

अन्योन्यगात्रग्रथितौ घर्षन्तावितरेतरम् ।
सधूमां मुखतो ज्वालां विसृजन्तौ परिश्रमात् ॥ ८२ ॥
नंतर तर कुंभाने सुग्रीवाला आपल्या दोन्ही भुजांनी पकडले. तत्पश्चात्‌ ते दोन्ही वीर मदमत्त गजराजाप्रमाणे वारंवार दीर्घ श्वास घेत एकमेकाशी भिडले. दोघेही दोघांना (एकमेकांना) रगडू लागले आणि दोघे ही परिश्रमामुळे मुखांतून धूमयुक्त आगीच्या जणु ज्वाळाच ओकू लागले. ॥८१-८२॥
तयोः पादाभिघाताच्च निमग्ना चाभवन्मही ।
व्याघूर्णिततरङ्‌गश्च चुक्षुभे वरुणालयः ॥ ८३ ॥
त्या दोघांच्या पायांच्या आघातांनी जमीन खचू लागली. हेलावणार्‍या तरंगांनी युक्त वरूणालय समुद्रात जणु भरती आली. ॥८३॥
ततः कुम्भं समुत्क्षिप्य सुग्रीवो लवणाम्भसि ।
पातयामास वेगेन दर्शयन् उदधेस्तलम् ॥ ८४ ॥
इतक्यात सुग्रीवाने कुंभाला उचलून अत्यंत वेगाने समुद्राच्या पाण्यात फेकून दिले. त्यात पडतांच कुंभाला समुद्राचा अत्यंत खालचा तळ पहावा लागला. ॥८४॥
ततः कुम्भनिपातेन जलराशिः समुत्थितः ।
विन्ध्यमन्दरसंकाशो विससर्प समन्ततः ॥ ८५ ॥
कुंभाच्या पडण्यामुळे फार मोठी जलराशी वर उसळली जी विंध्य आणि मंदराचलाप्रमाणे भासली आणि सर्वत्र पसरली. ॥८५॥
ततः कुम्भः समुत्पत्य सुग्रीवमभिपात्य च ।
आजघानोरसि क्रुद्धो वज्रवेगेन मुष्टिना ॥ ८६ ॥
त्यानंतर कुंभ परत उसळून बाहेर आला आणि क्रोधपूर्वक सुग्रीवांना आपटून त्यांच्या छातीवर त्याने वज्रासमान मुष्टिप्रहार केला. ॥८६॥
तस्य चर्म च पुस्फोट संजज्ञे चापि शोणितम् ।
तस्य मुष्टिर्महावेगः प्रतिजघ्नेऽस्थिमण्डले ॥ ८७ ॥
त्यामुळे वानरराजाचे कवच तुटून गेले आणि छातीतून रक्त वाहू लागले. त्याची महान्‌ वेगशाली मुष्टि सुग्रीवाच्या हाडांवर अत्यंत वेगाने लागली होती. ॥८७॥
तदा वेगेन तत्रासीत् तेजः प्रज्वलितं मुहुः ।
वज्रनिष्पेषसंजाता ज्वाला मेरोर्यथा गिरेः ॥ ८८ ॥
तिच्या वेगाने तेथे फार मोठी ज्वाला पेटून उठली, जणु मेरू पर्वताच्या शिखरातून वज्राच्या आघाताने आग प्रकट झाली होती. ॥८८॥
स तत्राभिहतस्तेन सुग्रीवो वानरर्षभः ।
मुष्टिं संवर्तयामास वज्रकल्पं महाबलः ॥ ८९ ॥

अर्चिः सहस्रविकच रविमण्डलवर्चसम् ।
स मुष्टिं पातयामास कुम्भस्योरसि वीर्यवान् ॥ ९० ॥
कुंभाच्या द्वारा याप्रमाणे आहत झाल्यावर वानरराज महाबली परम पराक्रमी सुग्रीवांनी ही आपली वज्रतुल्य मूठ उगारली आणि कुंभाच्या छातीवर बलपूर्वक आघात केला. त्या मूठीचे तेज हजारो किरणांनी प्रकाशित सूर्यमण्डलासमान उद्दीप्त होते होते. ॥८९-९०॥
स तु तेन प्रहारेण विह्वलो भृशपीडितः ।
निपपात तदा कुम्भो गतार्चिरिव पावकः ॥ ९१ ॥
त्या प्रहाराने कुंभाला फार पीडा झाली. तो व्याकुळ होऊन विझलेल्या आगीप्रमाणे खाली पडला. ॥९१॥
मुष्टिनाभिहतस्तेन निपपाताशु राक्षसः ।
लोहिताङ्‌ग इवाकाशाद् दीप्तरश्मिर्यदृच्छया ॥ ९२ ॥
सुग्रीवाच्या मुष्टिच्या प्रहाराने तो राक्षस आकाशातून अकस्मात्‌ पडणार्‍या मंगळाप्रमाणे तात्काळ धराशायी झाला. ॥९२॥
कुम्भस्य पततो रूपं भग्नस्योरसि मुष्टिना ।
बभौ रुद्राभिपन्नस्य यथा रूपं गवां पतेः ॥ ९३ ॥
मुष्टिच्या माराने ज्याचे वक्षःस्थळाचा चुराडा झाला होता. तो कुंभ जेव्हा खाली पडू लागला तेव्हा त्याचे रूप रूद्रदेवाकडून अभिभूत झालेल्या सूर्यदेवासमान भासले. ॥९३॥
तस्मिन् हते भीमपराक्रमेण
प्लवङ्‌गमानामृषभेण युद्धे ।
मही सशैला सवना चचाल
भयं च रक्षांस्यधिकं विवेश ॥ ९४ ॥
भयंकर पराक्रमी वानरराज सुग्रीवद्वारा युद्धात तो निशाचर मारला गेल्यावर पर्वत आणि वनांसहित सारी पृथ्वी कापू लागली आणि राक्षसांचे हृदय अत्यंत भयभीत झाले. ॥९४॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे षट्सप्ततितमः सर्गः ॥ ७६ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा शहाहत्तरावा सर्ग पूरा झाला. ॥७६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP