श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ षट्‍चत्वारिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
सीतां रथ उपवेश्य वने परित्यक्तुं लक्ष्मणस्य गमनं, गङ्‌गातटे समुपस्थानं च -
लक्ष्मणांनी सीतेला रथात बसवून तिला वनात सोडण्यासाठी घेऊन जाणे आणि गंगेच्या तटावर पोहोचणे -
ततो रजन्यां व्युष्टायां लक्ष्मणो दीनचेतनः ।
सुमन्त्रं अब्रवीद्वाक्यं मुखेन परिशुष्यता ॥ १ ॥
त्यानंतर जेव्हा रात्र सरली आणि दिवस उजाडला तेव्हा लक्ष्मणाने मनातल्या मनात दुःखी होऊन कोरड पडलेल्या मुखाने सुमंत्रास म्हटले - ॥१॥
सारथे तुरगान् धीघ्रीन् योजयस्व रथोत्तमे ।
स्वास्तीर्णं राजभवनात् सीतायाश्चासनं कुरु ॥ २ ॥

सीता हि राजवचनाद् आश्रमं पुण्यकर्मणाम् ।
मया नेया महर्षीणां शीघ्रमानीयतां रथः ॥ ३ ॥
सारथ्या ! एक उत्तम रथाला शीघ्रगामी घोडे जोड आणि त्या रथात सीतेसाठी सुंदर आसन पसर. मी महाराजांच्या आज्ञेने सीतादेवीला पुण्यकर्मा महर्षिंच्या आश्रमावर पोहोचवून देईन. तू शीघ्र रथ घेऊन ये. ॥२-३॥
सुमन्त्रस्तु तथेत्युक्त्वा युक्तं परमवाजिभिः ।
रथं सुरुचिरप्रख्यं स्वास्तीर्णं सुखशय्यया ॥ ४ ॥
तेव्हा सुमंत्र फार चांगले म्हणून तात्काळच उत्तम घोडे जुंपलेला एक सुंदर रथ घेऊन आले, ज्याच्यावर सुखद शय्येने युक्त सुंदर आसन पसरलेले होते. ॥४॥
आनीयोवाच सौमित्रिं मित्राणां मानवर्धनम् ।
रथोऽयं समनुप्राप्तो यत्कार्यं क्रियतां प्रभो ॥ ५ ॥
तो आणून ते मित्रांचा आनंद वाढविणार्‍या सौमित्रास म्हणाले - प्रभो ! हा रथ आला आहे. आता जे काही करावयाचे असेल ते करावे. ॥५॥
एवमुक्तः सुमन्त्रेण राजवेश्मनि लक्ष्मणः ।
प्रविश्य सीतामासाद्य व्याजहार नरर्षभः ॥ ६ ॥
सुमंत्रांनी असे म्हटल्यावर नरश्रेष्ठ लक्ष्मण राजमहालात गेले आणि सीतेजवळ जाऊन म्हणाले - ॥६॥
त्वया किलैष नृपतिः वरं वै याचितः प्रभुः ।
नृपेण च प्रतिज्ञातं आज्ञप्तश्चाश्रमं प्रति ॥ ७ ॥
देवी ! आपण महाराजांकडून मुनिंच्या आश्रमांवर जाण्यासाठी वर मागितला होता आणि महाराजांनी आपल्याला आश्रमावर पोहोचविण्यासाठी प्रतिज्ञा केली होती. ॥७॥
गङ्‌गातीरे मया देवि ऋषीणां आश्रमान् शुभान् ।
शीघ्रं गत्वा तु वैदेहि शासनात् पार्थिवस्य नः ॥ ८ ॥

अरण्ये मुनिभिर्जुष्टे अवनेया भविष्यसि ।

देवी ! वैदेही ! त्या संभाषणास अनुसरून मी राजांच्या आज्ञेने शीघ्रच गंगातटावरील ऋषिंच्या सुंदर आश्रमांपर्यंत येईन आणि आपल्याला मुनिजनसेवित वनामध्ये पोहोचवीन. ॥८ १/२॥
एवमुक्ता तु वैदेही लक्ष्मणेन महात्मना ॥ ९ ॥

प्रहर्षमतुलं लेभे गमनं चाप्यरोचयत् ।
महात्मा लक्ष्मणांनी असे म्हटल्यावर वैदेही सीतेला अनुपम हर्ष झाला. ती निघण्यासाठी तयार झाली. ॥९ १/२॥
वासांसि च महार्हाणि रत्‍नाीनि विविधानि च ॥ १० ॥

गृहीत्वा तानि वैदेही गमनायोपचक्रमे ।
इमानि मुनिपत्‍नीमनां दास्याम्याभरणान्हम् ॥ ११ ॥

वस्त्राणि च महार्हाणि धनानि विविधानि च ।
बहुमूल्य वस्त्रे आणि नाना प्रकारची रत्‍ने घेऊन वैदेही सीता वनाच्या यात्रेसाठी उद्यत झाली आणि लक्ष्मणास म्हणाली - ही सर्व बहुमूल्य वस्त्रे, आभूषणे आणि नानाप्रकारची रत्‍ने-धन मी मुनि-पत्‍नींना देईन. ॥१०-११ १/२॥
सौमित्रिस्तु तथेत्युक्त्वा रथमारोप्य मैथिलीम् ॥ १२ ॥

प्रययौ शीघ्रतुरगं रामस्याज्ञामनुस्मरन् ।
लक्ष्मणांनी फार चांगले म्हणून मैथिली सीतेस रथावर चढविले आणि रामांची आज्ञा लक्षात घेऊन त्या शीघ्रगामी घोडे असणार्‍या रथावर चढून ते वनाकडे जाण्यास निघाले. ॥१२ १/२॥
अब्रवीच्च तदा सीता लक्ष्मणं लक्ष्मिवर्धनम् ॥ १३ ॥

अशुभानि बहून्येव पश्यामि रघुनन्दन ।
नयनं मे स्फुरत्यद्य गात्रोत्कम्पश्च जायते ॥ १४ ॥
त्या समयी सीतेने लक्ष्मीवर्धन लक्ष्मणास म्हटले - रघुनंदना ! मला बरेचसे अपशकुन दिसून येत आहेत. आज माझा उजवा डोळा लवत आहे आणि माझ्या शरीरात कंप होत आहे. ॥१३-१४॥
हृदयं चैव सौमित्रे अस्वस्थमिव लक्षये ।
औत्सुक्यं परमं चापि अधृतिश्च परा मम ॥ १५ ॥
सौमित्र ! मी आपले हृदय अस्वस्थ असल्यासारखे पहात आहे. मनात मोठी उत्कण्ठा होत आहे आणि माझी अधीरता पराकाष्ठेला पोहोचलेली आहे. ॥१५॥
शून्यामेव च पश्यामि पृथिवीं पृथुलोचन ।
अपि स्वस्ति भवेत् तस्य भ्रातुस्ते भ्रातृवत्सल ॥ १६ ॥
विशाल लोचन लक्ष्मणा ! मला पृथ्वी शून्यवत्‌शी भासत आहे. भ्रातृवत्सला ! तुमचे भाऊ कुशल असोत. ॥१६॥
श्वश्रूणां चैव मे वीर सर्वासामविशेषतः ।
पुरे जनपदे चैव कुशलं प्राणिनामपि ॥ १७ ॥
वीरा ! माझ्या सर्व सासवा समान रूपाने सानंद राहोत. नगर आणि जनपदातही समस्त प्राणी सकुशल राहोत. ॥१७॥
इत्यञ्जलिकृता सीता देवता अभ्ययाचत ।
लक्ष्मणोऽर्थं ततः श्रुत्वा शिरसा वन्द्य मैथिलीम् ॥ १८ ॥

शिवमित्यब्रवीद्‌धृष्टो हृदयेन विशुष्यता ।
असे म्हणत असणार्‍या सीतेने हात जोडून देवतांची प्रार्थना केली. सीतेचे ते बोलणे ऐकून लक्ष्मणाने मस्तक नमवून तिला प्रणाम केला - वरून प्रसन्न होऊन व्यथित अंतःकरणाने म्हटले - सर्वांचे कल्याण होवो. ॥१८ १/२॥
ततो वासमुपागम्य गोमतीतीर आश्रमे ॥ १९ ॥

प्रभाते पुनरुत्थाय सौमित्रिः सूतमब्रवीत् ।
त्यानंतर गोमतीच्या तटावर पोहोचून एका आश्रमात त्या सर्वांनी रात्र काढली. नंतर प्रातःकाळी उठून सौमित्राने सारथ्यास म्हटले - ॥१९ १/२॥
योजयस्व रथं शीघ्रं अद्य भागीरथीजलम् ॥ २० ॥

शिरसा धारयिष्यामि त्रियम्बकः इवौजसा ।
सारथ्या ! लवकर रथ जुंपा. आज मी भागीरथीच्या जलाला ज्याप्रमाणे भगवान्‌ शंकारांनी आपल्या तेजाने तिला मस्तकावर धारण केले होते त्याप्रमाणे आपल्या मस्तकावर धारण करीन. ॥२० १/२॥
सोऽश्वान् विचारयित्वा तु रथे युङ्‌क्तान् मनोजवान् ॥ २१ ॥

आरोहस्वेति वैदेहीं सूतः प्राञ्जलिरब्रवीत् ।
सारथ्याने मनासमान वेगवान्‌ चारी घोड्‍यांना विचारपूर्वक रथास जुंपले आणि वैदेही सीतेस हात जोडून म्हटले -देवी ! रथावर आरूढ व्हावे. ॥२१ १/२॥
सा तु सूतस्य वचनाद् आरुरोह रथोत्तमम् ॥ २२ ॥

सीता सौमित्रिणा सार्धं सुमन्त्रेण च धीमता ।
आससाद विशालाक्षी गङ्‌गां पापविनाशिनीम् ॥ २३ ॥
सूताने असे म्हटल्यावर सीता त्या समयी रथावर आरूढ झाली. याप्रकारे सौमित्र लक्ष्मण आणि बुद्धिमान्‌ सुमंत्राबरोबर विशालाक्षी सीतादेवी पापनाशिनी गंगेच्या तटावर जाऊन पोहोचली. ॥२२-२३॥
अथार्धदिवसे गत्वा भागीरथ्या जलाशयम् ।
निरीक्ष्य लक्ष्मणो दीनः प्ररुरोद महास्वनः ॥ २४ ॥
दुपारच्या समयी भागीरथीच्या जलधारेपर्यंत पोहोंचून तिच्याकडे पहात असतां दुःखी होऊन लक्ष्मण उच्चस्वराने स्फुंदून स्फुंदून रडू लागले. ॥२४॥
सीता तु परमायत्ता दृष्ट्‍वा लक्ष्मणमातुरम् ।
उवाच वाक्यं धर्मज्ञा किमिदं रुद्यते त्वया ॥ २५ ॥

जाह्नवीतीरमासाद्य चिराभिलषितं मम ।
हर्षकाले किमर्थं मां विषादयसि लक्ष्मण ॥ २६ ॥
लक्ष्मण शोकातुर झालेले पाहून धर्मज्ञा सीता अत्यंत चिंतित होऊन त्यांना म्हणाली - लक्ष्मणा ! हे काय ! तुम्ही का रडत आहात ? गंगेच्या तटावर येऊन तर माझी चिरकालाची अभिलाषा पूर्ण झाली आहे. या हर्षाच्या समयी तुम्ही रडून मला दुःखी का करीत आहात ? ॥२५-२६॥
नित्यं त्वं रामपार्श्वेषु वर्तसे पुरुषर्षभ ।
कच्चिद् विनाकृतस्तेन द्विरात्रं शोकमागतः ॥ २७ ॥
पुरूषप्रवर ! श्रीरामांच्या जवळ तर तुम्ही सदाच रहात असता. काय दोन दिवसपर्यंत त्यांचा विरह झाल्यामुळे तुम्ही इतके शोकाकुल झाला आहात की काय ? ॥२७॥
ममापि दयितो रामो जीवितादपि लक्ष्मण ।
न चाहमेवं शोचामि मैवं त्वं बालिशो भव ॥ २८ ॥
लक्ष्मणा ! श्रीराम तर मलाही आपल्या प्राणांहूनही अधिक प्रिय आहेत परंतु मी तर याप्रकारे शोक करत नाही आहे. तुम्ही असे बालिश बनू नका. ॥२८॥
तारयस्व च मां गङ्‌गां दर्शयस्व च तापसान् ।
ततो मुनिभ्यो वासांसि दास्याम्याभरणानि च ॥ २९ ॥
मला गंगेच्या त्या तटावर घेऊन चला आणि तपस्वी मुनिंचे दर्शन करवा. मी त्यांना वस्त्रे आणि आभूषणे देईन. ॥२९॥
ततः कृत्वा महर्षीणां यथार्हमभिवादनम् ।
तत्र चैकां निशामुष्य यास्यामस्तां पुरीं पुनः ॥ ३० ॥
त्यानंतर त्या महर्षिंना यथायोग्य अभिवादन करून तेथे एक रात्र थांबून आपण पुन्हा अयोध्यापुरीला परत जाऊ. ॥३०॥
ममापि पद्मपत्राक्षं सिंहोरस्कं कृशोदरम् ।
त्वरते हि मनो द्रष्टुं रामं रमयतां वरम् ॥ ३१ ॥
माझे मनही सिंहासमान वक्षःस्थळ, कृश उदर आणि कमलासमान नेत्र असणार्‍या श्रीरामांना, जे मनाला रमविणारांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत, पहाण्यासाठी उतावीळ होत आहे. ॥३१॥
तस्यास्तद्वचनं श्रुत्वा प्रमृज्य नयने शुभे ।
नाविकानाह्वयामास लक्ष्मणः परवीरहा ।
इयं च सज्जा नौश्चेति दाशाः प्राञ्जलयोऽब्रुवन् ॥ ३२ ॥
सीतेचे हे वचन ऐकून शत्रुवीरांचा संहार करणार्‍या लक्ष्मणांनी आपले दोन्ही सुंदर डोळे पुसले आणि नाविकाला बोलावले. त्या नावाड्‍याने हात जोडून म्हटले -प्रभो ! ही नाव तयार आहे. ॥३२॥
तितीर्षुर्लक्ष्मणो गङ्‌गां शुभां नावमुपारुहत् ।
गङ्‌गां सन्तारयामास लक्ष्मणस्तां समाहितः ॥ ३३ ॥
लक्ष्मण गंगेच्या पार जाण्यासाठी सीतेसह त्या सुंदर नौकेवर बसले आणि अत्यंत सावधानतेने त्यांनी सीतेला गंगेच्या पार पोहोचविले. ॥३३॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे षट्चत्वारिंशः सर्गः ॥ ४६ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा सेहेचाळिसावा सर्ग पूरा झाला. ॥४६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP