श्रीभावार्थरामायण सम्पूर्ण

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय सत्त्याहत्तरावा ॥
श्रीरामांचे सर्वांसह वैकुंठगमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥


अयोध्या सांडोनि अर्ध योजन । पुढें निघाला श्रीरघुनंदन ।
देखोनि तीर शरयूचें पावन । तेथें वस्तीसी राहिला ॥१॥
त्या शरयूचा महिमा कैसा । जो देवांसी अगम्य सहसा ।
जातें वर्णितां महेशा । पार न कळें निर्धारीं ॥२॥
मानससरोवरीं जन्मली । उत्तरेची दक्षिणें चालिली ।
भागीरथीसी मिळती झालीं । आपुलेनि पूर्वपुण्यें ॥३॥
ऐसें शरयूतीर मनोहर । स्नानें निष्पाप होती नर ।
तया तीरीं श्रीरघुवीर । प्रस्थानासी उतरला ॥४॥
तंव येरीकडे चतुरानन । समस्त देवांसीं परिवारोन ।
दिव्य विमानीं सुरगण । आपुल्याला बैसले ॥५॥
जैसे हंस आपुल्याला मेळीं । उडोनि बैसती तडागाचे पाळीं ।
तैसे देव तये काळीं । परिवारेसीं मिरवले ॥६॥
गगनीं विमानांची दाटी । ऋषी मिळाले कोट्यानुकोटी ।
पाहती अंतरीं लक्षोनि जगजेठी । श्रीरामातें ते काळीं ॥७॥
विमानचे ज्योतीचेनि प्रभावें । दशदिशा तेज हेलावे ।
तयामाजी ब्रह्मदेवें । पुष्पवृष्टि करिजेली ॥८॥
अंजळि भरोनि कुसुमेंकरीं । टाकिते झाले श्रीरामावरी ।
तयाचे सुवासें पवन अंबरीं । पांगुळला सुगंधें हो ॥९॥
अप्सरा नृत्य करिती गगनी । गंधर्व स्वसुरें गाती गाणीं ।
तंव ब्रह्मा तये क्षणीं । श्रीरामासी बोलता झाला ॥१०॥
विधता म्हणे श्रीरामचंद्रा । भाग्यें देखिलासी गुणसमुद्रा ।
परिवारेंसीं या नरेंद्रा । भक्तजनां सुख द्यावें ॥११॥
तूं वैकुंठाचा नायक । तुज नेणती मतिमंद लोक ।
तूं यज्ञभोक्ता पुण्यश्लोक । अचिंत्य अव्यक्त स्वरुप तुझें ॥१२॥
तूं गुणातीत निर्विकार । तूं निष्कर्म निरुपचार ।
ऋतिशास्त्रांसी न कळे पार । तूं अगोचर निजवेदा ॥१३॥
तुज नाहीं जन्ममरणवार्ता । तूं सर्वसाक्षी सर्वभर्ता ।
तुझें ध्यान कैलासनाथा । रात्रंदिवस हेंचि पैं ॥१४॥
स्वस्वरुपीं समाधान । निजदेह होय मिथ्या जाण ।
ऐसेपरीचे साधुजन । आत्मनिष्ठें राहती ॥१५॥
जैसा बहुरुपिया नाना सोंगें धरी । त्यागितां एकदेहधारी ।
तैसा तूं रामा हेंही करीं । आत्मसाक्षात्कारीं राहून ॥१६॥
भुजंग सांडी त्वचेतें । काय हानि होय देहातें ।
तैसे श्रीरामा मानीं निजस्वरुपातें । ठायीं ठेवीं देवाधिदेवा ॥१७॥
ऐसें ब्रह्मा बोलिल्यावरी । मग श्रीराम रणकेसरी ।
स्नानें करोनि दिव्यशरीरी । बंधूंसहित पैं झाला ॥१८॥
शरयूचें करोनि स्नान । बंधूंसमवेत श्रीरघुनंदन ।
दिव्य देह शोभायमान । धरिला जाण श्रीरामें ॥१९॥
तें शरीर धरिलें कैसें । जया देहीं देहत्व नसे ।
जाणोनियां देवीं ऐसें । पूजाविधान पैं केलें ॥२०॥
दिव्य देह श्रीरामाचा । देखोनि सकळ बोलती वाचा ।
म्हणती आजि दिन दैवाचा । उदय झाला बहु दिवसां ॥२१॥
सिद्ध गंधर्व किन्नर । ऋषी तापस विद्याधर ।
पन्नग देव राक्षस वानर । उल्हास थोर पावले ॥२२॥
सर्वांचे झाले पूर्ण मनोरथ । दिव्यदेही देखिला श्रीरघुनाथ ।
भला भला म्हणों लागले तेथ । श्रीरामासी ते काळीं ॥२३॥
तदनंतर श्रीरघुनंदन । विधत्याप्रति बोले वचन ।
म्हणे सत्यलोकानायका हे जन । मजसमागमें स्वर्गां येताती ॥२४॥
यांसि तुम्ही उद्धरावें । मनोरथ पूर्ण करावे ।
सामोपचारें स्वर्गा न्यावें । भोग भोगावया तेथींचे ॥२५॥
हे मजबरोबर रमले वनवासीं । अन्न‍उदकेंवीण झाले क्लेशी ।
आतां सुख होय जेणें प्रकारेंसीं । तेंचि यांसी करावें ॥२६॥
ब्रह्मा म्हणे पौलस्त्यारी । हे युक्ती विचरिली बरी ।
तूं भक्तकाजकैवारी । ऐसीं श्रुतिपुराणें गर्जती ॥२७॥
ऐसें स्रष्ट्याचें वचन । सुधारसापरीस गोड गहन ।
समस्तीं जनीं ऐकोन । शरयूस्नान पैं केलें ॥२८॥
पूर्व देह त्यागितां । कोणा नाहीं दैन्यचिंता ।
उल्हासोनि श्रीरघुनाथा । अंतकाळीं स्मरती हो ॥२९॥
दिव्य देह धरोनि समस्तीं । विमानीं बैसोनि शोभती ।
चतुष्पादादि पक्षियाती । स्वर्गाप्रती निघाले ॥३०॥
पर्वत वृक्ष अयोध्येचे जाण । सर्वही विमानीं आरुढोन ।
श्रीरामासवें करिती गमन । जाते झाले ते समयीं ॥३१॥
श्रीरामासवें बैसोनि विमानीं । जाते झाले स्वर्गालागूनी ।
पुढें जयां जे लोक नेमिले तेथोनी । आपुलाले स्थळा पावले ॥३२॥
जेंवी विहंगम एक होऊन । उडाले आकाशीं करिती गमन ।
पुढें पसरले दश दिशां जाण । तैसे वानरगण निजलोका गेले ॥३३॥
जनोलोक तपोलोक । आणि वैकुंठ कैलास सत्यलोक ।
यांचे अधिकारी जे जे देख । ते त्या त्या स्थळा पैं गेले ॥३४॥
श्रीराम वैकुंठासि गेला । सवें अयोध्येचा लोक नेला ।
नगरीं कोणी नाहीं राखिला । पक्षिआदिकरोनी ॥३५॥
रविसुते रविलोकीं । जावोनि राहिला सुखीं ।
इतर तापस राक्षस ऋषी । सत्यलोकीं राहिले ॥३६॥
करितां श्रीरामस्मरण । स्वर्गीं राहिले लोकगण ।
वाल्मीकें इतकें कथिलें जाण । रामायण साजिरें ॥३७॥
श्रीराम वैकुंठा करितां गमन । मार्गी भेटले पुरंदरादि देवगण ।
तयांची पूजा घेवोन । निजधामा चालिला ॥३८॥
वैकुंठा जातां श्रीरामासी । मार्गी उद्धरले देवऋषी ।
जयांची इच्छा होती जैसी । मनोरथ पूर्ण केलें त्यांचे ॥३९॥
ऐसा लीलाविग्रही श्रीरघुनाथ । खेळ खेळूनि उद्धरिला भक्त ।
नाममात्रें मोक्ष देत । एक वेळ आठवलिया ॥४०॥
ब्रह्मचर्य धरोनि व्रत । वैकुंठा गेला जानकीकांत ।
ऐसें ऐकोनि श्रोते आक्षेपिते । म्हणते झाले वक्तया ॥४१॥
ब्रह्मचर्यव्रत धरोन । निजधामा गेला श्रीरघुनंदन ।
हा नेम धरावया कारण । काय असे सांगिजे ॥४२॥
व्रत धरावया श्रीरघुपती । काय कारण वाटे चित्तीं ।
तें सांगिजे आम्हांप्रती । संदेहनिवृत्तीकारणें ॥४३॥
ऐसें ऐकोनि श्रोतयांचे वचन । अंगें निवाला एका जनार्दन ।
म्हणे तुमच्या प्रश्नाचें खंडन । मधुरा वाणीं करीतसें ॥४४॥
ब्रह्मचर्य धरावया व्रत । काय कारण श्रीरघुनाथ ।
सावध होवोनि तुम्हीं संत । अनन्यभावें ऐकावें ॥४५॥
पुढिलें श्रीकृष्ण अवतारीं । पूर्ण प्रकटावया श्रीहरी ।
भोगोनि सोळा सहस्त्र नारी । ब्रह्मचारी म्हणविणें ॥४६॥
भोगोनि भोग अभोक्ता । ऐसी प्रकट करावया कथा ।
उल्हास थोर अच्युता । दाखवितां निजमहिमा ॥४७॥
याकारणें ब्रह्मचर्यव्रत । धरिता झाला श्रीरघुनाथ ।
पुढील रसाळ चरित्र । प्रकट करावयालागूनी ॥४८॥
तंव श्रोते म्हणती कविश्वरा । रामावतारीं स्त्रियां अपारा ।
दान दिधल्या काय कारण चतुरा । सुवर्णाच्या अग्निहोत्रीं ॥४९॥
होम करितां प्रतिदिनीं । सुवर्णस्त्री देतसे दानीं ।
तयाचें फळ आम्हांलागूनी । काय असे तें सांगावें ॥५०॥
वक्ता म्हणे अहो जी स्वामी । तुमचे प्रश्ननदीचे संगमीं ।
रामकथासिंधु मिळालों मी । ऐसें भावितसें मानसीं ॥५१॥
तुमचे प्रश्नकथेची वृद्धी । तुमचे वचनलोभें समाधी ।
तुमचे कृपेनें कैवल्यपदीं । पाविजे हो दातारा ॥५२॥
तुमचेनि प्रश्नें श्रीरामस्मरण । होतसे अधिकाधिक जाण ।
तुमचे प्रश्नें भवदोष-दहन । ब्रह्मपूर्ण होइ‍जे ॥५३॥
तुमचे प्रश्नाचें उत्तर । द्यावया मी कोण किंकर ।
परी सलगी करोनि सादर । तुम्हांप्रति सांगतसें ॥५४॥
रामावतारीं स्त्रिया दान । केल्या म्हणोनि पावला श्रीकृष्ण ।
पूर्वसंचित अवश्य जाण । भोगणें पडे देवादिकां ॥५५॥
पूर्वी स्त्रिया देवोनि दान । त्या कृष्णावतारीं पावला जाण ।
यालागीं श्रुतिप्रमाण । दिधल्यावांचोन न पाविजे ॥५६॥
नादसमुपतिष्ठतु । याचा ऐसा असे अर्थु ।
स्वमुखें बोलिला श्री‍अच्युत । पूर्वदत्त पाविजे ॥५७॥
यापरी श्रोतयांचे आक्षेप‍उत्तर । कवीनें देवोनि त्याचें प्रत्युत्तर ।
पुढें कथासमाप्तीचा विचार । आरंभिला जाणावा ॥५८॥
सवेंचि आठवलें माझिया चित्ता । तें परिसावें जी श्रोतां ।
जानकीवियोगें श्रीरघुनाथा । कष्ट अपार पैं झाले ॥५९॥
एकपत्नीव्रताचे नेमें । क्लेश भोगिले श्रीरामें ।
आणि वनफळें भक्षिलीं उत्तमें । तेणेकरोनी श्रम झाला ॥६०॥
ऐसीं दोनी व्रतें अति दुस्तरें । धरिली होतीं श्रीरघुवीरें ।
तीं श्रमरुप जाणोनी चतुरें । कृष्णावतारीं त्यागिलीं ॥६१॥
व्रतनेमाचा धरोनि वीट । अवतार धरिला अति श्रेष्ठ ।
करावया पूर्णत्व प्रकट । ऐसी लीला धरियेली ॥६२॥
घेवोनि कृष्णरुपाची बुंथी । लीलाविग्रहीं श्रीपती ।
आसक्त होवोनि वनितीं । चोरावया हिंडतसे ॥६३॥
भोगी गौळियांच्या नारी । दहीं चोरी घरोघरीं ।
दांवीं बांधिता सुंदरी । यशोदा आश्वर्य पावली ॥६४॥
ऐसा लीलाविग्रही जनार्दन । तोचि दाशरथी रघुनंदन ।
प्रकट करोनि पूर्णपण । खेळ खेळे नानापरी ॥६५॥
रामायणींचा एक श्लोक । भवबंधच्छेदक समर्थ देख ।
कथून गेला वाल्मीक शतकोटि संख्या हो ॥६६॥
श्लोकार्थ अथवा एक चरण । जो नर सादर करी श्रवण ।
तो पढियंता श्रीरामा पूर्ण । मुमुक्षांमाजि आगळा ॥६७॥
श्रीराम‍उच्चारें गणिका । तत्काळ गेली वैकुंठलोका ।
हा निश्चय होता कैलासनायका । ध्येयमूर्तिं म्हणोनि ॥६८॥
उत्तरकांड संपते‍अंतीं । वैकुंठा गेला लक्ष्मीपती ।
ऐसें चरित्र ठेवोनि त्रिजगतीं । उद्धरावयाकारणें ॥६९॥
एका जनार्दना शरण । झालें उत्तरकांड संपूर्ण ।
पुढें श्रोतीं करावें श्रीरामस्मरण । राम राम म्हणावें ॥७०॥
आदिपासोनि अंतींवरी । श्रीरामकथा अमृतलहरी ।
सादर जो श्रवण करी । तोचि संसारीं धन्य होय ॥७१॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
श्रीराम‍अयोध्याजनसमवेतवैकुंठपप्रवेशो नाम सप्तसप्ततितमोऽध्यायः ॥७७॥

॥ उत्तराकांड समाप्त ॥

GO TOP