[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। अष्टाधिकशततमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामं प्रति नास्तिकमतमवलम्ब्य जाबालिमुनेर्भाषणम् -
जाबलिंनी नास्तिकांच्या मताचे अवलंबन करून श्रीरामांना समजाविणे -
आश्वासयन्तं भरतं जाबालिर्ब्राह्मणोत्तमः ।
उवाच रामं धर्मज्ञं धर्मापेतमिदं वचः ॥ १ ॥
जेव्हां धर्मज्ञ श्रीराम भरतांना याप्रकारे समजावित होते, त्या समयी ब्राह्मण शिरोमणि जाबालिंनीत्यांना हे धर्माविरुद्ध वचन सांगितले - ॥ १ ॥
साधु राघव मा भूत् ते बुद्धिरेवं निरर्थिका ।
प्राकृतस्य नरस्येव ह्यार्यबुद्धेस्तपस्विनः ॥ २ ॥
राघव ! आपण ठीक सांगितलेत, परंतु आपण श्रेष्ठ बुद्धी असलेले आणि तपस्वी आहात, म्हणून आपल्याला गांवढळ मनुष्याप्रमाणे असे निरर्थक विचार मनांत आणता उपयोगी नाही. ॥ २ ॥
कः कस्य पुरुषो बन्धुः किमाप्यं कस्य केनचित् ।
यदेको जायते जन्तुरेकक एव विनश्यति ॥ ३ ॥
’संसारात कोण मनुष्य बंधु आहे, आणि कुणाला कुणाकडून काय मिळवायचे आहे ? जीव एकटाच जन्म घेतो आणि एकटाच नष्ट होऊन जातो. ॥ ३ ॥
तस्मान्माता पिता चेति राम सज्जेत यो नरः ।
उन्मत्त इव स ज्ञेयो नास्ति कश्चिद्धि कस्यचित् ॥ ४ ॥
’म्हणून श्रीराम ! जो मनुष्य माता अथता पिता समजून कुणाच्या प्रति आसक्त होतो त्याला वेड्याप्रमाणेच समजले पाहिजे. कारण येथे कोणी कोणाचेही नाही. ॥ ४ ॥
यथा ग्रामान्तरं गच्छन् नरः कश्चित् बहिर्वसेत् ।
उत्सृज्य च तमावासं प्रतिष्ठेतापरेऽहनि ॥ ५ ॥

एवमेव मनुष्याणां पिता माता गृहं वसु ।
आवासमात्रं काकुत्स्थ सज्जन्ते नात्र सज्जनाः ॥ ६ ॥
जसा एखादा मनुष्य दुसर्‍या गांवी जाते वेळी बाहेर एखाद्या धर्मशाळेत एका रात्रीसाठी थांबतो आणि दुसर्‍या दिवशी ते स्थान सोडून पुढे प्रस्थित होतो. या प्रकारे पिता, माता, घर आणि धन ही मनुष्यांची आवासमात्र आहेत. काकुत्स्थ ! यांच्यात सज्जन पुरुष आसक्त होत नाहीत. ॥ ५-६ ॥
पित्र्यं राज्यं समुत्सृज्य स नार्हसि नरोत्तम ।
आस्थातुं कापथं दुःखं विषमं बहुकण्टकम् ॥ ७ ॥
म्हणून नरश्रेष्ठ ! आपण पित्याचे राज्य सोडून या दुःखमय, उंच-सखल, तसेच अनेक काट्याकुट्यांनी व्याप्त वनांतील कुत्सित मार्गावर चालता उपयोगी नाही. ॥ ७ ॥
समृद्धायामयोध्यायामात्मानमभिषेचय ।
एकवेणी धरा हि त्वा नगरी सम्प्रतीक्षते ॥ ८ ॥
अपण समृद्धिशालिनी अयोध्येच्या राजाच्या पदावर आपला अभिषेक करवावा. ही नगरी प्रोषितभर्तृका नारीप्रमाणे एक वेणी धारण करून आपली प्रतीक्षा करीत आहे. ॥ ८ ॥
राजभोगाननुभवन् महार्हान् पार्थिवात्मज ।
विहर त्वमयोध्यायां यथा शक्रस्त्रिविष्टपे ॥ ९ ॥
’राजकुमार ! ज्याप्रमाणे देवराज इंद्र स्वर्गात विहार करतात त्याप्रमाणे आपण बहुमूल्य राजभोगांचा उपभोग करीत अयोध्येत विहार करावा. ॥ ९ ॥
न ते कश्चिद् दशरथः त्वं च तस्य न कश्चन ।
अन्यो राजा त्वमन्यस्तु तस्मात् कुरु यदुच्यते ॥ १० ॥
’राजा दशरथ आपले कोणी नव्हते आणि आपणही त्यांचे कोणीही नाही. राजा दशरथ दुसरे होते आणि आपणही दुसरेच आहात; म्हणून मी जे सांगतो तेच करावे. ॥ १० ॥
बीजमात्रं पिता जन्तोः शुक्लं शोणितमेव च ।
संयुक्तमृतुमन्मात्रा पुरुषस्येह जन्म तत् ॥ ११ ॥
’पिता जीवाच्या जन्मात निमित्त कारणमात्र होत असतो. वास्तविक ऋतुमती मातेच्या द्वारा गर्भात धारण केले गेलेल्या वीर्य आणि राजाचा परस्पर संयोग झाल्यावरच पुरुषाचा येथे जन्म होत असतो. ॥ ११ ॥
गतः स नृपतिस्तत्र गन्तव्यं यत्र तेन वै ।
प्रवृत्तिरेषा भूतानां त्वं तु मिथ्या विहन्यसे ॥ १२ ॥
’राजांना जिकडे जावयाचे होते तिकडे ते निघून गेले. ही प्राण्यांसाठी स्वाभाविक स्थिती आहे. आपण तर व्यर्थ मारले जात आहात (कष्ट सोसत आहात). ॥ १२ ॥
अर्थधर्मपरा ये ये तांस्ताञ्शोचामि नेतरान् ।
ते हि दुःखमिह प्राप्य विनाशं प्रेत्य लेभिरे ॥ १३ ॥
’जे जे लोक प्राप्त झालेल्या अर्थाचा परित्याग करून धर्मपरायण झाले आहेत त्या त्या लोकांसाठी मी शोक करतो, दुसर्‍यांसाठी नाही. ते या जगतात धर्माच्या नावावर केवळ दुःख भोगून मृत्युनंतर नष्ट होऊन जातात. ॥ १३ ॥
अष्टकापितृदैवत्यमित्ययं प्रसृतो जनः ।
अन्नस्योपद्रवं पश्य मृतो हि किमशिष्यति ॥ १४ ॥
अष्टका आदि जितकी श्राद्धे आहेत, त्यांच्या देवता पितर आहेत. श्राद्धाचे दान पितरांना मिळते असा विचार करूनच लोक श्राद्धात प्रवृत्त होतात, परंतु विचार करून पाहिला तर मात्र अन्नाचा नाशच होत असतो. भला, मेलेला मनुष्य काय खाईल ? ॥ १४ ॥
यदि भुक्तमिहान्येन देहमन्यस्य गच्छति ।
दद्यात् प्रवसतां श्राद्धं न तत् पथ्यशनं भवेत् ॥ १५ ॥
जर येथे एकाने खाल्लेले अन्न दुसर्‍याच्या शरीरास पोचत असेल तर परदेशात जाणारासाठीही श्राद्धच करायला पाहिजे. त्यांना वाटेत खाण्यासाठी भोजन देणे उचित नाही. ॥ १५ ॥
दानसंवनना ह्येते ग्रंथा मेधाविभिः कृताः ।
यजस्व देहि दीक्षस्व तपस्तप्यस्व संत्यज ॥ १६ ॥
देवतांसाठी यज्ञ आणि पूजा करा, दान द्या, यज्ञाची दीक्षा ग्रहण करा, तपस्या करा, आणि घरदार सोडून संन्यासी बनून जा इत्यादि गोष्टी सांगणारे ग्रंथ बुद्धिमान् मनुष्यांनी दानाकडे लोकांची प्रवृत्ति करविण्यासाठीच बनविले आहेत. ॥ १६ ॥
स नास्ति परमित्येतत् कुरु बुद्धिं महामते ।
प्रत्यक्षं यत् तदातिष्ठ परोक्षं पृष्ठतः कुरु ॥ १७ ॥
’म्हणून महामते ! आपण आपल्या मनांत हा निश्चय करावा की या लोकाशिवाय दुसरा कुठलाही लोक नाही (म्हणून तेथे फळ भोगण्यासाठी धर्म आदिच्या पालनाची आवश्यकता नाही). जो प्रत्यक्ष राज्यलाभ आहे, त्याचा आश्रय घ्यावा. परोक्षच्या (पारलौकिक) लाभाला मागे ढकलून द्यावे. ॥ १७ ॥
स तां बुद्धिं पुरस्कृत्य सर्वलोकनिदर्शिनीम् ।
राज्यं त्वं प्रतिगृह्णीष्व भरतेन प्रसादितः ॥ १८ ॥
’सत्पुरुषांची बुद्धि, जी सर्व लोकासाठी मार्ग दाखविणारी असल्याने प्रमाणभूत आहे; ती पुढे करून भरताच्या अनुरोधाने आपण अयोध्येचे राज्य ग्रहण करावे’. ॥ १८ ॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे अष्टोत्तरशततमः सर्गः ॥ १०८ ॥
या प्रकारे श्रीवाल्मिकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा एकशे आठवा सर्ग पूरा झाला ॥ १०८ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP