[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ एकोन्पञ्चाशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
रावणेन सीताया अपहरणं तस्या विलापो जटायुषो दर्शनं च -
रावण द्वारा सीतेचे अपहरण, सीतेचा विलाप आणि तिच्या द्वारा जटायुचे दर्शन -
सीताया वचनं श्रुत्वा दशग्रीवः प्रतापवान् ।
हस्ते हस्तं समाहत्य चकार सुमहद् वपुः ॥ १ ॥
सीतेचे हे वचन ऐकून प्रतापी दशमुख रावणाने आपल्या हातावर हात मारून शरीर खूपच विशाल केले. ॥१॥
स मैथिलीं पुनर्वाक्यं बभाषे वाक्यकोविदः ।
नोन्मत्तया श्रुतौ मन्ये मम वीर्यपराक्रमौ ॥ २ ॥
तो वाक्यकोविद होता. त्याने मैथिली सीतेस पुन्हा या प्रकारे सांगण्यास आरंभ केला- माझ्या समजुती प्रमाणे तू वेडी झाली आहेस म्हणून तू माझ्या बल आणि पराक्रमाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहेस. ॥२॥
उद्वहेयं भुजाभ्यां तु मेदिनीमम्बरे स्थितः ।
आपिबेयं समुद्रं च मृत्युं हन्यां रणे स्थितः ॥ ३ ॥
अग मी आकाशात उभा राहून या दोन्ही भुजांनीच सर्व पृथ्वी उचलून घेऊन जाऊ शकतो. समुद्र पिऊन टाकू शकतो आणि युद्धात स्थित होऊन मृत्युलाही मारून टाकू शकतो. ॥३॥
अर्कं तुद्यां शरैस्तीक्ष्णैर्विभिन्द्यां हि महीतलम् ।
कामरूपेण उन्मत्ते पश्य मां कामरूपिणम् ॥ ४ ॥
काम आणि रूपामुळे उन्मत्त राहाणार्‍या स्त्रिये ! जर मी इच्छा करीन तर आपल्या तीक्ष्ण बाणांनी सूर्यालाही व्यथित करीन आणि या भूतलाला विदीर्ण करून टाकीन. मी इच्छेप्रमाणे रूप धारण करण्यास समर्थ आहे; तू माझ्या कडे पहा. ॥४॥
एवमुक्तवतस्तस्य सूर्यकल्पे शिखिप्रभे ।
क्रुद्धस्य हरिपर्यन्ते रक्ते नेत्रे बभूवतुः ॥ ५ ॥
असे म्हणता म्हणता क्रोधाविष्ट झालेल्या रावणाचे डोळे ज्यांचे प्रांतभाग काळे होते, जळत्या आगीप्रमाणे लाल झाले. ॥५॥
सद्यः सौम्यं परित्यज्य तीक्ष्णरूपं स रावणः ।
स्वं रूपं कालरूपाभं भेजे वैश्रवणानुजः ॥ ६ ॥
कुबेराचा लहान भाऊ रावण याने तात्काळ आपले सौम्य रूपाचा त्याग करून तीक्ष्ण काळासमान विक्राळ आपले स्वाभाविक रूप धारण केले. ॥६॥
संरक्तनयनः श्रीमांस्तप्तकाञ्चनभूषणः ।
क्रोधेन महताविष्टो नीलजीमूतसंनिभः ॥ ७ ॥
त्यासमयी श्रीमान्‌ रावणाचे सर्व नेत्र लाल होत होते. तो चोख सोन्याच्या आभूषणांनी अलंकृत होता आणि महान्‌ क्रोधाने आविष्ट होऊन नीलमेघासमान काळा दिसू लागला.॥७॥
दशास्यो विंशतिभुजो बभूव क्षणदाचरः ।
स परिव्राजकच्छद्म महाकायो विहाय तत् ॥ ८ ॥
तो विशालकाय निशाचर परिव्राजकाचा तो छद्मवेष त्यागून दहामुखे आणि वीस भुजांनी संयुक्त झाला. ॥८॥
प्रतिपेदे स्वकं रूपं रावणो राक्षसाधिपः ।
रक्ताम्बरधरस्तस्थौ स्त्रीरत्‍नं प्रेक्ष्य मैथिलीम् ॥ ९ ॥
त्या समयी राक्षसराज रावणाने आपल्या सहज रुपास ग्रहण केले आणि लाल रंगाचे वस्त्र धारण करून तो स्त्री-रत्‍न सीतेकडे पहात उभा राहिला. ॥९॥
स तामसितकेशान्तां भास्करस्य प्रभामिव ।
वसनाभरणोपेतां मैथिलीं रावणोऽब्रवीत् ॥ १० ॥
काळे केस असणारी मैथिली वस्त्राभूषणांनी विभूषित होऊन सूर्याच्या प्रभेप्रमाणे भासत होती. रावणाने तिला म्हटले- ॥१०॥
त्रिषु लोकेषु विख्यातं यदि भर्तारमिच्छसि ।
मामाश्रय वरारोहे तवाहं सदृशः पतिः ॥ ११ ॥
वरारोहे ! जर तू तीन्ही लोकात विख्यात पुरुषाला आपला पति बनवू इच्छित असशील तर माझा आश्रय घे. मीच तुझ्या योग्य पति आहे. ॥११॥
मां भजस्व चिराय त्वमहं श्लाघ्यः पतिस्तव ।
नैव चाहं क्वचिद् भद्रे करिष्ये तव विप्रियम् ॥ १२ ॥
भद्रे ! माझा सुदीर्घकाळ पर्यंत स्वीकार कर. मी तुझ्यासाठी स्पृहणीय तसेच प्रशंसनीय पती होईन तसेच कधी तुझ्या मनाच्या प्रतिकूल कुठलेही वर्तन करणार नाही. ॥१२॥
त्यज्यतां मानुषो भावो मयि भावः प्रणीयताम् ।
राज्याच्च्युतमसिद्धार्थं रामं परिमितायुषम् ॥ १३ ॥

कैर्गुणैरनुरक्तासि मूढे पण्डितमानिनि ।
मनुष्य रामाच्या विषयी जो तुझा अनुराग आहे, त्याचा त्याग कर आणि माझ्यावर स्नेह कर. स्वतःला बुद्धिमती मानणार्‍या मूढ स्त्रिये ! जो राज्यापासून भ्रष्ट आहे, ज्याचा मनोरथ सफल झालेला नाही तसेच ज्याचे आयुष्य सीमित आहे, त्या रामामध्ये कोणत्या गुणांच्यामुळे तू अनुरक्त आहेस ? ॥१३ १/२॥
यः स्त्रियो वचनाद् राज्यं विहाय ससुहृज्जनम् ॥ १४ ॥

अस्मिन् व्यालानुचरिते वने वसति दुर्मतिः ।
जो एका स्त्रीच्या सांगण्यावरून सुहृदांसहित सर्व राज्याचा त्याग करून या हिंस्त्र जंतुंनी सेवित वनात निवास करीत आहे, त्याची बुद्धि कशी खोटी आहे ? ( तो सर्वथा मूढ आहे) ॥१४ १/२॥
इत्युक्त्वा मैथिलीं वाक्यं प्रियार्हां प्रियवादिनीम् ॥ १५ ॥

अभिगम्य सुदुष्टात्मा राक्षसः काममोहितः ।
जग्राह रावणः सीतां बुधः खे रोहिणीमिव ॥ १६ ॥
जी प्रिय वचन ऐकण्यास योग्य आणि सर्वांशी प्रिय वचन बोलणारी होती त्या मैथिली सीतेला असे अप्रिय वचन बोलून कामाने मोहित झालेल्या त्या अत्यंत दुष्टात्मा राक्षस रावणाने जवळ जाऊन (मातेसमान आदरणीय) सीतेला पकडले; जणु काही बुधाने आकाशात आपली माता रोहिणी हिला (*) पकडण्याचे दुस्साहस केले असावे. ॥१५-१६॥
* येथे अभूतोपमालंकार आहे. बुध चंद्रम्याचा पुत्र आहे आणि रोहिणी चंद्राम्याची पत्‍नी आहे. बुधाने कधी रोहिणीला पकडलेले नाही आणि ते असे कधी करू शकत नाहीत. येथे हे दाखविले गेले आहे की जर कदाचित बुध कामवश आपली माता रोहिणी हिला पकडतील तर ते जसे घोर पाप होईल, तेच पाप रावणाने सीतेला पकडण्यामुळे केले होते.)
वामेन सीतां पद्माक्षीं मूर्धजेषु करेण सः ।
ऊर्वोस्तु दक्षिणेनैव परिजग्राह पाणिना ॥ १७ ॥
त्याने डाव्या हाताने कमलनयनी सीतेच्या केसासहित तिचे मस्तक पकडले आणि उजवा हात तिच्या दोन्ही जांघांच्या खाली घालून त्या द्वारे तिला उचलले. ॥१७॥
तं दृष्ट्‍वा गिरिशृङ्‌गाभं तीक्ष्णदंष्ट्रं महाभुजम् ।
प्राद्रवन् मृत्युसङ्‌काशं भयार्ता वनदेवताः ॥ १८ ॥
त्या समयी तीक्ष्ण दाढा आणि विशाल भुजांनी युक्त पर्वतशिखराप्रमाणे प्रतीत होणार्‍या त्या काळा सारख्या विक्राळ राक्षसाला पाहून वनातील समस्त देवता भयभीत होऊन पळून गेल्या. ॥१८॥
स च मायामयो दिव्यः खरयुक्तः खरस्वनः ।
प्रत्यदृश्यत हेमाङ्‌गो रावणस्य महारथः ॥ १९ ॥
इतक्यातच गाढवे जुंपलेला आणि गाढवांप्रमाणेच शब्द करणारा रावणाचा तो विशाल सुवर्णमय मायानिर्मित दिव्य रथ तेथे दिसून आला. ॥१९॥
ततस्तां परुषैर्वाक्यैरभितर्ज्य महास्वनः ।
अङ्‌केनादाय वैदेहीं रथमारोपयत् तदा ॥ २० ॥
रथ प्रकट होताच जोर जोराने गर्जना करणार्‍या रावणाने कठोर वचनांच्या द्वारे वैदेही सीतेला दटावले आणि पूर्वोक्त रूपात मांडीवर उचलून घेऊन तात्काळ रथावर बसविले. ॥२०॥
सा गृहीतातिचुक्रोश रावणेन यशस्विनी ।
रामेति सीता दुःखार्ता रामं दूरं गतं वने ॥ २१ ॥
रावणाच्या द्वारा पकडली गेल्यामुळे यशस्विनी सीता दुःखाने व्याकुळ झाली आणि वनात दूर गेलेल्या श्रीरामांना हे राम ! म्हणून जोर जोराने हाका मारू लागली. ॥२१॥
तामकामां स कामार्तः पन्नगेन्द्रवधूमिव ।
विवेष्टमानामादाय उत्पपाताथ रावणः ॥ २२ ॥
सीतेच्या मनात रावणाची कामना नव्हती - ती त्याच्या संबंधी सर्वथा विरक्त होती आणि त्याच्या कैदेतून आपल्याला सोडविण्यासाठी, जखमी नागीणीप्रमाणे त्या रथावर तडफडत होती. त्याच अवस्थेत कामपीडित राक्षस तिला घेऊन आकाशात उडाला. ॥२२॥
ततः सा राक्षसेन्द्रेण ह्रियमाणा विहायसा ।
भृशं चुक्रोश मत्तेव भ्रान्तचित्ता यथातुरा ॥ २३ ॥
राक्षसराज जेव्हा सीतेचे हरण करून तिला आकाशमार्गाने घेऊन निघाला, त्यासमयी सीतेचे चित्त भ्रमित होऊन गेले. ती वेड्‍याप्रमाणे झाली आणि दुःखाने आतुर होऊन जोरजोराने विलाप करू लागली- ॥२३॥
हा लक्ष्मण महाबाहो गुरुचित्तप्रसादक ।
ह्रियमाणां न जानीषे रक्षसा कामरूपिणा ॥ २४ ॥
हा महाबाहु लक्ष्मणा ! तुम्ही गुरूजनांच्या मनाला प्रसन्न करणारे आहात. या समयी इच्छेनुसार रूप धारण करणारा राक्षस माझे हरण करून मला घेऊन जात आहे परंतु तुम्हाला या गोष्टीचा पत्ता नाही ॥२४॥
जीवितं सुखमर्थं च धर्महेतोः परित्यजन् ।
ह्रियमाणामधर्मेण मां राघव न पश्यसि ॥ २५ ॥
हे रघुनंदना ! (हे राघवा !) आपण धर्मासाठी प्राणांचा मोह, शरीराचे सुख तसेच राज्यवैभव सर्व काही सोडले आहे. हा राक्षस मला अधर्मपूर्वक हरण करून घेऊन जात आहे, परंतु आपण पहात नाही आहात. ॥२५॥
ननु नामाविनीतानां विनेतासि परंतप ।
कथमेवंविधं पापं न त्वं शाधि हि रावणम् ॥ २६ ॥
परंतप आर्यपुत्र ! आपण तर कुमार्गावरून जाणार्‍या उद्दण्ड पुरुषांना दण्ड देऊन त्यांना (योग्य) मार्गावर आणणारे आहात, मग अशा पापी रावणाला कां बरे दण्ड देत नाही. ॥२६॥
न तु सद्योऽविनीतस्य दृश्यते कर्मणः फलम् ।
कालोप्यङ्‌गीभवत्यत्र सस्यानामिव पक्तये ॥ २७ ॥
उद्दण्ड पुरुषाच्या उद्दण्डतापूर्ण कर्माचे फळ तात्काळ मिळालेले दिसून येत नाही; कारण की यात काळही सहकारी कारण असतो जसे की शेतात पिक येण्यास देखील अनुकूल समयाची अपेक्षा असते. ॥२७॥
त्वं कर्म कृतवानेतत् कालोपहतचेतनः ।
जीवितान्तकरं घोरं रामाद् व्यसनमाप्नुहि ॥ २८ ॥
रावणा ! तुझ्या मस्तकावर काळ नाचत आहे. त्यानेच तुझी विचारशक्ती नष्ट केली आहे, म्हणून तू असे पापकर्म केले आहेस. तुला श्रीरामांपासून ते भयंकर संकट प्राप्त होवो जे तुझ्या प्राणांचा अंत करून टाकील. ॥२८॥
हन्तेदानीं सकामा तु कैकेयी बान्धवैः सह ।
ह्रियेयं धर्मकामस्य धर्मपत्‍नी यशस्विनः ॥ २९ ॥
हाय ! या समयी कैकेयी आपल्या बंधु-बांधवांसह सफल मनोरथ झाली आहे. कारण, धर्माची अभिलाषा बाळगणार्‍या यशस्वी श्रीरामांची धर्मपत्‍नी असूनही एका राक्षसाद्वारे मी हरली जात आहे. ॥२९॥
आमन्त्रये जनस्थाने कर्णिकारांश्च पुष्पितान् ।
क्षिप्रं रामाय शंसध्वं सीतां हरति रावणः ॥ ३० ॥
मी जनस्थानात फुललेल्या कण्हेर वृक्षांची प्रार्थना करीत आहे की तुम्ही सर्व लवकरच श्रीरामांना सांगा की सीतेला रावणाने हरण करून नेले आहे. ॥३०॥
हंससारससंघुष्टां वन्दे गोदावरीं नदीम् ।
क्षिप्रं रामाय शंस त्वं सीतां हरति रावणः ॥ ३१ ॥
हंस आणि सारसांच्या कलरवाने मुखरित झालेल्या गोदावरी नदीला मी प्रणाम करीत आहे. माते ! तू शीघ्रच श्रीरामांना सांगून टाक की सीतेला रावण हरण करून घेऊन जात आहे. ॥३१॥
दैवतानि च यान्यस्मिन् वने विविधपादपे ।
नमस्करोम्यहं तेभ्यो भर्तुः शंसत मां हृताम् ॥ ३२ ॥
या वनातील निरनिराळ्या वृक्षांच्यावर निवास करणार्‍या ज्या ज्या देवता आहेत, त्या सर्वांना मी नमस्कार करीत आहे. आपण सर्व लोक शीघ्रच माझ्या स्वामींना सूचना द्यावी की आपल्या स्त्रीचे राक्षसाने हरण करून तो तिला घेऊन गेला आहे. ॥३२॥
यानि कानिचिदप्यत्र सत्त्वानि विविधानि च ।
सर्वाणि शरणं यामि मृगपक्षिगणानि वै ॥ ३३ ॥

ह्रियमाणां प्रियां भर्तुः प्राणेभ्योऽपि गरीयसीम् ।
विवशा ते हृता सीता रावणेनेति शंसत ॥ ३४ ॥
येथे पशु पक्षी आदि जे कोणी नाना प्रकारचे प्राणी राहात आहेत, त्या सर्वांना मी शरण जात आहे. त्यांनी माझे स्वामी श्रीरामचंद्र यांना सांगावे की जी आपल्याला प्राणांपेक्षा अधिक प्रिय होती, त्या सीतेचे हरण झाले आहे. आपल्या सीतेला असहाय अवस्थेत रावणाने हरून नेले आहे. ॥३३-३४॥
विदित्वा मां महाबाहुरमुत्रापि महाबलः ।
आनेष्यति पराक्रम्य वैवस्वतहृतामपि ॥ ३५ ॥
महाबाहु श्रीराम फार बलवान्‌ आहेत. त्यांनी मी परलोकात गेले आहे असे समजले तर ते यमराजाकडून अपह्रत झाल्यावरही मला पराक्रमपूर्वक तेथून परत आणतील. ॥३५॥
सा तदा करुणा वाचो विलपन्ती सुदुःखिता ।
वनस्पतिगतं गृध्रं ददर्शायतलोचना ॥ ३६ ॥
त्या समयी अत्यंत दुःखी होऊन करूणाजनक गोष्टी बोलून विलाप करणार्‍या विशाल लोचना सीतेने एका वृक्षावर बसलेल्या गृध्रराज जटायुला पाहिले. ॥३६॥
सा तमुद्वीक्ष्य सुश्रोणी रावणस्य वशंगता ।
समाक्रन्दद् भयपरा दुःखोपहतया गिरा ॥ ३७ ॥
रावणाच्या तावडीत सापडलेली सुंदरी सीता अत्यंत भयभीत होत होती. जटायुला पाहून ती दुःखाने भरलेल्या वाणीमध्ये करूण क्रंदन करू लागली- ॥३७॥
जटायो पश्य मामार्य ह्रियमाणामनाथवत् ।
अनेन राक्षसेन्द्रेणाकरुणं पापकर्मणा ॥ ३८ ॥
आर्य जटायु ! पहा, हा पापाचारी राक्षसराज अनाथाप्रमाणे मला निर्दयतापूर्वक हरण करून घेऊन जात आहे. ॥३८॥
नैष वारयितुं शक्यस्त्वया क्रूरो निशाचरः ।
सत्त्ववाञ्जितकाशी च सायुधश्चैव दुर्मतिः ॥ ३९ ॥
परंतु आपण या क्रूर निशाचराला अडवू शकत नाही; कारण की तो बलवान्‌ आहे, अनेक युद्धात विजय मिळाल्यामुळे याचे दुस्साहस वाढलेले आहे. याच्या हातात हत्यारे आहेत आणि याच्या मनात दुष्टताही भरलेली आहे. ॥३९॥
रामाय तु यथातत्त्वं जटायो हरणं मम ।
लक्ष्मणाय च तत्सर्वमाख्यातव्यमशेषतः ॥ ४० ॥
आर्य जटायू ! ज्याप्रकारे माझे अपहरण झालेले आहे, हा सर्व समाचार आपण श्रीराम आणि लक्ष्मणास जशाच्या तसा पूर्णरूपाने निवेदन करावा. ॥४०॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे एकोन्पञ्चाशः सर्गः ॥ ४९ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा एकोणपन्नासावा सर्ग पूरा झाला. ॥४९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP