कुबेरप्रहितस्य पुष्पकविमानस्य आगमनं. श्रीरामेण पूजितस्यानुगृहीतस्य च तस्य तिरोभावो भरतेन रामराज्यस्य अद्भुतप्रभावाणां वर्णनम् -   
 |                    
 
कुबेरांनी धाडलेले पुष्पक विमान येणे आणि श्रीरामांकडून पूजित आणि अनुग्रहीत होऊन अदृश्य होऊन जाणे, भरतद्वारा श्रीरामराज्याच्या विलक्षण प्रभावाचे वर्णन - 
 | 
विसृज्य च महाबाहुः ऋक्षवानर राक्षसान् ।   भ्रातृभिः सहितो रामः प्रमुमोद सुखं सुखी ॥ १ ॥   
 |                    
 
अस्वले, वानर आणि राक्षसांना निरोप देऊन भावांसहित सुखस्वरूप महाबाहु श्रीराम सुख आणि आनंदपूर्वक तेथे राहू लागले. ॥१॥
 | 
अथापराह्णसमये भ्रातृभिः सह राघवः ।   शुश्राव मधुरां वाणीं अन्तरिक्षात् महाप्रभुः ॥ २ ॥   
 |                    
 
एक दिवस अपराह्नकाळात आपल्या भावांसह बसलेल्या राघवांनी आकाशातून ही मधुर वाणी ऐकली - ॥२॥
 | 
सौम्य राम निरीक्षस्व सौम्येन वदनेन माम् ।   कुबेरभवनात् प्राप्तं विद्धि मां पुष्पकं प्रभो ॥ ३ ॥   
 |                    
 
सौम्य श्रीरामा ! आपण माझ्याकडे प्रसन्नतापूर्वक मुखाने दृष्टिपात करण्याची कृपा करावी. प्रभो ! आपल्याला विदित होणे आवश्यक आहे की मी कुबेर भवनातून परत आलेले पुष्पक विमान (बोलत) आहे. ॥३॥
 | 
तव शासनमाज्ञाय गतोऽस्मि भवनं प्रति ।   उपस्थातुं नरश्रेष्ठ स च मां प्रत्यभाषत ॥ ४ ॥   
 |                    
 
नरश्रेष्ठा ! आपली आज्ञा मानून मी कुबेरांच्या सेवेसाठी त्यांच्या भवनात गेलो होतो. परंतु त्यांनी मला सांगितले - ॥४॥ 
 | 
निर्जितस्त्वं नरेन्द्रेण राघवेण महात्मना ।   निहत्य युधि दुर्धर्षं रावणं राक्षसेश्वरम् ॥ ५ ॥   
 |                    
 
विमाना ! महात्मा महाराज राघवांनी युद्धात दुर्धर्ष राक्षसराज रावणाला मारून तुला जिंकले आहे. ॥५॥
 | 
ममापि परमा प्रीतिः हते तस्मिन् दुरात्मनि ।   रावणे सगणे चैव सपुत्रे सहबान्धवे ॥ ६ ॥   
 |                    
 
पुत्र, बंधु-बांधव तसेच सेवकगणांसहित तो दुरात्मा रावण मारला गेल्याने मलाही फार प्रसन्नता झाली आहे. ॥६॥
 | 
स त्वं रामेण लङ्कायां निर्जितः परमात्मना ।   वह सौम्य तमेव त्वं अहमाज्ञापयामि ते ॥ ७ ॥   
 |                    
 
सौम्य ! याप्रकारे परमात्मा श्रीरामांनी लंकेत रावणाबरोबरच तुलाही जिंकून घेतले आहे म्हणून मी आज्ञा देत आहे की तू त्यांचेच वाहन बनून रहा. ॥७॥
 | 
परमो ह्येष मे कामो यत्त्वं राघवनन्दनम् ।   वहेर्लोकस्य संयानं गच्छस्व विगतज्वरः ॥ ८ ॥   
 |                    
 
रघुकुळाला आनंदित करणारे श्रीराम संपूर्ण जगताचा आश्रय आहेत. तू त्यांचे वाहन म्हणून काम कर. - ही माझी सर्वात मोठी कामना आहे. म्हणून तू निश्चिंत होऊन जा. ॥८॥
 | 
सोऽहं शासनमाज्ञाय धनदस्य महात्मनः ।   त्वत्सकाशमनुप्राप्तो निर्विशङ्कः प्रतीक्ष माम् ॥ ९ ॥   
 |                    
 
याप्रकारे मी महात्मा कुबेरांची आज्ञा मिळूनच आपल्याजवळ आलो आहे. म्हणून आपण निःशंक होऊन माझे ग्रहण करा. ॥९॥
 | 
अदृष्यः सर्वभूतानां सर्वेषां धनदाज्ञया ।   चराम्यहं प्रभावेण तवाज्ञां परिपालयन् ॥ १० ॥   
 |                    
 
मी सर्व प्राण्यांसाठी अजेय आहे आणि कुबेराच्या आज्ञेनुसार आपल्या आदेशाचे पालन करीत आपल्या प्रभावाने समस्त लोकांमध्ये विचरण करीन. ॥१०॥
 | 
एवमुक्तस्तदा रामः पुष्पकेण महाबलः ।   उवाच पुष्पकं दृष्ट्वा विमानं पुनरागतम् ॥ ११ ॥   
 |                    
 
पुष्पकाने असे म्हटल्यावर महाबली श्रीरामांनी ते विमान परत आले आहे हे पाहून त्याला म्हटले - ॥११॥
 | 
यद्येवं स्वागतं तेऽस्तु विमानवर पुष्पक ।   आनुकूल्याद् धनेशस्य वृत्तदोषो न नो भवेत् ॥ १२ ॥   
 |                    
 
विमानराज पुष्पका ! जर अशी गोष्ट असेल तर मी तुझे स्वागत करतो. कुबेराची अनुकूलता प्राप्त झाल्याने आम्हांला मर्यादाभंगाचा दोष लागणार नाही. ॥१२॥
 | 
लाजैश्चैव तथा पुष्पैः धूपैश्चैव सुगन्धिभिः ।   पूजयित्वा महाबाहू राघवः पुष्पकं तदा ॥ १३ ॥   
 |                    
 
असे म्हणून महाबाहु रामांनी लाह्या, फुले, धूप आणि चंदन आदिंच्या द्वारा पुष्पकाचे पूजन केले. ॥१३॥
 | 
गम्यतामिति चोवाच आगच्छ त्वं स्मरे यदा ।   सिद्धानां च गतौ सौम्य मा विषादेन योजय ॥ १४ ॥ 
  प्रतिघातश्च ते मा भूद् यथेष्टं गच्छतो दिशः ।   
 |                    
 
आणि म्हटले - आता तू जा. जेव्हा मी स्मरण करीन तेव्हा ये. आकाशात रहा आणि स्वतःला माझ्या वियोगाने दुःखी होऊ देऊ नको. (मी यथा समय तुझा उपयोग करीत राहीन) स्वेच्छेने संपूर्ण दिशांमध्ये जाते समयी तुझी कुणाशी टक्कर होऊ नये अथवा तुझी गति कोठे प्रतिहत होऊ नये. ॥१४ १/२॥
 | 
एवमस्त्विति रामेण पूजयित्वा विसर्जितम् ॥ १५ ॥    अभिप्रेतां दिशं तस्मात् प्रायात् तत्पुष्पकं तदा ।   
 |                    
 
पुष्पकाने एवमस्तु असे म्हणून त्यांची आज्ञा शिरोधार्य केली. या प्रकारे श्रीरामांनी त्याचे पूजन करून जेव्हा त्याला जाण्याची आज्ञा दिली तेव्हा ते पुष्पक तेथून आपल्या अभीष्ट दिशेकडे निघून गेले. ॥१५ १/२॥
 | 
एवमन्तर्हिते तस्मिन् पुष्पके सुकृतात्मनि ॥ १६ ॥    भरतः प्राञ्जलिर्वाक्यं उवाच रघुनन्दनम् ।   
 |                    
 
याप्रकारे पुण्यमय पुष्पक विमान अदृश्य झाल्यावर भरतांनी हात जोडून रघुनंदनास म्हटले - ॥१६ १/२॥
 | 
विविधात्मनि दृश्यन्ते त्वयि वीर प्रशासति ॥ १७ ॥    अमानुषाणां सत्त्वानि व्याहृतानि मुहुर्मुहुः ।   
 |                    
 
वीरवर ! आपण देवस्वरूप आहात. म्हणून आपल्या प्रशासनकाळात मनुष्येतर प्राणीही वारंवार मनुष्यांसमान संभाषण करतांना दिसून येतात. ॥१७ १/२॥
 | 
अनामयश्च मर्त्यानां साग्रो मासो गतो ह्ययम् ॥ १८ ॥    जीर्णानामपि सत्त्वानां मृत्युर्नायाति राघव ।   अरोगप्रसवा नार्यो वपुष्मन्तो हि मानवाः ॥ १९ ॥   
 |                    
 
राघवा ! आपण राज्यावर अभिषिक्त होऊन एक महिन्याहून अधिक काल गेला आहे. तेव्हा पासून सर्व लोक निरोगी दिसत आहेत. वृद्ध प्राण्यांच्या जवळही मृत्यु फिरकत नाही. स्त्रिया कष्ट सहन करावे न लागता प्रसव करीत आहेत. सर्व मनुष्यांची शरीरे हृष्ट-पुष्ट दिसून येत आहेत. ॥१८-१९॥
 | 
हर्षश्चाभ्यधिको राजन् जनस्य पुरवासिनः ।   काले वर्षति पर्जन्यः पातयन् अमृतं पयः ॥ २० ॥   
 |                    
 
राजन् ! पुरवासी लोकांमध्ये अत्यंत हर्ष पसरला आहे. मेघ अमृतासमान जलाची वृष्टि योग्य समयी करीत आहेत. ॥२०॥
 | 
वाताश्चापि प्रवान्त्येते स्पर्शयुक्ताः सुखाः शिवाः ।   ईदृशो नश्चिरं राजा भवेदिति नरेश्वरः ॥ २१ ॥    कथयन्ति पुरे राजन् पौरजानपदास्तथा ।   
 |                    
 
वारा असा वहात आहे की त्याचा स्पर्श शीतल तसेच सुखद भासत आहे. राजन् ! नगर आणि जनपदातील लोक या पुरीमध्ये असे म्हणत आहेत की आमच्यासाठी चिरकाळपर्यंत असाच प्रभावशाली राजा रहावा. ॥२१ १/२॥
 | 
एता वाचः सुमधुरा भरतेन समीरिताः ।   श्रुत्वा रामो मुदा युक्तो बभूव नृपसत्तमः ॥ २२ ॥   
 |                    
 
भरतांनी सांगितलेल्या या सुमधुर गोष्टी ऐकून नृपश्रेष्ठ श्रीराम फार प्रसन्न झाले. ॥२२॥
 | 
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे एकचत्वारिंशः सर्गः ॥ ४१ ॥   
 |                    
 
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा एकेचाळिसावा सर्ग पूरा झाला. ॥४१॥
 |