श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ षडाधिकशततमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

रावणस्य रथं दृष्ट्‍वा श्रीरामेण मातलेः प्रबोधनं रावणपराजयस्य श्रीरामविजयस्य च सूचकानां शकुनानां वर्णनम् -
रावणाचा रथ पाहून श्रीरामांनी मातलिला सावधान करणे, रावणाच्या पराजयसूचक उत्पात, तसेच रामांचा विजय, सूचित करणार्‍या शुभ शकुनांचे वर्णन -
सारथिः स रथं हृष्टः परसैन्यप्रधर्षणम् ।
गन्धर्वनगराकारं समुच्छ्रितपताकिनम् ।। १ ।।

युक्तं परमसम्पन्नैः वाजिभिर्हेममालिभिः ।
युद्धोपकरणैः पूर्णं पताकाध्वजमालिनम् ।। २ ।।

ग्रसन्तमिव चाकाशं नादयन्तं वसुन्धराम् ।
प्रणाशं परसैन्यानां स्वसैन्यानां प्रहर्षणम् ।। ३ ।।

रावणस्य रथं क्षिप्रं चोदयामास सारथिः ।
रावणाच्या सारथ्याने हर्ष आणि उत्साहाने युक्त होऊन त्याचा रथ शीघ्रतापूर्वक हाकला. तो रथ शत्रूसेनेला चिरडून टाकणारा होता आणि गंधर्वनगराप्रमाणे आश्चर्यजनक दिसून येत होता. त्याच्यावर अनेक उंच पताका फडकत होत्या. त्या रथाला उत्तम गुणांनी संपन्न आणि सोन्याच्या हारांनी अलंकृत घोडे जुंपलेले होते. रथात युद्धासाठी आवश्यक सामग्री भरलेली होती. त्या रथाने ध्वजा-पताकांची तर जणु माळच धारण केली होती. तो आकाशाला जणु आपला ग्रास बनवीत असल्याप्रमाणे वाटत होता. वसुंधरेला तो आपल्या घडघडाटाच्या ध्वनीने निनादित करत होता. तो शत्रूंच्या सेनांचा नाशक आणि आपल्या सेनेतील योद्ध्यांचा हर्ष वाढविणारा होता. ॥१-३ १/२॥
तमापतन्तं सहसा स्वनवन्तं महाध्वजम् ।। ४ ।।

रथं राक्षसराजस्य नरराजो ददर्श ह ।
नरराज श्रीरामचंद्रांनी एकाएकी तेथे येत असलेल्या विशाल ध्वजेने अलंकृत आणि घोर घडघडाटाच्या ध्वनिने युक्त राक्षसराज रावणाचा तो रथ पाहिला. ॥४ १/२॥
कृष्णवाजिसमायुक्तं युक्तं रौद्रेण वर्चसा ।। ५ ।।

दीप्यमानमिवाकाशे विमानं सूर्यवर्चसम् ।
त्याला काळ्या रंगाचे घोडे जुंपलेले होते. त्यांची कांति फार भयंकर होती. तो आकाशात प्रकाशित होणार्‍या सूर्यतुल्य तेजस्वी विमानासमान दृष्टिगोचर होत होता. ॥५ १/२॥
तडित्पताकागहनं दर्शितेन्द्रायुधाप्रभम् ॥ ६ ॥

शरधारा विमुञ्चन्तं धारासारमिवाम्बुदम् ।
त्यावर फडकणार्‍या पताका विद्युत समान भासत होत्या. तेथे जे रावणाचे धनुष्य होते त्याच्या द्वारा तो रथ इंद्रधनुष्याच्या प्रभेने युक्त भासत होता आणि बाणांची धारावाहिक वृष्टि करत असल्याने जलधारांची वृष्टि करणार्‍या मेघासमान वाटत होता. ॥६ १/२॥
तं दृष्ट्‍वा मेघसङ्‌काशं आपतन्तं रथं रिपोः ।। ७ ।।

गिरैर्वज्राभिमृष्टस्य दीर्यतः सदृशस्वनम् ।
विस्फारयन् वै वेगेन बालचन्द्रनतं धनुः ।। ८ ।।

उवाच मातलिं रामः सहस्राक्षस्य सारथिम् ।
त्याचा आवाज जणु वज्राच्या आघाताने एखादा पर्वत फुटावा आणि त्याचा शब्द व्हावा तसा वाटत होता. मेघासमान प्रतीत होणारा तो शत्रूचा रथ येतांना पाहून श्रीरामचंद्रांनी अत्यंत वेगाने आपल्या धनुष्यावर टणत्कार केला. त्यासमयी त्यांचे ते धनुष्य द्वितीयेच्या चंद्राप्रमाणे दिसून येत होते. श्रीरामांनी इंद्रसारथि मातलिला म्हटले - ॥७-८ १/२॥
मातले पश्य संरब्धं आपतन्तं रथं रिपोः ।। ९ ।।

यथापसव्यं पतता वेगेन महता पुनः ।
समरे हन्तुमात्मानं तथा तेन कृता मतिः ।। १० ।।
मातले ! पहा माझा शत्रू रावण याचा रथ मोठ्‍या वेगाने येत आहे. रावण ज्याप्रकारे प्रदक्षिण भावाने महान्‌ वेगाने पुन्हा येत आहे त्यावरून याने समरभूमीमध्ये आपल्या वधाचा निश्चय केला आहे हे कळून येत आहे. ॥९-१०॥
तदप्रमादमातिष्ठ प्रत्युद्‌गच्छ रथं रिपोः ।
विध्वंसयितुमिच्छामि वायुर्मेघमिवोत्थितम् ।। ११ ।।
म्हणून आता तू सावधान हो आणि शत्रूच्या रथाकडे पुढे चल. ज्याप्रमाणे वारा मेघांना छिन्न-भिन्न करून टाकतो त्याच प्रमाणे मी आज शत्रूच्या रथाचा विध्वंस करू इच्छितो. ॥११॥
अविक्लवमसम्भ्रान्तं अव्यग्रहृदयेक्षणम् ।
रश्मिसञ्चारनियतं प्रचोदय रथं द्रुतम् ।। १२ ।।
भय आणि व्यग्रता सोडून मन आणि नेत्रांना स्थिर ठेवून घोड्‍यांचे लगाम ताब्यात ठेवा आणि रथ वेगाने चालवा. ॥१२॥
कामं न त्वं समाधेयः पुरन्दररथोचितः ।
युयुत्सुरहमेकाग्रः स्मारये त्वां न शिक्षये ।। १३ ।।
तुमचा देवराज इंद्रांचा रथ हाकण्याचा अभ्यास आहे म्हणून तुम्हांला काही शिकविण्याची आवश्यकता नाही आहे. मी एकाग्रचित्त होऊन युद्ध करू इच्छितो. म्हणून तुमच्या कर्तव्याची तुम्हांला केवळ आठवण मात्र करून देत आहे. तुम्हांला शिकवण देत नाही. ॥१३॥
परितुष्टः स रामस्य तेन वाक्येन मातलिः ।
प्रचोदयामास रथं सुरसारथिरुत्तमः ।। १४ ।।

अपसव्यं ततः कुर्वन् रावणस्य महारथम् ।
चक्रोत्क्षिप्तेन रजसा रावणं व्यवधूनयत् ।। १५ ।।
श्रीरामांच्या या वचनाने देवतांचे श्रेष्ठ सारथि मातलिंना फार संतोष झाला आणि त्यांनी रावणाच्या विशाल रथास उजव्या बाजूस ठेवून आपला रथ पुढे चालवला. त्याच्या चाकांनी इतकी धूळ उडाली की रावणाचा थरकाप उडाला. ॥१४-१५॥
ततः क्रुद्धो दशग्रीवः ताम्रविस्फारितेक्षणः ।
रथप्रतिमुखं रामं सायकैरवधूनयत् ।। १६ ।।
यामुळे दशमुख रावणाला फार क्रोध आला. तो आपले लाल लाल डोळे फाडफाडून पहात रथाच्या समोर आलेल्या रामांवर बाणांची वृष्टि करू लागला. ॥१६॥
धर्षणामर्षितो रामो धैर्यं रोषेण लम्भयन् ।
जग्राह सुमहावेगं ऐन्द्रं युधि शरासनम् ।। १७ ।।
त्याच्या या आक्रमणामुळे श्रीरामांना फार क्रोध आला. नंतर रोषाने धैर्य धारण करून युद्धस्थळी त्यांनी इंद्रांचे धनुष्य हाती घेतले, जे फारच वेगवान्‌ होते. ॥१७॥
शरांश्च सुमहावेगान् सूर्यरश्मिसमप्रभान् ।
तदुपोढं महद् युद्धं अन्योन्यवधकाङ्‌क्षिणोः ।
परस्पराभिमुखयोर्दृप्तयोरिव सिंहयोः ।। १८ ।।
त्याच बरोबर सूर्याच्या किरणांप्रमाणे प्रकाशित होणारे महान्‌ वेगशाली बाणही ग्रहण केले. त्यानंतर एक दुसर्‍याच्या वधाची इच्छा ठेवून श्रीराम आणि रावण या दोघात फार मोठ्‍या युद्धास आरंभ झाला. दोघेही दर्पाने भरलेल्या दोन सिंहाप्रमाणे समोरासमोर उभे ठाकले होते. ॥१८॥
ततो देवाः सगन्धर्वाः सिद्धाश्च परमर्षयः ।
समेयुर्द्वैरथं दृष्टुं रावणक्षयकाङ्‌क्षिणः ।। १९ ।।
त्यासमयी रावणाच्या विनाशाची इच्छा ठेवणार्‍या देवता, सिद्ध, गंधर्व आणि महर्षि त्या दोघांचे द्वैरथ युद्ध पहाण्यासाठी तेथे एकत्र झाले होते. ॥१९॥
समुत्पेतुरथोत्पाता दारुणा रोमहर्षणाः ।
रावणस्य विनाशाय राघवस्योदयाय च ।। २० ।।
त्या युद्धाच्यासमयी असे घोर उत्पात होऊ लागले जे अंगावर काटा आणणारे होते. त्यांच्या योगे रावणाचा विनाश आणि राघवांच्या अभ्युदयाची सूचना मिळत होती. ॥२०॥
ववर्ष रुधिरं देवो रावणस्य रथोपरि ।
वाता मण्डलिनस्तीव्रा ह्यपसव्यं प्रचक्रमुः ।। २१ ।।
मेघ रावणाच्या रथावर रक्ताची वृष्टि करू लागले; अत्यंत वेगाने उठलेले वादळ त्याची वामावर्त परिक्रमा करु लागले. ॥२१॥
महद् गृध्रकुलं चास्य भ्रममाणं नभस्थले ।
येन येन रथो याति तेन तेन प्रधावति ।। २२ ।।
ज्या ज्या मार्गाने रावणाचा रथ जात होता त्या त्या बाजूस आकाशात घिरट्‍या घालणारा गिधाडांचा समुदाय धावत जात होता. ॥२२॥
सन्ध्यया चावृता लङ्‌का जपापुष्पनिकाशया ।
दृश्यते सम्प्रदीप्तेव दिवसेऽपि वसुन्धरा ।। २३ ।।
असमयीच जपा-कुसुमा सारखी लाल रंगाच्या संध्येने आवृत्त झालेली लंकापुरीची भूमी दिवसाही जळत असल्याप्रमाणे दिसून येत होती. ॥२३॥
सनिर्घाता महोल्काश्च सम्प्रचेरुर्महास्वनाः ।
विषादयंस्ते रक्षांसि रावणस्य तदाहिताः ।। २४ ।।
रावणाच्या समोरच वज्रपातासारखा गडगडाट आणि फार मोठ्‍या आवाजांसह उल्का पडू लागल्या, ज्या त्याच्या अहिताची सूचना देत होत्या. त्या उत्पातांनी राक्षसांना विषादात पाडले. ॥२४॥
रावणश्च यतस्तत्र प्रचचाल वसुन्धरा ।
रक्षसां च प्रहरतां गृहीता इव बाहवः ।। २५ ।।
रावण जेथे जेथे जात होता तेथील भूमी डोलू लागत होती. प्रहार करीत असता राक्षसांच्या भुजा अशा निकामी होऊ लागल्या की जणु त्यांना कोणी पकडून ठेवले आहे. ॥२५॥
ताम्राः पीताः सिताः श्वेताः पतिताः सूर्यरश्मयः ।
दृश्यन्ते रावणस्याग्रे पर्वतस्येव धातवः ।। २६ ।।
रावणाच्या पुढे पडलेले सूर्यदेवाचे किरण पर्वतीय धातुप्रमाणे लाल पिवळ्या पांढर्‍या आणि काळ्या रंगाचे दिसून येत होते. ॥२६॥
गृध्रैरनुगताश्चास्य वमन्त्यो ज्वलनं मुखैः ।
प्रणेदुर्मुखमीक्षन्त्यः संरब्धमशिवं शिवाः ।। २७ ।।
रावणाच्या रोषावेशपूर्ण मुखाकडे पहात आणि आपल्या आपल्या मुखांतून आग ओकणार्‍या कोल्हीणी अमंगळसूचक बोली बोलत होत्या आणि त्यांच्या पाठोपाठ गिधाडांच्या झुंडीच्या झुंडी घिरट्‍या घालत होत्या. ॥२७॥
प्रतिकूलं ववौ वायू रणे पांसून् समुत्किरन् ।
तस्य राक्षसराजस्य कुर्वन् दृष्टिविलोपनम् ।। २८ ।।
रणभूमीमध्ये धूळ उडविणारा वारा राक्षसराज रावणाचे डोळे बंद करीत प्रतिकूल दिशेकडे वहात होता. ॥२८॥
निपेतुरिन्द्राशनयः सैन्ये चास्य समन्ततः ।
दुर्विषह्यस्वना घोरा विना जलधरोदयम् ।। २९ ।।
त्याच्या सेनेवर सर्व बाजूनी ढग नसतांनाच दुःसह आणि कठोर आवाजासह भयानक वीजा पडू लागल्या. ॥२९॥
दिशश्च प्रदिशः सर्वा बभूवुस्तिमिरावृताः ।
पांसुवर्षेण महता दुर्दर्शं च नभोऽभवत् ।। ३० ।।
समस्त दिशा आणि विदिशा अंधकाराने आच्छन्न होऊन गेल्या. धूळीच्या फार मोठ्‍या वर्षावामुळे आकाश दिसून येणे फार कठीण झाले होते. ॥३०॥
कुर्वन्त्यः कलहं घोरं शारिकास्तद् रथं प्रति ।
निपेतुः शतशस्तत्र दारुणं दारुणारुताः ।। ३१ ।।
भयानक आवाज करणार्‍या शेकडो दारूण सारिका आपसात घोर कलह करत रावणाच्या रथावर पडत होत्या. ॥३१॥
जघनेभ्यः स्फुलिङ्‌गाश्च नेत्रेभ्योऽश्रूणि सन्ततम् ।
मुमुचुस्तस्य तुरगाः तुल्यमग्निं च वारि च ।। ३२ ।।
त्याचे घोडे आपल्या जघनस्थळातून आगीच्या ठिणग्या आणि नेत्रातून अश्रू ढाळत होते. त्याप्रकारे ते एकाचवेळी आग आणि पाणी दोन्ही प्रकट करत होते. ॥३२॥
एवम्प्रकारा बहवः समुत्पाता भयावहाः ।
रावणस्य विनाशाय दारुणाः सम्प्रजज्ञिरे ।। ३३ ।।
याप्रकारे बरेचसे दारूण आणि भयंकर उत्पात प्रकट झाले, जे रावणाच्या विनाशाची सूचना देत होते. ॥३३॥
रामस्यापि निमित्तानि सौम्यानि च शुवानि च ।
बभूवुर्जयशंसीनि प्रादुर्भूतानि सर्वशः ।। ३४ ।।
श्रीरामांच्या समोरही अनेक शकुन प्रकट झाले जे सर्व प्रकारांनी शुभ, मंगलमय आणि विजयसूचक होते. ॥३४॥
निमित्तानीह सौम्यानि राघवः स्वजयाय च ।
दृष्ट्‍वा परमसंहृष्टो हतं मेने च रावणम् ।। ३५ ।।
राघव आपल्या विजयाची सूचना देणार्‍या या शुभ शकुनांना पाहून फार प्रसन्न झाले आणि ते रावणाला मेलेलाच समजले. ॥३५॥
ततो निरीक्ष्यात्मगतानि राघवो
रणे निमित्तानि निमित्तकोविदः ।
जगाम हर्षं च परां च निर्वृत्तिं
चकार युद्धे ह्यधिकं च विक्रमम् ।। ३६ ।।
शकुनांचे ज्ञाते भगवान्‌ राघव रणभूमीमध्ये आपल्याला प्राप्त होणार्‍या शुभ शकुनांना अवलोकन करून अत्यंत हर्ष आणि परम संतोषाचा अनुभव करू लागले तसेच त्यांनी युद्धात अधिक पराक्रम प्रकट केला. ॥३६॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे षडधिकशततमः सर्गः ।। १०६ ।।
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकशे सहावा सर्ग पूरा झाला. ॥१०६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP