[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ चतुर्विंशः सर्गः॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
सीतया रक्षसीनां वचसोऽनङ्‌गीकरणं, राक्षसीकर्तृकं तस्या भर्त्सनं च -
सीतेने राक्षसींचा उपदेश मान्य करण्यास नकार देणे तथा राक्षसींनी तिला मारण्याची - ठार करण्याची धमकी देणे -
ततः सीतां समस्तास्ता राक्षस्यो विकृताननाः ।
परुषं परुषानर्हां ऊचुस्तद् वाक्यमप्रियम् ॥ १ ॥
नन्तर आक्राळ विक्राळ चेहर्‍याच्या त्या सर्व राक्षसस्त्रिया, कठोर भाषण श्रवण करण्यास योग्य नसलेल्या त्या सीतेला उद्देशून कर्णकठोर आणि अप्रिय भाषण करू लागल्या- ॥१॥
किं त्वमन्तःपुरे सीते सर्वभूतमनोरमे ।
महार्हशयनोपेते न वासमनुमन्यसे ॥ २ ॥
त्या म्हणाल्या- सीते ! सर्व प्राण्यांचे मन आकर्षून टाकणार्‍या आणि मोठ्या मोठ्या बहुमूल्य शय्या असलेल्या अन्तःपुरामध्ये राहणे तुला का बरे पसन्त पडत नाही ? ॥२॥
मानुषी मानुषस्यैव भार्यात्वं बहु मन्यसे ।
प्रत्याहर मनो रामान् नैवं जातु भविष्यति ॥ ३ ॥
हे मानुषी ! तुला मनुष्याचीच भार्या होऊन राहाणे अधिक उत्तम, महत्वाचे वाटत आहे. परन्तु तू रामापासून आपले मन आता निवृत्त कर, अन्यथा तू कदापि जिवन्त राहाणार नाहीस. ॥३॥
त्रैलोक्यवसुभोक्तारं रावणं राक्षसेश्वरम् ।
भर्तारमुपसङ्‌गम्य विहरस्व यथासुखम् ॥ ४ ॥
त्रैलोक्यातील ऐश्वर्याचा उपभोग घेणार्‍या राक्षसाधिपती रावणाचा तू पती या नात्याने स्वीकार कर आणि त्याच्यासह आनन्दपूर्वक विहार कर. ॥४॥
मानुषी मानुषं तं तु राममिच्छसि शोभने ।
राज्याद् भ्रष्टमसिद्धार्थं विक्लवन्तं अनिन्दिते ॥ ५ ॥
हे कल्याणी ! हे अनिन्द्य सुन्दरी ! तू स्वतः मनुष्य असून राज्यापासून भ्रष्ट झालेल्या आणि ज्याचे मनोरथ भग्न झालेले आहेत अशा मनुष्य देहधारी रामाची इच्छा करीत आहेत, पण तो तर सदा दुःखाने व्याकुळ आहे म्हणून तुझे हे करणे ठीक नाही. ॥५॥
राक्षसीनां वचः श्रुत्वा सीता पद्मनिभेक्षणा ।
नेत्राभ्यां अश्रुपूर्णाभ्यां इदं वचनमब्रवीत् ॥ ६ ॥
हे राक्षसस्त्रियांचे भाषण श्रवण केल्यावर कमलनयनी सीतेचे नेत्र अश्रूंनी भरून आले आणि ती म्हणाली - ॥६॥
यदिदं लोकविद्विष्टं उदाहरत सङ्‌गताः ।
नैतन्मनसि वाक्यं मे किल्बिषं प्रतितिष्ठति ॥ ७ ॥
तुम्ही सर्व एकत्र होऊन या जगामध्ये निन्द्य असा उपदेश मला करीत आहा. परन्तु तो पापपूर्ण असल्याने माझ्या मनामध्ये एक क्षणभरही ठसत नाही. ॥७॥
न मानुषी राक्षसस्य भार्या भवितुमर्हति ।
कामं खादत मां सर्वा न करिष्यामि वो वचः ॥ ८ ॥
एक मानवकन्या कुणा राक्षसाची भार्या कधी होऊ शकत नाही. वाटल्यास तुम्ही सर्वजणी मला खाऊन टाका पण मी तुमचे म्हणणे मान्य करू शकत नाही. ॥८॥
दीनो वा राज्यहीनो वा यो मे भर्ता स मे गुरुः ।
तं नित्यमनुरक्ताऽस्मि यथा सूर्यं सुवर्चला ॥ ९ ॥
माझा पति दीन असो अथवा राज्यहीन असो, तोच माझा स्वामी आहे. तोच माझा गुरूही आहे. मी सदा त्याच्यावरच अनुरक्त आहे आणि पुढेही राहीन, जशी सुवर्चला सूर्यावर अनुरक्त राहात असते त्याप्रमाणे. ॥९॥
यथा शची महाभागा शक्रं समुपतिष्ठति ।
अरुन्धति वसिष्ठं च रोहिणी शशिनं यथा ॥ १० ॥

लोपामुद्रा यथागस्त्यं सुकन्या च्यवनं यथा ।
सावित्री सत्यवन्तं च कपिलं श्रीमती यथा ॥ ११ ॥

सौदासं मदयन्तीव केशिनी सगरं यथा ।
नैषधं दमयन्तीव भैमी पतिमनुव्रता ॥ १२ ॥

तथाहं इक्ष्वाकुवरं रामं पतिमनुव्रता ।
जशी महाभाग्यवान शची इन्द्राच्या सेवेत उपस्थित असते, देवी अरून्धती महर्षि वसिष्ठांवर, रोहिणी चन्द्रावर, लोपामुद्रा अगस्त्यांवर, सुकन्या च्यवनऋषींवर, सावित्री सत्यवानवर, श्रीमती कपिलावर, मदयन्ती सौदासावर, केशिनी सगरावर आणि भीमराजाची कन्या दमयन्ती निषेधराज नरेश नलावर अनुरक्त असते, त्याचप्रमाणेच मीही माझे पतिदेव इक्ष्वाकुकुल शिरोमणी भगवान श्रीरामांवर अनुरक्त आहे. ॥१०-१२ १/२॥
सीताया वचनं श्रुत्वा राक्षस्यः क्रोधमूर्छिताः ।
भर्त्सयन्ति स्म परुषैः वाक्यै रावणचोदिताः ॥ १३ ॥
सीतेचे वचन ऐकून राक्षस स्त्रियांच्या क्रोधाला सीमा राहिली नाही. त्या रावणाच्या आज्ञेस अनुसरून कठोर वचनाने तिला धमकावू लागल्या. ॥१३॥
अवलिनः स निर्वाक्यो हनुमान् शिंशपाद्रुमे ।
सीतां सन्तर्जयन्तीस्ता राक्षसीरशृणोत् कपिः ॥ १४ ॥
अशोकवृक्षात गुपचुप लपून बसलेले हनुमान सीतेची निर्भत्सना करणारी त्यांची भाषणे ऐकू लागले. ॥१४॥
तमभिक्रम्य संरब्धा वेपमानां समन्ततः ।
भृशं संलिलिहुर्दीप्तान् प्रलंबान् दशनच्छदान् ॥ १५ ॥
त्या सर्व राक्षसी रागाने सन्तप्त होऊन थरथर कापत असणार्‍या सीतेवर सर्व बाजूनी तुटून पडल्या आणि आपले प्रदीप्त आणि दिर्घ ओठ वारंवार चाटू लागल्या. ॥१५॥
ऊचुश्च परमक्रुद्धाः प्रगृह्याशु परश्वधान् ।
नेयमर्हति भर्तारं रावणं राक्षसाधिपम् ॥ १६ ॥
त्या अत्यन्त क्रुद्ध होऊन आणि हातातील कुर्‍हाडी सरसावून म्हणाल्या - ही राक्षसाधिपती रावणाची भार्या व्हावी अशी हिची योग्यताच नाही. ॥१६॥
सा भर्त्स्यमाना भीमाभी राक्षसीभिर्वरांगना ।
सा बाष्पमपमार्जन्ती शिंशपां तामुपागमत् ॥ १७ ॥
त्या भयानक राक्षसस्त्रियांनी वारंवार निर्भत्सना करून धमकावल्याने ती सर्वांगसुन्दरी कल्याणी सीता अश्रु पुसत पुसत त्या शिंशपा वृक्षाजवळ आली. (ज्यावर हनुमान लपून बसलेले होते) ॥१७॥
ततस्तां शिंशपां सीता राक्षसीभिः समावृता ।
अभिगम्य विशालाक्षी तस्थौ शोकपरिप्लुता ॥ १८ ॥
विशाललोचना वैदेही शोक सागरात बुडून गेलेली होती म्हणून त्या वृक्षासमीप गुपचुप बसून राहिली, परन्तु त्या राक्षसस्त्रिया तेथेही आल्या आणि त्यांनी तिला सर्व बाजूने वेढून टाकले. ॥१८॥
तां कृशां दीनवदनां मलिनांबरवासिनीम् ।
भर्त्सयाञ्चक्रिरे भीमा राक्षस्यस्ताः समन्ततः ॥ १९ ॥
ती अत्यन्त दुर्बळ झालेली होती. दीनवदन होऊन मलीन वस्त्र परिधान केलेल्या सीतेभोवतीही चारी बाजूनी उभ्या राहून त्या राक्षसीणी परत सीतेला धमकाविण्यास आरंभ केला ॥१९॥
ततस्तु विनता नाम राक्षसी भीमदर्शना ।
अब्रवीत् कुपिताकारा कराला निर्णतोदरी ॥ २० ॥
नन्तर दिसण्यात अत्यन्त भयंकर असलेली आणि जिचा देह म्हणजे जणु मूर्तीमन्त क्रोधाची प्रतिमा असावी तसा होता अशी विनता नावाची राक्षसी पुढे सरसावली. तिचे पोट अगदी खबदाडी गेलेले होते. ती म्हणाली- ॥२०॥
सीते पर्याप्तमेतावद् भर्तुः स्नेहः प्रदर्शितः ।
सर्वत्रातिकृतं भद्रे व्यसनायोपकल्पते ॥ २१ ॥
सीते ! झाले इतके पुरे झाले. तू आपल्या पतिविषयी जे प्रेम दाखविलेस हे ठीक आहे. पण कल्याणी ! कोणतीही गोष्ट अति झाली तर ती संकटाला कारणीभूत होते. ॥२१॥
परितुष्टास्मि भद्रं ते मानुशस्ते कृतो विधिः ।
ममापि तु वचः पथ्यं ब्रुवन्त्याः कुरु मैथिलि ॥ २२ ॥
हे मिथिलेशकुमारी ! देव तुझे भले करो ! तू मानवोचित शिष्टाचाराचे यथायोग्य पालन केले आहेस म्हणून मी तुझ्यावर सन्तुष्ट झाले आहे. आता मीही तुझ्या हितासाठी जी पथ्यकर गोष्ट सांगत आहे, तिच्याकडे लक्ष दे आणि तिचे शीघ्र पालन कर. ॥२२॥
रावणं भज भर्तारं भर्तारं सर्वरक्षसाम् ।
विक्रान्तमापतन्तं च सुरेशमिव वासवम् ॥ २३ ॥
समस्त राक्षसांचे पालन पोषण करणार्‍या महाराज रावणाचा तू आपला पति म्हणून स्वीकार कर. तो देवराज इन्द्रासारखा अत्यन्त पराक्रमी आणि रूपवानही आहे. ॥२३॥
दक्षिणं त्यागशीलं च सर्वस्य प्रियवादिनम् ।
मानुषं कृपणं रामं त्यक्त्वा रावणमाश्रय ॥ २४ ॥
दीन हीन मनुष्य रामाचा परित्याग करून तू रावणाचा आश्रय घे. तो सर्वांशी प्रिय वचन बोलणारा, उदार आणि त्यागी आहे. ॥२४॥
दिव्यांगरागा वैदेहि दिव्याभरणभूषिता ।
अद्यप्रभृति लोकानां सर्वेषामीश्वरी भव ॥ २५ ॥
हे विदेहराजकुमारी ! तू आजपासून समस्त लोकांची स्वामिनी बनून जा आणि दिव्य अंगराग आणि दिव्य आभूषणे धारण कर. ॥२५॥
अग्नेः स्वाहा यथा देवी शची वेन्द्रस्य शोभने ।
किं ते रामेण वैदेहि कृपणेन गतायुषा ॥ २६ ॥
शोभने ! जशी अग्नीची प्रिय पत्‍नी स्वाहा आहे आणि इन्द्राची प्राणवल्लभा शची आहे त्या प्रकारे तू रावणाची प्रेयसी बनून जा. हे वैदेही ! श्रीराम तर दीन आहे आणि त्याचे आयुष्यही आता संपत आले आहे. त्याचा पासून तुला काय सुख मिळणार आहे. ॥२६॥
एतदुक्तं च मे वाक्यं यदि त्वं न करिष्यसि ।
अस्मिन् मुहूर्ते सर्वास्त्वां भक्षयिष्यामहे वयम् ॥ २७ ॥
जर तू मी सांगितलेली ही गोष्ट मान्य केली नाहीस तर आम्ही सर्व मिळून तुला याच मुहूर्तावर आमचा आहार बनवून टाकू. ॥२७॥
अन्या तु विकटा नाम लंबमानपयोधरा ।
अब्रवीत् कुपिता सीतां मुष्टिमुद्यम्य तर्जती ॥ २८ ॥
त्यानन्तर दुसरी विकटा नावाची राक्षसी समोर आली. तिचे स्तन अत्यन्त लांब असून लटकत होते. ती अत्यन्त कुपित होऊन मूठ उगारून सीतेला दरडावून म्हणाली- ॥२८॥
बहून्यप्रतिरूपाणि वचनानि सुदुर्मते ।
अनुक्रोशान् मृदुत्वाच्च सोढानि तव मैथिलि ॥ २९ ॥
हे महादुष्टे मैथिली ! दयेमुळे आणि आमचा स्वभाव कोमल असल्याने या वेळेपर्यन्त तुझी पुष्कळच अप्रिय वचने आम्ही सहन केली आहे. ॥२९॥
न च नः करुषे वाक्यं हितं कालपुरस्कृतम् ।
आनीतासि समुद्रस्य पारमन्यैर्दुरासदम् ॥ ३० ॥

रावणान्तःपुरे घोरे प्रविष्टा चासि मैथिलि ।
रावणस्य गृहे रुद्धा अस्माभिस्त्वभिरक्षिता ॥ ३१ ॥
इतके असूनही तू आमचा सल्ला मानत नाहीस. आम्ही तुझ्या हितासाठीच समयोचित सल्ला दिला होता. हे पहा, जेथे इतर कुणालाही येता येणे अत्यन्त कठीण आहे अशा समुद्राच्या पर-तीराला तुला आणून ठेवले आहे. येथेही रावणाच्या भयानक अन्तःपुरात तुला ठेवलेले आहे. हे मैथिली ! हे लक्षात घे की तू रावणाच्या घरान्त कैदेत आहेस आणि आमच्या सारख्या राक्षसीणी तुझ्यावर पहरा करीत आहेत. ॥३०-३१॥
न त्वां शक्तः परित्रातुं अपि साक्षात् पुरन्दरः ।
कुरुष्व हितवादिन्या वचनं मम मैथिलि ॥ ३२ ॥
मैथिली ! साक्षात इन्द्र येथे तुझे रक्षण करण्यास समर्थ नाही. म्हणून हे मैथिली, माझे वचन ऐक. मी तुझ्या हिताचीच गोष्ट सांगत आहे. ॥३२॥
अलं अश्रुनिपातेन त्यज शोकमनर्थकम् ।
भज प्रीतिं प्रहर्षं च त्यजन्ती नित्यदैन्यताम् ॥ ३३ ॥
अश्रु ढाळण्यामुळे काहीच साध्य होणार नाही. हा व्यर्थ असलेला शोक सोडून दे. सदा झाकून राहिलेली दीनता दूर सार आणि हृदयात प्रसन्नता आणि उत्साह यास स्थान दे. ॥३३॥
सीते राक्षसराजेन परिक्रीड यथासुखम् ।
जानीमहे यथा भीरु स्त्रीणां यौवनमध्रुवम् ॥ ३४ ॥
आणि सीते ! तू राक्षसराज रावणाबरोबर सुखपूर्वक क्रीडा-विहार कर. हे भीरू ! आपण सर्व स्त्रिया जाणतो की स्त्रियांचे यौवन हे कायम टिकून राहात नाही. ॥३४॥
यावन्न ते व्यतिक्रामेत् तावत् सुखमवाप्नुहि ।
उद्यानानि च रम्याणि पर्वतोपवनानि च ॥ ३५ ॥

सह राक्षसराजेन चर त्वं मदिरेक्षणे ।
स्त्रीसहस्राणि ते देवि वशे स्थास्यन्ति सुन्दरि ॥ ३६ ॥
जो पर्यन्त तुझे यौवन नष्ट होत नाही तो पर्यन्त तू खुशाल सुखाचा उपभोग घे. हे मदिरेक्षणी ! (जिच्या नेत्राची शोभा पाहून मदिरेप्रमाणे नशा उत्पन्न होते) तू राक्षसराज रावणाबरोबर लंकेतील रमणीय उद्याने आणि पर्वतीय उपवनात सुखाने संचार कर. हे देवी ! असे केल्याने हजारो स्त्रिया सदा तुझ्या स्वाधीन राहातील, तुझी आज्ञा पाळतील. ॥३५-३६॥
रावण भज भर्तारं भर्तारं सर्वरक्षसाम् ।
उत्पाट्य वा ते हृदयं भक्षयिष्यामि मैथिलि ॥ ३७ ॥

यदि मे व्याहृतं वाक्यं न यथावत् करिष्यसि ।
महाराज रावण सर्व राक्षसांचे भरण पोषण करणारा स्वामी आहे. तू त्याला आपला पति बनव. मैथिली ! याद राख जर तू मी जे सांगत आहे त्याचे यथायोग्य पालन केले नाहीस तर मी आत्ताच तुझे हृदय काढून खाऊन टाकीन. ॥३७ १/२॥
ततश्चण्डोदरी नाम राक्षसी क्रूरदर्शना ॥ ३८ ॥

भ्रामयन्ती महच्छूलं इदं वचनमब्रवीत् ।
यानन्तर चण्डोदरी नावाच्या राक्षसीची पाळी आली. तिच्या दृष्टीतून क्रौर्य ओसंडत होते. तिने विशाल त्रिशूल फिरवीत बोलण्यास आरंभ केला- ॥३८ १/२॥
इमां हरिणशावाक्षीं त्रासोत्कंपपयोधराम् ॥ ३९ ॥

रावणेन हृतां दृष्ट्‍वा दौर्हृदो मे महानयम् ।
यकृत् प्लीहं महत् क्रोडं हृदयं च सबन्धनम् ॥ ४० ॥

गात्राण्यपि तथा शीर्षं खादेयमिति मे मतिः ।
महाराज रावणाने जेव्हा हिचे हरण करून हिला पळवून आणली, तेव्हा भयाने थरथर कापत होती आणि त्यामुळे हिचे दोन्ही स्तनही हलत होते. त्या दिवशीच या मृगशावकनयनी मानवकन्येस पाहिल्यावर माझ्या हृदयात अत्यन्त तीव्र इच्छा उत्पन्न झाली. ती इच्छा म्हणजे हिचे यकृत, प्लीहा, विशाल वक्षस्थळ, शिराबन्धनासह हृदय, मस्तक आणि इतरही अवयव खाऊन टाकावे. यावेळीही माझा हाच विचार आहे. ॥३९-४० १/२॥
ततस्तु प्रघसा नाम राक्षसी वाक्यमब्रवीत् ॥ ४१ ॥

कण्ठमस्या नृशंसायाः पीडयामः किमास्यते ।
निवेद्यतां ततो राज्ञे मानुषी सा मृतेति ह ॥ ४२ ॥

नात्र कश्चन सन्देहः खादतेति स वक्ष्यति ।
त्यानन्तर प्रघसा नामक राक्षसी म्हणाली की अग तुम्ही अशा बसलात काय ? या दुष्टेचा गळाच आपण आवळून टाकू. हिला मारून आपण महाराजांना सांगू की ती मनुष्य स्त्री मेली. मग तो नक्कीच सांगेल की तुम्ही सर्व तिला खाऊन टाका. यात जराही संशय नाही. ॥४१-४२ १/२॥
ततस्त्वजामुखी नाम राक्षसी वाक्यमब्रवीत् ॥ ४३ ॥

विशस्येमां ततः सर्वान् समान् कुरुत पिण्डकान् ।
विभजाम ततः सर्वा विवादो मे न रोचते ॥ ४४ ॥

पेयमानीयतां क्षिप्रं माल्यं च विविधं बहु ।
त्यानन्तर अजामुखी राक्षसी म्हणाली - मला तर हा व्यर्थ वाद-विवाद घालणे पसन्त नाही, या आणि हिला कापून हिचे खूप तुकडे-तुकडे करा. सर्व तुकडे एक सारख्या मापाचे आणि वजनाचे झाले पाहिजेत. नन्तर आपण सर्वजणी ते तुकडे आपसान्त वाटून घेऊ. त्याच्या बरोबर नाना प्रकारची पेये, रस आदि तथा फुले-माळा आदिही शीघ्र भरपूर प्रमाणार मागवून घेऊ या. ॥४३-४४ १/२॥
ततः शूर्पणखा नाम राक्षसी वाक्यमब्रवीत् ॥ ४५ ॥

अजामुख्या यदुक्तं हि तदेव मम रोचते ।
सुरा चानीयतां क्षिप्रं सर्वशोकविनाशिनी ॥ ४६ ॥

मानुषं मांसमास्वाद्य नृत्यामोऽथ निकुम्भिलाम् ।
तेव्हा शूर्पणखा राक्षसी म्हणाली - अजामुखीने जी गोष्ट सांगितली ती मला योग्य वाटत आहे. सर्व शोक नाहींसा करणार्‍या सुरेलाही शीघ्र मागवून घ्या. त्या सुरेबरोबर मनुष्य मांसाचे आस्वादन करून आपण निकुंभिला देवी समोर नृत्य करू या. ॥४५-४६ १/२॥
एवं संभर्त्स्यमाना सा सीता सुरसुतोपमा ।
राक्षसीभिः विरूपाभिः धैर्यमुत्सृज्य रोदिति ॥ ४७ ॥
त्या आक्राळ विक्राळ राक्षसींकडून याप्रकारे धमकावली गेल्यावर देवकन्ये प्रमाणे सुन्दर असणार्‍या सीतेचे धैर्य सुटले आणि ती हुन्दके देत स्फूदुन स्फुन्दुन रडू लागली. ॥४७॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे चतुर्विंशः सर्गः ॥ २४ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा चौवीसावा सर्ग पूरा झाला. ॥२४॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP