श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ अष्टादशाधिकशततमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

चितां विधूय सेतामादाय मूर्तिमतोऽग्निदेवस्य प्रकटनं सीतां श्रीरामाय समर्प्य तस्याः पवित्रतायाः प्रमाणीकरणं श्रीरामेण सहर्षं सीतायाः स्वीकरणं च -
मूर्तीमान अग्निदेवांचे सीतेला घेऊन चितेतून प्रकट होणे आणि श्रीरामांना समर्पित करून तिच्या पवित्रतेला प्रमाणित करणे तसेच श्रीरामांनी सीतेचा सहर्ष स्वीकार करणे -
एतच्छ्रुत्वा शुभं वाक्यं पितामहसमीरितम् ।
अङ्‌केनादाय वैदेहीं उत्पपात विभावसुः ।। १ ।।
ब्रह्मदेवांनी बोललेल्या या शुभ वचनांना ऐकून मूर्तिमंत अग्निदेव वैदेही सीतेला (पित्याप्रमाणे) मांडीवर घेऊन चितेतून बाहेर आले. ॥१॥
स विधूय चितां तां तु वैदेहीं हव्यवाहनः ।
उत्तस्थौ मूर्तिमानाशु गृहीत्वा जनकात्मजाम् ।। २ ।।
त्या चितेला हलवून इकडे तिकडे विखरून टाकत दिव्यरूपधारी हव्यवाहन अग्निदेव सीतेला बरोबर घेऊन तात्काळ उठून उभे राहिले. ॥२॥
तरुणादित्यसङ्‌काशां तप्तकाञ्चनभूषणाम् ।
रक्ताम्बरधरां बालां नीलकुञ्चितमूर्धजाम् ।। ३ ।।

अक्लिष्टमाल्याभरणां तथारूपामनिन्दिताम् ।
ददौ रामाय वैदेहीं अङ्‌के कृत्वा विभावसुः ।। ४ ।।
सीता प्रातःकाळच्या सूर्याप्रमाणे अरूण-पीत कांतिने प्रकाशित होत होती. तापविलेल्या सोन्याची आभूषणे तिची शोभा वाढवीत होती. तिच्या श्रीअंगावर लाल रंगाची रेशमी साडी लहरत होती. मस्तकावर काळे-काळे कुरळे केस सुशोभित होत होते. तिची अवस्था नवी होती आणि तिच्या द्वारा धारण केले गेलेले फुलांचे हार कोमेजतही नव्हते. अनिंद्य सुंदरी सती-साध्वी सीतेचे अग्नित प्रवेश करतांना जसे रूप होते, वेष होता, तशाच रूपसौन्दार्याने प्रकाशित होणार्‍या वैदेहीला मांडीवर घेऊन अग्निदेवांनी श्रीरामांना तिला समर्पित केले. ॥३-४॥
अब्रवीत् तु तदा रामं साक्षी लोकस्य पावकः ।
एषा ते राम वैदेही पापमस्यां न विद्यते ।। ५ ।।
त्या समयी लोकसाक्षी अग्निने श्रीरामांना म्हटले - श्रीरामा ! ही आपली धर्मपत्‍नी वैदेही आहे. हिच्या ठिकाणी काही पाप अथवा दोष नाही आहे. ॥५॥
नैव वाचा न मनसा नानुध्यानान्न चक्षुषा ।
सुवृत्ता वृत्तशौटीर्यं न त्वामत्यचरच्छुभा ।। ६ ।।
उत्तम आचार असणार्‍या या शुभलक्षणा सतीने मन, वाणी, बुद्धि अथवा नेत्रांच्या द्वाराही आपल्या शिवाय दुसर्‍या कुठल्याही पुरुषाचा आश्रय घेतला नाही. हिने सदा सदाचार परायण आपलीच आराधना केली आहे. ॥६॥
रावणेनापनीतैषा वीर्योत्सिक्तेन रक्षसा ।
त्वया विरहिता दीना विवशा निर्जने सती ।। ७ ।।
आपल्या बल-पराक्रमाची घमेंड बाळगणार्‍या राक्षस रावणाने जेव्हा हिचे अपहरण केले होते त्या समयी ही बिचारी सती शून्य आश्रमात एकटीच होती - आपण हिच्या जवळ नव्हता म्हणून ही विवश होती. (तिचा काही उपाय चालला नाही.) ॥७॥
क्रुद्धा चान्तःपुरे गुप्ता त्वच्चित्ता त्वत्परायणा ।
रक्षिता राक्षसीभिश्च घोरभिर्घोरबुद्धिभिः ।। ८ ।।
रावणाने हिला आणून अंतःपुरात कैद केले होते. हिच्यावर पहारा बसविला होता भयानक विचार असणार्‍या भीषण राक्षसीणी हिची राखण करीत होत्या. तरीही हिचे चित्त आपल्यातच लागून राहिले होते. ही आपल्यालाच स्वतःचा परम आश्रय मानत राहिली. ॥८॥
प्रलोभ्यमाना विविधं भर्त्स्यमाना च मैथिली ।
नाचिन्तयत तद्रक्षः त्वद्‌गतेनान्तरात्मना ।। ९ ।।
तत्पश्चात्‌ निरनिराळी प्रलोभनेही दाखविली गेली या मैथिलीला. धाक दडपशाही सहन करावी लागली परंतु हिचा अंतरात्मा निरंतर आपल्याच चिंतनात लागून राहिला होता. हिने त्या राक्षसाच्या विषयी कधी एक वेळही विचार केला नाही. ॥९॥
विशुद्धभावां निष्पापां पतिगृह्णीष्व मैथिलीम् ।
न किञ्चिदभिधातव्या अहमाज्ञापयामि ते ।। १० ।।
म्हणून हिचा भाव सर्वथा शुद्ध आहे. ही मैथिली सर्वथा निष्पाप आहे. आपण हिचा सादर स्वीकार करावा. मी आपल्याला आज्ञा देत आहे. आपण हिला कधी काही कठोर वचने (ऐकवू नयेत) बोलू नयेत. ॥१०॥
ततः प्रीतमना रामः श्रुत्वैवं वदतां वरः ।
दध्यौ मुहूर्तं धर्मात्मा हर्षव्याकुललोचनः ।। ११ ।।
अग्निदेवांचे हे बोलणे वक्त्यांमध्ये श्रेष्ठ धर्मात्मा श्रीरामांचे मन प्रसन्न झाले. त्यांच्या नेत्रात आनंदाश्रु दाटून आले. ते थोडा वेळपर्यंत विचारांत बुडून गेले. ॥११॥
एवमुक्तो महातेजा द्युतिमान् उरुविक्रमः ।
उवाच त्रिदशश्रेष्ठं रामो धर्मभृतां वरः ।। १२ ।।
त्यानंतर महातेजस्वी, धैर्यवान्‌, महान्‌ पराक्रमी तसेच धर्मात्म्यांमध्ये श्रेष्ठ श्रीरामांनी देवशिरोमणी अग्निदेवांना त्यांच्या पूर्वोक्त बोलण्याच्या उत्तरात म्हटले - ॥१२॥
अवश्यं चापि लोकेषु सीता पावनमर्हति ।
दीर्घकालोषिता हीयं रावणान्तःपुरे शुभा ।। १३ ।।
भगवन्‌ ! लोकांमध्ये सीतेच्या पातिव्रत्याचा विश्वास उत्पन्न व्हावा म्हणून हिची शुद्धिविषयक परीक्षा आवश्यक होती, कारण की शुभलक्षणा सीतेला विवश होऊन दीर्घकाळापर्यंत रावणाच्या आंतःपुरात राहावे लागले आहे. ॥१३॥
बालिशः खलु कामात्मा रामो दशरथात्मजः ।
इति वक्ष्यन्ति मां लोको जानकीमविशोध्य हि ।। १४ ।।
जर मी जानकीच्या शुद्धिच्या विषयात परीक्षा घेतली नसती तर लोक असेच म्हणाले असते की दशरथपुत्र राम फारच मूर्ख आणि कामी आहेत. ॥१४॥
अनन्यहृदयां सीतां मच्चित्तपरिरक्षीणीम् ।
अहमप्यवगच्छामि मैथिलीं जनकात्मजाम् ।। १५ ।।
ही गोष्ट तर मीही जाणत आहे की जनकात्मजा मैथिली सीतेचे हृदय सदा माझ्या ठिकाणीच लागून राहिलेले असते. माझ्यापासून कधी अलग होत नाही. ती सदा माझेच मन राखत असते - माझ्या इच्छेनुसारच वागते. ॥१५॥
इमामपि विशालाक्षीं रक्षितां स्वेन तेजसा ।
रावणो नातिवर्तेत वेलामिव महोदधिः ।। १६ ।।
मला हा ही विश्वास आहे की जसे महासागर आपल्या तटभूमीला कधी ओलांडू शकत नाही. त्याप्रमाणेच रावण, आपल्याच तेजाने सुरक्षित या विशाल लोचना सीतेवर अत्याचार करू शकत नव्हता. ॥१६॥
प्रत्ययार्थं तु लोकानां त्रयाणां सत्यसंश्रयः ।
उपेक्षे चापि वैदेहीं प्रविशन्तीं हुताशनम् ।। १७ ।।
तथापि तीन्ही लोकातील प्राण्यांच्या मनात विश्वास उत्पन्न करण्यासाठी एकमात्र सत्याचा आश्रय घेऊन मी अग्नित प्रवेश करणार्‍या वैदेही सीतेला रोखण्याचा प्रयत्‍न केला नाही. ॥१७॥
न हि शक्तः सुदुष्टात्मा मनसाऽपि हि मैथिलीम् ।
प्रधर्षयितुमप्राप्यां दीप्तामग्निशिखामिव ।। १८ ।।
मैथिली सीता प्रज्वलित अग्निशिखेसमान दुर्धर्ष तसेच दुसर्‍यांसाठी अलभ्य आहे. दुष्टात्मा रावण मनानेही हिच्यावर अत्याचार करण्यास समर्थ होऊ शकला नसता. ॥१८॥
नेयमर्हति वैक्लव्यं रावणान्तःपुरे सती ।
अनन्या हि मया सीता भास्करेण प्रभा यथा ।। १९ ।।
ही सती-साध्वी देवी रावणाच्या अंतःपुरात राहूनही व्याकुळता किंवा भीतीत पडू शकत नव्हती कारण की ही माझ्यापासून, सूर्यदेवापासून त्यांची प्रभा जशी अभिन्न असते, तशी अभिन्न आहे. ॥१९॥
विशुद्धा त्रिषु लोकेषु मैथिली जनकात्मजा ।
न विहातुं मया शक्या कीर्तिरात्मवता यथा ।। २० ।।
मैथिली जानकी तीन्ही लोकात परम पवित्र आहे. जसे मनस्वी पुरुष कीर्तिचा त्याग करू शकत नाही त्याच प्रकारे मी ही हिला सोडू शकत नाही. ॥२०॥
अवश्यं तु मया कार्यं सर्वेषां वो वचो हितम् ।
स्निग्धानां लोकनाथानां एवं च वदतां हितम् ।। २१ ।।
आपण सर्व लोकपाल माझ्या हिताचीच गोष्ट सांगत आहात आणि आपणा लोकांचा माझ्यावर फार स्नेह आहे म्हणून आपणांसर्वा देवतांच्या हितकर वचनाने मला अवश्य पालन केले पाहिजे. ॥२१॥
इत्येवमुक्त्वा विजयीदितं महाबलः
प्रशस्यमानः स्वकृतेन कर्मणा ।
समेत्य रामः प्रियया महायशाः
सुखं सुखार्होऽनुबभूव राघवः ।। २२ ।।
असे म्हणून आपण केलेल्या पराक्रमाने प्रशंसित झालेल्या महाबली, महायशस्वी, विजयी वीर राघव श्रीराम आपली प्रिया सीता हिला भेटून मोठ्‍या सुखाचा अनुभव करू लागले, कारण की ते सुख भोगण्यासच योग्य आहेत. ॥२२॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे अष्टादशाधिकशततमः सर्गः ।। ११८ ।।
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकशेअठरावा सर्ग पूरा झाला. ॥११८॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP