|
| नीलकर्तृकः प्रहस्तस्य वधः - 
 | नीलाच्या द्वारा प्रहस्ताचा वध - | 
| ततः प्रहस्तं निर्यान्तं दृष्ट्वा भीमपराक्रमम् । उवाच सस्मितं रामो विभीषणमरिन्दमः ॥ १ ॥
 
 | (या पूर्वी) प्रहस्ताला युद्धाची तयारी करून लंकेतून बाहेर पडताना पाहून शत्रुसूदन श्रीरामचंद्र हसून विभीषणास म्हणाले- ॥१॥ | 
| क एष सुमहाकायो बलेन महता वृतः । आगच्छति महावेगः किंरूपबलपौरुषः  ॥ २ ॥
 
 आचक्ष्व मे महाबाहो वीर्यवन्तं निशाचरम् ।
 
 | महाबाहो ! हा मोठे शरीर असलेला आणि महान वेग असलेला तसेच फार मोठ्या सेनेने घेरलेला कोण योद्धा येत आहे ? याचे रूप, बल आणि पौरुष कसे आहे ? या पराक्रमी निशाचराचा मला परिचय द्या. ॥२ १/२॥ | 
| राघवस्य वचः श्रुत्वा प्रत्युवाच विभीषणः ॥ ३ ॥ 
 एष सेनापतिस्तस्य प्रहस्तो नाम राक्षसः ।
 लङ्कायां राक्षसेन्द्रस्य त्रिभागबलसंवृतः ।
 वीर्यवानस्त्रविच्छूरः प्रख्यातश्च पराक्रमः ॥ ४ ॥
 
 | राघवाचे वचन ऐकून विभीषणाने याप्रकारे उत्तर दिले- प्रभो ! या राक्षसाचे नाव प्रहस्त आहे. हा राक्षसराज रावणाचा सेनापति आहे आणि लंकेच्या एक तृतीयांश सेनेने घेरलेला आहे. याचा पराक्रम चांगल्या प्रकारे विख्यात आहे. हा नाना प्रकारच्या अस्त्र-शस्त्रांचा ज्ञाता, बळ- विक्रमाने संपन्न आणि शूरवीर आहे. ॥३-४॥ | 
| ततः प्रहस्तं निर्यान्तं भीमं भीमपराक्रमम् । गर्जन्तं सुमहाकायं राक्षसैरभिसंवृतम् ॥ ५ ॥
 
 ददर्श महती सेना वानराणां बलीयसाम् ।
 अतिसञ्जातघोषाणां प्रहस्तमभिगर्जताम् ॥ ६ ॥
 
 | याच वेळी महाबलवान् वानरांच्या विशाल सेनेनेही भयानक पराक्रमी, भीषण रूपधारी तसेच महाकाय प्रहस्ताला मोठ्या गर्जना तर्जना करीत लंकेतून बाहेर पडतांना पाहिले. तो बहुसंख्य राक्षसांनी घेरलेला होता. त्याला पहाताच वानरांच्या दलात महान कोलाहल होऊ लागला आणि ते प्रहस्ताकडे पाहून पाहून गर्जना करू लागले. ॥५-६॥ | 
| खड्गशक्त्यृष्टिशूलाश्च बाणानि मुसलानि च । गदाश्च परिघाः प्रासा विविधाश्च परश्वधाः ॥ ७ ॥
 
 धनूंषि च विचित्राणि राक्षसानां जयैषिणाम् ।
 प्रगृहीतान्यराजन्त वानरानभिधावताम् ॥ ८ ॥
 
 | विजयाची इच्छा करणारे राक्षस वानरांकडे धावले. त्यांच्या हातात खड्ग, शक्ति, ऋष्टि, शूल, बाण, मुसळ, गदा, परिघ, प्रास, नाना प्रकारचे परशु आणि विचित्र - विचित्र धनुष्ये शोभून दिसत होती. ॥७-८॥ | 
| जगृहुः पादपांश्चापि पुष्पितांस्तु गिरींस्तथा । शिलाश्च विपुला दीर्घा योद्धुकामाः प्लवंगमाः ॥ ९ ॥
 
 | तेव्हा वानरांनीही युद्धाच्या इच्छेने फुललेले वृक्ष, पर्वत तसेच मोठ मोठे दगड उचलून घेतले. ॥९॥ | 
| तेषामन्योन्यमासाद्य संग्रामः सुमहानभूत् । बहूनामश्मवृष्टिं च शरवृष्टिं च वर्षताम् ॥ १० ॥
 
 | नंतर दोन्ही पक्षांच्या बहुसंख्य वीरांमध्ये दगड आणि बाणांची वृष्टि यासह आपापसात फार मोठा संग्राम सुरू झाला. ॥१०॥ | 
| बहवो राक्षसा युद्धे बहून् वानरयूथपान् । वानरा राक्षसांश्चापि निजघ्नुर्बहवो बहून् ॥ ११ ॥
 
 | त्या युद्धस्थळी बर्याचशा राक्षसांनी बर्याच वानरांचा आणि बहुसंख्य वानरांनी बर्याचशा राक्षसांचा संहार करून टाकला. ॥११॥ | 
| शूलैः प्रमथिताः केचित् केचित् तु परमायुधैः । परिघैराहताः केचित् केचिच्छिन्नाः परश्वधैः ॥ १२ ॥
 
 | वानरांमध्ये काही शूलांनी आणि काही चक्रांनी मारले गेले. तर कित्येक परिघांच्या मारांनी आहत झाले आणि कित्येकांचे परशुने तुकडे तुकडे केले गेले. ॥१२॥ | 
| निरुच्छ्वासाः कृताः केचित् पतिता जगतीतले । विभिन्नहृदयाः केचिद् इषुसन्धानसाधिताः ॥ १३ ॥
 
 | कित्येक योद्धे श्वासरहित होऊन पृथ्वीवर पडले आणि कित्येकच बाणांचे लक्ष्य बनले, ज्यामुळे त्यांचे हृदय विदीर्ण झाले. ॥१३॥ | 
| केचिद् द्विधा कृताः खड्गैः स्फुरन्तः पतिता भुवि । वानरा राक्षसैः शूरैः पार्श्वतश्च विदारिताः ॥ १४ ॥
 
 | कित्येक वानर तलवारीच्या घावाने दोन तुकडे होऊन पृथ्वीवर कोसळले आणि तडफडू लागले. कित्येक शूरवीर राक्षसांनी तर वानरांच्या बरगड्या विदीर्ण केल्या. ॥१४॥ | 
| वानरैश्चापि संक्रुद्धै राक्षसौघाः समन्ततः । पादपैर्गिरिशृङ्गैश्च संपिष्टा वसुधातले ॥ १५ ॥
 
 | याच प्रकारे वानरांनी अत्यंत कुपित होऊन वृक्ष आणि पर्वत शिखरांच्या द्वारा सर्वत्र भूतलावर राक्षसांच्या झुंडीच्या झुंडींचा चुराडा केला. ॥१५॥ | 
| वज्रस्पर्शतलैर्हस्तैः मुष्टिभिश्च हता भृशम् । वमन् शोणितमास्येभ्यो विशीर्णदशनेक्षणाः ॥ १६ ॥
 
 | वानरांच्या वज्रतुल्य कठोर थपडांनी आणि बुक्क्यांनी चांगल्या प्रकारे बदडले गेलेले राक्षस मुखाने रक्त ओकू लागले. त्यांचे दात आणि नेत्र छिन्न-भिन्न  होऊन विखुरले गेले. ॥१६॥ | 
| आर्तस्वनं च स्वनतां सिंहनादं च नर्दताम् । बभूव तुमुलः शब्दो हरीणां रक्षसामपि ॥ १७ ॥
 
 | कोणी आर्तनाद करत होते तर कोणी सिंहाप्रमाणे डरकाळ्या फोडत होते. याप्रकारे वानर आणि राक्षसांच्या भयंकर कोलाहल तेथे सर्वत्र निनादत राहिला होता. ॥१७॥ | 
| वानरा राक्षसाः क्रुद्धा वीरमार्गमनुव्रताः । विवृत्तनयनाः क्रूराः चक्रुः कर्माण्यभीतवत् ॥ १८ ॥
 
 | क्रोधाविष्ट झालेले वानर आणि राक्षस वीरोचित मार्गाचे अनुसरण करून युद्धात पाठ दाखवत नव्हते. ते तोंडे पसरून निर्भय असल्याप्रमाणे क्रूरतापूर्ण कर्मे करत होते. ॥१८॥ | 
| नरान्तकः कुंभहनुः महानादः समुन्नतः । एते प्रहस्तसचिवाः सर्वे जघ्नुर्वनौकसः ॥ १९ ॥
 
 | नरान्तक, कुंभहनु, महानाद आणि समुन्नत - हे प्रहस्ताचे सारे सचिव वानरांचा वध करू लागले. ॥१९॥ | 
| तेषां निपततां शीघ्रं निघ्नतां चापि वानरान् । द्विविदो गिरिशृङ्गेण जघानैकं नरान्तकम् ॥ २० ॥
 
 | शीघ्रतापूर्वक आक्रमण करीत असलेल्या आणि वानरांना मारीत असलेल्या प्रहस्ताच्या सचिवांपैकी एकाला, ज्याचे नाव नरान्तक होते, द्विविदाने एका पर्वताच्या शिखराने ठार मारले. ॥२०॥ | 
| दुर्मुखः पुनरुत्थाय कपिः सविपुलद्रुमम् । राक्षसं क्षिप्रहस्तं तु समुन्नतमपोथयत् ॥ २१ ॥
 
 | नंतर दुर्मुखाने एक विशाल वृक्ष घेऊन शीघ्रतापूर्वक हात चालविणार्या राक्षस समुन्नताला चिरडून टाकले. ॥२१॥ | 
| जाम्बवांस्तु सुसंक्रुद्धः प्रगृह्य महतीं शिलाम् । पातयामास तेजस्वी महानादस्य वक्षसि ॥ २२ ॥
 
 | तत्पश्चात् अत्यंत कुपित झालेल्या तेजस्वी जाम्बवानाने एक फार मोठी शिळा उचलली आणि ती महानादाच्या छातीवर फेकून मारली. ॥२२॥ | 
| अथ कुंभहनुस्तत्र तारेणासाद्य वीर्यवान् । वृक्षेण महता सद्यः  प्राणान् संत्याजयद् रणे ॥ २३ ॥
 
 | शिल्लक राहिला पराक्रमी कुंभहनु. तो तार नावाच्या वानराशी भिडला आणि शेवटी एका विशाल वृक्षाच्या तडाख्यात सापडून त्यालाही रणभूमीमध्ये आपले प्राण गमावणे भाग पडले. ॥२३॥ | 
| अमृष्यमाणस्तत्कर्म प्रहस्तो रथमास्थितः । चकार कदनं घोरं धनुष्पाणिर्वनौकसाम् ॥ २४ ॥
 
 | रथावर बसलेल्या प्रहस्ताला वानरांचा हा अद्भुत पराक्रम सहन झाला नाही. त्याने हातात धनुष्य घेऊन वानरांचा घोर संहार आरंभला. ॥२४॥ | 
| आवर्त इव सञ्जज्ञे सेनयोरुभयोस्तदा । क्षुभितस्याप्रमेयस्य सागरस्येव निस्वनः ॥ २५ ॥
 
 | त्यासमयी दोन्ही सेना पाण्याच्या भोंवर्याप्रमाणे गोल गोल फिरत राहिल्या होत्या. विक्षुब्ध अपार महासागराच्या गर्जनेप्रमाणे तिची गर्जना ऐकू येत होती. ॥२५॥ | 
| महता हि शरौघेण राक्षसो रणदुर्मदः । अर्दयामास संक्रुद्धो वानरान् परमाहवे ॥ २६ ॥
 
 | अत्यंत क्रोधाविष्ट झालेल्या रणदुर्मद राक्षस प्रहस्ताने आपल्या बाण-समूहांच्या द्वारा त्या महासमरात वानरांना पीडित करण्यास आरंभ केला. ॥२६॥ | 
| वानराणां शरीरैस्तु राक्षसानां च मेदिनी । बभूवातिचिता घोरैः पर्वतैरिव संवृता ॥ २७ ॥
 
 | पृथ्वीवर वानर आणि राक्षस यांच्या प्रेतांचे ढीग लागले. त्यांनी आच्छादित झालेली रणभूमी भयानक पर्वतांनी झाकली गेल्यासारखी भासत होती. ॥२७॥ | 
| सा मही रुधिरौघेण प्रच्छन्ना संप्रकाशते । संछन्ना माधवे मासि पलाशैरिव पुष्पितैः ॥ २८ ॥
 
 | रक्ताच्या प्रवाहाने आच्छादित झालेली ती युद्धभूमी वैशाख महिन्यातील फुललेल्या पलाश वृक्षांनी झाकल्या गेलेल्या वन्य भूमीसारखी सुशोभित होत होती. ॥२८॥ | 
| हतवीरौघवप्रां तु भग्नायुधमहाद्रुमाम् । शोणितौघमहातोयां यमसागरगमिनीम् ॥ २९ ॥
 
 यकृत्प्लीहमहापङ्कां विनिकीर्णान्त्रशैवलाम् ।
 भिन्नकायशिरोमीनां अंगावयवशाद्वलाम् ॥ ३० ॥
 
 गृध्रहंसगणाकीर्णां कङ्कसारससेविताम् ।
 मेदःफेनसमाकीर्णां आर्तस्तनितनिःस्वनाम् ॥ ३१ ॥
 
 तां कापुरुषदुस्तारां युद्धभूमिमयीं नदीम् ।
 नदीमिव घनापाये हंससारससेविताम् ॥ ३२ ॥
 
 राक्षसाः कपिमुख्यास्ते तेरुस्तां दुस्तरां नदीम् ।
 यथा पद्मरजोध्वस्तां नलिनीं गजयूथपाः ॥ ३३ ॥
 
 | मारल्या गेलेल्या वीरांची प्रेते हेच जिचे दोन्ही तट होते. रक्ताचा प्रवाह हाच जिची महान जलराशी होती, जी यमलोकी समुद्रास मिळाली होती.  तुटलेली मोडलेली अस्त्रे-शस्त्रे ही जिच्या तटवर्ती विशाल वृक्षांप्रमाणे वाटत होती. सैनिकांची यकृते आणि प्लिहा (हृदयाचे उजवे, डावे भाग) जिचा महान चिखल होता. बाहेर पडलेली आंतडी जेथे शेवाळ्याचे काम करीत होती. तुटलेली मस्तके आणि धडे जेथे मत्स्याप्रमाणे प्रतीत होत होती. शरीराचे लहान लहान अवयव आणि केस जिच्यामध्ये गवताचा भ्रम उत्पन्न करीत होते. जेथे गिधाडेच हंस बनून बसले होते. कंकरूपी सारस ज्याचे सेवन करत होते. मेदच फेन बनून जेथे सर्व बाजूस पसरले होते. पीडितांचे कण्हणे जिचा कलकल ध्वनि होता आणि कायरां (भित्र्या लोकां) साठी जिला पार करणे अत्यंत कठीण होते, त्या युद्धभूमीरूपी नदीला प्रवाहित करून राक्षस आणि श्रेष्ठ वानर वर्षाकाळाच्या अंती हंस आणि सारसांनी सेवित सरितेप्रमाणे त्या दुस्तर नदीला, जसे गजयूथपति कमलांच्या परागांनी आच्छादित एखाद्या पुष्करिणीला पार करतात, त्याप्रमाणे पार करीत होते. ॥२९-३३॥ | 
| ततः सृजन्तं बाणौघान् प्रहस्तं स्यन्दने स्थितम् । ददर्श तरसा नीलो विनिघ्नन्तं प्लवंगमान् ॥ ३४ ॥
 
 | त्यानंतर नीलाने पाहिले, रथावर बसलेला प्रहस्त बाणसमूहांची वृष्टि करीत वेगपूर्वक वानरांचा संहार करीत आहे. ॥३४॥ | 
| उद्धूत इव वायुः खे महदभ्रबलं बलात् । समीक्ष्याभिद्रुतं युद्धे प्रहस्तो वाहिनीपतिः ॥ ३५ ॥
 
 रथेनादित्यवर्णेन नीलमेवाभिदुद्रुवे ।
 
 | तेव्हा ज्याप्रमाणे प्रचण्ड वादळ सुटले की आकाशांत महान मेघांच्या समुदायाला छिन्नभिन्न करून उडवून देते, त्याप्रकारे नीलही बलपूर्वक राक्षससेनेचा संहार करू लागले. त्यामुळे त्या युद्धस्थळावर राक्षसांची सेना पळून जाऊ लागली. सेनापति प्रहस्ताने जेव्हा आपल्या सेनेची दुरावस्था पाहिली, तेव्हा त्याने सूर्यतुल्य तेजस्वी रथाच्या द्वारा नीलावरच हल्ला केला. ॥३५ १/२॥ | 
| स धनुर्धन्विनां श्रेष्ठो विकृष्य परमाहवे ॥ ३६ ॥ 
 नीलाय व्यसृजद् बाणान् प्रहस्तो वाहिनीपतिः ।
 
 | धनुर्धारी लोकात श्रेष्ठ आणि निशाचरांच्या सेनेचा नायक असलेल्या प्रहस्ताने त्या महासमरात आपले धनुष्य खेचून नीलावर बाणांची वृष्टि करण्यास आरंभ केला. ॥३६ १/२॥ | 
| ते प्राप्य विशिखा नीलं विनिर्भिद्य समाहिताः ॥ ३७ ॥ 
 महीं जग्मुर्महावेगा रुषिता इव पन्नगाः ।
 
 | रोषाने भरलेल्या सर्पाप्रमाणे ते महान् वेगशाली बाण नीलापर्यंत पोहोचून त्यांना विदिर्ण करून अत्यंत सावधानपूर्वक जमिनीत सामावले. ॥३७ १/२॥ | 
| नीलः शरैरभिहतो निशितैर्ज्वलनोपमैः ॥ ३८ ॥ 
 स तं परमदुर्धर्षं आपतन्तं महाकपिः
 प्रहस्तं ताडयामास वृक्षमुत्पाट्य वीर्यवान् ॥ ३९ ॥
 
 | प्रहस्ताचे तीक्ष्ण बाण प्रज्वलित अग्निसमान भासत होते. त्यांच्या आघाताने नील खूप घायाळ झाले. याप्रकारे त्या परम दुर्जय राक्षस प्रहस्ताला आपल्यावर आक्रमण करतांना पाहून बल-विक्रमशाली महाकपि नीलाने एक वृक्ष उपटून त्याच्या द्वारा, प्रहस्तावर आघात केला. ॥३८-३९॥ | 
| स तेनाभिहतः क्रुद्धो नदन् राक्षसपुङ्गवः । ववर्ष शरवर्षाणि प्लवंगानां चमूपतौ ॥ ४० ॥
 
 | नीलाचा आघात लागताच कुपित झालेला राक्षसशिरोमणी प्रहस्त फार मोठ्याने गर्जना करत त्या वानर सेनापतिवर बाणांची वृष्टि करू लागला. ॥४०॥ | 
| तस्य बाणगणानेव राक्षसस्य महाबलः । अपारयन् वारयितुं प्रत्यगृह्णान्निमीलितः ।
 यथैव गोवृषो वर्षं शारदं शीघ्रमागतम् ॥ ४१ ॥
 
 एवमेव प्रहस्तस्य शरवर्षं दुरासदान् ।
 निमीलिताक्षः सहसा नीलः सेहे दुरासदान् ॥ ४२ ॥
 
 | त्या दुरात्मा राक्षसाच्या बाण-समूहांचे निवारण करण्यास समर्थ न झाल्याने नील डोळे बंद करून त्या सर्व बाणांना आपल्या अंगावरच ग्रहण करू लागले. ज्याप्रमाणे वळू अचानक आलेल्या शरद ऋतुतील वृष्टिला गुपचुप आपल्या शरीरावर सहन करतो त्याचप्रकारे प्रहस्ताच्या त्या दुःसह बाणांच्या वृष्टिला नील गुपचुप डोळे बंद करून सहन करत राहिले. ॥४१-४२॥ | 
| रोषितः शरवर्षेण सालेन महता महान् । प्रजघान हयान् नीलः प्रहस्तस्य महाबलः ॥ ४३ ॥
 
 | प्रहस्ताच्या बाणवृष्टिने कुपित होऊन महाबली महाकपि  नीलाने एका विशाल सालवृक्षाच्या द्वारा त्याच्या घोड्यांना मारून टाकले. ॥४३॥ | 
| ततो रोषपरितात्मा धनुस्तस्य दुरात्मनः । बभञ्ज तरसा नीलो ननाद च पुनः पुनः ॥ ४४ ॥
 
 | त्यानंतर रोषाने भरलेल्या नीलाने त्या दुरात्माच्या धनुष्यालाही वेगपूर्वक तोडून टाकले आणि वारंवार ते गर्जना करू लागले. ॥४४॥ | 
| विधनुः स कृतस्तेन प्रहस्तो वाहिनीपतिः । प्रगृह्य मुसलं घोरं स्यन्दनादवपुप्लुवे ॥ ४५ ॥
 
 | नीलाच्या द्वारा धनुष्यरहित केला गेलेला सेनापति प्रहस्ताने एक भयानक मुसळ हातात घेऊन आपल्या रथांतून खाली उडी मारली. ॥४५॥ | 
| तावुभौ वाहिनीमुख्यौ जातवैरौ तरस्विनौ । स्थितौ क्षतजदिग्धाङ्गौ प्रभिन्नाविव कुञ्जरौ ॥ ४६ ॥
 
 | ते दोन्ही वीर आपापल्या सेनेचे प्रधान होते. दोघेही एक दुसर्याचे वैरी आणि वेगवान् होते. ते मदाची धारा वहावणार्या दोन गजराजांप्रमाणे रक्तांनी न्हाऊन निघाले होते. ॥४६॥ | 
| उल्लिखन्तौ सुतीक्ष्णाभिः दंष्ट्राभिरितरेतरम् । सिंहशार्दूलसदृशौ सिंहशार्दूलचेष्टितौ ॥ ४७ ॥
 
 | दोघेही आपल्या तीक्ष्ण दाढांनी चावून चावून एक-दुसर्याच्या अंगांना घायाळ करून टाकत होते. ते दोघेही सिंह आणि वाघाप्रमाणे शक्तिशाली आणि त्यांच्याप्रमाणेच विजयासाठी प्रयत्नशील होते. ॥४७॥ | 
| विक्रान्तविजयौ वीरौ समरेष्वनिवर्तिनौ । काङ्क्षमाणौ यशः प्राप्तुं वृत्रवासवयोरिव ॥ ४८ ॥
 
 | दोघे वीर पराक्रमी, विजयी आणि युद्धात कधी पाठ न दाखवणारे होते; तसेच वृत्रासुर आणि इंद्राप्रमाणे युद्धात यश मिळविण्याची इच्छा करत होते. ॥४८॥ | 
| आजघान तदा नीलं ललाटे मुसलेन सः । प्रहस्तः परमायत्तः ततः सुस्राव शोणितम् ॥ ४९ ॥
 
 | त्यासमयी परम उद्योगी प्रहस्ताने नीलाच्या ललाटावर मुसळाने प्रहार केला त्यामुळे त्यांच्या ललाटांतून रक्ताची धार वाहू लागली. ॥४९॥ | 
| ततः शोणितदिग्धाङ्गः प्रगृह्य च महातरुम् । प्रहस्तस्योरसि क्रुद्धो विससर्ज महाकपिः ॥ ५० ॥
 
 | त्यांचे सारे अंग रक्ताने भिजून गेले. तेव्हा क्रोधाविष्ट झालेल्या महाकपि नीलानी एक विशाल वृक्ष उचलून प्रहस्ताच्या छातीवर जोरात मारला. ॥५०॥ | 
| तमचिन्त्य प्रहारं स प्रगृह्य मुसलं महत् । अभिदुद्राव बलिनं बलान्नीलं प्लवंगमम् ॥ ५१ ॥
 
 | त्या प्रहाराची काही पर्वा न करता प्रहस्त महान मुसळ हातात घेऊन बलवान वानर नीलाकडे मोठ्या वेगाने धावला. ॥५१॥ | 
| तमुग्रवेगं संरब्धं आपतन्तं महाकपिः । ततः संप्रेक्ष्य जग्राह महावेगो महाशिलाम् ॥ ५२ ॥
 
 | त्या भयंकर वेगवान् राक्षसाला रोषाने भरून आक्रमण करतांना पाहून महान वेगवान् महाकपि नीलाने एक फार मोठी शिळा हातात घेतली. ॥५२॥ | 
| तस्य युद्धाभिकामस्य मृधे मुसलयोधिनः । प्रहस्तस्य शिलां नीलो मूर्ध्नि तूर्णमपातयत् ॥ ५३ ॥
 
 | त्या शिळेला नीलाने रंगभूमीमध्ये संग्रामाची इच्छा करणार्या मुसळयोद्यी निशाचर प्रहस्ताच्या मस्तकावर तात्काळ फेकून मारले. ॥५३॥ | 
| नीलेन कपिमुख्येन विमुक्ता महती शिला । बिभेद बहुधा घोरा प्रहस्तस्य शिरस्तदा ॥ ५४ ॥
 
 | कपिप्रवर नीलाच्या द्वारा फेकल्या गेलेल्या त्या भयंकर आणि विशाल शिळेने प्रहस्ताचे मस्तक फोडून त्याचे कित्येक तुकडे करून टाकले. ॥५४॥ | 
| स गतासुर्गतश्रीको गतसत्त्वो गतेन्द्रियः । पपात सहसा भूमौ छिन्नमूल इव द्रुमः ॥ ५५ ॥
 
 | त्याचे प्राण-पाखरू उडून गेले. त्याची कांति, त्याचे बळ आणि त्याची सारी इंद्रिये ही शिथील झाली. तो राक्षस मूळापासून तोडलेल्या वृक्षाप्रमाणे एकाएकी पृथ्वीवर कोसळला. ॥५५॥ | 
| विभिन्नशिरसस्तस्य बहु सुस्राव शोणितम् । शरीरादपि सुस्राव गिरेः प्रस्रवणं यथा ॥ ५६ ॥
 
 | त्याच्या छिन्न-भिन्न झालेल्या मस्तकातून आणि शरीरातूनही खूप रक्त वाहू लागले; जणु पर्वतातून पाण्याचे झरे वहात आहेत. ॥५६॥ | 
| हते प्रहस्ते नीलेन तदकम्प्यं महाबलम् । रक्षसानामहृष्टानां लङ्कामभिजगाम ह ॥ ५७ ॥
 
 | नीलाच्या द्वारा प्रहस्त मारला गेल्यावर दुःखी झालेल्या राक्षसांची ती अकंपनीय विशाल सेना लंकेला परत गेली. ॥५७॥ | 
| न शेकुः समवस्थातुं निहते वाहिनीपतौ । सेतुबंधं समासाद्य विकीर्णं सलिलं यथा ॥ ५८ ॥
 
 | सेनापती मारला गेल्यावर, जसे बांध फुटल्यावर नदीचे पाणी थांबू शकत नाही (वाहून जाते), त्याप्रमाणे ती सेना तेथे थांबू शकली नाही. ॥५८॥ | 
| हते तस्मिंश्चमूमुख्ये राक्षसास्ते निरुद्यमाः । रक्षःपतिगृहं गत्वा ध्यानमूकत्वमागताः ॥ ५९ ॥
 
 प्राप्ताः शोकार्णवं तीव्रं विसंज्ञा  इव तेऽभवन् ॥ ६० ॥
 
 | सेनानायक मारला गेल्याने ते सारे राक्षस आपला युद्धविषयक उत्साह हरवून बसले आणि राक्षसराज रावणाच्या भवनात जाऊन चिंतेमुळे गुपचुप उभे राहिले. तीव्र शोक-समुद्रात बुडून गेल्यामुळे ते सर्वच्या सर्व जणु अचेतच झाले होते. ॥५९-६०॥ | 
| ततस्तु नीलो विजयी महाबलः प्रशस्यमानः स्वकृतेन कर्मणा ।
 समेत्य रामेण सलक्ष्मणेन
 प्रहृष्टरूपस्तु बभूव यूथपः ॥ ६१ ॥
 
 | तदनंतर विजयी सेनापति महाबली नील आपल्या महान् कर्मामुळे प्रशंसित होऊन श्रीराम आणि लक्ष्मणास येऊन भेटले आणि अत्यंत हर्षाचा अनुभव करू लागले. ॥६१॥ | 
| इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद्युद्धकाण्डे अष्टपञ्चाशः सर्गः ॥ ५८ ॥ 
 | याप्रकारे श्रीवाल्मीकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा अठ्ठावन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५८॥ | 
 
 
|