॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ बालकाण्ड ॥

॥ तृतीयः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]भगवंतांचा जन्म आणि बाललीला -


श्रीमहादेव उवाच
अथ राजा दशरथः श्रीमान्सत्यपरायणः ।
अयोध्याधिपतिर्वीरः सर्वलोकेषु विश्रुतः ॥ १ ॥
श्रीमहादेव म्हणाले-एकदा सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध. सत्यपरायण, श्रीमान्, अयोध्येचे अधिपती, वीरवर असे महाराज दशरथ होते. (१)

सोऽनपत्यत्वदुःखेन पीडितो गुरुमेकदा ।
वसिष्ठं स्वकुलाचार्यमभिवाद्येदमब्रवीत् ॥ २ ॥
पुत्र नसल्यामुळे ते अत्यंत दुःखी होते. एकदा त्यांनी गुरुवर वसिष्ठ या आपल्या कुलाच्या आचार्यांना प्रणाम करून असे सांगितले. (२)

स्वामिन्पुत्रा कथं मे स्युः सर्वलक्षणलक्षितः ।
पुत्रहीनस्य मे राज्यं सर्वं दुःखाय कल्पते ॥ ३ ॥
"अहो स्वामी, सर्व चांगल्या लक्षणांनी युक्त असे पुत्र मला कसे होतील ? कारण पुत्र नसल्यामुळे हे संपूर्ण राज्य मला दुःखदायक वाटत आहे." (३)

ततोऽब्रवीद्वसिष्ठस्तं भविष्यन्ति सुतास्तव ।
चत्वारः सत्त्वसम्पन्ना लोकपाला इवापराः ॥ ४ ॥
तेव्हा वसिष्ठ राजांना म्हणाले, "अत्यंत सामर्थ्य-संपन्न आणि जणू साक्षात दुसरे लोकपालच असे चार पुत्र तुम्हांला होतील. (४)

शान्ताभर्तारमानीय ऋष्यशृङ्‌गं तपोधनम् ।
अस्माभिः सहितः पुत्रकामेष्टिं शीघ्रमाचर ॥ ५ ॥
शांतेचे पती तपोधन क्रष्यशृंग यांना बोलावून, आमच्यासह तुम्ही लवकरच पुत्र कामेष्टि यज्ञ करा. " (५)

तथेति मुनिमानीय मंत्रिभिः सहितः शुचिः ।
यज्ञकर्म समारेभे मुनिभिर्वीतकल्मषैः ॥ ६ ॥
'ठीक आहे,' असे म्हणून, पवित्र दशरथ राजांनी मंत्र्यासह मुनिवर ऋष्यशृंगाला बोलावून आणून, पुण्यशील अशा मुनिजनांच्या साहाय्याने यज्ञ सुरू केला. (६)

श्रद्धया हूयमानेऽग्नौ तप्तजाम्बूनदप्रभः ।
पायसं स्वर्णपात्रस्थं गृहीत्वोवाच हव्यवाट् ॥ ७ ॥
अग्नीमध्ये श्रद्धापूर्वक आहुती दिल्या जात असता तप्त सुवर्णाप्रमाणे दीप्तिमान असा हव्यवाहन भगवान अग्नी एका सुवर्णपात्रात पायस घेऊन प्रकट झाला आणि म्हणाला. (७)

गृहाण पायसं दिव्यं पुत्रीयं देवनिर्मितम् ।
लप्स्यसे परमात्मानं पुत्रत्वेन न संशयः ॥ ८ ॥
'हे राजा, देवांनी निर्माण केलेला, पुत्रप्राप्ती करून देणारा, हा दिव्य पायस (खीर) घे. याच्यामुळे तुला साक्षात परमात्मा पुत्र म्हणून लाभेल यात संशय नाही.' (८)

इत्युक्त्वा पायसं दत्त्वा राज्ञे सोऽन्तर्दधेऽनलः ।
ववन्दे मुनिशार्दूलौ राजा लब्धमनोरथः ॥ ९ ॥
असे बोलून आणि ती खीर राजाला देऊन अग्निदेव अंतर्धान पावला. त्यानंतर ज्याचे मनोरथ सफल झाले आहेत अशा त्या राजाने मुनिश्रेष्ठ वसिष्ठ व ऋष्यशृंग यांच्या चरणांना वंदन केले. (९)

वसिष्ठऋष्यशृङ्‌गाभ्यामनुज्ञातो ददौ हविः ।
कौसल्यायै सकैकेय्यै अर्धमर्धं प्रयत्‍नतः ॥ १० ॥
[ ऋष्यशृंग हा मुनिवर विभांडकाचा पुत्र होता. एके काळी विभांडक मुनी एका कुंडात ध्यानस्थ बसले होते. त्या वेळी त्या बाजूने उर्वशी अप्सरा जात होती. तिला पाहून मुनीचे वीर्य स्खलित झाले. ते वीर्य पाण्याबरोबर एक हरिणी प्याली. त्यापासून या ऋष्यशृंगाचा जन्म झाला. आईप्रमाणे त्याच्या डोक्यावर एक शिंगसुद्धा उद्‌भवले. म्हणून विभांडक पित्याने त्याचे नाव ऋष्यशृंग असे ठेवले. एकदा अंग देशात भीषण दुष्काळ पडला. त्या वेळी अंगदेशाच्या रोमपाद नावाच्या राजाला मुनींनी सांगितले, जर बालब्रह्मचारी ऋष्यशृंगाला येथे आणता आले तर पर्जन्यवृष्टी होईल. राजाच्या प्रयत्‍नाने ऋष्यशृंग अंगदेशात येताच पुष्कळ वृष्टी झाली. त्याचा असा अद्‌भुत प्रभाव पाहून राजाने त्याला आपली शांता नावाची कन्या दिली. कुठे असेही सांगितले गेले आहे की शांता ही दशरथाची मुलगी होती आणि तिला त्याने रोमपाद या आपल्या मित्राला दत्तक दिली होती. ] आणि मग वसिष्ठ आणि ऋष्यशृंग या दोघांच्या आज्ञेनुसार राजा दशरथांनी तो पायस महाराणी कौसल्या आणि कैकेयी या दोघींना अर्धा अर्धा वाटून दिला. (१०)

ततः सुमित्रा संप्राप्ता जगृघ्नुः पौत्रिकं चरुम् ।
कौसल्या तु स्वभागार्धं ददौ तस्यै मुदान्विता ॥ ११ ॥
तदनंतर पुत्र प्राप्त करून देणारा तो चरू घेण्यासाठी सुमित्रासुद्धा तेथे येऊन पोचली. तेव्हा कौसल्येने मोठ्या आनंदाने आपल्या भागातील अर्धा भाग तिला दिला. (११)

कैकेयी च स्वभागार्धं ददौ प्रीतिसमन्विता ।
उपभुज्य चरुं सर्वाः स्त्रियो गर्भसमन्विताः ॥ १२ ॥
तसेच कैकेयीनेसुद्धा आपल्या पायसाचा अर्धा भाग प्रेमाने सुमित्रेला दिला. अशा प्रकारे तो पायस खाऊन तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. (१२)

देवता इव रेजुस्ताः स्वभासा राजमन्दिरे ।
दशमे मासि कौसल्या सुषुवे पुत्रमद्‌भुतम् ॥ १३ ॥
राजभवनात त्या तिन्ही राण्या स्वतःच्या कांतीने देवतांप्रमाणे शोभू लागल्या. त्यानंतर दहावा महिना लागल्यावर कौसल्येने एका अद्‌भुत बालकाला जन्म दिला. (१३)

मधुमासे सिते पक्षे नवम्यां कर्कटे शुभे ।
पुनर्वस्वृक्षसहिते उच्चस्थे ग्रहपञ्चके ॥ १४ ॥
मेषं पूषणि संप्राप्ते पुष्पवृष्टिसमाकुले ।
आविरासीज्जगन्नाथः परमात्मा सनातनः ॥ १५ ॥
चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमीच्या दिवशी, शुभ अशा कर्क लग्नात, पुनर्वसू नक्षत्राचे समयी, जेव्हा पांचही ग्रह उच्च स्थानी होते आणि सूर्य हा मेष राशीत आला होता, मध्यान्ह काळी, सनातन परमात्मा असलेले जगन्नाथ आविर्भूत झाले. त्या वेळी दिव्य पुष्पांच्या वर्षावाने आकाश भरून गेले. (१४-१५)

नीलोत्पलदलश्यामः पीतवासाश्चतुर्भुजः ।
जलजारुणनेत्रान्तः स्फुरत्कुण्डलमण्डितः ॥ १६ ॥
त्यांचा नील कमळाच्या पाकळीप्रमाणे श्याम वर्ण होता; त्यांनी पीतांबर परिधान केले होते; ते चतुर्भुज होते; त्यांच्या नेत्रांच्या आंतील भाग अरूण कमळाप्रमाणे लालसर होता, चमकणार्‍या कुंडलांनी ते सुंदर दिसत होते. (१६)

सहस्रार्कप्रतीकाशः किरीटी कुञ्चितालकः ।
शङ्‌खचक्रगदापद्मवनमालाविराजितः ॥ १७ ॥
त्यांचा प्रकाश हजारो सूर्यांप्रमाणे होता, त्यांच्या मस्तकावर प्रकाशमान मुकुट होता; त्यांचे केस कुरळे होते, त्यांच्या हातात शंख, चक्र, गदा, व पद्य आणि गळ्यात वैजयंती माला शोभत होती. (१७)

अनुग्रहाख्यहृस्थेन्दुसूचकस्मितचन्द्रिकः ।
करुणारससम्पूर्णविशालोत्पललोचनः ।
श्रीवत्सहारकेयूर नूपुरादिविभूषणः ॥ १८ ॥
हृदयांतील अनुग्रहरूपी चंद्राची सूचना देणारे स्मितरूपी चांदणे त्यांच्या मुखकमलावर चमकत होते, करुणारसाने भरलेले त्यांचे डोळे कमळाप्रमाणे विशाल होते; श्रीवत्स, हार, केयूर आणि नूपुर इत्यादी अलंकारांनी ते विभूषित होते. (१८)

दृष्ट्‍वा तं परमात्मानं कौसल्या विस्मयाकुला ।
हर्षाश्रुपूर्णनयना नत्वा प्राञ्जलिरब्रवीत् ॥ १९ ॥
त्या परमात्म्यांना पाहून, कौसल्या विस्मयचकित झाली. आनंदाशूंनी भरलेल्या डोळ्यांनी हात जोडून नमस्कार करीत ती म्हणाली. (१९)

कौसल्योवाच -
देवदेव नमस्तेऽस्तु शङ्‌खचक्रगदाधर ।
परमात्माच्युतोऽनन्तः पूर्णस्त्वं पुरुषोत्तमः ॥ २० ॥
कौसल्या म्हणाली-"हे देवदेवा, तुम्हांला नमस्कार असो. शंख, चक्र, गदा धारण करणार्‍या हे प्रभो, तुम्ही अच्युत आणि अनंत असे परमात्मा आहात. तुम्ही सर्वत्र परिपूर्ण पुरुषोत्तम आहात. (२०)

वदन्त्यगोचरं वाचां बुद्ध्यादीनां अतीन्द्रियम् ।
त्वां वेदवादिनः सत्तामात्रं ज्ञानैकविग्रहम् ॥ २१ ॥
वाणी तसेच मन इत्यादींचे तुम्ही विषय नाही, तुम्ही इंद्रियातीत, केवळ सत्तारूप आणि केवळ ज्ञान हेच स्वरूप असणारे आहात, असे वेदवेत्ते लोक तुमच्याबद्दल म्हणतात. (२१)

त्वमेव मायया विश्वं सृजस्यवसि हंसि च ।
सत्त्वादिगुणसंयुक्तस्तुर्य एवामलः सदा ॥ २२ ॥
तुम्हीच आपल्या मायेने, सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांनी युक्त होऊन, हे विश्व उत्पन्न करता, त्याचे पालन करता, आणि त्याचा संहार करता. तथापि खरे पाहता तुम्ही सदा निर्मळ अशा तुरीय स्थितीत असता. (२२)

करोषीव न कर्ता त्वं गच्छसीव न गच्छसि ।
शृणोषि न शृणोषीव पश्यसीव न पश्यसि ॥ २३ ॥
तुम्ही कर्ता नाही तथापि तुम्ही कर्मे करीत असल्यासारखे वाटते. तुम्ही गमन करीत नाही तरीसुद्धा तुम्ही गमन करीत असल्यासारखे वाटते. तुम्ही ऐकत नाही; परंतु तुम्ही शब्द ऐकल्यासारखे दिसून येते. तुम्ही पाहात नाही, तथापि तुम्ही पाहात असल्यासारखे प्रतीत होते. (२३)

अप्रमाणो ह्यमनाः शुद्ध इत्यादि शृतिरब्रवीत् ।
समः सर्वेषु भूतेषु तिष्ठन्नपि न लक्ष्यसे ॥ २४ ॥
अज्ञानध्वान्तचित्तानां व्यक्त एव सुमेधसाम् ।
जठरे तव दृश्यन्ते ब्रह्माण्डाः परमाणवः ॥ २५ ॥
त्वं ममोदरसम्भूत इति लोकान्विडम्बसे ।
भक्तेषु पारवश्यं ते दृष्टं मेऽद्य रघूत्तम ॥ २६ ॥
तुम्ही प्राण-रहित, मन-रहित आणि शुद्धस्वरूप आहात असे भगवती श्रुतीसुद्धा सांगते. सर्व प्राण्यांमध्ये तुम्ही समान भावाने स्थित आहात, तथापि ज्यांचे अंतःकरण अज्ञानरूपी अंधकाराने झाकलेले असते अशा लोकांना तुम्ही दिसत नाही. ज्यांची बुद्धी शुद्ध आहे, अशा पुरुषांनाच तुमचा साक्षात्कार होतो. हे भगवान रघूत्तमा, तुमच्या उदरात अनेक ब्रह्मांडे परमाणूप्रमाणे दिसतात. तथापि 'माझ्या उदरातून तुम्ही जन्म घेतलात' असे जे तुम्ही लोकांमध्ये प्रकट करीत आहात, ही तुमची लीला आहे, त्यावरून तुमची भक्त-वत्सलता आज मला दिसून आली. (२४-२६)

संसारसागरे मग्ना पतिपुत्रधनादिषु ।
भ्रमामि मायया तेऽद्य पादमूलमुपागता ॥ २७ ॥
हे प्रभो, तुमच्या मायेने मोहित होऊन, संसार-सागरात मग्न झालेली मी पती, पुत्र, धन इत्यादींमध्ये गुंतून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांमध्ये भटकत होते. परंतु आज माझ्या परम भाग्याने मी तुमच्या पदकमली शरण आले आहे. (२७)

देव त्वद्‌रूपमेतन्मे सदा तिष्ठतु मानसे ।
आवृणोतु न मां माया तव विश्वविमोहिनी ॥ २८ ॥
हे देवा, ही तुमची मनोहर मूर्ती सदा माझ्या हृदयात विराजमान राहो आणि विश्वाला मोहात टाकणार्‍या तुमच्या मायेने मला मोहात टाकू नये. (२८)

उपसंहर विश्वात्मन्नदो रूपमलौकिकम् ।
दर्शयस्व महानन्द बालभावं सुकोमलम् ।
हे विश्वात्मन, तुम्ही हे आपले अलौकिक रूप आता आवरून घ्या आणि परम आनंददायक व अतिशय कोमल असे बालरूप मला दाखवा. मग तुम्हांला सुखदायक आलिंगन देणे, तुमच्याशी संभाषण करणे इत्यादींद्वारा मी अज्ञानरूपी घोर अंधकारातून तरून जाईन." (२९)

ललितालिङ्‌गनालापैस्तरिष्याम्युत्कटं तमः ॥ २९ ॥
श्रीभगवानुवाच
यद्यदिष्टं तवास्त्यम्ब तत्तद्‌भवतु नान्यथा ॥ ३० ॥
श्रीभगवान् म्हणाले-"हे माते, तुला जी जी इच्छा असेल ते ते सर्व होवो. दुसरे काही नको. (३०)

अहं तु ब्रह्मणा पूर्वं भूमिर्भारापनुत्तये ।
प्रार्थितो रावणं हन्तुं मानुषत्वमुपागतः ॥ ३१ ॥
भूमीचा भार उतरविण्यासाठी पूर्वी ब्रह्मदेवाने माझी प्रार्थना केली होती. म्हणून रावण इत्यादी निशाचरांना ठार करण्यासाठीच मी मनुष्यरूपाने अवतार घेतला आहे. (३१)

त्वया दशरथेनाहं तपसाराधितः पुरा ।
मत्पुत्रत्वाभिकाङ्‍क्षिण्या तथा कृतमनिन्दिते ॥ ३२ ॥
हे पुण्यशील माते, मला पुत्ररूपाने प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने दशरथांसह तूसुद्धा तपस्येने माझी आराधना केली होतीस. (३२)

रूपमेतत्त्वया दृष्टं प्राक्तनं तपसः फलम् ।
मद्दर्शनं विमोक्षाय कल्पते ह्यन्यदुर्लभम् ॥ ३३ ॥
तू माझे जे हे दिव्य रूप पाहिलेस ते तुझ्या पूर्वीच्या तपस्येचे फळ आहे. माझे दर्शन हे मानवांना मोक्ष देणारे असते. पुण्यरहित लोकांना या रूपाचे दर्शन अत्यंत दुर्लभ आहे. (३३)

संवादं आवयोर्यस्तु पठेद्वा शृणुयादपि ।
स याति मम सारूप्यं मरणे मत्स्मृतिं लभेत् ॥ ३४ ॥
आपणा दोघांचा हा संवाद जो कोणी पठन करील अथवा ऐकेल त्याला माझ्या कृपेने मरणसमयी माझी स्मृती राहील आणि नंतर माझी सरूपता क्री प्राप्त होईल." (३४)

इत्युक्त्वा मातरं रामो बालो भूत्वा रुरोद ह ।
बालत्वेऽपीद्रनीलाभो विशालाक्षोऽतिसुन्दरः ॥ ३५ ॥
बालारुणप्रतीकाशो लालिताखिललोकपः ।
अथ राजा दशरथः श्रुत्वा पुत्रोद्‌भवोत्सवम् ।
आनन्दार्णवमग्नोऽसावाययौ गुरुणा सह ॥ ३६ ॥
अशा प्रकारे मातेला सांगून, भगवान राम बालरूप घेऊन रडू लागले. त्यांचे बालरूपसुद्धा इंद्रनील मण्यासारखे कांतिमय, विशाल नेत्र असणारे आणि अतिशय सुंदर होते. प्रभातकालीन बालसूर्याप्रमाणे त्यांची कांती होती. अशा प्रकारे आपल्या अवताराने त्यांनी सर्व लोकपालांना आनंदित केले होते. त्यानंतर पुत्रजन्माचा शुभ समाचार जेव्हा महाराज दशरथांनी ऐकला, तेव्हा ते जणू आनंदसागरात मग्न झाले आणि गुरू वसिष्ठांसह राजभवनात आले. (३५-३६)

रामं राजीवपत्राक्षं दृष्ट्‍वा हर्षाश्रुसंप्लुतः ।
गुरुणा जातकर्माणि कर्तव्यानि चकार सः ॥ ३७ ॥
तेथे आल्यावर कमलनयन रामाला पाहून त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून गेले. नंतर गुरूंकडून जातकर्म इत्यादी आवश्यक संस्कार त्यांनी करवून घेतले. (३७)

कैकेयी चाथ भरतं असूत कमलेक्षणा ।
सुमित्रायां ययौ जातौ पूर्णेन्दुसदृशाननौ ॥ ३८ ॥
त्यानंतर इकडे कमलनयना कैकेयीने भरताला जन्म दिला आणि पूर्णचंद्राप्रमाणे मुख असणारे दोन जुळे पुत्र सुमित्रेला झाले. (३८)

तदा ग्रामसहस्राणि ब्राह्मणेभ्यो मुदा ददौ ।
सुवर्णानि च रत्‍नानि वासांसि सुरभीः शुभाः ॥ ३९ ॥
त्या वेळी महाराज दशरथांनी मोठ्या आनंदाने हजारो गावे, पुष्कळ सोने, नाना रत्‍ने, अनेक प्रकारची वस्त्रे आणि शुभ लक्षणांनी युक्त अशा अनेक गाई ब्राह्मणांना दान दिल्या. (३९)

यस्मिन् रमन्ते मुनयो विद्ययाऽज्ञानविप्लवे ।
तं गुरुः प्राह रामेति रमणाद्‌राम इत्यपि ॥ ४० ॥
ज्ञानाने अज्ञान नष्ट झाल्यावर, मुनिजन ज्यांच्या ठिकाणी रमतात अथवा जे भक्तजनांच्या चित्ताला रमवितात ते राम, असा विचार करून गुरूंनी त्यांचे राम असे नाव ठेवले. (४०)

भरणाद्‌भरतो नाम लक्ष्मणं लक्षणान्वितम् ।
शत्रुघ्नं शत्रुहन्तारमेवं गुरुरभाषत ॥ ४१ ॥
याच प्रमाणे संसाराचे भरणपोषण करणारा असल्याने दुसर्‍या पुत्राचे नाव भरत, सर्व चांगल्या लक्षणांनी युक्त असल्यामुळे तिसर्‍या पुत्राचे नाव लक्ष्मण, आणि शत्रूचा नाश करणारा असल्याने चौथ्या पुत्राचे नाव शत्रुघ्न, अशी नावे गुरूंनी ठेवली. (४१)

लक्ष्मणो रामचन्द्रेण शत्रुघ्नो भरतेन च ।
द्वन्द्वीभूय चरन्तौ तौ पायसांशानुसारतः ॥ ४२ ॥
कौसल्या आणि कैकेयी यांनी दिलेल्या पायसाच्या भागांनुसार, लक्ष्मण हा रामचंद्रांचा आणि शत्रुघ्न हा भरताचा सहचर होऊन ते जोडीने राहू लागले. (४२)

रामस्तु लक्ष्मणेनाथ विचरन्बाललीलया ।
रमयामास पितरौ चेष्टितैर्मुग्धभाषितैः ॥ ४३ ॥
लक्ष्मणाबरोबर विहार करणारे रामचंद्र आपल्या बाललीला, मधुर अशा गमती आणि बोबडे बोल यांनी आपल्या मातापित्यांना आनंदित करू लागले. (४३)

भाले स्वर्णमयाश्वत्थपर्णमुक्ताफलप्रभम् ।
कण्ठे रत्‍नमणिव्रातमध्यद्वीपिनखाञ्चितम् ॥ ४४ ॥
श्रीरामाच्या कपाळावर मोत्यांनी सजलेले, देदीप्यमान, सुवर्णमय अश्वत्थ वृक्षाचे पान होते; तसेच त्यांच्या गळ्यात रत्‍ने आणि मध्ये व्याघ्रनख घालून गुंफलेला रत्‍नहार शोभत होता. (४४)

कर्णयोः स्वर्णसम्पन्नरत्‍नार्जुनसटालुकम् ।
शिञ्जनमणिमञ्जीरकटिसूत्राङ्‌गदैर्वृतम् ॥ ४५ ॥
अर्जुन वृक्षाच्या कच्च्या फळाप्रमाणे शोभणारे रत्‍नजडित सोन्याचे अलंकार त्यांच्या कानांत शोभत होते. रुणझुण आवाज करणारे मणिमय नूपुर, सुवर्ण मेखला आणि बाजूबंद यांनी ते सुशोभित होते. (४५)

स्मितवक्त्राल्पदशनमिन्द्रनीलमणिप्रभम् ।
अङ्‌गणे रिङ्‌गमाणं तं तर्णकाननु सर्वतः ॥ ४६ ॥
दृष्ट्‍वा दशरथो राजा कौसल्या मुमुदे तदा ।
भोक्ष्यमाणो दशरथो राममेहीति चासकृत् ॥ ४७ ॥
आह्वयत्यतिहर्षेण प्रेम्णा नायाति लीलया ।
आनयेति च कौसल्यामाह सा सस्मिता सुतम् ॥ ४८ ॥
धावत्यपि न शक्नोति स्प्रष्टुं योगिमनोगतिम्
प्रहसन्स्वयमायाति कर्दमाङ्‌कितपाणिना ।
किञ्चिद्‍गृहीत्वा कवलं पुनरेव पलायते ॥ ४९ ॥
इंद्रनील मण्याप्रमाणे त्यांची प्रभा होती आणि छोट्या छोट्या दातांनी युक्त आणि स्मित करणारे असे त्यांचे मुख होते, अशा श्रीरामांना राजभवनांतील अंगणात पाडसांच्या मागे मागे सगळीकडे रांगताना पाहून, महाराज दशरथ आणि कौसल्या त्या वेळी अतिशय आनंदित होत असत. ज्या वेळी महाराज दशरथ भोजन करण्यास बसत असत, त्या वेळी ते 'अरे रामा, ये' असे म्हणत अतिशय हर्षाने आणि प्रेमाने श्रीरामांना वारंवार बोलावीत असत. परंतु खेळात मग्न असल्यामुळे जेव्हां राम येत नसत, तेव्हा दशरथ 'त्याला घेऊन ये,' असे कौसल्येला सांगत. परंतु योगिजनांच्या चित्ताचा एकमात्र आश्रय असणार्‍या त्या आपल्या पुत्राला, हसत हसत धावणारी कौसल्या पकडू शकत नसे. (मग पळून पळून आई दमली आहे असे पाहून) श्रीराम चिखलाने माखलेल्या हातांनी स्वतःच हसत हसत येत असत आणि मग एखादा घास खाऊन पुनः पळून जात असत. (४६-४९)

कौसल्या जननी तस्य मासि मासि प्रकुर्वती ।
वायनानि विचित्राणि समलङ्‍कृत्य राघवम् ॥ ५० ॥
प्रत्येक महिन्यात राघवांना चांगल्याप्रकारे वस्त्रे-भूषणे घालून, कौसल्या अनेक प्रकारची वाणे वाटत असे. (५०)

अपूपान्मोदकान्कृत्वा कर्णशष्कुलिकास्तथा ।
कर्णपूरांश्च विविधान् वर्षवृद्धौ च वायनम् ॥ ५१ ॥
आणि वार्षिक वाढदिवसा दिवशीसुद्धा अनरसे, लाडू, जिलबी, कचोरी इत्यादी नानाप्रकारचे पदार्थ बनवून त्यांची वाणे देत असे. (५१)

गृहकृत्यं तया त्यक्तं तस्य चापल्यकारणात् ।
एकदा रघुनाथोऽसौ गतो मातरमन्तिके ॥ ५२ ॥
भोजनं देहि मे मातर्न शृतं कार्यसक्तया ।
ततः क्रोधेन भाण्डानि लगुडेनाहनत्तदा ॥ ५३ ॥
श्रीरामांच्या खोड्यांमुळे कौसल्येने घरातील काम करणेसुद्धा सोडून दिले. एकदा रघुनाथ आईच्या जवळ गेले. आणि म्हणाले, 'आई, मला जेवण दे.' कामात गढलेल्या कौसल्येला ते ऐकू आले नाही. तेव्हा श्रीरामांनी काहीशा रागारागाने काठी मारून भांडी फोडून टाकली. (५२-५३)

शिक्यस्थं पातयामास गव्यं च नवनीतकम् ।
लक्ष्मणाय ददौ रामो भरताय यथाक्रमम् ॥ ५४ ॥
शत्रुघ्नाय ददौ पश्चाद्दधि दुग्धं तथैव च ।
सूदेन कथिते मात्रे हास्यं कृत्वा प्रधावति ॥ ५५ ॥
तसेच शिंक्यावर ठेवलेले दही, लोणी खाली पाडले; नंतर दूध, दही, लोणी हेसुद्धा त्यांनी क्रमाने लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांना दिले. स्वयंपाक्याने ही गोष्ट कौसल्या मातेला सांगितली. तेव्हा ती हसून त्यांना पकडण्यास धावली. (५४-५५)

आगतां तां विलोक्याथ ततः सर्वैः पलायितम् ।
कौसल्या धावमानापि प्रस्खलन्ती पदे पदे ॥ ५६ ॥
नंतर आई येत आहे हे पाहून ते चौघे पळून गेले. त्यांच्यामागे धावणारी कौसल्यासुद्धा पावलोपावली अडखळू लागली. (५६)

रघुनाथं करे धृत्वा किञ्चिन्नोवाच भामिनी ।
बालभावं समाश्रित्य मन्दं मन्दं रुरोद ह ॥ ५७ ॥
शेवटी तिने रघुनाथांचा हात पकडला. राम बालभावानुसार मुळूमुळू रडू लागले. तेव्हा आई रामांना काहीही बोलली नाही. (५७)

ते सर्वे लालिता मात्रा गाढमालिङ्‌ग्य यत्‍नतः ।
एवमानन्दसन्दोहजगदानन्दकारकः ॥ ५८ ॥
मायाबालवपुर्धृत्वा रमयामास दम्पती ।
अथ कालेन ते सर्वे कौमारं प्रतिपेदिरे ॥ ५९ ॥
घट्ट मिठीत घेऊन आईने त्यांना कुरवाळले. अशा प्रकारे आनंदघन आणि जगाला आनंद देणार्‍या भगवान रामांनी मायामय असे बालरूप धारण करून दशरथ आणि कौसल्या या दांपत्याला आनंदित केले. काही काळ व्यतीत झाल्यावर ते चारही भाऊ कौमार अवस्थेत प्रविष्ट झाले. (५८-५९)

उपनीता वसिष्ठेन सर्वविद्याविशारदाः ।
धनुर्वेदे च निरताः सर्वशास्त्रार्थवेदिनः ॥ ६० ॥
बभूवुर्जगतां नाथ लीलया नररूपिणः ।
लक्ष्मणस्तु सदा राममनुगच्छति सादरम् ॥ ६१ ॥
सेव्यसेवकभावेन शत्रुघ्नो भरतं तथा ।
रामश्चापधरो नित्यं तूणीबाणान्वितः प्रभुः ॥ ६२ ॥
अश्वारूढो वनं याति मृगयायै सलक्ष्मणः ।
हत्वा दुष्टमृगान् सर्वान् पित्रे सर्वं न्यवेदयत् ॥ ६३ ॥
तेव्हा वसिष्ठांनी त्यांचा उपनयन संस्कार केला. लीलेनेच नररूप धारण करणारे आणि सर्व लोकांचे स्वामी असे ते चौघे भाऊ सर्व विद्यांमध्ये विशारद, सर्व शास्त्रांचे मर्म जाणणारे आणि धनुर्वेद इत्यादी सर्व विद्यांमध्ये पारंगत झाले. त्या चौघा भावांपैकी लक्ष्मण हा सेव्य-सेवक भावाने आदरपूर्वक सदा रामचंद्रांच्या बरोबर राहात असे. त्याच प्रमाणे शत्रुघ्न नेहमी भरताच्या सेवेत उपस्थित असे. धनुष्यबाण आणि भाते घेऊन, भगवान राम हे दररोज लक्ष्मणासह घोड्यावर स्वार होऊन, मृगयेसाठी वनात जात आणि तेथे सर्व (सिंह, व्याघ्र इत्यादी) दुष्ट पशूंना मारून, घरी परत आल्यावर, सर्व गोष्टी पित्याला सांगत. (६०-६३)

प्रातरुत्थाय सुस्नातः पितरौ अभिवाद्य च ।
पौरकार्याणि सर्वाणि करोति विनयान्वितः ॥ ६४ ॥
प्रातःकाळी उठून, स्नान क रून, श्रीराम मातापित्यांना प्रणाम करीत आणि नंतर नम्रतापूर्वक ते नगरवासी लोकांची सर्व कामे करीत. (६४)

बन्धुभिः सहितो नित्यं भुक्त्वा मुनिभिरन्वहम् ।
धर्मशास्त्ररहस्यानि शृणोति व्याकरोति च ॥ ६५ ॥
भावांसह भोजन झाल्यावर, ते नेहमी मुनिजनांकडून दररोज धर्मशास्त्रांचे मर्म ऐकत असत आणि स्वतःही त्यांचे स्पष्टीकरण करीत असत. (६५)

एवं परात्मा मनुजावतारो
    मनुष्यलोकाननुसृत्य सर्वम्
चक्रेऽविकारी परिणामहीनो
    विचार्यमाणे न करोति किञ्चित् ॥ ६६ ॥
अशा प्रकारे राग-द्वेष इत्यादी विकारांनी रहित तसेच षडविकारांनी रहित असे परमात्मा मनुष्यावतार धारण करून, मनुष्य लोकातील आचरणांचे अनुसरण करीत सर्व कार्ये करीत असत. परंतु विचार करून पाहिले तर ते परमात्मा काहीच करीत नसत. (६६)

इति श्रीमद् अध्यात्मरामयणे उमामहेश्वरसंवादे
बालकाण्डे तृतीयः सर्गः ॥ ३ ॥
तृतीयः सर्गः समाप्तः ॥ ३ ॥


GO TOP