॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय बावन्नावा ॥
हनुमंत – मकरध्वज भेट

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

अहिरावण – महिरावण यांच्याकडून वानरसैन्याची टेहळणी :

अहिरावण महिरावण । धराया रघुनंदन ।
करिते झाले विवंचन । सावधान अवधारा ॥ १ ॥
पाताळ सांडोनि त्वरित । जाले रणभूमीसीं प्राप्त ।
धरोनि न्यावया संधि पाहत । अहोरात्र सावध ॥ २ ॥

हनुमंताची प्रतिकारार्थ सिद्धता :

येरीकडे वानरभारीं । दळ सज्जी कपिकेसरी ।
सन्नद्धबद्ध द्रुमकरी । निजगजरीं हरिनामें ॥ ३ ॥
हनुमान वीर निजभक्त । रामभजनीं सावचित्त ।
करोनियां कुरवंडी जीवित । स्वामीस राखित अहर्निशीं ॥ ४ ॥
राक्षस मायावी निश्चितीं । युद्धीं पावले उपहती ।
धूर चोरिती अतर्क्यगती । म्हणोनि कपिपती राखित ॥ ५ ॥
न म्हणे वेळ अवेळ । दिवस रात्र अक्षर पळ ।
घटिका मुहूर्त काळवेळ । अचळ रामभजनीं ॥ ६ ॥
सर्व शरीर सर्वसंपत्ती । अंतर्बाह्य श्रीरामभक्ती ।
वेंचिली असे मारुतीं । साक्षेपस्थितीं अवधारा ॥ ७ ॥
एकलें मन श्रीरामभक्तीं । लावितांचि बाह्यवृत्ती ।
सहज अर्पिलें रघुपती । इंद्रियस्थिति श्रीराम ॥ ८ ॥
मनें वचनें कर्मस्थिती । राखिता झाला रघुपती ।
श्रोतीं अवधान द्यावें चित्तीं । कथासंगती सांगेन ॥ ९ ॥
मनें कवळोनियां ध्याना । मोकळूं न जाणे रघुनंदना ।
संकल्प विकल्प गमनागमना । रघुनंदनासरिसेंचि ॥ १० ॥
बुद्धिनिश्चयें जाण । सावधान रघुनंदन ।
राखिते झाले अनुदिन । क्षणें क्षण न विसंबे ॥ ११ ॥
चित्तचिंतनसमवेत । धरोनि राहिले रघुनाथ ।
अहर्निशीं राम राखित । सावचित्त सर्वदा ॥ २ ॥
निजभिमानी कपिपती । रामोहमस्मि निजवृत्ती ।
धरोनि राहिला रघुपती । अहोरातीं सावध ॥ १३ ॥
अंतःकरण व्यापक पाहीं । राम राखे सर्वां ठायीं ।
बालाग्रमात्र सवडी नाही । राखण पाहीं हनुमंत ॥ १४ ॥
अंतरी ऐसा हनुमंत । सर्वभावीं रघुनाथ ।
क्षणक्षणां सांभाळित । बाह्यव्रत अवधारा ॥ १५ ॥
दृष्टिविषय रघुनंदन । दृश्यमात्रीं भरला जाण ।
राखता झाला अनुदिन । अनुसंधान अखंड ॥ १६ ॥
श्रवणद्वारीं शब्दविषयो । अर्थावबोधें रामरावो ।
राखितसे महाबाहो । भक्तरावो हनुमंत ॥ १७ ॥
घ्राणद्वारें गंधावबोध । श्रीरामपरम मकरंद ।
श्वासोच्छ्वासीं परमानंद । अगाध बोध कपीचा ॥ १८ ॥
रसनारसें विषयस्थिती । श्रीराम स्वयें चिच्छक्ती ।
गोडियेमाजी रघुपती । वीर मारुति न विसंबे ॥ १९ ॥
त्वचा आलिंगितां स्पर्शी । उडवूनि शून्यत्व आकाशीं ।
मिठी घालोनि श्रीरामासी । चिदाकाशीं राखित ॥ २० ॥
वाचेनें शब्दव्युत्पत्ती । गांठ घातली रघुपती ।
बोलतां व्यवहार वदंती । राम मारुति न विसंबे ॥ २१ ॥
हस्ताची क्रियाशक्ती । क्रियामात्र रघुपती ।
घेतां देतां अर्थजाती । राम मारुति न विसंबे ॥ २२ ॥
चरणाचें गमनागमन । आचरणेंचि राम जाण ।
पाऊलही न पडे शून्य । रघुनंदनावांचोनी ॥ २३ ॥
लिंगाची स्वानंदरती । तंव ऊर्ध्वरेता मारुती ।
अखंडाननंद रघुपती । सहजस्थितीं राखित ॥ २४ ॥
गुदाचा स्वभाव क्षर । क्षरीं अक्षर रघुवीर ।
उडवोनि क्षराक्षर । राम कपींद्र राखत ॥ २५ ॥
राम प्राणाचा पाळक । कपि रामाचाही रक्षक ।
होवोनियां एकाएक । रघुकुळटिळक राखित ॥ २६ ॥
पुच्छदुर्ग करोनि कटका । द्वारमुखाचे अलोलिका ।
कर्णरंध्रीं निर्गम देखा । कपिनायक रचीतसे ॥ २७ ॥
उरलें पुच्छाचें जें अग्र । तें तळीं वरी निरंतर ।
भंवे जैसे विष्णुचक्र । अहोरात्र सावध ॥ २८ ॥
वारियासी रीघ नाहीं । तेथे राक्षसें बापुडीं कायी ।
भ्रमण करिती लवलाहीं । धुरा पाहीं चोरावया ॥ २९ ॥

अहिरावण – महिरावण यांचे चिंतायुक्त होऊन कुलदेवतेला आवाहन :

फेरे केले लक्षांत । तरी राम नोहे प्राप्त ।
भजनहीना रघुनाथ । नव्हे प्राप्त सर्वथा ॥ ३० ॥
बहुत झाले खेदक्षीण । प्राप्त नव्हे रघुनंदन ।
मग करुं आदरिलें स्तवन । कुळदेवता जाण कामाक्षी ॥ ३१ ॥
सकळ कामना संपूर्ण । स्मरतांचि करी आपण ।
म्हणवोनि तिसीं अभिधान । कामाक्षी जाण बोलती ॥ ३२ ॥
बुद्धीची बुद्धी आपण । परमात्मा रघुनंदन ।
राक्ष्सां वोळला संपूर्ण । मोक्षदान द्यावया ॥ ३३ ॥
जंव नुपजे तीव्र अवस्था । शरण न रिघवे रघुनाथा ।
तंव कैंची मोक्षवार्ता । दुःखावर्तामाजी पडिजे ॥ ३४ ॥
राक्षस दोघे चिंताक्रांत । राघव साधावया तळमळित ।
तें जाणोनि श्रीरघुनाथ । बुद्धि प्रेरीत ते ऐका ॥ ३५ ॥
मांडिलें कामाक्षीस्तवन । तिचा प्रकाशक रघुनंदन ।
शक्तिरुपें संतोषोन । झाला प्रसन्न राक्षसां ॥ ३६ ॥

हनुमंताला शेपटीचा वेढा काढण्याची श्रीरामांची आज्ञा :

राक्षसांची करुणा । न सहावेचि रघुनंदना ।
बोलावोनि कपिनंदना । मधुर वचना बोलत ॥ ३७ ॥
हनुमंता तुझेनि नामें । विघ्ने दिक्पुटीं लागावें ।
भयें माथें नुधवावें । निर्भय व्हावें चराचर ॥ ३८ ॥
ऐकतां कपिनामोच्चार । भेणें कांपती सुरासुर ।
येवढा ज्याचा नामनिर्धार । तो भेणें दळभार राखित ॥ ३९ ॥
ऐसी तुझी अपकीर्तीं । विस्तारेल त्रिजगतीं ।
ऐसें न करी मारुती । सांडीं निश्चितीं निजभय ॥ ४० ॥
काढीं पुच्छाचा पैं वेढा । करीं दारवंठा उघडा ।
स्वैर विचरुं दे माकडां । हुडाहुडां आल्हादें ॥ ४१ ॥
श्रीरामकटकीं अवरोध । हे गोष्टीचा असंबद्ध ।
क्षात्रधर्मा पावे बाध । माथां अपवाद बैसल ॥ ४२ ॥
देहभय दारुण । यत्‍न करावा जरी आपण ।
तरी सामर्थ्या आली नागवण । काळें वदन तयाचें ॥ ४३ ॥
देहभयें विषयसुख । सर्वथा प्राप्त नव्हे देख ।
अथवा नव्हे सांसारिक । परमार्थ देख तेथ कैंचा ॥ ४४ ॥
देहभयें साधन । सिद्ध न साधे गा जाण ।
देहभयें कर्माचरण । वृथा जाण जातसे ॥ ४५ ॥
देहभयें न साधे योग । देहभयें न साधे याग ।
देहभयें स्वर्गभोग । नव्हे सांग निजप्राप्ति ॥ ४६ ॥
देहभयें सकळ दुःख । अणुमात्र नव्हे सुख ।
आकल्प भोगावे नरक । दुःख अलोलिक देहसंगें ॥ ४७ ॥
तें देहभय आम्हांप्रतीं । असतां कैंची विरवृत्ती ।
सकळ धर्माची होय शांती । भयें निश्चितीं देहाच्या ॥ ४८ ॥
लोकापवाद बैसे माथां । देहभय रघुनाथा ।
ते चुकवावें हनुमंता । वेढा तत्वतां काढोनी ॥ ४९ ॥
ऐकोनियां रामवचन । हनुमान घाली लोटांगण ।
अगाधबोध रघुनंदन । आम्हां पामरां ज्ञान कैंचे ॥ ५० ॥
चरण वंदोनि तत्वतां । वेढा काढिला परता ।
कर जोडोनियां रघुनाथा । संमुखता राहिला ॥ ५१ ॥
सुग्रीवादि वानरभार । त्यांसी सांगे रघुवीर ।
सुखें निद्रा करा समग्र । भयमात्र धरुं नका ॥ ५२ ॥
लाहोनियां श्रीरामाज्ञा । वानर गेले निद्रास्थाना ।
लाज उपजली वायुनंदना । स्वयें विवंचना करीतसे ॥ ५३ ॥
श्रीराम सकळांसी राखिता । त्या सांभाळीतसें रघुनाथा ।
कोण अर्थाजीतसें ॥ ५४ ॥
श्रीराम राखे त्रैलोक्यासी । त्या मी राखितसें रामासी ।
काळिमा लागली ज्ञानासी । कर्मटवेषी यथार्थ ॥ ५५ ॥
अगाधबोध रघुनाथा । प्रबोधिली यथार्थ वार्ता ।
मज एवढी कोण चिंता । स्वस्थ आतां सुखें निजों ॥ ५६ ॥
ऐसें जाणोनि कपिकेसरीं । वेढा काढिला झडकरी ।
आपुलाले मेळिकारीं । सुखें वानरीं निद्रा केली ॥ ५७ ॥
जाणोनियां पुढील कायार्थ । निद्रा करी रघुनाथ ।
राक्षस वेगें आले तेथ । चोरोनि नेत रघुनाथा ॥ ५८ ॥


निशि निद्रां समापन्नौ दाशरथी जहर्तुभृशम् ।
कुणपाद्वायुके पाशे यथा पातालमासुरैः ॥१॥

निद्रिस्त रामलक्ष्मणांना राक्षस मध्यरात्री घेऊन जातात :

पडली गडधूप अंधारी । मध्यरात्रीं निशाचरीं ।
येवोनियां झडकरीं । केली चोरी धुरेची ॥ ५९ ॥
जैसे यमाचे यमपाश । न लक्षती कोणास ।
वेगें काढोनि प्राणास । नेती उदास निर्भय ॥ ६० ॥
सुहृदस्वजनांदेखतां । भूमीवरी सांडूनि प्रेता ।
प्राण हरी तत्वतां । कोणाही सर्वथा लक्षेना ॥ ६१ ॥
तैसें प्रेतरुप वानरां । सांडोनियां मेळिकारां ।
दोघां जणीं दोनी धुरा । पाताळद्वारा पळविल्या ॥ ६२ ॥
राम वानरांचें जीवन । राम वानरांचा जीवप्राण ।
रामेंवीण । प्रेतवत् जाण सकळिक ॥ ६३ ॥
जरी रामें प्रबोधिला । तरी न राहे उगला ।
घरटीकार । होवोनि वहिला । पाहे वेळोवेळां हनुमंत ॥ ६४ ॥

राम-लक्ष्मण नाहीसे झाल्यामुळे हनुमंताचे चिंतायुक्त होऊन प्रयाण :

आलगेचा आला जव फेरा । तंव न देखे दोनी धुरा ।
होवोनि अत्यंत घाबरा । पाहे सैरा कटकांत ॥ ६५ ॥
मळमूत्रासीं नाहीं गेला । वनविहारा नवचे वहिला ।
श्रीराम कोणीकडे गेला । वेडावला कपिनाथ ॥ ६६ ॥
युद्ध करितां भागला पूर्ण । गेला मेळिकार सोडून ।
केलें अयोध्येंसी गमन । वंचिलों पूर्ण श्रीरामें ॥ ६७ ॥
हेंही न घडे सर्वथा । तो न विसंबे शरणागता ।
दीन वानरां समस्तां । सांडी सर्वथा हें न घडे ॥ ६८ ॥
शरणागता कृपाळु । श्रीराम दीनदयाळ ।
एवढा ब्रीदाचा कल्लोळ । वानरमेळ सांडील कां ॥ ६९ ॥
बिभीषणा जाणवूं मात । आणि सुग्रीव वानरनाथ ।
गोष्टी फांकतां कटकाआंत । होईल आकांत सकळिकांसी ॥ ७० ॥
गोष्टी जाईल लंकेसीं । ठाउकें पडेल रावणासीं ।
धांवोनि येईल वेगेंसीं । अंत सकळांसी करील ॥ ७१ ॥
रावण बापुडें ते किती । त्यासी मारावया जुत्पती ।
एकएकाची अद्‍भुत शक्ती । करितील शांती रावणाची ॥ ७२ ॥
तथापि राजनीतिविचार । आच्छादावा समाचार ।
धुरेवरीच पडले चोर । जघन्ये थोर वीरवृत्ती ॥ ७३ ॥
ऐसें विचारोनि कपिनाथ । बिभीषणा सावध करित ।
आणि सुग्रीव वानरनाथ । वृत्तांत सांगत तयां दोघां ॥ ७४ ॥
येरां समस्तां कळों न देतां । पाहों लागले रघुनाथा ।
कोठें न देखती सर्वथा । तिघां अति चिंता वर्तली ॥ ७५ ॥
बिभीषण सांगे तयांसी । व्यर्थ जाणे न घडे रामासीं ।
कांही योजिलें कार्यासी । न पुसतां कोणासी मग गेला ॥ ७६ ॥
सर्वांगाचे दुर्ग करोनी । स्वमी राखतां अनुदिनीं ।
रामें हनुमंत निवारोनी । कार्यालागोनी स्वयें गेला ॥ ७७ ॥
आतां काय करणे विचार । म्हणोनि झाले चिंतातुर ।
तंव सरसावला कपीद्र । काय उत्तर बोलत ॥ ७८ ॥
तुम्ही सावध रहा येथें । कळों न द्यावें कोणातें ।
संरक्षावें सैन्यातें । अति सामार्थ्ये सावध ॥ ७९ ॥
मी जावोनि वेगेंसीं । झाडा घेईन त्रैलोक्यासीं ।
शोधोनि श्रीरामासी । अति वेगेंसीं आणिन ॥ ८० ॥
सप्त पाताळांची चवडी । उल्लंघीन न लागतां घडी ।
खचीत पर्वतांच्या दरडी । पृथ्वी रोकडी वाटीन ॥ ८१ ॥
एकवीस स्वर्गांच्या उतरंडी । पाडीन लागतां घडी ।
पीठ करोनि रोकडी । मिळवीन तांतडी अव्यक्तासीं ॥ ८२ ॥
मोडीन वैकुंठ कैलासासी । शीक लावीन महेशासी ।
अनुग्रहिलें रावणासी । उद्धत त्यासी करविलें ॥ ८३ ॥
रावण बापुडें तें किती । क्षणें नेईन भस्मांतीं ।
लंकेची करीन शांती । त्रिकूट निश्चितीं खचवीन ॥ ८४ ॥
शोधीन विवरेंविवर । उल्लंघीन गिरिकंदर ।
तुम्ही दळभार रहा समग्र । अहोरात्र सावध ॥ ८५ ॥
मात गुप्त करोनि सत्वर । भारीं राहवोनि समग्र ।
निघता झाला कपींद्र । अति सत्वर रामकार्या ॥ ८६ ॥
निघोनि कटकाबाहेरी । चिंताक्रांत कपिकेसरी ।
काय करुं गा श्रीहरी । बुद्धि झडकरी मज देईं ॥ ८७ ॥
तूं अनाथांचा नाथ । निजभक्तां संरक्षित ।
न विसंबसी शरणागत । तोही रणांत सांडिला ॥ ८८ ॥
शरणांगतां वज्रपंजर । ऐसा ब्रीदाचा बडिवार ।
वाढविला अपार । तो साचार करीं रामा ॥ ८९ ॥
उपेक्षिसी शरणांगतां । बोल लागेल निजव्रता ।
आणि विरुद्ध वेदशास्त्रार्था । दीन अनाथां सांडितां ॥ ९० ॥
ऐसी तीव्र चिंता करितां । कृपा उपजली रघुनाथा ।
गेला तात्वतां यक्षिणीवटा ॥ ९१ ॥

हनुमंताची आदिशक्तीला प्रार्थना :

यक्षिणीवटातळीं मारुती । स्तविता झाला आदिशक्ती ।
तुज गमन त्रिजगतीं । माझी विनंती परिसावी ॥ ९२ ॥
सांडोनि वानरभारा सकळा । रामसौ‍मित्र कोठें गेला ।
याचा समाचार वहिला । मज सांगितला पाहिजे ॥ ९३ ॥
तुम्ही पूर्वी मज प्रसन्न । म्हणोनि तुम्हासी आलों शरण ।
वेंगीं सांगा रघुनंदन । केउतें गमन केलेंसे ॥ ९४ ॥
मज वृत्तांत न सांगतां । क्षोभ वाटेल रघुनाथा ।
ऐसें जाणोनि सर्वथा । शुद्धि तत्वतां सांगावी ॥ ९५ ॥
ऐकोनि कपीचे उत्तरा । हडबडिली ते सुंदरा ।
त्यासी न सांगितल्या समाचारा । करील संहारा सर्वांसी ॥ ९६ ॥
अद्‍भुतशक्ति कपिनाथ । नाहीं कळिकाळासी भीत ।
नित्य रामनामें गर्जत । राम सेवीत सर्वदा ॥ ९७ ॥
आम्हीं न सांगताही वृत्त । कार्य साधील निश्चित ।
आपण यश घेतल्या येथ । श्रीरघुनाथ सुखावे ॥ ९८ ॥
आम्ही न सांगो जरी । कार्य साधील तो तरी ।
मारील राक्षसांच्या हारी । चराचरीं निजविजयी ॥ ९९ ॥
क्षोभ आलिया कपीसी । जीवें मारील सखळांसी ।
म्हणोनि पहिलेंचि कपीसी । समाचारासी जाणवूं ॥ १०० ॥
गोष्टी सांगों जरी स्पष्ट । समाचार होईल प्रकट ।
क्षोभोनियां रावण दुष्ट । करील सपाट सर्वांचें ॥ १ ॥

आदिमायेकडून गिधाडाच्याद्वारे हनुमंताला मार्गदर्शन :

काय करुं विचार । म्हणोनि झाली चिंतातुर ।
बुद्धि स्फुरली सत्वर । प्रकारांतर योजिलें ॥ २ ॥
गीध गीधी वृक्षावरी । बैसली असतां परस्परीं ।
पक्षिणीचे संचरोनि अंतरीं । कपिकेसरीतें वृत्त सांगे ॥ ३ ॥
गीधातें म्हणे गीधिनी । मज डोहळे होती मनीं ।
नरमांस पाहिजे भोजनीं । तें कोठोनी मेळविसी ॥ ४ ॥
तूं माझा प्राणपती । मी तुझी अर्धागशक्ती ।
झणें उदास होसी चित्तीं । डोहळे निश्चितीं पुरवावे ॥ ५ ॥
गीध म्हणे गीधीप्रती । त्वरा न करावी सर्वांथीं ।
अनायासें मांस प्राप्ती । तुज निश्चितीं होईल ॥ ६ ॥
अहिरावण महिरावण । सखे बंधु दोघे जण ।
चोरोनियां राम लक्ष्मण । नेले जाण पाताळा ॥ ७ ॥
त्यांच्या धांवण्यासी त्वरित । जावोनियां कपिनाथ ।
करील सकळांचा घात । मांस बहुत मिळेल ॥ ८ ॥

हनुमंताचे पाताळामध्ये गमन :

ऐसें बोलतां तिहीं दोघी । कपीनें ऐकिलें वेगीं ।
आनंद भरला सर्वांगी । गर्जे सवेग रामनामें ॥ ९ ॥
भूमी हाणोनि लात । विवर केलें अत्यद्‍भुत ।
गेला पाताळा हनुमंत । राक्षसनाथ जेथ असे ॥ ११० ॥
येरीकडे ते राक्षस । घेवोनि आले दोघांस ।
पुरले नवसिले नवस । जगदंबेस पूजित ॥ ११ ॥
पूजोपचारसामग्री । मेळविली बहुतांपरी ।
अति उल्लास राक्षसभारीं । निजगजरीं मांडिला ॥ १२ ॥
आतुर्बळी वानर । मार्ग काढील सत्वर ।
धांवण्या वेगत्तर । येईल कपींद्र पैं येथें ॥ १३ ॥
मग कांही न चले मत । युद्ध करील त्वरित ।
सोडवील रघुनाथ । शक्ति अद्‍भुत कपीची ॥ १४ ॥

राक्षसबंधु रामलक्ष्मणांना मकरध्वजाच्या बंदोवस्तामध्ये ठेवतात :

म्हणोनि नगरबाह्यप्रांतीं । राखणें ठेविली सभोंवतीं ।
मकरध्वज द्वाराप्रती । अद्‍भुतशक्ती राखण ॥ १५ ॥
चौदा सहस्र राक्षस । अद्‍भुतशक्ती दुर्धर्ष ।
द्वारीं सावध अनिमेष । मकरध्वजासमवेत ॥ १६ ॥
न लावितां पातया पातें । द्वार राखिती सावचित्तें ।
तंव हनुमान पावला तेथें । श्रीरामातें पहावया ॥ १७ ॥
कपिरुपें जातां भीतरीं । वळखी पडेल राक्षसभारीं ।
राम आच्छादोनि झडकरी । महामारीं उठतील ॥ १८ ॥
युद्धाचें भय नाहीं मज । परी न लाभे रघुराज ।
सिद्धी न पवे स्वामिकाज । ऐसी वोज नये करुं ॥ १९ ॥

साधुवेषामध्ये हनुमंताचे आगमन :

साधावया स्वामिकार्यासी । झाला तापसी तीर्थवासी ।
तापसवेषें राजद्वारासीं । भीतरीं जावयासी पैं आला ॥ १२० ॥
अत्यंत चतुर कपिपती । रामप्रभावें स्तविली शक्ती ।
माया प्रेरिली निश्चितीं । लागली सुषुप्ती सर्वांसी ॥ २१ ॥

मकरध्वजाचा हनुमंताला प्रश्न :

जो स्वामिकार्या सादर । त्यासीं नव्हे माया साचार ।
सावध मकरध्वज वीर । निरंतर स्वामिकाजीं ॥ २२ ॥
माध्यान्हीं निशीं वेशीपासीं । देखिला अवचितां तापसी ।
भीतरीं जातां वर्जिले त्यासी । जासी निशिं केउता ॥ २३ ॥
भिन्न असतां मध्यरात्र । कोठें जासी न पुसत ।
धरोनियां तापसव्रत । स्वेच्छा जात नगरांत ॥ २४ ॥
भिक्षुकाचा धर्म पाहीं । दिवसा अपराण्हसमयीं ।
गृहस्थ जेविल्या निजगृहीं । जावें तिहीं भिक्षेसी ॥ २५ ॥
यजमान सकळ तृप्त । घरींचा वैश्वानर शांत ।
भिक्षेसी काळ तोचि प्राप्त । यथोचित भिक्षुका ॥ २६ ॥
उचित काळ सांडोनियां जाण । अकाळीं करितां गमन ।
लागे स्वधर्मा दूषण । ऐसें आपण न करावें ॥ २७ ॥
तूं अकाळीं गमन करीसी । निजधर्मा बोल लाविसी ।
स्वामी क्षोभेल आम्हांसी । कोण निशीथीं विचरत ॥ २८ ॥
आणिकीं ठेवावें दूषण । तें आम्हीच करितों प्रार्थन ।
येथून परतावें आपण । करावे गमन स्वाश्रमा ॥ २९ ॥
ऐकोनि तयाचें बोलणें । तापस क्षोभला निजमनें ।
कांही धर्माधर्म नेणे । बैसविलें कोणें तुज येथें ॥ १३० ॥
आम्ही विरक्त तापसी । स्वेच्छें विचरूं अहर्निशी ।
कोठेही निर्बंध नाहीं आम्हासी । तूं कां वारिसी निजमूर्खा ॥ ३१ ॥
निवारितां साधूसी । स्वयें अधःपाता जासी ।
बोल आम्हांसी ठेविसी । व्यर्थ तापसीं शापिलें ॥ ३२ ॥
ऐकोनि त्याचें बोलणें । मकराक्ष क्षोभला मनें ।
अकाळीं स्वेच्छा विचरणें । हें साधुत्व कोणें शिकविलें ॥ ३३ ॥
जरी वांचविणें निजशरीर । तरी परतावें माघारा ।
मग होसील घाबिरा । धोत्रां वस्त्रां सांभाळीं ॥ ३४ ॥

हनुमंताचे व मकरध्वजाचे युद्ध :

ऐकोनि क्षोभें तापस बोले । तुज कां शाप देणें लागलें ।
थापा हाणोनि दोनी डोळे । पाडीन तत्काळ भूमीसीं ॥ ३५ ॥
येरु क्षोभला तत्क्षणीं । मिसळले युद्धा लागूनी ।
दोघे आले झोंटधरणी । निष्टुर वचनीं बोलती ॥ ३६ ॥
थापा हाणिती येरयेरां । गुडघे कोंपर परस्परां ।
बुकिया हाणिती सैरावैरा । दोहीं वीरा बळ सम ॥ ३७ ॥
परस्परें हाणिती थडका । परस्परें हाणिती झडका ।
परस्परें घालिती धडका । एकमेकां मेचेना ॥ ३८ ॥
युद्ध करितां दोघे जण । परस्परें खेदक्षीण ।
हनुमान विचारी आपण । हा कोण कैंचा पां येथें ॥ ३९ ॥
माझ्या घायाचेनि आघात । पीठ होताती पर्वत ।
अद्यापि वांचला जीवें जीत । कोण निश्चित पुसों पां ॥ १४० ॥
अरे कोण तूं काय आहेसी । माझ्या धायी वांचलासी ।
वेगीं सांग मजपासीं । यमापासीं अन्यथा धाडीन ॥ ४१ ॥

हनुमंताला मकरध्वजाचे आत्मकथन :

ऐकोनी त्याचें बोलणें । मकराक्ष क्षोभला निजमनें ।
काय बोलत प्रतिवचनें । सावधानें अवधारा ॥ ४२ ॥
युद्ध करितां भागलासी । काकुळती येवोनि पुससी ।
तरी ऐक यथार्थेसीं । मी तुजपासीं सांगेन ॥ ४३ ॥
सवेंचि बोले वचन । तुज सांगोनि कार्य सोण ।
जाया दिधलें जीवदान । सखें गमन करावें ॥ ४४ ॥
सुखरुप न करिसी गमन । तरी स्वर्गा तुज धाडीन ।
पुसतचि आहेसी तूं कोण । सावधान अवधारीं ॥ ४५ ॥
वायुसुत कपिराज । त्या हनुमंताचा आत्मज ।
माझें नांव मकरध्वज । बळ माझें पित्यासम ॥ ४६ ॥
अहिरावण महिरावण । हे सखे बंधु दोघेजण ।
तिहीं मज ठेविलें रक्षण । द्वारीं संपूर्ण आपुलिये ॥ ४७ ॥
त्यांचे कुळीं कुळस्वामिणी । कामाक्षी जाण यक्षिणी ।
तिसी बळिदानालागोनी । मानव दोनी आणिले ॥ ४८ ॥
त्यांच्या धांवण्यालागून । स्वर्गमृत्युलोकींहून ।
येईल कोणी धांवून । म्हणोन राखण ठेविलें ॥ ४९ ॥
आतां स्वस्ति असो तुजलागीं । सुखें जाय आले मार्गी ।
अन्यथा वृथा जाशी वेगीं । ग्रासभागीं यमाचे ॥ १५० ॥
ऐकोनि त्याचें उत्तर । क्रोधें झाला कालग्निरुद्र ।
नेत्र भवंडी गरगर । बोले कपींद्र तें ऐका ॥ ५१ ॥


रे रे वानर सावधानमनसा वार्ता क्षणं श्रूयतां
सोऽहं मारुत राघवस्य कृपया पत्‍नीभगं नेक्षितम् ।
मिथ्या जल्पसि वेषवानरतनुः कोणात्मजो लक्ष्यसे
एहि त्वं समरे निशाचरगणैः पुत्रांतकोऽहं किल ॥२॥

हनुमंताला आश्चर्य वाटते व तो वृत्तांत विचारतो :

हनुमान म्हणे तयासी । तूं राक्षस कपटवेषी ।
धरोनि वानरवेषासी । पुत्र म्हणविसी हनुम्याचा ॥ ५२ ॥
सांडोनि आपुला पिता । आणिकाचा पुत्र म्हणवितां ।
स्वयें जातोसी अधःपाता । लाज सर्वथा तुज नाहीं ॥ ५३ ॥
ज्याचा पुत्र म्हणविसी । तो हनुमान मी निश्चियेंसी ।
जन्मादारभ्य तुज आम्हांसी । भेटी कैसी न झाली ॥ ५४ ॥
कोणीं देखिलें न ऐकिलें । पुत्र म्हणविसी उगलें ।
लांछन पूर्वजां लाविलें । जोड जोडिलें अधःपाता ॥ ५५ ॥
श्रीरामकृपा मी हनुमंत । कौपीन लाधलों उदरस्थ ।
केव्हांही स्त्रीसंगाची मात । स्वप्नाआंतही न देखें ॥ ५६ ॥
जन्मादारभ्य पत्‍नीभोग । म्यां देखिलें नाहीं स्त्रीलिंग ।
कैंचा पुत्र झालासी सांग । मातेसीं डाग लाविला ॥ ५७ ॥
राक्षसाचा पुत्र होसी । आणि आणिकाचा म्हणविसी ।
जीवें नाहीं मारिलासी । करुणा भाकिसी अनिवार ॥ ५८ ॥
तूं पुत्र आणिकाचा असतां । पिता म्हणविसी हनुमंता ।
व्यभिचारी केली निजमाता । देईन प्रायश्चिता तुज आजी ॥ ५९ ॥
मी स्त्रीमात्रीं सहोदर । मज कैंचा स्त्रीपुत्र ।
सांडी परता कपटाचार । निगें सत्वर युद्धासी ॥ १६० ॥
राक्षसगणसमवेत । दावीं आपला पुरुषार्थ ।
पुत्रांतक मी हनुमंत । जाण निश्चित आलों असें ॥ ६१ ॥

मकरध्वजाच्या मातेचे पूर्वकथेचे सत्यकथन :

वचनें झाली संकोचता । मग पाचारिली निजमाता ।
पुसता झाला निजवृत्तांता । माझा पिता तो कोण ॥ ६२ ॥
मगरी म्हणे मकरध्वजा । नोळखिसी तूं पवनात्मजा ।
भ्रमलासी कवण्या काजा। ऐक वोजा सांगेन ॥ ६३ ॥
ब्रह्मचारी पवनपुत्र । त्यासी कैंचे स्त्रीपुत्र ।
तुझ्या उत्पत्तीचे चरित्र । ऐक सविस्तर सांगेन ॥ ६४ ॥
सीताशुद्धीलागीं मारुती । आला होता लंकेप्रती ।
तेथें केली महाख्याती । लंकापती अपमानिला ॥ ६५ ॥
पुच्छीं लावोनि आगी । उपरी धवलारांलागीं ।
दुर्गी लाविली आगी । हूडे सवेग खचविले ॥ ६६ ॥
जाळोनियां सकळ नगर । वेगीं आला समुद्रतीरा ।
विझवावया पुच्छाग्रा । मांडिली त्वरा सागरीं ॥ ६७ ॥
शरण आला समुद्र । तेणें विनविला कपींद्र ।
जळीं समग्र विझवितां पुच्छाग्र । जीव समग्र मरतील ॥ ६८ ॥
पुच्छ ठेवोनियां तीरीं । हळुच विझवीं लहरीं ।
ऐसें विनवितां सागरीं । वचन कपींद्रीं मानिलें ॥ ६९ ॥
पुच्छ तीरा ठेवून । लहरीं विझविलें सानसान ।
स्वेद सांडिला निपटून । तो आपण गिळीला ॥ १७० ॥
अमोघवीर्य वायुनंदन । त्याहीवरी रामभजन ।
स्वेदें झालें गर्भाधान । गर्भ संपूर्ण वाढला ॥ ७१ ॥
त्या गर्भास्तव पाहीं । तूं झालासी माझ्या हृदयीं ।
पित्या पुत्रा दोघांही । भाग्यें पाहीं भेट झाली ॥ ७२ ॥
तुम्हां दोघां वैरभावो । सर्वथा नसावा पहाहो ।
सांडून युद्धाचा अविर्भावो । महाबाहो आलिंगी ॥ ७३ ॥
ऐकोनि मातेचें वचन । मकराक्षें घातले लोटांगण ।
येरें दिधलें आलिंगन । समाधान दोघांसी ॥ ७४ ॥
एका जनार्दना शरण । झालें पिता पुत्रदर्शन ।
आतां वधूं अहिरावण । महिरावण समवेत ॥ ७५ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
हनुमंतकरध्वजदर्शनं नाम द्विपंचाशत्तमोऽध्यायः ॥ ५२ ॥
ओंव्या ॥ १७५ ॥ श्लोक ॥ २ ॥ एवं ॥ १७७ ॥


GO TOP