[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। एकोननवतितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
गङ्‌गामुत्तीर्य सेनासहितस्य भरतस्य भरद्वाजाश्रमे गमनम् -
भरतांचे सेनेसहित गंगा पार करून भरद्वाजांच्या आश्रमात जाणे -
व्युष्य रात्रिं तु तत्रैव गङ्‌गाकूले स राघवः ।
भरतः काल्यमुत्थाय शत्रुघ्नमिदं वचनमब्रवीत् ॥ १ ॥
शृङ्‌‍गवेरपुरांतच गंगेच्या तटावर रात्र घालवून राघव-भरत प्रातःकाळी उठले आणि शत्रुघ्नाला याप्रकारे म्हणाले - ॥१॥
शत्रुघ्नोत्तिष्ठ किं शेषे निषादाधिपतिं गुहम् ।
शीघ्रमानय भद्रं ते तारयिष्यति वाहिनीम् ॥ २ ॥
’शत्रुघ्ना ! उठ काय झोपून राहिला आहेस. तुझे कल्याण होवो. तू निषादराज गुहाला त्वरित बोलावून आण, तोच आम्हांला गंगेपार उतरवील’. ॥२॥
जागर्मि नाहं स्वपिमि तथैवार्यं विचिन्तयन् ।
इत्येवमब्रवीद् भ्रात्रा शत्रुघ्नो विप्रचोदितः ॥ ३ ॥
त्यांच्या कडून याप्रकारे प्रेरीत झाल्यावर शत्रुघ्नानी म्हटले- ’बंधो ! मीही आपल्या प्रमाणेच आर्य श्रीरामांचे चिंतन करीत जागत राहिलो आहे, झोपलो नाही.’ ॥३॥
इति संवदतोरेवमन्योन्यं नरसिंहयोः ।
आगम्य प्राञ्जलिः काले गुहो वचनमब्रवीत् ॥ ४ ॥
ते दोन्ही पुरूषसिंह जेव्हा याप्रकारे परस्परात बोलत राहिले होते, त्याच वेळी गुह उपयुक्त वेळी तेथे येऊन पोहोंचला आणि हात जोडून म्हणाला- ॥४॥
कच्चित् सुखं नदीतीरेऽवात्सीः काकुत्स्थ शर्वरीम् ।
कच्चिच्च सहसैन्यस्य तव नित्यमनामयम् ॥ ५ ॥
’काकुस्थ भरता ! या नदीच्या तटावर आपण रात्री सुखाने राहिला आहात ना ? सेनेसहित आपल्याला येथे काही कष्ट तर झाले नाहीत ना ? आपण सर्वथा निरोगी आहात ना ?’ ॥५॥
गुहस्य तत् तु वचनं श्रुत्वा स्नेहादुदीरितम् ।
रामस्यानुवशो वाक्यं भरतोऽपीदमब्रवीत् ॥ ६ ॥
गुहाने स्नेहपूर्वक बोललेले हे वचन ऐकून श्रीरामांच्या अधीन राहाणार्‍या भरताने असे म्हटले - ॥६॥
सुखा नः शर्वरी धीमन् पूजिताश्चापि ते वयम् ।
गङ्‌गां तु नौभिर्बह्वीभिर्दाशाः संतारयन्तु नः ॥ ७ ॥
’बुद्धिमान निषादराज ! आम्हा सर्व लोकांची रात्र फार सुखात गेली आहे. तुम्ही आमचा मोठा सत्कार केला आहे. आता अशी व्यवस्था करा की तुमचे नावाडी अनेक नौकांच्या द्वारे आम्हांला गंगेच्या पार नेऊन उतरवतील. ॥७॥
ततो गुहः संत्वरितं श्रुत्वा भरतशासनम् ।
प्रतिप्रविश्य नगरं तं ज्ञातिजनमब्रवीत् ॥ ८ ॥
भरताचा हा आदेश ऐकून गुह तात्काळ आपल्या नगरात गेला आणि बंधु-बांधवांना म्हणाला- ॥८॥
उत्तिष्ठत प्रबुध्यध्वं भद्रमस्तु हि वः सदा ।
नावः समुपकर्षध्वं तारयिष्यामि वाहिनीम् ॥ ९ ॥
’उठा, जागे व्हा. सदा तुमचे कल्याण होवो ! नौकांना खेचून घाटावर घेऊन या. भरतांच्या सेनेला गंगेच्या पार उतरवूया.’ ॥९॥
ते तथोक्ताः समुत्थाय त्वरिता राजशासनात् ।
पञ्च नावां शतान्येव समानिन्युः समन्ततः ॥ १० ॥
गुहाने याप्रकारे सांगितल्यावर आपल्या राजाच्या आज्ञेने सर्व नावाडी तात्काळ उठून उभे राहिले आणि चारी बाजूनी पांचशे नौका एकत्रित करून घेऊन आले. ॥१०॥
अन्याः स्वस्तिकविज्ञेया महाघण्टाधरावराः ।
शोभमानाः पताकिन्यो युक्तवाताः सुसंहताः ॥ ११ ॥
या सर्वाच्या अतिरिक्त काही स्वस्तिक नामाने प्रसिद्ध नौकाही होत्या, ज्या स्वस्तिकाच्या चिन्हांनी अलंकृत होण्यामुळे त्याच चिन्हांनी ओळखल्या जात होत्या. त्यांच्यावर ज्या पताका फडकत होत्या, त्यांच्यामघ्ये मोठमोठ्या घण्टा लटकत होत्या. सोन्याच्या बनविलेल्या चित्रांनी त्या नौका विशेष शोभून दिसत होत्या. त्यांत नौका वल्हविण्यासाठी अनेक वल्ही ठेवलेली होती. तसेच चतुर नाविक त्यांना चालविण्यासाठी तैयार होऊन बसले होते. त्या सर्व नौका अत्यंत मजबूत बनविलेल्या होत्या. ॥११॥
ततः स्वस्तिकविज्ञेयां पाण्डुकम्बलसंवृताम् ।
सनन्दिघोषां कल्याणीं गुहो नावमुपाहरत् ॥ १२ ॥
त्यांच्या पैकी एक कल्याणमयी नाव गुह स्वतः घेऊन आला, ज्यात श्वेत गालिचे होते त्या स्वास्तिक नामक नौकेवर माङ्‌‍गलिक शब्द होत होता. ॥१२॥
तामारुरोह भरतः शत्रुघ्नश्च महाबलः ।
कौसल्या च सुमित्रा च याश्चान्या राजयोषितः । ॥ १३ ॥

पुरोहितश्च तत् पूर्वं गुरवो ब्राह्मणाश्च ये ।
अनन्तरं राजदारास्तथैव शकटापणाः ॥ १४ ॥
त्यावर सर्वात प्रथम पुरोहित, गुरू आणि ब्राह्मण बसले. त्यानंतर तिच्यावर भरत, महाबली शत्रुघ्न, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी तसेच राजा दशरथांच्या इतर ज्या राण्या होत्या त्याही आरूढ झाल्या. त्यानंतर राजपरिवारांतील इतर स्त्रिया बसल्या. गाड्या आणि क्रय-विक्रयाची (अन्नादि निर्वाहासाठी लागणारी) सामग्री इतर बर्‍याच नौकेवर लादली गेली. ॥१३-१४॥
आवासमादीपयतां तीर्थं चाप्यवगाहताम् ।
भाण्डानि चाददानानां घोषस्तु दिवमस्पृशत् ॥ १५ ॥
काही सैनिक मोठमोठ्या मशाली पेटवून आपल्या राहुट्यात विखुरलेल्या वस्तु एकत्रित करू लागले. काही लोक भराभर घाटावर उतरू लागले आणि बरेचसे सैनिक आपले आपले सामान ’हे माझे आहे, हे माझे आहे’ अशा प्रकारे ओळखून उचलून घेऊ लागले. त्या समयी महान कोलाहल माजला, तो आकाशात गुंजत राहिला. ॥१५॥
पताकिन्यस्तु ता नावः स्वयं दाशैरधिष्ठिताः ।
वहन्त्यो जनमारूढं तदा सम्पेतुराशुगाः ॥ १६ ॥
[ श्लोकाच्या सुरुवातीस ’आवासं आदीपयताम्’ असा शब्द आला आहे. याचा अर्थ काही टीकाकारांनी असा दिला आहे की ’ते आपल्या आवासस्थानांना आग लावू लागले’ आवश्यक वस्तु लादून नेल्यावर ज्या मामूली राहुट्या आदि व इतर् नगणाय वस्तु शिल्लक राहातात त्यांस छावणी उठवितांना आग लावणे हा सेनेचा धर्म सांगितला गेला आहे. यात दोन रहस्ये आहेत - कुणा शत्रुपक्षीय व्यक्तिसाठी आपल्या खुणा न ठेवणे - ही सैनिक नीति आहे. दुसरे रहस्य हे आहे की याप्रकारे आग लावून जाण्याने विजयलक्ष्मीची प्राप्ति होते - असा त्यांचा परंपरागत विश्वास आहे.]
त्या सर्व नौकांच्या वर पताका फडकत होत्या. सर्वांवर नौका वल्हविणारे काही नावाडी बसलेले होते. त्या सर्व नौका त्या समयी त्यांच्यावर चढलेल्या सर्व लोकांना तीव्रगतीने पार नेऊ लागल्या. ॥१६॥
नारीणामभिपूर्णास्तु काश्चित् काश्चित् तु वाजिनाम् ।
काश्चित् तत्र वहन्ति स्म यानयुग्यं महाधनम् ॥ १७ ॥
कित्येक नौका केवळ स्त्रियांनी भरलेल्या होत्या, कांही नावावर घोडे होते, तसेच काही नौका गाड्या, त्याला जोडले जाणारे घोडे, खेचरे, बैल आदि वाहने, तसेच बहुमूल्य रत्‍ने आदिना वाहून नेत होत्या. ॥१७॥
तास्तु गत्वा परं तीरमवरोप्य च तं जनम् ।
निवृत्ताः काण्डचित्राणि क्रियन्ते दाशबन्धुभिः ॥ १८ ॥
त्या नावा दुसर्‍या तटावर पोहोंचून लोकांना उतरवून जेव्हा परत येऊ लागल्या तेव्हा नाविक बंधु जलामध्ये त्यांच्या विचित्र गतींचे प्रदर्शन करू लागले. ॥१८॥
सवैजयन्तास्तु गजा गजारोहैः प्रचोदिताः ।
तरन्तः स्म प्रकाशन्ते सध्वजा इव पर्वताः ॥ १९ ॥
वैजयंती पताकांनी सुशोभित झालेले हत्ती माहुतांच्या द्वारा प्रेरित होऊन स्वतःच नदी पार करु लागले, त्यावेळी ते पंखधारी पर्वताप्रमाणे प्रतीत होत होते. ॥१९॥
नावश्चारुरुहस्त्वन्ये प्लवैस्तेरुस्तथापरे ।
अन्ये कुम्भघटैस्तेरुरन्ये तेरुश्च बाहुभिः ॥ २० ॥
कित्येक लोक नावेवर बसले होते आणि कित्येक कळकाच्या आणि गवतांपासून बनविलेल्या तराफ्यावर स्वार झाले होते. काही लोक मोठ मोठे कलश, काही छोटे घडे यांच्या सहाय्याने तर कांही आपल्या बाहुंनी पोहून नदीच्या पार जात होते. ॥२०॥
सा पुण्या ध्वजिनी गङ्‌गां दाशैः संतारिता स्वयम् ।
मैत्रे मुहूर्त्ते प्रययौ प्रयागवनमुत्तमम् ॥ २१ ॥
याप्रकारे नावाड्यांच्या मदतीने ती सारी पवित्र सेना गंगेच्या पार उतरविली गेली. नंतर ती सेना स्वतः ’मैत्र’ नामक मुहूर्तावर उत्तम प्रयागवनाकडे प्रस्थित झाली. ॥२१॥
आश्वासयित्वा च चमूं महात्मा
    निवेशयित्वा च यथोपजोषम् ।
द्रष्टुं भरद्वाजमृषिप्रवर्य-
    मृत्विक्सदस्यैर्भरतः प्रतस्थे ॥ २२ ॥
तेथे पोहोंचून महात्मा भरतांनी सेनेला सुखपूर्वक विश्राम करण्याची आज्ञा देऊन तिला प्रयागवनात उतरविले आणि स्वतः ऋत्विज, तसेच राजसभेचे सदस्य यांच्या बरोबर ऋषिश्रेष्ठ भरद्वांजाचे दर्शन घेण्यासाठी गेले. ॥२२॥
स ब्राह्मणस्याश्रममभ्युपेत्य
    महात्मनो देवपुरोहितस्य ।
ददर्श रम्योटजवृक्षदेशं
    महद्वनं विप्रवरस्य रम्यम् ॥ २३ ॥
देवपुरोहित महात्मा ब्राह्मण भरद्वाज मुनिंच्या आश्रमावर पोहोंचून भरतांनी त्या विप्रशिरोमणींच्या रमणीय आणि विशाल वनास पाहिले, जे मनोहर पर्णशालांनी आणि वृक्षवल्लींनी सुशोभित होते. (वृक्षांच्या रांगांनी सुशोभित होते). ॥२३॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे एकोननवतितमः सर्गः ॥ ८९ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा एकोणनव्वदावा सर्ग पूरा झाला. ॥८९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP