॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥


॥ श्रीभावार्थरामायण ॥


युद्धकांड


॥ अध्याय नव्वदावा ॥
बिभीषणाचे लंकेला प्रयाण -


॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रामांनी बिभीषणाला लंकेत जाण्यास सांगितले :


तदुपरी दुसरे दिवशीं । सारोनिया नित्यकर्मासी ।
बैसोनि अंतरसभेसी । बिभीषणासी बोलाविले ॥ १ ॥
सीता आणि त्रिवर्गबंधु । उभे राहिले अति स्तब्धु ।
मग मांडिला उब्दोधु । बिभीषणालागूनी ॥ २ ॥
बिभीषणासी म्हणे श्रीरघुपती । मज कळली तुझी मनोवृत्ती ।
आतां असावें अयोध्येप्रती । माझ्या स्नेहा लागोनियां ॥ ३ ॥


वचन पाळण्याची परंपरा :


तरी लौकिकीं माझी वार्ता । लंका दिधली शरणागता ।
ते हिरोनि सलोभता । बिभीषण अयोध्ये ठेविला ॥ ४ ॥
तरी हें थोर जधन्य । सूर्यवंशा येईन ऊन ।
स्वगी हरिश्चंद्रादि आपण । अधःपतन पावतील ॥ ५ ॥
म्हणोनि वचनाकरणें । पूर्वजीं प्राणांत करणें ।
परी अन्यथा होऊं न देणें । वचन आपुलें सर्वथा ॥ ६ ॥
यालागीं म्यां आपण । सोसिलें कष्ट दारुण ।
चौदा वर्षे वनप्रयाण । तिघीं आम्हीं भोगिलें ॥ ७ ॥
आतांही तैसेचि घडेल । परी वचन अन्यथा न होईल ।
स्वयें ब्रह्मांडही खचेल । तरी अन्यथा करूं न शके ॥ ८ ॥
याचिलागीं पै जाण । स्वयें शंकरे आपण ।
करोनियां कोप शमन । त्रैलोक्य जाण रक्षिलें ॥ ९ ॥
लंकेश म्हणे श्रीरामासी । कैसें घडलें न कळे मजसीं ।
कृपा करोनि विस्तारेंसीं । मज प्रीतीसीं सांगिजे ॥ १० ॥


केवळ तुझ्याकरिता मी त्रैलोक्याचे रक्षण केले असे श्रीराम बिभीषणाला सांगतात :


श्रीराम म्हणे रावणवधांती । माझ्या कोपे जळेल त्रिजगती ।
तंव देव येवोनि काकुळती । श्रीउमापति प्रार्थिला ॥ ११ ॥
तेणें येवोनि ते अवसरीं । स्तवोनि कोपातें आंवरी ।
ते वेळी लक्ष्मण चरण धरी । म्हणे आठवी वचन आपुलें ॥ १२ ॥
स्वामीनें शरणागता । लंकाराज्य दिधलें तत्वतां ।
तें होऊं पाहे अन्यथा । विश्वप्रळयीं निमाल्या ॥ १३ ॥
मग कैंची लंका कैंचा बिभीषण । देवांसी मग रक्षील कोण ।
कृपाब्धि हें वचन । सांग कैसैनि उरेल ॥ १४ ॥
याचि वचना- साठीं । तुजनिमित्तें ब्रह्मसृष्टी ।
हे जाणोनि राक्षसकिरीटीट्ट । लंकागमन करावें ॥ १५ ॥


रामाज्ञेप्रमाणे बिभीषण लंकेला परत जाण्यास तयार होताच
रामांनी विश्वकर्म्याला पूर्वीसारखीच लंका सुंदर करण्यास आज्ञा केली :


बिभीषण म्हणे श्रीरामासी । आला वंदोनियां शिसीं ।
मी जाईन लंकेसी । प्रयाणवचनासी स्वामीचिया ॥ १६ ॥
ऐकोनि श्रीराम संतोषला । स्नेहेंकरोनि उचंबळला ।
बिभीषण पोटेंसीं धरिला । परम भक्त म्हणोनी ॥ १७ ॥
करोनि विश्वकर्म्याचें स्मरण । येरू पातला धरी चरण ।
श्रीराम म्हणे लंकेशालागून । करीं उपवनें पूर्विल्याऐसीं ॥ १८ ॥
त्रैलोक्याची संपत्ती । आणोनि ठेवीं लंकेप्रती ।
सांप्रत उद्वस जाहली होती । तें करी पुन्हां यथास्थित ॥ १९ ॥
दुर्गां करोनि उभवणी । रत्‍नखचित करीं सुवर्णी ।
हार्ट बिदिया चौबारांनीं । शोभायमान अपूर्व ॥ २० ॥
राजमदिरें सर्व । प्रधानादि गृहें अपूर्व ।
पूर्विल्याहूनि गौरव । शोभावैभव अति रम्य ॥ २१ ॥
अशोकवन करीं बरवें । पुष्पकविमान निर्मावें ।
मागेल तें पुरवाचे । बिभिषणालागूनी ॥ २२ ॥
सुवेळेपुढें रणांगण । रावणासहित रक्षोगण ।
यांचें झालें पूर्ण कंदन । रक्तमांस धरेवरी ॥ २३ ॥
अस्थींचे झाले डोंगर । वनें झालीं बीभत्साकार ।
तीं करावीं मनोहर । जैसी पूर्वी होती तैसी ॥ २४ ॥


बिभीषणाला सर्वतोपरी साहाय्य करण्याची सर्वांना रामांची आज्ञा :


बोलावोनी लोकपाळांसी । तुम्हीं सख्य करावें बिभीषणासीं ।
रावणाघरीं संपत्ती जैसी । त्याहून विशेषीं पुरवाची ॥ २५ ॥
बोलावोनि अष्टमहासिद्धी । तुम्हीं साह्य व्हावें बिभीषणा आधीं ।
तुम्हासी सांगतों सद्‌बुद्धी । स्वहित सिद्ध करावें ॥ २६ ॥
सवेंचि पाचारिले ऋषिगण । तुम्हीं आशीर्वाद द्यावा संपूर्ण ।
निकुंभिळेसी करील होम जाण । तो सिद्धी पावावा ॥ २७ ॥
गणपति दुर्गा क्षेत्रपाळासी । श्रीराम सांगे आदरेंसीं ।
मनोरथ पुरवावे बिभीषणासीं । कल्पतरुकामधेनूसीं समृद्धि ॥ २८ ॥
प्रार्थोनियां ब्रह्मदेवासी । तुम्ही कल्पावें राक्षसांसी ।
पुत्रसुहृदयसंबंधासी । पूर्विल्यापेक्षांही करावें ॥ २९ ॥
रथ गज वाजी अनेक । चतुरंगसेना सकळिक ।
नाना वाद्ये अलोलिक । लंकेशातें पुरवावी ॥ ३० ॥
धन धान्य खिल्लारे वस्त्रें । उत्तम वास परिकरें ।
तांबूलसुगंधादि सह परिवारें । बिभीषणासी पुरवावी ॥ ३१ ॥


जग सुखी करावे असा बिभीषणाला रामांचा उपदेश :


रावण गेलियानंतर । उणे न दिसावे अणुमात्र ।
सुख द्यावें सर्वत्र । लंकापुरवासियां ॥ ३२ ॥
श्रीराम म्हणे बिभीषणासी । रावणें पीडिलें त्रैलोक्यासी ।
तैसे न करावें विश्वासी । करीं जगासी सुखरूप ॥ ३३ ॥
हिंसा न करावी सर्वथा । विधिप्राप्त यज्ञ करीं तत्वतां ।
मानोनियां शास्त्रसंमता । साचारता वर्तावें ॥ ३४ ॥
करोनि श्रीशंकरार्चन । देवीचें करावें पूजन ।
स्मरोनियां नारायण । नित्यावर्ती जाण वर्तावें ॥ ३५ ॥
तुज म्हणती राक्षसजाती । परी तुझी नव्हे तैसी मती ।
जाणोनि माझी प्रकृती । तैसी वर्तणूक करावी ॥ ३६ ॥
न करीं अभिचारी कर्म । नाचरावे दुष्ट धर्म ।
उचित काळ राजधर्म । नित्यावर्ती वर्तावें ॥ ३७ ॥


श्रीरामाचे वरदान :


राज्यीं न घडे अभिचार । अल्पायुषी नव्हती नारी नर ।
धन्य होती समग्र । मदनुग्रहेंकरोनी ॥ ३८ ॥
उदार होई सर्वशक्तीं । शरण आलिया रक्षी निश्चिती ।
समरांगणीं शौर्यवृत्ती । हें हो तुजप्रती असो दे ॥ ३९ ॥
चौदा विद्या चौसष्ट कळा । ज्ञान व्हावें राक्षसपाळा ।
हेंही पावसी आता स्वलीळा । ममाज्ञा करोनियां ॥ ४० ॥
करोनि सकळांसी प्रार्थना । पाठविलें स्वस्थाना ।
देवोनि मंत्रबीजखुणा । सर्व शक्ति जाणा दीधल्या ॥ ४१ ॥


लंकेतील आचरण कसे असावे ते श्रीराम सांगतात :


मागुती म्हणे बिभीषणासी । प्रतिवर्षी भरवीं यात्रेसी ।
करोनियां महोत्साहासी । माझे स्थानासी पूजावें ॥ ४२ ॥
प्रति इंदुवारी आपण । घ्यावें रामेश्वरदर्शन ।
पूजा करोनि संपूर्ण । माझें ध्यान करावें ॥ ४३ ॥
ऐसा नानापरींच्या युक्ती । शिकवोनि लंकापती ।
पुढती सांगे अतिनिगुती । स्वात्महितीं रघुवीर ॥ ४४ ॥
रावणाचिये घरीं । तुवां रहावे निर्धारी ।
स्वपुत्र ठेवावा गृहाभीतरीं । यौवराज्य देवोनियां ॥ ४५ ॥
उर्वरित३ रावणाचिया अंतुरी । त्या ठेवाव्या इंद्रजिताचे घरीं ।
सर्वस्व सांभाळावे बरवेपरी । आपुल्या अपत्यासमान ॥ ४६ ॥
शुद्ध करोनि कुंभकर्णमदिर । तेथें ठेवावे माझे चाप शर ।
त्यांची पूजा करोनि परिकर । नित्य कर्तिनगजर करावा ॥ ४७ ॥
शतकोटी रामायण । करावें हे नित्य श्रवण ।
आपण करोनि माझें मूर्तिपूजन । विश्व लावावे स्वधर्मा ॥ ४८ ॥
करावे षडक्षरपुरश्चरण । भूतशुद्धि प्राणप्रतिष्ठा करून ।
केशवादि मातृका संपूर्ण । दशविध न्यास करावे ॥ ४९ ॥
तें बोलिलें अगस्तिसंहितेसीं । आणि अथर्वण उत्तरतापिनासीं ।
करोनियां यंत्रोद्धारासी । ममार्चनासी करावें ॥ ५० ॥
सिद्धियुक्त चातुर्मास्थादि व्रत । तें बोलिलें वराहसंमत ।
शयनी बोधिनी व्रतत्रय व्रत । विप्रदीक्षा प्रकटावी ॥ ५१ ॥
न करावी निंदा कोणाची । स्तुति येऊं नेदीं इच्छेची ।
वार्ता नाणीं परांगनेची । स्वप्नीं मातें न विसरावे ॥ ५२ ॥


बिभीषणाला द्वीपे, रथ, हत्ती दिले :


श्रीरामें धरोनियां पोटेंसीं । बैसविला आपणांपासीं ।
पाचारोनि शुक्रासी । मग मुहुर्तासी पूसिलें ॥ ५३ ॥
येरू म्हणे सुनिश्चित । उदयिक आहे सुमुहूर्त ।
साधोनियां अभिजित । भोजनयुक्त धाडावा ॥ ५४ ॥
याउपरी श्रीरामें । प्रधान बोलविले अनुक्रमें ।
लंकेसमीप द्वीपें उत्तमें । बिभीषणालागीं दीधलीं ॥ ५५ ॥
शत रथ सहस्र हस्ती । तुरंग उत्तम सालंकृती ।
लंकेशासी विधियुक्ती । अति प्रीतीं दीधले ॥ ५६ ॥


श्रीरामांनी जानकीकडून बिभीषणपत्‍नीची पूजा करवून दोघांची लंकेला पाठवणी केली :


जानकीस पाचारोनि रघुनंदन । कानीं सांगोनि वचन ।
पूजा करोनि संपूर्ण । बिभीषणपत्‍नी पाठवावी ॥ ५७ ॥
आज्ञा वंदोनि शिरीं । पूजा करोनि यथोपचारीं ।
वस्त्रालंकारपरिकरीं । शिबिकारूढ पाठविली ॥ ५८ ॥
ऐसे रीतीं रघुपती । सिद्ध करोनि लंकापती ।
सवें देवोनि प्रधान सुमती । लंकेप्रती गमन करावी ॥ ५९ ॥
येरीकडे विश्वकर्मा आपण । करोनि लंकेसी गमन ।
आज्ञेप्रमाणें रचोनि पूर्ण । श्रीरामचरण वंदिले ॥ ६० ॥
आज्ञेप्रमाणें आपण । ब्रह्मा रची सृष्टि संपूर्ण ।
लोकभरोनि विविधजन । अष्टादशवर्ण नांदवी ॥ ६१ ॥
तैसेचि येती सकळ । समृद्ध करोनि लंकामंडळ ।
वंदोनियां भूपाळ । स्वस्थानासी निघाले ॥ ६२ ॥


ऋषींना बिभीषणाला राज्याभिषेक करण्याची विनंती :


पाचोरोनि सकळ ऋषी । अति नम्रत्वें बोले तयांसी ।
तुम्हीं जावोनि लंकेसी । बिभीषणासी स्थापावें ॥ ६३ ॥
माझा बिभीषण आपण । तें माझें निजस्थान ।
अग्रगणी वैष्णव पूर्ण । मी तयाधीन सर्वस्वें ॥ ६४ ॥
ऐसे राहविले एक मास । प्रत्यहीं आदराचा विलास ।
आनंदें करोनि समरस । परस्परें स्नेहेंकरोनी ॥ ६५ ॥


नित्योत्सव :


प्रातःकाळी श्रीरामचरण । देखती डोळेभरी पूर्ण ।
मध्यान्हीं करोनि शरयूस्नान । पंक्ती भोजन यथारुचि ॥ ६६ ॥
सायंकाळी रघुनंदन । देखतां आनंदें नीराजन ।
भाट गर्जती संपूर्ण । श्रीरामगुण वाखाणिती ॥ ६७ ॥
प्राप्त झालिया निशी । यथाविधि सुमनचंदनासीं ।
शय्याविधीची उपमा कैसी । ब्रह्मसदनासीं समानत्वें ॥ ६८ ॥
एके दिवशी वनक्रीडेसी । जाऊनि करिती सहपरिवारेंसीं ।
तैसेंचि राजगृहीं संपभ्रमेंसीं । अति आनंदेंसी भोगिती ॥ ६९ ॥
सवेंचि येती गोपुरासी । मग पाहती गजयुद्धासी ।
रचून सकळ संन्यासी । निशी अग्नियंत्रासी दाविती ॥ ७० ॥
राजगृहीं तांबूलसन्मान । मग पावती आपुलें स्थान ।
भोग भोगिती संपूर्ण । जे रघुनंदन निर्मिले ॥ ७१ ॥
गंधर्व येती घरासी । नानापरी दाविती कर्मासी ।
लाहोनि यथोचितासी । मग सेजेसी पहुडती ॥ ७२ ॥
तेथें येवोनि उर्वशीचे शत । सेवेलागीं तिष्ठत ।
परी त्यांचें मन नव्हेचि कामासक्त । कीं हरिभक्त म्हणोनी ॥ ७३ ॥
ऐसा करितां गदारोळ । आनंदें भरिला भूगोळ ।
कीर्ती स्कूटों पाहे दिङ्‌मंडळ । राम रायाचेनि धर्मे ॥ ७४ ॥
सुखरत सर्व अहोरात्र । काळ पळे झोकोनि नेत्र ।
इतराचा लेखा किंमात्र । श्रीरामराज्य करितां स्वामी ॥ ७५ ॥
देव येवोनि तेहतीस कोडी । करीं धरोनि कुरवंडी ।
गावोनि सांडिती रामरायाची प्रौढी । मग ओवाळोनि सांडिती ॥ ७६ ॥
होतो अरुणोदय प्राप्त । स्तुतिवादें बोधिती श्रीरघुनाथ ।
प्रतिपाळीं विश्व समस्त । प्रातर्बोध करिते झाले ॥ ७७ ॥
मग उठोनि सकळांसी । शौचविधी यथान्वयेंसीं ।
घालोनियां मृद्रासनासी । मूर्ति ध्यानासी अणिती ॥ ७८ ॥
येवोनि सकळ जन । घेती श्रीरामदर्शन ।
मग करोनि शरयूस्नान । संध्याहोम संपादिती ॥ ७९ ॥
करोनि देवतार्चन । घेवोनि वस्त्रें भूषण ।
परस्परें अर्पोनि सुमन चंदन । राजद्वारा जाण स्वयें येती ॥ ८० ॥
काय वानूं हाटवटिया । जाणों मूर्तिमंत निधी ठेलिया ।
किंवा वोळंगणे आलिया । सकळ संपत्ती समवेत ॥ ८१ ॥
अंतरसभा विसर्जून । बाहेरी आला रघुनंदन ।
तंव वानिती बंदिजन । अति पुरुषार्थ चार ते ॥ ८२ ॥
ऐसा नित्यानित्य उत्साव । करिता झाला रामराव ।
आनंदाचा गौरव । ब्रह्मादिकां दुर्लभ ॥ ८३ ॥
यापरी बिभीषण एकांतीं । प्रबोधोनि बहुतां युक्ती ।
आणोनि कौसल्येप्रती । चरणावरी घातला ॥ ८४ ॥


बिभीषणाचे कौसल्यादि मातांना वंदन व मातांचे त्याला आशीर्वाद :


माता म्हणे बिभीषणासी । तूं माझा रामाचा सखा होसी ।
मग देवोनि आशीर्वचनासी । सुमित्रे कैकयीसी भेटविला ॥ ८५ ॥
सात शतें माता समस्त । डोळा पाहती सुग्रीव लंकानाथ ।
सकळासहित हनुमंत । त्रिजगतींत तत्सम असेना ॥ ८६ ॥
चौघी सुना येवोनि ते वेळीं । पाहती बिभीषण वानरमंडळी ।
हाडपियां करीं तांबोली । देवोनियां धाडिले ॥ ८७ ॥
सभेसी येती ऋषिगण । देवोनि वेदोक्त आशीर्वचन ।
येरी देवोनि सन्मान । समीप जाण बैसविले ॥ ८८ ॥


रावणवधाचे प्रायश्चित कोणते घ्यावे असा रामांचा ऋषींना प्रश्न :


श्रीराम पुसे तयांसी । विनंती आहे मानसीं ।
मज सांगावें निश्चयेंसीं । धर्मनीतीसी अनुकूल ॥ ८९ ॥
आम्हीं मारिला रावण । तरी हें तंव देवकार्य जाण ।
तरो पावला कृतकल्याण । परी दूषण तें आम्हां ॥ ९० ॥
हा विधात्याचा पणतू । पौलस्तीचा सुतू ।
ब्राह्मणोत्तम निश्चितू । सकळ वेदार्थू जाणता ॥ ९१ ॥
यासी मारिलें समरांगणीं । दोष नाही क्षात्रधर्मालागूनी ।
तथापि स्वामींच्या वचनीं । अति विश्वास आमुचा ॥ ९२ ॥
तरी आतां यथार्थ । वदावें जी प्रायश्चित ।
ते करोनि विधिधुक्त । धर्मस्थापन करावें ॥ ९३ ॥
तंव बोलती ऋषीश्वर । पुससी गौरवोनि विचार ।
तूं सकळांचा ईश्वर । कृपाकर आमुतें ॥ ९४ ॥


शिवलिंग स्थापना करावी, विषांना वर्षासने द्यावीत असे ऋषींनी संगितले :


तरी आता ऐसें कीजे । स्थलमाजी लिंग प्रतिष्ठिजे ।
तीर्थस्थापन करविजे । संपादिजे शिवाचा ॥ ९५ ॥
कृष्णा गोदा भागीरथी । उभयतीरीं लिंगप्रतिष्ठा निश्चिती ।
येणें ब्रह्महत्येची निर्मुक्ती । वेदप्रयुक्ती बोलिली जे ॥ ९६ ॥
आणिक एक असे कारण । ब्राह्मणासी द्यावें अग्रहार दान ।
पत्र द्यावें वर्षासन । पुष्टी शशि सूर्य जंव आहे ॥ ९७ ॥
वंदोनि ऋषींचे चरण । करोनि चरणक्षाळण ।
भक्तियुक्त करोनि पूजन । मग स्वाश्रमा जाण धाडिले ॥ ९८ ॥


त्याप्रमाणे करण्याची प्रधानांना रामांची आज्ञा :


आला करोनि प्रधानासी । एक भाग देवांसी ।
दुजा भाग द्विजांसी । तिजा राज्यासी चालवी ॥ ९९ ॥
आज्ञेप्रमाणें शिवालयें । लिंगप्रतिष्ठा यथान्वयें ।
संपादोनि शीघ्र मजप्रति ये । सुखवार्ता सागावया ॥ १०० ॥
आला वंदोनि शिशीं । वंदोनियां भरतासी ।
मुद्रा लाहोनि पत्रासी । मग दूतासी धाडिलें ॥ १०१ ॥
चमत्कारे करोनि नमन । आज्ञेप्रमाणे संपादून ।
त्रिमासांत पातले गण । श्रीरामचरण वंदावया ॥ १०२ ॥
तडीतापडी संन्यासी । योगी बैसले योगाभ्यासीं ।
त्यांची वार्ता आणोनि मानसीं । यथोपचारांसी पाठविलें ॥ १०३ ॥
अंधपंगु हीन अंगें । दरिद्रें पीडिले वातयोगें ।
गृहअन्नवस्त्र संयोगें । अति स्नेहे रक्षिले ॥ १०४ ॥
भरतासी म्हणे श्रीराम । राज्यभार चालवीं निःसीम ।
जे असेल दुर्जय दुर्गम । तें मजप्रति नेमे सांगावें ॥ १०५ ॥
त्यानंतर सभाविसर्जन । सवें बिभीषणात्मज घेऊन ।
मग पातला जानकीभुवन । परिचारक जनसमवेत ॥ १०६ ॥
अंतगृहा नेवोनि त्यासी । भेटविलें जानकीसी ।
तिणें अर्पून कंठाभरणासी । स्वाश्रमासी धाडिलें ॥ १०७ ॥
भरतें येवोनि भद्रासीं । पाचोरोनि सर्व प्रधानांसी ।
आला नेमी समस्तांसी । प्रति सभेसी शीघ्र यावें ॥ १०८ ॥
उदयीक सकळांसी प्रयाण । स्वयें करवील रघुनंदन ।
सदन्नें करोनि निर्माण । सिद्ध करणें उपचारातें ॥ १०९ ॥
श्रीरामसंकेतलाघवता । निर्माण करावें चौ पुरुषार्था ।
जे जे अपेक्षा ज्याचे चित्ता । त्या त्या पदार्था पुरवाचे ॥ ११० ॥
एका जनार्दना शरण । झालें बिभीषणा समाधान ।
पावोनियां रामवरदान । राजनीति जाण संपादिली ॥ १११ ॥
हें बिभीषण आख्यान । कर्ता श्रीगुरु आपण ।
तेणेंचि संपवूनि निरूपण । अकर्तेपणें राहिला ॥ ११२ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
बिभीषणप्रयाणं नाम नवतितमोऽध्याय ॥ ९० ॥
ओंव्या ॥ ११२ ॥

GO TOP