| 
 
 
 ॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥ 
 ॥ श्रीभावार्थरामायण ॥ 
 अरण्यकाण्ड
 ॥  अध्याय विसावा ॥  उमा व श्रीराम यांचा संवाद
 
 
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ 
 
 
पौणिमेच्या रात्री गवताच्या अंथरुणावर पहुडले असता श्रीरामांचा झालेला मनःक्षोभ :
 
पूर्णिमेची रात्री शोभयमान । तृणशेजे रघुनंदन ।करिता जाला सूखें शयन । करीं पादसंवाहन सौमित्र ॥ १ ॥
 चंद्रादय मनोहर । चंद्रकिरण अति सुकुमार ।
 अंगीं लागतां श्रीरामचंद्र । उठी सत्वर गजबजोनी ॥ २ ॥
 
 
 
सौमित्रे ननु सेव्यतां तरुतलं चंडांशुरुज्जंभते ।चंडांशोर्निशि का कथा रघुपते चंद्रोयऽमुन्मीलति ।
 वत्सैतद्भवता कथं नु विदितं धत्ते कुरंगं यतः ।
 क्वासि प्रेयसि हा कुरंगनयने चंद्रानने जानकि ॥ १ ॥
 
 
 
श्रीराम म्हणे लक्ष्मण । खडतर सूर्याचे किरण ।मज बाधिती दारुण । बैसूं दोघे जण तरुतळीं ॥ ३ ॥
 तंव सौमित्र म्हणे श्रीरघुनाथा । रात्रीं कायसी सूर्याची कथा ।
 हा अमृतांशु चंद्र तत्वतां । निववी समस्तां निजकिरणीं ॥ ४ ॥
 जरी हे चंद्रबिंब सांगसी पूर्ण । सौमित्रा तुज हें कैसें ज्ञान ।
 बिंबीं देखोनियां मृगचिन्ह । चंद्रलक्षण मी जाणें ॥ ५ ॥
 जरी हें चंद्रबिंब निजचिन्हीं । एकत्र देखतसों नयनीं ।
 तरी मृगनयना चंद्रवदनेसी । जनकनंदिनी ते कोठें ॥ ६ ॥
 जरी मृगचिन्ह चंद्र देखसी । तरी मृगनयना चंद्रवदनेंसीं ।
 सीता दाखवीं मजपासीं । म्हणोनि उसकाबुकसीं स्फुंदत ॥ ७ ॥
 हा हा सीता प्रियकांता । सुखरुपा जनक्दुहिता ।
 लक्ष्मणा कोठे आहे सीता । दूःखावस्था अनुवादे ॥ ८ ॥
 पाठींसी उभी माझी सीता । पुढें पळे जनकदुहिता ।
 लक्ष्मणा धांव धांव तत्वतां । रुसली कांता बुझावीं ॥ ९ ॥
 सवेचि बोले आन आन । चंद्रे द्वंद्व मांडिलें जाण ।
 खडतर तावितात किरण । तापलों पूर्ण सौमित्रा ॥ १० ॥
 
 
 
चंद्रश्चंडकरायते मृदुगतिर्वातोऽपि वज्रायते ।माल्यं सुचिकुलायते मलयजो लेपःस्फुलिगायते ।
 रात्रिः कल्पशतायते विधिवशात्प्राणोऽपि भारायते ।
 हात हंत प्रमदावियोगसमयः संहारकालायते ॥ २ ॥
 
 
कामज्वराची पीडा व श्रीरामाची मनःस्थितीः  :
 
लक्ष्मणा सावध ऐकें तू आतां । चंद्रमा दवडीं गां परता ।न चवे तरी करीन घाता । संतापता मज तावी ॥ ११ ॥
 लक्ष्मण घाली शीतल वारा । म्हणे तूं द्वंद्वा पेटलासी सौमित्रा ।
 मज हाणिसी वज्रधारा । दशशिरा मिनलासी ॥ १२ ॥
 येथोनि ठऊठ जाय परता । करुं आलासी माझे घाता ।
 ऐसा विरहज्वर श्रीरघुनाथा । संतापता अति तावी ॥ १३ ॥
 शीतोत्पली सुमनशेजार । तेथें निजविला श्रीरामचंद्र ।
 तंव सुयानीं खिळिलें सर्व शरीर । आप्त सौमित्र मज द्वंद्वी ॥ १४ ॥
 जो तूं होतासी सुमित्र । तो तूं जालासी कुमित्र ।
 सुयांनी खिळिलें सर्व गात्र । वृथा वैर कां करिसी ॥ १५ ॥
 सवेग निघावया धगी । बावन्न चंदन लाविले अंगी ।
 क्रोधें श्रीराम बोले वेगीं । आगी सर्वांगीं लाविली ॥ १६ ॥
 सीताविरहें अति विव्हळ । त्यावरी लाविलें त्वां विंगळ ।
 न भेटतां जनकबाल । प्रळयकाळ मज आला ॥ १८ ॥
 सीतेचे वियोगविरहें । सूर्य निमाला रे नेणों काये ।
 रात्रि आली कल्पप्राये । करुं मी काय सौमित्रा ॥ १८ ॥
 मजसीं वैर चालवी चंद्र । वैरा पेटला सौमित्र ।
 वायु चालवी वैराकार । वज्रधार मज लागे ॥ १९ ॥
 सीतावियोगविरहें जाण । माझा निघों पाहे प्राण ।
 सौमित्रा वेगीं रचीं सरण । अलोट मरण मज आलें ॥ २० ॥
 ऐसें बोलतां । सवेंचि धांवे म्हणे सीता ।
 वृक्षांसि म्हणे माझी कांता । गुल्मलता आलिंगी ॥ २१ ॥
 सीता म्हणोनियां जाण । श्रीराम चुंबी पाषाण ।
 धांवोनि हृदयी धरी तृण । सीता संपूर्ण हे माझी ॥ २२ ॥
 लक्ष्मणासी म्हणे तूं सीता । तूचि माझी निजकांता ।
 ऐसी सीतेची अवस्था । श्रीरघुनाथा अति भ्रांती ॥ २३ ॥
 मी येथें सौमित्रा सांग कोण । तूं श्रेष्ठ सखा स्वामी संपूर्ण ।
 स्वामित्व मज कैंचें जाण । अयोध्यापति संपूर्ण श्रीराम ॥ २४ ॥
 तूं मजपासीं कैंचा कोण । हर हर मी काय सांगूं आपण ।
 नित्यानुवर्ती लक्ष्मण । मज  सेवक संपूर्ण आज्ञाधारी ॥ २५ ॥
 तरी वनीं कां हिंडसी एकाकी । प्रियप्राप्तीच्या अनुलक्षीं ।
 प्रिया कोण कैंची कीं । तुझी भार्या जानकी जनकात्मजा ॥ २६ ॥
 ऐसी आठवण देतां । जानकी आठवली चित्ता ।
 हा हा केउती गेली सीता । भेटवीं आतां सौमित्रा ॥ २७ ॥
 
 
श्रीरामांची ही अवस्था पाहून पार्वतीने श्रीशंकरांना केलेला प्रश्न :
 
ऐसें देखोनि श्रीरामासी । उमा विनवी महेशासी ।कांहींएक पुसेन तुम्हांसी । तें निश्चयेंसीं मज सांगा ॥ २८ ॥
 तुम्हींच सांगितलें आपण । श्रीराम प्ररब्रह्म पूर्ण ।
 त्यांचे स्वरुप तें कोण । कृपा करुन मज सांगा ॥ २९ ॥
 म्हणोनि घातलें लोटांगण । मस्तकीं धरिले दोनी चरण ।
 मग तीस उठवोनि जाण । शिव आपण स्वयें सांगे ॥ ३० ॥
 वनामाजि जो विचरत । सीतेलागीं आर्तभूत ।
 पूर्णब्रह्म श्रीरघुनाथ । जाण निश्चित पार्वतिये ॥ ३१ ॥
 पार्वती म्हणे विषयासक्त । स्त्रीकामार्थी अति लोलुप्त ।
 शिव म्हणे तेंचि सदोदित । ब्रह्म रघुनाथ पार्वतिये ॥ ३२ ॥
 
 
शिवाचे उत्तराने उमेचे उपहासगर्भ हास्य :
 
उमा म्हणे रडत पडत । अहर्निशों तडफडत ।सीतेलागीं चरफडत । तरी ब्रह्म रघुनाथ शिव म्हणे ॥ ३३ ॥
 तुम्हांसी काय हेंचि ध्यान । तुम्हांसी काय हेंचि चिंतन ।
 शिव म्हणे ज्ञानविज्ञान । आम्हां ब्रह्म पूर्ण श्रीराम ॥ ३४ ॥
 विषयकामी कामासक्त । धन्य धन्य हे दोघे देवभक्त ।
 ऐसी उमा उपहासें हांसत । ब्रह्म रघुनाथ शिव म्हणे ॥ ३५ ॥
 रडत पडत तरफडत । विषयकामी कामासक्त ।
 तरी परब्रह्म श्रीरघुनाथ । जाण निश्चित पार्वतिये ॥ ३६ ॥
 
 
शिवाच्या अनुज्ञेने रामांची कसोटी पाहण्यासाठी निघते :
 
उमा म्हणे महेशासी । जरी म्यां ठकविले श्रीरामासी ।तरी शिव म्हणे पार्वतीसी । ब्रह्मत्व त्यासी पैं नाहीं   ॥ ३७ ॥
 तुमचें जालिया आज्ञापन । क्षणार्धे छळीन रघुनंदन ।
 शिव म्हणे तो सावधान । सुखें छळण तूं करी त्यासी ॥ ३८ ॥
 ऐसें शिवासीं बोलतां । उमा स्वयें जाली सीता ।
 मग छळावया श्रीरघुनाथा । अतिलाघवता छळणार्थी ॥ ३९ ॥
 
 
सीतेचे रुप घेऊन उमा रामांकडे जाते :
 
हा हा सीता स्वयें म्हणत । वनीं विचरे श्रीरघुनाथ ।तंव त्यासन्मुख योगोनि ओ म्हणत । उमा वनांत पैं आली ॥ ४० ॥
 ओ म्हणोनि रामापुढें । राम सीता म्हणे आणखीकडे ।
 ते तंव येओ तिकडे । तंव श्रीराम म्हणे आणखीकडे सीता ॥ ४१ ॥
 जंव जंव ते ये रामासन्मुख । तंव तंव श्रीराम होय तिसीं विमुख ।
 हा हा सीते फोडोनी हाक । अधोमुख विलपत ॥ ४२ ॥
 तंव लक्ष्मण विचारी निजचित्ता । वृक्षपाषाणां म्हणे सीता ।
 ते जानकी सन्मुख असतां दुःखावस्था कां श्रीरामा ॥ ४३ ॥
 
 
त्या उमारुपी सीतेची उपेक्षा केलेली पाहून लक्ष्मणाला आश्चर्य :
 
तंव लक्ष्मण म्हणे श्रीरघुनाथा । दुःख कां करितां भेटली सीता ।तंव त्यासी हाणूं धांवे लाता । बोल बोलतां मारुं पाहे ॥ ४४ ॥
 मग सौमित्र म्हणे कोपसी वृथा । पैल सन्मुख उभी सीता ।
 ऐसें बोलणें ऐकतां । शस्त्रें घाता करुं धांवे ॥ ४५ ॥
 सौमित्र आम्ही तुम्ही सहोदर । तो तूं मजसीं करिसी वैर ।
 येथें कैची सीता सुंदर । दुःख दुर्धर मज आलें ॥ ४६ ॥
 अति भ्रांति श्रीरघुनाथा । मारुं धांवे सीता सांगतां ।
 लक्ष्मण म्हणे न बोलें आतां । बोलों जातां मारील ॥ ४७ ॥
 सन्मुख भेटलीसे सीता । तेचि प्रबोधील श्रीरघुनाथा ।
 आतां मी न बोले सर्वथा । म्हणोनि मौनावस्था लक्ष्मणीं ॥ ४८ ॥
 
 
तसेच स्वर्गस्थ देवांनाही गूढविस्मय :
 
तंव स्वर्गी सुरवरां समस्तां । ओढवली प्रमावस्था ।बंदीं सुटोनि लंकानाथा । वना सीता केंवी आली ॥ ४९ ॥
 विस्मय करिती ऋषीश्वर । विस्मय करिती सुरवर ।
 जे ठकवूनियां दशशिर । सीता सुंदर वना आली   ॥ ५० ॥
 ऐसे ब्रह्मा मानी अपूर्वता । भस्म करोनि लंकानाथा ।
 वना आली सती सीता । तेणें विधाता विस्मित ॥ ५१ ॥
 पार्वती स्वयें जाली सीता । हें न कळे ब्रह्मादिकां  समस्तां ।
 तें कळलें श्रीरघुनाथा । सर्वांगें ज्ञाता श्रीराम ॥ ५२ ॥
 श्रीराम अलिप्त ज्ञानें ज्ञाता । त्यासी मानिती अति भ्रांतता ।
 पुढें काय वर्तली कथा । सावधानता अवधारा  ॥ ५३ ॥
 
 
नंतर ती सीतास्वरुपी उमा श्रीरामांना प्रश्न करिते :
 
लक्ष्मण राहिला धरोनि मौन । मग सीता जल्पे रघुनंदन ।तंव कृत्रिम सीता धरी धांवोन । सावधान व्हावें तुम्हीं ॥ ५४ ॥
 मी जवळीच उभी असतां । व्यर्थ कां धांवा म्हणां सीता ।
 स्त्रीविरहें रडतां  पडतां । लाज सर्वथा न ये तुम्हां ॥ ५५ ॥
 पूर्वी बोलोनि निजमहिमान । मी श्रीराम नित्य सावधान ।
 तें स्त्रीविरहें बुडालें ज्ञान । अति अज्ञान जालेती ॥ ५६ ॥
 अज्ञानाची अगाध मात । बुडविला प्रपंच आणि स्वार्थ ।
 सखा बंधु भक्त विनवित । त्याचाच घात करु धांवा ॥ ५७ ॥
 सखा बंधु आणि भक्त अनन्य । त्यांचें करुं धांवा हनन ।
 बुडालें प्रवृत्तीचें ज्ञान । ब्रह्मज्ञान तुम्हां मग कैंचें ॥ ५८ ॥
 मज क्षण एक न भेटतां । जड मूढ जालेती भ्रांत अवस्था ।
 प्रवृत्तिज्ञान नाठवे चित्ता । मग परमार्थता तेथे कैंची ॥ ५९ ॥
 वनीं मी राहोनि अति गुप्त । तुमचें पाहिलें आचरित ।
 तंव तुम्ही जालेती अति भ्रांत । मग धांवत मी आलें ॥ ६० ॥
 
 
 
स पण्डितो नरश्रेष्ठ प्राज्ञः कर्मविदां वरः ।अप्राज्ञ इव किं राम भायहितोर्विमुह्यसे ॥ ३ ॥
 
 
 
पूर्वी मी म्हणसी आत्मा तत्वतां । परी स्त्रीविरहें तोचि आतां ।कर्म करोनि अकर्तात्मता । जडमूढता अति भ्रांत ॥ ६१ ॥
 जरी वियोगें भ्रांति मोठी । तरी तुम्हां आम्हां जाली भेटी ।
 आंता भ्रांति सांडोनियां पोटीं । पंचवटीं जाऊं दोघें ॥ ६२ ॥
 मर्यादा वर्षे चतुर्दश । आम्हीं करावा वनवास ।
 आतां उरले असती षण्मास । अयोध्येस मग जाऊं  ॥ ६३ ॥
 
 
श्रीराम तिचे सत्य स्वरुप ओळखून तिला तुकाई जगदंबा अशी हाक मारतात :
 
श्रीराम म्हणे तूकाई । तेंची नाम लोकांच्या ठायीं ।अद्यापि राहिलेंसे पाहीं । म्हणती तुकाई जगदंबा ॥ ६४ ॥
 तुकाई नामें नामभिधान । तें जगदंबेचें निजस्थान ।
 अद्यापि पूजिती जन । अति पावन दंडकारण्यीं ॥ ६५ ॥
 श्रीरामवरदायिनी माता । तुकाई म्हणती रामवाक्यार्था ।
 पुढे काय वर्तली कथा । सावधान श्रोतां परिसावी ॥ ६६ ॥
 हांसोनि बोले श्रीरघुनंदन । माते तुज आलों लोटांगण ।
 तुवां माझें न करावें छळण । मी अनन्य दीन शिवाचें ॥ ६७ ॥
 श्रीराम म्हणे सीतेसी माता । तो विस्मय लक्ष्मणाच्या चित्ता ।
 आश्चर्य सुरवरां समस्तां । नोळखे कांता ऋषी म्हणती ॥ ६८ ॥
 
 
श्रीरामांच्या प्रश्नाने उमा उद्विग्न व तिची शरणागती :
 
श्रीराम म्हणे पुढती तिसी । एकलें सांडोनि शिवासी ।सीतारुपे छळवयासी । तूं का आलीस जननीये ॥ ६९ ॥
 ऐकोनि श्रीरामाचें वचन । सीतेची स्वरुपता सांडोन ।
 उमा घाली लोटांगण । श्रीराम सर्वज्ञ छळवेना ॥ ७० ॥
 शिव बोलिला सत्यवचन । श्रीराम नित्य सावधान ।
 त्यासीं तुझे न चले छळण । तें प्रमाण मज आलें ॥ ७१ ॥
 मी शिवाची शिवशक्ती । सीता जालें  अतर्क्ययुक्ती ।
 ब्रह्मादि देव मज नेणती तुवां श्रीरघुपती ओळखिलें ॥ ७२ ॥
 श्रीरामाचें अगाध ज्ञान । न चले छळण छद्मकामन ।
 ऐसी बाणली उमेसी निजखूण । मग धरोनि चरण पुसतसे ॥ ७३ ॥
 
 
खर्या स्वरुपाचे ज्ञान सांगण्याविषयींच्या उमेच्या विनंतीवरुन, ते ज्ञान शिवापासूनच प्राप्त करण्याचा श्रीरामांचा तिला आदेश :
 
 
तूं सर्वार्थसर्वज्ञ संपूर्ण । अवलंबोनियां  संभ्रांतपण ।आलिंगावया तृण पाषाण । हें काय कारण मज सांगें ॥ ७४ ॥
 सीताविरहें कामकामन । तुज नाहीं अणुप्रमाण ।
 ते बाणाली खूण संपूर्ण । जे ब्रह्म परिपूर्ण श्रीराम  ॥ ७५ ॥
 दुर्धर धरोनि पिशाचता । विरहेंवीण सीता सीता ।
 म्हणोनि वनोवनीं धांवता । रडता पडता कां होसी ॥ ७६ ॥
 ऐसें बोलोनि आपण । मग उमा धरी श्रीरामचरण ।
 तुझी स्थिति हे संपूर्ण । कृपा करोन मज सांगें ॥ ७७ ॥
 तंव श्रीराम म्हणे माझी स्थिति गती । सदाशिव जाणे निश्चितीं ।
 तो सांगेल तुजप्रती । स्वमुखें कीर्ति नये सांगूं ॥ ७८ ॥
 
 
ज्ञानप्राप्ती करुन घेणर्या शिष्याची चित्तशुद्धी असणे आवश्यक :
 
जरी सांगांवें कृपाविधी । तरी पाहावी पात्रशुद्धीं ।न व्हावा छळवादी । वादी विवाद नसावा ॥ ७९ ॥
 न व्हावा धूर्त ज्ञानवंचक । नास्तिक दुजा शब्दवंचक ।
 नीतिशात्रीं करी कुतर्क । आळसी वंचक न व्हावा ॥ ८० ॥
 द्रव्यदारत्यागोन्मुख । शोधित सत्वाचा सात्विक ।
 पूर्ण परार्थी सविवेक । त्यासी परिपाक सांगावा ॥ ८१ ॥
 तुझे अंगी ज्ञानभिमान । न मानोनि शिवाचें वचन ।
 माझें करुं आलीस छळण । तुज आपण केंवी सांगों ॥ ८२ ॥
 नाहीं पतिवचनीं कर्तव्यार्था । नाहीं गुरुवचनीं भावार्थ ।
 तु सांगों नये गुह्यार्थ । ऐसे श्रीरघुनाथ बोलिला ॥ ८३ ॥
 
 
पश्चात्तापदग्ध उमेची श्रीरामांची प्रार्थना :
 
ऐसें ऐकोनि श्रीरामवचन । उमा संकोचली मनीं संपूर्ण ।पतिवचन गुरुवचन । उल्लंघन म्यां केलें ॥ ८४ ॥
 न मानोनि शिवाचें  वचन । छळूं आले रघुनंदन ।
 जळो माझा ज्ञानाभिमान । करी रुदन अनुतापें ॥ ८५ ॥
 ज्ञानभिमानाचें लक्षण । भेटल्या साधु सज्जन ।
 जो शोधून पाहे दोषगुण । त्याचें छळण करावया ॥ ८६ ॥
 छळणें छळवेना श्रीरघुनाथा । शेखीं मज कोपसी ना सर्वथा ।
 तेणें मज पालट जाला चित्ता । ऐक आतां सांगेन ॥ ८७ ॥
 
 
त्यामुळे रामांचे समाधान व रहस्य स्पष्टीकरण :
 
तुझें होतांचि दर्शन । ज्ञानाभिमाना जालें दहन ।छळच्छद्म गेलें जळोन । तुझी आण श्रीरामा ॥ ८८ ॥
 ऐकोन तिचें सत्य वचन । कृपें द्रवला श्रीरघुनंदन ।
 आपुलें अतर्क्य गुह्य ज्ञान । सांगे आपण सद्भावे ॥ ८९ ॥
 उमे ऐकें सावधान । पूर्वी हे वो ऋषिजन ।
 माझे प्राप्तीलागोन जाण । केलें अनुष्ठान निष्कामें ॥ ९० ॥
 माझे पावावया चरण । त्यांचा सद्भाव संपूर्ण ।
 सांडोनि सर्वही अभिमान । तृण पाषाण होवोनि ठेले ॥ ९१ ॥
 एक ते वृक्ष होवोनी तिष्ठत । एक ते झाले पर्वत ।
 एक ते तृणपाषाण होत । मी तेथें तेथें स्वयें धांवें ॥ ९२ ॥
 त्यांचा भावार्थ देखोन । परम प्रीतीनें दें अलिंगन ।
 त्यांसी तूं म्हणसी तृणपाषाण । पिसें पूर्ण मज म्हणसई ॥ ९३ ॥
 तें तंव निरभिमानी भक्त । भक्तभावार्थी मी रघुनाथ ।
 प्रीतीनें भक्त गिंवसित । स्वयें धांवत वनोवन ॥ ९४ ॥
 भक्त उद्धरावयाकारणें । रडणें पडणें अडखळणें ।
 पर्वतोपर्वतीं धांवणें । आणि आलिंगनें वृक्षांसी ॥ ९५ ॥
 उमे जाण तूं  निश्चित । माझें पाऊल न पडे व्यर्थ ।
 जाणे सदाशिव समर्थ । तुझा भावार्थ तो नाहीं ॥ ९६ ॥
 गाळींव भावाचा भावार्थ । सर्व भूतीं श्रीभगवंत ।
 हाचि मुख्यत्वें परमार्थ । निजस्वार्थ परमार्थ ॥ ९७ ॥
 गूळाचें कारले केलें । ते सकंटक कडू नाहीं जालें ।
 तेवी ब्रह्मवृत्तीं कर्म केलें । ते मुकले बंधुत्वा ॥ ९८ ॥
 साकरेचें वृंदावन फळ केलें । कडू म्हणतां ते स्वयें ठकले ।
 तेंवी साधूचें कर्म निंदोनि बोले । ते ते गेले अधःपाता ॥ ९९ ॥
 साधूंची सच्चिद् गरिमा । अतर्क्य त्यांचे कर्म प्रेमा ।
 ते नाकळिती मोहभ्रमा । अगाध महिमा साधूंचा ॥ १०० ॥
 ते तूं म्हणसी तृणपाषाण । तरी त्या साधूंसी ब्रह्म पूर्ण ।
 ऐसें ऐकोनि श्रीरामवचन । मूर्च्छापन्न पार्वती ॥ १ ॥
 मी एक शक्ती तो शिव । हें नाठवे पर्वापूर्व ।
 श्रीरामासी रुप ना नांव । भावाभाव विसरली ॥ २ ॥
 अहं कोहं सोहंपण । येणें नासिलें मीतूंपण ।
 कोंदाटले ब्रह्म परिपूर्ण । समाधान शिवप्रिये ॥ ३ ॥
 करितां श्रीरामाच्छळणोक्ती । समाधि पावली पार्वती ।
 ऐसी संतांची संगती । उपकारार्थी अपकारियां ॥ ४ ॥
 पावोनि पूर्ण समाधान । उमा जाली सावधान ।
 त्रैलोक्य देखे चैतन्यघन । श्रीराम पूर्ण तुष्टला ॥ ५ ॥
 
 
श्रीरामांचा उपदेश :
 
श्रीराम म्हणे अहो माते । कांहीएक सांगेन तूंतें ।तंव उमा म्हणे सर्वस्वार्थे । तुझे आज्ञेनें नुल्लघीं ॥ ६ ॥
 उमा धांवोनि उल्लासतां । श्रीरामचरनीं ठेविला माथा ।
 तुझेनि जालें सुखरुपता । काय मी आतां अनुवादूं ॥ ७ ॥
 मिथ्या व म्हणावें शिववचन । कोणाचें न करावें ढळण ।
 हेंचि मागतों मी आपण । कृपा पूर्ण करीं माते ॥ ८ ॥
 श्रीरामा तुझें देखतां चरण । छळणादि वृत्तींसी जालें धन ।
 न करीं शिवाज्ञाहेळण । ब्रह्मपरिपूर्ण परिपाक ॥ ९ ॥
 
 
उमेचे आश्वासन :
 
तुझें ऐकतांचि वचन । जालें अविद्येचें दहन ।निमाले दळण आणि हेळण । तुझी आण श्रीरामा ॥ ११० ॥
 तुझेनि वचनें श्रीरघुनाथा । पावलें सुखसायुज्यता ।
 मग चरणीं ठेवोनि माझे । गेली उल्लासता कैलासा ॥ ११ ॥
 
 
लक्ष्मणावर व इतरांवरही या अद्भुत घटनेमुळे परिणाम :
 
उमेनें केलिया नमन । सौमित्रें स्वयें धांवोन ।मस्तकीं धरिले श्रीरामचरण । काय आपण बोलत ॥ १२ ॥
 मी म्हणें हेचि आमची सीता । तंव ते शिवाची शिवकांता ।
 भली ओळखिली श्री रघुनाथा । सर्वज्ञ सत्य तूं श्रीरामा ॥ १३ ॥
 देखोनि उमेची स्थिति गती । ब्रह्मादिक विस्मित  चित्तीं ।
 आम्ही म्हणों हे सीता सती । श्रीरामें पार्वती ओळखिली ॥ १४ ॥
 आम्ही म्हणों सीताविरहें भ्रांत । परी अचुक ज्ञाता भ्रमांत ।
 याचा न कळे निजवृत्तांत । ब्रह्म सदोदित श्रीराम ॥ १५ ॥
 रडणें पडणें स्वैर धांवणें । देखोनि जग पिसें म्हणे ।
 श्रीराम विचरे ब्रह्मपणें । जग उद्धरणे श्रीरामा ॥ १६ ॥
 देखोनि श्रीरामाची स्थिती । ब्रह्मादि देव विस्मित चित्तीं ।
 मग तिहीं वंदोनि श्रीराममूर्ती । गेले निश्चितीं निजधामा ॥ १७ ॥
 फितली देवांची निजभ्रांती । आणि लक्ष्मण पावला विश्रांती ।
 अगाध श्रीरामाची स्थिती । नामें उद्धरती जडजीव ॥ १८ ॥
 एकाजनार्दना शरण । पुढें सीतागवेषण ।
 करुं निघाले श्रीराम लक्ष्मण । हेंही निरुपण अवधारा ॥ १९ ॥
 
 
उमा-शिव संवादाचा मूळ आधार शिवरामायण :
 
श्रीरामउमासंभाषण । यासी मूळ शिवरामायण ।ते ग्रंथींचे निरुपण । श्रोते सज्ञान जाणती ॥ २० ॥
 
 
मूळ रामायण शतकोटी श्लोकसंख्येचे होते :
 
संख्या शतकोटी समस्त । श्रीरामायण मूळ ग्रंथ ।सुर नर पन्नग यथार्थ । कलह करीत पैं आले ॥ २१ ॥
 
 
त्याची विभागणी करण्याच्या बाबतीत स्पर्धा :
 
श्रीराम राजा सुरवरांचा । त्याची कथा वांटा देवांचा ।पन्नग म्हणती शेषशयनींचा । राम आमचा तुम्ही कैंचे ॥ २२ ॥
 मनुष्ये म्हणती मनुष्यकृतीं । रामें केली अगाध ख्याती ।
 आमचा वांटा श्रीरामकीर्ती । तुम्ही तदर्थी कां भांडा ॥ २३ ॥
 श्रीराम तुमचा वैकुंठपती । तरी वैकुंठीं नाही केली ख्याती ।
 श्रीराम शेषशयनी जरी निश्चितीं । तरी निजेल्या कीर्ति नाहीं केली ॥ २४ ॥
 येवोनि मनुष्यलोकाप्रती । रामें केली विचित्र ख्याती ।
 मृत्युलोकींची हे कीर्ती । तुम्ही तदर्थी कां भांडा ॥ २५ ॥
 एक खालते एक वरते । वांटा मागू आलेती तेथें ।
 निर्लज्ज लाजाना पै चित्ते । संबंध तुम्हातें असेचिना ॥ २६ ॥
 दोघे केले निरुत्तर । तरी कथेची आवडी फार ।
 न सोडिती येरयेर । कथामृतसार सेवावया ॥ २७ ॥
 
 
विभाजनाचे काम ब्रह्मदेवाने श्रीशिवाकडे सुपूर्त केले :
 
तंव ब्रह्मयानें बुद्धि केली जाण । वाटेकरी तीघे जण ।त्यांची करावया बुझावन । धाडी आपन शिवापासीं ॥ २८ ॥
 मग शिवें बुद्धि केली कैसी । तिघे येतां आपणापासीं ।
 स्वयें राखोनि जिजसारासी । विभागेंसी बुझावी ॥ २९ ॥
 शिव म्हणे तया तिघांसी । विमुख मी न धाडीं कोणासी ।
 वाटा देईन सम भागेंसी । वचन तिघांसी मानलें ॥ १३० ॥
 
 
श्रीशिवाकडून विभागणी :
 
शतकोटी संख्या येथ । रामायण मूळग्रथ ।शिव वांटी त्रैलोक्यांत । विभागार्थ तो ऐका ॥ ३१ ॥
 तेहतीस कोटी प्रथमांक । तेहतीस लक्ष  आणिक ।
 तेहतीस सहस्र तीनशें श्लोक । तेहतीस आणिक एक उरला ॥ ३२ ॥
 श्लोक एक उरला निर्धारें । त्याचीं बत्तीस अक्षरें ।
 तीहीं वांटिली शंकरें । परिसा आदरें वांटणी ॥ ३३ ॥
 
 
शेवटी उरलेली “राम” ही दोन अक्षरे विभागणे अशक्य असल्याने श्रीशिवाने ती स्वतः घेतली :
 
दहा दहा अक्षरें वांट्या आलीं । दोन अक्षरें तेथे उरलीं ।तदर्थी शिवें बुद्धि केली । युक्त बोली बोलून ॥ ३४ ॥
 अक्षरें दोन लोक निन्ही । वांटा करितां न ये वांटणी ।
 तरी हीं द्यावीं मज मापार्यालागोनी । खळें दानीं दानार्थ ॥ ३५ ॥
 मग तिघे जणीं अति उल्लासीं । दोनी अक्षरें दिधली शिवासी ।
 तेणें धरिलीं हृदयेसीं । अहर्निशीं श्रीराम ॥ ३६ ॥
 रामायणींचे सार पूर्ण । शिवाचें वसवी हृदयभुवन ।
 श्रीराम हीं अक्षरें  जाण । ब्रह्मपूर्ण परियेसा ॥ ३७ ॥
 
 
लोकविभाग व पोटविभाग :
 
लोकविभाग मुख्य एक । तेहतीस कोटी तेहतीस लक्ष ।तेहतीस सहस्र तीनशें श्लोक । दहा अक्षरें अधिंक मृत्युलोकीं ॥ ३८ ॥
 याही भागाचें विवरण । बहुविध कवित्व रामायण ।
 तेहीं अर्थींचें निरुपण । सावधान अवधारा ॥ ३९ ॥
 
 
बहुत प्रकारची रामायणेः
 
शिवरामायण शैवरामायण । आगम पंचरात्र रामायण ।गुहा गुह्यक रामायण । अनुमंत रामायण नाटक ॥ १४० ॥
 मत्स्य कूर्म वराह रामायण । काळिकाखंडींचें निरुपण ।
 महाकालीरामायण । स्कंदरामायण प्रसिद्ध ॥ ४१ ॥
 अगस्ति पौलस्ति रामायण । पद्मपुराणींचें रामायण ।
 रवि अग्नि वरुण रामायण । ऐकोनि आपण जटायु वक्ता ॥ ४२ ॥
 नंदिग्रामीं भरत आपण । वदे तें भरतरामायण ।
 महाभारतीचें रामायण । वक्ता आपण श्रीव्यास ॥ ४३ ॥
 क्रौचद्वीपीं अद्यापि जाण । कौचऋषि सांगे पुराण ।
 कथा पवित्र रामायण । अति पावन अनुपम्य ॥ ४४ ॥
 विभीषणापासीं जाण । नित्य कथानिरुपण ।
 धर्मऋषि सांगे आपणे धर्म रामायण धार्मिक ॥ ४५ ॥
 श्वेतद्वीपींचे निरुपण । श्वेतकेतुरामायण ।
 कथाविचित्रविंदान । अति पावन तिहीं लोकीं ॥ ४६ ॥
 शांकर वक्ता स्वयें आपण । श्रोती भवानी सावधान ।
 तें शिवभवानीरामायण । कथाविंदान विचित्र ॥ ४७ ॥
 सदाशिव स्वयें वक्ता । स्वयें श्रीराम निजश्रोता ।
 ते शिवरामायणी कथा । श्रवणी ऐकतां स्वानंद ॥ ४८ ॥
 स्वयें श्रीराम स्वानंदें पूर्ण । आपणाप्रति वदे  आपण ।
 ते कथा आत्मरामायण । गोड निरुपण सर्वार्थी ॥ ४९ ॥
 जैमिनिकृत रामायण । अपूर्व कथेचें विंदान ।
 अलोलिक निरुपण । आश्चर्ययुक्त जाण चरित्र ॥ १५० ॥
 जें कां अध्यात्मरामायण । रामायणींचे वेंचे काढोन ।
 केले आध्यात्मिक निरुपण । ऋषिकृत जाण तें नव्हे ॥ ५१ ॥
 मृत्युलोकामाजी भाविकीं । रामायणें असंख्यात कीं ।
 कैसेनि आकळती तितुकीं । अल्पमात्र बोलिलोम् ॥ ५२ ॥
 उमाश्रीरामदर्शन । समूळ मुळीचें निरुपण ।
 एकाजनार्दना शरण । श्रोती संपूर्ण क्षमा कीजे ॥ ५३ ॥
 परम विश्रांति जीवशिवां । परम विश्रांति देहविदेहभावा ।
 तो हा प्रसंग विसावा । उमाराघवां संवादा ॥ ५४ ॥
 विश्रांति त्रिविधतापोद्भवा । अति विश्रांति देहभावा ।
 तो हा प्रसंग विसावा । उमा राघवां संवाद  ॥ ५५ ॥
 विश्रांति निवृति अहंभावा । विश्रांति निवृत्ति सोहंभावा ।
 तो हा प्रसंग विसावा । उमाराघवां संवाद ॥ ५६ ॥
 विश्रांति अहमात्मवैभवा । विश्रांति हे ब्रह्मभावा ।
 तो हा प्रसंग विसावा । उमाराघवा संवाद ॥ ५७ ॥
 भ्रमामाजी विभ्रमठेवा । भ्रमें चाळवी भवभवा ।
 तो हा प्रसंग विसावा । उमाराघवां संवाद ॥ ५८ ॥
 एकाजनार्दना शरण । अगाध रामाचें रामायण ।
 विचित्र कथानिरुपण । ग्रंथभूषण श्रीराम ॥ ५९ ॥
 स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
 उमाराम संवादो नाम विंशतितमोऽध्यायः ॥ २० ॥
 ॥ ओंव्या  १५९ ॥ श्लोक ३ ॥ एवं ॥ १६२ ॥
 
 
 
 GO TOP 
 
 |