श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। त्रिषष्टितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
विश्वामित्रस्य महर्षिपदवीलाभः, मेनकया तस्य तपोभङ्गो, ब्रह्मर्षिपदप्राप्तये तस्य घोरं तपश्च - विश्वामित्रांना ऋषि आणि महर्षिपदाची प्राप्ति, मेनकाद्वारा त्यांचा तपोभंग तथा ब्रह्मर्षिपदाच्या प्राप्तीसाठी त्यांची पुनः घोर तपस्या -
पूर्णे वर्षसहस्रे तु व्रतस्नातं महामुनिम् ।
अभ्यगच्छन् सुराः सर्वे तपः फलचिकीर्षवः ॥ १ ॥
[शतानन्द सांगत आहेत] श्रीरामा ! जेव्हां एक हजार वर्षे पूर्ण झाली, तेव्हां त्यांनी व्रताच्या समाप्तिचे स्नान केले. स्नान केल्यावर महामुनि विश्वामित्रांच्या जवळ समस्त देवता त्यांना तपस्येचे फल देण्याच्या इच्छेने आल्या. ॥ १ ॥
अब्रवीत् सुमहातेजा ब्रह्मा सुरुचिरं वचः ।
ऋषिस्त्वमसि भद्रं ते स्वार्जितैः कर्मभिः शुभैः ॥ २ ॥
त्या समयी महातेजस्वी ब्रह्मदेवांनी मधुर वाणीने म्हटले - 'मुने ! तुमचे कल्याण होवो ! आता तुम्ही आपल्याद्वारा उपार्जित शुभकर्मांच्या प्रभावाने ऋषि झालेले आहात. ॥ २ ॥
तमेवमुक्त्वा देवेशस्त्रिदिवं पुनरभ्यगात् ।
विश्वामित्रो महातेजा भूयस्तेपे महत् तपः ॥ ३ ॥
त्यांना असे सांगून देवेश्वर ब्रह्मदेव परत स्वर्गात निघून गेले. इकडे महातेजस्वी विश्वामित्र पुनः फार मोठी तपस्या करू लागले. ॥ ३ ॥
ततः कालेन महता मेनका परमाप्सराः ।
पुष्करेषु नरश्रेष्ठ स्नातुं समुपचक्रमे ॥ ४ ॥
'नरश्रेष्ठ ! त्या नंतर बराच काळ व्यतीत झाल्यावर परम सुंदरी अप्सरा मेनका पुष्करमध्ये आली आणि तेथे स्नानाची तयारी करू लागली. ॥ ४ ॥
तां ददर्श महातेजा मेनकां कुशिकात्मजः ।
रूपेणाप्रतिमां तत्र विद्युतं जलदे यथा ॥ ५ ॥
महातेजस्वी कुशिकनन्दन विश्वामित्रांनी तेथे मेनकेला पाहिले. तिच्या रूप आणि लावण्याची कुठेच तुलना करण्यासारखी नव्हती. ज्या प्रमाणे ढगात वीज चमकत असते त्याप्रकारे ती पुष्करच्या जलात शोभत होती. ॥ ५ ॥
कंदर्पदर्पवशगो मुनिस्तामिदमब्रवीत् ।
अप्सरः स्वागतं तेऽस्तु वस चेह ममाश्रमे ॥ ६ ॥
तिला पाहून विश्वामित्र मुनि कामाच्या अधीन झाले आणि तिला म्हणाले - "अप्सरे तुझे स्वागत आहे, तू माझ्या या आश्रमात निवास कर. ॥ ६ ॥
अनुगृह्णीष्व भद्रं ते मदनेन विमोहितम् ।
इत्युक्ता सा वरारोहा तत्र वासमथाकरोत् ॥ ७ ॥
'तुझे भले होवो ! मी कामाने मोहित आहे. माझ्यावर कृपा कर." त्यांनी असे म्हटल्यावर सुंदर कटिप्रदेश असणारी मेनका तेथे निवास करू लागली. ॥ ७ ॥
तपसो हि महाविघ्नो विश्वामित्रमुपागमत् ।
तस्यां वसन्त्यां वर्षाणि पञ्च पञ्च च राघव ॥ ८ ॥

विश्वामित्राश्रमे सौम्ये सुखेन व्यतिचक्रमुः ।
या प्रकारे तपस्येतील फार मोठे विघ्न विश्वामित्रांजवळ स्वयं उपस्थित झाले. रघुनन्दना ! मेनकेची दहा वर्षे विश्वामित्रांच्या त्या सौम्य आश्रमात राहात असल्याने अत्यंत सुखात गेली. ॥ ८ १/२ ॥
अथ काले गते तस्मिन् विश्वामित्रो महामुनिः ॥ ९ ॥

सव्रीड इव संवृत्तश्चिन्ताशोकपरायणः ।
इतका समय निघून गेल्यावर महामुनि विश्वामित्र लज्जित झाल्यासारखे झाले, चिंता आणि शोक यात बुडून गेले. ॥ ९ १/२ ॥
बुद्धिर्मुनेः समुत्पन्ना सामर्षा रघुनन्दन ॥ १० ॥

सर्वं सुराणां कर्मैतत् तपोऽपहरणं महत् ।
'रघुनन्दना ! मुनिच्या मनांत रोषपूर्वक हा विचार उत्पन्न झाला की, हे सर्व देवतांचेच कर्तृत्त्व आहे. त्यांनी आमच्या तपस्येचे अपहरण करण्यासाठी हा महान् प्रयत्‍न केला आहे. ॥ १० १/२ ॥
अहोरात्रापदेशेन गताः संवत्सरा दश ॥ ११ ॥

काममोहाभिभूतस्य विघ्नोऽयं प्रत्युपस्थितः ।
'मी कामजनित मोहात असा आक्रांत झालो की माझी दहा वर्षे एका दिवस-रात्रीप्रमाणे निघून गेली. हे माझ्या तपस्येत फार मोठे विघ्न उपस्थित झाले आहे.' ॥ ११ १/२ ॥
स निःश्वसन् मुनिवरः पश्चात्तापेन दुःखितः ॥ १२ ॥
असा विचार करून मुनिवर विश्वामित्र दीर्घ श्वास घेत पश्चात्तापाने दुःखीत झाले. ॥ १२ ॥
भीतामप्सरसं दृष्ट्‍वा वेपन्तीं प्राञ्जलिं स्थिताम् ।
मेनकां मधुरैर्वाक्यैर्विसृज्य कुशिकात्मजः ॥ १३ ॥

उत्तरं पर्वतं राम विश्वामित्रो जगाम ह ।
त्या समयी मेनका अप्सरा भयभीत होऊन थरथर कांपत हात जोडून त्यांच्यासमोर उभी राहिली. तिच्याकडे पाहून कुशिकनन्दन विश्वामित्रांनी मधुर वचनांच्या द्वारे तिला निरोप दिला आणि स्वतः उत्तर पर्वतावर (हिमालयावर) निघून गेले. ॥ १३ १/२ ॥
स कृत्वा नैष्ठिकीं बुद्धिं जेतुकामो महायशाः ॥ १४ ॥

कौशिकीतीरमासाद्य तपस्तेपे दुरासदम् ।
तेथे त्या महायशस्वी मुनीने निश्चयात्मक बुद्धिचा आश्रय घेऊन कामदेवाला जिंकण्यासाठी कौशिकीच्या तटावर जाऊन दुर्जय तपस्येला आरंभ केला. ॥ १४ १/२ ॥
तस्य वर्षसहस्राणि घोरं तप उपासतः ॥ १५ ॥

उत्तरे पर्वते राम देवतानामभूद् भयम् ।
'श्रीरामा ! तेथे उत्तर पर्वतावर एक हजार वर्षेपर्यंत घोर तपस्येत मग्न असलेल्या विश्वामित्रांपासून देवतांना मोठे भय उत्पन्न झाले. ॥ १५ १/२ ॥
आमन्त्रयन् समागम्य सर्वे सर्षिगणाः सुराः ॥ १६ ॥

महर्षिशब्दं लभतां साध्वयं कुशिकात्मजः ।
सर्व देवता आणि ऋषि परस्पर एकत्र जमून विचार विनिमय करू लागले. - 'हे कुशिकनन्दन विश्वामित्र महर्षिंची पदवी प्राप्त करोत, हीच त्यांच्यासाठी सर्वोत्तम गोष्ट ठरेल. ॥ १६ १/२ ॥
देवतानां वचः श्रुत्वा सर्वलोकपितामहः ॥ १७ ॥

अब्रवीन्मधुरं वाक्यं विश्वामित्रं तपोधनम् ।
महर्षे स्वागतं वत्स तपसोग्रेण तोषितः ॥ १८ ॥

महत्त्वमृषिमुख्यत्वं ददामि तव कौशिक ।
देवतांचे म्हणणे ऐकून सर्वलोकपितामह ब्रह्मदेव तपोधन विश्वामित्रांजवळ गेले आणि मधुर वाणीने म्हणाले - ' महर्षे ! तुमचे स्वागत आहे. वत्सा कौशिका ! मी तुझ्या उग्र तपस्येने खूप संतुष्ट झालो आहे आणि तुला महत्ता आणि ऋषिंच्या मध्ये श्रेष्ठता प्रदान करीत आहे. ॥ १७-१८ १/२ ॥
ब्रह्मणस्तु वचः श्रुत्वा विश्वामित्रस्तपोधनः ॥ १९ ॥

प्राञ्जलिः प्रणतो भूत्वा प्रत्युवाच पितामहम् ।
महर्षिशब्दमतुलं स्वार्जितैः कर्मभिः शुभैः ॥ २० ॥
ब्रह्मदेवांचे हे वचन ऐकून तपोधन विश्वामित्र हात जोडून प्रणाम करून त्यांना म्हणाले - 'भगवन् ! जर आपल्या द्वारा उपार्जित शुभकर्मांच्या फलाने मला आपण ब्रह्मर्षिचे अनुपम पद प्रदान करू शकलात तर मी आपल्या स्वतःला जितेंद्रिय समजेन. ॥ १९-२० ॥
यदि मे भगवान्नाह ततोऽहं विजितेन्द्रियः ।
तमुवाच ततो ब्रह्मा न तावत् त्वं जितेन्द्रियः ॥ २१ ॥

यतस्व मुनिशार्दूल इत्युक्त्वा त्रिदिवं गतः ।
तेव्हां ब्रह्मदेवांनी म्हटले - "मुनिश्रेष्ठ ! अजून तुम्ही जितेंद्रिय झालेले नाही आहात. यासाठी प्रयत्‍न करा." असे म्हणून ते स्वर्गलोकास निघून गेले. ॥ २१ १/२ ॥
विप्रस्थितेषु देवेषु विश्वामित्रो महामुनिः ॥ २२ ॥

ऊर्ध्वबाहुर्निरालम्बो वायुभक्षस्तपश्चरन् ।
देवता निघून गेल्यावर महामुनि विश्वामित्र पुन्हा घोर तपस्या करू लागले. ते दोन्ही हात उंच करून कुठल्याही आधाराशिवाय उभे राहून केवळ वायु पिऊन तपात संलग्न झाले. ॥ २२ १/२ ॥
घर्मे पञ्चतपा भूत्वा वर्षास्वाकाशसंश्रयः ॥ २३ ॥

शिशिरे सलिलेशायी रात्र्यहानि तपोधनः ।
एवं वर्षसहस्रं हि तपो घोरमुपागमत् ॥ २४ ॥
उन्हाळ्याच्या दिवसात पंचाग्नि सेवन करीत असत. वर्षाकाली खुल्या आकाशाखाली राहात आणि हिवाळ्यात रात्रंदिवस पाण्यात उभे राहात असत. या प्रकारे त्या तपोधनांनी एक हजार वर्षे घोर तपस्या केली. ॥ २३-२४ ॥
तस्मिन् संतप्यमाने तु विश्वामित्रे महामुनौ ।
संतापः सुमहानासीत् सुराणां वासवस्य च ॥ २५ ॥
महामुनि विश्वामित्रांना या प्रकारे तपस्या करताना पाहून देवता आणि इंद्र यांच्या मनांत फार मोठा संताप झाला. ॥ २५ ॥
रम्भामप्सरसं शक्रः सह सर्वैः मरुद्‍गणैः ।
उवाचात्महितं वाक्यमहितं कौशिकस्य च ॥ २६ ॥
समस्त मरुद्‌गणांसहित इंद्रांनी त्या समयी रंभा नामक अप्सरेला उद्देशून ही गोष्ट सांगितली की जी स्वतःसाठी हितकर आणि विश्वामित्रासाठी अहितकारक होती. ॥ २६ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे त्रिषष्टितमः सर्गः ॥ ६३ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा त्रेसष्टावा सर्ग समाप्त झाला. ॥ ६३ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP