माहात्म्य

बालकाण्ड

अयोध्याकाण्ड

अरण्यकाण्ड

किष्किंधाकाण्ड

सुंदरकाण्ड

युद्धकाण्ड

उत्तरकाण्ड


॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


॥ श्रीमद् वाल्मीकि रामायणम् ॥


॥ प्रास्ताविक ॥


रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे ।
रघुनाथाय नाथा सीतायाः पतये नमः ॥
रामं रामानुजं सीतां भरतं भरतात्मजम् ।
सुग्रीवं वायुसूनुंच प्रणमामि पुनः पुनः ॥
वेदवेद्ये परे पुंसि जाते दशरथात्मजे ।
वेदः प्राचेतसादासीत् साक्षात् रामायणात्मना ॥वेद ज्या परमात्माचे वर्णन करतात तेच श्रीमन्नारायणतत्त्व श्रीमद्‌रामायणात श्रीरामरूपाने निवेदित आहे. वेदवेद्य परमपुरुषोत्तमाचे दशरथनंदन श्रीरामाच्या रूपामध्ये अवतरण झाल्यवर साक्षात् वेदच श्रीवाल्मीकिंच्या मुखातून श्रीरामायणरूपात प्रकट झाले, अशी आस्तिकांची चिरकालापासून मान्यता आहे. म्हणून श्रीमद्‌वाल्मीकीय रामायणास वेदतुल्यच प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. तसेच महर्षि वाल्मीकि आदिकवि आहेत, म्हणून विश्वातील समस्त कवींचे गुरु आहेत. त्यांचे 'आदिकाव्य' श्रीमद्‌वाल्मीकीय रामायण भूतलावरील प्रथम काव्य आहे. ती सर्वांसाठी पूज्य वस्तू आहे. भारतासाठी तर ती परम गौरवाची गोष्ट आहे आणि देशाचा खराखुरा बहुमूल्य राष्ट्रीय निधि आहे. या नात्यानेही ती सर्वांसाठी संग्रह, पठण, मनन आणि श्रवण करण्याची वस्तु आहे. याचे एकेक अक्षर महापातकाचा नाश करणारे आहे - एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् । तसेच हे समस्त काव्यांचे बीज आहे - काव्यबीजं सनातनम् ( बृहद्धर्म १.३०.४७)


पठं रामायणं व्यास काव्यबीजं सनातनम् । यत्र रामचरितं स्यात् तदहं तत्र शक्तिमान् ॥ (बृहद्धर्म १.३०.४७,५१) या उक्तीनुसार श्रीव्यासदेवादि सर्व कवींनी श्रीवाल्मीकि रामायणाचे अध्ययन करून पुराणे, महाभारत आदिंची निर्मिती केली आहे. हेच बृहद्धर्म पुराणात विस्ताराने सांगितले आहे. श्रीव्यासांनी अनेक पुराणांतून रामायणाचे माहात्म्य वर्णन केले आहे. स्कंदपुराणातील रामायणमाहात्म्य तर या ग्रंथाच्या आरंभीच दिलेले आहे. इतरत्रही काही ठिकाणी माहात्म्य वर्णन आढळते. श्रीव्यासांनी युधिष्ठिराच्या विनंतीवरून वाल्मिकी रामायणावर 'रामायणतात्पर्य दीपिका' नामक एक टीका लिहिली होती आणि तिची हस्तलिखित प्रत आजही उपलब्ध आहे (असे श्री. के. एस्. रामशास्त्री त्यांच्या 'Riddles in Ramayana' या ग्रंथात म्हणतात).


श्री वाल्मीकिंची आदिकवि म्हणून श्रद्धापूर्वक गौरवयुक्त वचने स्कंदपुराण, अध्यात्मरामायण, श्रीमद्‌भागवत, कालिदासांचे 'रघुवंश' इत्यादि अनेक ठिकाणी आढळतात. तसेच महाकवि भास, आचार्य शंकर, रामानुजाचार्य, राजा भोज, गोस्वामी तुलसीदास यांच्या साहित्यातून वाल्मीकिंचे आदिकवि म्हणून वारंवार श्रद्धापूर्वक स्मरण व कृतज्ञता प्रकट केली आहे.


महर्षि वाल्मीकिंचे संक्षिप्त चरीत्र


महर्षि वाल्मीकिंना काही लोक निम्न जातिचे मानतात. पण वाल्मीकि रामायण तसेच अध्यात्मरामायण येथे त्यांना प्रचेताचे पुत्र मानले गेले आहे. मनुस्मृतिनुसार प्रचेतस यास वसिष्ठ, भृगु आदिंचा बंधु म्हाटले आहे. स्कंदपुराणातून त्यांना जन्मांतरातील व्याध असे सांगितले गेले आहे. व्याध जन्माच्या आधीही ते 'स्तम्भ' नामक श्रीवत्सगोत्रीय ब्राह्मण होते. व्याध जन्मात शंख ऋषिंच्या सत्संगाने रामनामाच्या जपाने ते दुसर्‍या जन्मात 'अग्निशर्मा' (मतभेदानुसार 'रत्‍नाकर') या नावाने होते. नंतर सप्तर्षिंच्या सत्संगाने मरा मराचा दीर्घकाळ जप, अंगावर वारूळ वाढेपर्यंत केल्याने ते पुढे वाल्मीकि नामाने प्रसिद्ध झाले आणि त्यांनी वाल्मीकि रामायणाची रचना केली. कृतिवास रामायण (बंगाली), रामचरितमानस, अध्यात्मरामायण, आनंदरामायण, भविष्यपुराण येथेही थोड्याफार फरकाने अशाच आशयाचे वर्णन आढळते. यावरून त्यांना नीच जातिचे मानणे सर्वथा भ्रममूलक वाटते.


प्राचीन संस्कृत टीका


वाल्मिकी रामायणावर अगणित प्राचीन टीका आहेत. जसे - १. कतक टीका - ह्या टीकेचा नागोजी भट्ट तथा गोविन्द राजा आदिंनी बराच उल्लेख केला आहे; २. नागोजी भट्टांची तिलक अथवा रामाभिमानी व्याख्या; ३. गोविन्द राजांची भूषण टीका; ४. शिवसहायांची रामायण शिरोमणि व्याख्या (पूर्वोक्त तिन्ही टीका गुजराती प्रिंटींग प्रेस, मुंबईहून एकत्रच छापल्या आहेत; ५. माहेश्वर तीर्थांची तीर्थ व्याख्या अथवा तत्त्वदीप; ६. कन्दाल रामानुजांची रामानुजीय व्याख्या (वेंकटेश्वर प्रेस, मुंबई); ७. वरदराजकृत विवेकतिलक; ८ त्र्यंबकराज मखानीची धर्माकूत व्याख्या (ही खंडशः मद्रास व श्रीरंगमध्ये छापली आहे); आणि ९. रामानंद तीर्थ यांची रामायणकूट व्याख्या. या व्यतिरिक्त चतुरर्थ दीपिका, रामायणविरोध परिहार, रामायण सेतु, तात्पर्य तरणि, श्रुंगार सुधाकर, रामायणसारबिंब, मनोरमा आदि अनेक टीका आहेत. 'Readings in Ramayana' च्या नुसार इतक्याच टीका आणखीही आहेत. १. अहोबलाची 'वाल्मिकी-हृदय', तीनश्लोकी व्याख्या, त्यांच्या शिष्याची विरोधभञ्जिनी टीका, मध्वाचार्य यांची रामायण तात्पर्यनिर्णय व्याख्या, श्री अप्पय दीक्षितेन्द्र यांचीही याच नावाची एक अन्य व्याख्या (यात त्यांनी रामायणाला शिवपर सिद्ध केले आहे); प्रबालमुकुन्दसूरिची रामायणभूषण व्याख्या एवं श्रीरामभद्राश्रमांची सुबोधिनी टीका. डॉ. एम्. कृष्णमारींनी आपले पुस्तक - History of Classical Sanskrit Literature' यात काही अशा टीकांचा उल्लेख केला आहे की ज्यांच्या लेखकांचा पत्ता नाही. उदाहरणार्थ - अमृतकतक, रामायणसार दीपिका, गुरुबाला चित्तरंजिनी, विद्वन्मनोरंजिनी आदि. त्यांनी वरदराजाचार्यांची रामायणसारसंग्रह, देवरामभट्टांनी विषयपदार्थव्याख्या, नृसिंहशास्त्रींची कल्पवल्लीका, वेंकटाचार्यांची रामायणार्थप्रकाशिका, वेंकटाचार्यांचीच रामायणकथाविमर्श आदि व्याख्या ग्रंथांचाही उल्लेख केला आहे. या व्यतिरिक्त काही टीका 'मध्वविलास' यांच्या प्रतिमध्ये संग्रहीत आहेत. या ज्ञात असलेल्या सर्व टीका (व्याख्या) असून अज्ञात संस्कृत व्याख्या, हिंदीतील अनेकानेक द्वैत, अद्वैत, शुद्धाद्वैत, विशिष्टाद्वैतादि मतांचे अवलंबल करणार्‍या, आर्यसमाजी टीका, बंगाली, मराठी, गुजराती आदि विभिन्न प्रांतीय भाषा तसेच फ्रेंच, इंग्रजी आणि अन्य विदेशी भाषांमधून केले गेलेले अनुवाद, टीका-टिप्पणी यांवर तर काही बोलणेही अवघड आहे. कारण त्याचा पार लागणे दुरापास्त आहे.


रामायणाचे काव्य गुण आणि अन्य वैशिष्ट्ये -


काही विद्वानांनी येथपर्यंत म्हटले आहे की वाल्मिकी रामायणाच्या लक्षणांच्या आधारे दण्डी आदिंनी काव्यांची परिभाषा सांगितली आहे. त्र्यंबकराज मखानी यांनी सुंदरकाण्डाच्या व्याख्येमध्ये प्रायः सर्व श्लोकांतील अलंकार रसादियुक्त मानून काण्डाच्या नावाची सार्थकता दाखविली आहे. वास्तवही असेच आहे. सुंदरकाण्डाचा पाचवा सर्ग तर नितांत सुंदर आहेच. श्रीमखानींनी सर्वांची उदाहरणेही दिली आहेत. ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे की आदिकवींनी कुठल्याही प्राचीन काव्यास न पाहतां (न अभ्यासतां) वा कोणत्याही ग्रंथाचा आधार न घेता सर्वोत्तम काव्याची निर्मिती केली. त्यातील प्राकृतिक चित्रण तर सुंदर आहेच, संवाद देखील सर्वाधिक सुंदर आहेत. हनुमंताचा वार्तालाप, कुशलता तर सर्वत्र पहात राहावी अशीच आहे. श्रीरामांची प्रतिपादनशैली, दशरथांची संभाषणपद्धति, (उदा - अयोध्याकाण्ड २ रा सर्ग); एवढेच नव्हे तर कोठे कोठे रावणाचे कथनही ((युद्धकाण्ड १६ वा सर्ग) अत्यंत सुंदर आहे. त्यांनी ज्योतिषशास्त्रालाही परम प्रमाण मानले आहे. त्रिजटेचे स्वप्न, श्रीरामांचा यात्राकालातील मुहूर्तविचार, विभीषणद्वारा लंकेतील अपशकुनांचे प्रतिपादन (युद्धकाण्ड १० वा सर्व) आदि ज्योतिर्विज्ञानाचे ्ञापक आणि समर्थक आहेत. श्रीराम ज्यावेळी अयोध्येतून निघतात, तेव्हा नऊ ग्रह एकत्रित होतात (पहा - 'दारुणाः सोममभ्येत्य ग्रहाः सर्वे व्यवस्थिताः - अयोध्या. ४१.११ यावर तिलक तथा शिरोमणि व्याख्या) यामुळे लंकायुद्ध होते. दशरथ श्रीरामास ज्योतिष्यांच्याकडून आपल्या अनिष्टाचा फलादेश कळल्याची गोष्ट सांगतात (अयोध्या ४.१८ - 'अवश्टब्धं च मे राम नक्षत्रं दारुणग्रहैः । आवेदयन्तिं दैवज्ञाः सूर्याङ्‍कारकराहुभिः ॥) युद्धकाण्ड १०२.३२-३४ या श्लोकात रावणाच्या मरण समयीची ग्रहस्थितीही ध्येय आहे. युद्धकाण्डाच्या ९१ व्या सर्वात आयुर्वेदविज्ञानाचा उल्लेख मिळतो. युद्ध सर्ग १० वा तसेच सर्ग ६३ श्लोक २ ते २५ श्लोकापर्यंत राजनीतिमधील अत्यंत सारभूत अद्‍भुत गोष्टी आलेल्या आहेत. युद्धकाण्डा ७३.२४-२८ मध्ये तंत्रशास्त्राच्याही प्रक्रिया आहेत. यात रावण आणि मेघनाद यांना मोठे तांत्रिक असल्याचे दाखविले आहे. मेघनादाचे सर्व विजय तंत्रमूलक आहेत. ज्यावेळी तो जिवंत कृषमृग बळी देतो तेव्हा तप्त काञ्चनतुल्य अग्निच्या दक्षिणावर्त ज्वाला (शिखा) त्याला विजय सूचित करतात - प्रदक्षिणस्तप्तकाञ्चन सन्निभः । (६.७३.२३). रावणही तांत्रिक आहे. त्याच्या ध्वजेवर तांत्रिकाचे चिन्ह - नरशिरकपाल - मनुष्याच्या खोपडीचे चिन्ह होते (६.१००.१४). परंतु ऋषिगण त्याचा पराभव आदिद्वारा वाममार्गाच्या या बलि-मांस-सुरादि क्रियांची असमीचीनता प्रदर्शित करीत आहेत. (गोस्वामी तुलसीदासांनीही 'तजि श्रुति पंच बाम पथ चलहि । (अयोध्या १६८-७-८); ' कौल कामबस कृपन बिमूढा (लंका) आदिने याच गोष्टीचे समर्थन केले आहे). या प्रकारे आपल्याला महर्षिंच्या दृष्टीतून ज्योतिष, तंत्र, आयुर्वेद, शकुनादि शास्त्रांची प्राचीनता आणि समीचीनता ज्ञात होते. वस्तुतः हीच परम आस्तिक मनुष्याची दृष्टी असते. धर्मशास्त्रासाठी तर हा ग्रंथ परम प्रमाण आहेच, शिवाय अन्य ऐतिहासिक कथाही खूप आहेत. अर्थशास्त्राची देखील पर्याप्त सामग्री आहे. व्यवहार आणि आचारासंबंधीही गोष्टी आहेत. कुशल मार्गाचे देखील प्रदर्शन आहे.


पवित्र दार्शनिकता


महर्षि वाल्मिकींची अद्‍भुत कविता तसेच अन्यान्य महत्ता यांस त्यांची तपस्याच हेतु आहे. याबाबतीत वाल्मिकी रामायणच प्रमाण आहे. 'तपःस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्‍विदां वरम्' असा या काव्याचा 'तप' शब्दानेच आरंभ होत आहे. आणि प्रथम अर्धालीतच दोन वेळा 'तप' शब्द आला आणि तप शब्दाद्वारा महर्षिंनी एक प्रकारे आपले जीवन चरित्रच लिहिले आहे. तपद्वाराच त्यांना ब्रह्मदेवांचा साक्षात्कार झाला. रामायणाच्या दिव्य काव्यत्वाचा आशीर्वाद मिळाला आणि रामचरित्राचे दर्शनही झाले. नंतर विश्वामित्रांच्या विचित्र तपाचे वर्णन, गंगेच्या आगमनासाठी भगीरथाची अद्‍भुत तपस्या, चूलि ऋषिंची तपस्या, भृगुंची तपस्या आदिंचेही वर्णन आहे. त्यांच्या मताने स्वर्गादि सर्व सुखोपभोगांचा हेतु तप आहे. किमधिकं, रावणादिकांचे राज्य, सुख, शक्ति, आयु आदिंचे मूळही तप आहे. श्रीराम तर शुद्ध तपस्वी आहेत. ते तपस्व्यांच्या आश्रमात प्रवेश करतात, तेथे ते वैखानस, वालखिल्य, सम्प्रक्षाल, मरीचिप (केवळ चंद्रकिरणांचे पान करणारे), पत्राहारी, उन्मज्जक (सदा कंठापर्यंत पाण्यात बुडून राहून तपस्या करणारे), पञ्चाग्निसेवी, वायुभक्षी, जलभक्षी, स्थण्डिलशायी, आकाशविलयी एवं ऊर्ध्ववासी (पर्वत शिखर, वृक्ष, मचाण आदिंच्यावर निवास करणारे) तपस्व्यांना भेटतात. हे सर्वजण जपात लीन होते (अरण्यकाण्ड ६ वा सर्ग). त्यांचा जप संभवतः 'श्रीराम' मंत्र असावा कारण, त्यांतील अधिकांश लोकांनी श्रीरामांना पाहताच योगाग्निने शरीरत्याग केला. वस्तुतः काव्यविधि प्रमाणे कान्तासम्मित मधुर वाणीमध्ये वाल्मिकींचा हाच दार्शनिक उपदेश आहे. त्यांचे मूल तत्त्व याप्रकारे पवित्रतापूर्वक राहून तपोनुष्ठान करीत करीत ईश्वराची आराधना करावी आणि अधर्मापासून सदा दूर रहावे हीच आहे.


श्रीरामांची परब्रह्मता


काही विद्वान रामायणात नरचरित्र आहे असे मानतात आणि श्रीरामांना ईश्वर असे प्रतिपादन करणारे श्लोक प्रक्षिप्त मानतात. उदाहरणार्थ - बालकाण्ड १५ ते १८ सर्ग; सर्ग ७६ श्लोक १७-१९; अयोध्या १.७; अरण्य ३.३७; सुंदर २५.२७-३१; ५१-३८; युद्ध ५९.११०, ९५.२५ पूर्ण १११ तथा ११७ वा सर्ग; ११९.१८ व ३२ - यात सुस्पष्ट 'ब्रह्म' शब्द आला आहे. उत्तरकाण्ड ८.२६; ५१.१२ ते २२, १०४.४ आदि. बंग आणि पश्चिमी शाखांमध्येही हे सर्व श्लोक आहेत. एवढेच नव्हे तर कोठे कोठे याहूनही अधिक उदाहरणे आहेत. या हजारो वचनांना प्रक्षिप्त मानतात. परंतु लक्षपूर्वक वाचले असता श्रीरामांची ईश्वरता सर्वत्र दिसून येते. गंभीर चिंतनानंतर तर प्रत्येक श्लोकच श्रीरामांची अचिंत्य शक्तिमत्ता, लोकोत्तर धर्मप्रियता, आश्रित वत्सलता वगैरे ईश्वरतत्त्व प्रतिपादक दिसून येतात. विभीषण शरणगतिचे समयी तर कुठलेही ऐश्वर्य प्रदर्शक वचन आलेले नाही, तरीही श्रीरामांचे अप्रतिम मार्दव, कपोताच्या आतिथ्य सत्काराचे उदाहरण देणे, परमर्षि कण्डुची गाथा सांगणे आणि आपल्याला शरण येणार्‍या समस्त प्राण्यांना इतर समस्त प्राण्यांपासून अभयदान देणाच्या स्वाभविक नियमाची घोषणा करणे (येथे सर्वभूतेभ्यः मध्ये प्रायः सर्व प्राचीन टीकाकारांनी चतुर्थी आणि पंचमी दोन्ही विभक्ति मानून या पदाचा दोन वेळा अर्थ केला आहे). आणि त्यानंतर प्रतिवादी सुग्रीवाला विवश होऊन असे म्हणावेच लागले की, 'धर्मज्ञ ! लोकनाथांचे शिरोमणि ! आपल्या या कथनात आश्चर्य करण्यासारखे काही नाही कारण, आपण महान् शक्तिशाली आणि सत्पथावर आरूढ आहात. 'किमत्र चित्रं धर्मज्ञ शिरोमणे । यत् त्वमार्य प्रभाषेथाः सत्त्ववान् सत्पथे स्थितः ॥ (६.१८.३६).


अशाच प्रकारे हनुमंताने सीतेसमोर तथा रावणासमोर जे श्रीरामांचे गुणवर्ण केले आहे त्यात त्यांना ईश्वर म्हटलेले नाही, परंतु 'श्रीरामांत हे सामर्थ्य आहे की ते एकाच क्षणात समस्त स्थावर जंगमात्मक विश्वाचा संहार करून दुसर्‍याच क्षणी पुन्हा या संसारास जशाच्या तसा निर्माण करू शकतात. या कथनात काय ईश्वरतेचा भाव सुस्पष्ट होत नाही का ? किती स्पष्ट आहे -
सत्यं राक्षसराजेंद्र शृणुश्व वचनं मम ।
रामदासस्य दूतस्य वानरस्य विशेषतः ॥
सर्वान् लोकान् सुसंहृत्य सभूतान् सचराचरान् ।
पुनरेव तथा स्रष्टुं शक्तो रामो महायशाः ॥ (सुंदर ५१.३८-३९)


खरी गोष्ट तर ही आहे की, तपस्वी वाल्मिकी 'राम'चाच जप करणारे (जापक) होते. त्यांच्या 'मरा, मरा' जपण्याची कथाही कित्येकांनी निर्मूल मानली आहे. परंतु अशी कथा अध्यात्मरामायण- अयोध्याकाण्ड, आनन्द रामायण रज्यकाण्ड १४ तथा स्कन्दपुराणातही आलेली आहे, तुलसीदास आदिंनी लिहिले आहे). यामुळेच त्यांना तसेच इतरांनाही सर्व सिद्धि प्राप्त झाल्या होत्या. म्हणून या ग्रंथात 'श्रीमन्नारायणा'चेच काव्यरूप वर्णन केले आहे अन्यथा तत्कालीन कन्द मुळे व फळे खाऊन राहणार्‍या वनवासी व सर्वथा निरपेक्ष तपस्व्याला कुणा राजाच्या चरित्र वर्णनाने काही लाभ मिळणार नव्हता. 'योगवासिष्ठ'मध्येही, जी महर्षिंची दुसरी विशाल रचना आहे, त्यांनी गुप्तरूपाने श्रीरामाचेच विस्तृत चरित्र गायले आहे. परंतु प्रथम अध्यायात तथा अन्यत्रही जागोजागी नारायणत्वाचे स्पष्ट प्रतिपादन केले आहे. वस्तुतः प्रेमाची मधुरता त्याच्या गूढतेमध्ये आहे. देवतांसंबंधी तर हे प्रसिद्धही आहे की ते 'परोक्षप्रिय' असतात - 'परोक्षप्रिया इव हि देवाः, प्रत्यक्षद्विषः' (ऐतरेय उप. १.३.१४; बृहद् ४.२.२.). म्हणून महर्षिंची ही वर्णनशैली गूढ प्रेमाचीच आहे; परंतु साधकासाठी ती सर्वत्र स्पष्टच आहे, तिरोहित नाही. यावर प्रायः शेकडो संस्कृत व्याख्या याच्या साक्षी आहेत.


ऐतिहासिक दृष्टि


वाल्मिकींचे वर्णन आधुनिक ऐतिहासिक शैलीने केलेले नाही, म्हणून लोक त्यांना ऐतिहासिक रूपात स्वीकारत नाहीत. परंतु वाल्मिकींचा संसार हजार, दोन हजार वर्षांचा नव्हता. मग भले अर्व (अब्ज) वर्षांचा इतिहास आजच्या विकासाच्या चष्म्याने वाचता येणे कसे शक्य आहे ? अशा स्थितीमध्ये केवळ उपयोगी व्यक्तिंचाच इतिहास लाभदायक ठरतो. म्हणून आपल्याकडे इतिहासाची परिभाषाच वेगळी केली गेली आहे -

धर्मार्थकाम मोक्षाणां उपदेशसमन्वितम् ।
पूर्ववृत्तं कथायुक्तं इतिहासं प्रचक्षते ॥ (विष्णुधर्म ३.१५.१)


रामायणात भूगोलावरही बरेच अनुसंधान झाले आहे. कल्याणचा 'रामायणाङ्क', Cunningham ची Ancient Dictionary व Dey यांची Geographical Dictionary यात यावर बरेच संशोधन आहे. कित्येक लोकांनी स्वतंत्र लेखही लिहिले आहेत. लंडनच्या Asiatic Society Journal मध्ये एक महत्त्वाचा लेख छापला होता. 'वेद धरातल' (पं. गिरिशचंद्र) यातही काही चांगली सामग्री आहे. केवळ 'लंके'वर अनेक प्रबंध आहेत. 'सर्वेश्वर' च्या एका लेखात मालद्विपला लंका सिद्ध केले आहे. काही लोक तिला ध्वस्त, मज्जित अथवा दुर्ज्ञेय मानतात. वा.रा. १.२२ मध्ये उल्लेखिलेली कौशाम्बी प्रयागपासून १४ मैल दक्षिण-पश्चिम दिशेस कोसम नामक गाव आहे. धर्मारण्य ही आजची गया आहे. कुशनाभाचे महोदयनगर त्याच्या कन्यांच्या कुब्ज होण्यामुळे पुढे कान्यकुब्ज व त्याचेच परत कनौज झाले. गिरिव्रज हे आजचे राजगिर (बिहार) आहे. १.२४ मधील मलद करुष आता आरा जिल्ह्याचा उत्तरी भाग आहे. केकयदेश काही लोक 'गजनी'ला तर काही झेलम एवं कीकनाला म्हणतात. बालकाण्ड २.३-४ मध्ये उल्लेखिलेली तमसा नदी, जिच्या काठी वाल्मिकींचा आश्रम होता; ही दुसरी एक तमसा नदी, जिचा उल्लेख गंगेच्या उत्तरेस व अयोध्येच्या दक्षिणेस असा मिळतो, त्याहून सर्वथा भिन्न आहे. वाल्मिकी आश्रमाचा उल्लेख २.५६.१६ मध्येही आला आहे. पश्चिमोत्तर शास्त्रीय रामायणाच्या २.११४ मध्ये देखील या आश्रमाचा उल्लेख आहे. बी. एच्. वडेर यांनी कल्याणचा रामायणाङ्कात (पृष्ठ ४९६) हा प्रयागपासून २० मैल दक्षिणेस आहे असे लिहिले आहे. सम्मेलनपत्रिका ४३/२ च्या पृष्ठ १३३ वर वाल्मिकी आश्रम प्रयाग - झांसीरोड व राजापुर - माणिकपुर रोडच्या संगमावर स्थित असल्याचे सांगितले आहे. गोस्वामी तुलसीदासांच्या मताप्रमाणे वाल्मिकींचा आश्रम वारिपुर दिग्‌पुरच्या मध्ये (विलसतिभूमि) होता. मूल गोसाई चरित्रकार 'दिग्‌वारिपुरा मधील सीतामढी' ला वाल्मिकी आश्रम मानतात. २.५६.१६ च्या टीकेत कतक, तीर्थ, गोविन्दराज, शिरोमणिकार आदि याचे विवरण करताना लिहितात की महर्षि प्रायः हिंडत राहात असत. श्रीरामांच्या वनवासाच्या वेळी ते चित्रकूटाच्या समीप आणि राज्यारोहण काळात गंगातटावर बिठूर येथे राहात होते. वा.रा ७.६६.१ तथा ७.७१.१४ यावरूनही वाल्मिकाश्रम बिठूर येथेच सिद्ध होत आहे. अन्य विवरण प्रायः प्रस्तुत ग्रंथाच्या टिप्पणीमध्ये दिले गेले आहे.


रामायणात राजनीति, मनोविज्ञान


वाल्मिकी वर्णित राजनीति अत्यंत उच्च कोटीची आहे. तिच्यापुढे सर्व राजनैतिक विचार तुच्छ प्रतीत होतात. हनुमंताचे ठिखाणी तर नीतिची मूर्तिच भासते. विभीषण आल्यावर श्रीराम सर्वांची सम्मती मागतात. सुग्रीव म्हणतात की हा शत्रूचाच बंधु आहे. कळत नाही की आता हा अकस्मात इथे येऊन आपल्या सैन्यात प्रवेश मिळण्याची इच्छा कां करीत आहे ? संभवतः संधि मिळताच घुबड जसे कावळ्यांचा वध करून टाकते तसा हा आपल्यालाही मारून टाकील. प्रकृतिने राक्षस आहे, त्याचा काय विश्वास ? शिवाय या बरोबरच अशी नीति आहे की मित्राने धाडलेली, विकत घेतलेली अथवा जंगली जातिंची सहायता ही ग्राह्य आहे पण शत्रूची मदत तर सदा शंका घेण्याजोगी आहे. अंगदाने असेच मत मांडले. जाम्बवानानेही म्हटले की याला अवेळी आलेला पाहून मोठी शंका येत आहे. शरभाने सांगितले की याच्यावर गुप्त पहारा ठेवावा. अश्विनीकुमार मैन्द म्हणाला की प्रश्न - प्रतिप्रश्न केल्याने त्याच्या उत्तरांवरून त्याचा भाव जाणता येईल.


पण हनुमंताने याचे असे काही खंडन केले आहे, जे आजही अभूतपूर्व आहे. ते म्हणाले, "प्रभो ! आपल्या समक्ष तर बृहस्पतीचे भाषणही तुच्छ आहे. पण आपली आज्ञा शिरोधार्य आहे. मी विवाद, तर्क, स्पर्धा आदि कारणांमुळे नव्हे तर कार्याची गुप्तता (महत्त्व) पाहून काही निवेदन करू इच्छितो. 'आपल्या मंत्र्यांपैकी काहींनी विभीषणाच्या मागे गुप्तचर लावण्याचा सल्ला दिला आहे, पण गुप्तचर तर दूर राहणार्‍या आणि अदृष्ट अज्ञातवृत्त व्यक्तिंच्या मागे लावले जातात, आणि हा तर प्रत्यक्ष येथे समोरच आहे. आपले नाम, काम देखील स्वयं सांगत आहे. येथे गुप्तचराचा काय उपयोग ? कोणी म्हणतात 'अदेशकाळी आल आहे', पण मला तर वाटते की हाच याच्या येण्याचा योग्य देशकाल आहे. आपल्या द्वारे वालि मारला गेला आणि सुग्रीवाला अभिषेक झाला हे ऐकून आपला परम शत्रू आणि वालीचा मित्र रावण याच्या संहरासाठीच आला आहे. म्हणून त्याला प्रश्न करण्याची गोष्टही दोषयुक्त दिसते. कारण त्यामुळे त्याच्या मैत्रीभावास बाधा येईल, आणि ते मित्र दूषित करण्याचे कार्य होईल. तसेही आपण त्याच्याशी काहीही बोलताना त्याचा स्वरभेद, आकार, मुखविक्रिया आदिवरून त्याचे मन जाणून घ्यालच. म्हणून मी माझ्या तुच्छ बुद्धिला अनुसरून हे थोडेसे निवेदन केले आहे. प्रमाण तर आपण स्वतःच आहात.' याचप्रकारे त्यांच्या लंका प्रवेशानंतरचा १३ व्या सर्गातील विमर्श, सीतेशी बोलण्यापूर्वी 'कोणत्या भाषेत कशाप्रकारे बोलावे' इत्यादि परामर्श, तसेच सीतेशी बोलून परत फिरतेवेळी दूताचे कर्तव व लंकेच्या बलाबलाची माहिती मिळविण्यासाठी केलेला ऊहापोह, सुग्रीव भोगालिप्त झालेला पाहून त्याला दिलेला परामर्श, तसेच रावणाला जो उपदेश केला त्यामध्ये अपूर्व नीतिमत्ता, रामभक्ति, विचार प्रवणता, साधुता आणि अप्रतिम बुद्धिमत्ता प्रकट झाली आहे. या सर्व कारणांमुळेच त्यांना 'बुद्धिमतां वरिष्ठम्' म्हटले गेले आहे. स्वयं श्रीराम देखील त्याचे भाषणचातुर्य, बुद्धि कौशल्य यामुळे चकित होतात (किष्किंधा ४.२५-३५, युद्ध १). श्रीरामाची नीतिमत्ता, साधुता, सद्‍गुणसंपन्नता तर सर्वतोपरी वर्णन केलेली आहेच. श्रीलक्ष्मणही काही कमी नाहीत. ते मारीच राक्षस आहे असे पहिल्यापासून सांगून सावध करतात. सीतेला वारंवार सांगतात की 'श्रीरामावर काहीही संकट आलेले नाही, आपल्यावरच संकट आलेले दिसते आहे. ही सर्व राक्षसांची माया आहे' इत्यादि. या प्रकारे विभीएषण आदिंच्या गोष्टीही ठिकठिकाणी पाहण्यासारख्याच आहेत.


उपसंहार


आतापर्यंत विचार केलेल्या सर्व गुणांचे आगर असल्यामुळे हे काव्य सर्वाधिक लोकप्रिय, अजर, अमर, दिव्य आणि कल्याणकर आहे. संतांच्या शब्दात हे 'रामायण रामतनु' आहे. याचे पठण, मनन, अनुष्ठान साक्षात् प्रभु श्रीरामांचे सान्निध्य प्राप्त करविणारे आहे. हनुमंताच्या प्रसन्नतेसाठी श्रीरामचरिताच्या गानाहून अन्य उपाय नाही. यांतील हनुमान चरित्रही निरुपम उज्ज्वल तथा दिव्य आहे. म्हणून अनादि कालापासून याचे श्रवण - पठण, अनुष्ठान आदिची परंपरा आहे. रामलीलेचाही प्रथम हाच आधार होता. यदुवंशियांच्या द्वारे हरिवंशात रामायण नाटक खेळले गेल्याचे उल्लेख आहे. हनुमाननाटक, प्रसन्नराघवनाटक, अनर्घराघवनाटक, महानाटक, बालरामायण नाटक असे अनेक रामलीला नाटक ग्रंथ लिहिले गेले आहेत. या सर्व नाटक ग्रंथांचा एकमात्र आधार वाल्मिकी रामायणच आहे. वाल्मिकी रामायण आणि रामकथांचा प्रचार, विस्तार जावा, बाली आदि द्विपांपर्यंत झाला. भारतात याचे चार पाठे प्रचलित आहेत. पश्चिमोत्तर शाखा - लाहोरचे १९३१ चे संस्करण, वंग शाखीय - गोरेशियाचे संस्करण (Gorresio's edition), दाक्षिणात्य संस्करण (कुम्भकोणम् संस्करण), आणि उत्तर भारताचे (काश्मिरी) संस्करण. यात दाक्षिणात्य तथा औदिच्य संस्करण एकजुळते असून अगदी नाममात्राचाही फरक नाही. पश्चिम पूर्व संस्करणामध्ये अध्यायांचे अंतर आहे पण त्यावर कोणतीही संस्कृत टीका मिळत नाही. वंग शाखेवर केवळ एकमात्र (लोकनाथ रचित मनोरमा) टीका मिळते. म्हणून दाक्षिणात्य संस्करणाचाच (म्हणजे औदिच्य) सर्वत्र प्रचार आणि प्रामाण्य आहे. गीताप्रेसकडे जनतेची मागणी होती म्हणून दाक्षिणात्य पाठाचे शुद्ध, सचित्र, सटीक व स्वस्त संस्करण हिंदी अनुवादासह गीताप्रेसने प्रकाशित केले आहे, तसेच केवळ हिंदीचेही एक संस्करण केले आहे. आता त्याच हिंदी संस्करणाचा हा मराठी अनुवाद उपलब्ध केला जात आहे. भाविक याचा यथायोग्य लाभ करून घेतीलच.


या प्रास्ताविकासहित श्रीवाल्मीकि रामायणाचा मराठी अनुवाद सांगली निवासी श्रीमति कमलताई वैद्य यांनी केला आहे.GO TOP