श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ षड्‌विंश: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

सारणेन रावणं प्रति पृथक्-पृथग् वानरयूथपतीनां परिचयदानम् - सारणाने रावणाला पृथक- पृथक वानरयूथपतिंचा परिचय देणे -
तद्वचः पथ्यमक्लीबं सारणेनाभिभाषितम् ।
निशम्य रावणो राजा प्रत्यभाषत सारणम् ॥ १ ॥
शुक आणि सारण यांचे ते खरे आणि आवेशपूर्ण शब्द ऐकून रावणाने सारणाला म्हटले- ॥१॥
यदि मामभियुञ्जीरन् देवगंधर्वदानवाः ।
नैव सीतां प्रदास्यामि सर्वलोकभयादपि ॥ २ ॥
जरी देवता, गंधर्व आणि दानव माझ्याशी युद्ध करावयास येतील आणि समस्त लोक भय दाखवू लागतील तरीही मी सीतेला परत देणार नाही. ॥२॥
त्वं तु सौम्य परित्रस्तो हरिभिः पीडितो भृशम् ।
प्रतिप्रदानमद्यैव सीतायाः साधु मन्यसे ॥ ३ ॥

को हि नाम सपत्‍नो् मां समरे जेतुमर्हति ।
सौम्य ! असे कळून येत आहे की वानरांनी तुला फारच त्रास दिला आहे आणि यामुळे भयभीत होऊन तू आजच सीतेला परत देणेच ठीक समजू लागला आहेस. असा कोण शत्रु आहे की जो समरांगणात मला जिंकू शकेल ? ॥३ १/२॥
इत्युक्त्वा परुषं वाक्यं रावणो राक्षसाधिपः ॥ ४ ॥

आरुरोह ततः श्रीमान् प्रासादं हिमपाण्डरम् ।
बहुतालसमुत्सेधं रावणोऽथ दिदृक्षया ॥ ५ ॥
असे कठोर वचन बोलून श्रीमान्‌ राक्षसराज रावण वानरांच्या सेनेचे निरीक्षण करण्यासाठी आपल्या कित्येक ताल उंचीच्या आणि बर्फाप्रमाणे श्वेत रंगाच्या अट्टालिकेवर चढला. ॥४-५॥
ताभ्यां चराभ्यां सहितो रावणः क्रोधमूर्च्छितः ।
पश्यमानः समुद्रं च पर्वतांश्च वनानि च ॥ ६ ॥

ददर्श पृथिवीदेशं सुसंपूर्णं प्लवंगमैः ।
त्यावेळी रावण क्रोधाने बेभान झाला होता. त्याने त्या दोन्ही गुप्तचरांच्या बरोबर जेव्हा समुद्र, पर्वत आणि वनांवर दृष्टिपात केला तेव्हा पृथ्वीचा सारा प्रदेश वानरांनी भरून गेलेला दिसून आला. ॥६ १/२॥
तदपारमसह्यं च वानराणां महद्‌बलम् ॥ ७ ॥

आलोक्य रावणो राजा परिपप्रच्छ सारणम् ।
वानरांची ती विशाल सेना अपार आणि असह्य होती. ती पाहून राजा रावणाने सारणाला विचारले- ॥७ १/२॥
एषां वानरमुख्यानां के शूराः के महाबलाः ॥ ८ ॥
सारणा ! या वानरांमध्ये कोण कोण मुख्य आहेत ? कोण शूरवीर आहेत आणि कोण बळामध्ये वरचढ आहेत ? ॥८॥
के पूर्वमभिवर्तन्ते महोत्साहाः समन्ततः ।
केषां शृणोति सुग्रीवः के वा यूथपयूथपाः ॥ ९ ॥

सारणाचक्ष्व मे सर्वं किं प्रभावाः प्लवंगमाः ।
कोण कोण वानर महान्‌ उत्साहाने संपन्न होऊन युद्धात पुढे-पुढे राहातात ? सुग्रीव कोणाचे म्हणणे ऐकतो आणि कोण यूथपतिंचा ही यूथपति आहे ? सारणा ! ह्या सर्व गोष्टी मला सांग. याच बरोबर हेही सांग की त्या वानरांचा प्रभाव कसा आहे ? ॥९ १/२॥
सारणो राक्षसेन्द्रस्य वचनं परिपृच्छतः ॥ १० ॥

आचचक्षेऽथ मुख्यज्ञो मुख्यांस्तत्र वनौकसः ।
याप्रकारे विचारणार्‍या राक्षसराज रावणाचे वचन ऐकून मुख्य-मुख्य वानरांना जाणणार्‍या सारणाने त्या मुख्य वानरांचा परिचय देत असता म्हटले- ॥१० १/२॥
एष योऽभिमुखो लङ्‌कां नर्दंस्तिष्ठति वानरः ॥ ११ ॥

यूथपानां सहस्राणां शतेन परिवारितः ।
यस्य घोषेण महता सप्राकारा सतोरणा ॥ १२ ॥

लङ्‌का प्रतिहता सर्वा सशैलवनकानना ।
सर्वशाखामृगेन्द्रस्य सुग्रीवस्य महात्मनः ॥ १३ ॥

बलाग्रे तिष्ठते वीरो नीलो नामैष यूथपः ।
महाराज ! हा जो लंकेकडे तोंड करून उभा आहे आणि गर्जत आहे, एक लाख यूथपांनी घेरलेला आहे आणि ज्याच्या गर्जनेच्या अत्यंत गंभीर घोषाने तटबंदी, दरवाजे, पर्वत आणि वनांसहित सारी लंका प्रतिहत होऊन निनादत आहे याचे नाव नील आहे. हा वीर यूथपतिंच्या पैकी आहे. समस्त वानरांचे राजे महामना सुग्रीव यांच्या सेनेच्या पुढे हाच उभा असतो. ॥११-१३ १/२॥
बाहू प्रगृह्य यः पद्‌भ्यां महीं गच्छति वीर्यवान् ॥ १४ ॥

लङ्‌कामभिमुखः कोपाद् अभीक्ष्णं च विजृंभते ।
गिरिशृङ्‌गप्रतीकाशः पद्मकिञ्जल्कसन्निभः ॥ १५ ॥

स्फोटयत्यतिसंरब्धो लाङ्‌गूलं च पुनःपुनः ।
यस्य लाङ्‌गूलशब्देन स्वनन्ति प्रदिशो दश ॥ १६ ॥

एष वानरराजेन सुग्रीवेणाभिषेचितः ।
युवराजोऽङ्‌गदो नाम त्वामाह्वयति संयुगे ॥ १७ ॥
जो पराक्रमी वानर दोन्ही भुजा उचलून एकीने दुसरीला धरून ठेवून दोन्ही पायांनी पृथ्वीवर फिरत आहे, लंकेकडे मुख करून क्रोधपूर्वक पहात आहे आणि वारंवार जांभई देत आहे, ज्याचे शरीर पर्वतशिखरासमान उंच आहे, ज्याची कांती कमळकेसराप्रमाणे सोनेरी रंगाची आहे, जो रोषाने भरून वारंवार आपले पुच्छ आपटत आहे आणि ज्याच्या पुच्छ आपटाण्याच्या आवाजाने दाही दिशा निनादत आहेत तो हा युवराज अंगद आहे. वानरराज सुग्रीवाने याचा युवराजपदावर अभिषेक केला आहे. हा आपल्या बरोबर युद्ध करण्यासाठी आपल्याला आव्हान देत आहे. ॥१४-१७॥
वालिनः सदृशः पुत्रः सुग्रीवस्य सदा प्रियः ।
राघवार्थे पराक्रान्तः शक्रार्थे वरुणो यथा ॥ १८ ॥
वालीचा हा पुत्र आपल्या पित्यासमानच बलशाली आहे. सुग्रीवाला हा सदाच प्रिय आहे. जसे वरुण इंद्रासाठी पराक्रम प्रकट करतात, त्याच प्रकारे हा राघवांसाठी आपला पुरुषार्थ करण्यासाठी उद्यत आहे. ॥१८॥
एतस्य सा मतिः सर्वा यद् दृष्टा जनकात्मजा ।
हनूमता वेगवता राघवस्य हितैषिणा ॥ १९ ॥
राघवांचे हित इच्छिणार्‍या हनुमानाने येथे येऊन जे जनकनंदिनी सीतेचे दर्शन केले त्यामध्ये या अंगदाचीच सारी बुद्धि काम करीत होती. ॥१९॥
बहूनि वानरेन्द्राणां एष यूथानि वीर्यवान् ।
परिगृह्याभियाति त्वां स्वेनानीकेन मर्दितुम् ॥ २० ॥
पराक्रमी अंगद वानर शिरोमणींचे बरेचसे यूथ घेऊन आपल्या सेनेसह आपल्याला चेचून टाकण्यासाठी येत आहे. ॥२०॥
अनु वालिसुतस्यापि बलेन महता वृतः ।
वीरस्तिष्ठति संग्रामे सेतुहेतुरयं नलः ॥ २१ ॥
अंगदाच्या मागे संग्राम भूमीमध्ये जो वीर विशाल सेनेने घेरलेला उभा आहे, याचे नाव नल आहे. हाच सेतु निर्मितीचा प्रधान हेतु आहे. ॥२१॥
ये तु विष्टभ्य गात्राणि क्ष्वेलयन्ति नदन्ति च ।
उत्थाय च विजृंभन्ते क्रोधेन हरिपुंगवाः ॥ २२ ॥

एते दुष्प्रसहा घोराः चण्डाश्चण्डपराक्रमाः ।
अष्टौ शतसहस्राणि दशकोटिशतानि च ।
य एनमनुगच्छन्ति वीराश्चन्दनवासिनः ॥ २३ ॥

एषैवाशंसते लङ्‌कां स्वेनानीकेन मर्दितुम् ।
जे आपल्या अंगांना सुस्थिर करून सिंहनाद करत आहेत आणि गर्जत आहेत तसेच जे कपिश्रेष्ठ वीर आपल्या आसनांवरून उठून क्रोधाने जांभाई देत आहेत, यांचा वेग सहन करणे अत्यंत कठीण आहे. ते फार भयंकर, अत्यंत क्रोधी आणि प्रचंड पराक्रमी आहेत. यांची संख्या दहा अरब आणि आठ लाख आहे. हे सर्व वानर तसेच चंदनवनात निवास करणारे वीर वानर या यूथपति नलाचेच अनुसरण करतात. हा नल आपल्या सेने द्वारा लंकापुरीला चिरडून टाकण्याचा उत्साह बाळगून आहे. ॥२२-२३ १/२॥
श्वेतो रजतसंकाशः चपलो भीमविक्रमः ॥ २४ ॥

बुद्धिमान् वानरो वीरः त्रिषु लोकेषु विश्रुतः ।
तूर्णं सुग्रीवमागम्य पुनर्गच्छति वानरः ॥ २५ ॥

विभजन् वानरीं सेनां अनीकानि प्रहर्षयन् ।
हा जो चांदीच्या सारखा पांढरा रंगाचा चंचल वानर दिसून येत आहे, याचे नाव श्वेत आहे. हा भयंकर पराक्रम करणारा, बुद्धिमान्‌, शूरवीर आणि तीन्ही लोकात विख्यात आहे. श्वेत अत्यंत वेगाने सुग्रीवाजवळ जाऊन परत जात असतो. हा वानर सेनेचे विभाग करतो आणि सैनिकांमध्ये हर्ष आणि उत्साह भरतो. ॥२४-२५ १/२॥
यः पुरा गोमतीतीरे रम्यं पर्येति पर्वतम् ॥ २६ ॥

नाम्ना संरोचनो नाम नानानगयुतो गिरिः ।
तत्र राज्यं प्रशास्त्येष कुमुदो नाम यूथपः ॥ २७ ॥
गोमतीच्या तटावर जे नाना प्रकारच्या वृक्षांनी युक्त संरोचन नामक पर्वत आहेत त्याच रमणीय पर्वतांच्या चारी बाजूस जो पूर्वी विचरत असे आणि तेथेच आपल्या वानरराज्याचे शासन करीत आहे, तोच हा कुमुद नामक यूथपति आहे. ॥२६-२७॥
योऽसौ शतसहस्राणां सहर्षं परिकर्षति ।
यस्य वाला बहुव्यामा दीर्घा लाङ्‌गूलमाश्रिताः ॥ २८ ॥

ताम्राः पीताः सिताः श्वेताः प्रकीर्णा घोरदर्शनाः ।
अदीनो वानरश्चण्डः संग्राममभिकाङ्‌क्षति ।
एषोऽप्याशंसते लङ्‌कां स्वेनानीकेन मर्दितुम् ॥ २९ ॥
तो जो लाखो वानर-सैनिकांना सहर्ष आपल्या बरोबर ओढून आणत आहे, ज्याच्या लांब शेपटीत बरेचसे मोठे मोठे लाल, पिवळे, भूर्‍या आणि पांढरे रंगाचे केस पसरलेले आहेत आणि जो दिसण्यात फार भयंकर आहे तसेच जो कधी दीनता दाखवत नाही सदा युद्धाचीच इच्छा बाळगतो, त्या वानराचे नाव चंद आहे. हा चंदही आपल्या सेनेद्वारा लंकेला चिरडून टाकण्याची इच्छा बाळगून आहे. ॥२८-२९॥
यस्त्वेष सिंहसंकाशः कपिलो दीर्घकेसरः ।
निभृतः प्रेक्षते लङ्‌कां दिधक्षन्निव चक्षुषा ॥ ३० ॥

विन्ध्यं कृष्णगिरिं सह्यं पर्वतं च सुदर्शनम् ।
राजन् सततमध्यास्ते रम्भो नामैष यूथपः ।
शतं शतसहस्राणां त्रिंशच्च हरिपुंगवाः ॥ ३१ ॥

यं याम्तं वानराः घोराः चण्डाश्चण्डपराक्रमाः ।
परिवार्यानुगच्छन्ति लङ्‌कां मर्दितुमोजसा ॥ ३२ ॥
राजन्‌ ! जो सिंहासमान पराक्रमी आणि कपिल वर्णाचा आहे, ज्याच्या मानेवर लांब लांब केस आहेत आणि जो ध्यान लावून लंककडे अशा प्रकारे पहात राहिला आहे की जणु हिला भस्म करून टाकील, तो रंभ नामक यूथपति आहे. तो निरंतर विंध्य, कृष्णगिरि, सह्य आणि सुदर्शन आदि पर्वतांवर रहात असतो. जेव्हा तो युद्धासाठी निघतो त्यावेळी त्याच्या मागे एक कोटी तीस श्रेष्ठ भयंकर, अत्यंत क्रोधी आणि प्रचंड पराक्रमी वानर चालतात. ते सर्वच्या सर्व आपल्या बळाने लंकेला चिरडून टाकण्यासाठी रंभाला सर्व बाजूनी घेरून इकडे येत आहेत. ॥३०-३२॥
यस्तु कर्णौ विवृणुते जृंभते च पुनःपुनः ।
न च संविजते मृत्योः न च सेनां प्रधावति ॥ ३३ ॥

प्रकंपते च रोषेण तिर्यक् च पुनरीक्षते ।
पश्यन् लाङ्‌गूलविक्षेपं च क्ष्वेडत्येष महाबलः ॥ ३४ ॥
जो कानांना पसरवित आहे, वारंवार जांभई देत आहे, मृत्युलाही भीत नाही आणि सेनेच्या मागे न जाता अर्थात्‌ सेनेचा भरवसा न धरता एकटाच युद्ध करू इच्छितो, रागाने जो थरथर कापत आहे, तिरक्या नजरेने पहात आहे आणि शेपटी आपटून सिंहनाद करत आहे याचे नाव शरभ आहे. पहा, हा महाबली वानर कशी गर्जना करत आहे ? ॥३३-३४॥
महाजवो वीतभयो रम्यं साल्वेयपर्वतम् ।
राजन् सततमध्यास्ते शरभो नाम यूथपः ॥ ३५ ॥
ह्याचा वेग महान्‌ आहे. भय तर याला स्पर्शही करत नाही. राजन्‌ ! हा यूथपति शरभ सदा रमणीय साल्वेय पर्वतावर निवास करतो. ॥३५॥
एतस्य बलिनः सर्वे विहारा नाम यूथपाः ।
राजन् शतसहस्राणि चत्वारिंशत् तथैव च ॥ ३६ ॥
याच्याजवळ जे यूथपति आहेत त्या सर्वांची विहार संज्ञा आहे. ते फार बलवान्‌ आहेत. राजन्‌ त्यांची संख्या एक लाख चाळीस हजार आहे. ॥३६॥
यस्तु मेघ इवाकाशं महानावृत्य तिष्ठति ।
मध्ये वानरवीराणां सुराणामिव वासवः ॥ ३७ ॥

भेरीणामिव सन्नादो यस्यैष श्रूयते महान् ।
घोषः शाखामृगेन्द्राणां संग्रामं अभिकाङ्‌क्षताम् ॥ ३८ ॥

एष पर्वतमध्यास्ते पारियात्रमनुत्तमम् ।
युद्धे दुष्प्रसहो नित्यं पनसो नाम यूथपः ॥ ३९ ॥

एनं शतसहस्राणां शतार्धं पर्युपासते ।
यूथपा यूथपश्रेष्ठं येषां यूथानि भागशः ॥ ४० ॥
जो विशाल वानर मेघाप्रमाणे आकाशाला घेरून उभा आहे तसेच वानरवीरांच्या मध्ये, देवातांच्यामध्ये इंद्र असावा तसा भासत आहे, युद्धाची इच्छा बाळगणार्‍या वानरांमध्ये ज्याची गंभीर गर्जना जणु बर्‍याचशा भेरींच्या तुमुल नाद होत असावा तशी ऐकू येत आहे तसेच जो युद्धात दु:सह आहे, तो पनस नावाने प्रसिद्ध यूथपति आहे. हा पनस परम उत्तम पारियात्र पर्वतावर निवास करतो. यूथपतिंमध्ये श्रेष्ठ पनसाच्या सेवेत पन्नास लाख यूथपति राहातात, ज्यांचे आपापले वेगळे वेगळे यूथ आहेत. ॥३७-४०॥
यस्तु भीमां प्रवल्गन्तीं चमूं तिष्ठति शोभयन् ।
स्थितां तीरे समुद्रस्य द्वितीय इव सागरः ॥ ४१ ॥

एष दर्दरसंकाशो विनतो नाम यूथपः ।
पिबंश्चरति यो वेणां नदीनामुत्तमां नदीम् ॥ ४२ ॥

षष्टिः शतसहस्राणि बलमस्य प्लवंगमाः ।
जो समुद्राच्या तटावर स्थित झालेल्या उसळणार्‍या भीषण सेनेला दुसर्‍या मूर्तीमंत समुद्राप्रमाणे सुशोभित करीत उभा आहे, तो दर्दुर पर्वतासमान विशालकाय वानर विनत नामाने प्रसिद्ध यूथपति आहे. तो नद्यांच्या मध्ये श्रेष्ठ वेणा नदीचे पाणी पीत विचरण करीत असतो. साठ लाख वानर त्याचे सैनिक आहेत. ॥४१-४२ १/२॥
त्वामाह्वयति युद्धाय क्रोधनो नाम वानरः ॥ ४३ ॥

विक्रान्ता बलवंतश्च यथायूथानि भागशः ।
युद्धासाठी सदा आपल्याला ललकारत रहातो तसेच ज्याच्या जवळ बल-विक्रमशाली अनेक यूथपति राहातात आणि त्या यूथपतिंच्या जवळ पृथक्‌-पृथक्‌ बरेचसे यूथ आहेत, तो क्रोधन नावाने प्रसिद्ध वानर आहे. ॥४३ १/२॥
यस्तु गैरिकवर्णाभं वपुः पुष्यति वानरः ॥ ४४ ॥

अवमत्य सदा सर्वान् वानरान् बलदर्पितः ।
गवयो नाम तेजस्वी त्वां क्रोधादभिवर्तते ॥ ४५ ॥

एनं शतसहस्राणि सप्ततिः पर्युपासते ।
एषैवाशंसते लङ्‌कां स्वेनानीकेन मर्दितुम् ॥ ४६ ॥
तो जो गेरूच्या समान लाल रंगाच्या शरीराचे पोषण करीत आहे, त्या तेजस्वी वानराचे नाव गवय आहे. त्याला बळाचा फार गर्व आहे. तो सदा सर्व वानरांचा तिरस्कार करत असतो. पहा, किती रोषाने तो आपल्याकडे येत आहे. याच्या सेवेमध्ये सत्तर लाख वानर रहातात. हाही आपल्या सेनेच्या द्वारा लंकेला धूळीत मिळवून देण्याची इच्छा बाळगून आहे. ॥४४-४६॥
एते दुष्प्रसहा वीरा येषां संख्या न विद्यते ।
यूथपा यूथपश्रेष्ठाः तेषां यूथानि भागशः ॥ ४७ ॥
हे सारेच्या सारे वानर दु:सह वीर आहेत. यांची गणना करणेही असंभव आहे. यूथपतिंच्या मध्ये श्रेष्ठ जे यूथप आहेत त्या सर्वांचे वेग-वेगळे यूथ आहेत. ॥४७॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे षड्‌विंशः सर्गः ॥ २६ ॥ याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा सव्वीसावा सर्ग पूर्ण झाला. ॥२६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP