श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ चतुर्विंशत्यधिक शततमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

भरद्वाजाश्रमे अवतीर्य श्रीरामेण महर्षेर्दर्शनं ततो वरग्रहणं च -
श्रीरामांचे भरद्वाज आश्रमावर उतरून महर्षिंना भेटणे आणि त्यांच्याकडून वर प्राप्त होणे -
पूर्णे चतुर्दशे वर्षे पञ्चम्यां लक्ष्मणाग्रजः ।
भरद्वाजश्रमं प्राप्य ववन्दे नियतो मुनिम् ॥ १ ॥
लक्ष्मणाग्रज श्रीरामांनी चौदावे वर्ष पूर्ण झाल्यावर पञ्चमी तिथिला भरद्वाज आश्रमात पोहोचून मनाला संयमित करून मुनिंना प्रणाम केला. ॥१॥
सोऽपृच्छद् अभिवाद्यैनं भरद्वाजं तपोधनम् ।
शृणोषि कच्चिद् भगवन् सुभिक्षानामयं पुरे ।
कच्चित् स युक्तो भरतो जीवन्त्यपि च मातरः ॥ २ ॥
तपोधन भरद्वाज मुनिंना प्रणाम करून श्रीरामांनी त्यांना विचारले - भगवन्‌ ! आपण अयोध्यापुरी विषयीही काही ऐकले आहे कां ? तेथे सुकाळ आणि कुशलमंगल आहे ना ? भरत प्रजापालनात तत्पर राहातात ना ? माझ्या माता जिवंत आहेत ना ? ॥२॥
एवमुक्तस्तु रामेण भरद्वाजो महामुनिः ।
प्रत्युवाच रघुश्रेष्ठं स्मितपूर्वं प्रहृष्टवत् ॥ ३ ॥
श्रीरामांनी याप्रकारे विचारल्यावर महामुनी भरद्वाजांनी हसून त्या रघुश्रेष्ठ श्रीरामांना प्रसन्नतापूर्वक म्हटले - ॥३॥
आज्ञावशत्वे भरतो जटिलस्त्वां प्रतीक्षते ।
पादुके ते पुरस्कृत्य सर्वं च कुशलं गृहे ॥ ४ ॥
रघुनंदना ! भरत आपल्या आज्ञेच्या अधीन आहेत. ते जटा वाढवून आपल्या आगमनाची प्रतीक्षा करत आहेत. आपल्या चरणपादुका समोर ठेवून सर्व कार्य करतात. आपल्या घरी आणि नगरांतही सर्व कुशल आहे. ॥४॥
त्वां पुरा चीरवसनं प्रविशन्तं महावनम् ।
स्त्रीतृतीयं च्युतं राज्याद् धर्मकामं च केवलम् ॥ ५ ॥

पदातिं त्यक्तसर्वस्वं पितृर्निदेशकारिणम् ।
सर्वभोगैः परित्यक्तं स्वर्गच्युतमिवामरम् ॥ ६ ॥

दृष्ट्‍वा तु करुणा पूर्वं ममासीत् समितिञ्जय ।
कैकेयीवचने युक्तं वन्यमूल फलाशिनम् ॥ ७ ॥
पूर्वी जेव्हा आपण महान्‌ वनाची यात्रा करत होता त्यासमयी आपण चीर वस्त्र धारण केले होते आणि आपणा दोघां भावांबरोबर तिसरी केवळ आपली स्त्री होती. आपण राज्यापासून वंचित केला गेला होता आणि केवळ धर्मपालनाची इच्छा मनांत ठेवून सर्वस्वाचा त्याग करून पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठीच पायी जात होता. सर्व भोगांपासून दूर राहून स्वर्गांतून भूतलावर पडलेल्या देवतेप्रमाणे वाटत होता. शत्रुविजयी वीरा ! आपण कैकेयीच्या आदेशाचे पालन करण्यात तत्पर राहून जंगली फळमूळांचा आहार घेत होता, त्यावेळी आपल्याला पाहून माझ्या मनात फार करूणा उत्पन्न झाली होती. ॥५-७॥
साम्प्रतं तु समृद्धार्थं समित्रगणबान्धवम् ।
समीक्ष्य विजितारिं च त्वां ममाभूत् प्रीतिरनुत्तमा ॥ ८ ॥
परंतु यासमयी तर सर्व परिस्थिती बदलली आहे. आपण शत्रुवर विजय मिळवून सफल मनोरथ होऊन मित्र तसेच बांधवांसह परत आला आहात. या रूपात आपल्याला पाहून मला फार सुख वाटले- मला फार प्रसन्नता वाटली. ॥८॥
सर्वं च सुखदुःखं ते विदितं मम राघव ।
यत्त्वया विपुलं प्राप्तं जनस्थाननिवासिना ॥ ९ ॥
राघवा ! आपण जनस्थानात राहून जे विपुल सुखदुःख सोसले आहे ते सर्व मला माहित आहे. ॥९॥
ब्राह्मणार्थे नियुक्तस्य रक्षितुः सर्वतापसान् ।
रावणेन हृता भार्या बभूवेयं अनिन्दिता ॥ १० ॥
तेथे राहून आपण ब्राह्मणांच्या कार्यात संलग्न होऊन समस्त तपस्वी मुनींचे रक्षण करत होतात. त्या समयी रावण आपल्या या सती-साध्वी भार्येला हरण करून तिला घेऊन गेला. ॥१०॥
मारीचदर्शनं चैव सीतोन्मथनमेव च ।
कबन्धदर्शनं चैव पम्पाभिगमनं तथा ॥ ११ ॥

सुग्रीवेण च ते सख्यं यत्र वाली हतस्त्वया ।
मार्गणं चैव वैदेह्याः कर्म वातात्मजस्य च ॥ १२ ॥

विदितायां च वैदेह्यां नलसेतुर्यथा कृतः ।
यथा वा दीपिता लङ्‌का प्रहृष्टैर्हरियूथपैः ॥ १३ ॥

सपुत्रबान्धवामात्यः सबलः सहवाहनः ।
यथा च निहतः सङ्‌ख्ये रावणो बलदर्पितः ॥ १४ ॥

यथा च निहते तस्मिन् रावणे देवकण्टकः ।
समागमश्च त्रिदशैः यथा दत्तश्च ते वरः ॥ १५ ॥

सर्वं ममैतद् विदितं तपसा धर्मवत्सल ।
धर्मवत्सला ! मारीचाचे कपट रूपात दिसणे, सीतेचे बलपूर्वक अपहरण होणे, तिचा शोध करीत असता आपल्याला मार्गात कबंध भेटणे, आपले पंपा सरोवराच्या तटावर जाणे, सुग्रीवाशी आपली मैत्री होणे, आपल्या हाताने वालि मारला जाणे, सीतेचा शोध, पवनपुत्र हनुमानाचे अद्‍भुत कर्म, सीतेचा पत्ता लागल्यावर नलद्वारा समुद्रावर सेतुची निर्मिती, हर्ष आणि उत्साहानी भरलेल्या वानर-यूथपतिंच्या द्वारा लंकापुरीचे दहन, पुत्र, बंधु, मंत्री, सेना आणि वाहनांसह बलाभिमानी रावण मारला गेल्यावर देवतांच्या बरोबर आपला समागम होणे, तसेच त्यांनी आपल्याला वर देणे - या सार्‍या गोष्टी मला तपाच्या प्रभावाने ज्ञात आहेत. ॥११-१५ १/२॥
सम्पतन्ति च मे शिष्याः प्रवृत्ताख्याः पुरीमितः ॥ १६ ॥

अहमप्यत्र ते दद्मि वरं शस्त्रभृतां वर ।
अर्घ्यं प्रतिगृहाणेदं अयोध्यां श्वो गमिष्यसि ॥ १७ ॥
माझा प्रवृति नावाचा शिष्य येथून अयोध्यापुरीला येत जात असतो. (म्हणून मला तेथील वृत्तांत माहित होत असतो) शस्त्रधार्‍यांमध्ये श्रेष्ठ श्रीरामा ! येथे मीही आपल्याला एक वर देतो. (आपली जी इच्छा असेल ते मागून घ्यावे.) आज माझा अर्घ्य आणि अतिथी-सत्कार ग्रहण करावा. उद्या सकाळी अयोध्येला जावे. ॥१६-१७॥
तस्य तच्छिरसा वाक्यं प्रतिगृह्य नृपात्मजः ।
बाढमित्येव संहृष्टो धीमान् वरमयाचत ॥ १८ ॥
मुनींचे ते वचन शिरोधार्य करून हर्षाने श्रीमान्‌ राजकुमार राम म्हणाले - फारच चांगले. नंतर त्यांनी त्यांच्याकडून हा वर मागितला - ॥१८॥
अकाले फलिनो वृक्षाः सर्वे चापि मधुस्रवाः ।
फलानि अमृतगन्धीनि बहूनि विविधानि च ॥ १९ ॥

भवन्तु मार्गे भगवन् अयोध्यां प्रति गच्छतः ।
भगवन्‌ ! येथून अयोध्येला जाते समयी मार्गात सर्व वृक्षांना समय नसतांनाही फळे उत्पन्न व्हावीत. ते सर्वच्या सर्व मधुच्या धारा ठिबकविणारे व्हावेत. त्यांना नाना प्रकारची बरीचशी अमृतोपम सुगंधित फळे लागावीत. ॥१९ १/२॥
तथेति च प्रतिज्ञाते वचनात् समनन्तरम् ॥ २० ॥

अभवन् पादपास्तत्र स्वर्गपादपसन्निभाः ।
भरद्वाजांनी म्हटले - असेच होवो. त्यांनी याप्रकारे प्रतिज्ञा करताच त्यांच्या मुखांतून ते शब्द बाहेर पडताच, तात्काळ तेथील सारे वृक्ष स्वर्गीय वृक्षांप्रमाणे झाले. ॥२० १/२॥
निष्फलाः फलिनश्चासन् विपुष्पाः पुष्पशालिनः ॥ २१ ॥

शुष्काः समग्रपत्रास्ते नगाश्चैव मधुस्रवाः ।
सर्वतो योजनास्तिस्रो गच्छतामभवंस्तदा ॥ २२ ॥
ज्यांना फळे नव्हती त्यांना फळे लागली, ज्यांना फुले नव्हती ते फुलांनी सुशोभित होऊ लागले. वाळलेल्या वृक्षांनाही हिरवी पालवी फुटली आणि सर्व वृक्षांतून मधाच्या धारा वाहू लागल्या. अयोध्येला जाण्याचा जो मार्ग होता त्याच्या आसपास तीन योजनपर्यंत वृक्ष असेच झाले. ॥२१-२२॥
ततः प्रहृष्टाः प्लवगर्षभास्ते
बहूनि दिव्यानि फलानि चैव ।
कामादुपाश्नन्ति सहस्रशस्ते
मुदान्विताः स्वर्गजितो यथैव ॥ २३ ॥
नंतर तर ते हजारो श्रेष्ठ वानर हर्षाने भरून जाऊन स्वर्गवासी देवतांप्रमाणे आपल्या रुचिला अनुसरून प्रसन्नतापूर्वक त्या बहुसंख्य दिव्य फळांचा आस्वाद घेऊ लागले. ॥२३॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे चतुर्विंशत्यधिकशततमः सर्गः ॥ १२४ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकशेचोविसावा सर्ग पूरा झाला. ॥१२४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP