[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। एकविंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
लक्ष्मणस्य रोषो बलाद्‌राज्यं स्वायत्तीकर्तुं तेन श्रीरामस्य प्रेरणं श्रीरामेण पितुराज्ञायाः पालनमेव धर्म इति प्रतिपाद्य मातुर्भ्रातुश्च प्रतिबोधनम् - लक्ष्मणाचा रोष, त्याने श्रीरामास बलपूर्वक राज्यावर अधिकार करण्यासाठी प्रेरीत करणे, तथा श्रीरामांनी पित्याच्या आज्ञेचे पालन हा धर्म आहे असे सांगून माता आणि लक्ष्मणास समजाविणे -
तथा तु विलपन्तीं तां कौसल्यां राममातरम् ।
उवाच लक्ष्मणो दीनस्तत्कालसदृशं वचः ॥ १ ॥
या प्रकारे विलाप करीत असलेल्या राममाता कौसल्येला अत्यंत दुःखी झालेल्या लक्ष्मणाने त्यावेळी योग्य गोष्ट सांगितली - ॥१॥
न रोचते ममाप्येतदार्ये यद् राघवो वनम् ।
त्यक्त्वा राज्यश्रियं गच्छेत् स्त्रिया वाक्यवशंगतः ॥ २ ॥

विपरीतश्च वृद्धश्च विषयैश्च प्रधर्षितः ।
नृपः किमिव न ब्रूयाच्चोद्यमानः समन्मथः ॥ ३ ॥
'थोरली आई ! मलाही हे चांगले वाटत नाही की राघवाने राज्यलक्ष्मीचा परित्याग करून वनात जावे. महाराज तर या समयी स्त्रीच्या वचनात गुंतले आहेत, म्हणून त्यांची प्रकृति विपरीत झाली आहे. एक तर ते वृद्ध (म्हातारे) आहेत दुसरे विषयांनी त्यांना वश करून घेतले आहे, म्हणून कामदेवाच्या वशीभूत होऊन ते नरेश कैकेयी सारख्या स्त्रीच्या प्रेरणेने काय सांगू शकत नाहीत ? ॥२-३॥
नास्यापराधं पश्यामि नापि दोषं तथाविधम् ।
येन निर्वास्यते राष्ट्राद् वनवासाय राघवः ॥ ४ ॥
मला राघवाचा असा कुठलाही अपराध अथवा दोष दिसून येत नाही की ज्यामुळे त्यांना राज्यांतून बाहेर घालवले जावे आणि वनांत राहण्यासाठी विवश केले जावे ? ॥४॥
न तं पश्याम्यहं लोके परोक्षमपि यो नरः ।
स्वमित्रोऽपि निरस्तोऽपि योऽस्य दोषमुदाहरेत् ॥ ५ ॥
मला या जगांत असा एकही मनुष्य दिसून येत नाही की अत्यंत शत्रु एवं तिरस्कृत असूनही परोक्षातही यांचा काही दोष दाखवू शकेल. ॥५॥
देवकल्पमृजुं दान्तं रिपूणामपि वत्सलम् ।
अवेक्षमाणः को धर्मं त्यजेत् पुत्रमकारणात् ॥ ६ ॥
धर्मावर दृष्टी ठेवणारा असा कोठला राजा असेल की जो देवतेसमान शुद्ध, सरल, जितेंद्रिय आणि शत्रूंच्यावरही स्नेह ठेवणार्‍या रामासारख्या पुत्राचा अकारण परित्याग करील ? ॥६॥
तदिदं वचनं राज्ञः पुनर्बाल्यमुपेयुषः ।
पुत्रः को हृदये कुर्याद् राजवृत्तमनुस्मरन् ॥ ७ ॥
जे पुन्हा बालभावाला (विवेकशून्यतेला) प्राप्त झाले आहेत अशा राजांच्या या वचनाला राजनीतिवर ध्यान देणारा कुठला पुत्र आपल्या हृदयात स्थान देऊ शकेल ? ॥७॥
यावदेव न जानाति कश्चिदर्थमिमं नरः ।
तावदेव मया सार्धमात्मस्थं कुरु शासनम् ॥ ८ ॥
'रघुनंदना ! जोपर्यंत कोणीही मनुष्य आपल्या वनवासाची गोष्ट जाणत नाही तोपर्यत आपण माझ्या सहाय्याने या राज्याच्या शासनाचे लगाम आपल्या हातात घ्यावे. ॥८॥
मया पार्श्वे सधनुषा तव गुप्तस्य राघव ।
कः समर्थोऽधिकं कर्तुं कृतान्तस्येव तिष्ठतः ॥ ९ ॥
'राघवा ! जेव्हा मी धनुष्य घेऊन आपल्या जवळ राहून आपले रक्षण करीत आहे आणि आपण कालाप्रमाणे युद्धासाठी उभे राहाल त्यावेळी आपल्यापेक्षा अधिक पौरुष प्रकट करण्यास कोण समर्थ होऊ शकतो ? ॥९॥
निर्मनुष्यामिमां सर्वामयोध्यां मनुजर्षभ ।
करिष्यामि शरैस्तीक्ष्णैर्यदि स्थास्यति विप्रिये ॥ १० ॥
'नरश्रेष्ठ ! जर नगरांतील लोक विरोधात उभे राहिले तर मी तीक्ष्ण बाणांनी सारी अयोध्या निर्मनुष्य करून टाकीन. ॥१०॥
भरतस्याथ पक्ष्यो वा यो वास्य हितमिच्छति ।
सर्वांस्ताश्च वधिष्यामि मृदुर्हि परिभूयते ॥ ११ ॥
जो जो भरताचा पक्ष घेईल अथवा केवळ जो त्याचे हित इच्छिल त्या सर्वांचा मी वध करून टाकीन, कारण की जो कोमल अथवा नम्र असतो त्याचा सर्व तिरस्कार करतात. ॥११॥
प्रोत्साहितोऽयं कैकेय्या संतुष्टो यदि नः पिता ।
अमित्रभूतो निःसङ्‌‍गं वध्यतां वध्यतामपि ॥ १२ ॥
जर कैकेयीने प्रोत्साहन दिल्यावर तिच्यावर संतुष्ट होऊन आपले वडील आपले शत्रु बनले तर आम्हीही मोह-ममता सोडून त्यांना कैद केले पाहिजे अथवा मारुन टाकले पाहिजे. ॥१२॥
गुरोरप्यवलिप्तस्य कार्याकार्यमजानतः ।
उत्पथं प्रतिपन्नस्य कार्यं भवति शासनम् ॥ १३ ॥
कारण की गुरूही जर घमेंडीत येऊन कर्तव्याकर्तव्याचे ज्ञान हरवून बसले आणि कुमार्गावर चालू लागले तर त्यांनाही दण्ड देणे आवश्यक होऊन जाते. ॥१३॥
बलमेष किमाश्रित्य हेतुं वा पुरुषोत्तम ।
दातुमिच्छति कैकेय्यै उपस्थितमिदं तव ॥ १४ ॥
'पुरुषोत्तम ! राजा कोणत्या बळाचा आधार घेऊन अथवा कुठले कारण समोर ठेवून आपल्याला न्यायतः प्राप्त झालेले हे राज्य आता कैकेयीला देऊ इच्छित आहे ? ॥१४॥
त्वया चैव मया चैव कृत्वा वैरमनुत्तमम् ।
कास्य शक्तिः श्रियं दातुं भरतायारिशासन ॥ १५ ॥
'शत्रूदमन रामा ! आपल्याशी आणि माझ्याशी भारी वैर बांधून यांची कोणती शक्ती आहे की ही राज्यलक्ष्मी ते भरताला देऊ शकतील ? ॥१५॥
अनुरक्तोऽस्मि भावेन भ्रातरं देवि तत्त्वतः ।
सत्येन धनुषा चैव दत्तेनेष्टेन ते शपे ॥ १६ ॥
'देवी ! (मोठ्या आई) ! मी सत्य, धनुष्य, दान, यज्ञ आदिंची शपथ घेऊन तुला खरी गोष्ट सांगतो आहे की माझा आपला पूज्य भ्राता श्रीराम याच्या ठिकाणी हार्दिक अनुराग आहे. ॥१६॥
दीप्तमग्निमरण्यं वा यदि रामः प्रवेक्ष्यति ।
प्रविष्टं तत्र मां देवि त्वं पूर्वमवधारय ॥ १७ ॥
'देवि ! आपण विश्वास ठेवा, जर राम जळत्या आगीत अथवा घोर वनांत प्रवेश करणार असतील तर मी त्यांच्याही आधी तेथे प्रविष्ट होईन. ॥१७॥
हरामि वीर्याद् दुःखं ते तमः सूर्य इवोदितः ।
देवी पश्यतु मे वीर्यं राघवश्चैव पश्यतु ॥ १८ ॥
या समयी आपण, राघव तथा अन्य सर्व लोकही माझा पराक्रम पहा. ज्याप्रमाणे सूर्य उदित होऊन अंधःकाराचा नाश करतो. त्या प्रमाणे मीही आपल्या शक्तीने आपली सर्व दुःखे दूर करीन. ॥१८॥
हनिष्ये पितरं वृद्धं कैकेय्यासक्तमानसम् ।
कृपणं च स्थितं बाल्ये वृद्धभावेन गर्हितम् ॥ १९ ॥
जे कैकेयीमध्ये आसक्तचित्त होऊन दीन बनलेले आहेत , बालभावात (अविवेकात) स्थित आहेत आणि अधिक म्हातारपणामुळे निंदित होत आहेत त्या वृद्ध पित्यास मी अवश्य मारून टाकीन. ॥१९॥
एतत्तु वचनं श्रुत्वा लक्ष्मणस्य महात्मनः ।
उवाच रामं कौसल्या रुदती शोकलालसा ॥ २० ॥
महामनस्वी लक्ष्मणाचे हे ओजस्वी वचन ऐकून शोकमग्न कौसल्या रडत रडत रामास म्हणाली - ॥२०॥
भ्रातुस्ते वदतः पुत्र लक्ष्मणस्य श्रुतं त्वया ।
यदत्रानन्तरं तत्त्वं कुरुष्व यदि रोचते ॥ २१ ॥
'मुला ! तू आपला भाऊ लक्ष्मण याचे सर्व बोलणे ऐकले आहेस. जर पटले तर यानंतर तुला जे काही करणे उचित वाटेल ते तू कर.' ॥२१॥
न चाधर्म्यं वचः श्रुत्वा सपत्‍न्या मम भाषितम् ।
विहाय शोकसंतप्ता गन्तुमर्हसि मामितः ॥ २२ ॥
'माझ्या सवतीने सांगितलेली अधर्मयुक्त गोष्ट ऐकून मला, शोकाने संतप्त झालेल्या मातेला सोडून तू येथून जाता कामा नये. ॥२२॥
धर्मज्ञ इति धर्मिष्ठो धर्मं चरितुमिच्छसि ।
शुश्रूष मामिहस्थस्त्वं चर धर्ममनुत्तमम् ॥ २३ ॥
'धर्मिष्ट ! तुम्ही धर्मास जाणणारे आहात. म्हणून जर धर्माचे पालन करू इच्छित असाल तर येथेच राहून माझी सेवा करा आणि या प्रकारे उत्तम धर्माचे पालन करा. ॥२३॥
शुश्रूषुर्जननीं पुत्रः स्वगृहे नियतो वसन् ।
परेण तपसा युक्तः काश्यपस्त्रिदिवं गतः ॥ २४ ॥
'वत्स ! आपल्या घरात नियमपूर्वक राहून मातेची सेवा करणारे काश्यप उत्तम तपस्येने युक्त होऊन स्वर्गलोकास निघून गेले होते. ॥२४॥
यथैव राजा पूज्यस्ते गौरवेण तथा ह्यहम् ।
त्वां साहं नानुजानामि न गन्तव्यमितो वनम् ॥ २५ ॥
ज्याप्रमाणे गौरवामुळे राजा तुम्हाला पूज्य आहे त्याप्रमाणे मीही आहे. मी तुम्हांला वनास जाण्याची आज्ञा देत नाही, म्हणून तुम्ही येथून वनात जाता कामा नये ॥२५॥
त्वद्‌वियोगान्न मे कार्यं जीवितेन सुखेन वा ।
त्वया सह मम श्रेयस्तृणानामपि भक्षणम् ॥ २६ ॥
तुमच्या बरोबर गवत खाऊन राहणेही माझ्या साठी श्रेयस्कर आहे, परंतु तुमचा वियोग झाल्यावर मला या जीवनाशी काही प्रयोजन नाही अथवा सुखाशी काही प्रयोजन नाही. ॥२६॥
यदि त्वं यास्यसि वनं त्यक्त्वा मां शोकलालसाम् ।
अहं प्रायमिहासिष्ये न हि शक्ष्यामि जीवितुम् ॥ २७ ॥
जर तुम्ही मला शोकात बुडालेली असता सोडून वनात निघून जाल तर मी उपवास करून प्राणत्याग करीन, जीवित राहू शकणार नाही. ॥२७॥
ततस्त्वं प्राप्स्यसे पुत्र निरयं लोकविश्रुतम् ।
ब्रह्महत्यामिवाधर्मात् समुद्रः सरितां पतिः ॥ २८ ॥
'मुला ! असे झाल्यावर तुला संसार प्रसिद्ध ते नरकतुल्य कष्ट प्राप्त होतील, जे ब्रह्महत्ये समान आहेत आणि सरितांचा स्वामी समुद्रांनी आपल्या अधर्माच्या फलरूपाने ज्यांना प्राप्त केले होते. (कुठल्या तरी कल्पात समुद्राने आपल्या मातेला दुःख दिले होते त्यामुळे पिप्पलाद नामक ब्रह्मर्षिंनी त्या अधर्माचा दण्ड देण्यासाठी त्याच्यावर एका कृत्येचा प्रयोग केला. त्यामुळे समुद्रास नरकवासतुल्य दुःख भोगावे लागले होते.) ॥२८॥
विलपन्तीं तदा दीनां कौसल्यां जननीं ततः ।
उवाच रामो धर्मात्मा वचनं धर्मसंहितम् ॥ २९ ॥
माता कौसल्येला या प्रकारे दीन होऊन विलाप करतांना पाहून धर्मात्मा श्रीरामचंद्रांनी याप्रमाणे धर्मयुक्त वचन सांगितले - ॥२९॥
नास्ति शक्तिः पितुर्वाक्यं समतिक्रमितुं मम ।
प्रसादये त्वां शिरसा गन्तुमिच्छाम्यहं वनम् ॥ ३० ॥
'माते ! मी तुझा चरणी मस्तक नमवून तुला प्रसन्न करु इच्छितो. माझ्यामध्ये पित्याच्या आज्ञेचे उल्लंघन करण्याची शक्ति नाही, म्हणून मी वनांतच जाण्याची इच्छा करीत आहे. ॥३०॥
ऋषिणा च पितुर्वाक्यं कुर्वता वनचारिणा ।
गौर्हता जानताधर्मं कण्डुना च विपश्चिता ॥ ३१ ॥
'वनवासी विद्वान कण्डु मुनिंनी पित्याची आज्ञा पाळण्यासाठी अधर्म समजत असूनही गाईचा वध केला होता. ॥३१॥
अस्माकं च कुले पूर्वं सगरस्याज्ञया पितुः ।
खनद्‌भिः सागरैर्भूमिमवाप्तः सुमहान् वधः ॥ ३२ ॥
'आमच्या कुळातही प्रथम राजा सगराचे पुत्र असे होऊन गेले, जे पित्याच्या आज्ञेने पृथ्वी खोदत असतां वाईट तर्‍हेने मारले गेले.' ॥३२॥
जामदग्न्येन रामेण रेणुका जननी स्वयम् ।
कृत्ता परशुनारण्ये पितुर्वचनकारणात् ॥ ३३ ॥
'जमदग्निचे पुत्र परशुराम यांनी पित्याची आज्ञा पालन करण्यासाठीच वनात कुर्‍हाडीने (परशुने) आपली माता रेणुका हिचा गळा कापला होता.' ॥३३॥
एतैरन्यैश्च बहुभिः देवि देवसमैः कृतम् ।
पितुर्वचनमक्लीबं करिष्यामि पितुर्हितम् ॥ ३४ ॥
'देवी ! यांनी, तसेच आणखीही बर्‍याच देवतुल्य मनुष्यांनी उत्साहाने पित्याच्या आदेशाचे पालन केले आहे. म्हणून मीही कार्पण्य (कायरता) सोडून पित्याच्या हिताचे साधन करीन. ॥३४॥
न खल्वेतन्मयैकेन क्रियते पितृशासनम् ।
एतैरपि कृतं देवि ये मया परिकीर्तिताः ॥ ३५ ॥
'देवी ! केवळ मीच या प्रकारे पित्याच्या आदेशाचे पालन करतो आहे असे नाही तर ज्यांची आत्ता मी चर्चा केली आहे, त्या सर्वांनीही पित्याच्या आदेशाचे पालन केले आहे. ॥३५॥
नाहं धर्ममपूर्वं ते प्रतिकूलं प्रवर्तये ।
पूर्वैरयमभिप्रेतो, गतो मार्गोऽनुगम्यते ॥ ३६ ॥
हे माते ! मी काही तुला काही अपूर्व, धर्माला अनुसरून नसलेले असे काही वेगळे सांगत नाही. सनातन काळापासून धर्माचे आचरण करणार्‍या सर्व श्रेष्ठांना हे अभीष्ट असेच आहे. मी केवळ श्रेष्ठांनी प्रतिपादन केलेल्या मार्गाचेच अनुसरण करीत आहे. ॥ ३६ ॥
तदेतत् तु मया कार्यं क्रियते भुवि नान्यथा ।
पितुर्हि वचनं कुर्वन् न कश्चिन्नाम हीयते ॥ ३७ ॥
या भूमण्ड्लावर जे सर्वांनी करण्यायोग्य आहे, तेच मीही करणार आहे. पित्याच्या आज्ञेचे पालन करणारा कोणीही पुरुष धर्मापासून भ्रष्ट होत नाही. ॥३७॥
तामेवमुक्त्वा जननीं लक्ष्मणं पुनरब्रवीत् ।
वाक्यं वाक्यविदां श्रेष्ठः श्रेष्ठः सर्वधनुष्मताम् ॥ ३८ ॥
आपल्या मातेला असे सांगून वाक्यवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ समस्त धनुर्धर शिरोमणी रामांनी पुन्हा लक्ष्मणास म्हटले- ॥३८॥
तव लक्ष्मण जानामि मयि स्नेहमनुत्तमम् ।
विक्रमं चैव सत्त्वं च तेजश्च सुदुरासदम् ॥ ३९ ॥
'लक्ष्मणा ! माझ्या प्रति तुझा जो परम उत्तम स्नेह आहे तो मी जाणतो. तुझा पराक्रम, धैर्य आणि दुर्धर्ष तेजाचेही मला ज्ञान आहे. ॥३९॥
मम मातुर्महद् दुःखमतुलं शुभलक्षण ।
अभिप्रायं न विज्ञाय सत्यस्य च शमस्य च ॥ ४० ॥
'शुभलक्षण संपन्न लक्ष्मणा ! माझ्या मातेला जे अनुपम आणि महान दुःख होत आहे, ते सत्य आणि शम याविषयी माझा अभिप्राय न समजण्यामुळे होत आहे.' ॥४०॥
धर्मो हि परमो लोके धर्मे सत्यं प्रतिष्ठितम् ।
धर्मसंश्रितमप्येतत् पितुर्वचनमुत्तमम् ॥ ४१ ॥
संसारात धर्मच सर्वाहून श्रेष्ठ आहे. धर्मातच सत्याची प्रतिष्ठा आहे. पित्याहे हे वचनही धर्माचे आश्रित असल्याने परम उत्तम आहे. ॥४१॥
संश्रुत्य च पितुर्वाक्यं मातुर्वा ब्राह्मणस्य वा ।
न कर्तव्यं वृथा वीर धर्ममाश्रित्य तिष्ठता ॥ ४२ ॥
वीरा ! धर्माचा आश्रय घेऊन राहाणार्‍या पुरुषाने पिता, माता अथवा ब्राह्मणांच्या वचनांचे पालन करण्याची प्रतिज्ञा करून तिला मिथ्या करता कामा नये. ॥४२॥
सोऽहं न शक्ष्यामि पुनर्नियोगमतिवर्तितुम् ।
पितुर्हि वचनाद् वीर कैकेय्याहं प्रचोदितः ॥ ४३ ॥
'वीरा ! म्हणून मी पित्याच्या आज्ञेचे उल्लंघन करू शकत नाही. कारण की पित्याच्या सांगण्यावरूनच कैकेयीने मला वनांत जाण्याची आज्ञा दिली आहे. ॥४३॥
तदेतां विसृजानार्यां क्षत्रधर्माश्रितां मतिम् ।
धर्ममाश्रय मा तैक्ष्ण्यं मद्‍बुद्धिरनुगम्यताम् ॥ ४४ ॥
'म्हणून केवळ क्षात्रधर्माचे अवलंबन करणार्‍या या संकुचित बुद्धिचा त्याग कर. धर्माचा आश्रय घे. कठोरता सोड आणि माझ्या विचारास अनुसरून वाग.' ॥४४॥
तमेवमुक्त्वा सौहार्दाद् भ्रातरं लक्ष्मणाग्रजः ।
उवाच भूयः कौसल्यां प्राञ्जलिः शिरसा नतः ॥ ४५ ॥
आपला भाऊ लक्ष्मण यास सौहार्दवश असे बोलून त्यांच्या ज्येष्ठ भ्रात्या श्रीरामाने पुन्हा कौसल्येच्या चरणी मस्तक नमवले आणि हात जोडून म्हटले- ॥४५॥
अनुमन्यस्व मां देवि गमिष्यन्तमितो वनम् ।
शापितासि मम प्राणैः कुरु स्वस्त्ययनानि मे ॥ ४६ ॥
'देवी ! मी येथून वनात जाईन. तू मला आज्ञा दे आणि स्वास्तिवाचन करव. ही गोष्ट मी आपल्या प्राणांची शपथ देऊन सांगत आहे. ॥४६॥
तीर्णप्रतिज्ञश्च वनात् पुनरेष्याम्यहं पुरीम् ।
ययातिरिव राजर्षिः पुरा हित्वा पुनर्दिवम् ॥ ४७ ॥
'ज्याप्रमाणे पूर्वकाली राजर्षि ययाति स्वर्गलोकाचा त्याग करून पुन्हा भूतलावर उतरून आले होते, त्याच प्रकारे मीही प्रतिज्ञा पूर्ण करून पुन्हा वनांतून अयोध्यापुरीस परत येईन. ॥४७॥
शोकः संधार्यतां मातर्हृदये साधु मा शुचः ।
वनवासादिहैष्यामि पुनः कृत्वा पितुर्वचः ॥ ४८ ॥
'माते ! (आई !) शोकाला आपल्या हृदयात उत्तम प्रकारे दाबून ठेव. शोक करूं नको. पित्याच्या आज्ञेचे पालन करून मी वनवासांतून येथे परत येईन. ॥४८॥
त्वया मया च वैदेह्या लक्ष्मणेन सुमित्रया ।
पितुर्नियोगे स्थातव्यं एष धर्मः सनातनः ॥ ४९ ॥
तुला, मला, सीतेला, लक्ष्मणाला आणि सुमित्रेलाही पित्याच्या आज्ञेमध्येच राहिले पाहिजे. हाच सनातन धर्म आहे. ॥४९॥
अम्ब सम्भृत्य सम्भारान् दुःखं हृदि निगृह्य च ।
वनवासकृता बुद्धिर्मम धर्म्यानुवर्त्यताम् ॥ ५० ॥
'माते ! ही अभिषेकाची सामग्री घेऊन जा आणि ठेऊन दे. आपल्या मनांतील दुःख मनांतच दाबून ठेव आणि वनवासा संबंधी माझा जो धर्मानुकूल विचार आहे, त्याचे अनुसरण कर - मला जाण्याची आज्ञा दे.' ॥५०॥
एतद्वचस्तस्य निशम्य माता
     सुधर्म्यमव्यग्रमविक्लवं च ।
मृतेव सञ्ज्ञां प्रतिलभ्य देवी
     समीक्ष्य रामं पुनरित्युवाच ॥ ५१ ॥
श्रीरामाचंद्रांचे हे धर्मानुकूल तसेच व्यग्रता आणि आकुलता रहित भाषण ऐकून, मेलेल्या मनुष्यांत प्राण संचार व्हावा त्याप्रमाणे देवी कौसल्या मूर्च्छा त्यागून शुद्धिवर आली आणि आपल्या पुत्राकडे- श्रीरामाकडे पाहून या प्रकारे म्हणू लागली - ॥५१॥
यथैव ते पुत्र पिता तथाहं
     गुरुः स्वधर्मेण सुहृत्तया च ।
न त्वानुजानामि न मां विहाय
     सुदुःखितामर्हसि पुत्र गन्तुम् ॥ ५२ ॥
'पुत्रा ! (मुला !) धर्म आणि सौहार्दाच्या नात्याने जसे पिता तुझ्यासाठी आदरणीय गुरूजन आहेत तशीच मीपण आहे. मी तुला वनात जाण्याची आज्ञा देत नाही. वत्स ! मला दुखी सोडून तू कोठेही जाता कामा नये. ॥५२॥
किं जीवितेनेह विना त्वया मे
     लोकेन वा किं स्वधयामृतेन ।
श्रेयो मुहूर्तं तव सन्निधानं
     ममैव कृत्स्नादपि जीवलोकात् ॥ ५३ ॥
'तुझ्या शिवाय मला येथे या जीवनापासून काय लाभ आहे ? या स्वजनांपासून, देवता तथा पितरांच्या पूजेपासून अथवा अमृतापासून तरी काय घ्यायचे आहे ? तू मुहूर्तपर्यत (दोन घटका) तरी माझ्याजवळ राहिलास तरी तेही माझ्यासाठी संसाराच्या राज्याहूनही सुख देणारे आहे.' ॥५३॥
नरैरिवोल्काभिरपोह्यमानो
     महागजो ध्वान्तमभिप्रविष्टः ।
भूयः प्रजज्वाल विलापमेवं
     निशम्य रामः करुणं जनन्याः ॥ ५४ ॥
ज्याप्रमाणे एखादा विशाल गजराज कुठल्यातरी अंधकूपांत पडावा आणि लोकांनी त्याला जळत्या लाकडाने मारमारून पीडित करू लागावे अशा स्थितित तो जसा क्रोध खवळून उठतो त्याप्रकारे रामही मातेचा वारंवार करूण-विलाप ऐकून (त्यास स्वधर्मपालनात बाधा मानून) आवेशाने भरुन गेले. (वनांत जाण्याचाच द्दढ निश्चय केला.) ॥५४॥
स मातरं चैव विसंज्ञकल्पा-
     मार्तं च सौमित्रिमभिप्रतप्तम् ।
धर्मे स्थितो धर्म्यमुवाच वाक्यं
     यथा स एवार्हति तत्र वक्तुम् ॥ ५५ ॥
त्यांनी धर्माच्या ठिकाणीच दृढतापूर्वक स्थित राहून अचेताप्रमाणे झालेल्या मातेला आणि आर्त आणि संतप्त झालेल्या सौमित्रालाही अशी धर्मानुकूल गोष्ट सांगितली, तशी त्या अवसरी तेच फक्त सांगू शकत होते. ॥५५॥
अहं हि ते लक्ष्मण नित्यमेव
     जानामि भक्तिं च पराक्रमं च ।
मम त्वभिप्रायमसन्निरीक्ष्य
     मात्रा सहाभ्यर्दसि मां सुदुःखम् ॥ ५६ ॥
'लक्ष्मणा ! मी जाणतो, तू सदाच माझा ठिकाणी भक्ति ठेवतोस आणि तुझा पराक्रम किती महान आहे हेही माझ्यापासून लपून नाही; तथापि तू माझ्या अभिप्रायाकडे लक्ष न देता माते बरोबरच स्वतःही मला पीडा देत आहेस. याप्रकारे मला अत्यंत दुःखात पाडू नको. ॥५६॥
धर्मार्थकामाः खलु जीवलोके
     समीक्षिता धर्मफलोदयेषु ।
ये तत्र सर्वे स्युरसंशयं मे
     भार्येव वश्याभिमता सपुत्रा ॥ ५७ ॥
या जीव-जगात पूर्वकृत धर्माच्या फलाच्या प्राप्तिच्या वेळी जो धर्म, अर्थ आणि काम तीन्ही पाहिले गेले आहेत, ते सर्वच्या सर्व जेथे धर्म आहे तेथे अवश्य प्राप्त होतात - यात संशय नाही, ठीक त्या प्रकारे जसे भार्याही धर्म, अर्थ आणि काम तीन्हीचे साधन असते. ती पतीच्या- वशीभूत अथवा अनुकूल राहून अतिथि- सत्कार आदि धर्माच्या पालनात सहाय्यक होते. प्रेयसी रूपाने कामाचे साधन बनते आणि पुत्रवती होऊन उत्तम लोकाची प्राप्तीरूप अर्थाची साधिका होते. ॥५७॥
यस्मिंस्तु सर्वे स्युरसन्निविष्टा
     धर्मो यतः स्यात् तदुपक्रमेत ।
द्वेष्यो भवत्यर्थपरो हि लोके
     कामात्मता खल्वपि न प्रशस्ता ॥ ५८ ॥
ज्या कर्मात धर्म आदि सर्व पुरुषार्थांचा समावेश होत नसेल ते करता कामा नये. ज्यायोगे धर्माची सिद्धि होत असेल त्याचा आरंभ केला पाहिजे. जो केवळ अर्थपरायण होतो तो लोकात सर्वांच्या द्वेषास पात्र बनतो. तथा धर्मविरूद्ध कामात अत्यंत आसक्त होणे प्रशंसेची नसून निंदेची बाब आहे. ॥५८॥
गुरुश्च राजा च पिता च वृद्धः
     क्रोधात् प्रहर्षादथवापि कामात् ।
यद् व्यादिशेत् कार्यमवेक्ष्य धर्मं
     कस्तं न कुर्यादनृशंसवृत्तिः ॥ ५९ ॥
महाराज आपले सर्वांचे गुरू, राजा आणि पिता होण्या बरोबरच मोठे वयोवृद्ध माननीय पुरुष आहेत. त्यांनी क्रोधाने, हर्षाने अथवा कामाने प्रेरीत होऊनही जरी कुठल्या कार्यासाठी आज्ञा दिली तरी आपण तो धर्म समजून तिचे पालन केले पाहिजे. ज्यांच्या आचरणात क्रूरता नाही असा कोण पुरुष पित्याचा आज्ञापालनरूपी धर्माचे आचरण करणार नाही ? ॥५९॥
न तेन शक्नोमि पितुः प्रतिज्ञा-
     मिमां न कर्तुं सकलां यथावत् ।
स ह्यावयोस्तात गुरुर्नियोगे
     देव्याश्च भर्ता स गतिश्च धर्मः ॥ ६० ॥
म्हणून मी पित्याच्या या संपूर्ण प्रतिज्ञेचे यथावत पालन करण्या पासून विन्मुख होऊ शकत नाही. तात लक्ष्मणा ! ते आपल्या दोघांनाही आज्ञा देण्यास समर्थ गुरू आहेत आणि मातेसाठी तर तेच पति, गति अथवा धर्म आहेत. ॥६०॥
तस्मिन् पुनर्जीवति धर्मराजे
     विशेषतः स्वे पथि वर्तमाने ।
देवी मया सार्धमितोऽपगच्छेत्
     कथंस्विदन्या विधवेव नारी ॥ ६१ ॥
ते धर्माचे प्रवर्तक महाराज अद्याप जीवित आहेत आणि विशेषतः आपल्या धर्ममय मार्गावर स्थित आहेत. अशा स्थितिमध्ये माता जशी दूसरी कुणी विधवा स्त्री मुलाबरोबर राहात असते त्याप्रकारे माझ्या बरोबर येथून वनात कशी चलू शकेल ? ॥६१॥
सा माऽनुमन्यस्व वनं व्रजन्तं
     कुरुष्व नः स्वस्त्ययनानि देवि ।
यथा समाप्ते पुनराव्रजेयं
     यथा हि सत्येन पुनर्ययातिः ॥ ६२ ॥
म्हणून देवी ! तू मला वनात जाण्याची आज्ञा दे आणि आमच्या मंगलासाठी स्वस्तिवाचन करव, ज्यायोगे वनवासाची अवधी समाप्त झाल्यावर मी परत तुझ्या सेवेमध्ये येईन, ज्याप्रमाणे राजा ययाति सत्याच्या प्रभावाने स्वर्गातून परत आले होते. ॥६२॥
यशो ह्यहं केवलराज्यकारणा-
     न्न पृष्ठतः कर्तुमलं महोदयम् ।
अदीर्घकालेन तु देवि जीविते
     वृणेऽवरामद्य महीमधर्मतः ॥ ६३ ॥
केवळ धर्महीन राज्यासाठी मी महान फलदायक धर्मपालनरूप सुयशाला मागे ढकलू शकणार नाही. ,माते ! (आई !) जीवन अधिक काळपर्यंत टिकणारे नाही या साठी मी आज अधर्मपूर्वक या तुच्छ पृथ्वीचे राज्य घेऊ इच्छित नाही. ॥६३॥
प्रसादयन्नरवृषभः स मातरं
     पराक्रमाज्जिगमिषुरेव दण्डकान् ।
अथानुजं भृशमनुशास्य दर्शनं
     चकार तां हृदि जननीं प्रदक्षिणम् ॥ ६४ ॥
या प्रकारे नरश्रेष्ठ श्रीरामचंद्रांनी धैर्यपूर्वक दण्डकारण्यात जाण्याच्या इच्छेने मातेला प्रसन्न करण्याचा प्रयत्‍न केला. तसेच आपला लहान भाऊ लक्ष्मण यासही आपल्या विचारास अनुसरून धर्माचे रहस्य उत्तम प्रकारे समजावून देऊन मनातल्या मनात मातेची परिक्रमा करण्याचा संकल्प केला. ॥६४॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् अयोध्याकाण्डे एकविंशः सर्गः ॥ २१ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा एकविसावा सर्ग पूरा झाला. ॥२१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP