श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। दशमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

ऋष्यशृङ्‌गस्याङ्‌गदेश आगमनं शान्तया सह विवाहश्च - अंगदेशात ऋष्यशृंगाचे येणे आणि शांतेशी विवाह होण्याच्या प्रसंगाची काहीशा विस्ताराने वर्णन -
सुमंत्रश्चोदितो राज्ञा प्रोवाचेदं वचस्तथा ।
यथर्ष्यशृङ्‍गस्त्वानीतो येनोपायेन मन्त्रिभिः ।
तन्मे निगदितं सर्वं शृणु मे मंत्रिभिः सह ॥ १ ॥
राजाची आज्ञा मिळताच सुमंत्राने सांगण्यास आरंभ केला - "राजन् ! रोमपादाच्या मंत्र्यांनी ज्या प्रकारे ऋष्यशृंगास तेथे आणले तो उपाय वगैरे सर्व काही मी सांगतो. आपण मंत्र्यांसहित माझे निवेदन ऐकावे. ॥ १ ॥
रोमपादमुवाचेदं सहामात्यः पुरोहितः ।
उपायो निरपायोऽयमस्माभिरभिचिन्तितः ॥ २ ॥
'त्यावेळी अमात्यांसहित पुरोहितांनी राजा रोमपादास म्हटले - 'महाराज ! आम्ही एक उपाय शोधला आहे ज्याचे अवलंबन करण्यात कोणतेही विघ्न वा बाधा होण्याची संभावना नाही. ॥ २ ॥
ऋष्यशृङ्‍गो वनचरस्तपःस्वाध्यायसंयुतः ।
अनभिज्ञस्तु नारीणां विषयाणां सुखस्य च ॥ ३ ॥
ऋष्यशृंग मुनि सदा वनातच राहून तपस्या आणि स्वाध्यायात मग्न असतात. त्यांना स्त्री-जातीबद्दल सुतराम देखील कल्पना नाही; म्हणजेच काम विषयांच्या सुखापासून सर्वथा अनभिज्ञ आहेत. ॥ ३ ॥
इंद्रियार्थैरभिमतैर्नरचित्तप्रमाथिभिः ।
पुरमानाययिष्यामः क्षिप्रं चाध्यवसीयताम् ॥ ४ ॥
'आम्ही मनुष्याच्या चित्ताला विचलित करणार्‍या मनोवाञ्छित विषयांचे प्रलोभन दाखवून त्यांना आपल्या नगरात घेऊन येऊ. म्हणून यासाठी शीघ्र प्रयत्‍न केला जावा. ॥ ४ ॥
गणिकास्तत्र गच्छन्तु रूपवत्यः स्वलङ्‍कृताः ।
प्रलोभ्य विविधोपायैरानयिष्यन्तीह सत्कृताः ॥ ५ ॥
सुंदर आभूषणांनी विभूषित मनोहर रूप असणार्‍या गणिका तेथे जाऊन त्यांना नाना उपायांनी आकर्षित करून ऋषिंना या नगरात घेऊन येतील. म्हणून गणिकांना सत्कारपूर्वक पाठवले पाहिजे. ॥ ५ ॥
श्रुत्वा तथेति राजा च प्रत्युवाच पुरोहितम् ।
पुरोहितो मन्त्रिणश्च तथा चक्रुश्च ते तथा ॥ ६ ॥
हे ऐकून राजाने पुरोहितांना म्हणाले, 'फार चांगले. आपण तसेच करावे !' आज्ञा मिळताच पुरोहित आणि मंत्र्यांनी त्याच वेळी तशीच व्यवस्था केली. ॥ ६ ॥
वारमुख्यास्तु तच्छ्रुत्वा वनं प्रविविशुर्महत् ।
आश्रमस्याविदूरेऽस्मिन् यत्‍नं कुर्वन्ति दर्शने ॥ ७ ॥
तेव्हा नगरातील मुख्य मुख्य गणिका राजाचा आदेश ऐकून त्या महान् वनात गेल्या आणि मुनिंच्या आश्रमापासून थोड्याच अंतरावर राहून त्यांच्या दर्शनाच्या (ऋषिंचे लक्ष वेधण्याच्या) उद्योगास लागल्या. ॥ ७ ॥
ऋषेः पुत्रस्य धीरस्य नित्यमाश्रमवासिनः ।
पितुः स नित्यसंतुष्टो नातिचक्राम चाश्रमात् ॥ ८ ॥
'मुनिकुमार ऋष्यशृंग फार धीर स्वभावाचे होते. सदा आश्रमांतच राहात असत. त्यांना नेहमी आपल्या पित्यासमीप राहण्यातच अधिक सुख मिळत असे. म्हणून ते सहसा आश्रमाच्या बाहेर पडत नसत. ॥ ८ ॥
न तेन जन्मप्रभृति दृष्टपूर्वं तपस्विना ।
स्त्री वा पुमान् वा यच्चान्यत् सत्त्वं नगरराष्ट्रजम् ॥ ९ ॥
त्या तपस्वी मुनिकुमाराने जन्मापासून त्या वेळेपर्यंत कधी स्त्रीला पाहिलेच नव्हते आणि पित्याखेरीज दुसर्‍या कोणा पुरुषाचेही दर्शन त्याने केले नव्हते. नगरात अथव राष्ट्रातील गावात उत्पन्न होणार्‍या विविध प्राण्यांनाही त्यांनी पाहिले नव्हते. ॥ ९ ॥
ततः कदाचित् तं देशमाजगाम यदृच्छया ।
विभाण्डकसुतस्तत्र ताश्चापश्यत् वराङ्‍गनाः ॥ १० ॥
तदनंतर एक दिवस विभाण्डक कुमार ऋष्यशृंग हिंडत फिरत अकस्मात् जेथे गणिका राहिल्या होत्या त्या स्थानी आले. तेथे त्यांनी त्या सुंदर वनितांना पाहिले. ॥ १० ॥
ताश्चित्रवेषाः प्रमदा गायन्त्यो मधुरस्वरम् ।
ऋषिपुत्रमुपागम्य सर्वा वचनमब्रुवन् ॥ ११ ॥
त्या प्रमदांचा वेष फारच सुंदर आणि अद्‌भुत होता. त्या उंच स्वरात गात होत्या. ऋषि कुमारास आलेला पाहून त्या सर्व त्याच्याजवळ आल्या आणि अशा प्रकारे विचारू लागल्या - ॥ ११ ॥
कस्त्वं किं वर्तसे ब्रह्मञ्ज्ञातुमिच्छामहे वयम् ।
एकस्त्वं विजने दूरे वने चरसि शंस नः ॥ १२ ॥
'ब्रह्मन् ! आपण कोण आहात ? आपण येथे काय करता ? या निर्जन वनांत आश्रमापासून इतक्या दूर येऊन आपण एकटे कां हिंडत आहात ? हे सर्व आम्हाला सांगा. आम्ही हे सर्व जाणू इच्छितो.' ॥ १२ ॥
अदृष्टरूपास्तास्तेन काम्यरूपा वने स्त्रियः ।
हार्दात्तस्य मतिर्जाता आख्यातुं पितरं स्वकम् ॥ १३ ॥
वनात ऋष्यशृंगाने कधी स्त्रियांचे रूप पाहिलेले नव्हते आणि त्या स्त्रिया तर अत्यंत कमनीय रूपाने सुशोभित दिसत होत्या; म्हणून त्यांना पाहताच त्यांच्या मनांत स्नेह उत्पन्न झाला. त्यांनी आपल्या पित्याचा परिचय देण्याचा विचार केला. ॥ १३ ॥
पिता विभण्डकोऽस्माकं तस्याहं सुत औरसः ।
ऋष्यशृङ्‍ग इति ख्यातं नाम कर्म च मे भुवि ॥ १४ ॥
ते म्हणाले - "माझ्या पित्याचे नाव विभाण्डक मुनि आहे. मी त्यांचा औरस पुत्र आहे. माझे नाव ऋष्यशृंग आणि माझी तपस्या, कर्म या भूमण्डलात सर्वत्र प्रसिद्ध आहे. ॥ १४ ॥
इहाश्रमपदोऽस्माकं समीपे शुभदर्शनाः ।
करिष्ये वोऽत्र पूजां वै सर्वेषां विधिपूर्वकम् ॥ १५ ॥
'येथे जवळच माझा आश्रम आहे. आपण सर्व दिसण्यांत परम सुंदर आहात व आपले दर्शन माझ्यासाठी फार शुभकारक आहे. आपण माझ्या आश्रमात यावे. तेथे मी आपणा सर्वांची विधिवत् पूजा करेन.' ॥ १५ ॥
ऋषिपुत्रवचः श्रुत्वा सर्वासां मतिरास वै ।
तदाश्रमपदं द्रष्टुं जग्मुः सर्वास्ततोऽङ्‌गनाः ॥ १६ ॥
ऋषिकुमाराचे हे म्हणणे ऐकून त्या सर्व त्याच्याशी सहमत झाल्या आणि त्या सर्व सुंदर स्त्रिया त्यांचा आश्रम पाहण्यासाठी तेथे गेल्या. ॥ १६ ॥
गतानां तु ततः पूजामृषिपुत्रश्चकार ह ।
इदमर्घ्यमिदं पाद्यं इदं मूलं हलं च नः ॥ १७ ॥
तेथे गेल्यानंतर 'हे अर्घ्य आहे, हे पाद्य आहे, तसेच भोजनासाठी ही फळे व मूले प्रस्तुत आहेत' असे म्हणत त्या सर्वांचे त्यांनी विधिवत् पूजन केले. ॥ १७ ॥
प्रतिगृह्य तु तां पूजां सर्वा एव समुत्सुकाः ।
ऋषेर्भीताश्च शीघ्रं तु गमनाय मतिं दधुः ॥ १८ ॥
ऋषिंचा सत्कार स्वीकारून त्या सर्व तेथून जाण्यास उत्सुक झाल्या. त्यांना विभाण्डक मुनिंचे भय वाटत होते म्हणून त्यांनी शीघ्र तेथून निघून जाण्याचा विचार केला. ॥ १८ ॥
अस्माकमपि मुख्यानि फलानीमानि वै द्विज ।
गृहाण विप्र भद्रं ते भक्षयस्व च मा चिरम् ॥ १९ ॥
त्या म्हणाल्या, "ब्रह्मन् ! आमच्या जवळही उत्तमोत्तम फळे आहेत. विप्रवर ही ग्रहण करा ! आपले कल्याण असो. ही फळे शीघ्रच चाखून घ्या, विलंब करू नका." ॥ १९ ॥
ततस्तास्तं समालिङ्‍ग्य सर्वा हर्षसमन्विताः ।
मोदकान् प्रददुस्तस्मै भक्ष्यांश्च विविधाञ्शुभान् ॥ २० ॥
असे म्हणून त्या सर्वांनी हर्षाने ऋषिला आलिंगन दिले आणि त्यांना खाण्यास योग्य असे निरनिराळे मोदकादि उत्तम पदार्थ आणि बरीचशी मिठाई दिली. ॥ २० ॥
तानि चास्वाद्य तेजस्वी फलानीति स्म मन्यते ।
अनास्वादितपूर्वाणि वने नित्यनिवासिनाम् ॥ २१ ॥
त्यांचे रसास्वादन करून त्या तेजस्वी ऋषींना वाटले की ही पण फळेच आहेत. कारण त्या दिवसपर्यंत त्यांनी कधीही तसे पदार्थ खाल्ले नव्हते. सदा वनात राहणार्‍यास अशा वस्तूंचा स्वाद घेण्याची संधि तरी कशी आणि केव्हां मिळणार ? ॥ २१ ॥
आपृच्छ्य तु तदा विप्रं व्रतचर्यां निवेद्य च ।
गच्छन्ति स्मापदेशात्ता भीतास्तस्य पितुः स्त्रियः ॥ २२ ॥
त्यानंतर त्यांचा पिता विभाण्डक मुनि यांच्या भितीने घाबरलेल्या त्या ललना व्रत आणि अनुष्ठानाची गोष्ट इत्यादि बहाण्याने त्या ब्राह्मण कुमाराची अनुमति घेऊन तेथून निघाल्या. ॥ २२ ॥
गतासु तासु सर्वासु काश्यपस्यात्मजो द्विजः ।
अस्वस्थहृदयश्चासीत् दुःखाच्च परिवर्तते ॥ २३ ॥
त्या सर्व निघून गेल्यावर काश्यपकुमार ब्राह्मण ऋष्यशृंग मनातल्या मनात व्याकुळ झाला आणि मोठ्या दुःखाने इकडे तिकडे भटकू लागला. ॥ २३ ॥
ततोऽपरेद्युस्तं देशमाजगाम स वीर्यवान् ।
विभाण्डकसुतः श्रीमान् मनसाचिन्त्तयन्मुहुः ॥ २४

मनोज्ञा यत्र ता दृष्टा वारमुख्याः स्वलङ्‍कृताः ।
तदनंतर दुसर्‍या दिवशीही मनाने त्यांचे वारंवार चिंतन करीत विभाण्डककुमार श्रीमान् ऋष्यशृंग जेथे आदल्या दिवशी वस्त्रे आणि आभूषणांनी सजलेल्या मनोहर रूपाच्या गणिकांना पाहिले होते तेथेच परत गेले. ॥ २४ १/२ ॥
दृष्ट्‍वैव च तदा विप्रमायान्तं हृष्टमानसाः ॥ २५ ॥

उपसृत्य ततः सर्वास्तास्तमूचुरिदं वचः ।
एह्याश्रमपदं सौम्य अस्माकमिति चाब्रुवन् ॥ २६ ॥
ऋष्यशृंगाला येताना पाहून ताबडतोब त्या गणिकांचे हृदय प्रसन्नतेने प्रफुल्ल झाले आणि त्या सर्वच्या सर्व त्यांच्याजवळ जाऊन त्यांना म्हणू लागल्या - "सौम्य ! या, या आज आपण आमच्या आश्रमावर चला. ॥ २५-२६ ॥
चित्राण्यत्र बहूनि स्युर्मूलानि च फलानि च ।
तत्राप्येष विशेषेण विधिर्हि भविता ध्रुवम् ॥ २७ ॥
जरी येथे नाना प्रकारची फळे मूले विपुल असली तरी तेथेही निश्चितच या सर्वांची विशेषरूपाने व्यवस्था होऊ शकेल." ॥ २७ ॥
श्रुत्वा तु वचनं तासां सर्वासां हृदयङ्‍गमम् ।
गमनाय मतिं चक्रे तं च निन्युस्तथा स्त्रियः ॥ २८ ॥
त्या सर्वांची मनोहर वचने ऐकून ऋष्यशृंग त्यांच्या बरोबर जाण्यास तयार झाले आणि त्या स्त्रिया त्यांना अंगदेशात घेऊन गेल्या. ॥ २८ ॥
तत्र चानीयमाने तु विप्रे तस्मिन् महात्मनि ।
ववर्ष सहसा देवो जगत् प्रह्लादयंस्तदा ॥ २९ ॥
त्या महात्मा ब्राह्मणाचे अंगदेशात आगमन होताच इंद्राने सर्व जगताला प्रसन्न करीत एकाएकी प्रचंड पर्जन्यवृष्टी करण्यास आरंभ केला. ॥ २९ ॥
वर्षेणैवागतं विप्रं तापसं स नराधिपः ।
प्रत्युद्‍गम्य मुनिं प्रह्वः शिरसा च महीं गतः ॥ ३० ॥
वृष्टि सुरू होताच राजाला अनुमानाने कळले की ते तपस्वी ब्राह्मण कुमार नगरात आले आहेत. नंतर अत्यंत विनयाने राजाने सामोरे जाऊन त्यांचे स्वागत केले आणि पृथ्वीवर मस्तक टेकवून त्यांना साष्टांग नमस्कार केला. ॥ ३० ॥
अर्घ्यं च प्रददौ तस्मै न्यायतः सुसमाहितः ।
वव्रे प्रसादं विप्रेन्द्रान्मा विप्रं मन्युराविशेत् ॥ ३१ ॥
त्यानंतर एकाग्रचित्त होऊन त्यांनी ऋषिंना अर्घ्य निवेदन केले आणि त्या विप्रशिरोमणिकडे वरदान मागितले, 'भगवन् ! आपला आणि आपल्या पित्याचा कृपाप्रसाद मला प्राप्त व्हावा.' असे त्यांनी एवढ्यासाठी केले की न जाणो कपटाने येथपर्यंत आणले गेल्याचे रहस्य कळल्यावर विप्रवर ऋष्यशृंग अथवा विभाण्डक मुनिंच्या मनांत क्रोध निर्माण होऊ नये. ॥ ३१ ॥
अंतःपुरं प्रविश्यास्मै कन्यां दत्त्वा यथाविधि ।
शान्तां शान्तेन मनसा राजा हर्षमवाप सः ॥ ३२ ॥
तत्पश्चात ऋष्यशृंगांना अंतःपुरात घेऊन जाऊन त्यांनी शांत चित्ताने आपली कन्या शान्ता हिचा त्यांच्याबरोबर विधिपूर्वक विवाह करून दिला. असे करून राजाला फार प्रसन्नता वाटली. ॥ ३२ ॥
एवं स न्यवसत् तत्र सर्वकामैः सुपूजितः ।
ऋष्यशृङ्‍गो महातेजाः शान्तया सह भार्यया ॥ ३३ ॥
या प्रकारे महातेजस्वी ऋष्यशृंग राजाकडून पूजित होऊन संपूर्ण मनोवाञ्छित भोग प्राप्त करून आपली धर्मपत्‍नी शान्ता हिच्यासह तेथे राहू लागले. ॥ ३३ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे दशमः सर्गः ॥ १० ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा दहावा सर्ग समाप्त झाला. ॥ १० ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP