॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ उत्तरकाण्ड ॥

॥ नवमः सर्गः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]कालमहाप्रयाण


श्रीमहादेव उवाच
लक्ष्मणं तु परित्यज्य रामो दुःखसमन्वितः ।
मन्‍त्रिणो नैगमांश्चैव वसिष्ठं चेदमब्रवीत् ॥ १ ॥
श्रीमहादेव म्हणाले- हे पार्वती, लक्ष्मणाचा त्याग केल्यावर दुःखी झालेले श्रीराम मंत्री, वेदवेत्ते लोक आणि वसिष्ठ यांना म्हणाले. (१)

अभिषेक्ष्यामि भरतं अधिराज्ये महामतिम् ।
अद्य चाहं गमिष्यामि लक्ष्मणस्य पदानुगः ॥ २ ॥
"आज महाबुद्धिमान भरताला राज्यावर अभिषेक करून, मी लक्ष्मणाच्या पाठोपाठ जातो." (२)

एवमुक्ते रघुश्रेष्ठे पौरजानपदास्तदा ।
द्रुमा इवच्छिन्नमूला दुःखार्ताः पतिता भुवि ॥ ३ ॥
रघुश्रेष्ठांनी असे म्हटल्यावर, नगरवासी व देशवासी लोक दुःखाने कळवळले, आणि मुळे तुटलेले वृक्ष ज्या प्रमाणे जमिनीवर पडतात, त्या प्रमाणे ते उन्मळून पडले. (३)

मूर्छितो भरतो वापि श्रुत्वा रामाभिभाषितम् ।
गर्हयामास राज्यं स प्राहेदं रामसन्निधौ ॥ ४ ॥
श्रीरामांचे भाषण ऐकून भरतसुद्धा मूर्छित पडला. श्रीरामांच्यापुढेराज्याची घृणा वाटून तो असे म्हणाला. (४)

सत्येन च शपे नाहं त्वां विना दिवि वा भुवि ।
काङ्‍क्षे राज्यं रघुश्रेष्ठ शपे त्वत्पादयोः प्रभो ॥ ५ ॥
"हे रघुश्रेष्ठा, सत्याची शपथ घेऊन आणि तुमच्या पाया ची शपथ घेऊन सांगतो की तुमच्याविना स्वर्गलोकातील किंवा पृथ्वीलोकातील राज्याची मला मुळीच इच्छा नाही. (५)

इमौ कुशलवौ राजन् अभिषिञ्चस्व राघव ।
कोशलेषु कुशं वीरं उत्तरेषु लवं तथा ॥ ६ ॥
हे महाराज, या कुश व लव यांना राज्याचा अभिषेक करा. वीर कुशाला कोशल देशावर आणि वीर लवाला उत्तरेमध्ये अभिषेक करा. (६)

गच्छन्तु दूतास्त्वरितं शत्रुघ्नानयनाय हि ।
अस्माकमेतद्‍गमनं स्वर्वासाय शृणोतु सः ॥ ७ ॥
शत्रुघ्नाला आणण्यासाठी दूत त्वरेने जाऊ देत. आपले हे स्वर्गगमन त्यालाही कळू दे." (७)

भरतेनोदितं श्रुत्वा पतितास्ताः समीक्ष्य तम् ।
प्रजाश्च भयसंविग्ना रामविश्लेषकातराः ॥ ८ ॥
भरताने उच्चारले वचन ऐकल्यावर, त्याच्याकडे पाहून समस्त प्रजाजन भयाने उद्विग्न झाले आणि श्रीरामांच्या वियोगाने व्याकूळ होऊन पडले. (८)

वसिष्ठो भगवान् रामं उवाच सदयं वचः ।
पश्य तातादरात्सर्वाः पतिता भूतले प्रजाः ॥ ९ ॥
तेव्हा भगवान वसिष्ठांनी प्रभू रामांना उद्देशून कारुण्यपूर्ण शब्द उच्चारले, "सारी प्रजा पृथ्वीवर पडली आहे, तिच्याकडे कृपादृष्टीने पाहा. (९)

तासां भावानुगं राम प्रसादं कर्तुमर्हसि ।
श्रुत्वा वसिष्ठवचनं ताः समुत्थाप्य पूज्य च ॥ १० ॥
सस्नेहो रघुनाथस्ताः किं करोमीति चाब्रवीत् ।
ततः प्राञ्जलयः प्रोचुः प्रजा भक्त्या रघूद्वहम् ॥ ११ ॥
प्रभू रामचंद्रा, लोकांच्या प्रेमभावानुसार तुम्ही यांच्यावर कृपाप्रसाद करावयास हवा." वसिष्ठांचे वचन ऐकल्यावर, श्रीरामानी त्या सर्व प्रजाजनांना उठवले, त्यांचा सत्कार केला, मग स्नेहपूर्वक त्यांना विचारले, "मी तुमच्यासाठी काय करू ?" तेव्हा सर्व प्रजाजन हात जोडून भक्तीने रघुश्रेष्ठांना म्हणाले. (१०-११)

गन्तुमिच्छसि यत्र त्वं अनुगच्छामहे वयम् ।
अस्माकमेषा परमा प्रीतिर्धर्मोऽयमक्षयः ॥ १२ ॥
"तुम्ही जेथे जाऊ इच्छिता तेथे आम्ही मागोमाग येऊ. यातच आम्हांला आनंद आहे आणि यातच आमचा अक्षय धर्म आहे. (१२)

तवानुगमने राम हृद्‍गता नो दृढा मतिः ।
पुत्रदारादिभिः सार्धं अनुयामोऽद्य सर्वथा ॥ १३ ॥
तपोवनं वा स्वर्गं वा पुरं वा रघुनन्दन ।
ज्ञात्वा तेषां मनोदार्ढ्यं कालस्य वचनं तथा ॥ १४ ॥
भक्तं पौरजनं चैव बाढमित्याह राघवः ।
कृत्यैव निश्चयं रामः तस्मिन्नेवाहनि प्रभुः ॥ १५ ॥
प्रस्थापयामास च तौ रामभद्रः कुशीलवौ ।
अष्टौ रथसहस्राणि सहस्रं चैव दन्तिनाम् ॥ १६ ॥
सष्टिं चाश्वसहस्राणां एकैकस्मै ददौ बलम् ।
बहुरत्‍नौ बहुधनौ हृष्टपुष्टजनावृतौ ॥ १७ ॥
अभिवाद्य गतौ रामं कृच्छ्रेण तु कुशीलवौ ।
शत्रुघ्नानयने दूतान् प्रेषयामास राघवः ॥ १८ ॥
हे प्रभू रामा, तुमच्या मागोमाग येण्याचा आमच्या मनातील विचार अगदी पक्का आहे. हे रघुनंदना, तुम्ही तपोवन, नगर अथवा स्वर्ग येथे कुठेही जा. आम्ही आमचे पुत्र, पत्नी इत्यादींसह आज तुमच्या मागोमाग येणार." त्यांच्या मनाचा तो दृढ निश्चय, तसेच कालाचे वचन लक्षात घेऊन "ठीक आहे" असे राघव त्या भक्तियुक्त नागरिकांना म्हणाले. मग प्रभू रामांनी तसा निश्चय केला आणि त्याच दिवशी त्यांनी कुश व लवाची रवानगी त्यांच्या राज्यांत केली. प्रत्येकाला त्यांनी आठ हजार रथ, एक हजार हत्ती, साठ हजार घोडे आणि बलवान सैन्य दिले, तसेच पुष्कळ रत्ने, पुष्कळ द्रव्य आणि आनंदी व बलसंपन्न सेवक त्यांना प्रदान केले. मग श्रीरामांना अभिवादन करून कुश आणि लव मोठ्या कष्टाने निघून गेले. शत्रुघ्नाला आणण्यासाठी राघवांनी दूत पाठविले. (१३-१८)

ते दूतास्त्वरितं गत्वा शत्रुघ्नाय न्यवेदयन् ।
कालस्यागमनं पश्चात् अत्रिपुत्रस्य चेष्टितम् ॥ १९ ॥
लक्ष्मणस्य च निर्याणं प्रतिज्ञां राघवस्य च ।
पुत्राभिषेचनं चैव सर्वं रामचिकीर्षितम् ॥ २० ॥
दूत त्वरित गेले आणि त्यांनी शत्रुघ्नाला कालाचे आगमन, नंतर अत्रिपुत्र दुर्वासाचे कृत्य, लक्ष्मणाचे महानिर्वाण, श्रीरामांची प्रतिज्ञा, कुश व लव या पुत्रांचा राज्याभिषेक आणि आता श्रीराम काय करू इच्छितात, हे सर्व निवेदन केले. (१९-२०)

श्रुत्वा तद् दूतवचनं श्त्रुघ्नः कुलनाशनम् ।
व्यथितोऽपि धृतिं लब्ध्वा पुत्रौ आहूय सत्वरः ।
अभिषिच्य सुबाहुं वै मथुरायां महाबलः ॥ २१ ॥
यूपकेतुं च विदिशानगरे शत्रुसूदनः ।
अयोध्यां त्वरितं प्रागात् स्वयं रामदिदृक्षया ॥ २२ ॥
कुळाच्या नाशाविषयीचे ते दूतांचे वचन ऐकल्यावर शकुन अतिशय व्यथित झाला. तथापि त्याने धैर्य धारण केले आणि सत्वर आपल्या दोन पुत्रांना बोलावून घेतले. मग त्या महाबलवान शत्रुघ्नाने सुबाहूला मथुरा नगरीत अभिषेक केला, तसेच त्याने यूपकेतूला विदिशा नगरीत अभिषेक केला आणि रामांना भेटण्यासाठी तो स्वतः त्वरेने अयोध्येकडे निघाला. (२१-२२)

ददर्श च महात्मानं तेजसा ज्वलनप्रभम् ।
दुकूलयुगसंवीतं ऋषिभिश्चाक्षयैर्वृतम् ॥ २३ ॥
स्वतःच्या तेजाने अग्नीप्रमाणे प्रभा असणाऱ्या व दोन रेशमी वस्त्रे परिधान केलेल्या आणि चिरंजीव अशा ऋषींसमवेत महात्म्या श्रीरामांना शत्रुघ्नाने पाहिले. (२३)

अभिवाद्य रमानाथं शत्रुघ्नौ रघुपुङ्‍गवम् ।
प्राञ्जलिर्धर्मसहितं वाक्यं प्राह महामतिः ॥ २४ ॥
नंतर लक्ष्मीपती रघुश्रेष्ठाला अभिवादन करून, महाबुद्धिमान शत्रुघ्न हात जोडून धर्माने युक्त असे वचन बोलला. (२४)

अभिषिच्य सुतौ तत्र राज्ये राजीवलोचन ।
तवानुगमने राजन् विद्धि मां कृतनिश्चयम् ॥ २५ ॥
"हे कमलनयन श्रीरामा, तेथे राज्यावर माझ्या दोन पुत्रांना अभिषेक करून मी आलो आहे. हे राजन्, तुमच्या मागोमाग येण्याचा मीसुद्धा निश्चय केला आहे, हे लक्षात घ्या. (२५)

त्यक्तुं नार्हसि मां वीर भक्तं तव विशेषतः ।
शत्रुघ्नस्य दृढां बुद्धिं विज्ञाय रघुनन्दनः ॥ २६ ॥
सज्जिभवतु मध्याह्ने भवानित्यब्रवीद्वचः ।
अथ क्षणात् समुत्पेतुः वानराः कामरूपिणः ॥ २७ ॥
ऋक्षाश्च राक्षसाश्चैव गोपुच्छाश्च सहस्रशः ।
ऋषीणां देवतानां च पुत्रा रामस्य निर्गमम् ॥ २८ ॥
श्रुत्वा प्रोचू रघुश्रेष्ठं सर्वे वानरराक्षसाः ।
तवानुगमने विद्धि निश्चितार्थान्हि नः प्रभो ॥ २९ ॥
हे वीर रामा, मी तुमचा भक्त आहे. विशेषतः माझा त्याग करणे तुम्हांला शोभणार नाही." शत्रुघ्नाचा दृढ निश्चय कळल्यावर, श्रीराम बोलले, "आज दुपारी तू तयार हो." त्याच वेळी एका क्षणात इच्छेप्रमाणे रूप धारण करणारे वानर, अस्वले, राक्षस आणि गोपुच्छ जातीचे वानर हजारोंच्या संख्येने उड्या मारत तेथे आले. ऋषी तसेच देवतांचे अंशभूत पुत्ररूप असे सर्व वानर आणि राक्षसांचे समूह हे सर्वजण श्रीरामांचे निर्याणाविषयी ऐकल्यावर रघुश्रेष्ठ श्रीरामांना म्हणाले, "हे प्रभो, तुमच्या मागोमाग येण्याचा आम्हीसुद्धा निश्चय केला आहे, असे समजा." (२६-२९)

एतस्मिन् अन्तरे रामं सुग्रीवोऽपि महाबलः ।
यथावत् अभिवाद्याह राघवं भक्तवत्सलम् ॥ ३० ॥
दरम्यानच्या काळात महाबलवान सुग्रीवसुद्धा तेथे आला आणि अभिवादन करून, तो भक्तवत्सल राघवांना म्हणाला. (३०)

अभिषिच्याङ्‍गदं राज्ये आगतोऽस्मि महाबलम् ।
तवानुगमने राम विद्धि मां कृतनिश्चयम् ॥ ३१ ॥
"महाबलवान अंगदाचा राज्यावर अभिषेक करून मी आलो आहे. तुमच्या मागोमाग येण्याचा माझासुद्धा निश्चय आहे, हे लक्षात असू द्या." (३१)

श्रुत्वां तेषां दृढं वाक्यं ऋक्ष वानर रक्षसाम् ।
विभीषणमुवाचेदं वचनं मृदु सादरम् ॥ ३२ ॥
त्या वेळी ती अस्वले, वानर आणि राक्षस यांचा दृढ निश्चय ऐकल्यावर, श्रीरामांनी आदरपूर्वक बिभीषणाला उद्देशून मृदू भाषेत सांगितले. (३२)

धरिष्यति धरा यावत् प्रजाः तावत् प्रशाधि मे ।
वचनात् राक्षसं राज्यं शापितोऽसि ममोपरि ॥ ३३ ॥
"अरे बिभीषणा, जोपर्यंत धरतीवर प्रजा असेल तोपर्यंत माझ्या सांगण्याप्रमाणे तू राक्षस-राज्याचे शासन कर. माझी तुला शपथ आहे. (३३)

न किञ्चिदुत्तरं वाच्यं त्वया मत्कृतकारणात् ।
एवं विभीषणं तु उक्‍त्वा हनूमन्तमथाब्रवीत् ॥ ३४ ॥
मी केलेल्या या योजनेवर तू आता मला कोणतीही सबब सांगू नकोस " अशा प्रकारे बिभीषणाला सांगिल्यावर, मग श्रीराम हनुमंताला म्हणाले. (३४)

मारुते त्वं चिरञ्जीव ममाज्ञां मा मृषा कृथाः ।
जाम्बवन्तमथ प्राह तिष्ठ त्वं द्वापरान्तते । ३५ ॥
मया सार्धं भवेद् युद्धं यत्किञ्चित् कारणान्तरे ।
ततस्तान् राघवः प्राह ऋक्षराक्षसवानरान् ।
सर्वानेव मया सार्धं प्रयातेति दयान्वितः ॥ ३६ ॥
"हे मारुती, तू चिरकाल जिवंत राहा. माझी आज्ञा मोडू नकोस." नंतर ते जांबवंताला म्हणाले " तू द्वापर युगाच्या शेवटपर्यंत राहा. त्या वेळी काही तरी कारणाने तुझे माझ्याशी युद्ध होईल." त्यानंतर सर्व अस्वले, राक्षस आणि वानर यांना राघव दयावंत होऊन म्हणाले, "तुम्ही सर्व जण माझ्याबरोबरच चला." (३५-३६)

ततः प्रभाते रघुवंशनाथो
    विशालवक्षाः सितकञ्जनेत्रः ।
पुरोधसं प्राह वसिष्ठमार्यं
    यान्त्वग्निहोत्राणि पुरो गुणो मे । ३७ ॥
दुसरे दिवशी प्रभातकाळी, विशाल वक्षःस्थळाच्या आणि श्वेत कमळाप्रमाणे नेत्र असलेल्या रघुवंशनाथांनी पूज्य पुरोहित वसिष्ठांना म्हटले, "हे गुरो, अग्निहोत्राचे आहवनीय इत्यादी अग्नी माझ्यापुढे असू देत." (३७)

ततो वसिष्ठोऽपि चकार सर्वं
    प्रास्थानिकं कर्म महद्विधानात् ।
क्षौमाम्बरो दर्भपवित्रपाणिः
    महाप्रयाणाय गृहीतबुद्धीः ॥ ३८ ॥
निष्क्रम्य रामो नगरात्सिताभ्रात्
    शशीव यातः शशिकोटिकान्तिः ।
रामस्य सव्ये सितपद्महस्ता
    पद्मा गता पद्मविशालनेत्रा ॥ ३९ ॥
पार्श्वेऽथ दक्षेऽरुणकञ्जहस्ता
    श्यामा ययौ भूरपि दीप्यमाना ।
शास्त्राणि शस्त्राणि धनुश्च बाणा
    जग्मुः पुरस्ताद् धृतविग्रहास्ते ॥ ४० ॥
तेव्हा वसिष्ठांनीसुद्धा मोठ्या शास्त्रविधीने प्रस्थानाला योग्य असणारी सर्व धर्म-कर्मे केली. ज्या प्रमाणे पांढऱ्या ढगातून चंद्र बाहेर पडतो, त्याप्रमाणे रेशमी वस्त्रे परिधान केलेले, हातात दर्भाचे पवित्रक असणारे कोट्यवधी चंद्राप्रमाणे कांती असणारे आणि महाप्रयाणाचे बाबतीत निश्चय केलेले श्रीराम नगरातून बाहेर पडले. रामांच्या डाव्या बाजूने, हातात श्वेत कमळ घेतलेली आणि कमळाप्रमाणे विशाल नेत्र असणारी लक्ष्मी चालत होती. त्याच वेळी त्यांच्या उजव्या बाजूला, हातात लाल कमळ घेतलेली देदीप्यमान श्याम वर्णाची पृथ्वीदेवीसुद्धा चालली होती, शास्त्रे, शस्त्रे, धनुष्य आणि बाण हे देह धारण करून रामांच्या पुढे चालत होते. (३८-४०)

वेदाश्च सर्वे धृतिविग्रहाश्च
    ययुश्च सर्वे मुनयश्च दिव्याः ।
माता श्रुतीनां प्रणवेन साध्वी
    ययौ हरिं व्याहृतिभिः समेता ॥ ४१ ॥
याचप्रमाणे शरीर धारण करून सर्व वेद आणि सर्व दिव्य मुनी रामांबरोबर निघाले होते. तसेच वेदांची साध्वी माता गायत्री देवीही प्रणव आणि व्याहृती यांच्यासह रामांबरोबर निघाली होती. (४१)

गच्छन्तमेवानुगता जनास्ते
    सपुत्रदाराः सह बन्धुवर्गैः ।
अनावृतद्वारमिवापवर्ग
    रामं व्रजन्तं ययुराप्तकामाः ।
सान्तःपुरः सानुचरः सभार्यः
    शत्रुघ्नयुक्तो भरतोऽनुयातः ॥ ४२ ॥
अशा प्रकारे राम जात असताना, ते सर्व प्रजाजन आपले पुत्र, पत्नी आणि बंधुबांधवांचा समाज यांचेसह श्रीरामांच्या मागोमाग निघाले. इच्छा नष्ट झालेले लोक ज्या प्रमाणे दार उघडलेल्या मोक्षाकडे जातात, त्या प्रमाणे ते लोक श्रीरामांच्या मागोमाग जात होते. तसेच अंतःपुरातील स्त्रिया, सेवक, पत्नी आणि शत्रुघ्न यांच्यासह भरतसुद्धा मागे चालला होता. (४२)

गच्छन्तमालोक्य रमासमेतं
    श्रीराघवं पौरजनाः समस्ताः ।
सबालवृद्धाश्च ययुर्द्विजाग्र्याः
    सामात्यवर्गश्च समंत्रिणो ययुः ॥ ४३ ॥
लक्ष्मीसह जाणाऱ्या श्रीराघवांना पाहून, बालक आणि वृद्ध यांचेसह सर्व नगरवासी लोक निघाले होते. तसेच अमात्यांचा समूह आणि मंत्री यांच्यासह श्रेष्ठ ब्राह्मणही मागोमाग निघाले होते. (४३)

सवे गताःक्षत्रमुखाप्रहृष्टा
    वैश्याश्च शूद्राश्च तथा परे च ।
सुग्रीवमुख्या हरिपुङ्‌गवाश्च
    स्नाता विशुद्धाः शुभशब्दयुक्ताः ॥ ४४ ॥
प्रमुख क्षत्रिय, वैश्य, शूद्र तसेच इतर सर्व लोक मोठ्या आनंदाने चालले होते. खेरीज सुग्रीवादी श्रेष्ठ वानर स्नान करून, शुद्ध होऊन ' श्रीरामांचा जय असो ' असे शुभ शब्द उच्चारीत मागोमाग चालले होते. (४४)

न कश्चित् आसीत् भवदुःखयुक्तो
    दीनोऽथवा बाह्यसुखेषु सक्तः ।
आनदरूपानुगता विरक्ता
    ययुश्च रामं पशुभृत्यवर्गैः ॥ ४५ ॥
संसारदुःखाने दुःखी, दीन किंवा बाह्य विषयांच्या सुखांमध्ये आसक्त असा कोणीही त्यांमध्ये नव्हता. उलट संसारातून विरक्त झालेले ते सर्व जण आपापले पशू व सेवक वर्ग यांच्यासह आनंदरूप असणाऱ्या श्रीरामांच्या मागे निघाले होते. (४५)

भूतान्यदृश्यानि च यानि तत्र
    ये प्राणिनः स्थावरजङ्‌गमाश्च ।
साक्षात्परात्मानमनन्तशक्तिं
    जग्मुर्विमुक्ताः परमेकमीशम् ॥ ४६ ॥
तेथे जे भूतप्रेतादी अदृश्य प्राणी होते, तसेच जे स्थावर जंगम प्राणी होते ते सर्व विरक्त होऊन त्या एकमेवाद्वितीय परम ईश्वर, अनंत शक्ति-संपन्न अशा साक्षात परमात्म्याचे मागे निघाले होते. (४६)

नासीदयोध्यानगरे तु जन्तुः
    कश्चित्तदा राममना न यातः ।
शून्यं बभूवाखिलमेव तत्र
    पुरं गते राजनि रामचन्द्रे ॥ ४७ ॥
त्या वेळी अयोध्या नगरीत श्रीरामांच्याबरोबर मनः पूर्वक निघाला नव्हता, असा एकही प्राणी नव्हता. महाराज रामचंद्र बाहेर पडल्यावर, ते संपूर्ण नगर सुनेसुने झाले. (४७)

ततोऽदूरं नगरात्स गत्वा
    दृष्ट्वा नदीं तां हरिनेत्रजाताम् ।
ननन्द रामः स्मृतपावनोऽतो
    ददर्श चाशेषमिदं हृदिस्थम् ॥ ४८ ॥
त्यानंतर नगरातून बरेच दूर गेल्यावर, विष्णूच्या नेत्रांपासून उत्पन्न झालेली सरयू नदी श्रीरामांनी पाहिली. स्मरण करताच पावन करणारे श्रीराम त्या नदीस पाहून आनंदित झाले आणि हे संपूर्ण जग आपल्या हृदयातच सामावले आहे, असे त्यांना दिसले. (४८)

अथागतस्तत्र पितामहो महान्
    देवाश्च सर्वे ऋषयश्च सिद्धाः ।
विमानकोटीभिरपारपारं
    समावृतं खं सुरसेविताभिः ॥ ४९ ॥
रविप्रकाशाभिरभिस्फुरत्स्वं
    ज्योतिर्मयं तत्र नभो बभूव ।
स्वयंप्रकाशैर्महतां महद्‌भिः
    समावृतं पुण्यकृतां वरिष्ठैः ॥ ५० ॥
तितक्यात तेथे श्रेष्ठ पितामह ब्रह्मदेव, सर्व देव ऋषी आणि सिद्ध हेही आले. त्या वेळी देव विराजमान असलेल्या कोट्यवधी विमानांनी अपरंपार आकाश गच्च भरून गेले होते. सूर्याप्रमाणे असणाऱ्या त्या विमानांच्या प्रकाशांनी ते प्रकाशमान झाले. पुण्यवानांतील श्रेष्ठ, महात्म्यांमधील महान अशा स्वयंप्रकाशी पुरुषांमुळे आकाश भरून गेले होते. (४९-५०)

ववुश्च वाताश्च सुगन्धवन्तो
    ववर्ष वृष्टिः कुसुमावलीनाम् ।
उपस्थिते देवमृदङ्‍गनादे
    गायत्सु विद्याधरकिन्नरेषु ॥ ५१ ॥
रामस्तु पद्‌भ्यां सरयूजलं सकृत्
    स्पृष्ट्वा परिक्रामदनन्तशक्तिः ।
ब्रह्मा तदा प्राह कृताञ्जलिस्तं
    रामं परात्मन् परमेश्वरस्त्वम् ॥ ५२ ॥
विष्णुः सदानन्दमयोऽसि पूर्णो
    जानासि तत्त्वं निजमैशमेकम् ।
तथापि दासस्य ममाखिलेश
    कृतं वचो भक्तपरोऽसि विद्वन् ॥ ५३ ॥
त्या वेळी सुगंधी वारे वाहू लागले. कुसुम-समूहाची सतत वृष्टी हो ऊ लागली आणि देवांच्या मृदंगाचा नाद कानी पडत असताना आणि विद्याधर व किन्नर गात असताना, अनंतशक्ती असणाऱ्या श्रीरामांनी सरयूच्या जलाचे एकदा आचमन केले. मग सरयू जलाला पायांनी स्पर्श करून ते त्या पाण्यातून चालू लागले. त्यावेळी हात जोडून ब्रह्मदेव श्रीरामांना म्हणाले, " हे परमात्मन्, तुम्ही परमेश्वर आहात, नित्य आनंदमय आणि सर्वांशी पूर्ण असे साक्षात विष्णू आहात. आपले स्वतःचे एकमेव ईश्वरी तत्त्व तुम्हीच जाणता, तथापि हे सर्वांच्या स्वामी असलेल्या तुमचा मी दास आहे. माझी प्रार्थना तुम्ही पूर्ण केली आहे. हे विद्वाना, तु म्ही भक्तवत्सल आहात. (५१-५३)

त्वं भ्रातृभिर्वैष्णवमेवमाद्यं
    प्रविश्य देहं परिपाहि देवान् ।
यद्वा परो वा यदि रोचते तं
    प्रविश्य देहं परिपाहि नस्त्वम् ॥ ५४ ॥
आता आपल्या भावांसह तुम्ही आद्य विष्णूच्या शरीरातच प्रवेश करा आणि देवांचे रक्षण करा, किंवा जर तुम्हाला दुसरा एकादा देह पसंत असेल, तर त्या देहात प्रवेश करून तुम्ही आम्हा सर्वांचे पालन करा. (५४)

त्वमेव देवाधिपतिश्च विष्णुः
    जानन्ति न त्वां पुरुषा विना माम् ।
सहस्रकृत्वस्तु नमो नमस्ते
    प्रसीद देवेश पुनर्नमस्ते ॥ ५५ ॥
तुम्हीच देवांचे अधिपती विष्णू आहात. ही गोष्ट माझ्याखेरीज इतर कोणी पुरुष जाणत नाहीत. हे देवेश्वरा, तुम्हांला हजार वेळा माझा नमस्कार असो. तुम्ही प्रसन्न व्हा. पुनः तुम्हांला माझा नमरार असो." (५५)

पितामहर्थनया स रामः
    पश्यत्सु देवेषु महाप्रकाशः ।
मुष्णंश्च चक्षूंषि दिवौकसां तदा
    बभूव चक्रादि युतश्चतुर्भुजः ॥ ५६ ॥
पितामह ब्रह्मदेवाने अशी प्रार्थना केली असता आणि सर्व देव पाहात असताना, स्वर्गात राहाणाऱ्या सर्व देवांची दृष्टी दिपवीत, महातेजस्वी प्रभू रामचंद्रांनी चक्र इत्यादींनी युक्त चतुर्मुज रूप धारण केले. (५६)

शेषो बभूवेश्वरतल्पभूतः
    सौमित्रिरत्यद्‌भुतभोगधारी ।
बभूवतुश्चक्राधरौ च दिव्यौ
    कैकेयिसूनूर्लवणान्तकश्च ॥ ५७ ॥
लक्ष्मण अतिशय अद्‌भुत फणा धारण करून विष्णूची शय्या असणारा शेष नाग झाला. तसेच कैकेयीचा पुत्र भरत आणि लवणाचा वध करणारा शत्रुघ्न हे अनुक्रमे दिव्य असे चक्र आणि शंख झाले. (५७)

सीता च लक्ष्मीरभवत्पुरेव
    रामो हि विष्णुः पुरुषः पुराणः ।
सहानुजः पूर्वशरीरकेण
    बभूव तेजोमयदिव्यमूर्तिः ॥ ५८ ॥
सीता ही तर अगोदरच लक्ष्मी झाली होती. राम हे साक्षात पुराण पुरुष विष्णूच. आपल्या कनिष्ठ बंधूसह आपले पूर्वीचे शरीर धारण करून श्रीरामचंद्र तेजोमय दिव्य स्वरूपी विष्णू बलून शोभू लागले. (५८)

विष्णुं समासाद्य सुरेन्द्रमुख्या
    देवाश्च सिद्धा मुनयश्च दक्षाः ।
पितामहाद्याः परितः परेशं
    स्तवैर्गृणन्तः परिपूजयन्तः ॥ ५९ ॥
आनन्द्संप्लावितपूर्णचित्ता
    बभूविरे प्राप्तमनोरथास्ते ।
तदाह विष्णुर्द्रुहिणं महात्मा
    एते हि भक्ता मयि चानुरक्ताः ॥ ६० ॥
त्या वेळी इद्रादी देव, सिद्ध, मुनी, यक्ष, ब्रह्मदेव इत्यादी परमेश्वर विष्णुजवळ येऊन, सर्व प्रकारे स्तोत्रांनी त्यांची स्तुती करू लागले आणि त्यांनी त्यांची पूजा केली. आपला मनोरथ पूर्ण झाल्यामुळे त्या सर्वांची मने आनंदाने संपूर्णपणे भरून गेली. त्या वेळी भगवान विष्णू ब्रह्मदेवांना म्हणाले, 'हे सार्व जण माझे भक्त आहेत आणि ते माझ्यावर प्रेम करणारे आहेत. (५९-६०)

यान्तं दिवं मामनुयान्ति सर्वे
    तिर्यक् शरीरा अपि पुण्ययुक्ताः ।
वैकुण्ठसाम्यं परमं प्रयान्तु
    समाविशस्वाशु ममाज्ञया त्वम् ॥ ६१ ॥
मी स्वर्गलोकाला येण्यास निघालो असताना, हे सर्व जण माझ्या मागोमाग येथे आले आहेत. यांमध्ये जे तिर्यक् शरीरधारी आहेत, तेसुद्धा फार पुण्यवंत आहेत. हे सर्वजण वैकुंठसदृश उत्तम लोकांप्रत जाऊ देत. तेव्हा माझ्या आज्ञेने तुम्ही यांना ताबडतोब प्रवेश द्या. " (६१)

श्रुत्वा हरेर्वाक्यमथाब्रवीत्कः
    सन्तानिकान्यान्तु विचित्रभोगन् ।
लोकान्मदीयोपरि दीप्यमानान्
    त्वद्‌भावयुक्ताः कृतपुण्यपुञ्जाः ॥ ६२ ॥
हरीचे वचन ऐकल्यावर ब्रह्मदेव म्हणाले, "माझ्या ब्रह्मलोकाच्याही वर असणारे, देदीप्यमान, विचित्र भोग साधनांनी संपन्न असे जे सांतानिक लोक आहेत, त्या लोकांप्रत तुमच्या भक्तीने युक्त असणारे आणि ज्यांनी पुण्याचा संचय केला आहे, असे हे लोक जाऊ देत. (६२)

ये चापि ते राम पवित्रनाम
    गृणन्ति मर्त्या लयकाल एव ।
अज्ञानतो वापि भजन्तु लोकान्
    तानेव योगैरपि चाधिगम्यान् ॥ ६३ ॥
आणि हे श्रीरामा, आणखी सांगतो की मरणकाळी जे मानव ' राम ' हे तुमचे पवित्र नाम उचारतील, तसेच अजाणता का होईना जे कोणी तुम्हांला भजतील, त्या लोकांनासुद्धा, योगीजनांना प्राप्त होण्यास योग्य असे ते सांतानिक लोक प्राप्त होतील. " (६३)

ततोऽतिहृष्टा हरिराक्षसाद्याः
    स्पृष्ट्वा जलं त्यक्तकलेवरास्ते ।
प्रपेदिरे प्राक्तनमेव रूपं
    यदंशजा ऋक्षहरीश्वरास्ते ॥ ६४ ॥
- ! त्या वेळी वानर, राक्षस इत्यादी अतिशय आनंदित झाले. सरयूच्या जलाला स्पर्श करून त्यांनी आपल्या शरीराचा त्याग केला. त्यानंतर ती अस्वले व वानरश्रेष्ठ ज्या अंशापासून उत्पन्न झाले होते, त्या देवांची पूर्वीची रूपे त्यांना प्राप्त झाली. (६४)

प्रभाकरं प्राप हरिप्रवीरः
    सुग्रीव आदित्यजवीर्यवत्त्वात् ।
ततो विमग्नाः सरयूजलेषु
    नराः परित्यज्य मनुष्यदेहम् ॥ ६५ ॥
आरुह्य दिव्याभरणा विमानं
    प्रापुश्च ते सान्तनिकाख्यलोकान् ।
तिर्यक् प्रजाता अपि रामदृष्ट्वा
    जलं प्रविष्टा दिवमेव याताः ॥ ६६ ॥
वानरांतील श्रेष्ठ वीर सुग्रीव हा आदित्याच्या वीर्यापासून उत्पन्न झाला असल्यामुळे तो सूर्यात विलीन होऊन गेला. त्यानंतर इतर माणसांनी सरयूच्या पाण्यात बुडी मारली; त्यांनी आपल्या मनुष्यदेहांचा त्याग केला; मग दिव्य अलंकारांनी विभूषित होऊन ते विमानात चढले आणि त्यांनी सांतानिक नावाचे लोक प्राप्त करून घेतले. तिर्यक् योनीत जन्मलेले प्राणीसुद्धा श्रीरामांची दृष्टी पडल्यावर सरयूच्या पाण्यात शिरले आणि तेही रवर्गलोकचि गेले. (६५-६६)

दिदृक्षवो जानपदाश्च लोका
    रामं समालोक्य विमुक्तसङ्‌गाः ।
स्मृत्वा हरिं लोकगुरुं परेशं
    स्पृष्ट्वा जलं स्वर्गमवापुरञ्जः ॥ ६७ ॥
जे देशवासी लोक हा प्रसंग पाहाण्याच्या इच्छेने आलेले होते, तेसुद्धा श्रीरामांचे दर्शन झाल्यावर, संसाराच्या आसक्तीतून मुक्त झाले आणि लोकगुरू व परमेश्वर अशा श्रीहरींचे स्मरण करून, त्यांनी सरयूच्या जलाला स्पर्श करताच, त्यांनासुद्धा अनायासे स्वर्गाची प्राप्ती झाली. (६७)

एतावदेवोत्तरमाह शम्भुः
    श्रीरामचन्द्रस्य कथावशेषम् ।
यः पादमप्यत्र पठेत्स पापाद्‍
    विमुच्यते जन्मसहस्रजातात् ॥ ६८ ॥
श्रीरामचंद्रांच्या कथेचा उरलेला इतकाच भाग शंकरांनी पार्वतीला उत्तरकांड रूपात सांगितला. जो कुणी माणूस यातील एक पाद (चौथा भाग) सुद्धा पठण करील, तो हजारो जन्मात झालेल्या पापांतून मुक्त होऊन जाईल. (६८)

दिने दिने पापचयं प्रकुर्वन्
    पठेन्नरः श्लोकमपीह भक्त्या ।
विमुक्तसर्वाघचयः प्रयाति
    रामस्य सालोक्यमनन्यलभ्यम् ॥ ६९ ॥
दररोज पापाचा संचय करणारा पुरूष जर भक्तीने या अध्यात्मरामायणातील एक तरी श्लोक पठण करील, तो पापांच्या सर्व संचयातून मुक्त होऊन, इतरांना अलभ्य अशा रामाच्या सालोक्यपदाप्रत जाईल. (६९)

आख्यानमेतत् रघुनायकस्य
    कृतं पुरा राघवचोदितेन ।
महेश्वरेणाप्तभविष्यदर्थं
    श्रुत्वा तु रामः परितोषमेति ॥ ७० ॥
ज्यामध्ये भविष्यकालीन गोष्टी वर्णिल्या आहेत, असे हे रघुनायकांचे आख्यान त्यांच्या प्रेरणेनेच महेश्वराने पूर्वी रचले. ते ऐकून श्रीराम अतिशय संतुष्ट होतात. (७०)

रामायणं काव्यमनन्तपुण्यं
    श्रीशङ्‍करेणाभिहितं भवान्यै ।
भक्त्या पठेद्यः शृणुयात्स पापैः
    विमुच्यते जन्मशतोद्‌भवैश्च ॥ ७१ ॥
अनंत पुण्य देणारे हे अध्यात्म रामायण नावाचे काव्य पूर्वी श्रीशंकरांनी पार्वतीला सांगितले. जो पुरुष हे भक्तीने पठण करील अथवा श्रवण करील, तो शेकडो जन्मांत निर्माण झालेल्या पापांतून मुक्त होऊन जातो. (७१)

अध्यात्मरामं पठतश्च नित्यं
    श्रोतुश्च भक्त्या लिखितुश्च रामः ।
अतिप्रसन्नश्च सदा समीपे
    सीतासमेतः श्रियमातनोति ॥ ७२ ॥
या अध्यात्मरामायणाचे नित्य पठण जो पुरुष भक्तीने करतो, वा श्रवण करतो अथवा त्याचे लेखन करतो, त्याच्यावर श्रीराम अतिशय प्रसन्न होतात आणि सीतेसह सदा त्याच्या समीप राहून त्याला भोगमोक्ष देतात. (७२)

रामायणं जनमनोहरमादिकाव्यं
    ब्रह्मादिभिः सुरवरैरपि संस्तुतं च ।
श्रद्धान्वितः पठति यः शृणुयात्तु नित्यं
    विष्णोः प्रयाति सदनं स विशुद्धदेहः ॥ ७३ ॥
ब्रह्मदेव इत्यादी श्रेष्ठ देवांनी प्रशंसा केलेले आणि माणसांच्या मनाचे हरण करणारे हे आदिकाव्य असे अध्यात्म रामायण जो कोणी भक्तिसंपन्न होऊन नित्य पठण करतो किंवा नित्य श्रवण करतो, त्याचे शरीर शुद्ध होते (व मन निर्मळ होते) आणि तो विष्णूच्या परमधामास जातो. (७३)

इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे
उत्तरकाण्डे नवमः सर्गः ॥ ९ ॥
समाप्तामिदमुत्तरकाण्डम् ॥
इति श्रीमद्‌अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे उत्तरकाण्डे नवमः सर्गः ॥ ९ ॥
समाप्तामिदमुत्तरकाण्डम्

पार्वत्यै परमेश्वरेण गदिते ह्मध्यात्मरामायणे
काण्डैः सप्तभिरन्वितेऽतिशुभदे सर्गाश्चतुःषष्टिकाः ।
श्लोकानां तु शतद्वयेन सहितान्युक्तानि चत्वारि वै
साहस्राणि समाप्तितः श्रुतिशतान्युक्तानि तत्त्वार्थतः ॥
श्रीशंकरांनी पार्वतीला सांगितलेल्या, आणि सात कांडांनी युक्त असणाऱ्या या अतिशय शुभप्रद अध्यात्मरामायणात चौसष्ट सर्ग आहेत. याच्या अंतापर्यंत एकूण चार हजार दोनशे श्लोक सांगितलेले आहेत. तसेच तत्त्वार्थाचे विवेचन करणाऱ्या शेकडो श्रुतींची वचने सांगितली आहेत.


GO TOP