[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। एकषष्टितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
कौसल्याया राजानं प्रति सविलापमुपालम्भः - कौसल्येचे विलापपूर्वक राजा दशरथांना दोष देणे -
वनं गते धर्मरते रामे रमयतां वरे ।
कौसल्या रुदती चार्ता भर्तारमिदमब्रवीत् ॥ १ ॥
प्रजाजनांना आनंद प्रदान करणार्‍या पुरुषांमध्ये श्रेष्ठ धर्मपरायण श्रीराम वनात निघून गेल्यावर आर्त होऊन रडणार्‍या कौसल्येने आपल्या पतिला या प्रमाणे म्हटले- ॥१॥
यद्यपि त्रिषु लोकेषु प्रथितं ते महद् यशः ।
सानुक्रोशो वदान्यश्च प्रियवादी च राघवः ॥ २ ॥
’महाराज ! जरी तिन्ही लोकात आपले महान यश पसरलेले आहे, सर्व लोक हे जाणतात की - रघुकुळनरेश दशरथ अत्यंत दयाळू, उदार आणि प्रिय वचन बोलणारे आहेत. ॥२॥
कथं नरवरश्रेष्ठ पुत्रौ तौ सह सीतया ।
दुःखितौ सुखसंवृद्धौ वने दुःखं सहिष्यतः ॥ ३ ॥
’नरेशात श्रेष्ठ, आर्यपुत्र ! तरीही आपण या गोष्टीचा कसा विचार केला नाही की सुखात वाढलेले आपले दोन्ही पुत्र सीतेसह वनवासाचे कष्ट कसे सहन करतील ? ॥३॥
सा नूनं तरुणी श्यामा सुकुमारी सुखोचिता ।
कथमुष्णं च शीतं च मैथिली विसहिष्यते ॥ ४ ॥
’ती सोळा-अठरा वर्षाची सुकुमारी तरुणी मैथिली सीता जी सुखच भोगण्यास योग्य आहे, वनात थंडी, उन्हाळा यांचे दुःख कसे सहन करील ? ॥४॥
भुक्त्वाशनं विशालाक्षी सूपदंशान्वितं शुभम् ।
वन्यं नैवारमाहारं कथं सीतोपभोक्ष्यते ॥ ५ ॥
विशालाक्षी सीता सुंदर व्यञ्जनांनी युक्त सुंदर स्वादिष्ट अन्नाचे भोजन करीत असे. ती आता जंगलातील वरीच्या तांदूळाचा कोरडा भात कसा बरे खाईल ? ॥५॥
गीतवादित्रनिर्घोषं श्रुत्वा शुभसमन्विता ।
कथं क्रव्यादसिंहानां शब्दं श्रोष्यत्यशोभनम् ॥ ६ ॥
’जी सदा मांगलिक वस्तुनी संपन्न राहून गीत आणि वाद्यांचा मधुर ध्वनी ऐकत असे, तीच जंगलात मांसभक्षी सिंहाचा अशोभन (अमंगलकारी) शब्द कसा एकू शकेल ? ॥६॥
महेन्द्रध्वजसङ्‌काशः क्व नु शेते महाभुजः ।
भुजं परिघसङ्‌काशमुपाधाय महाबलः ॥ ७ ॥
’जे इंद्रध्वजाप्रमाणे समस्त लोकांना उत्सव प्रदान करणारे होते, ते महाबली, महाबाहु श्रीराम आपल्या परिधाप्रमाणे मोठ्या बाहुंचा तक्क्यां (उशी) करून कोठे बरे झोपत असतील ? ॥७॥
पद्मवर्णं सुकेशान्तं पद्मनिश्वासमुत्तमम् ।
कदा द्रक्ष्यामि रामस्य वदनं पुष्करेक्षणम् ॥ ८ ॥
’ज्याची कान्ति कमलाप्रमाणे आहे, ज्यांच्या मस्तकावर सुंदर केस शोभून दिसत आहेत, ज्यांच्या प्रत्येक श्वासाबरोबर कमलासारखा सुगंध बाहेर पडतो आणि ज्यामध्ये विकसित कमलासारखे सुंदर नेत्र सुशोभित होत असतात ते श्रीरामांचे मनोहर मुख मी केव्हा बरे पाहीन ? ॥८॥
वज्रसारमयं नूनं हृदयं मे न संशयः ।
अपश्यन्त्या न तं यद् वै फलतीदं सहस्रधा ॥ ९ ॥
’माझे हृदय निश्चितच लोखंडाचे बनलेले आहे यात संशय नाही, कारण श्रीराम दृष्टीस पडत नाहीत तरीही माझ्या या हृदयाचे हजारो तुकडे होत नाहीत. ॥९॥
यत् त्वया करुणं कर्म व्यपोह्य मम बान्धवाः ।
निरस्ताः परिधावन्ति सुखार्हाः कृपणा वने ॥ १० ॥
’आपण हे फारच निर्दय कर्म केले आहे की काहीही विचार न करता माझ्या बांधवांना कैकेयीच्या सांगण्यावरून घालवून दिले आहे. त्यामुळे ते सुख भोगण्यास योग्य असूनही दीन होऊन वनात धावत आहेत. ॥१०॥
यदि पञ्चदशे वर्षे राघवः पुनरेष्यति ।
जह्याद् राज्यं च कोशं च भरतो नोपलक्षते ॥ ११ ॥
’जरी पंधराव्या वर्षी राघव वनांतून पुन्हा परतले तरी भरत त्यांच्यासाठी राज्य आणि खजिना सोडून देईल अशी संभावना दिसून येत नाही. ॥११॥
भोजयन्ति किल श्राद्धे केचित् स्वानेव बांधवान् ।
ततः पश्चात् समीक्षन्ते कृतकार्या द्विजोत्तमान् ॥ १२ ॥

तत्र ये गुणवन्तश्च विद्वांसश्च द्विजातयः ।
न पश्चात् तेऽभिमन्यन्ते सुधामपि सुरोपमाः ॥ १३ ॥
’असे म्हणतात की काही लोक श्राद्ध करण्याआधीच आपल्या बांधवांनाच (दौहित्र वगैरेना) भोजन करवितात, त्यानंतर कृतकृत्य होऊन निमंत्रित श्रेष्ठ ब्राह्मणांकडे लक्ष देतात. परंतु तेथे जे गुणवान आणि विद्वान देवतुल्य उत्तम ब्राह्मण असतात ते नंतर अमृत जरी वाढले गेले तरी त्याचा सुद्धा स्वीकार करीत नाहीत. ॥१२-१३॥
ब्राह्मणेष्वपि वृत्तेषु भुक्तशेषं द्विजोत्तमाः ।
नाभ्युपेतुमलं प्राज्ञाः शृङ्‌गच्छेदमिवर्षभाः ॥ १४ ॥
’जरी पहिल्या पंक्तिमध्ये ब्राह्मणच भोजन करून उठलेले असतात तरी जे श्रेष्ठ आणि विद्वान ब्राह्मण आहेत ते अपमानाच्या भयाने त्या भुक्तशेष अन्नाला, ज्याप्रमाणे उत्तम बैल आपली शिंगे कापून घेण्यास तयार होत नाहीत त्याप्रमाणे ग्रहण करण्यास तयार होत नाहीत. ॥१४॥
एवं कनीयसा भ्रात्रा भुक्तं राज्यं विशाम्पते ।
भ्राता ज्येष्ठो वरिष्ठश्च किमर्थं नावमन्यते ॥ १५ ॥
’महाराज ! याच प्रकारे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ भ्राता आपल्या लहान भावाने भोगलेल्या राज्यास कसे ग्रहण करील ? ते त्याचा तिरस्कर (त्याग) कां बरे करणार नाहीत ? ॥१५॥
न परेणाहृतं भक्ष्यं व्याघ्रः खादितुमिच्छति ।
एवमेव नरव्याघ्रः परलीढं न मंस्यते ॥ १६ ॥
’ज्याप्रमाणे वाघ, गिधाड आदि दुसर्‍या जंतुनी आणलेल्या अथवा खालेल्या भक्ष्य पदार्थाला (शिकारीला) खाण्याची इच्छा करीत नाही, त्या प्रमाणे पुरुषसिंह श्रीराम दुसर्‍यांनी उष्टावलेल्या (भोगलेल्या) राज्य भोगाचा स्वीकार करणार नाहीत. ॥१६॥
हविराज्यं पुरोडाशः कुशा यूपाश्च खादिराः ।
नैतानि यातयामानि कुर्वन्ति पुनरध्वरे ॥ १७ ॥
’हविष्य, तूप, पुरोडाश, कुश आणि खदिराचे (खैराचे) यूप - जे एका यज्ञात उपयोगात आणले गेले की ’यातयाम’ (उपभुक्त) होऊन जातात. म्हणून विद्वान त्यांचा नंतर दुसर्‍या यज्ञात उपयोग करीत नाहीत. ॥१७॥
तथा ह्यात्तमिदं राज्यं हृतसारां सुरामिव ।
नाभिमन्तुमलं रामो नष्टसोममिवाध्वरम् ॥ १८ ॥
’याप्रकारे निःसार सुरा आणि उपभोग घेऊन उरलेल्या यज्ञसंबंधी सोमरस प्रमाणेच या दुसर्‍यानी भोगलेल्या राज्याला श्रीराम गहण करू शकत नाहीत. ॥१८॥
नैवंविधमसत्कारं राघवो मर्षयिष्यति ।
बलवानिव शार्दूलो वालधेरभिमर्शनम् ॥ १९ ॥
’ज्याप्रमाणे बलवान वाघ कुणाकडून आपले पुच्छ (शेपूट) पकडले गेलेले सहन करू शकत नाही त्याप्रमाणे राघवही असा अपमान सहन करू शकणार नाहीत. ॥१९॥
नैतस्य सहिता लोका भयं कुर्युर्महामृधे ।
अधर्मं त्विह धर्मात्मा लोकं धर्मेण योजयेत् ॥ २० ॥
’समस्त लोक एकत्र होऊन जरी महायुद्धात समोर आले तरी तेही रामांच्या मनात भय उत्पन्न करू शकत नाहीत, तथापी या प्रकारे राज्य घेण्यात अधर्म मानून त्यांनी अधिकार गाजविला नाही. जे धर्मात्मा समस्त जगताला धर्मात प्रवृत्त करतात ते स्वतः अधर्म कसे करू शकतील ? ॥२०॥
नन्वसौ काञ्चनैर्बाणैर्महावीर्यो महाभुजः ।
युगान्त इव भूतानि सागरानपि निर्दहेत् ॥ २१ ॥
’ते महापराक्रमी महाबाहु श्रीराम आपल्या सुवर्णभूषित बाणांच्या द्वारे, प्रलयकाली जसा संवर्तक अग्निदेव संपूर्ण प्राण्यांना भस्म करून टाकतो त्या प्रमाणे सार्‍या समुद्रांनाही दग्ध करू शकतात. ॥२१॥
स तादृशः सिंहबलो वृषभाक्षो नरर्षभः ।
स्वयमेव हतः पित्रा जलजेनात्मजो यथा ॥ २२ ॥
’ज्याप्रमाणे माशाचे पिल्लू आपल्या मत्स्य पित्याच्या द्वारेच मारले जाते, त्याप्रमाणे सिंहा समान बल आणि बैलाप्रमाणे मोठे मोठे डोळे असलेले नरश्रेष्ठ वीर पुत्र (राम) आपल्या पित्याच्या द्वारेच मारले गेले (राज्यापासून वञ्चित केले गेले.) ॥२२॥
द्विजातिचरितो धर्मः शास्त्रे दृष्टः सनातनैः ।
यदि ते धर्मनिरते त्वया पुत्रे विवासिते ॥ २३ ॥
’आपल्या द्वारे धर्मपरायण पुत्राला देशातून हाकलले गेले आहे म्हणून असा प्रश्न उत्पन्न होतो की सनातन ऋषिंनी वेदात ज्याचा साक्षात्कार केला आहे आणि श्रेष्ठ द्विज ज्याला आचरणात आणतात तो धर्म आपल्या दृष्टीने सत्य आहे की नाही ? ॥२३॥
गतिरेका पतिर्नार्या द्वितीया गतिरात्मजः ।
तृतीया ज्ञातयो राजंश्चतुर्थी नैव विद्यते ॥ २४ ॥
’राजन ! स्त्रीसाठी एक आश्रय तिचा पति आहे, दुसरा तिचा पुत्र आहे आणि तिसरा आश्रय तिचे वडील, भाऊ आणि बंधु-बांधव (नातेवाईक) आहेत. तिच्यासाठी चौथा कोठलाही आश्रय नाही. ॥२४॥
तत्र त्वं मम नैवासि रामश्च वनमाहितः ।
न वनं गन्तुमिच्छामि सर्वथा हा हता त्वया ॥ २५ ॥
’या आश्रयापैकी आपण तर माझे नाहीच आहात. (कारण आपण सवतीच्या अधीन आहात) दुसरा आश्रय श्रीराम आहेत. ज्यांना वनांत धाडले गेले आहे. (म्हणून तिसरा आश्रयही राहिलेला नाही.) आपली सेवा सोडून मी रामाजवळ वनात जाऊ इच्छित नाही, म्हणून सर्वस्वी आपल्या द्वारेच मारली गेले आहे. ॥२५॥
हतं त्वया राज्यमिदं सराज्यं
     हताः स्म सर्वा सह मन्त्रिभिश्च ।
हता सपुत्रास्मि हताश्च पौराः
     सुतश्च भार्या च तव प्रहृष्टौ ॥ २६ ॥
’आपण रामाला वनात धाडून या राष्ट्राचा आणि आसपासच्या अन्य राज्यांचाही नाश केला आहे. मंत्रांसहित सर्व प्रजेचा वध केला आहे. आपल्या द्वारा पुत्रासह मी ही मारली गेले आहे आणि या नगराचे निवासी ही नष्टप्राय झाले आहेत. केवळ आपला पुत्र भरत आणि पत्‍नी कैकेयी दोघेच प्रसन्न झाली आहेत. ॥२६॥
इमां गिरं दारुणशब्दसंहितां
     निशम्य रामेति मुमोह दुःखितः ।
ततः स शोकं प्रविवेश पार्थिवः
     स्वदुष्कृतं चापि पुनस्तथास्मरत् ॥ २७ ॥
कौसल्येची कठोर शब्दांनी युक्त वाणी ऐकून राजा दशरथांना अत्यंत दुःख झाले. ते ’हा राम !’ म्हणून मूर्च्छित झाले. ते शोकात बुडून गेले. नंतर त्याच वेळी त्यांना आपल्या एका जुन्या दुष्कर्माचे स्मरण झाले, की ज्यामुळे त्यांना हे मोठे दुःख प्राप्त झाले होते. ॥२७॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीय० अयोध्याकाण्डे एकषष्टितमः सर्गः ॥ ६१ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा एकसष्टावा सर्ग पूरा झाला. ॥६१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP