|
| सीतासक्ष्मणसहितस्य श्रीरामस्य तापासाश्रममण्डले सत्कारः - 
 | श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेचा तापसांच्या आश्रम मण्डलात सत्कार - | 
| प्रविश्य तु महारण्यं दण्डकारण्यमात्मवान् । ददर्श रामो दुर्धर्षsतापसाश्रममण्डलम् ॥ १ ॥
 
 | दण्डकारण्य नामक महान वनात प्रवेश करून मनाला वश ठेवणार्या दुर्जय वीर श्रीरामांनी तपस्वी मुनींचे बरेशसे आश्रम पाहिले. ॥१॥ | 
| कुशचीरपरिक्षिप्तं ब्राह्म्या लक्ष्म्या समावृत्तम् । यथा प्रदीप्तं दुर्दर्शं गगने सूर्यमण्डलम् ॥ २ ॥
 
 | तेथे कुश आणि वल्कल वस्त्रे पसरलेली होती. ते आश्रम मण्डल ऋषिंच्या ब्रह्मविद्येच्या अभ्यासाने प्रकट झालेल्या विलक्षण तेजाने व्याप्त होते, म्हणून आकाशात प्रकाशित होणार्या दुर्दर्श सूर्य-मण्डलाप्रमाणे ते भूतलावर उद्दीप्त होत होते. राक्षस आदिंसाठी त्यांच्याकडे पहाणे ही कठीण होते. ॥२॥ | 
| शरण्यं सर्वभूतानां सुसम्मृष्टाजिरं सदा । मृगैर्बहुभिराकीर्णं पक्षिसङ्घैः समावृतम् ॥ ३ ॥
 
 | तो आश्रमसमुदाय सर्व प्राण्यांना शरण (आश्रय) देणारा होता. त्याचे अंगण सदा झाडून - सारवून स्वच्छ बनविलेले राहात होते. तेथे बरेशसे वन्य पशु होते आणि पक्ष्यांचे समुदायही त्याला सर्व बाजूनी घेरून राहात होते. ॥३॥ | 
| पूजितं चोपनृत्तं च नित्यमप्सरसां गणैः । विशालैरग्निशरणैः स्रुग्भाण्डैरजिनैः कुशैः ॥ ४ ॥
 
 समिद्भिस्तोयकलशैः फलमूलैश्च शोभितम् ।
 आरण्यैश्च महावृक्षैः पुण्यैः स्वादुफलैर्वृतम् ॥ ५ ॥
 
 | तेथील प्रदेश इतका मनोरम होता की तेथे अप्सरा प्रतिदिन येऊन नृत्य करीत असत. त्या स्थानाबद्दल त्यांच्या मनात मोठा आदराचा भाव होता. मोठ - मोठ्या अग्निशाला, स्त्रुवा आदि यज्ञपात्रे, मृगचर्म, कुश, समिधा, जलपूर्ण कलश आणि फल - मूल वगैरे त्याची शोभा वाढवत होते. स्वादिष्ट फळे देणारे परम पवित्र तसेच मोठ मोठ्या वृक्षांनी ते आश्रममण्डल घेरलेले होते. ॥४-५॥ | 
| बलिहोमार्चितं पुण्यं ब्रह्मघोषनिनादितम् । पुष्पैश्चान्यैः परिक्षिप्तं पद्मिन्या च सपद्मया ॥ ६ ॥
 
 | बलि- वैश्वदेव आणि होमाने पूजित तो पवित्र आश्रम समूह वेदमंत्रांच्या पाठाच्या ध्वनीने गुंजत राहात होता. कमल पुष्पांनी सुशोभित पुष्करिणी त्या स्थानाची शोभा वाढवत होत्या तसेच तेथे दुसरीही बरीचसी फुले सर्वत्र विखरून पडलेली होती. ॥६॥ | 
| फलमूलाशनैर्दान्तैश्चीरकृष्णाजिनाम्बरैः । सूर्यवैश्वानराभैश्च पुराणैर्मुनिभिर्युतम् ॥ ७ ॥
 
 | त्या आश्रमात चीर आणि काळे मृगचर्म धारण करणारे तसेच फल-मूलाचा आहार करून राहाणारे, जितेन्द्रिय आणि सूर्य आणि अग्नितुल्य महातेजस्वी, पुरातन मुनि निवास करीत होते. ॥७॥ | 
| पुण्यैश्च नियताहारैः शोभितं परमर्षिभिः । तद् ब्रह्मभवनप्रख्यं ब्रह्मघोषनिनादितम् ॥ ८ ॥
 
 | नियमित आहार करणार्या पवित्र महर्षिंनी सुशोभित तो आश्रमसमूह ब्रह्मदेवांच्या धामाप्रमाणे तेजस्वी आणि वेदध्वनीने निनादीत होता. ॥८॥ | 
| ब्रह्मविद्भिर्महाभागैर्ब्राह्मणैरुपशोभितम् । स दृष्ट्वा राघवः श्रीमांस्तापसाश्रममण्डलम् ॥ ९ ॥
 
 अभ्यगच्छन्महातेजा विज्यं कृत्वा महद् धनुः ।
 
 | अनेक महाभाग ब्रह्मवेत्ते ब्राह्मण त्या आश्रमांची शोभा वाढवीत होते. महातेजस्वी श्रीरामांनी त्या आश्रम मण्डलाला पाहून आपल्या महान धनुष्याची प्रत्यञ्चा उतरविली, नंतर ते आश्रमाच्या आंत गेले. ॥९ १/२॥ | 
| दिव्यज्ञानोपपन्नास्ते रामं दृष्ट्वा महर्षयः ॥ १० ॥ 
 अभिजग्मुस्तदा प्रीता वैदेहीं च यशस्विनीम् ।
 
 | श्रीराम तसेच यशस्विनी सीतेला पाहून ते दिव्य ज्ञानाने संपन्न महर्षि अत्यंत प्रसन्नतेने त्यांच्या जवळ गेले. ॥१० १/२॥ | 
| ते तं सोममिवोद्यन्तं दृष्ट्वा वै धर्मचारिणम् ॥ ११ ॥ 
 लक्ष्मणं चैव दृष्ट्वा तु वैदेहीं च यशस्विनीम् ।
 मङ्गलानि प्रयुञ्जानाः प्रत्यगृह्णन् दृढव्रताः ॥ १२ ॥
 
 | दृढतापूर्वक उत्तम व्रताचे पालन करणारे ते महर्षि उदयकालच्या चंद्रम्याप्रमाणे मनोहर, धर्मात्मा श्रीरामाला, लक्ष्मणाला आणि यशस्विनी वैदेही सीतेलाही पाहून त्या सर्वांसाठी मङ्गलमय आशीर्वाद देऊ लागले. त्यांनी त्या तिघांना आदरणीय अतिथिंच्या रूपात ग्रहण केले. ॥११-१२॥ | 
| रूपसंहननं लक्ष्मीं सौकुमार्यं सुवेषताम् । ददृशुर्विस्मिताकारा रामस्य वनवासिनः ॥ १३ ॥
 
 | श्रीरामांचे रूप, शरीराची ठेवण, कांति, सुकुमारता तसेच सुंदर वेष यांना त्या वनवासी मुनींनी आश्चर्यचकित होऊन पाहिले. ॥१३॥ | 
| वैदेहीं लक्ष्मणं रामं नेत्रैरनिमिषैरिव । आश्चर्यभूतान् ददृशुः सर्वे ते वनवासिनः ॥ १४ ॥
 
 | वनात निवास करणारे ते सर्व मुनि श्रीराम, लक्ष्मण आणि सीता तिघांना एकटक नजरेने पाहात राहिले. त्यांचे स्वरूप त्यांना आश्चर्यमय प्रतीत होत होते. ॥१४॥ | 
| अत्रैनं हि महाभागाः सर्वभूतहिते रतम् । अतिथिं पर्णशालायां राघवं संन्यवेशयन् ॥ १५ ॥
 
 | समस्त प्राण्यांच्या हितात तत्पर राहाणार्या त्या महाभाग महर्षिंनी तेथे आपले प्रिय अतिथि या भगवान श्रीरामांना पर्णशाळेत घेऊन जाऊन तेथे थांबवून घेतले. ॥१५॥ | 
| ततो रामस्य सत्कृत्य विधिना पावकोपमाः । आजह्रुस्ते महाभागाः सलिलं धर्मचारिणः ॥ १६ ॥
 
 | अग्नितुल्य तेजस्वी आणि धर्मपरायण अशा त्या महाभाग मुनिंनी श्रीरामांना विधिवत सत्कारासह जल समर्पित केले. ॥१६॥ | 
| मङ्गलानि प्रयुञ्जाना मुदा परमया युताः । मूलं पुष्पं फलं सर्वमाश्रमं च महात्मनः ॥ १७ ॥
 
 | नंतर अत्यंत प्रसन्नतेने मङ्गलसूचक आशिर्वाद देत त्या महात्मा श्रीरामांना त्यांनी फल-मूल आणि फुले आदिसह सारा आश्रम समर्पित केला. ॥१७॥ | 
| निवेदयित्वा धर्मज्ञास्ते तु प्राञ्जलयोऽब्रुवन् । धर्मपालो जनस्यास्य शरण्यश्च महायशाः ॥ १८ ॥
 
 पूजनीयश्च मान्यश्च राजा दण्डधरो गुरुः ।
 इन्द्रस्यैव चतुर्भागः प्रजा रक्षति राघव ॥ १९ ॥
 
 राजा तस्माद् वरान् भोगान् रम्यान् भुङ्क्ते नमस्कृतः ।
 
 | सर्व काही निवेदन करून ते धर्मज्ञ मुनि हात जोडून म्हणाले- ’रघुनंदन ! दण्ड धारण करणारा राजा धर्माचा पालक, महायशस्वी, या जनसमुदायाला (आश्रय) शरण देणारा, माननीय, पूजनीय, आणि सर्वांचा गुरू आहे. या भूतलावर (लोकपालां सहित)इंद्राचाच चौथा अंश असल्यामुळे तो प्रजेचे रक्षण करतो. म्हणून राजा सर्वांकडून वंदित होतो आणि उत्तम व रमणीय भोगांचा उपभोग घेतो. (जर साधारण राजाची ही स्थिति आहे, तर आपल्या बद्दल तर काय सांगावे. आपण तर साक्षात भगवान आहात.) ॥१८-१९ १/२॥ | 
| ते वयं भवता रक्ष्या भवद्विषयवासिनः । नगरस्थो वनस्थो वा त्वं नो राजा जनेश्वरः ॥ २० ॥
 
 | आम्ही आपल्या राज्यात निवास करतो आहोत म्हणून आपण आमचे रक्षण केले पाहिजे. आपण नगरात राहा अगर वनात, आम्हां लोकांचे राजेच आहात. आपण समस्त जनसमुदायाचे शासक आणि पालक आहात. ॥२०॥ | 
| न्यस्तदण्डा वयं राजञ्जितक्रोधा जितेन्द्रियाः । रक्षणीयास्त्वया शश्वद् गर्भभूतास्तपोधनाः ॥ २१ ॥
 
 | ’राजन् ! आम्ही जीवमात्रास दण्ड देणे सोडून दिलेले आहे. क्रोध आणि इंद्रियांना जिंकले आहे, आता तपस्या हेच आमचे धन आहे. ज्याप्रमाणे माता गर्भस्थ बालकाचे रक्षण करते त्याच प्रकारे आपल्यालाही सदा सर्व प्रकारांनी आमचे रक्षण केले पाहिजे.’ ॥२१॥ | 
| एवमुक्त्वा फलैर्मूलैः पुष्पैरन्यैश्च राघवम् । वन्यैश्च विविधाहारैः सलक्ष्मणमपूजयन् ॥ २२ ॥
 
 | असे म्हणून त्या तपस्वी मुनिंनी वनात उत्पन्न होणारी फळे, मूळे, फुले तसेच अन्य अनेक प्रकारच्या आहारांनी लक्ष्मण (आणि सीता) सहित भगवान श्रीरामचंद्रांचा सत्कार केला. ॥२२॥ | 
| तथान्ये तापसाः सिद्धा रामं वैश्वानरोपमाः । न्यायवृत्ता यथान्यायं तर्पयामासुरीश्वरम् ॥ २३ ॥
 
 | याशिवाय दुसर्या अग्नितुल्य तेजस्वी व न्याययुक्त आचरण करणार्या सिद्ध तापसांनीही सर्वेश्वर भगवान श्रीरामांना यथोचित रूपाने तृप्त केले. ॥२३॥ | 
| इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे प्रथमः सर्गः ॥ १ ॥ 
 | याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा पहिला सर्ग पूरा झाला. ॥१॥ | 
|