॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

सुंदरकांड

॥ अध्याय अकरावा ॥
सीता व मारुती यांची प्रथम भेट

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

पूर्वीच्या घटनांचे स्मरण होऊन सीतेचा अनुताप :

सवेग भेटी श्रीरामकांता । परम आल्हाद हनुमंता ।
तिच्या निरपेक्ष एकांता । वृक्षाआंतौता बैसला ॥ १ ॥
स्वस्थानीं राक्षसी समस्ता । स्वभावें जाहलिया निद्रिस्ता ।
अशोकवृक्षातळीं सीता । सावधानता बैसली ॥ २ ॥
म्हणे मज नाहीं पापकर्मपरता । आणि कां भोगितें दुःखावस्था ।
वृथा लक्ष्मणाभिशापता । तेणें पापें लंकेशा आतुडलें ॥ ३ ॥
लक्ष्मणाची मर्यादारेखा । म्यां उल्लंघिता देखा ।
अंतरोनी श्रीरामसखा । त्या दशमुखा आतुडलें ॥ ४ ॥
छळूं जातां श्रीरामभक्ता । मुकलें मी श्रीरघुनाथा ।
हें पाप माझें माथां । दुःखावस्था मी भोगीं ॥ ५ ॥
अवज्ञा केली म्यां पापिणी । रावण म्हणे होय पत्‍नी ।
म्यांच केली खोटी करणी । श्रीरामस्वप्नीं मी न देखें ॥ ६ ॥
छळणपाप सबळ जनीं । त्या पापाची पाहें पां करणी ।
श्रीरामशब्द नायकें कानीं । श्रीराम स्वप्नीं न देखें ॥ ७ ॥
यालागीं कोणाचें छळण । प्राणांतीही न करावें आपण ।
छळणाचें पाप पूर्ण । आपलें आपण मी भोगी ॥ ८ ॥
छळणपापाचे पातकीं । कैसी अनुतापली जानकी ।
बैसोनियां एकाकी । पुढील श्लोकीं अनुवादे ॥ ९ ॥
निश्चयें मानलें निजनिष्ठा । मृग नव्हे तो कळिकाळकांटा ।
तिघां केल्या तीन वाटा । हेंही कटकटां म्यां केले ॥ १० ॥
मृगरूपी केवळ काळ । माझा लोभ तो काळवेळ ।
खवळोनियां तत्काळ । मज म्यांचि केवळ नाडिलें ॥ ११ ॥
माझिया लोभाची कुबुद्धि मोठी । मृगलोभाच्या सलोभ दृष्टीं ।
म्यां राम धाडिला मृगापाठीं । तेव्हांचि करंटी मी झालें ॥ १२ ॥
करंटी बुद्धि बाणली कैसी । लक्ष्मण रक्षण सत्वराशी ।
रामें ठेविला मजपाशीं । म्यां छळूनि त्यासी दवडिलें ॥ १३ ॥
लक्ष्मण न मानी अल्प छळणासी । माझी पापबुद्धी कैसी ।
एकला राहतोसी मजपासीं । रामपत्‍नीसी भोगावया ॥ १४ ॥
धांवण्या न जासी रामापाशीं । स्वयें भोगावया सीतेसी ।
तूं काय येथें राहतोसी । ऐशा वक्रोक्तीसीं छळियेलें ॥ १५ ॥
ऐकोनि माझी पापगोष्टी । बोटे घातलीं कर्णपुटीं ।
लक्ष्मण पळे उठाउठीं । ऐसी मी खोटी पापिणी ॥ १६ ॥
श्रीराम आज्ञे लक्ष्मण । असतां मजपाशीं संरक्षण ।
तो रामआज्ञा उल्लंघून । छळोन परता म्यां दवडिला ॥ १७ ॥
श्रीरामआज्ञा उल्लंघितां । भेटणें ठेलें रघुनाथा ।
आतडोनियां लंकानाथा । दुःखावस्था तेणें पापें ॥ १८ ॥
लक्ष्मण सर्वत्र सुमित्र । तो म्यां छळोनि केला कुमित्र ।
तेणें पापें दशवक्त्र । मज अपवित्र झोंबला ॥ १९ ॥
धन्य लक्ष्मणाची मर्यादारेखा । नुल्लंघवेचि दशमुखा ।
ते म्यां उल्लंघितां देखा । दुःखशोका पावलें ॥ २० ॥
श्रीराम पाठविला मृगाचे पाठीं । हेचि माझी बुद्धि खोटी ।
तेणें रामीं पडली तुटीं । दुःखकोटी मज प्राप्त ॥ २१ ॥
भ्रतारापासीं स्वयें मागणें । हेंचि स्त्रियांचे निंद्द जिणें ।
तेणेंचि निंद्दत्वे मज रावणें । धरोनि आणिलें लंकेसी ॥ २२ ॥
लोभे मागता मृगकांचोळी । माझ्या व्रतासी जाहली होळी ।
श्रीराम अंतरला महाबळी । दुःखसमेळी निजलोभें ॥ २३ ॥
श्रीराम केवळ आत्माराम । लक्ष्मण सबाह्य निष्काम ।
लाभ अलाभ दोन्ही सम । देहीं आराम निर्द्वंद्व ॥ २४ ॥
लाभालाभीं समान । तें निधडें रामलक्ष्मण ।
त्यांसी माझें लोटांगण । अनन्य शरण मी त्यासीं ॥ २५ ॥

झाडावरून मारूती श्रीरामांची अंगठी टाकतो :

देखोनि अनुतापिनी सीता । कृपा उपजली हनुमंता ।
श्रीराममुद्रिका होय टाकिता । दुःखावस्था शमावया ॥ २६ ॥
श्रीराममुद्रेचा बडिवार । दुःख निर्दाळी समग्र ।
सुख द्दावया अपरंपार । सच्चिन्मात्र श्रीराममुद्रा ॥ २७ ॥

त्याचा सीतेवर विलक्षण परिणाम :

दीपिका जेंवी अंधार । श्रीराममुद्रा क्लेश ग्रासी समग्र ।
खद्दोत करी रवि चंद्र । प्रकाशवंत राममुद्रा ॥ २८ ॥
श्रीराममुद्रा प्रकाशवंत । सीता देखोनि अकस्मात ।
स्वयें जाहली विस्मित । कैसेनि एथ ही आली ॥ २९ ॥
सुवर्णमुद्रा वरी सुवर्णवर्ण । श्रीरामसंगे शुद्ध सुवर्ण ।
जानकी स्वयें सुवर्णवर्ण । देखे सुवर्णमुद्रिका ॥ ३० ॥
मुद्रिकापीठीं पत्रावळी । सहस्त्रनामप्रभावळीं ।
अक्षरीं अक्षर लिहिल्या ओळी । अक्षरें न्याहाळी जानकी ॥ ३१ ॥
अक्षरीं निबद्ध मुद्रिका । दशावतारांची टीका ।
जडितपाचीमाणिका । सुखदायका सीतेसी ॥ ३२ ॥
मुद्रिकागर्भ अति पवित्र । त्याहीमाजी सार परात्पर ।
श्रीरामनामें निरक्षर । चिदचिन्मात्र मुद्रिका ॥ ३३ ॥
ऐसी देखोनि मुद्रिका तेथ । सीता जाहली सद्गदित ।
नेत्रीं आनंदजळ स्त्रवत । हर्षयुक्त जानकी ॥ ३४ ॥
मुद्रिका शोभे नामेंकरीं । श्रीरामनाम मुद्रिकेवरी ।
श्रीराम मुद्रिके सबाह्य अंतरीं । सीता सुंदरी स्वयें देखे ॥ ३५ ॥
देखतांचि चमत्कार जाहला । स्वयें श्रीरामचि आला ।
सीतेसी ऐसा भाव गमला । सरसावला अंचळू ॥ ३६ ॥
श्रीराम आला एकाएकीं । लाजें जाहली अधोमुखी ।
सर्वांगें हर्षली जानकी । सुखोन्मुखी डुल्लत ॥ ३७ ॥
केउता आहे लक्ष्मण । दुष्ट दुरूक्तें केलें छळण ।
त्याचे केशीं झाडीन चरण । त्यासी लोटांगण घालीन पैं ॥ ३८ ॥

जानकीचे अवलोकन व तिचे मुद्रिकेशी संभाषण :

सावध होतांचि देखा । पुढें देखिली अंगोळिका ।
ओळखोनि श्रीराममुद्रिका । प्रेमोन्मुखा जानकी ॥ ३९ ॥
पहिली वंदिली निढळीं । मग आलिंगिली ह्रदयकमळीं ।
स्वानंदें चुंबी जनकबाळी । सुखें वेल्हाळी आलीसी ॥ ४० ॥
म्हणोनि घातलें लोटांगण । बैस करूं दे चरणक्षाळण ।
तुझें तीर्थ मी सेवीन । करीन संवाहन चरणांचें ॥ ४१ ॥
तूं माझी सखी श्रीराममुद्रा । घालूं सेजे करिसी निद्रा ।
श्रमलीस उतरतां समुद्रा । आणि गिरिवरां उल्लंघितां ॥ ४२ ॥
न म्हणे अचेतन सचेतन । भक्तिप्रेम संपूर्ण ।
तेणें हनुमंतासी आलें रूदन । करी स्फुंदन वृक्षाआड ॥ ४३ ॥
आम्ही म्हणवितों भक्त । परी प्रेम नाहीं पोटाआंत ।
जानकीप्रेमें सदोदित । हिशीं रघुनाथ तुष्टला ॥ ४४ ॥
अचेतनीं प्रेमपान्हा हो । हा कोणासीं नाहीं सद्‌भावो ।
हिसीं तुष्टला श्रीरामरावो । वंद्य स्वयमेवा सर्वांसी ॥ ४५ ॥
सगुण निर्गुण सद्‌गुरूभक्त । जो वंदितो तो होय मुक्त ।
जो निंदितो त्या नरक प्राप्त । वेदशास्त्रार्थ गर्जती ॥ ४६ ॥
मुद्रिका देखतांचि दृष्टीं । अत्यानंद मानी गोरटी ।
सीता सप्रेम पुसे गोष्टी । अवस्था पोटीं जे वर्ते ॥ ४७ ॥
कुशल असतां रामलक्ष्मण । माझी कां न करिती सोडवण ।
करावया नाहीं आंगवण । दुर्धर बाण असोनी ॥ ४८ ॥
सुटलिया श्रीरामाचे बाण । शोषोनि टाकितील समुद्र संपूर्ण ।
सकुळ निवटोनि रावण । माझी सोडवण का न करी ॥ ४९ ॥
त्या दोघां वीरीं टाकिली सृष्टी । हे न सांगवे दुःखकोटी ।
यालागीं सुचली मौनदृष्टी । सज्ञान मोठीं तूं होसी ॥ ५० ॥
श्रीराम गेला परलोकता । तूं मज मूळ आलीस आतां ।
तो जरी स्वस्थ असता । मज सोडविता निमेषार्धें ॥ ५१ ॥
मुद्रिकें तूं सांगे गोष्टी । रावणें मातें हरिल्यापाठीं ।
दोघे येवोनी पंचवटीं । अति संकटीं काय केलें ॥ ५२ ॥
मज न देखतां पर्णकुटीं । दोघे जाहले कडेलोटी ।
अथवा शस्त्रें घातलीं पोटीं । केले संकटीं गळां फास ॥ ५३ ॥
किंवा लोकलज्जे लाजले । दोघे विष घेवोनि निमाले ।
किंवा माझ्या शोकें मूर्च्छा पावले । कीं विकळ होतां गेले प्राण त्यांचे ॥ ५४ ॥
सीता सीता आक्रंदोनी । प्राण सांडिले दोघे जणीं ।
नातरी मागतां पाणी । ताहना फुटोनि निमाले ॥ ५५ ॥
माझेनि दुःखें दुःखी प्रबळ । आहार त्यजिला फळमूळ ।
दोघां भरोनियां तरळ । प्राण तत्काळ सांडिले ॥ ५६ ॥
पर्वतपाठारीं प्रचंड धोंडीं । दोघीं घातलिया मुरकुंडी ।
तेथें वाळोनि जाहली करवंडी । दुःखनिर्वडी निमाले ॥ ५७ ॥
विजनीं मूर्च्छित पडिलें । कीं वृकव्याघ्रीं ते फाडिले ।
किंवा सिंहें विभांडिलें । कीं रगडिले वनगजीं ॥ ५८ ॥
किंवा गिळिले मत्स्यसुसरीं । कीं बुडालें असती सागरीं ।
अथवा रिघतां राहिले विवरीं । तरसीं तगरीं भक्षिले ॥ ५९ ॥
ते तों महावीर निधडे । सिंह व्याघ्र काय बापुडे ।
शार्दूळ पळती तयांपुढें । केलें कुडें रावणें ॥ ६० ॥
रावणें छळोनि केलें घाता । स्नानतर्पण संपादितां ।
अथवा फळ मूळ भक्षितां । दोघां निद्रिस्तां मारिलें ॥ ६१ ॥
देखतां श्रीरामाचा बाण । रावण भयें पलायमान ।
श्रीराम नित्य सावधान । त्यासी छळण चालेना ॥ ६२ ॥
विश्वामित्रयागाप्रती । श्रीराम सावध अहोरात्रीं ।
सुबाहूच्या छळणोक्ती । त्यास रघुपतीं मारिलें ॥ ६३ ॥
छळावया सुंदरपणें । शूर्पणखा आली आपण ।
तिचें केलें विटंबण । न चले छळण रामासीं ॥ ६४ ॥
माझेनि दुःखशोकें जाणा । स्वयें रामें सोडिलें प्राणा ।
येरवीं निवटोनि रावणा । माझे सोडवणा येता कीं ॥ ६५ ॥
श्रीरामभातां दुर्धर शर । निवटून दुष्ट निशाचर ।
शोषोनियां महासागर । नरवानर येत कीं ॥ ६६ ॥
वर्षोनिया बाणजाळीं । लंकेची करोनियां होळी ।
रावण निर्दाळोनि समूळीं । जनकबाळीं सोडविता ॥ ६७ ॥
विराधें लावितांचि हात । एकेंचि बाणें केला घात ।
श्रीराम असतां जीवें जीत । लंकानाथा निर्दाळिता ॥ ६८ ॥
चवदा सहस्त्र राक्षसगण । त्रिशिरा मारिला खर दूषण ।
त्यासी मारितां रावण । अर्धक्षण न लगे पैं ॥ ६९ ॥
श्रीराम सहजें उदासी । रावणें हरितां स्त्रियेसी ।
न्यस्तशस्त्र जाहला संन्यासी । वनवासीं विचरत ॥ ७० ॥
सन्यासियासी स्वभावता । धरूं नये देहाची ममता ।
करूं नये स्त्रियेची चिंता । तुटली कथा धांवण्याची ॥ ७१ ॥
संन्यासधर्म स्वभावतां । अभयदान दिधलें भूतां ।
आतां वधूं नयें लंकानाथा । खुंटली कथा लंकेची ॥ ७२ ॥
अथवा आणिक आहे गुज । श्रीराम आत्माराम सहज ।
रावणें हरितांचि भाज । समाधिसेजे प्रवेशला ॥ ७३ ॥
समाधिसुखें स्वभावतां । कैंचा राम कैंची सीता ।
रावणें हरिली माझी कांता । हेंही रघुनाथा नाठवे ॥ ७४ ॥
समाधिसुखें सुखसंपन्न । मिथ्या हें प्रपंचाचे भान ।
मिथ्या श्रीराम रावण । धांवण्या कोण येथें धांवे ॥ ७५ ॥
मुद्रिके सत्य सांग मजपासीं । श्रीराम तरी जाहला संन्यासी ।
अथवा समाधिसेजेसीं । किंवा देहासी त्यागिलें ॥ ७६ ॥
मुद्रिके मौनाचें लक्षण । निमाले श्रीराम लक्ष्मण ।
हेंचि तुझें मौनवचन । अति सावधान निजमौनें ॥ ७७ ॥
अबोलणें ज्याचे ठायीं । त्याचिया ज्ञाना मर्यादा नाहीं ।
तें तंव वर्ततें तुझे ठायीं । वानूं कायी गुण तुझे ॥ ७८ ॥
माझी वस्ती वामभागीं । तूं वर्तसी दक्षिणांगी ।
श्रीरामाचे अंगसंगी । तूं सर्वांगीं सर्वज्ञ ॥ ७९ ॥
सद्‌गुरूअंगींचें अचेतन । मिथ्या न मानी सीता सज्ञान ।
तिचें न करीच हेळण । उपेक्षण न करीचि ॥ ८० ॥

सीतेला मूर्च्छा आली :

श्रीराममुद्रा अचेतन । तीस देवोनी अति सन्मान ।
मृदु मंजुळ विनवून । काय आपण पुसतसे ॥ ८१ ॥
कैसेनि चालवलें वाटा । कैसेनि उल्लंघवलें घांटा ।
समुद्र तरोनि दुस्तर मोठा । कैसेनि परतटा आलिसी ॥ ८२ ॥
मज संबोखावया येथें । तुज काय धाडिलें श्रीरघुनाथें ।
ऐसें बोलत बोलत तेथें । पडे मूर्च्छित जानकी ॥ ८३ ॥

त्यामुळे मारूती घाबरला :

सीता पडतांचि मूर्च्छित । हनुमान जाहला साशंकित ।
श्रीरामविरहें अति संतप्त । प्राण निश्चित त्यागील ही ॥ ८४ ॥
देखतां श्रीराममुद्रेसी । श्रीराम निमाला वनवासीं ।
धरोनि हा निश्चय मानसीं । निजदेहासीं त्यागील ॥ ८५ ॥
देह त्यागितांचि सीता । श्रीराम म्हणेल हनुमंता ।
समुद्रलंघन तत्वतां । कवण्या अर्था साधिलें ॥ ८६ ॥
मज आलिया लंकेआंत । ना सीता ना रघुनाथ ।
ओढवला अति अनर्थ । तेणें हनुमंत महादुःखी ॥ ८७ ॥
सीता पडतांचि मूर्च्छापन्न । हनुमंत मनीं अति उद्विग्न ।
ह्र्दयीं स्मरतां रघुनंदन । बुद्धि निर्विघ्न आठवली ॥ ८८ ॥

मारूतीने श्रीरामवृत्तांत कथन केला :

सीता व्हावया सावधान । आता करूं श्रीरामसंकीर्तन ।
म्हणोनि रामकथागायन । करी आपण मारूती ॥ ८९ ॥
कौसल्या गर्भीं गर्भीतीत । दाशरथि श्रीरघुनाथ ।
परब्रह्म मूर्तिमंत । सूर्यवंशीं अवतरला ॥ ९० ॥
श्रीराम परब्रह्म सीता प्रकृती । श्रीराम चैतन्य सीता चिच्छक्ती ।
श्रीराम धैर्य सीता धृती । श्रीराम अनन्यगती अवतारू ॥ ९१ ॥
श्रीरामाचें आचरित । गुरूपितृआज्ञाविक्रीत ।
ब्राह्मणाचा निजभक्त । सुरसाह्यार्थ श्रीराम ॥ ९२ ॥
कैकेयीवरदें दशरथें । श्रीराम धाडिला दंडकारण्यातें ।
सीतालक्ष्मणसमवेते । निघे रघुनाथ वनवास ॥ ९३ ॥
वनवास गंगातटीं । वसतिस्थान पंचवटीं ।
श्रीराम राहिला जगजेठी । सीता गोरटी समवेत ॥ ९४ ॥
शूर्पणखा करी छळण । तें जाणोनि श्रीराम सज्ञान ।
तिचे घेवोनि नाक कान । विटंबोनि सोडिली ॥ ९५ ॥
तिचे कैवारी दारूण । त्रिशिरा मारिला खर दूषण ।
श्रीरामें घेवोनि जनस्थान । दिधलें दान ब्राह्मणां ॥ ९६ ॥
मृगकंचुकीस लोभतां । मृगापाठीं धाडिलें श्रीरघुनाथा ।
छळोनि दवडिले सौमित्रा । हरिली सीता रावणें ॥ ९७ ॥
श्रीराम आणि लक्ष्मण । करितां सीतागवेषण ।
जटायुरावणेंसीं रण । दोघें जण तेथें आले ॥ ९८ ॥
रथपात छत्रपात । पक्षियें गांजिला लंकानाथ ।
जटायु रावणें पाडिला तेथ । श्रीरघुनाथ तेथ आला ॥ ९९ ॥
श्रीराम कृपाळू परिपूर्ण । करोनि जटायुउद्धरण ।
कबंध मारोनियां जाण । आले आपण किष्किंधे ॥ १०० ॥
श्रीरामें निर्दळोनि वाळिसी । राज्य दिधलें सुग्रीवासी ।
यौवराज्य अंगदासी । वानरांसी निजसख्य ॥ १०१ ॥
तुझे शुद्धीसी निरूतें । श्रीरामें पाठविलें मातें ।
तुझे भेटीलागीं व्रतें । श्रीरघुनाथे धरियेलीं ॥ १०२ ॥
शिळीं बांधोनि सागर । सपुत्रप्रधाननिशाचर ।
येणेंसीं वधोनि दशशिर । सीता सुंदर उद्धरणें ॥ १०३ ॥
विश्वासू न मानील वानरा । म्हणोनि खूण आणिली मुद्रा ।
सांडोनियां दुःखनिद्रा । भेटें कपींद्रा रामदूता ॥ १०४ ॥

श्रीरामगुणसंकीर्तन ऐकून सीता सावध होते, व मुद्रिका आणणार्याला भेटीस बोलाविते :

ऐकोनि श्रीरामचरित । सीता जाहली सावचित्त ।
कथानुवाद वृक्षाआंत । अति विस्मित जानकी ॥ १०५ ॥
कृपेंनें कोंवळा श्रीरघुनाथ । मज आश्वासावया येथ ।
वृक्ष कथा अनुवादत । आला निश्चित श्रीराम ॥ १०६ ॥
वृक्षासी पुसे करोनि नमन । कोण करितो श्रीरामकीर्तन ।
त्याचे पाहीन मी वदन । लोटांगण त्यासी माझे ॥ १०७ ॥
ज्यासी श्रीरामकथेची शैली । त्याच्या चरणींची धुळी ।
मी वंदीन सुखसमेळीं । मुख मजजवळी दावावें ॥ १०८ ॥
ज्याचे मुखीं श्रीरामकीर्तन । त्याचें मज देखतां वदन ।
परम सुखसमाधान । कृपा करोन भेटावें ॥ १०९ ॥
सीता सप्रेम निजचित्ते । परमोत्कंठ अति भावार्थे ।
जेणें खूणमुद्रा आणिली येथें । कृपावंतें भेटावें ॥ ११० ॥

मारूतीने खाली उतरून सीतेला साष्टांग वंदन केले :

ऐकोनि सीतेंचे वचन । हनुमान स्वयें उतरून ।
सीतेसी घाली लोटांगण । मस्तकीं चरण वंदिले ॥ १११ ॥
सीता देखोनियां दृष्टीं । सीतेसी हनुमान निकट भेटी ।
हनुमंतासी हर्ष पोटीं । आनंद सृष्टीं न समाये ॥ ११२ ॥
महानिधीचा लाभ जाहला । क्षीराब्धि चुळोदकें प्राशिला ।
कीं कळिकाळ जिंकोनिंया ठेला । तो पाड जाहला हनुमंतासी ॥ ११३ ॥

मारुतीचा आनंद व सात्विक भाव :

तेणें हर्षाचेनि मेळे । गडबडां पायांवरी लोळे ।
आनंदाश्रूं स्त्रवती डोळे । सुखकल्लोळें नाचत ॥ ११४ ॥
धांवधांवोनिया पायां पडे । सद्गद कंठें सप्रेम रडे ।
पुच्छ नाचवोनियां पुढें । हर्षे उडे वानर ॥ ११५ ॥
येथें सांपडली सीता । कार्यसिद्धी श्रीरघुनाथा ।
यश आलें हनुमंता । उल्लसतां उन्मत्त ॥ ११६ ॥

सीतेच्या मनात शंका, मारूती हा खरा दूत की मायावी राक्षस :

सीता विचारी ह्रदयांत । हा म्हणवितो रामदूत ।
श्रीरामासी कैंचा हनुमंत । पूर्ववृत्तांत मी जाणे ॥ ११७ ॥
श्रीरामलक्ष्मण दोघे वीर । त्यासंवे नाहीं नरवानर ।
कैंचें नेणों हें वानर । नाना विकार करिताहे ॥ ११८ ॥
हा तरी रावण निश्चयेंसी । पहिलें होवोनि आला संन्यासी ।
आतां आला वानरवेषीं । न ये यासीं विश्वासों ॥ ११९ ॥
परी हा वदतो श्रीरामकथा । कपटी म्हणों नयें हनुमंता ।
मी देखतें स्वप्नावस्था । तेचि सीता अनुवादे ॥ १२० ॥
मज श्रीरामाचें नित्य ध्यान । तेणें मी हें देखें स्वप्न ।
रामदूताचें आगमन । सर्वथा जाण घडेना ॥ १२१ ॥
दुर्गम दुर्ग लंकापुर । आड दुर्धर सागर ।
अशोकवन अति दुस्तर । केंवी वानर प्रवेशे ॥ १२२ ॥
रावण राणिवसाआंत । अशोकवन अति गुप्त ।
तेथें प्रवेशेल रामदूत । हा सत्यार्थ घडेना ॥ १२३ ॥
जरी मी हें मानूं स्वप्न । तरी मी आहें सावधान ।
नाहीं निद्रा ना स्वप्नभान । सत्यगमन वानरू ॥ १२४ ॥
श्रीरामकथा अनुवादत । धन्य धन्य हा श्रीरामभक्त ।
माझेनि भाग्यें हनुमंत । आला शुद्ध्यर्थ कैवारी ॥ १२५ ॥

पूर्ववृत्तांत जाणून घेण्याची इच्छा :

मिथ्या म्हणों नये हनुमंता । जे बोलेल ते सत्य वार्ता ।
याचिया पूर्ववृत्तांता । पुसों आतां यापासीं ॥ १२६ ॥
सीता पुसेल वृत्तांत । सत्य सांगेल हनुमंत ।
तया कथेचा कथार्थ । मुख्य मोक्षार्थ मुमुक्षां ॥ १२७ ॥
श्रोतीं दिधलिया अवधान । कथा होय चैतन्यघन ।
श्रोतीं कथेंसीं निजजीवन । एकाजनार्दन कृपाळू ॥ १२८ ॥
एकाजनार्दना शरण । सीतामारूतीसंभाषण ।
हें गोड रामायणीं रामायण । श्रोतीं अवधान मज द्दावें ॥ १२९ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
सीताहनुमद्दर्शनं नाम एकादशोऽध्यायः ॥ ११ ॥
॥ ओव्यां १२९ ॥ श्लोक १३ ॥ एवं संख्या १४२ ॥



GO TOP