श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ द्विचत्वारिंश: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

लङ्‌कां प्रति वानराणां आक्रमणं, राक्षसैः सह संग्रामश्च - लंकेवर वानरांची चढाई तसेच राक्षसांबरोबर त्यांचे घोर युद्ध -
ततस्ते राक्षसास्तत्र गत्वा रावणमन्दिरम् ।
न्यवेदयन् पुरीं रुद्धां रामेण सह वानरैः ॥ १ ॥
त्यानंतर त्या राक्षसांनी रावणाच्या महालात जाऊन निवेदन केले की वानरांसह श्रीरामांनी लंकापुरीला चारी बाजूनी घेरून टाकले आहे. ॥१॥
रुद्धां तु नगरीं श्रुत्वा जातक्रोधो निशाचरः ।
विधानं द्विगुणं कृत्वा प्रासादं चाप्यरोहत ॥ २ ॥
लंकेला घेरले असल्याची गोष्ट ऐकून रावणाला फार क्रोध आला आणि तो नगराचे रक्षणाची पहिल्यापेक्षाही दुप्पट व्यवस्था करून महालाच्या गच्चीवर चढला. ॥२॥
स ददर्शावृतां लङ्‌कां सशैलवनकाननाम् ।
असंख्येयैर्हरिगणैः सर्वतो युद्धकांक्षिभिः ॥ ३ ॥
तेथून त्याने पाहिले की पर्वत, वन, काननांसहित सारी लंका सर्व बाजूंनी असंख्य युद्धाभिलाषी वानरांच्या द्वारा घेरली गेली आहे. ॥३॥
स दृष्ट्‍वा वानरैः सर्वैः वसुधां कपिलीकृताम् ।
कथं क्षपयितव्याः स्युः इति चिन्तापरोऽभवत् ॥ ४ ॥
याप्रकारे समस्त वानरांनी आच्छादित वसुधेला कपिल वर्णाची झालेली पाहून तो चिंतेत पडला की या सर्वांचा विनाश कसा होईल ? ॥४॥
स चिन्तयित्वा सुचिरं धैर्यमालम्ब्य रावणः ।
राघवं हरियूथांश्च ददर्शायतलोचनः ॥ ५ ॥
बराच वेळ चिंता केल्यानंतर धैर्य धारण करून विशाल नेत्र असलेल्या रावणाने राघव आणि वानरयूथांकडे पुन्हा पाहिले. ॥५॥
राघवः सह सैन्येन मुदितो नाम पुप्लुवे ।
लङ्‌कां ददर्श गुप्तां वै सर्वतो राक्षसैर्वृताम् ॥ ६ ॥
इकडे राघव आपल्या सेनेसह प्रसन्नतापूर्वक पुढे निघाले. त्यांनी पाहिले लंका सर्व बाजुनी राक्षसांच्या द्वारा आवृत्त आणि सुरक्षित आहे. ॥६॥
दृष्ट्‍वा दाशरथिर्लङ्‌कां चित्रध्वजपताकिनीम् ।
जगाम सहसा सीतां दूयमानेन चेतसा ॥ ७ ॥
विचित्र ध्वजा पताकांनी अलंकृत लंकापुरीला पाहून दाशरथि श्रीराम व्यथित चित्ताने मनातल्या मनात सीतेचे स्मरण करू लागले- ॥७॥
अत्र सा मृगशावाक्षी मत्कृते जनकात्मजा ।
पीड्यते शोकसंतप्ता कृशा स्थण्डिलशायिनी ॥ ८ ॥
हाय ! ती मृगशावकनयनी जनकनंदिनी सीता येथेच माझ्यासाठी शोकसंतप्त होऊन पीडा सहन करत आहे. आणि पृथ्वीच्या वेदीवर झोपत आहे. असे ऐकतो की ती खूप दुर्बल झाली आहे. ॥८॥
नीपीड्यमानां धर्मात्मा वैदेहीमनुचिन्तयन् ।
क्षिप्रमाज्ञापयद् रामो वानरान् द्विषतां वधे ॥ ९ ॥
याप्रकारे राक्षसींच्याकडून पीडित वैदेहीचे वारंवार चिंतन करत धर्मात्मा श्रीरामांनी तात्काळ वानरांना शत्रुभूत राक्षसांचा वध करण्याची आज्ञा दिली. ॥९॥
एवमुक्ते तु वचसिने रामेणाक्लिष्टकर्मणा ।
सङ्‌घर्षमाणाः प्लवगाः सिंहनादैरनादयन् ॥ १० ॥
अक्लिष्टकर्मा श्रीरामांनी अशी आज्ञा देतांच पुढे जाण्यासाठी परस्परात स्पर्धा करणार्‍या वानरांनी आपल्या सिंहनादाने तेथील धरती आणि आकाश यांना निनादून टाकले. ॥१०॥
शिखरैर्विकिरामैतां लङ्‌कां मुष्टिभिरेव वा ।
इति स्म दधिरे सर्वे मनांसि हरियूथपाः ॥ ११ ॥
ते समस्त वानर यूथपति आपल्या मनात असा निश्चय करून उभे होते की आम्ही पर्वत शिखरांची वृष्टी करून लंकेच्या महालांचा चुराडा करून टाकू अथवा बुक्के मारमारून त्यांना पाडून टाकू. ॥११॥
उद्यम्य गिरिशृङ्‌गाणि महान्ति शिखराणि च ।
तरूंश्चोत्पाट्य विविधान् तिष्ठन्ति हरियूथपाः ॥ १२ ॥
ते वानर सेनापति पर्वतांची मोठमोठी शिखरे उचलून आणि नाना प्रकारच्या वृक्षांना उपटून प्रहार करण्यासाठी उभे होते. ॥१२॥
प्रेक्षतो राक्षसेन्द्रस्य तान्यनीकानि भागशः ।
राघवप्रियकामार्थं लङ्‌कामारुरुहुस्तदा ॥ १३ ॥
राक्षसराज रावणाच्या डोळ्यादेखत विभिन्न भागात वाटले गेलेले ते वानर सैनिक राघवांचे प्रिय करण्याच्या इच्छेने तात्काळ तटबंदीवर चढले. ॥१३॥
ते ताम्रवक्त्रा हेमाभा रामार्थे त्यक्तजीविताः ।
लङ्‌कामेवाभ्यवर्तन्त सालभूधरयोधिनः ॥ १४ ॥
तांब्याप्रमाणे लाल मुख आणि सुवर्णासारखी कांति असणारे ते वानर श्रीरामांसाठी प्राण ओवाळून टाकण्यास तयार होते. ते सर्वच्या सर्व साल वृक्ष आणि शैल-शिखारांनी युद्ध करणारे होते; म्हणून त्यांनी लंकेवर आक्रमण केले. ॥१४॥
ते द्रुमैः पर्वताग्रैश्च मुष्टिभिश्च प्लवंगमाः ।
प्राकाराग्राण्यसंख्यानि ममन्थुस्तोरणानि च ॥ १५ ॥
ते सर्व वानर वृक्ष, पर्वत-शिखरे आणि बुक्क्यांनी असंख्य कोट आणि दरवाजे तोडू लागले. ॥१५॥
परिखाः पूरयंतश्च प्रसन्नसलिलाशयान् ।
पांसुभिः पर्वताग्रैश्च तृणैः काष्ठैश्च वानराः ॥ १६ ॥
त्या वानरांनी स्वच्छ जलाने भरलेल्या खंदकांना धूळ, पर्वतशिखरे आणि गवत आणि काष्ठांनी भरून टाकले. ॥१६॥
ततः सहस्रयूथाश्च कोटीयूथाश्च वानराः ।
कोटीशतयुताश्चान्ये लङ्‌कामारुरुहुस्तदा ॥ १७ ॥
नंतर तर सहस्त्र यूथ, कोटी यूथ आणि शेकडो कोटी यूथांसह (त्यांना बरोबर घेऊन) अनेक यूथपति त्या समयी लंकेच्या किल्ल्यावर चढले. ॥१७॥
काञ्चनानि प्रमृद्नन्तः तोरणानि प्लवंगमाः ।
कैलासशिखराभाणि गोपुराणि प्रमथ्य च ॥ १८ ॥

आप्लवन्तः प्लवन्तश्च गर्जन्तश्च प्लवंगमाः ।
लङ्‌कां तामभिधावन्ति महावारणसन्निभाः ॥ १९ ॥
मोठ मोठे गजराजांसमान विशालकाय वानर सोन्याच्या बनविलेल्या दरवाजांना धूळीत मिळवून, कैलासशिखरासमान उंच उंच गोपुरांनाही पाडून टाकीत, उड्‍या मारत तसेच गर्जना करीत लंकेवर आकमण करू लागले. ॥१८-१९॥
जयत्युतिबलो रामो लक्ष्मणश्च महाबलः ।
राजा जयति सुग्रीवो राघवेणाभिपालितः ॥ २० ॥

इत्येवं घोषयन्तश्च गर्जन्तश्च प्लवंगमाः ।
अभ्यधावन्त लङ्‌कायाः प्राकारं कामरूपिणः ॥ २१ ॥
अत्यंत बलशाली श्रीरामचंद्रांचा विजय होवो; महाबली लक्ष्मणाचा जय असो; आणि राघवांच्या द्वारा सुरक्षित राजा सुग्रीवाचाही जय होवो अशा घोषणा करत आणि गर्जत इच्छेनुसार रूप धारण करणारे वानर लंकेच्या कोटावर तुटून पडले. ॥२०-२१॥
वीरबाहुः सुबाहुश्च नलश्च पनसस्तथा ।
निपीड्योपनिविष्टास्ते प्राकारं हरियूथपाः ।
एतस्मिन्नन्तरे चक्रुः स्कन्धावारनिवेशनम् ॥ २२ ॥
त्याच समयी वीरबाहु, सुबाहु, नल आणि पनस - हे वानर यूथपति लंकेच्या तटबंदीवर चढून गेले आणि त्यांनी तेथे आपला सेनेचा तळ ठोकला. ॥२२॥
पूर्वद्वारं तु कुमुदः कोटीभिर्दशभिर्वृतः ।
आवृत्य बलवांस्तस्थौ हरिभिर्जितकाशिभिः ॥ २३ ॥
बलवान्‌ कुमुद, विजयश्रीने सुशोभित होणार्‍या दहा कोटी वानरांसह (ईशान्य कोपर्‍यात राहून) लंकेच्या पूर्व(*१) द्वाराला घेरून उभा राहिला. ॥२३॥
साहाय्यार्थं तु तस्यैव निविष्टः प्रघसो हरिः ।
पनसश्च महाबाहुः वानरैरभिसंवृतः ॥ २४ ॥
त्याच्या सहायतेसाठी अन्य वानरांसह महाबाहु पनस आणि प्रघस हेही येऊन उभे ठाकले. ॥२४॥
दक्षिणं द्वारमासाद्य वीरः शतबलिः कपिः ।
आवृत्य बलवांस्तस्थौ विंशत्या कोटिभिर्वृतः ॥ २५ ॥
वीर शतबलीने (आग्नेय कोणांत स्थित होऊन) दक्षिण (*२) द्वारावर येऊन वीस कोटी वानरांसह त्या द्वाराला घेरले आणि तेथेच मुक्काम ठोकला. ॥२५॥
सुषेणः पश्चिमद्वारं गत्वा तारापिता बलिः ।
आवृत्य बलवांस्तस्थौ कोटिकोटिभिरावृतः ॥ २६ ॥
तारेचे बलवान्‌ पिता सुषेण (नैऋत्य कोनात स्थित होऊन) कोटी कोटी वानरांसह पश्चिम (*३) द्वारावर आक्रमण करून त्याला घेरून उभे राहिले. ॥२६॥
उत्तरं द्वारमागम्य रामः सौमित्रिणा सह ।
आवृत्य बलवांस्तस्थौ सुग्रीवश्च हरीश्वरः ॥ २७ ॥
सौमित्र लक्ष्मणासह महाबलवान्‌ राम तसेच वानरराज सुग्रीव उत्तर(*४) द्वाराला घेरून उभे राहिले (सुग्रीव पूर्व वर्णनानुसार वायव्य कोनामध्ये स्थित होऊन उत्तर द्वारवर्ती श्रीरामांची सहायता करत होते.) ॥२७॥
(*१,२,३,४ - येथे जे पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर शब्द आले आहेत, ते क्रमश: ईशान, अग्नि, नैऋत्य आणि वायव्य कोनाकडे लक्ष्य करणारे आहेत, कारण पूर्वी (४१ व्या सर्गात) पूर्व आदि दरवाजांवर नील आदि यूथपतिंच्या आक्रमणाचा उल्लेख आला आहे. ते कुमुद आदि वानर निकटवर्ती ईशान आदि कोनात राहून पूर्वादि द्वारांवर आक्रमण करून नल आदिंची सहायता करत होते.)
गोलाङ्‌गूलो महाकायो गवाक्षो भीमदर्शनः ।
वृतः कोट्या महावीर्यः तस्थौ रामस्य पार्श्वतः ॥ २८ ॥
लंगूर जातिचे विशालकाय महापराक्रमी वानर गवाक्ष, जे दिसण्यात फार भयंकर होते, एक कोटी वानरांसह श्रीरामांच्या एका बाजूला उभे राहिले. ॥२८॥
ऋक्षाणां भीमकोपानां धूम्रः शत्रुनिबर्हणः ।
वृतः कोट्या महावीर्यः तस्थौ रामस्य पार्श्वतः ॥ २९ ॥
याच प्रकारे महाबली शत्रुसूदन ऋक्षराज धूम्र एक कोटी भयानक क्रोधी अस्वलांसह श्रीरामचंद्रांच्या दुसर्‍या बाजूस उभे राहिले. ॥२९॥
सन्नद्धस्तु महावीर्यो गदापाणिर्विभीषणः ।
वृतो यत्तैस्तु सचिवैः तस्थौ यत्र महाबलः ॥ ३० ॥
कवच आदिंनी सुसज्जित महान्‌ पराक्रमी विभीषण हातात गदा घेऊन आपल्या सावधान मंत्र्यांसह तेथेच येऊन खिळून राहिले, जेथे महाबली राम विद्यमान होते. ॥३०॥
गजो गवाक्षो गवयः शरभो गंधमादनः ।
समन्तात् परिधावन्तो ररक्षुर्हरिवाहिनीम् ॥ ३१ ॥
गज, गवाक्ष, गवय, शरभ आणि गंधमादन- सर्वत्र हिंडून फिरून वानर सेनेचे रक्षण करू लागले. ॥३१॥
ततः कोपपरीतात्मा रावणो राक्षसेश्वरः ।
निर्याणं सर्वसैन्यानां द्रुतमाज्ञापयत् तदा ॥ ३२ ॥
याच वेळी अत्यंत क्रोधाविष्ट झालेल्या राक्षसराज रावणाने आपल्या सर्व सेनेला तात्काळच बाहेर पडण्याची आज्ञा दिली. ॥३२॥
एतच्छुत्वा तदा वाक्यं रावणस्य मुखेरितम् ।
सहसा भीमनिर्घोषं उद्‌घुष्टं रजनीचरैः ॥ ३३ ॥
रावणाच्या मुखांतून बाहेर निघण्याचा आदेश ऐकताच राक्षसांनी एकाएकी फार भयानक गर्जना केली. ॥३३॥
ततः प्रचोदिता भेर्यः चंद्रपाण्डरपुष्कराः ।
हेमकोणैरभिहता राक्षसानां समन्ततः ॥ ३४ ॥
नंतर तर राक्षसांकडून, ज्यांचे मुखभाग चंद्रम्यासमान उज्ज्वल होते आणि ज्या सोन्याच्या दांड्‍यांनी वाजविल्या अथवा बडविल्या जात होत्या अशा बर्‍याशसा भेरी एकाच वेळी वाजविल्या गेल्या. ॥३४॥
विनेदुश्च महाघोषाः शङ्‌खाः शतसहस्रशः ।
राक्षसानां सुघोराणां मुखमारुतपूरिताः ॥ ३५ ॥
त्याबरोबरच भयानक राक्षसांच्या मुखातील वायूने पूरित होऊन लाखो गंभीर घोष असलेले शंख वाजू लागले. ॥३५॥
ते बभुः शुभनीलाङ्‌गाः सशङ्‌का रजनीचराः ।
विद्युन्मण्डलसन्नद्धाः सबलाका इवाम्बुदाः ॥ ३६ ॥
आभूषणांच्या प्रभेने सुशोभित काळ्या शरीराचे ते निशाचर शंख वाजवित असता विद्युत्प्रभेने उद्‌भासित तसेच बगळ्यांच्या रांगेने युक्त नील मेघांप्रमाणे भासत होते. ॥३६॥
निष्पतन्ति ततः सैन्या हृष्टा रावणचोदिताः ।
समये पूर्यमाणस्य वेगा इव महोदधेः ॥ ३७ ॥
त्यानंतर रावणाच्या प्रेरणेने त्याचे सैनिक मोठ्‍या हर्षाने युद्धासाठी बाहेर पडू लागले, जणु प्रलयकाळी महान्‌ मेघांच्या जलांनी भरले जात असता समुद्राचे वेग पुढे वाढत जात आहेत. ॥३७॥
ततो वानरसैन्येन मुक्तो नादः समन्ततः ।
मलयः पूरितो येन ससानुप्रस्थकंदरः ॥ ३८ ॥
तत्पश्चात्‌ वानर सैनिकांनी सर्वबाजुंनी मोठ्‍या जोराने सिंहनाद केला, ज्यायोगे लहान-मोठ्‍या शिखरांसह आणि कंदरांसह मलय पर्वत निनादून गेला. ॥३८॥
शङ्‌खदुन्दुभिनिर्घोषं सिंहनादस्तरस्विनाम् ।
पृथिवीं चान्तरिक्षं च सागरं चाभ्यनादयन् ॥ ३९ ॥

गजानां बृंहितैः सार्धं हयानां ह्रेषितैरपि ।
रथानां नेमिघोषैश्च रक्षसां वदनस्वनैः ॥ ४० ॥
याप्रकारे हत्तींचा चीत्कार, घोड्‍यांचे खिंकाळणे, रथांच्या चाकांचा घडघडाट तसेच राक्षसांच्या मुखांतून प्रकट होणार्‍या आवाजाबरोबरच शंख आणि दुन्दुभिंचा शब्द तसेच वेगवान्‌ वानरांचा निनाद याने पृथ्वी, आकाश आणि समुद्र निनादित होऊन गेले. ॥३९-४०॥
एतस्मिन्नन्तरे घोरः संग्रामः समपद्यत ।
रक्षसां वानराणां च यथा देवासुरे पुरा ॥ ४१ ॥
इतक्यात पूर्वी होऊन गेलेल्या देवासुर संग्रामाप्रमाणे राक्षस आणि वानरांमध्ये घोर युद्ध सुरू झाले. ॥४१॥
ते गदाभिः प्रदीप्ताभिः शक्तिशूलपरश्वधैः ।
निजघ्नुर्वानरान् सर्वान् कथयन्तः स्वविक्रमान् ॥ ४२ ॥
ते राक्षस चमकणार्‍या गदा तसेच शक्ति, शूल आणि परशुंनी समस्त वानरांना मारू लागले आणि आपल्या पराक्रमाची घोषणा करू लागले. ॥४२॥
तथा वृक्षैर्महाकायाः पर्वताग्रैश्च वानराः ।
निजघ्नुस्तानि रक्षांसि नखैर्दन्तैश्च वेगिनः ॥ ४३ ॥
याप्रकारे वेगवान्‌ विशालकाय वानरही राक्षसांवर मोठ मोठे वृक्ष, पर्वत-शिखरे, नखे आणि दात यांनी आघात करू लागले. ॥४३॥
राजा जयति सुग्रीव इति शब्दो महानभूत् ।
राजन् जय जयेत्युक्त्वा स्वस्वनामकथां ततः ॥ ४४ ॥
वानरसेनेमध्ये वानरराज सुग्रीवाचा जय होवो असा महान्‌ शब्द होऊ लागला. तिकडे राक्षसलोकही महाराज रावणाचा जय होवो असे म्हणून आपापल्या नावांचा उच्चार करू लागले. ॥४४॥
राक्षसास्त्वपरे भीमाः प्राकारस्था महीं गतान् ।
वानरान् भिन्दिपालैश्च शूलैश्चैव व्यदारयन् ॥ ४५ ॥
दुसरे बरेचसे भयानक राक्षस जे तटबंदीवर चढलेले होते ते पृथ्वीवर उभे असलेल्या वानरांना भिंडिपाल आणि शूलांनी विदीर्ण करू लागले. ॥४५॥
वानराश्चापि सङ्‌क्रुद्धाः प्राकारस्थान् महीगताः ।
राक्षसान् पातयामासुः खमाप्लुत्य स्वबाहुभिः ॥ ४६ ॥
तेव्हा पृथ्वीवर उभे असलेले वानरही अत्यंत कुपित होऊन गेले आणि आकाशांत उड्डाण करून तटबंदीवर बसलेल्या राक्षसांना आपल्या बाहुंमध्ये पकडून खाली पाडू लागले. ॥४६॥
स संप्रहारस्तुमुलो मांसशोणितकर्दमः ।
रक्षसां वानराणां च संबभूवाद्‌भुतोपमः ॥ ४७ ॥
याप्रकारे राक्षस आणि वानरांमध्ये फारच अद्‌भुत घनघोर युद्ध झाले, ज्यामुळे तेथे रक्त आणि मांसाचा चिखल जमला होता. ॥४७॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद्युद्धकाण्डे द्विचत्वारिंशः सर्गः ॥ ४२ ॥ याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा बेचाळिसावा सर्ग पूरा झाला. ॥४२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP