श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ त्रिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
ब्रह्मणेन्द्रजिते वरं प्रदाय तद्‌बंधनत इन्द्रस्य मोचनं, तदीयं पूर्वकृतं अघं स्मारयित्वा तं यज्ञं पूरयित्वा इन्द्रस्य स्वर्गलोके गमनम् -
ब्रह्मदेवांनी इंद्रजितास वरदान देऊन इंद्रास त्याच्या कैदेतून सोडविणे आणि त्यांच्या पूर्वकृत पापकर्माचे स्मरण देऊन त्याच्या कडून वैष्णव-यज्ञाचे अनुष्ठान करण्यासाठी सांगणे, तो यज्ञ पूर्ण करून इंद्रांचे स्वर्गलोकात जाणे -
जिते महेन्द्रेऽतिबले रावणस्य सुतेन वै ।
प्रजापतिं पुरस्कृत्य ययुर्लङ्‌कां सुरास्तदा ॥ १ ॥
रावणपुत्र मेघनाद जेव्हा अत्यंत बलशाली इंद्राला जिंकून आपल्या नगरांत घेऊन गेला, तेव्हा संपूर्ण देवता प्रजापति ब्रह्मदेवांना पुढे करून लंकेत जाऊन पोहोचल्या. ॥१॥
तत्र रावणमासाद्य पुत्रभ्रातृभिरावृतम् ।
अब्रवीद्‌ गगने तिष्ठन् सामपूर्वं प्रजापतिः ॥ २ ॥
ब्रह्मदेव आकाशात उभे राहूनच पुत्र आणि भावांसह बसलेल्या रावणाच्या जवळ जाऊन कोमल वाणीने त्याला समजावत म्हणाले - ॥२॥
वत्स रावण तुष्टोऽस्मि पुत्रस्य तव संयुगे ।
अहोऽस्य विक्रमौदार्यं तव तुल्योऽधिकोऽपि वा ॥ ३ ॥
वत्सा रावणा ! युद्धात तुझ्या पुत्राची वीरता पाहून मी फार संतुष्ट झालो आहे. अहो ! ह्याचा उदार पराक्रम तुझ्यासारख्या अथवा तुझ्याहूनही अधिक आहे. ॥३॥
जितं हि भवता सर्वं त्रैलोक्यं स्वेन तेजसा ।
कृता प्रतिज्ञा सफला प्रीतोऽस्मि ससुतस्य ते ॥ ४ ॥
तू आपल्या तेजाने समस्त त्रैलोक्यावर विजय मिळविला आहेस आणि आपली प्रतिज्ञा सफल केली आहेस. म्हणून पुत्रासहित तुझ्यावर मी फार प्रसन्न आहे. ॥४॥
अयं च पुत्रोऽतिबलः तव रावण वीर्यवान् ।
जगतीन्द्रजिदित्येव परिख्यातो भविष्यति ॥ ५ ॥
रावणा ! तुझा हा पुत्र अतिशय बलशाली आणि पराक्रमी आहे. आजपासून संसारात हा इंद्रजित्‌ नावाने प्रसिद्ध होईल. ॥५॥
बलवान्दुर्जयश्चैव भविष्यत्येव राक्षसः ।
यं समाश्रित्य ते राजन् स्थापितास्त्रिदशा वशे ॥ ६ ॥
राजन्‌ ! हा राक्षस फार बलवान्‌ आणि दुर्जय होईल, ज्याचा आश्रय घेऊन तू समस्त देवतांना आपल्या अधीन केले आहेस. ॥६॥
तन्मुच्यतां महाबाहो महेन्द्रः पाकशासनः ।
किं चास्य मोक्षणार्थाय प्रयच्छन्तु दिवौकसः ॥ ७ ॥
महाबाहो ! आता तू पाकशासन इंद्राला सोडून दे आणि याला सोडण्याच्या बदल्यात देवता तुला काय देऊ देत ? ॥७॥
अथाब्रवीन् महातेजा इन्द्रजित् समितिंजयः ।
अमरत्वमहं देव वृणे यद्येष मुच्यते ॥ ८ ॥
तेव्हा युद्धविजयी महातेजस्वी इंद्रजिताने स्वतःच म्हटले - देवा ! जर इंद्राला सोडवयाचे असेल तर त्याच्या बदल्यात मी अमरत्व घेऊ इच्छितो. ॥८॥
ततोऽब्रवीन्महातेजा मेघनादं प्रजापतिः ।
नास्ति सर्वामरत्वं हि कस्यचित्प्राणिनो भुवि ॥ ९ ॥

चतुष्पदः पक्षिणश्चतुष्पादो वा भूतानां वा महौजसाम् ।
हे ऐकून महातेजस्वी प्रजापति ब्रह्मदेवांनी मेघनादास म्हटले -मुला ! या भूतलावर राहाणार्‍या पक्षी, चतुष्पाद प्राणी तसेच महातेजस्वी मनुष्य आदि प्राण्यांच्यामध्ये कुणीही प्राणी सर्वथा अमर होऊ शकत नाही. ॥९ १/२॥
श्रुत्वा पितामहेनोक्तं इन्द्रजित् प्रभुणाव्ययम् ॥ १० ॥

अथाब्रवीत् स तत्रस्थं मेघनादो महाबलः ।
भगवान्‌ ब्रह्मदेवांनी सांगितलेली ही गोष्ट ऐकून इंद्रविजयी महाबली मेघनादांनी तेथे उभे असलेल्या अविनाशी ब्रह्मदेवांना म्हटले - ॥१० १/२॥
श्रूयतां वा भवेत् सिद्धिः शतक्रतुविमोक्षणे ॥ ११ ॥

ममेष्टं नित्यशो हर्व्यैः मन्त्रैः सम्पूज्य पावकम् ।
संग्राममवतर्तुं च शत्रुनिर्जयकाङ्‌क्षिणः ॥ १२ ॥

अश्वयुक्तो रथो मह्यं उत्तिष्ठेत् तु विभावसोः ।
तत्स्थस्यामरता स्यान्मे एष मे निश्चयो वरः ॥ १३ ॥
भगवन्‌ ! (जर सर्वथा अमरत्व प्राप्त होणे असंभव आहे) तर इंद्राला सोडण्यासंबंधी माझी दुसरी जी अट आहे - जी दुसरी सिद्धि प्राप्त करणे मला अभीष्ट आहे, ती ऐका. माझ्या विषयी सदा हा नियम बनून जावा की मी जेव्हा शत्रुवर विजय मिळविण्याच्या इच्छेने संग्रामात उतरण्याची इच्छा करीन आणि मंत्रयुक्त हव्याच्या आहुतिने अग्निदेवाची पूजा करीन त्यासमयी अग्निपासून माझ्यासाठी एक असा रथ प्रकट व्हावा जो घोडे जुंपलेला तय्यार असावा आणि त्यावर मी बसून राहीन तो पर्यंत कुणी मला मारू शकणार नाही. हाच माझा निश्चित वर आहे. ॥११-१३॥
तस्मिन् यद्यसमाप्ते च जप्यहोमे विभावसौ ।
युध्येयं देव संग्रामे तदा मे स्याद् विनाशनम् ॥ १४ ॥
जर युद्धाच्या निमित्तने केल्या जाणार्‍या जप आणि होमाला पूर्ण न करताच जर मी समरांगणात युद्ध करू लागलो तरच माझा विनाश व्हावा. ॥१४॥
सर्वो हि तपसा देव वृणोत्यमरतां पुमान् ।
विक्रमेण मया त्वेतद् अमरत्वं प्रवर्तितम् ॥ १५ ॥
देवा ! सर्व लोक तपस्या करून अमरत्व प्राप्त करतात, परंतु मी पराक्रम द्वारा ह्या अमरत्वाचे वरण केले आहे. ॥१५॥
एवमस्त्विति तं चाह वाक्यं देवः पितामहः ।
मुक्तश्चेन्द्रजिता शक्रो गताश्च त्रिदिवं सुराः ॥ १६ ॥
हे ऐकून भगवान्‌ ब्रह्मदेवांनी म्हटले - एवमस्तु (असेच होवो) यानंतर इंद्रजिताने इंद्राला मुक्त केले आणि सर्व देवता त्यांना बरोबर घेऊन स्वर्गलोकी निघून गेल्या. ॥१६॥
एतस्मिन्नन्तरे राम दीनो भ्रष्टाम्बरद्युतिः ।
इन्द्रश्चिन्तापरीतात्मा ध्यानतत्परतां गतः ॥ १७ ॥
श्रीरामा ! त्या समयी इंद्रांचे देवोचित तेज नष्ट झाले होते. ते दुःखी होऊन चिंतेमध्ये बुडून आपल्या पराजयाचे कारणाचा विचार करू लागले. ॥१७॥
तं तु दृष्ट्‍वा तथाभूतं प्राह देवः पितामहः ।
शतक्रतो किमु पुरा करोति स्म सुदुष्कृतम् ॥ १८ ॥
भगवान्‌ ब्रह्मदेवांनी त्यांच्या त्या अवस्थेस लक्ष्य केले आणि म्हटले -शतक्रतो ! जर आज तुम्हाला या अपमानाने शोक आणि दुःख होत आहे तर सांगा बरे तुम्ही पूर्वी फार मोठे दुष्कर्म का केले होते ? ॥१८॥
अमरेन्द्र मया बुद्ध्या प्रजाः सृष्टास्तथा प्रभो ।
एकवर्णाः समाभाषा एकरूपाश्च सर्वशः ॥ १९ ॥
प्रभो ! देवराज ! पूर्वी मी आपल्या बुद्धिने ज्या प्रजांना उत्पन्न केले होते त्यांची सर्वांची अङ्‌गकान्ति, भाषा, रूप आणि अवस्था सर्व गोष्टी एकसारख्या होत्या. ॥१९॥
तासां नास्ति विशेषो हि दर्शने लक्षणेऽपि वा ।
ततोऽहमेकाग्रमनाः ताः प्रजाः समचिन्तयम् ॥ २० ॥
त्यांच्या रूप आणि रंग आदिमध्ये परस्परात काही विलक्षणता नव्हती. तेव्हा मी एकाग्रचित्त होऊन त्या प्रजांच्या विषयी विशेषता आणण्यासाठी काही विचार करू लागलो. ॥२०॥
सोऽहं तासां विशेषार्थं स्त्रियमेकां विनिर्ममे ।
यद्यत्प्रजानां प्रत्यङ्‌गं विशिष्टं तत् तदुद्‌धृतम् ॥ २१ ॥
विचार केल्यानंतर त्या सर्व प्रजांपेक्षा विशिष्ट प्रजेला प्रस्तुत करण्यासाठी मी एका नारीची सृष्टि केली. प्रजांच्या प्रत्येक अंगात जी जी अद्‌भुत विशिष्टता - सारभूत सौंदर्य होते ते मी तिच्या अंगामध्ये प्रकट केले. ॥२१॥
ततो मया रूपगुणैः अहल्या स्त्री विनिर्मिता ।
हलं नामेह वैरूपं हल्यं तत्प्रभवं भवेत् ॥ २२ ॥

यस्मान्न विद्यते हल्यं तेनाहल्येति विश्रुता ।
अहल्येति मया शक्र तस्या नाम प्रवर्तितम् ॥ २३ ॥
त्या अद्‍भुत रूप-गुणांनी उपलक्षित जी नारी माझ्या द्वारे निर्माण झाली तिचे नाव झाले अहल्या ! या जगात कुरूपतेला हल म्हणतात; तिच्यामुळे जी निंदनीयता प्रकट होते तिचे नाव आहे हल्या. ज्या नारीमध्ये हल्य नसेल तिला अहल्या म्हटले जाते; म्हणून ती नवनिर्मित नारी अहल्या नावाने विख्यात झाली. मीच तिचे नाव अहल्या ठेवलेले होते. ॥२२-२३॥
निर्मितायां च देवेन्द्र तस्यां नार्यां सुरर्षभ ।
भविष्यतीति कस्यैषा मम चिन्ता ततोऽभवत् ॥ २४ ॥
देवेंद्र ! सुरश्रेष्ठ ! जेव्हा त्या नारीची निर्मिती झाली तेव्हा माझ्या मनात ही चिंता उत्पन्न झाली की ही कुणाची पत्‍नी होईल ? ॥२४॥
त्वं तु शक्र तदा नारीं जानीषे मनसा प्रभो ।
स्थानाधिकतया पत्‍नीि ममैषेति पुरंदर ॥ २५ ॥
प्रभो ! पुरंदर ! देवेंद्रा ! त्या काळात तू आपले स्थान आणि पदाची श्रेष्ठतामुळे माझ्या अनुमतिशिवाय मनातल्या मनात असे समजू लागलास की ही माझीच पत्‍नी होईल. ॥२५॥
सा मया न्यासभूता तु गौतमस्य महात्मनः ।
न्यस्ता बहूनि वर्षाणि तेन निर्यातिता च ह ॥ २६ ॥
मी ठेव या स्वरूपात महर्षि गौतमांच्या हाती त्या कन्येला सोपविले होते. ती बरीच वर्षे त्यांच्या येथे राहिली आणि नंतर गौतमानी तिला परत माझ्या स्वाधीन केले. ॥२६॥
ततस्तस्य परिज्ञाय महास्थैर्यं महामुनेः ।
ज्ञात्वा तपसि सिद्धिं च पत्‍न्यशर्थं स्पर्शिता तदा ॥ २७ ॥
महामुनि गौतमांचे ते महान्‌ स्थैर्य (इंद्रिय संयम) तसेच तपस्या विषयक सिद्धि जाणून मी ती कन्या पुन्हा त्यांनाच पत्‍नीरूपाने देऊन टाकली. ॥२७॥
स तया सह धर्मात्मा रमते स्म महामुनिः ।
आसन्निराशा देवास्तु गौतमे दत्तया तया ॥ २८ ॥
धर्मात्मा महामुनि गौतम तिच्या बरोबर सुखपूर्वक राहू लागले. जेव्हा अहल्या गौतमांना दिली गेली तेव्हा सर्व देव निराश झाले. ॥२८॥
तं क्रुद्धस्त्विह कामात्मा गत्वा तस्याश्रमं मुनेः ।
दृष्टवांश्च तदा तां स्त्रीं दीप्तामग्निशिखामिव ॥ २९ ॥
तुमच्या तर क्रोधाला सीमाच राहिली नाही. तुमचे मन कामाधीन झाले होते, म्हणून तुम्ही मुनिंच्या आश्रमावर जाऊन अग्निशिखे समान प्रज्वलित होणार्‍या त्या दिव्य सुंदरीला पाहिले. ॥२९॥
सा त्वया धर्षिता शक्र कामार्तेन समन्युना ।
दृष्टस्त्वं च तदा तेन ह्याश्रमे परमर्षिणा ॥ ३० ॥
इंद्रा ! तू कुपित आणि कामाने पीडित होऊन तिच्यावर बलात्कार केलास. त्या समयी त्या महर्षिंनी आपल्या आश्रमांत तुला पाहिले. ॥३०॥
ततः क्रुद्धेन तेनाऽसि शप्तः परमतेजसा ।
गतोऽसि येन देवेन्द्र दशाभागविपर्ययम् ॥ ३१ ॥
देवेंद्रा ! यामुळे त्या परम तेजस्वी महर्षिंना फारच क्रोध आला आणि त्यांनी तुला शाप दिला. त्याच शापामुळे तुला या विपरीत दशेमध्ये पडावे लागले आहे - शत्रूंचा कैदी बनावे लागले आहे. ॥३१॥
यस्मान्मे धर्षिता पत्‍नीा त्वया वासव निर्भयम् ।
तस्मात्त्वं समरे शक्र शत्रुहस्तं गमिष्यसि ॥ ३२ ॥
त्यांनी शाप देतांना म्हटले - वासव ! शक्र ! तू निर्भय होऊन माझ्या पत्‍नीवर बलात्कार केला आहेस म्हणून तू युद्धास जाऊन शत्रुंच्या हाती पडशील. ॥३२॥
अयं तु भावो दुर्बुद्धे यस्त्वयेह प्रवर्तितः ।
मानुषेष्वपि लोकेषु भविष्यति न संशयः ॥ ३३ ॥
दुर्बुद्धे ! तुझ्या सारख्या राजाच्या दोषाने मनुष्यलोकातही हा जारभाव प्रचलित होईल; ज्याचा सूत्रपात येथे तू स्वतःच केला आहेस यात संशय नाही. ॥३३॥
तत्रार्धं तस्य यः कर्ता त्वय्यर्धं निपतिष्यति ।
न च ते स्थावरं स्थानं भविष्यति न संशयः ॥ ३४ ॥
जो जारभावाने पापाचार करील त्या पुरुषावर त्या पापाचा अर्धा भाग पडेल आणि अर्धा तुझ्यावर पडेल; कारण की याचे प्रवर्तक तुम्हीच आहात. निःसंदेह तुमचे हे स्थान स्थिर होणार नाही. ॥३४॥
यश्च यश्च सुरेन्द्रः स्याद् ध्रुवः स न भविष्यति ।
एष शापो मया मुक्त इत्यसौ त्वां तदाऽब्रवीत् ॥ ३५ ॥
जो कोणीही देवराजाच्या पदावर प्रतिष्ठित होईल तो तेथे स्थिर राहाणार नाही. हा शाप मी इंद्रमात्रासाठी दिलेला आहे; ही गोष्ट मुनिनी तुला सांगितली होती. ॥३५॥
तां तु भार्यां स निर्भर्त्स्य सोऽब्रवीत् सुमहातपाः ।
दुर्विनीते विनिध्वंस ममाश्रमसमीपतः ॥ ३६ ॥

रूपयौवनसम्पन्ना यस्मात् त्वमनवस्थिता ।
तस्माद्रूपवती लोके न त्वमेका भविष्यति ॥ ३७ ॥
नंतर त्या तपस्वी मुनिनी आपल्या त्या पत्‍नीचीही योग्य प्रकारे निर्भत्सना करून म्हटले -दुष्टे ! तू माझ्या आश्रमाच्या जवळच अदृश्य होऊन रहा आणि आपल्या रूपसौंदर्यापासून भ्रष्ट होऊन जा. रूप आणि यौवनाने संपन्न होऊन मर्यादेमध्ये तू स्थित राहू शकली नाहीस म्हणून आता लोकात तू एकटीच रूपवती राहाणार नाहीस. (बर्‍याच रूपवती स्त्रिया उत्पन्न होतील.) ॥३६-३७॥
रूपं च ते प्रजाः सर्वा गमिष्यन्ति न संशयः ।
यत् तदेकं समाश्रित्य विभ्रमोऽयमुपस्थितः ॥ ३८ ॥
ज्या एका रूप-सौंदर्यामुळे इंद्राच्या मनात हा काम-विकार उत्पन्न झाला होता; त्या तुझ्या या रूप-सौंदर्याला समस्त प्रजा प्राप्त करतील, यात संशय नाही. ॥३८॥
तदाप्रभृति भूयिष्ठं प्रजा रूपसमन्विता ।
सा तं प्रसादयामास महर्षिं गौतमं तदा ॥ ३९ ॥

अज्ञानाद् धर्षिता विप्र त्वद्‌रूपेण दिवौकसा ।
न कामकाराद् विप्रर्षे प्रसादं कर्तुमर्हसि ॥ ४० ॥
तेव्हांपासून अधिकांश प्रजा रूपवती होऊ लागल्या. अहल्येने त्या समयी विनीत-वचनांच्या द्वारा महर्षि गौतमांना प्रसन्न केले आणि म्हटले - विप्रवर ! महर्षे ! देवराजाने आपलेच रूप धारण करून मला कलंकित केले आहे. मी त्याला ओळखू शकले नव्हते. म्हणून अज्ञानाने माझ्याकडून हा अपराध झाला आहे. स्वेच्छाचारवश नव्हे, म्हणून आपण माझ्यावर कृपा केली पाहिजे. ॥३९-४०॥
अहल्यया त्वेवमुक्तः प्रत्युवाच स गौतमः ।
उत्पत्स्यति महातेजा इक्ष्वाकूणां महारथः ॥ ४१ ॥

रामो नाम श्रुतो लोके वनं चाप्युपयास्यति ।
ब्राह्मणार्थे महाबाहुः विष्णुर्मानुषविग्रहः ॥ ४२ ॥

तं द्रक्ष्यसि यदा भद्रे ततः पूता भविष्यसि ।
स हि पावयितुं शक्तः त्वया यद् दुष्कृतं कृतम् ॥ ४३ ॥
अहल्येने असे म्हटल्यावर गौतमांनी उत्तर दिले - भद्रे ! इक्ष्वाकु वंशात एक महातेजस्वी महारथी वीराचा अवतार होईल, जो संसारात राम नावाने विख्यात होईल. महाबाहु रामाच्या रूपात साक्षात्‌ भगवान्‌ विष्णुच मनुष्य शरीर धारण करून प्रकट होतील. ते ब्राह्मणांच्या (विश्वामित्रांच्या) कार्याच्या निमित्ताने यज्ञपोवनात येतील. जेव्हा तू त्यांचे दर्शन करशील तेव्हा पवित्र होशील. तू जे पाप केले आहेस त्यापासून तुला तेच (फक्त) पवित्र करू शकतात. ॥४१-४३॥
तस्यातिथ्यं च कृत्वा वै मत्समीपं गमिष्यसि ।
वत्स्यसि त्वं मया सार्धं तदा हि वरवर्णिनि ॥ ४४ ॥
वरवर्णिनी ! त्यांचा अतिथी-सत्कार करून तू माझ्या जवळ येशील आणि नंतर माझ्याच बरोबर राहू लागशील. ॥४४॥
एवमुक्त्वा स विप्रर्षिः आजगाम स्वमाश्रमम् ।
तपश्चाचार सुमहत् सा पत्‍नीा ब्रह्मवादिनः ॥ ४५ ॥
असे म्हणून ब्रह्मर्षि गौतम आपल्या आश्रमाच्या आत आले आणि त्या ब्रह्मवादी मुनिंची पत्‍नी अहल्या फार मोठी तपस्या करू लागली. ॥४५॥
शापोत्सर्गाद्धि तस्येदं मुनेः सर्वमुपस्थितम् ।
तत्स्मर त्वं महाबाहो दुष्कृतं यत् त्वया कृतम् ॥ ४६ ॥
महाबाहो ! त्या ब्रह्मर्षि गौतमांनी शाप दिल्यामुळेच तुझ्यावर हे सारे संकट ओढवले आहे, म्हणून तू जे पाप केले होतेस, त्याची आठवण कर. ॥४६॥
तेन त्वं ग्रहणं शत्रोः यातो नान्येन वासव ।
शीघ्रं वै यज यज्ञं त्वं वैष्णवं सुसमाहितः ॥ ४७ ॥
वासव ! त्या शापामुळेच शत्रुच्या कैदेत पडला आहेस, दुसर्‍या कुठल्या कारणामुळे नाही. म्हणून आता एकाग्रचित्त होऊन शीघ्रच वैष्णव-यज्ञाचे अनुष्ठान कर. ॥४७॥
पावितस्तेन यज्ञेन यास्यसे त्रिदिवं ततः ।
पुत्रश्च तव देवेन्द्र न विनष्टो महारणे ॥ ४८ ॥

नीतः सन्निहितश्चैव आर्यकेण महोदधौ ।
देवेंद्रा ! त्या यज्ञाने पवित्र होऊन तू पुन्हा स्वर्गलोक प्राप्त करशील. तुझा पुत्र जयंत त्या महासमरात मारला गेलेला नाही. त्याचे आजोबा (मातामह) पुलोमा त्याला महासागरात घेऊन गेले आहेत. या समयी तो त्यांच्या जवळ आहे. ॥४८ १/२॥
एतच्छ्रुत्वा महेन्द्रस्तु यज्ञमिष्ट्‍वा च वैष्णवम् ॥ ४९ ॥

पुनस्त्रिदिवमाक्रामद् अन्वशासच्च देवराट् ।
ब्रह्मदेवांचे हे वचन ऐकून देवराज इंद्रांनी वैष्णव यज्ञाचे अनुष्ठाने केले. तो यज्ञ पूरा करून देवराज स्वर्गलोकात गेले आणि तेथे देवराज्याचे शासन करू लागले. ॥४९ १/२॥
एतदिन्द्रजितो नाम बलं यत्कीर्तितं मया ॥ ५० ॥

निर्जितस्तेन देवेन्द्रः प्राणिनोऽन्ये तु किं पुनः ।
रघुनंदना ! हे आहे इंद्रविजयी मेघनादाचे बळ, ज्याचे मी आपणाजवळ वर्णन केले आहे. त्याने देवराज इंद्रालाही जिंकले होते, मग इतर दुसर्‍या प्राण्यांची तर बिशादच काय होती. ॥५० १/२॥
आश्चर्यमिति रामश्च लक्ष्मणश्चाब्रवीत् तदा ॥ ५१ ॥

अगस्त्यवचनं श्रुत्वा वानरा राक्षसास्तदा ।
अगस्त्यांचे वचन ऐकून श्रीराम आणि लक्ष्मण तात्काळ म्हणाले -आश्चर्य आहे ! त्याच बरोबर वानर आणि राक्षसांनाही या गोष्टीने फार आश्चर्य वाटले. ॥५१ १/२॥
विभीषणस्तु रामस्य पार्श्वस्थो वाक्यमब्रवीत् ॥ ५२ ॥

आश्चर्यं स्मारितोऽस्म्यद्य यत् तद् दृष्टं पुरातनम् ।
त्या समयी रामाच्या बाजूला बसलेल्या विभीषणाने म्हटले - मी पूर्वकाळी ज्या आश्चर्यकारक गोष्टी पाहिल्या होत्या, त्यांचे आज महर्षिनी मला स्मरण करून दिले आहे. ॥५२ १/२॥
अगस्त्यं त्वब्रवीद् रामः सत्यमेतच्छ्रुतं च मे ॥ ५३ ॥

एवं राम समुद्‌भूतो रावणो लोककण्टकः ।
सपुत्रो येन संग्रामे जितः शक्रः सुरेश्वरः ॥ ५४ ॥
तेव्हा रामांनी अगस्त्यांना म्हटले-आपण जे ऐकविलेत ते सत्यच आहे. मी ही विभीषणाच्या मुखाने ही गोष्ट ऐकली होती. नंतर अगस्त्य म्हणाले - रामा ! याप्रकारे पुत्रासहित रावण संपूर्ण जगासाठीच कण्टकरूप होता, ज्याने देवराज इंद्रांनाही संग्रामात जिंकले होते. ॥५३-५४॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे त्रिंशः सर्गः ॥ ३० ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा तिसावा सर्ग पूरा झाला. ॥३०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP