॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ किष्किन्धाकाण्ड ॥

॥ नवमः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]समुद्र उल्लंघून जाण्यासंबंधी वानरांची चर्चा -


गते विहायसा गृध्र-राजे वानरपुङ्‌गवाः ।
हर्षेण महताविष्टाः सीतादर्शलालसाः ॥ १ ॥
श्रीमहादेव म्हणाले- हे पार्वती, गिधाडांचा राजा संपाती आकाशमार्गाने निघून गेल्यावर, सीतेची भेट घेण्याची अतिशय उत्कंठा असणारे ते श्रेष्ठ वानर तिचा पत्ता लागल्याने अतिशय आनंदित झाले. (१)

ऊचुः समुद्रं पश्यन्तो नक्रचक्रभयङ्‌करम् ।
तरङ्‌गादिभिरुन्नद्धं आकाशमिव दुर्ग्रहम् ॥ २ ॥
परस्परं अवोचन्वै कथमेनं तरामहे ।
उवाच चाङ्‌गदस्तत्र शृणुध्वं वानरोत्तमाः ॥ ३ ॥
पण मगरी आणि भोवरे यांच्यामुळे भयंकर असणारा, लाटा इत्यादींनी सतत उसळत राहाणारा, आणि आकाशाप्रमाणे दुर्लंघ्य असा समुद्र त्या वानरांनी पाहिला. तेव्हा ते एकमेकांना म्हणू लागले, 'हा समुद्र आपण कसा बरे तरून जाऊ शकू ?' त्यावेळी तेथे अंगद म्हणाला, "हे वानरश्रेष्ठांनो, मी काय म्हणतो ते ऐका. (२-३)

भवन्त्योऽत्यन्तबलिनः शूराश्च कृतविक्रमाः ।
को वात्र वारिधिं तीर्त्वा राजकार्यं करिष्यति ॥ ४ ॥
तुम्ही सर्वजण बलवान शूरवीर असून तुम्ही आत्तापर्यंत अनेक पराक्रम केलेले आहेत. तेव्हा येथे तुमच्या मध्ये असा कोण आहे की जो हा समुद्र तरून जाऊन, सुग्रीव राजाचे कार्य पूर्ण करील ? (४)

एतेषां वानराणां स प्राणदाता न संशयः ।
तदुत्तिष्ठतु मे शीघ्रं पुरतो यो महाबलः ॥ ५ ॥
तो या सर्व वानरांना जीवदान देईल यात संशय नाही. म्हणून तुमच्यापैकी असा जो कोणी महाबलवान आहे त्याने चटदिशी येऊन माझ्यापुढे यावे. (५)

वानराणां च सर्वेषां रामसुग्रीवयोरपि ।
स एव पालको भूयात् नात्र कार्या विचारणा ॥ ६ ॥
तो वानरच सर्व वानरांचा तसेच राम व सुग्रीव यांचा रक्षक ठरेल. या बाबतीत मुळीच विचार करण्याचे कारण नाही." (६)

इत्युक्ते युवराजेन तूष्णीं वानरसैनिकाः ।
आसन्नोचुः किञ्चिदपि परस्परविलोकिनः ॥ ७ ॥
युवराज अंगदाने असे म्हटल्यावर, वानर सैनिक गप्प बसून राहिले. आणि परस्परांकडे पाहात, ते काहीही बोलले नाहीत. (७)

अङ्‌गद उवाच
उच्यतां वै बलं सर्वैः प्रत्येकं कार्यसिद्धये ।
केन वा साध्यते कार्यं जानीमस्तदनन्तरम् ॥ ८ ॥
अंगद म्हणाला- "आता तुम्हांपैकी प्रत्येकाने या कार्याच्या सिद्धीसाठी आपले सामर्थ्य किती आहे, हे सांगावे. त्यानंतर हे कार्य कोणाकडून साधले जाईल, हे आम्हांला कळू शकेल." (८)

अङ्‌गदस्य वचः श्रुत्वा प्रोचुर्वीरा बलं पृथक् ।
योजनानां दशारभ्य दशोत्तरगुणं जगुः ॥ ९ ॥
अंगदाचे वचन ऐकल्यावर वानरवीरांनी स्वतंत्रपणे आपापले सामर्थ्य कथन केले. दहा योजनांपासून सुरवात करून क्रमाने दहा योजनांच्या दहा दहा योजने अधिक उड्डाण होईल असे त्या वानरांनी सांगितले. (९)

शतादर्वाग्जाम्बवांस्तु प्रह मध्ये वनौकसाम् ।
पुरा त्रिविक्रमे देवे पादं भूमानलक्षणम् ॥ १० ॥
त्रिःसप्तकृत्वोऽहमगां प्रदक्षिणविधानतः ।
इदानीं वार्धकग्रस्तो न शक्नोमि विलङ्‌घितुम् ॥ ११ ॥
वनात राहाणार्‍या प्राण्यांपैकी त्या जाबवान अस्वलाने आपली शक्ती शंभर योजनांपेक्षा काही कमी अंतर इतके जाण्याची आहे, असे सांगितले. तो पुढे म्हणाला, "पूर्वी जेव्हा श्रीविष्णूनी वामन अवतार घेतला होता, तेव्हा त्या वामनाचे एक पाऊल पृथ्वीएवढ्या मापाचे होते. त्या वेळी मी एकवीस वेळा त्याला प्रदक्षिणा घातल्या होत्या. परंतु आता मी वार्धक्याने ग्रस्त असल्याने समुद्राचे उल्लंघन करू शकणार नाही." (१०-११)

अङ्‌गदोऽप्याह मे गन्तुं शक्यं पारं महोदधेः ।
पुनर्लङ्‌घनसामर्थ्यं न जानाम्यस्ति वा न वा ॥ १२ ॥
तेव्हा अंगदसुद्धा म्हणाला, "या महासागराच्या पलीकडे मला जाता येईल. परंतु पुनः परत येण्याचे सामर्थ्य माझ्याजवळ आहे की नाही, हे मात्र मला माहीत नाही." (१२)

तमाह जाम्बवान्वीरः त्वं राजा नो नियामकः ।
न युक्तं त्वां नियोक्तुं मे त्वं समर्थोऽपि यद्यपि ॥ १३ ॥
तेव्हा वीर जांबवान त्याला म्हणाला, 'तू वीर आहेस. आणि तू हे कार्य करण्यास समर्थ असलास तरी या कार्यासाठी तुझी योजना करणे, हे मला योग्य वाटत नाही. कारण तू आमचा नायक आहेस आणि नियामक आहेस." (१३)

अङ्‌गद उवाच
एवं चेत्पूर्ववत्सर्वे स्वप्स्यामो दर्भविष्टरे ।
केनापि न कृतं कार्यं जीवितुं च न शक्यते ॥ १४ ॥
अंगद म्हणाला- " असे जर असेल तर आपण सर्वजण पूर्वीप्रमाणे कुशासनांवर प्रायोपवेशन करण्यास पडून राहू ? कारण हे कार्य कुणाकडूनही झाले नाही तर अशा स्थितीत जिवंत राहाणे, हेही आपणांस शक्य होणार नाही." (१४)

तमाह जाम्बवान्वीरो दर्शयिष्यामि ते सुत ।
येनास्माकं कार्यसिद्धिः भविष्यति अचिरणे च ॥ १५ ॥
तेव्हा वीर जांबवान त्याला म्हणाला, "वत्सा, ज्याच्याकडून आपली कार्यसिद्धी झटपट होईल, असा वानरवीर मी तुला दाखवितो." (१५)

इत्युक्त्‍वा जाम्बवान्प्राह हनूमन्तं अवस्थितम् ।
हनूमन्किं रहस्तूष्णीं स्थीयते कार्यगौरवे ॥ १६ ॥
प्राप्तेऽज्ञेनेव सामर्थं दर्शयाद्य महाबल ।
त्वं साक्षाद्वायुतनयो वायुतुल्यपराक्रमः ॥ १७ ॥
असे बोलून जांबवान तेथे जवळच असलेल्या हनुमंताला म्हणाला, ' अरे हनुमाना, हे महान कार्य उपस्थित झाले असताना, एखाद्या अज्ञानी माणसाप्रमाणे तू बाजूला एकटाच गप्प का उभा राहिला आहेस ? अरे सामर्थ्यसंपन्न हनुमाना, तू साक्षात वायूचा पुत्र आहेस आणि वायूप्रमाणेच तुझा पराक्रम आहे. तेव्हा आज तू आपले सामर्थ्य दाखव. (१६-१७)

रामकार्यार्थमेव त्वं जनितोऽसि महात्मना ।
जातमात्रेण ते पूर्वं दृष्ट्‍वोद्यन्तं विभावसुम् ॥ १८ ॥
पक्वं फलं जिघृक्षामीति उत्प्लुतं बालचेष्टया ।
योजनानां पञ्चशतं पतितोऽसि ततो भुवि ॥ १९ ॥
अरे महात्म्या, वायूने तुला श्रीरामांचे कार्य करण्यासाठीच जन्माला घातले आहे. पूर्वी जन्माला येताच उगवणारा सूर्य पाहून, 'हे पिकले फळ मी घेतो,' असा विचार करून, तू बाललीला करीत पाचशे योजने उड्डाण करून मग जमिनीवर पडला होतास. (१८-१९)

अतस्त्वद्‌बलमाहात्म्यं को वा शक्नोति वर्णितुम् ।
उत्तिष्ठ कुरु रामस्य कार्यं नः पाहि सुव्रत ॥ २० ॥
म्हणून तुझ्या सामर्थ्यज्चे माहात्म्य वर्न करण्यास कोण बरे समर्थ आहे ? तेव्हा, हे सुव्रता, ऊठ. रामाचे कार्य कर आणि आमचे रक्षण कर." (२०)

श्रुत्वा जाम्बवतो वाक्यं हनूमानतिहर्षितः ।
चकार नादं सिंहस्य ब्रह्माण्डं स्फोटयन्निव ॥ २१ ॥
जांबवानाचे हे वाक्य ऐकून हनुमान अतिशय आनंदित झाला. आणि जणू ब्रह्मांड फोडणारा असा प्रचंड सिंहनाद त्याने केला. (२१)

बभूव पर्वताकारः त्रिविक्रम इवापरः ।
लङ्‌घयित्वा जलनिधिं कृत्वा लङ्‌कां च भस्मसात् ॥ २२ ॥
रावणं सकुलं हत्वान् एष्ये जनकनन्दिनीम् ।
यद्वा बद्‍ध्वा गले रज्ज्वा रावणं वामपाणिना ॥ २३ ॥
लङ्‌कां सपर्वतां धृत्वा रामस्याग्रे क्षिपाम्यहम् ।
यद्वा दृष्ट्‍वैव यास्यामि जानकीं शुभलक्षणाम् ॥ २४ ॥
तो पर्वताच्या आकाराचा झाला. जणू तो दुसरा वामन आहे अशे वाटत होते. तो गर्जना करू लागला, "अरे वानरांनो, हा समुद्र उल्लंघून, लंकेला भस्मसात् करतो आणि कुळासकट रावणाला ठार करून मी जनकाच्या कन्येला परत आणतो किंवा तुम्ही म्हणाल तर रावणाच्या गळ्यात दोर बांधून आणि डाव्या हाताने पर्वतासकट लंका पकडून मी त्याला श्रीरामांच्या पुढे उभा करतो, किंवा शुभलक्षणी जानकीला जिवंत पाहूनच परत येतो." (२२-२४)

श्रुत्वा हनुमतो वाक्यं जाम्बवान् इदमब्रवीत् ।
दृष्ट्‍वैवागच्छ भद्रं ते जीवन्तीं जानकीं शुभाम् ॥ २५ ॥
हनुमंताचे वाक्य ऐकून जांबवान असे म्हणाला, "हनुमाना, तुझे कल्याण होवो. शुभलक्षणी जानकीला जिवंत पाहूनच तू परत ये. (२५)

पश्चाद्‍रामेण सहितो दर्शयिष्यसि पौरुषम् ।
कल्याण भवताद्‌भद्र गच्छतस्ते विहायसा ॥ २६ ॥
मग श्रीरामांबरोबर लंकेत जाऊन तू तुझे सामर्थ्य दाखव. हे कल्याणा, आकाशमार्गाने जाणार्‍या तुझे कल्याण असो. (२६)

गच्छन्तं रामकार्यार्थं वायुस्त्वामनुगच्छतु ।
इत्याशीर्भिः समामंत्र्य विसृष्टः प्लवगाधिपैः ॥ २७ ॥
श्रीरामांच्या कार्यासाठी जाणार्‍या तुझ्या मागोमाग वायुदेवता तुझ्याबरोबर येवो." अशा प्रकारे आशीर्वाद देऊन त्या वानरश्रेष्ठांनी हनुमानाला निरोप दिला. (२७)

महेन्द्राद्रिशिरो गत्वा बभूवाद्‌भुतदर्शनः ॥ २८ ॥
मग मारुती महेंद्र पर्वताच्या शिखरावर गेला. तेथे त्याने अद्‌भुत रूप धारण केले. (२८)

महानगेन्द्रप्रतिमो महात्मा
    सुवर्णवर्णोऽरुणचारुवक्‍त्रः ।
महाफणीन्द्राभसुदीर्घबाहुः
    वातात्मजोऽदृश्यत सर्वभूतैः ॥ २९ ॥
त्या वेळी महान पर्वतराजाप्रमाणे असणारा, सुवर्णवर्ण, बाल सूर्याप्रमाणे लाल आणि सुंदर मुख असणारा, महान सर्पराजाप्रमाणे दीर्घ बाहू असणारा, असा तो महात्मा वायुपुत्र हनुमान सर्व प्राण्यांना दिसला. (२९)

इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे
किष्किन्धाकाण्डे नवमः सर्गः ॥ ९ ॥
॥ समाप्तमिदं किष्किन्धाकाण्डम् ॥
इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे किष्क्रिंधाकाण्डे नवमः सर्गः॥ ९ ॥
किष्किंधाकाण्ड समाप्त


GO TOP