श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। नवमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

सुमन्त्रेण ऋष्यशृङ्वृत्तान्तस्य संक्षेपेण वर्णनम् - सुमंत्राने राजाला ऋष्यशृंग मुनिंना बोलावण्याचा सल्ला देऊन त्यांचे अंगदेशात जाणे, आणि शांताशी विवाह करण्याचा प्रसंग ऐकविणे -
एतच्छ्रुत्वा रहः सूतो राजानमिदमब्रवीत् ।
श्रूयतां तत् पुरावृत्तं पुराणे च मया श्रुतम् ॥ १ ॥
पुत्रासाठी अश्वमेध करणाचा प्रस्ताव ऐकून सुमंत्राने राजाला एकांतात म्हटले - "महाराज ! एक जुना इतिहास ऐकावा. मी पुराणातही याचे वर्णन ऐकले आहे. ॥ १ ॥
ऋत्विग्भिरुपदिष्टोऽयं पुरावृत्तो मया श्रुतः ।
सनत्कुमारो भगवान् पूर्वं कथितवान् कथाम् ॥ २ ॥

ऋषीणां सन्निधौ राजंस्तव पुत्रागमं प्रति ।
'ऋत्विजांनी पुत्रप्राप्तीसाठी हा अश्वमेधरूपी उपायाचा उपदेश केला आहे, परंतु मी ऐतिहासिक अशी एक विशेष गोष्ट ऐकली आहे. राजन् ! पूर्वकाली भगवान सनत्कुमारांनी ऋषिंच्या निकट एक कथा ऐकविली होती. ती आपल्या पुत्रप्राप्तीशी संबंधित आहे. ॥ २ १/२ ॥
काश्यपस्य च पुत्रोऽस्ति विभाण्डक इति श्रुतः ॥ ३ ॥

ऋष्यशृङ्‍ग इति ख्यातस्तस्य पुत्रो भविष्यति ।
स वने नित्यसंवृद्धो मुनिर्वनचरः सदा ॥ ४ ॥
'त्यांनी सांगितले होते की 'मुनिवरांनो ! महर्षि कश्यपांचा विभाण्डाक नावाने एक पुत्र प्रसिद्ध आहे. त्याला एक पुत्र होईल जो लोकामध्ये ऋष्यशृंग नावाने प्रसिद्ध होईल. ते ऋष्यशृंग मुनि सदा वनातच राहतील आणि वनातच त्यांचे पालन पोषण होऊन ते मोठे होतील. ॥ ३-४ ॥
नान्यं जानाति विप्रेन्द्रो नित्यं पित्रनुवर्तनात् ।
द्वैविध्यं ब्रह्मचर्यस्य भविष्यति महात्मनः ॥ ५ ॥

लोकेषु प्रथितं राजन् विप्रैश्च कथितं सदा ।
सदा पित्याच्याच बरोबर राहिल्याने विप्रवर ऋष्यशृंग दुसर्‍या कुणाला जाणणारच नाहीत. राजन् ! लोकामध्ये ब्रह्मचर्याची दोन रूपे विख्यात आहेत, आणि ब्राह्मणांनी सदा त्या दोन्ही स्वरूपाचे वर्णन केले आहे. एक आहे दण्ड, मेखला आदि धारणरूप मुख्य ब्रह्मचर्य आणि दुसरे आहे ऋतुकालात पत्‍नी‍समागमरूप गौण ब्रह्मचर्य. त्या महात्म्याच्या द्वारा दोन्ही प्रकारच्या ब्रह्मचर्याचे पालन होईल. ॥ ५ १/२ ॥
तस्यैवं वर्तमानस्य कालः समभिवर्तत ॥ ६ ॥

अग्निं शुश्रूषमाणस्य पितरं च यशस्विनम् ।
अशा प्रकारे राहात असतांना मुनिंचा समय अग्नि आणि यशस्वी पित्याच्या सेवेमध्येच व्यतीत होईल ॥ ६ १/२ ॥
एतस्मिन्नेव काले तु रोमपादः प्रतापवान् ॥ ७ ॥

अङ्‍गेषु प्रथितो राजा भविष्यति महाबलः ।
तस्य व्यतिक्रमाद् राज्ञो भविष्यति सुदारुणा ॥ ८ ॥

अनावृष्टिः सुघोरा वै सर्वलोकभयावहा ।
त्याचवेळी अंगदेशात रोमपाद नामक एक मोठा प्रतापी आणि बलवान राजा होईल. त्याच्याकडून धर्माचे उल्लंघन झाल्यामुळे त्या देशात घोर अनावृष्टि होईल, जी सर्व लोकांना अत्यंत भयभीत करून टाकील. ॥ ७-८ १/२ ॥
अनावृष्ट्यां तु वृत्तायां राजा दुःखसमन्वितः ॥ ९ ॥

ब्राह्मणाञ्छ्रुतसंवृद्धान् समानीय प्रवक्ष्यति ।
भवन्तः श्रुतकर्माणो लोकचारित्रवेदिनः ॥ १० ॥

समादिशन्तु नियमं प्रायश्चित्तं यथा भवेत् ।
अवर्षणामुळे राजा रोमपादालाही फार दुःख होईल. शास्त्रज्ञानात पारंगत अशा ब्राह्मणांना बोलावून म्हणेल - 'विप्रवर हो ! आपण वेद शास्त्रास अनुसरून कर्म करणारे आणि लोकांचे आचार विचार जाणणारे आहात. म्हणून कृपा करून मला असा काही नियम (उपाय) सांगा की ज्यायोगे माझ्या पापाचे प्रायश्चित्त होऊन जाईल'॥ ९-१० १/२ ॥
इत्युक्तास्ते ततो राज्ञा सर्वे ब्राह्मणसत्तमाः ॥ ११ ॥

वक्ष्यन्ति ते महीपालं ब्राह्मणा वेदपारगाः ।
राजाने असे सांगितल्यावर ते वेद पारंगत विद्वान व श्रेष्ठ ब्राह्मण त्यांना अशा प्रकारे सल्ला देतील. ॥ ११ १/२ ॥
विभाण्डकसुतं राजन् सर्वोपायैरिहानय ॥ १२ ॥

आनाय्य तु महीपाल ऋष्यशृङ्‍गं सुसत्कृतम् ।
विभाण्डकसुतं राजन् ब्राह्मणं वेदपारगम् ।
प्रयच्छ कन्यां शान्तां वै विधिना सुसमाहितः ॥ १३ ॥
'राजन् ! विभाण्डकाचा पुत्र ऋष्यशृंग वेदांचा पारगामी विद्वान आहे. भूपाल ! आपण सर्व उपायांनी त्यांना येथे घेऊन यावे. त्यांना बोलावून त्यांचा उत्तम प्रकारे सत्कार करा. नंतर एकाग्रचित्त होऊन वैदिक विधिला अनुसरून त्यांच्याशी आपली कन्या शान्ता हिचा विवाह करून द्यावा.'॥ १२-१३ ॥
तेषां तु वचनं श्रुत्वा राजा चिन्तां प्रपत्स्यते ।
केनोपायेन वै शक्यमिहानेतुं स वीर्यवान् ॥ १४ ॥
त्यांचे असे म्हणणे ऐकून राजाला अशी चिंता पडली की कुठल्या उपायाने त्या शक्तिशाली महर्षिंना येथे आणता येणे शक्य होईल ? ॥ १४ ॥
ततो राजा विनिश्चित्य सह मन्त्रिभिरात्मवान् ।
पुरोहितममात्यांश्च प्रेषयिष्यति सत्कृतान् ॥ १५ ॥
नंतर ते मनस्वी नरेश मंत्र्यांशी विचार विनिमय करून आपले पुरोहित आणि मंत्री यांना सत्कारपूर्वक तेथे पाठवतील. (पाठवायचा निर्णय घेतील) ॥ १५ ॥
ते तु राज्ञो वचः श्रुत्वा व्यथिता विनताननाः ।
न गच्छेम ऋषेर्भीता अनुनेष्यन्ति तं नृपम् ॥ १६ ॥
राजाचे म्हणणे ऐकून ते मंत्री व पुरोहित चेहरा पाडून दुःखी होऊन म्हणू लागतील की - 'आम्ही महर्षिंना घाबरतो म्हणून तेथे जाणार नाही.' असे म्हणून ते राजाची न पाठवण्याबद्दल मनधरणी करतील ॥ १६ ॥
वक्ष्यन्ति चिन्तयित्वा ते तस्योपायांश्च तान् क्षमान् ।
आनेष्यामो वयं विप्रं न च दोषो भविष्यति ॥ १७ ॥
'यानंतर नीट विचार करून ते राजाला योग्य उपाय सुचवीत म्हणतील की 'आम्ही त्या ब्राह्मण कुमारास कोणत्यातरी उपायाने येथे घेऊन येऊ, व असे करण्यात कोणताही दोष घडणार नाही याची काळजी घेऊ.' ॥ १७ ॥
एवमङ्‍गाधिपेनैव गणिकाभिर्ऋषेः सुतः ।
आनीतोऽवर्षयत् देवः शान्ता चास्मै प्रदीयते ॥ १८ ॥
याप्रकारे गणिकांची सहायता घेऊन अंगराज मुनिकुमार ऋष्यशृंगाला आपल्या येथे बोलावून घेतील. त्यांचे आगमन होताच इंद्रदेव त्या राज्यांत वृष्टि करतील. नंतर राजे त्यांना आपली कन्या शान्ता समर्पित करतील. ॥ १८ ॥
ऋष्यशृङ्‍गस्तु जामाता पुत्रांस्तव विधास्यति ।
सनत्कुमारकथितमेतावद् व्याहृतं मया ॥ १९ ॥
या प्रकारे ऋष्यशृंग आपले जावई झाले. तेच आपल्यासाठी पुत्रप्राप्ति सुलभ करणार्‍या यज्ञकर्माचे संपादन करतील. ही सनत्कुमारांनी सांगितलेली कथा मी आपल्याला निवेदन केली आहे." ॥ १९ ॥
अथ हृष्टो दशरथः सुमन्त्रं प्रत्यभाषत ।
यथर्ष्यशृङ्‍गस्त्वानीतो येनोपायेन सोच्यताम् ॥ २० ॥
हे ऐकून राजा दशरथांना फार प्रसन्नता वाटली. त्यांनी सुमंत्रास म्हटले, 'मुनिकुमार ऋष्यशृंगास तेथे ज्या प्रकारे आणि ज्या उपायाने आणण्यात आले ते सर्व स्पष्ट रूपाने सांगावे.' ॥ २० ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे नवमः सर्गः ॥ ९ ॥ या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा नववा सर्ग समाप्त झाला. ॥ ९ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP