श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ षष्ठः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

कर्तव्यनिर्णयाय मंत्रिणः प्रति समुचित संमतिदानार्थं रावणस्यानुरोधः -
रावणाने कर्तव्यनिर्णयासाठी आपल्या मंत्र्यांना समुचित सल्ला देण्यासाठी अनुरोध करणे -
लङ्‌कायां तु कृतं कर्म घोरं दृष्ट्‍वा भयावहम् । राक्षसेन्द्रो हनुमता शोकेणेव महात्मना ।
अब्रवीद् राक्षसान् सर्वान् ह्रिया किञ्चिदवाङ्‌मुखः ॥ १ ॥
इकडे इंद्रतुल्य पराक्रमी महात्मा हनुमानांनी लंकेमध्ये जे अत्यंत भयावह घोर कर्म केले होते ते पाहून राक्षसराज रावणाचे मुख लज्जेने काहीसे खाली झुकले होते आणि त्याने समस्त राक्षसांना याप्रकारे म्हटले- ॥१॥
धर्षिता च प्रविष्टा च लङ्‌का दुष्प्रसहा पुरी ।
तेन वानरमात्रेण दृष्टा सीता च जानकी ॥ २ ॥
निशाचरांनो ! तो हनुमान्‌ जो केवळ एक वानरमात्र आहे, एकटा या दुर्धर्ष पुरीमध्ये घुसून आला. त्याने हिला उध्वस्त करून टाकले आणि जानकी सीतेलाही तो भेटला. ॥२॥
प्रासादो धर्षितश्चैत्यः प्रवरा राक्षसा हताः ।
आविला च पुरी लङ्‌का सर्वा हनुमता कृता ॥ ३ ॥
एवढेच नव्हे तर हनुमानाने चैत्यप्रासादाला धराशायी केले. मुख्य मुख्य राक्षसांना मारून टाकले आणि सर्व लंकापुरीमध्ये खळबळ उडवून दिली. ॥३॥
किं करिष्यामि भद्रं वः किं वा युक्तमनन्तरम् ।
उच्यतां नः समर्थं यत् कृतं च सुकृतं भवेत् ॥ ४ ॥
तुम्हांलोकांचे कल्याण होवो. मी आता काय करूं ? तुम्हांला जे कार्य उचित आणि समर्थ वाटत असेल तसेच जे केले असता काही चांगला परिणाम होईल, ते सांगावे. ॥४॥
मंत्रमूलं हि विजयं प्रवदन्ति मनस्विनः ।
तस्माद् वै रोचये मंत्रं रामं प्रति महाबलाः ॥ ५ ॥
महाबली वीरांनो ! मनस्वी पुरूषांचे सांगणे आहे की विजयाचे मूळ कारण मंत्र्यांनी दिलेला चांगला सल्लाच असते. म्हणून मी रामांविषयी तुम्हां लोकांचा सल्ला घेणे चांगले समजतो. ॥५॥
त्रिविधाः पुरुषा लोके उत्तमाधममध्यमाः ।
तेषां तु समवेतानां गुणदोषौ वदाम्यहम् ॥ ६ ॥
संसारात उत्तम, मध्यम आणि अधम तीन प्रकारचे पुरूष असतात. मी त्या सर्वांच्या गुण दोषांचे वर्णन करतो. ॥६॥
मंत्रस्त्रिभिर्हि संयुक्तः समर्थैर्मंत्रनिर्णये ।
मित्रैर्वापि समानार्थैः बान्धवैरपि वाधिकैः ॥ ७ ॥

सहितो मंत्रयित्वा यः कर्मारम्भान् प्रवर्तयेत् ।
दैवे च कुरुते यत्‍नंद तमाहुः पुरुषोत्तमम् ॥ ८ ॥
ज्याचा मंत्र पुढे सांगितल्या गेलेल्या तीन लक्षणांनी युक्त असतो तसेच जो पुरूष मंत्र निर्णय करण्यांत समर्थ मित्र, समान दु:खसुख असणारे बांधव आणि त्याहून अधिक आपल्या हितकर्त्याशी सल्ला करून कार्याला आरंभ करतो तसेच दैवाच्या आधारे प्रयत्‍न करतो त्याला उत्तम पुरूष म्हणतात. ॥७-८॥
एकोऽर्थं विमृशेदेको धर्मे प्रकुरुते मनः ।
एकः कार्याणि कुरुते तमाहुर्मध्यमं नरम् ॥ ९ ॥
जो एकटाच आपल्या कर्तव्याचा विचार करतो, एकटाच धर्मामध्ये मन लावतो आणि एकटाच सर्व काम करतो, त्याला मध्यम श्रेणीचा पुरूष म्हणले जाते. ॥९॥
गुणदोशौ न निश्चित्य त्यक्त्वा दैवव्यपाश्रयम् ।
करिष्यामीति यः कार्यं उपेक्षेत् स नराधमः ॥ १० ॥
जो गुण-दोषाचा विचार न करता, दैवाचाही आश्रय सोडून केवळ मी करीन अशा बुद्धिने कार्याचा आरंभ करतो आणि नंतर त्याची उपेक्षा करतो, तो पुरूषांमध्ये अधम आहे. ॥१०॥
यथेमे पुरुषा नित्यं उत्तमाधममध्यमाः ।
एवं मंत्रोऽपि विज्ञेय उत्तमाधममध्यमाः ॥ ११ ॥
जसे हे पुरूष सदा उत्तम, मध्यम आणि अधम तीन प्रकारचे असतात तसेच मंत्रही (निश्चित केलेला विचार) उत्तम, मध्यम आणि अधम - भेदाने तीन प्रकारचे समजले पाहिजेत. ॥११॥
ऐकमत्यमुपागम्य शास्त्रदृष्टेन चक्षुषा ।
मंत्रिणो यत्र निरताः तमाहुर्मंत्रमुत्तमम् ॥ १२ ॥
ज्यामध्ये शास्त्रोक्त दृष्टिने सर्व मंत्री एकमत होऊन प्रवृत्त होतात, त्यास उत्तम मंत्र म्हणातात. ॥१२॥
बह्वीरपि मतीर्गत्वा मंत्रिणामर्थनिर्णयः ।
पुनर्यत्रैकतां प्राप्तः स मंत्रो मध्यमः स्मृतः ॥ १३ ॥
जेथे आरंभी काही प्रकारचा मतभेद होऊन अंती सर्व मंत्रांचा कर्तव्यविषयक निर्णय एकच होऊन जातो तो मंत्र मध्यम मानला जातो. ॥१३॥
अन्योन्यं अतिमास्थाय यत्र संप्रतिभाष्यते ।
न चैकमत्ये श्रेयोऽस्ति मंत्रः सोऽधम उच्यते ॥ १४ ॥
जेथे भिन्न भिन्न बुद्धिचा आश्रय घेऊन सर्व बाजूने स्पर्धापूर्वक भाषण केले जाते आणि एकमत होऊनही ज्याच्यापासून कल्याणाची संभावना नसेल, तो मंत्र निश्चितच अधम म्हटला जातो. ॥१४॥
तस्मात् सुमंत्रितं साधु भवन्तो मतिसत्तमाः ।
कार्यं संप्रतिपद्यन्तं एतत् कृत्यं मतं मम ॥ १५ ॥
आपण सर्व लोक परम बुद्धिमान्‌ आहात, म्हणून उत्तम प्रकारे सल्ला (विचार विनिमय) करून कुठलेही एक कार्य निश्चित करावे. त्यालाच मी आपले कर्तव्य समजेन. ॥१५॥
वानराणां हि धीराणां सहस्रैः परिवारितः ।
रामोऽभ्येति पुरीं लङ्‌कां अस्माकमुपरोधकः ॥ १६ ॥
(अशा निश्चयाची आवश्यकता यासाठी उत्पन्न झाली आहे, कारण) राम हजारो धीर-वीर वानरांसह आपल्या लंकापुरीवर चढाई करण्यासाठी येत आहेत. ॥१६॥
तरिष्यति च सुव्यक्तं राघवः सागरं सुखम् ।
तरसा युक्तरूपेण सानुजः सबलानुगः ॥ १७ ॥
ही गोष्टही उत्तम प्रकारे स्पष्ट होऊन चुकली आहे की ते रघुवंशी राम आपल्या समुचित बलाच्या द्वारे भाऊ, सेना आणि सेवकांसहित सुखपूर्वक समुद्रास पार करतील. ॥१७॥
समुद्रमुच्छोषयति वीर्येणान्यत् करोति वा ।
अस्मिन् एवंविधे कार्ये विरुद्धे वानरैः सह ।
हितं पुरे च सैन्ये च सर्वं सम्मंत्र्यतां मम ॥ १८ ॥
ते एक तर समुद्रास सुकवूनच टाकतील अथवा आपल्या पराक्रमाने दुसराच कुठला उपाय करतील. अशा स्थितीमध्ये वानरांशी विरोध उत्पन्न झाल्यावर नगर आणि सेनेसाठी जे काही हितकर असेल असा सल्ला आपण लोकांनी द्यावा. ॥१८॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे षष्ठः सर्गः ॥ ६ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा सहावा सर्ग पूर्ण झाला. ॥६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP