श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ द्विषष्टितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
संपातिं सांत्वयता निशाकरेण भाविश्रीरामकार्ये साहाय्यकरणाय जीवनं धारयितुं तं प्रत्यादेशदानम् - निशाकर मुनीनी संपातिला सांत्वना देऊन त्यांना भावी श्रीरामचंद्रांच्या कार्यात सहायता करण्यासाठी जीवंत राहाण्याचा आदेश देणे -
एवमुक्त्वा मुनिश्रेष्ठं अरुदं भृशदुःखितः ।
अथ ध्यात्वा मुहूर्तं तु भगवानिदमब्रवीत् ॥ १ ॥
’वानरांनो ! त्या मुनिश्रेष्ठांना असे सांगून मी फार दुःखी होऊन विलाप करू लागलो. माझी गोष्ट ऐकून थोड्या वेळपर्यंत ध्यान करून महर्षि भगवान् निशाचर म्हणाले- ॥१॥
पक्षौ च ते प्रपक्षौ च पुनरन्यौ भविष्यतः ।
चक्षुषी चैव प्राणाश्च विक्रमश्च बलं च ते ॥ २ ॥
’संपाते ! चिंता करू नको. तुमचे लहान आणि मोठे दोन्ही प्रकारचे पंख फिरून निघून येतील, डोळेही ठीक होतील तसेच हरवलेली प्राणशक्ती, बल आणि पराक्रम सर्व परत येईल. ॥२॥
पुराणे सुमहत्कार्यं भविष्यति मया श्रुतम् ।
दृष्टं मे तपसा चैव श्रुत्वा च विदितं मम ॥ ३ ॥
’मी पुराणात पुढे होणार्‍या अनेक मोठमोठ्या कार्यांच्या गोष्टी ऐकल्या आहेत. ऐकून तपस्येच्या द्वारे मी त्या सर्व गोष्टींना प्रत्यक्ष पाहिले आणि जाणले आहे. ॥३॥
राजा दशरथो नाम कश्चिदिक्ष्वाकुवर्धनः ॥
तस्य पुत्रो महातेजा रामो नाम भविष्यति ॥ ४ ॥
’इक्ष्वाकुवंशाची कीर्ति वाढविणारा कुणी दशरथ नावाचा प्रसिद्ध राजा होईल. त्यांना एक महातेजस्वी पुत्र होईल, जो राम नामाने प्रसिद्ध होईल. ॥४॥
अरण्यं च सह भ्रात्रा लक्ष्मणेन गमिष्यति ।
अस्मिन्नर्थे नियुक्तः सन् पित्रा सत्यपराक्रमः ॥ ५ ॥
’सत्यपराक्रमी श्रीराम आपली पत्‍नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह वनात जातील, यासाठी त्यांना पित्याकडून आज्ञा प्राप्त होईल. ॥५॥
नैर्‌ऋतो रावणो नाम तस्य भार्यां हरिष्यति ।
राक्षसेंद्रो जनस्थाने अवध्यः सुरदानवैः ॥ ६ ॥
’वनवास-काळात जनस्थानात राहाते वेळी त्यांची पत्‍नी सीता हिला राक्षसांचा राजा रावण नामक असुर हरण करून घेऊन जाईल. तो देवता आणि दानव यांना ही अवध्य असेल. ॥६॥
सा च कामैः प्रलोभ्यंती भक्ष्यैर्भोज्यैश्च मैथिली ।
न भोक्ष्यति महाभागा दुःखमग्ना यशस्विनी ॥ ७ ॥
’मैथिली सीता फारच यशस्विनी आणि सौभाग्यवती होईल. जरी राक्षसांकडून तिला तर्‍हेतर्‍हेचे भोग आणि भक्ष्य-भोज्य आदि पदार्थांचे प्रलोभन दिले जाईल. तथापि ती त्यांचा स्वीकार करणार नाही आणि निरंतर आपल्या पतिसाठी चिंतित होऊन दुःखात मग्न होऊन राहील. ॥७॥
परमान्नं तु वैदेह्या ज्ञात्वा दास्यति वासवः ।
यदन्नममृतप्रख्यं सुराणामपि दुर्लभम् ॥ ८ ॥
’सीता राक्षसांचे अन्न ग्रहण करीत नाही - हे माहीत झाल्यावर देवराज इंद्र तिच्यासाठी अमृतासमान खीर, जी देवतांनाही दुर्लभ आहे, तिला निवेदन करील. ॥८॥
तदन्नं मैथिली प्राप्य विज्ञायेंद्रादिदं त्विति ।
अग्रमुधृत्य रामाय भूतले निर्वपिष्यति ॥ ९ ॥
’ते अन्न इंद्राद्वारे दिले गेलेले जाणून जानकी ते स्वीकारील आणि सर्वात प्रथम त्यांतून अग्रभाग काढून श्रीरामांच्या उद्देश्याने पृथ्वीवर ठेवून त्यांना अर्पण करील. ॥९॥
यदि जीवति मे भर्ता लक्ष्मणो वापि देवरः ।
देवत्वं गच्छतोर्वापि तयोरन्नमिदं त्विति ॥ १० ॥
’त्या समयी ती या प्रकारे म्हणेल- ’माझे पति भगवान् श्रीराम तसेच दीर लक्ष्मण जर जीवित असतील अथवा देवभावास प्राप्त झाले असतील, हे अन्न त्यांच्यासाठी समर्पित आहे. ॥१०॥
एष्यंति प्रेषितास्तत्र रामदूताः प्लवंगमाः ।
आख्येया राममहिषी त्वया तेभ्यो विहङ्‌गपम ॥ ११ ॥
’संपाते ! रामांनी पाठविलेले त्यांचे दूत वानर येथे सीतेचा शोध घेत येतील. त्यांना तू श्रीरामांच्या महाराणी सीतेचा पत्ता सांग. ॥११॥
सर्वथा तु न गंतव्यं ईदृशः क्क गमिष्यसि ।
देशकालौ प्रतीक्षस्व पक्षौ त्वं प्रतिपत्स्यसे ॥ १२ ॥
’येथून कुठल्याही प्रकारे दुसर्‍या जागी कधी जाऊ नको. अशा स्थितिमध्ये तू जाशील तरी कोठे ! देश आणि काळ यांची प्रतीक्षा कर. तुला नंतर नवीन पंख प्राप्त होतील. ॥१२॥
नोत्सहेयमहं कर्तुं अद्यैव त्वां सपक्षकम् ।
इहस्थस्त्वं तु लोकानां हितं कार्यं करिष्यसि ॥ १३ ॥
’जरी मी आजही तुला पंखयुक्त करू शकतो, तरीही तू येथेच राहिलास तर संसारासाठी हितकर कार्य करू शकशील म्हणून मी तसे करीत नाहीत. ॥१३॥
त्वयापि खलु तत् कार्यं तयोश्च नृपपुत्रयोः ।
ब्राह्मणानां गुरूणां च मुनीनां वासवस्य च ॥ १४ ॥
’तूही त्या दोन्ही राजकुमारांची त्यांच्या कार्यात सहायता कर. ते कार्य केवळ त्यांचेच नाही. समस्त ब्राह्मण गुरूजन, मुनी आणि देवराज इंद्रांचेही आहे. ॥१४॥
इच्छाम्यहमपि द्रष्टुं भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।
नेच्छे चिरं धारयितुं प्राणांस्त्यक्ष्ये कलेवरम् ।
महर्षिस्त्वब्रवीदेवं दृष्टतत्त्वार्थदर्शनः ॥ १५ ॥
’जरी मी त्या दोघा भावांचे दर्शन करू इच्छितो, तरी अधिक काळपर्यंत या प्राणांना धारण करण्याची इच्छा नाही आहे. म्हणून तो समय येण्यापूर्वीच मी प्राणांचा त्याग करीन.’ असे त्या तत्वदर्शी महर्षिनी मला सांगितले होते.’ ॥१५॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे द्विषष्टितमः सर्गः ॥ ६२ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायणा आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा बासष्टावा सर्ग पूरा झाला. ॥६२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP