श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ पञ्चदशाधिकशततमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

सीतायाश्चरित्रं संदिह्य तामनङ्‌गीकृत्य श्रीरामेण तां प्रत्यन्यत्र कुत्रापि गन्तुमादेशदानम् -
सीतेच्या चारित्रावर संदेह करून श्रीरामांनी तिचे ग्रहण करण्यास नकार देणे आणि तिला अन्यत्र जाण्यास सांगणे -
तां तु पार्श्वस्थितां प्रह्वां रामः सम्प्रेक्ष्य मैथिलीम् ।
हृदयान्तर्गतं भावं व्याहर्तुमुपचक्रमे ।। १ ।।
मैथिली सीतेला विनयपूर्वक आपल्या समीप उभी असलेली पाहून श्रीरामांनी आपला हार्दिक अभिप्राय सांगण्यास आरंभ केला - ॥१॥
एषासि निर्जिता भद्रे शत्रुं जित्वा रणाजिरे ।
पौरुषाद् यदनुष्ठेयं मयैतदुतपादितम् ।। २ ।।
भद्रे ! समरांगणात शत्रुला पराजित करून मी तुला त्याच्या तावडीतून सोडवले आहे. पुरुषार्थाच्या द्वारा जे काही करणे शक्य होते ते सर्व मी केले आहे. ॥२॥
गतोऽस्म्यन्तममर्षस्य धर्षणा सम्प्रमार्जिता ।
अवमानश्च शत्रुश्च युगपन्निहतो मया ।। ३ ।।
आता माझ्या अमर्षाचा अंत झाला आहे. माझ्यावर जो कलंक लागला होता त्याचे मी मार्जन केले आहे. शत्रुजनित अपमान आणि शत्रु दोघांना एकदमच नष्ट करून टाकले आहे. ॥३॥
अद्य मे पौरुषं दृष्टं अद्य मे सफलः श्रमः ।
अद्य तीर्णप्रतिज्ञोऽहं प्रभवाम्यद्य चात्मनः ।। ४ ।।
आज सर्वांनी माझा पराक्रम पाहिला आहे. आता माझे परिश्रम सफल झाले आहेत आणि या समयी मी प्रतिज्ञा पूर्ण करून तिच्या भारांतून मुक्त आणि स्वतंत्र झालो आहे. ॥४॥
या त्वं विरहिता नीता चलचित्तेन रक्षसा ।
दैवसम्पादितो दोषो मानुषेण मया जितः ।। ५ ।।
जेव्हा तू आश्रमात एकटी होतीस त्यासमयी तो चञ्चल चित्त असलेला राक्षस तुझे हरण करून तुला घेऊन गेला. हा दोष माझ्यावर दैववश प्राप्त झाला होता, ज्याचे मी मानवसाध्य पुरुषार्थाच्या द्वारा मार्जन केले आहे. ॥५॥
सम्प्राप्तमवमानं यः तेजसा न प्रमार्जति ।
कस्तस्य पौरुषेणार्थो महताप्यल्पतेजसः ।। ६ ।।
जो पुरुष प्राप्त झालेल्या अपमानाचे आपल्या तेजाने अथवा बळाने मार्जन करत नाही, त्या मंदबुद्धि मानवाच्या महान्‌ पुरुषार्थाने ही काय लाभ झाला ? ॥६॥
लङ्‌घनं च समुद्रस्य लङ्‌कायाश्चापि मर्दनम् ।
सफलं तस्य च श्लाघ्यं अद्य कर्म हनूमतः ।। ७ ।।
हनुमानांनी जे समुद्रोल्लंघन केले आणि लंकेचा विध्वंस केला त्यांचे ते प्रशंसनीय कर्म आज सफल झाले आहे. ॥७॥
युद्धे विक्रमतश्चैव हितं मन्त्रयतस्तथा ।
सुग्रीवस्य ससैन्यस्य सफलोऽद्य परिश्रमः ।। ८ ।।
सेनासहित सुग्रीवांनी युद्धात पराक्रम दाखविला तसेच वेळोवेळा ते मला हितकर सल्ला देत राहिले आहेत त्यांचे ते परिश्रमही आता सार्थक झाले आहेत. ॥८॥
विभीषणस्य च तथा सफलोऽद्य परिश्रमः ।
विगुणं भ्रातरं त्यक्त्वा यो मां स्वयमुपस्थितः ।। ९ ।।
हे विभीषण दुर्गुणांनी भरलेल्या आपल्या भावाचा परित्याग करून स्वतःच माझ्याजवळ उपस्थित झाले होते. आत्तापर्यंत त्यांनी केलेले परिश्रमही निष्फळ झाले नाहीत. ॥९॥
इत्येवं वदतः श्रुत्वा सीता रामस्य तद् वचः ।
मृगीवोत्फुल्लनयना बभूवाश्रुपरिप्लुता ।। १० ।।
याप्रकारे सांगत असलेल्या श्रीरामांचे म्हणणे ऐकून मृगीसमान विकसित नेत्र असणार्‍या सीतेच्या डोळ्यात अश्रु दाटून आले. ॥१०॥
पश्यतस्तां तु रामस्य समीपे हृदयप्रियाम् ।
जनवादभयाद् राज्ञो बभूव हृदयं द्विधा ।। ११ ।।
ती आपल्या स्वामीची हृदयवल्लभा होती. तिचे प्राणवल्लभ तिला आपल्या समीप पहात होते, परंतु लोकापवादाच्या भयाने राजा श्रीरामांचे हृदय त्यासमयी विदीर्ण होत होते. ॥११॥
सीतामुत्पलपत्राक्षीं नीलकुञ्चितमूर्धजाम् ।
अवदद् वै वरार्हां मध्ये वानररक्षसाम् ।। १२ ।।
ते काळे भोर कुरळे केस असलेल्या कमललोचना सुंदरी सीतेला, वानर आणि राक्षसांनी भरलेल्या सभेत पुन्हा याप्रकारे सांगू लागले - ॥१२॥
यत् कर्तव्यं मनुष्येण धर्षणां प्रतिमार्जता ।
तत् कृतं रावणं हत्वा मयेदं मानकाङ्‌क्षिणा ।। १३ ।।
आपल्या तिरस्काराचा बदला घेण्यासाठी मनुष्याचे जे कर्तव्य आहे ते सर्व मी आपल्या मानरक्षणाच्या अभिलाषेने रावणाचा वध करून पूर्ण केले आहे. ॥१३॥
निर्जिता जीवलोकस्य तपसा भावितात्मना ।
अगस्त्येन दुराधर्षा मुनिना दक्षिणेव दिक् ।। १४ ।।
जसे तपस्येने भावित आंतःकरणाच्या अथवा तपस्यापूर्वक परमात्मस्वरूपाचे चिंतन करणार्‍या महर्षि अगस्त्यांनी वातापि आणि इत्वल यांच्या भयाने जीव-जगतासाठी दुर्गम झालेल्या दक्षिण दिशेला जिंकले होते त्याच प्रकारे रावणाच्या ताब्यात सांपडलेल्या तुला मी जिंकले आहे. ॥१४॥
विदितश्चास्तु भद्रं ते योऽयं रणपरिश्रमः ।
सुतीर्णः सुहृदां वीर्यान् न त्वदर्थं मया कृतः ।। १५ ।।
तुझे कल्याण होवो ! तुला समजणे आवश्यक आहे की मी जे हे युद्धाचे परिश्रम केले आहेत तसेच या मित्रांच्या पराक्रमाने जो यात विजय प्राप्त केला आहे, हे सर्व तुला प्राप्त करण्यासाठी केले गेलेले नाही. ॥१५॥
रक्षता तु मया वृत्तं अपावादं च सर्वशः ।
प्रख्यातस्यात्मवंशस्य न्यङ्‌गं च परिमार्जता ।। १६ ।।
सदाचाराचे रक्षण, सर्वत्र पसरलेल्या अपवादाचे निवारण तसेच आपल्या सुविख्यात वंशावर लागलेल्या कलंकाचे परिमार्जन करण्यासाठी मी हे सर्व केले आहे. ॥१६॥
प्राप्तचारित्रसन्देहा मम प्रतिमुखे स्थिता ।
दीपो नेत्रातुरस्येव प्रतिकूलासि मे दृढा ।। १७ ।।
तुझ्या चरित्रात संदेहाचा अवसर उपस्थित झाला आहे आणि तरी तू माझ्या समोर उभी राहिली आहेस. जसे डोळ्याच्या रोग्याला दीपकाची ज्योत आवडत नाही त्याच प्रकारे आज तू मला अत्यंत अप्रिय वाटत आहेस. ॥१७॥
तद् गच्छ त्वानुजानेऽद्य यथेष्टं जनकात्मजे ।
एता दश दिशो भद्रे कार्यमस्ति न मे त्वया ।। १८ ।।
म्हणून जनककुमारी ! तुझी जेथे इच्छा असेल तिकडे निघून जा. मी माझ्याकडून तुला अनुमति देत आहे. भद्रे ! ह्या दाही दिशा तुझ्यासाठी मोकळ्या आहेत. आता तुझ्याशी मला काहीही प्रयोजन नाही. ॥१८॥
कः पुमान् हि कुले जातः स्त्रियं परगृहोषिताम् ।
तेजस्वी पुनरादद्यात् सुहृल्लोभेन चेतसा ।। १९ ।।
असा कोण कुलीन पुरुष असेल, जो तेजस्वी असूनही दुसर्‍याच्या घरात राहिलेल्या स्त्रीचे केवळ ही माझ्याबरोबर बरेच दिवस राहून सौहार्द स्थापित करून चुकली आहे या लोभाने तिचे मनानेही ग्रहण करू शकेल ? ॥१९॥
रावणाङ्‌कपरिक्लिष्टां दृष्टां दुष्टेन चक्षुषा ।
कथं त्वां पुनरादद्यां कुलं व्यपदिशन् महत् ।। २० ।।
रावणाने तुला आपल्या मांडीवर उचलून घेऊन तुला उचलून नेले होते आणि तो तुझ्यावर आपली दूषित दृष्टि टाकून चुकला आहे, अशा स्थितिमध्ये आपल्या कुळाला महान्‌ म्हणविणारा मी तुझे परत ग्रहण कसे करू शकतो ? ॥२०॥
यदर्थं निर्जिता मे त्वं सोऽयमासादितो मया ।
नास्ति मे त्वय्यभिष्वङ्‌गो यथेष्टं गम्यतामिति ।। २१ ।।
म्हणून ज्या उद्देश्याने मी तुला जिंकले होते तो सिद्ध झाला आहे. माझ्या कुळाच्या कलंकाचे मार्जन झाले आहे. आता माझी तुझ्याप्रति ममता अथवा आसक्ति नाही आहे म्हणून तू जिकडे जाऊ इच्छित असशील तिकडे जाऊ शकतेस. ॥२१॥
तदद्य व्याहृतं भद्रे मयैतत् कृतबुद्धिना ।
लक्ष्मणे वाथ भरते कुरु बुद्धिं यथासुखम् ।। २२ ।।
भद्रे ! हा माझा निश्चित विचार आहे. याला अनुसरून आज मी तुझ्या समोर या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. तू वाटल्यास भरत अथवा लक्ष्मणाच्या संरक्षणात सुखपूर्वक राहाण्याचा विचार करू शकतेस. ॥२२॥
शत्रुघ्ने वाथ सुग्रीवे राक्षसे वा विभीषणे ।
निवेशय मनः सीते यथा वा सुखमात्मना ।। २३ ।।
सीते ! तुझी इच्छा असेल तर तू शत्रुघ्न, वानरराज सुग्रीव अथवा राक्षसराज विभीषण यांच्याजवळही राहू शकतेस. जेथे तुला सुख मिळेल तेथेच आपले मन लाव. ॥२३॥
न हि त्वां रावणो दृष्ट्‍वा दिव्यरूपां मनोरमाम् ।
मर्षयेत चिरं सीते स्वगृहे पर्यवस्थिताम् ।। २४ ।।
सीते ! तुझ्यासारख्या दिव्यरूप - सौन्दर्याने सुशोभित मनोरम नारीला आपल्या घरात स्थित पाहून रावण चिरकालपर्यंत तुझ्यापासून दूर राहाण्याचे कष्ट सहन करू शकला नसेल. ॥२४॥
ततः प्रियार्हश्रवणा तदप्रियं
प्रियादुपश्रुत्य चिरस्य मानिनी ।
मुमोच बाष्पं रुदती तदा भृशं
गजेन्द्रहस्ताभिहतेव वल्लरी ।। २५ ।।
जी सदा प्रिय वचन ऐकण्यास योग्य होती, ती मानिनी सीता चिरकालानंतर भेटलेल्या प्रियतमाच्या मुखाने असे अप्रिय वचन ऐकून त्या समयी हत्तीच्या सोंडेने आहत झालेल्या लतेसमान अश्रु ढाळू लागली आणि रडू लागली. ॥२५॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे पञ्चदशाधिकशततमः सर्गः ।। ११५ ।।
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकशेंपंधरावा सर्ग पूरा झाला. ॥११५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP