॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ किष्किन्धाकाण्ड ॥

॥ पंचमः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]भगवान श्रीरामांचा शोक आणि लक्ष्मणाचे किष्किंधापुरीत गमन -


रामस्तु पर्वतस्याग्रे मणिसानौ निशामुखे ।
सीताविरहजं शोकं असहन् इदमब्रवीत् ॥ १ ॥
श्रीमहादेव म्हणाले - हे पार्वती, एकदा संध्याकाळच्या वेळी प्रवर्ष्ण पर्वताच्या माथ्यावरील रत्‍नशिखरावर राम बसले असताना त्यांना सीतेच्या विरहाने झालेला शोक असह्य झाला आणि ते असे म्हणू लागले. (१)

पश्य लक्ष्मण मे सीता राक्षसेन हृता बलात् ।
मृतामृता वा निश्चेतुं न जानेऽद्यापि भामिनीम् ॥ २ ॥
"लक्ष्मणा, पाहा. एका राक्षसाने बळजबरीने माझ्या सीतेला हरण करून नेले आहे. ती भामिनी जिवंत आहे की मेली हेसुद्धा मला अद्यापि काही कळलेले नाही. (२)

जीवतीति मम ब्रूयात् कश्चिद्वा प्रियकृत्स मे ।
यदि जानामि तां साध्वीं जीवंतीं यत्र कुत्र वा ॥ ३ ॥
हठादेवाहरिष्यामि सुधामिव पयोनिधेः ।
प्रतिज्ञां शृणु मे भ्रातः येन मे जनकात्मजा ॥ ४ ॥
नीता तं भस्मसात्कुर्यां सपुत्रबलवाहनम् ।
हे सीते चन्द्रवदने वसन्ती राक्षसालये ॥ ५ ॥
दुःखार्त्ता मामपश्यन्ती कथं प्राणान् धरिष्यसि ।
चन्द्रोऽपि भानुवद्‌भाति मम चन्द्राननां विना ॥ ६ ॥
'ती जिवंत आहे' असे जर मला कुणी तरी सांगेल तर माझ्यावर उपकार होतील. ती साध्वी कुठे तरी जिवंत आहे, असे जर मला कळले तर ज्याप्रमाणे प्रयत्‍नपूर्वक समुद्रातून अमृत काढले गेले, त्याप्रमाणे मी प्रयत्‍नपूर्वक तिला निश्चित परत आणीन. हे बंधो, माझी प्रतिज्ञा ऐक. ज्याने माझी जानकी पळवून नेली आहे, त्याचे पुत्र, सैन्य आणि वाहने यासकट मी त्याला भस्मसात करून टाकीन. हे चंद्रवदने सीते, तुला मी दिसत नसल्यामुळे दुःखार्त झालेली तू राक्षसाच्या घरी कशी बरे जिवंत राहात असशील ? चंद्रमुखी सीतेशिवाय हा चंद्रसुद्धा मला सूर्याप्रमाणे तापदायक वाटत आहे. ३-६

चन्द्र त्वं जानकीं स्पृष्ट्‍वा करैर्मां स्पृश शीतलैः ।
सुग्रीवोऽपि दयाहीनो दुःखितं मां न पश्यति ॥ ७ ॥
अरे चंद्रा, तू प्रथम तुझ्या शीतल किरणांनी जानकीला स्पर्श करून मग मला स्पर्श कर. सुग्रीवसुद्धा निर्दय झाला आहे. कारण तो मी दुःखी असतानाही माझ्याकडे पाहात नाही. (७)

राज्यं निष्कण्टकं प्राप्य स्त्रीभिः परिवृतो रहः ।
कृतघ्नो दृश्यते व्यक्तं पानासक्तोऽतिकामुकः ॥ ८ ॥
निष्कंटक राज्य प्राप्त झाल्यावर, मद्यपानात आसक्त झालेला आणि एकांतात स्त्रियांनी वेढलेला तो अतिशय कामुक वानर नक्कीच कृतघ्न झाला आहे, असे स्पष्ट दिसते. (८)

नायाति शरदं पश्यन् अपि मार्गयितुं प्रियाम् ।
पूर्वोपकारिणं दुष्टः कृतघ्नो विस्मृतो हि माम् ॥ ९ ॥
शरद क्रतू आलेला असूनसुद्धा तो माझ्या प्रियेच्या शोधासाठी येत नाही. मी पूर्वी त्याच्यावर उपकार केला आहे. परंतु तो दुष्ट कृतघ्न होऊन मला विसरून गेलेला आहे. (९)

हन्मि सुग्रीवमप्येवं सपुरं सहबान्धवम् ।
वाली यथा हतो मेऽद्य सुग्रीवोऽपि तथा भवेत् ॥ १० ॥
सुग्रीवालासुद्धा मी नगरी आणि बांधव यांच्यासह नष्ट करीन. वालीला ज्याप्रमाणे मी ठार केले त्या प्रमाणे सुग्रीवसुद्धा आता माझ्याकडून मारला जाईल. " (१०)

इति रुष्टं समालोक्य राघवं लक्ष्मणोऽब्रवीत् ।
इदानीमेव गत्वाहं सुग्रीवं दुष्टमानसम् ॥ ११ ॥
मामाज्ञापय हत्वा तं आयास्ये राम तेऽन्तिकम् ।
इत्युक्‍त्वा धनुरादाय स्वयं तूणीरमेव च ॥ १२ ॥
गन्तुमभ्युद्यतं वीक्ष्य रामो लक्ष्मणमब्रवीत् ।
न हन्तव्यस्त्वया वत्स सुग्रीवो मे प्रियः सखा ॥ १३ ॥
अशा प्रकारे राघव रागावलेले आहेत हे पाहून लक्ष्मण त्यांना म्हणाला, "दादा, तुम्ही मला आज्ञा द्या. आत्ताच जाऊन त्या दुष्ट सुग्रीवाला ठार करून मी परत येतो." असे बोलून, धनुष्य व भाता घेऊन, स्वतःच जाण्यास तयार झालेल्या लक्ष्मणाला पाहून श्रीराम म्हणाले, वत्सा, सुग्रीव हा माझा प्रिय मित्र आहे. तू त्याला ठार करणे योग्य नव्हे. (११-१३)

किन्तु भीषय सुग्रीवं वालिवत्त्वं हनिष्यसे ।
इत्युक्‍त्वा शीघ्रमादाय सुग्रीवप्रतिभाषितम् ॥ १४ ॥
आगत्य पश्चाद्यत्कार्यं तत्करिष्याम्यसंशयम् ।
तथेति लक्ष्मणोऽगच्छत् त्वरितो भीमविक्रमः ॥ १५ ॥
तथापि 'वालीप्रमाणे तूसुद्धा मारला जाशील' असे सांगून त्या सुग्रीवाला तू भीती घाल. मग सुग्रीवाचे उत्तर घेऊन लगेच तू परत ये. त्यानंतर जे काही करावयाचे आहे, ते मी निश्चितपणे करीन. 'ठीक आहे' असे म्हणून महान पराक्रमी लक्ष्मण त्वरित किष्किंधा नगरीला गेला. त्या वेळी तो रागाने जणू सर्व वानरांना जाळून टाकील की काय असे वाटले. (१४-१५)

किष्किन्धां प्रति कोपेन निर्दहन्निव वानरान् ।
सर्वज्ञो नित्यलक्ष्मीको विज्ञानात्मापि राघवः ॥ १६ ॥
सीतामनुशुशोचार्त्तः प्राकृतः प्राकृतामिव ।
बुद्‍ध्यादिसाक्षिणस्तस्य मायाकार्यातिवर्तिनः ॥ १७ ॥
रागादिरहितस्यास्य तत्कार्यं कथमुद्‌भवेत् ।
ब्रह्मणोक्तमृतं कर्तुं राज्ञो दशरथस्य हि ॥ १८ ॥
तपसः फलदानाय जतो मानुषवेषधृक् ।
मायया मोहितां सर्वे जना अज्ञानसंयुताः ॥ १९ ॥
कथमेषां भवेन्मोक्ष इति विष्णुर्विचिन्तयन् ।
कथां प्रथयितुं लोके सर्वलोकमलापहाम् ॥ २० ॥
रामायणाभिधां रामो भूत्वा मानुषचेष्टकः ।
क्रोधं मोहं च कामं च व्यवहारार्थसिद्धये ॥ २१ ॥
तत्तत्कालोचितं गृह्णन् मोहवत्यवशाः प्रजाः ।
अनुरक्त इवाशेष गुणेषु गुणवर्जितः ॥ २२ ॥
श्रीमहादेव म्हणाले - वस्तुत: राघव हे सर्वज्ञ आहेत; लक्ष्मी ही नित्य त्यांच्याजवळ असते. विज्ञान हे त्यांचे स्वरूप आहे. असे असूनसुद्धा एखाद्या सामान्य स्त्रीसाठी तिच्या वियोगाने दुःखी झालेल्या एखाद्या सामान्य माणसाने शोक करावा, त्या प्रमाणे दुःखी श्रीराम सीतेसाठी शोक करीत होते. खरे म्हणजे बुद्धी इत्यादीचे साक्षी असणारे, मायेच्या कार्यांच्या पलीकडे असणारे आणि राग, द्वेष इत्यादींनी रहित अशा त्या श्रीरामांच्या ठायी राग इत्यादीपासून उद्‌भवणारे शोकरूपी कार्य कसे बरे उद्‌भवेल ? तथापि ब्रह्मदेवांचे शब्द खरे करण्यासाठी आणि दशरथाला तपस्येचे फळ देण्यासाठी श्रीरामांनी मनुष्य रूप धारण केले होते. 'सर्व लोक मायेने मोहित होऊन अज्ञानाने युक्त झाले आहेत; त्यांना कसा बरे मोक्ष मिळेल ?' असा विचार ते विष्णू करीत असताना, सर्व लोकांचे पाप हरण करणारी, रामायण नावाची आपली कथा या जगात पसरविण्यासाठी, ते रामरूप झाले आणि माणसाप्रमाणे क्रिया करीत, व्यवहारातील गोष्टी सिद्ध करण्यासाठी, त्या त्या वेळी उचित असणारे क्रोध, मोह, आणि काम हे विकार स्वीकारून ते मायासक्त जीवांना मनुष्य असल्याचे भासवीत होते. खरे म्हणजे ते जरी सर्व गुणांत आसक्त असल्याप्रमाणे दिसत असले, तरी ते सर्व गुणांनी रहित असेच आहेत. (१६-२२)

विज्ञानमूर्तिर्विज्ञान शक्तिः साक्ष्यगुणान्वितः ।
अतः कामादिभिर्नित्यं अविलिप्तो यथा नभः ॥ २३ ॥
विज्ञान हे त्यांचे स्वरूप आहे. विज्ञान ही त्यांची शक्ती आहे. ते साक्षी असून गुणांनी युक्त नाहीत. म्हणून ते काम इत्यादी विकारांनी कधीही आकाशाप्रमाणे लिप्त होत नाहीत. (२३)

विन्दन्ति मुनयः केचित् जानन्ति जनकादयः ।
तद्‌भक्ता निर्मलात्मानः सम्यक् जानन्ति नित्यदा ।
भक्तचित्तानुसारेण जायते भगवानजः ॥ २४ ॥
त्यांचे खरेखुरे स्वरूप काही मुनिजन जाणतात, जनक इत्यादी राजर्षी जाणतात, तसे च निर्मल अंतःकरणाचे त्यांचे भक्त नेहमी योग्यप्रकारे जाणतात. ते जन्मरहित भगवान भक्तांच्या इच्छेनुसार (अवतार रूपाने) जन्माला येतात. (२४)

लक्ष्मणोपि तदा गत्वा किष्किन्धानगरान्तिकम् ।
ज्याघोषं अरोत्तीव्रं भीषयन् सर्ववानरान् ॥ २५ ॥
इकडे लक्ष्मणसुद्धा त्या वेळी किष्किंधा नगरीच्या जवळ गेला, आणि सर्व वानरांचे ठायी भीती निर्माण करीत त्याने आपल्या धनुष्याच्या प्रत्यंचेचा भयंकर टणत्कार केला. (२५)

तं दृष्ट्‍वा प्राकृतास्तत्र वानरा वप्रमूर्धनि ।
चक्रुः किलकिलाशब्दं धृतपाषाणपादपाः ॥ २६ ॥
त्या वेळी तेथे नगराच्या तटबंदीवर असणारे सामान्य वानर लक्ष्मणाला पाहून, हातात दगड व वृक्ष घेऊन कलकलाट करू लागले. (२६)

तान्दृष्ट्‍वा क्रोधताम्राक्षो वानरान् लक्ष्मणस्तदा ।
निर्मूलान्कर्तुमुद्युक्तो धनुरानम्य वीर्यवान् ॥ २७ ॥
त्या वानरांना पाहून त्या वेळी लक्ष्मणाचे डोळे क्रोधाने लाल बुंद झाले. आणि तो पराक्रमी लक्ष्मण धनुष्य ताणून त्यांना समूळ नष्ट करण्यास सिद्ध झाला. (२७)

ततः शीघ्रं समाप्लुत्य ज्ञात्वा लक्ष्मणमागतम् ॥ २८ ॥
निर्वाय वानरान् सर्वान् अङ्‌गदो मंत्रिसत्तमः ।
गत्वा लक्ष्मणसामीप्यं प्रणनाम स दण्डवत् ॥ २९ ॥
लक्ष्मण आला आहे हे कळल्यावर, मंत्रिश्रेष्ठ अंगद हा झटदिशी उडी मारून तेथे आला. त्याने सर्व वानरांना रोखले आणि लक्ष्मणाचेजवळ जाऊन त्याने त्याला दंडवत प्रणाम केला. (२८-२९)

ततो अङ्‌गदं परिष्वज्य लक्ष्मणः प्रियवर्धनः ।
उवाच वत्स गच्छ त्वं पितृव्याय न्यवेदय ॥ ३० ॥
मां आगतं राघवेण चोदितं रौद्रमूर्तिना ।
तथेति त्वरितं गत्वा सुग्रीवाय न्यवेदयत् ॥ ३१ ॥
त्यानंतर लक्ष्मणाने अंगदाला प्रेमाने आलिंगन दिले आणि त्याला म्हटले, "वत्सा, तू लगेच जा आणि तुझ्या काकाला, सुग्रीवाला सांग की तुझ्यावर अतिशय क्रुद्ध झालेल्या श्रीराघवांच्या सांगण्यावरून मी लक्ष्मण येथे आलो आहे". 'ठीक आहे' असे म्हणून अंगद त्वरित परत गेला आणि त्याने सुग्रीवाला निरोप सांगितला. (३०-३१)

लक्ष्मणः क्रोधताम्राक्षः पुरद्वारिबहिः स्थितः ।
तच्छ्रुत्वातीव सन्त्रस्तः सुग्रीवो वानरेश्वरः ॥ ३२ ॥
तो म्हणाला, "क्रोधाने डोळे लाल झालेला लक्ष्मण बाहेर नगराच्या दाराशी उभा आहे." ते ऐकून वानरांचा राजा सुग्रीव अतिशय भयभीत झाला. (३२)

आहूय मंत्रिणां श्रेष्ठं हनूमन्तं अथाब्रवीत् ।
गच्छ त्वं अङ्‌गदेनाशु लक्ष्मणं विनयान्वितः ॥ ३३ ॥
सान्त्वयन्कोपितं वीरं शनैरानय सादरम् ।
प्रेषयित्वा हनूमन्तं तारामाह कपीश्वरः ॥ ३४ ॥
मग मंत्र्यांमधील श्रेष्ठ अशा हनुमंताला बोलावून घेऊन तो त्याला म्हणाला "अंगदाबरोबर तू ताबडतोब लक्ष्मणाजवळ जा आणि विनयपूर्वक बोलून सावकाशपणे त्या रागावलेल्या वीर लक्ष्मणाला शांत कर, आणि आदरपूर्वक त्याला इकडे घेऊन ये." अशा प्रकारे हनुमंताला पाठवून देऊन, वानरांचा राजा सुग्रीव तारेला म्हणाला. (३३-३४)

त्वं गच्छ सान्त्वयन्ती तं लक्ष्मणं मृदुभाषितैः ।
शान्तमन्तःपुरं नीत्वा पश्चाद्दर्शय मेऽनघे ॥ ३५ ॥
"हे तारे, तूही जा आणि तुझ्या मधुर वचनांनी लक्ष्मणाला शांत कर आणि मग तो शांत झाल्यावर त्याला अंतःपुरात आण आणि मला भेटव." (३५)

भवत्विति ततस्तारा मध्यकक्षं समाविशत् ।
हनुमानङ्‌गदेनैव सहितो लक्ष्मणान्तिकम् ॥ ३६ ॥
गत्वा ननाम शिरसा भक्‍त्या स्वागतमब्रवीत् ।
एहि वीर महाभाग भवद्‍गृहमशङ्‌कितम् ॥ ३७ ॥
प्रविश्य राजदारादीन् दृष्ट्‍वा सुग्रीवमेव च ।
यदाज्ञापयसे पश्चात् तत्सर्वं करवाणि भोः ॥ ३८ ॥
"ठीक आहे" असे म्हणून त्यानंतर ताराही राजवाड्याच्या मधल्या दालनात येऊन थांबली. इकडे अंगदाबरोबर हनुमान लक्ष्मणाजवळ गेला आणि मस्तक नमवून त्याने त्याला भक्तिपूर्वक प्रणाम केला. लक्ष्मणाचे स्वागत करून तो म्हणाला "हे महाभागा वीरा, निःशंकपणे ये. हे तुझेच घर आहे. आत येऊन, राजस्त्रियांना भेटून मग सुग्रीवाला भेट. अरे वीरा, तू जी आज्ञा करशील त्याप्रमाणे सर्व काही आम्ही करू." (३६-३८)

इत्युक्‍त्वा लक्ष्मणं भक्‍त्या करे गृह्य स मारुतिः ।
आनयामास नगर-मध्याद्राजगृहं प्रति ॥ ३९ ॥
असे बोलून हनुमानाने भक्तीने लक्ष्मणाचा हात धरला आणि त्याला नगरातून राजवाडयाकडे आणले. (३९)

पश्यन् तत्र महासौधान् यूथपानां समन्ततः ।
जगाम भवनं राज्ञः सुरेन्द्रभवनोपमम् ॥ ४० ॥
त्या नगरीत सगळीकडे वानरनायकांचे भव्य प्रासाद पाहात पाहात लक्ष्मण इंद्रभवनाप्रमाणे सुंदर असणार्‍या त्या राजभवनात पोचला. (४०)

मध्यकक्षे गता तत्र तारा ताराधिपानना ।
सर्वाभरणसम्पन्न मदरक्तान्तलोचना ॥ ४१ ॥
चंद्रमुखी तारा तेथे मधल्या दालनात होतीच. ती सर्व अलंकारांनी विभूषित होती आणि तिचे डोळे काहीसे आरक्त होते. (४१)

उवाच लक्ष्मणं नत्वा स्मितपूर्वाभिभाषिणी ।
एहि देवर भद्रं ते साधुस्त्वं भक्तवत्सलः ॥ ४२ ॥
लक्ष्मणाला नमस्कार करून ती गोड बोलणारी तारा स्मित करीत म्हणाली, "भाऊजी, या. तुमचे कल्याण असो. तुम्ही सज्जन आणि भक्तवत्सल आहात. (४२)

किमर्थं कोपमाकार्षीः भक्ते भृत्ये कपीश्वरे ।
बहुकालमनाश्वासं दुःखमेवानुभूतवान् ॥ ४३ ॥
तुमचा भक्त आणि सेवक असणार्‍या वानरराज सुग्रीवावर तुम्ही असे का बरे रागावलात ? खरे म्हणजे बराच काळ त्याला शांतता मिळालेली नव्हती. त्याने दुःखच अनुभवले होते. (४३)

इदानीं बहुदुःखौघाद् भवद्‌भिः अभिरक्षितः ।
भवत्प्रसादात्सुग्रीवः प्राप्तसौख्यो महामतिः ॥ ४४ ॥
आता तुम्हीच त्याला मोठ्या दुःखसागरातून बाहेर काढून त्याचे रक्षण केले आहे. तु मच्याच कृपेमुळे महाबुद्धिमान सुग्रीवाला आत्ता कोठे सुख प्राप्त झालेले आहे. (४४)

कामासक्तो रघुपतेः सेवार्थं नागतो हरिः ।
आगमिष्यन्ति हरयो नानादेशगताः प्रभो ॥ ४५ ॥
सुग्रीव जातीने वानर आहे. त्यामुळे कामासक्त होऊन तो रघुपतींच्या सेवेसाठी आला नाही हे खरे. तथापि हे प्रभो, सुग्रीवाच्या आज्ञेनुसार आता नाना देशांतील वानर येथे येणार आहेत. (४५)

प्रेषितो दशसाहस्रा हरयो रघुसत्तम ।
आनेतुं वानरान् दिग्भ्यो महापर्वतसन्निभान् ॥ ४६ ॥
हे रघुश्रेष्ठा, प्रचंड पर्वताप्रमाणे असणार्‍या वानरांना वेगवेगळ्या दिशांतून येथे आणण्यासाठी दहा हजार वानर अगोदरच पाठविले आहेत. (४६)

सुग्रीवः स्वयमागत्य सर्ववानरयूथपैः ।
वधयिष्यति दैत्यौघान् रावणं च हनिष्यति ॥ ४७ ॥
आणि सुग्रीव स्वतः जाऊन वानरांच्या सर्व सेनापतींच्या द्वारा दैत्यसमूहांचा नाश करील आणि रावणालाही ठार करील. (४७)

त्वयैव सहितोऽद्यैव गन्ता वानरपुङ्‌गवः ।
पश्यान्तर्भवनं तत्र पुत्रदारसुहृद्‍वृतम् ॥ ४८ ॥
दृष्ट्‍वा सुग्रीवमभयं दत्त्वा नय सहैव ते ।
ताराया वचनं श्रुत्वा कृशक्रोधोऽथ लक्ष्मणः ॥ ४९ ॥
जगामान्तःपुरं यत्र सुग्रीवो वानरेश्वरः ।
रुमामालिङ्‌ग्य सुग्रीव पर्यङ्‌के पर्यवस्थितः ॥ ५० ॥
वानरश्रेष्ठ सुग्रीव आजच तुमच्याबरोबर श्रीरामांकडे येईल. तोवर तुम्ही आमचे अंतःपुर पाहा. तेथे पुत्र, पत्‍नी, मित्र यांनी वेढलेल्या सुग्रीवाला तुम्ही भेटा. त्याला अभय द्या आणि त्याला तुमच्याबरोबर श्रीरामांकडे घेऊन जा." तारेचे हे वचन ऐकल्यावर लक्ष्मणाचा क्रोध बराच कमी झाला. मग वानरांचा राजा सुग्रीव जेथे होता, त्या अंतःपुरात तो गेला. तेथे रुमेसह सुग्रीव पलंगावर विसावलेला होता. (४८-५०)

दृष्ट्‍वा लक्ष्मणमत्यर्थं उत्पपातातिभीतवत् ।
तं दृष्ट्‍वा लक्ष्मणः क्रुद्धो मदविह्वलितेक्षणम् ॥ ५१ ॥
सुग्रीवं प्राह दुर्वृत्त विस्मृतोऽसि रघुत्तमम् ।
वाली येन हतो वीरः स बाणोऽद्य प्रतीक्षते ॥ ५२ ॥
लक्ष्मणाला पाहिल्यावर अतिशय भ्याल्यासारखा सुग्रीव उडी मारून उठला. मद्याच्या धुंदीने ज्याचे डोळे गरगरत होते अशा त्या सुग्रीवाला पाहून रागावलेला लक्ष्मण म्हणाला, "अरे दुराचार्‍या, तू रघूत्तमांना विसरलास काय ? वीर वाली ज्या बाणाने मारला गेला तो बाण आज तुझी वाट पाहात आहे. (५१-५२)

त्वमेव वालिनो मार्गं गमिष्यसि मया हतः ।
एवमत्यन्तपरुषं वदन्तं लक्ष्मणं तदा ॥ ५३ ॥
उवच हनुमान् वीरः कथमेवं प्रभाषसे ।
त्वत्तोऽधिकतरो रामे भक्तोऽयं वानराधिपः ॥ ५४ ॥
रामकार्यार्थमनिशं जागर्ति न तु विस्मृतः ।
आगताः परितः पश्य वानराः कोटिशः प्रभो ॥ ५५ ॥
माझ्याकडून मारला जाऊन तूसुद्धा वालीच्या मार्गाने जाशील." अशा प्रकारे अत्यंत कठो र शब्द बोलणार्‍या लक्ष्मणाला त्या वेळी वीर हनुमान म्हणाला, "हे प्रभू ? असे कसे बोलता ? हा वानरांचा राजा सुग्रीव खरे म्हणजे तुमच्यापेक्षा रामांचा अधिक भक्त आहे. श्रीरामांच्या कार्यासाठी हा रात्रंदिवस जागरूक असतो. तो त्यांना विसरलेला नाही. पाहा, सगळीकडून कोट्यवधी वानर येथे आलेले आहेत. (५३-५५)

गमिष्यन्त्यचिरेणैव सीतायाः परिमार्गणम् ।
साधयिष्यति सुग्रीवो रामकार्यमशेषतः ॥ ५६ ॥
आणि लौकरच ते सीतेच्या शोधासाठी जातील. सुग्रीव श्रीरामांचे कार्य पूर्णपणे पार पाडेल." (५६)

श्रुत्वा हनुमतो वाक्यं सौमित्रिर्लज्जितोऽभवत् ।
सुग्रीवोऽप्यर्घ्यपाद्याद्यैः लक्ष्मणं समपूजयत् ॥ ५७ ॥
हनुमंताचे वाक्य ऐकून लक्ष्मण लज्जित झाला. त्यानंतर सुग्रीवानेसुद्धा अर्घ्य, पाद्य इत्यादींनी लक्ष्मणाची पूजा केली. (५७)

आलिङ्‌ग्य प्राह रामस्य दासोऽहं तेन रक्षितः ।
रामः स्वतेजसा लोकान् क्षणार्द्धेनैव जेष्यति ॥ ५८ ॥
लक्ष्मणाला आलिंगन देऊन सुग्रीव म्हणाला, "मी श्रीरामांचा दास आहे. त्यांनीच माझे रक्षण केले आहे. स्वतःच्या पराक्रमानेच श्रीराम सर्व लोकांना क्षणार्धातच जिंकून टाकतील. (५८)

सहायमात्रमेवाहं वानरैः सहितः प्रभो ।
सौमित्रिरपि सुग्रीवं प्राह किञ्चिन्मयोदितम् ॥ ५९ ॥
तत्क्षमस्व महाभाग प्रणयाद्‌भाषितं मया ।
गच्छामोऽद्यैव सुग्रीव रामस्तिष्ठति कानने ॥ ६० ॥
एक एवार्तिदुःखार्त्तो जानकीविरहात्प्रभुः ।
तथेति रथमारुह्य लक्ष्मणेन समन्वितः ॥ ६१ ॥
वानरैः सहितो राजा राममेवान्वपद्यत ॥ ६२ ॥
हे प्रभो, सर्व वानरांसह मी त्यांचा केवळ नावापुरता सहायक असेन." तेव्हा लक्ष्मणसुद्धा सुग्रीवाला म्हणाला, "हे महाभागा, मी जे काही तुला बोललो होतो त्याची मला क्षमा कर. मी ते श्रीरामांच्यावरील प्रेमाने बोललो होतो. हे सुग्रीवा, आत्ताच आपण श्रीरामांकडे जाऊ या. अरण्यात श्रीराम एकटेच आहेत आणि जानकीच्या विरहाने अतिशय दुःखाकुल आहेत." 'ठीक आहे' असे सुग्रीव म्हणाला. लक्ष्मणासह तो एका रथात चढला आणि इतर वानरांसह राजा सुग्रीव श्रीरामांजवळच जाण्यास निघाला. (५९-६२)

भेरीमृदङ्‌गैर्बहुऋक्षवानरैः
    श्वेतातपत्रैर्व्यजनैश्च शोभितः ।
नीलाङ्‌गदाद्यैर्हनुमत्प्रधानैः
    समावृतो राघवमभ्यगाद्धरिः ॥ ६३ ॥
भेरी आणि मृदुंग या वाद्यांच्या गजरात, पुष्कळ अस्वले आणि वानर, तसेच पांढरी छत्रे आणि चवर्‍या यांनी सुशोभित झालेला आणि नील, अंगद, हनुमान इत्यादी वानरप्रमुखांसमवेत सुग्रीव श्रीरामांकडे गेला. (६३)

इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे
किष्किन्धाकाण्डे पञ्चमः सर्गः ॥ ५ ॥
इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे किष्किंधाकाण्डे पंचमः सर्गः ॥ ५ ॥


GO TOP