श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ एकोनविंश: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

नभसोऽवतीर्णेन विभीषणेन श्रीरामचरणयोः शरणीकरणं; श्रीरामपृष्टेन तेन रावणशक्तेः परिचयदानं रावणवधं प्रतिज्ञाय विभीषणं लंकाराज्ये चाभिषिच्य तत्सम्मत्यैव तस्य समुद्रतटे उपवेशनम् - विभीषणांचे आकाशातून उतरून भगवान्‌ श्रीरामांच्या चरणी शरण येणे, त्यांनी विचारल्यावरून रावणाच्या शक्तिचा परिचय देणे, आणि श्रीरामांनी रावण-वधाची प्रतिज्ञा करून विभीषणांना लंकेच्या राज्यावर अभिषिक्त करून त्यांच्या सम्मतिने समुद्रतटावर धरणे धरण्यासाठी बसणे -
राघवेणाभये दत्ते संनतो रावणानुजः ।
विभीषणो महाप्राज्ञो भूमिं समवलोकयत् ॥ १ ॥
याप्रकारे राघवांनी अभय दिल्यावर विनयशील महाबुद्धिमान्‌ विभीषणाने खाली उतरण्यासाठी पृथ्वीकडे पाहिले. ॥१॥
खात् पपातावनीं हृष्टो भक्तैरनुचरैः सह ।
स तु रामस्य धर्मात्मा निपपात विभीषणः ॥ २ ॥

पादयोः निपपाताथ चतुर्भिः सह राक्षसैः ।
ते आपल्या भक्त सेवकांसह हर्षाने भरून आकाशातून पृथ्वीवर उतरून आले. उतरून चारी राक्षसांसह धर्मात्मा विभीषण श्रीरामचंद्रांच्या चरणांवर पडले. ॥२ १/२॥
अब्रवीच्च तदा वाक्यं रामं तत्र विभीषणः ॥ ३ ॥

धर्मयुक्तं च युक्तं च सांप्रतं संप्रहर्षणम् ।
त्या समयी विभीषणांनी श्रीरामांना धर्मानुकूल, युक्तियुक्त, समयोचित आणि हर्षवर्धक गोष्ट सांगितली- ॥३ १/२॥
अनुजो रावणस्याहं तेन चास्म्यवमानितः ॥४ ॥

भवन्तं सर्वभूतानां शरण्यं शरणं गतः ।
भगवन्‌ ! मी रावणाचा लहान भाऊ आहे. रावणाने माझा अपमान केला आहे. आपण समस्त प्राण्यांना शरण देणारे आहात म्हणून मी आपल्याला शरण आलो आहे. ॥४ १/२॥
परित्यक्ता मया लङ्‌का मित्राणि च धनानि च ॥ ५ ॥

भवद्‌गतं हि मे राज्यं जीवितं च सुखानि च ।
आपले सर्व मित्र, धन आणि लंकापुरीला मी सोडून आलो आहे. आता माझे राज्य, जीवन आणि सुख सर्व आपल्याच अधीन आहे. ॥५ १/२॥
तस्य तद्वचनं श्रुत्वा रामो वचनमब्रवीत् ॥ ६ ॥

वचसा सान्त्वयित्वैनं लोचनाभ्यां पिबन्निव ।
विभीषणांचे हे वचन ऐकून श्रीरामांनी मधुर वाणी द्वारा त्यांना सांत्वना दिली आणि नेत्रांनी जणु त्यांना पिऊन टाकतील अशा प्रकारे प्रेमपूर्वक त्यांच्याकडे पहात पहात म्हणाले- ॥६ १/२॥
आख्याहि मम तत्त्वेन राक्षसानां बलाबलम् ॥ ७ ॥

एवमुक्तं तदा रक्षो रामेणाक्लिष्टकर्मणा ।
रावणस्य बलं सर्वं आख्यातुमुपचक्रमे ॥ ८ ॥
विभीषण ! तुम्ही मला राक्षसांचे बलाबल ठीक ठीक (यथावत्‌) सांगा. अनायासेच महान्‌ कर्म करणार्‍या श्रीरामांनी असे म्हटल्यावर राक्षस विभीषणाने रावणाचे संपूर्ण बलाचा परिचय देण्यास आरंभ केला- ॥७-८॥
अवध्यः सर्वभूतानां गंधर्वोरगपक्षिणाम् ।
राजपुत्र दशग्रीवो वरदानात् स्वयम्भुवः ॥ ९ ॥
राजकुमार ! ब्रह्मदेवांच्या वरदानाच्या प्रभावाने दशमुख रावण (केवळ मनुष्यांना सोडून) गंधर्व, नाग आणि पक्षी आदि सर्व प्राण्यांसाठी अवध्य आहे. ॥९॥
रावणानन्तरो भ्राता मम ज्येष्ठश्च वीर्यवान् ।
कुम्भकर्णो महातेजाः शक्रप्रतिबलो युधि ॥ १० ॥
रावणाहून लहान आणि माझ्याहून मोठा जो माझा भाऊ कुंभकर्ण आहे तो महातेजस्वी आणि पराक्रमी आहे. युद्धात तो इंद्रासमान बलशाली आहे. ॥१०॥
राम सेनापतिस्तस्य प्रहस्तो यदि ते श्रुतः ।
कैलासे येन समरे मणिभद्रः पराजितः ॥ ११ ॥
श्रीरामा ! रावणाच्या सेनापतिचे नाव प्रहस्त आहे. कदाचित्‌ आपण त्याचे नाव ऐकले असेल. त्याने कैलासावर झालेल्या युद्धात कुबेराचा सेनापति मणिभद्र याला पराजित केले होते. ॥११॥
बद्धगोधाङ्‌गुलित्राणः त्ववध्यकवचो युधि ।
धनुरादाय यस्तिष्ठन् नदृश्यो भवतीन्द्रजित् ॥ १२ ॥
रावणाचा पुत्र इंद्रजित्‌ आहे, तो घोरपडीच्या चामड्‍याचे बनविलेले मोजे धारण करून अवध्य कवच धारण करून हातात धनुष्य घेऊन जेव्हा युद्धात उभा राहातो, त्यावेळी अदृश्य होऊन जातो. ॥१२॥
सङ्‌ग्रामे सुमहद् व्यूहे तर्पयित्वा हुताशनम् ।
अन्तर्धानगतः श्रीमान् इंद्रजिद्धन्ति राघव ॥ १३ ॥
राघवा ! श्रीमान्‌ इंद्रजिताने अग्निदेवताला तृप्त करून अशी शक्ति प्राप्त केली आहे की तो विशाल व्यूहाने युक्त संग्रामातही अदृश्य होऊन शत्रूंच्या वर प्रहार करतो. ॥१३॥
महोदरमहापार्श्वौ राक्षसश्चाप्यकंपनः ।
अनीकपास्तु तस्यैते लोकपालसमा युधि ॥ १४ ॥
महोदर, महापार्श्व आणि अकंपन - हे तीन्ही राक्षस रावणाचे सेनापती आहेत आणि युद्धात लोकपालांसमान पराक्रम प्रकट करत असतात. ॥१४॥
दशकोटिसहस्राणि राक्षसां कामरूपिणाम् ।
मांसशोणितभक्षाणां लङ्‌कापुरनिवासिनाम् ॥ १५ ॥

स तैस्तु सहितो राजा लोकपालानयोधयत् ।
सह देवैस्तु ते भग्ना रावणेन दुरात्मना ॥ १६ ॥
लंकेमध्ये रक्त आणि मांस यांचे भोजन करणारे आणि इच्छेनुसार रूप धारण करण्यास समर्थ जे दहा कोटी सहस्त्र (एक खर्व) राक्षस निवास करतात, त्यांना बरोबर घेऊन राजा रावणाने लोकपालांशी युद्ध केले होते. त्या समयी देवतांसहित ते सर्व लोकपाल दुरात्मा रावणाकडून पराजित होऊन पळून गेले होते. ॥१५-१६॥
विभीषणस्य तु वचः तत् श्रुत्वा रघुसत्तमः ।
अन्वीक्ष्य मनसा सर्वं इदं वचनमब्रवीत् ॥ १७ ॥
विभीषणाचे हे बोलणे ऐकून रघुकुलतिलक श्रीरामांनी मनातल्या मनात या सर्वांवर वारंवार विचार केला आणि याप्रकारे म्हटले- ॥१७॥
यानि कर्मापदानानि रावणस्य विभीषण ।
आख्यातानि च तत्त्वेन ह्यवगच्छामि तान्यहम् ॥ १८ ॥
विभीषणा ! तुम्ही रावणाच्या युद्धविषयक ज्या ज्या पराक्रमाचे वर्णन केले आहे त्यांना मी चांगल्या प्रकारे जाणतो. ॥१८॥
अहं हत्वा दशग्रीवं सप्रहस्तं सहात्मजम् ।
राजानं त्वां करिष्यामि सत्यमेतद् शृणोतु मे ॥ १९ ॥
परंतु ऐक ! मी खरेच सांगतो आहे की प्रहस्त आणि पुत्रांसहित रावणाचा वध करून मी तुला लंकेचा राजा बनवीन. ॥१९॥
रसातलं वा प्रविशेत् पातालं वापि रावणः ।
पितामहसकाशं वा न मे जीवन् विमोक्ष्यते ॥ २० ॥
रावणाने रसातळात अथवा पाताळात जरी प्रवेश केला अथवा तो पितामह ब्रह्मदेवांकडे जरी निघून गेला तरीही तो आता माझ्या हातून जिवंत सुटू शकणार नाही. ॥२०॥
अहत्वा रावणं संख्ये सपुत्रजनबान्धवम् ।
अयोध्यां न प्रवेक्ष्यामि त्रिभिस्तैर्भ्रातृभिः शपे ॥ २१ ॥
मी आपल्या तीन्ही भावांची शपथ घेऊन सांगतो आहे की युद्धात पुत्र, भृत्यजन आणि बंधु-बांधवांसहित रावणाचा वध केल्याशिवाय मी अयोध्यापुरीत प्रवेश करणार नाही. ॥२१॥
श्रुत्वा तु वचनं तस्य रामस्याक्लिष्टकर्मणः ।
शिरसाऽऽवन्द्य धर्मात्मा वक्तुमेवं प्रचक्रमे ॥ २२ ॥
अनायासेच महान्‌ कर्म करणार्‍या श्रीरामांचे हे वचन ऐकून धर्मात्मा विभीषणाने मस्तक नमवून त्यांना प्रणाम केला आणि नंतर याप्रकारे बोलण्यास आरंभ केला- ॥२२॥
राक्षसानां वधे साह्यं लङ्‌कायाश्च प्रधर्षणे ।
करिष्यामि यथाप्राणं प्रवेक्ष्यामि च वाहिनीम् ॥ २३ ॥
प्रभो ! राक्षसांच्या संहारात आणि लंकापुरीवर आक्रमण करून तिला जिंकण्यास मी आपली यथाशक्ती सहायता करीन तसेच प्राणांची बाजी लावून युद्धासाठी रावणाच्या सेनेतही प्रवेश करीन. ॥२३॥
इति ब्रुवाणं रामस्तु परिष्वज्य विभीषणम् ।
अब्रवील्लक्ष्मणं प्रीतः समुद्राज्जलमानय ॥ २४ ॥

तेन चेमं महाप्राज्ञं अभिषिञ्च विभीषणम् ।
राजानं रक्षसां क्षिप्रं प्रसन्ने मयि मानद ॥ २५ ॥
विभीषणाने असे म्हटल्यावर भगवान्‌ श्रीरामांनी त्यांना हृदयाशी धरले आणि प्रसन्न होऊन लक्ष्मणास सांगितले - दुसर्‍यांना मान देणार्‍या सुमित्रानंदना ! तुम्ही समुद्राचे जल घेऊन या आणि त्याच्या द्वारा या परम बुद्धिमान्‌ राक्षसराज विभीषणाचा लंकेच्या राज्यावर शीघ्रच अभिषेक करा. मी प्रसन्न झाल्यावर यांना हा लाभ मिळालाच पाहिजे. ॥२४-२५॥
एवमुक्तस्तु सौमित्रिः अभ्याषिञ्चद् विभीषणम् ।
मध्येवानरमुख्यानां राजानं राजशासनात् ॥ २६ ॥
त्यांनी असे म्हटल्यावर सौमित्र लक्ष्मणांनी मुख्य मुख्य वानरांच्या मध्ये महाराज श्रीरामांच्या आदेशाने विभीषणांचा राक्षसांच्या राजाच्या पदावर अभिषेक केला. ॥२६॥
तं प्रसादं तु रामस्य दृष्ट्‍वा सद्यः प्लवंगमाः ।
प्रचुक्रुशुर्महात्मानं साधु साध्विति चाब्रुवन् ॥ २७ ॥
भगवान्‌ श्रीरामांचा हा तात्कालिक प्रसाद (अनुग्रह) पाहून सर्व वानर हर्षध्वनि करू लागले आणि महात्मा श्रीरामांना साधुवाद देऊ लागले. ॥२७॥
अब्रवीच्च हनूमांश्च सुग्रीवश्च विभीषणम् ।
कथं सागरमक्षोभ्यं तराम वरुणालयम् ।
सैन्यैः परिवृताः सर्वे वानराणां महौजसाम् ॥ २८ ॥
त्यानंतर हनुमान्‌ आणि सुग्रीवाने विभीषणाला विचारले - राक्षसराज ! आम्ही सर्व लोक या अक्षोभ्य समुद्राला महाबली वानरांच्या सेनेसह कशा प्रकारे पार करू शकतो ? ॥२८॥
उपायैरभिगच्छाम यथा नदनदीपतिम् ।
तराम तरसा सर्वे ससैन्या वरुणालयम् ॥ २९ ॥
ज्या उपायांनी आम्ही सर्व लोक नद आणि नद्यांचे स्वामी वरूणालय समुद्राच्या पार जाऊ शकू तो उपाय सांगावा. ॥२९॥
एवमुक्तस्तु धर्मात्मा प्रत्युवाच विभीषणः ।
समुद्रं राघवो राजा शरणं गन्तुमर्हति ॥ ३० ॥
त्यांनी याप्रकारे विचारल्यावर धर्मात्मा विभीषणाने असे उत्तर दिले - राघव राजा श्रीराम यांनी समुद्रास शरण गेले पाहिजे. ॥३०॥
खानितः सगरेणायं अप्रमेयो महोदधिः ।
कर्तुमर्हति रामस्य ज्ञातेः कार्यं महोदधिः ॥ ३१ ॥
या अपार महासागरास राजा सगरांनी खणून काढले होते. श्रीराम सगराचे वंशज आहे, म्हणून समुद्राने यांचे काम अवश्य केले पाहिजे. ॥३१॥
एवं विभीषणेनोक्तो राक्षसेन विपश्चिता ।
आजगामाथ सुग्रीवो यत्र रामः सलक्ष्मणः ॥ ३२ ॥
विद्वान्‌ राक्षस विभीषणांनी असे सांगितल्यावर सुग्रीव त्या स्थानावर आले जेथे लक्ष्मणासह श्रीराम विद्यमान्‌ होते. ॥३२॥
ततश्चाख्यातुमारेभे विभीषणवचः शुभम् ।
सुग्रीवो विपुलग्रीवः सागरस्योपवेशनम् ॥ ३३ ॥
तेथे विशाल ग्रीवा असलेल्या सुग्रीवांनी समुद्राजवळ धरणे धरण्याविषयी जे विभीषणांचे शुभ वचन होते, ते सांगण्यास आरंभ केला. ॥३३॥
प्रकृत्या धर्मशीलस्य रानस्यास्याप्यरोचत ।
स लक्ष्मणं महातेजाः सुग्रीवं च हरीश्वरम् ॥ ३४ ॥

सत्क्रियार्थं क्रियादक्षं स्मितपूर्वमभाषत ।
भगवान्‌ श्रीराम स्वभावानेच धर्मशील होते म्हणून त्यांनाही विभीषणाचे हे म्हणने चांगले वाटले. ते महातेजस्वी रघुनाथ लक्ष्मणासहित कार्यदक्ष वानरराज सुग्रीवांचा सत्कार करीत त्यांना हसून म्हणाले- ॥३४ १/२॥
विभीषणस्य मंत्रोऽयं मम लक्ष्मण रोचते ॥ ३५ ॥

सुग्रीवः पण्डितो नित्यं भवान् मंत्रविचक्षणः ।
उभाभ्यां संप्रधार्यार्थं रोचते यत् तदुच्यताम् ॥ ३६ ॥
लक्ष्मणा ! विभीषणाची ही सम्मति (मत) मला ही चांगली वाटते आहे. परंतु सुग्रीव राजनीतिचे मोठे पंडित आहेत आणि तुम्हीही समयोचित सल्ला देण्यात सदा कुशल आहात. म्हणून तुम्ही दोघे प्रस्तुत कार्यावर चांगल्या प्रकारे विचार करून जे ठीक वाटत असेल, ते सांगा. ॥३५-३६॥
एवमुक्तौ ततौ वीरौ उभौ सुग्रीवलक्ष्मणौ ।
समुदाचारसंयुक्तं इदं वचनमूचतुः ॥ ३७ ॥
श्रीरामांनी असे सांगितल्यावर ते दोघे सुग्रीव आणि लक्ष्मण त्यांना आदरपूर्वक म्हणाले- ॥३७॥
किमर्थं नौ नरव्याघ्र न रोचिष्यति राघव ।
विभीषणेन यत् तूक्तं अस्मिन् काले सुखावहम् ॥ ३८ ॥
पुरूषसिंह राघव ! या समयी विभीषणांनी जी सुखदायक गोष्ट सांगितली आहे, ती आम्हां दोघांना का बरे चांगली वाटणार नाही ? ॥३८॥
अबद्ध्वा सागरे सेतुं घोरेऽस्मिन् वरुणालये ।
लङ्‌का नासादितुं शक्या सेन्द्रैरपि सुरासुरैः ॥ ३९ ॥
या भयंकर समुद्रात पूल बांधल्याशिवाय इंद्रासहित देवता आणि असुरही येथून लंकापुरीत पोहोचू शकत नाहीत. ॥३९॥
विभीषणस्य शूरस्य यथार्थं क्रियतां वचः ।
अलं कालात्ययं कृत्वा समुद्रोऽयं नियुज्यताम् ।
यथा सैन्येन गच्छाम पुरीं रावणपालिताम् ॥ ४० ॥
म्हणून आपण शूरवीर विभीषणांच्या यथार्थ वचनानुसार कार्य करावे. आता अधिक विलंब करणे ठीक नाही. या समुद्राकडे हा अनुरोध केला जावा की ह्याने आमची सहायता करावी, ज्यायोगे आम्ही सेनेसह रावणपालित लंकापुरीत पोहोचू शकू. ॥४०॥
एवमुक्तः कुशास्तीर्णे तीरे नदनदीपतेः ।
संविवेश तदा रामो वेद्यामिव हुताशनः ॥ ४१ ॥
त्या दोघांनी असे म्हटल्यावर श्रीरामांनी त्यासमयी समुद्राच्या तटावर कुश पसरून त्यावर वेदीवर अग्निदेव प्रतिष्ठित व्हावेत, त्याप्रमाणे श्रीराम बसले. ॥ ४१ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे एकोनविंशः सर्गः ॥ १९ ॥ याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा एकोणीसावा सर्ग पूर्ण झाला. ॥१९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP