श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ एकनवतितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामस्य आदेशेन अश्वमेधयज्ञस्य आयोजनम् -
श्रीरामांच्या आदेशाने अश्वमेध यज्ञाची तयारी -
एतदाख्याय काकुत्स्थो भ्रातृभ्यां अमितप्रभः ।
लक्ष्मणं पुनरेवाह धर्मयुक्तमिदं वचः ॥ १ ॥
आपल्या दोन्ही भावांना ही कथा ऐकवून अमित तेजस्वी काकुत्स्थ राम लक्ष्मणांना पुन्हा हे धर्मयुक्त वचन बोलले- ॥१॥
वसिष्ठं वामदेवं च जाबालिमथ कश्यपम् ।
द्विजांश्च सर्वप्रवरान् अश्वमेधपुरस्कृतान् ॥ २ ॥

एतान् सर्वान् समानीय मन्त्रयित्वा च लक्ष्मण ।
हयं लक्षणसम्पन्नं विमोक्ष्यामि समाधिना ॥ ३ ॥
लक्ष्मणा ! मी अश्वमेध यज्ञ करविणार्‍या ब्राह्मणांमध्ये अग्रगण्य तसेच सर्वश्रेष्ठ वसिष्ठ, वामदेव, जाबालि आणि कश्यप आदि सर्व द्विजांना बोलावून आणि त्यांचा सल्ला घेऊन पूर्ण सावधानतेने शुभ लक्षणांनी संपन्न घोडा सोडीन. ॥२-३॥
तद्वाक्यं राघवेणोक्तं श्रुत्वा त्वरितविक्रमः ।
द्विजान् सर्वान् समाहूय दर्शयामास राघवम् ॥ ४ ॥
राघवांनी बोललेले हे वचन ऐकून शीघ्रगामी लक्ष्मणांनी समस्त ब्राह्मणांना बोलावून त्यांची राघवांशी भेट करवून दिली. ॥४॥
ते दृष्ट्‍वा देवसङ्‌काशं कृतपादाभिवन्दनम् ।
राघवं सुदुराधर्षं आशीर्भिः समपूजयन् ॥ ५ ॥
त्या ब्राह्मणांनी पाहिले देवतुल्य तेजस्वी आणि अत्यंत दुर्जय श्री राघवेंद्र आपल्या चरणी प्रणाम करून उभे आहेत, तेव्हा त्यांनी शुभाशीर्वाद द्वारा त्यांचा सत्कार केला. ॥५॥
प्राञ्जलिः स तदा भूत्वा राघवो द्विजसत्तमान् ।
उवाच धर्मसंयुक्तं अश्वमेधाश्रितं वचः ॥ ६ ॥
त्यासमयी राघव हात जोडून त्या श्रेष्ठ ब्राह्मणांशी अश्वमेध यज्ञाविषयी धर्मयुक्त श्रेष्ठ वचन बोलले. ॥६॥
ते तु रामस्य तच्छ्रुत्वा नमस्कृत्वा वृषध्वजम् ।
अश्वमेधं द्विजाः सर्वे पूजयन्ति स्म सर्वशः ॥ ७ ॥
ते सर्व ब्राह्मणही श्रीरामांचे बोलणे ऐकून भगवान्‌ शंकरांना प्रणाम करून सर्व प्रकारे अश्वमेध यज्ञाची प्रशंसा करू लागले. ॥७॥
स तेषां द्विजमुख्यानां वाक्यं अद्‌भुतदर्शनम् ।
अश्वमेधाश्रितं श्रुत्वा भृशं प्रीतोऽभवत् तदा ॥ ८ ॥
अश्वमेध यज्ञाविषयी त्या श्रेष्ठ ब्राह्मणांचे अद्‍भुत ज्ञानाने युक्त वचन ऐकून श्रीरामचंद्रांना फार प्रसन्नता वाटली. ॥८॥
विज्ञाय कर्म तत् तेषां रामो लक्ष्मणमब्रवीत् ।
प्रेषयस्व महाबाहो सुग्रीवाय महात्मने ॥ ९ ॥

यथा महद्‌भिर्हरिभिः बहुभिश्च वनौकसाम् ।
सार्धमागच्छ भद्रं ते ह्यनुभोक्तुं महोत्सवम् ॥ १० ॥
त्या कर्मासाठी त्या ब्राह्मणांची स्वीकृति जाणून श्रीराम लक्ष्मणांना म्हणाले - महाबाहो ! तू महात्मा वानरराज सुग्रीवाकडे हा संदेश धाड की कपिश्रेष्ठ ! तुम्ही बरेचसे विशालकाय वनवासी वानरांसह येथे यज्ञ महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी यावे. तुमचे कल्याण होवो. ॥९-१०॥
बिभीषणश्च रक्षोभिः कामगैर्बहुभिर्वृतः ।
अश्वमेधं महायज्ञं आयात्वतुलविक्रमः ॥ ११ ॥
त्याच बरोबर अतुल-पराक्रमी विभीषणांनाही सूचना द्या की त्यांनी इच्छेनुसार चालणार्‍या बर्‍याच राक्षसांसह आमच्या महान्‌ अश्वमेध यज्ञात यावे. ॥११॥
राजानश्च महाभागा ये मे प्रियचिकीर्षवः ।
सानुगाः क्षिप्रमायान्तु यज्ञं भूमिनिरीक्षकाः ॥ १२ ॥
या शिवाय माझे प्रिय करण्याची इच्छा असणारे जे महाभाग राजे आहेत, त्यांनी ही यज्ञभूमि पहाण्यासाठी सेवकांसहित शीघ्र येथे यावे. ॥१२॥
देशान्तरगता ये च द्विजा धर्मसमाहिताः ।
आमन्त्रयस्व तान् सर्वान् अश्वमेधाय लक्ष्मण ॥ १३ ॥
लक्ष्मणा ! जे धर्मनिष्ठ ब्राह्मण कार्यवश दुसर्‍या देशात निघून गेलेले आहेत, त्या सर्वांनाही आपल्या अश्वमेध यज्ञासाठी आमंत्रित करा. ॥१३॥
ऋषयश्च महाबाहो आहूयन्तां तपोधनाः ।
देशान्तरगताः सर्वे सदाराश्च द्विजातयः ॥ १४ ॥
महाबाहो ! तपोधन ऋषिंना तसेच अन्य राज्यात राहाणार्‍यांना समस्त ब्रह्मर्षिंना स्त्रियांसहित बोलावून घ्या. ॥१४॥
तथैव तालावचराः तथैव नटनर्तकाः ।
यज्ञवाटश्च सुमहान् गोमत्या नैमिशे वने ॥ १५ ॥

आज्ञाप्यतां महाबाहो तद्धि पुण्यमनुत्तमम् ।
महाबाहो ! ताल घेऊन रंगभूमित संचरण करणारे सूत्रधार तसेच नट आणि नर्तक यांनाही बोलाविले जावे. नैमिषारण्यात गोमतीच्या तटावर विशाल यज्ञ मण्डप बनविण्याची आज्ञा द्या, कारण की ते वन फारच उत्तम आणि पवित्र स्थान आहे. ॥१५ १/२॥
शान्तयश्च महाबाहो प्रवर्त्यन्तां समन्ततः ॥ १६ ॥

शतशश्चापि धर्मज्ञाः क्रतुमुख्यमनुत्तमम् ।
अनुभूय महायज्ञं नैमिषे रघुनन्दन ॥ १७ ॥
महाबाहु रघुनंदना ! तेथे यज्ञाच्या निर्विघ्न समाप्तिसाठी सर्वत्र शान्तिविधान प्रारंभ करविले जावो. नैमिषारण्यात शेकडो धर्मज्ञ पुरुष त्या परम उत्तम आणि श्रेष्ठ महायज्ञाला पाहून कृतार्थ होवोत. ॥१६-१७॥
तुष्टः पुष्टश्च सर्वोऽसौ मानितश्च यथाविधि ।
प्रीतिं यास्यति धर्मज्ञ शीघ्रमामन्त्र्यतां जनः ॥ १८ ॥
धर्मज्ञ लक्ष्मणा ! शीघ्र लोकांना आमंत्रित करा आणि जे लोक येतील ते सर्व विधियुक्त तुष्ट, पुष्ट तसेच सन्मानित होऊन परत जावोत. ॥१८॥
शतं वाहसहस्राणां तण्डुलानां वपुष्मताम् ।
अयुतं तिलमुद्‌गस्य प्रयात्वग्रे महाबल ॥ १९ ॥

चणकानां कुलित्थानां माषाणां लवणस्य च ।
महाबली सौमित्रा ! लाखो ओझे वाहून नेणारे उभे दाणे असलेले तांदूळ घेऊन आणि दहा हजार पशु तिळ, मूग, चणे, कुळीथ, उडीद आणि मीठांचे ओझे घेऊन पुढे रवाना होवोत. ॥१९ १/२॥
अतोऽनुरूपं स्नेहं च गन्धं सङ्‌क्षिप्तमेव च ॥ २० ॥

सुवर्णकोट्यो बहुला हिरण्यस्य शतोत्तराः ।
अग्रतो भरतः कृत्वा गच्छत्वग्रे समाधिना ॥ २१ ॥
याला अनुरूप तूप तेल, दूध, दही तसेच न उगाळलेले चंदन आणि पिठ न केलेले सुगंधित पदार्थ ही धाडले गेले पाहिजेत. भरत शंभर कोटीहून अधिक सोन्या चांदीची नाणी बरोबर घेऊन प्रथमच जाऊ देत आणि अत्यंत सावधानपणे यात्रा करू देत. ॥२०-२१॥
अन्तरा पणवीथ्यश्च सर्वे च नटनर्तकाः ।
सूदा नार्यश्च बहवो नित्यं यौवनशालिनः ॥ २२ ॥
मार्गात आवश्यक वस्तुंच्या क्रय-विक्रयासाठी जागोजागी बाजार लागले पाहिजेत; म्हणून त्याचे प्रवर्तक वणिक तसेच व्यवसायी लोकही यात्रा करोत. समस्त नट आणि नर्तक यांनीही जावे. बरेचसे आचारी तसेच सदा युवावस्थेने सुशोभित होणार्‍या स्त्रियाही यात्रा करोत. ॥२२॥
भरतेन तु सार्धं ते यान्तु सैन्यानि चाग्रतः ।
नैगमान् बालवृद्धाश्च द्विजांश्च सुसमाहितान् ॥ २३ ॥

कर्मान्तिकान् वर्धकिनः कोशाध्यक्षांश्च नैगमान् ।
मम मातॄस्तथा सर्वाः कुमारान्तःपुराणि च ॥ २४ ॥

काञ्चनीं मम पत्‍नींर च दीक्षायां ज्ञांश्च कर्मणि ।
अग्रतो भरतः कृत्वा गच्छत्वग्रे महायशाः ॥ २५ ॥
भरताबरोबर पुढे पुढे सेनाही जाऊ देत. महायशस्वी भरत, शास्त्रवेत्ते विद्वान्‌, बालके, वृद्ध लोक, एकाग्रचित्त असणारे ब्राह्मण, कामे करणारे सेवक, सुतार, कोषाध्यक्ष, वैदिक, माझ्या सर्व माता, कुमारांची अंतःपुरे (भरत आदिंच्या स्त्रिया) माझ्या पत्‍नीची सुवर्णमय प्रतिमा, तसेच यज्ञकर्माच्या दीक्षेचे जाणकार ब्राह्मण या सर्वांना पुढे घालून प्रथम यात्रा करू देत. ॥२३-२५॥
उपकार्या महार्हाश्च पार्थिवानां महौजसाम् ।
सानुगानां नरश्रेष्ठो व्यादिदेश महाबलः ॥ २६ ॥

अन्नपानानि वस्त्राणि अनुगानां महात्मनाम् ।
त्यानंतर महाबली नरश्रेष्ठ श्रीरामांनी सेवकांसहित महातेजस्वी नरेशांना राहाण्यासाठी बहुमूल्य निवासस्थान बनविण्यासाठी (राहुट्‍या बनविण्यासाठी) आदेश दिला तसेच सेवकांसहित त्या महात्मा नरेशांसाठी अन्न-पान तसेच वस्त्रे आदिंची व्यवस्था करविली. ॥२६ १/२॥
भरतः स तदा यातः शत्रुघ्नसहितस्तदा ॥ २७ ॥

वानराश्च मनात्मानः सुग्रीवसहितास्तदा ।
विप्राणां प्रवराः सर्वे चक्रुश्च परिवेषणम् ॥ २८ ॥
त्यानंतर शत्रुघ्नासहित भरतांनी नैमिषारण्याकडे प्रस्थान केले. त्यासमयी तेथे सुग्रीवासहित महात्मा वानर, जितके म्हणून श्रेष्ठ ब्राह्मण तेथे उपस्थित होते त्या सर्वांना भोजन वाढण्याचे काम करीत होते. ॥२७-२८॥
विभीषणश्च रक्षोभिः स्त्रीभिश्च बहुभिर्वृतः ।
ऋषीणां उग्रतपसां पूजां चक्रे महात्मनाम् ॥ २९ ॥
स्त्रिया आणि बर्‍याचशा राक्षसांसहित विभीषण उग्रतपस्वी महात्मा मुनिंच्या स्वागत-सत्काराचे काम संभाळू लागले. ॥२९॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे एकनवतितमः सर्गः ॥ ९१ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा एक्क्याण्णवावा सर्ग पूरा झाला. ॥९१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP