|
| गुहभरतयोर्वार्तालापो भरतस्य शोकश्च - 
 | गुह आणि भरताचे संभाषण आणि भरताचा शोक - | 
| एवमुक्तस्तु भरतो निषादाधिपतिं गुहम् । प्रत्युवाच महाप्राज्ञो वाक्यं हेत्यर्थसंहितम् ॥ १ ॥
 
 | निषादराज गुहानी असे म्हटलावर महाबुद्धिमान भरतांनी युक्ति आणि प्रयोजनयुक्त वचनांनी त्यास याप्रकारे उत्तर दिले - ॥१॥ | 
| ऊर्जितः खलु ते कामः कृतो मम गुरोः सखे । यो मे त्वमीदृशीं सेनामभ्यर्चयितुमिच्छसि ॥ २ ॥
 
 | ’हे सख्या ! तुम्ही माझ्या ज्येष्ठ भावाचे मित्र आहात. तुम्ही माझ्या इतक्या मोठ्या सेनेचा सत्कार करू इच्छिता हा तुमचा मनोरथ फार उच्च आहे. तुम्ही तो पूर्ण झाला असेच समजावे- तुमच्या श्रद्धेनेच आम्हा सर्वांचा सत्कार झाला आहे. ॥२॥ | 
| इत्युक्त्वा तु महातेजा गुहं वचनमुत्तमम् । अब्रवीद् भरतः श्रीमान् पन्थानं दर्शयन् पुनः ॥ ३ ॥
 
 | असे म्हणून महातेजस्वी श्रीमान भरतांनी गंतव्य मार्गाला हाताच्या खुणेने दाखवून पुन्हा गुहाला उत्तम वाणीने विचारले - ॥३॥ | 
| कतरेण गमिष्यामि भरद्वाजाश्रमं यथा । गहनोऽयं भृशं देशो गङ्गानूपो दुरत्ययः ॥ ४ ॥
 
 | ’निषादराज ! या दोन मार्गांपैकी कोणत्या मार्गाने मला भरद्वाज मुनींच्या आश्रमाकडे जाता येईल ? गंगेच्या किनार्यावरील हा प्रदेश फारच गहन आहे असे दिसून येत आहे. हा ओलांडून पुढे जाणे कठीण आहे’. ॥४॥ | 
| तस्य तद् वचनं श्रुत्वा राजपुत्रस्य धीमतः । अब्रवीत् प्राञ्जलिर्भूत्वा गुहो गहनगोचरः ॥ ५ ॥
 
 | महाबुद्धिमान राजकुमार भरताचे म्हणणे ऐकून वनात विचरण करणार्या गुहाने हात जोडीत म्हटले - ॥ ५ ॥ | 
| दाशास्त्वनुगमिष्यन्ति देशज्ञाः सुसमाहिताः । अहं चानुगमिष्यामि राजपुत्र महाबल ॥ ६ ॥
 
 | ’महाबली राजकुमार ! आपल्या बरोबर बरेचसे नावाडी येतील, जे या प्रदेशाशी पूर्ण परिचित तसेच उत्तमप्रकारे सावधान राहाणारे आहेत. याशिवाय मीही आपल्या बरोबर येईन. ॥६॥ | 
| कच्चिन्न दुष्टो व्रजसि रामस्याक्लिष्टकर्मणः । इयं ते महती सेना शङ्कां जनयतीव मे ॥ ७ ॥
 
 | ’परंतु एक गोष्ट सांगावी, अनायासेच महान पराक्रम करणार्या श्रीरामांच्या प्रति आपण काही दुर्भावना घेऊन तर जात नाही ना ? आपली ही विशाल सेना माझ्या मनांत शङ्का उत्पन्न करीत आहे’. ॥७॥ | 
| तमेवमभिभाषन्तमाकाश इव निर्मलः । भरतः श्लक्ष्णया वाचा गुहं वचनमब्रवीत् ॥ ८ ॥
 
 | असे बोलणार्या गुहाला आकाशाप्रमाणे निर्मल भरतांनी मधुर वाणीने म्हटले- ॥८॥ | 
| मा भूत् स कालो यत् कष्टं न मां शङ्कितुमर्हसि । राघवः स हि मे भ्राता ज्येष्ठः पितृसमो मतः ॥ ९ ॥
 
 | ’निषादराज ! अशी वेळ कधी न येवो ! तुमचे बोलणे ऐकून मला फार कष्ट झाले. तुम्ही माझ्याबद्दल संदेह करता कामा नये. राघव माझे ज्येष्ठ बंधु आहेत. मी त्यांना पित्यासमान मानतो. ॥९॥ | 
| तं निवर्तयितुं यामि काकुत्स्थं वनवासिनम् । बुद्धिरन्या न ते कार्या गुह सत्यं ब्रवीमि ते ॥ १० ॥
 
 | ’काकुत्स्थ राम वनात निवास करीत आहेत, म्हणून त्यांना परत आणण्यासाठी मी जात आहे. गुह ! तुम्हाला खरे तेच सांगत आहे. तुम्ही माझ्याविषयी कुठलाही अन्यथा विचार करता कामा नये’. ॥१०॥ | 
| स तु संहृष्टवदनः श्रुत्वा भरतभाषितम् । पुनरेवाब्रवीद् वाक्यं भरतं प्रति हर्षितः ॥ ११ ॥
 
 | भरताचे म्हणणे ऐकून निषादराजाचे मुख प्रसन्नतेने खुलले. तो हर्षाने भरून जाऊन पुन्हा भरतांना म्हणाला - ॥११॥ | 
| धन्यस्त्वं न त्वया तुल्यं पश्यामि जगतीतले । अयत्नादागतं राज्यं यस्त्वं त्यक्तुमिहेच्छसि ॥ १२ ॥
 
 | ’बिना प्रयास हाती आलेल्या राज्याचा आपण त्याग करू इच्छिता त्याअर्थी आपण धन्य आहात ! आपल्या सारखा धर्मात्मा मला या भूखण्डावर (दुसरा) कोणीही दिसत नाही. ॥१२॥ | 
| शाश्वती खलु ते कीर्तिर्लोकाननु चरिष्यति । यस्त्वं कृच्छ्रगतं रामं प्रत्यानयितुमिच्छसि ॥ १३ ॥
 
 | ’कष्टप्रद वनात निवास करणार्या रामांना जे आपण परत आणू इच्छित आहात त्यामुळे समस्त लोकात आपल्या अक्षय कीर्तीचा प्रसार होईल’. ॥१३॥ | 
| एवं संभाषमाणस्य गुहस्य भरतं तदा । बभौ नष्टप्रभः सूर्यो रजनी चाभ्यवर्तत ॥ १४ ॥
 
 | ज्यावेळी गुह भरतांशी याप्रमाणे गोष्टी करीत होता त्याच वेळी सूर्यदेवांची प्रभा अदृश्य झाली आणि रात्रीचा अंधकार सर्वत्र पसरला. ॥१४॥ | 
| संनिवेश्य स तां सेनां गुहेन परितोषितः । शत्रुघ्नेन समं श्रीमाञ्छयनं पुनरागमत् ॥ १५ ॥
 
 | गुहाच्या वर्तनाने श्रीमान भरतांना फार संतोष झाला आणि ते सेनेला विश्राम करण्याची आज्ञा देऊन शत्रुघ्नाबरोबर शयन करण्यासाठी गेले. ॥१५॥ | 
| रामचिन्तामयः शोको भरतस्य महात्मनः । उपस्थितो ह्यनर्हस्य धर्मप्रेक्षस्य तादृशः ॥ १६ ॥
 
 | धर्मावर दृष्टी ठेवणारे महात्मा भरत शोकास योग्य नव्हते तथापि त्यांच्या मनात रामांविषयीच्या चिंतेमुळे शोक उत्पन्न झाला होता ज्याचे वर्णन करता येणे शक्य नाही. ॥१६॥ | 
| अन्तर्दाहेन दहनः संतापयति राघवम् । वनदाहाग्निसंतप्तं गूढोऽग्निरिव पादपम् ॥ १७ ॥
 
 | ज्याप्रमाणे वनात पसरलेल्या दावानलाने संतप्त झालेल्या वृक्षाला त्यांच्या ढोलीत लपलेली आग अधिक जाळून टाकते, त्याच प्रकारे दशरथ मरणजन्य चिंतेच्या आगीने संतप्त झालेल्या राघव-भरतास तो रामवियोगाने उत्पन्न झालेला शोकाग्नी अधिकच जाळू लागला. ॥१७॥ | 
| प्रसृतः सर्वगात्रेभ्यः स्वेदं शोकाग्निसम्भवम् । यथा सूर्यांशुसन्तप्तो हिमवान् प्रसृतो हिमम् ॥ १८ ॥
 
 | ज्याप्रमाणे सूर्यकिरणांनी तापलेला हिमालय आपल्या वितळलेल्या बर्फाला वाहून देऊ लागतो, त्याच प्रकारे भरत शोकाग्नीने संतप्त झाल्याने आपल्या सर्व अंगातून घाम गाळू लागले. ॥१८॥ | 
| ध्याननिर्दरशैलेन विनिःश्वसितधातुना । दैन्यपादपसंघेन शोकायासाधिशृङ्गिणा ॥ १९ ॥
 
 प्रमोहानन्तसत्त्वेन संतापौषधिवेणुना ।
 आक्रान्तो दुःखशैलेन महता कैकयीसुतः ॥ २० ॥
 
 | त्यावेळी कैकेयीकुमार भरत दुःखाच्या पर्वताने आक्रांत झाले होते. श्रीरामांचे ध्यान हेच त्यांतील छिद्ररहित शिलांचा समूह होता. दुःखपूर्ण उच्छ्वासच गैरिक आदि धातूंचे स्थान घेत होते. दीनता (इंद्रियांची आपल्या विषयांपासून विमुखता)च वृक्षसमूहांच्या रूपात प्रतीत होत होती. शोकजनित आयासच त्या दुःखरूपी पर्वताची उंच शिखरे होती. अतिशय मोह हाच त्यातील अनंत प्राणी होते. बाहेर, आंत इंद्रियात होणारा संताप हाच त्या पर्वतातील औषधी आणि वेणुचे वृक्ष होते. ॥१९-२०॥ | 
| विनिःश्वसन् वै भृशदुर्मनास्ततः प्रमूढसंज्ञः परमापदं गतः ।
 शमं न लेभे हृदयज्वरार्दितो
 नरर्षभो यूथगतो यथर्षभः ॥ २१ ॥
 
 | त्यांचे मन फार दुःखी होते. ते दीर्घ श्वास घेत असता एकाएकी आपली शुद्ध हरवून फार मोठ्या आपत्तीत पडले. मानसिक चिंतेने पीडित झाल्यामुळे नरश्रेष्ठ भरतांना शांति मिळत नव्हती. आपल्या कळपापासून दुरावलेल्या वृषभासारखी त्यांची दशा झाली होती. ॥२१॥ | 
| गुहेन सार्धं भरतः समागतो महानुभावः सजनः समाहितः ।
 सुदुर्मनास्तं भरतं तदा पुन-
 र्गुहः समाश्वासयदग्रजं प्रति ॥ २२ ॥
 
 | परिवारासह एकाग्रचित्त महानुभाव भरत जेव्हा गुहास भेटले त्या समयी त्यांच्या मनात अत्यंत दुःख होते. ते आपल्या मोठ्या भावासाठी चिंतित झाले होते म्हणून गुहाने त्यांना पुन्हा आश्वासन दिले. ॥२२॥ | 
| इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे पञ्चाशीतितमः सर्गः ॥ ८५ ॥ 
 | याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा पंच्याऐंशीवा सर्ग पूरा झाला ॥८५॥ | 
|