[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ सप्तषष्टितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामलक्ष्मणकर्तृकं जटायुषो दर्शनं श्रीरामस्य तमाश्लिष्य रोदनम् -
श्रीराम आणि लक्ष्मणांची पक्षिराज जटायुशी भेट आणि श्रीरामांचे त्यास हृदयाशी धरून रडणे -
पूर्वजोऽप्युक्तमात्रस्तु लक्ष्मणेन सुभाषितम् ।
सारग्राही महासारं प्रतिजग्राह राघवः ॥ १ ॥
भगवान्‌ श्रीरामचंद्र सर्व वस्तूंचे सार ग्रहण करणारे आहेत. वयाने मोठे असूनही त्यांनी लक्ष्मणांनी सांगितलेली सारगर्भित उत्तम वचने ऐकून त्यांचा स्वीकार केला. ॥१॥
संनिगृह्य महाबाहुः प्रवृद्धं रोषमात्मनः ।
अवष्टभ्य धनुश्चित्रं रामो लक्ष्मणमब्रवीत् ॥ २ ॥
त्यानंतर महाबाहु श्रीरामांनी आपला वाढलेला राग आवरला आणि त्या विचित्र धनुष्याला उतरवून लक्ष्मणास म्हटले- ॥२॥
किं करिष्यावहे वत्स क्व वा गच्छाव लक्ष्मण ।
केनोपायेन पश्यावः सीतामिह विचिन्तय ॥ ३ ॥
वत्स ! आता आपण काय करावे ? कोठे जावे ? लक्ष्मणा ! कुठल्या उपायाने आम्हाला सीतेचा पत्ता लागेल ? येथे याचा विचार कर. ॥३॥
तं तथा परितापार्तं लक्ष्मणो वाक्यमब्रवीत् ।
इदमेव जनस्थानं त्वमन्वेषितुमर्हसि ॥ ४ ॥
तेव्हा लक्ष्मणाने संताप पीडित रामांना याप्रकारे म्हटले - बंधु ! आपल्या या जनस्थानातच सीतेचा शोध केला पाहिजे. ॥४॥
राक्षसैर्बहुभिः कीर्णं नानाद्रुमलतायुतम् ।
सन्तीह गिरिदुर्गाणि निर्दराः कन्दराणि व ॥ ५ ॥
नाना प्रकारचे वृक्ष आणि लता यांनी युक्त हे सघन वन अनेक राक्षसांनी भरलेले आहे. यात पर्वताच्यावर बरीचशी दुर्गम स्थाने, तुटलेले कडे आणि गुहा आहेत. ॥५॥
गुहाश्च विविधा घोरा नानामृगगणाकुलाः ।
आवासाः किन्नराणां च गन्धर्वभवनानि च ॥ ६ ॥
तेथे निरनिराळ्या प्रकारच्या भयंकर गुहा आहेत ज्या नाना प्रकारच्या मृगगणांनी भरलेल्या असतात. येथील पर्वतावर किन्नरांच्या राहाण्याची ठिकाणे आणि गंधर्वांची भवने ही आहेत. ॥६॥
तानि युक्तो मया सार्धं त्वमन्वेषितुर्महसि ।
त्वद्विधा बुद्धिसंपन्ना महात्मानो नरर्षभाः ॥ ७ ॥

आपत्सु न प्रकम्पन्ते वायुवेगैरिवाचलाः ।
माझ्या बरोबर येऊन आपण त्या सर्व स्थानात एकाग्रचित्त होऊन सीतेचा शोध करू. जसा पर्वत वायुच्या वेगाने विचलित होत नाही त्या प्रकारेच आपल्यासारखे बुद्धिमान्‌ महात्मे नरश्रेष्ठ आपत्तींनी विचलित होत नाहीत. ॥७ १/२॥
इत्युक्तस्तद् वनं सर्वं विचचार सलक्ष्मणः ॥ ८ ॥

क्रुद्धो रामः शरं घोरं सन्धाय धनुषि क्षुरम् ।
त्यांनी असे म्हटल्यावर श्रीरामांनी रोषपूर्वक आपल्या धनुष्यावर क्षुर नामक भयंकर बाण चढविला आणि लक्ष्मणासह तेथे सार्‍या वनात विचरण करू लागले. ॥८ १/२॥
ततः पर्वतकूटाभं महाभागं द्विजोत्तमम् ॥ ९ ॥

ददर्श पतितं भूमौ क्षतजार्द्रं जटायुषम् ।
तं दृष्ट्‍वा गिरिशृङ्‌गाभं रामो लक्ष्मणमब्रवीत् ॥ १० ॥
थोडेसे दूर गेल्यावर त्यांना पर्वताशिखराप्रमाणे विशाल शरीराचे पक्षिराज जटायु दिसून आले; जे रक्तात न्हाऊन पृथ्वीवर पडलेले होते. पर्वत शिखराप्रमाणे प्रतीत होणार्‍या त्या गृध्रराजाला पाहून श्रीराम लक्ष्मणास म्हणाले- ॥९-१०॥
अनेन सीता वैदेही भक्षिता नात्र संशसः ।
गृध्ररूपमिदं व्यक्तं रक्षो भ्रमति काननम् ॥ ११ ॥
लक्ष्मणा ! हा गृध्राच्या रूपात अवश्यच कुणी राक्षस असावा असे वाटत आहे. जो या वनात हिंडत राहात असतो. निःसंदेह यानेच वैदेही सीतेला खाऊन टाकले असावे. ॥११॥
भक्षयित्वा विशालाक्षीमास्ते सीतां यथासुखम् ।
एनं वधिष्ये दीप्ताग्रैः शरैर्घोरैरजिह्मगैः ।॥ १२ ॥
विशाल लोचना सीतेला खाऊन हा येथे सुखपूर्वक बसलेला आहे. मी प्रज्वलित अग्रभाग असलेल्या आणि सरळ जाणार्‍या आपल्या भयंकर बाणांनी याचा वध करीन. ॥१२॥
इत्युक्त्वाभ्यपतद् द्रष्टुं सन्धाय धनुषि क्षुरम् ।
क्रुद्धो रामः समुद्रान्तां चलयन्निव मेदिनीम् ।॥ १३ ॥
असे म्हणून क्रोधाविष्ट झालेले श्रीराम धनुष्यावर बाण चढवून समुद्रापर्यंत पृथ्वीला कंपित करीत त्याला पहाण्यासाठी पुढे गेले. ॥१३॥
तं दीनं दीनया वाचा सफेनं रुधिरं वमन् ।
अभ्यभाषत पक्षी स रामं दशरथात्मजम् ॥ १४ ॥
याच वेळी पक्षी जटायु आपल्या तोंडातून फेनयुक्त रक्त वमन करीत अत्यंत दीन वाणीने दशरथनंदन श्रीरामास म्हणाले- ॥१४॥
यामोषधिमिवायुष्मन्नन्वेषसि महावने ।
सा देवी मम च प्राणा रावणेनोभयं हृतम् ॥ १५ ॥
आयुष्यमान्‌ ! या महान वनात जिला औषधि प्रमाणे तुम्ही शोधत आहात त्या देवी सीतेला तसेच माझ्या या प्राणांना ही रावणाने हरण केले आहे. ॥१५॥
त्वया विरहिता देवी लक्ष्मणेन च राघव ।
ह्रियमाणा मया दृष्टा रावणेन बलीयसा ॥ १६ ॥
राघवा ! तुम्ही आणि लक्ष्मण नसतांना महाबली रावण आला आणि देवी सीतेचे हरण करून तिला घेऊन निघाला. त्यावेळी माझी दृष्टी सीतेवर पडली. ॥१६॥
सीतामभ्यवपन्नोऽहं रावणश्च रणे प्रभोमया ।
विध्वंसितरथच्छत्रः पातितो धरणीतले ॥ १७ ॥
प्रभो ! जशी माझी दृष्टी पडली तशी लगेच मी सीतेच्या सहाय्यासाठी धाव घेतली. रावणाशी माझे युद्ध झाले. मी त्या युद्धात रावणाचा रथ आणि छत्र आदि सर्व साधने नष्ट करून टाकली आणि तोही घायाळ होऊन पृथ्वीवर पडला. ॥१७॥
एतदस्य धनुर्भग्नमेते चास्य शरास्तथा ।
अयमस्य रथो राम भग्नः साङ्‌ग्रामिको रथःमया ॥ १८ ॥
श्रीरामा ! हे पहा त्याचे तुटलेले धनुष्य, हे आहेत त्याचे खण्डित झालेले बाण आणि हा आहे त्याचा युद्धोपयोगी रथ, जो युद्धात माझ्याकडून मोडून टाकला गेला आहे. ॥१८॥
अयं तु सारथिस्तस्य मत्पक्षनिहतो युधि ।
परिश्रान्तस्य मे पक्षौ छित्त्वा खड्गेन रावणः ॥ १९ ॥

सीतामादाय वैदेहीं उत्पपात विहायसम् ।
रक्षसा निहतं पूर्वं मां न हन्तुं त्वमर्हसि ॥ २० ॥
हा रावणाचा सारथी आहे, ज्याला मी आपल्या पंखानी मारून टाकले होते. जेव्हा युद्ध करता करता थकून गेलो, तेव्हा रावणाने तलवारीने माझे दोन्ही पंख कापले आणि तो वैदेही सीतेला घेऊन आकाशात उडाला. मी त्या राक्षसाच्या हाताने आधीच मारला गेलो आहे. आता तुम्ही मला मारू नका. ॥१९-२०॥
रामस्तस्य तु विज्ञाय सीतासक्तां प्रियां कथाम् ।
गृध्रराजं परिष्वज्य परित्यज्य महद् धनुः ॥ २१ ॥

निपपातावशो भूमौ रुरोद सहलक्ष्मणः ।
द्विगुणीकृततापार्तो रामो धीरतरोऽपि सन् ॥ २२ ॥
सीतेशी संबंध असणारी ही प्रिय वार्ता ऐकून श्रीरामचंद्रांनी आपले महान धनुष्य फेकून दिले आणि गृध्रराज जटायुला हृदयाशी धरून ते शोकाने विवश होऊन पृथ्वीवर पडले आणि लक्ष्मणासह रडू लागले. अत्यंत धीर असूनही श्रीरामांनी त्यासमयी दुप्पट दुःखाचा अनुभव घेतला. ॥२१-२२॥
एकमेकायने कृच्छ्रे निःश्वसन्तं मुहुर्मुहुः ।
समीक्ष्य दुःखितो रामः सौमित्रिमिदमब्रवीत् ॥ २३ ॥
असहाय्य होऊन एकमात्र ऊर्ध्वश्वासाच्या संकटपूर्ण अवस्थेत पडून वारंवार दीर्घश्वास घेणार्‍या जटायुकडे पाहून श्रीरामांना फार दुःख झाले. त्यांनी सौमित्रास म्हटले- ॥२३॥
राज्यं भ्रष्टं वने वासः सीता नष्टा मृतो द्विजः ।
ईदृशीयं ममालक्ष्मीर्दहेदपि हि पावकम् ॥ २४ ॥
लक्ष्मणा ! मी राज्यभ्रष्ट झालो, मला वनवास मिळाला, पित्याचा मृत्यु झाला. सीतेचे अपहरण झाले आणि हे माझे परम सहाय्यक पक्षिराजही मृत झाले. असे माझे दुर्भाग्य आहे. हे तर अग्निला ही जाळून भस्म करू शकते. ॥२४॥
संपूर्णमपि चेदद्य प्रतरेयं महोदधिम् ।
सोऽपि नूनं ममालक्ष्म्या विशुष्येत् सरितां पतिः ॥ २५ ॥
तर मी आज भरलेल्या महासागरात पोहू लागलो तर माझ्या दुर्भाग्याच्या आचेने तो सरितांचा स्वामी, समुद्रही निश्चितच सुकून जाईल. ॥२५॥
नास्त्यभाग्यतरो लोके मत्तोऽस्मिन् सचराचरे ।
येनेयं महती प्राप्ता मया व्यसनवागुरा ॥ २६ ॥
या चराचर जगतात माझ्याहून अधिक भाग्यहीन दुसरा कोणी ही नाही, ज्या अभाग्यामुळे मला या विपत्तीच्या फार मोठ्‍या जाळ्यात फसावे लागले आहे. ॥२६॥
अयं पितुर्वयस्यो मे गृध्रराजो महाबलः ।
शेते विनिहतो भूमौ मम भाग्यविपर्ययात् ॥ २७ ॥
हे महाबली गृध्रराज जटायु माझ्या पित्याचे मित्र होते. परंतु आज माझ्या दुर्भाग्याने मारले जाऊन या वेळी पृथ्वीवर पडले आहेत. ॥२७॥
इत्येवमुक्त्वा बहुशो राघवः सहलक्ष्मणः ।
जाटयुषं च पस्पर्श पितृस्नेहं विदर्शयन् ॥ २८ ॥
याप्रकारे बर्‍याच गोष्टी बोलून लक्ष्मणासहित राघवांनी जटायुच्या शरीरावरून हात फिरवला आणि पित्याच्या प्रति जसा स्नेह असावयास हवा तसाच स्नेह त्यांच्या प्रति प्रदर्शित केला. ॥२८॥
निकृत्तपक्षं रुधिरावसिक्तं
     तं गृध्रराजं परिगृह्य राघवः ।
क्व मैथिली प्राणसमा गतेति
     विमुच्य वाचं निपपात भूमौ ॥ २९ ॥
पंख कापले गेल्यामुळे गृध्रराज जटायु रक्तात न्हाऊन निघाले होते. त्याच अवस्थेत त्यांना गळ्याशी धरून राघवांनी विचारले- तात ! माझ्या प्राणाप्रमाणे प्रिय मैथिली सीता कोठे निघून गेली ? एवढेच बोलून ते पृथ्वीवर पडले. ॥२९॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे सप्तषष्टितमः सर्गः ॥ ६७ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अरण्यकाण्डाचा सदुषष्टावा सर्ग पूरा झाला. ॥६७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP