॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय सहासष्टावा ॥
बिभीषणाला राज्याभिषेक

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥


जो सकळलोकघातक । सकळधर्मावरोधक ।
सत्कर्मविच्छेदक । तो रामें दशमुख निवटिला ॥ १ ॥
शेतीं केली वाफधांवणी । जेंवी कृषीवल सुखावे मनीं ।
तेंवी निवटून दशाननी । रघुनंदनीं उल्लास ॥ २ ॥
दीक्षित याग आचरती । दुःसाध्य यज्ञ संपादिती ।
साधोनि केली पूर्णाहुती । पावती विश्रांती निजसुखें ॥ ३ ॥
तेंवी रामें करोनि ख्याती । सेतु बांधोनि अपांपती ।
राक्षसांची करोनि शांती । लंकापती निवटिला ॥ ४ ॥
श्रीराम याज्ञिक चोखत । रणभूमि तेचि यज्ञवाट ।
काळानळ अति श्रेष्ठ । हव्यवाट आव्हानिला ॥ ५ ॥
सुग्रीवादि हनुमंत । ऋत्विज सेनापति समस्त ।
बिभीषण साक्षी तेथ । कर्म सांगत चुकलें तें ॥ ६ ॥
परिसमूहन सडा होत । परिस्तरण शस्त्रें अद्‍भुत ।
पर्युक्षण अस्त्रांचें तेथ । अति आरक्त रुधिराचा ॥ ७ ॥
श्रीराम नेटाका यजमान । हविर्द्रव्य राक्षससैन्य ।
स्रुवा बाणाचा सुलक्षण । देत अवदान काळानळीं ॥ ८ ॥
तेथें येंत्राचें मंत्रघोष । सारी मारी पाडी देख ।
न मम म्हणतां रघुकुळटिळक । काळानळ देख स्वीकारी ॥ ९ ॥
हवीं होमिलें सकळिक । पूर्णाहतीसीं दशमुख ।
रामें घालोनि सकळिक । याग देख संपविला ॥ १० ॥
संपवोनि रणयज्ञ । हातींचें ठेविलें चाप बाण ।
तेंची अवभृथ झालें पूर्ण । राम विचक्षण याज्ञिक ॥ ११ ॥

नंतर श्रीराम ब्राह्मणांना दक्षिणा देतात :

ऋत्विजांसी निजदक्षिणा । देतां उल्लास रघुनंदना ।
एका सायुज्य दिधलें जाणा । विदेहत्वदान एकांसी ॥ १२ ॥
एका दिधलें अनंत सुख । एका दिधलें कीर्तन देख ।
नामें गर्जता हरिख । ब्रह्मांडलोक उद्धरती ॥ १३ ॥
ऐसें करोनि दक्षिणादान । रामें संपविला रणयज्ञ ।
ऋत्विज करोनियां प्रसन्न । श्रेयः संपादन विजयश्री ॥ १४ ॥
कोणी करिती अश्वमेध । एक करिती नरमेध ।
रामें केला राक्षसमेध । अति विशुद्ध याज्ञिक ॥ १५ ॥


ततो विमुक्तं सशरं शरासनम्
महेंद्रदत्तं कवचं रथं च ।
विमुच्यं रोपं रिपुनिग्रहे कृतम्
शशीव सौ‍म्यत्वमुपागमत्पुनः ॥१॥

परशुरामांकडून रावणवधासाठीं मिळालेला क्रोध रामांनी शांत केला :

निवटोनियां लंकापती । रणामाजी रणख्याती ।
करोनि हातींचे चाप रघुपती । ठेविलें क्षिती बाणेंसीं ॥ १६ ॥
परशुरामदत्त क्रोध । करावया रावणवध ।
झाला होता उद्‍बुद्ध । तोही निजानंद पावला ॥ १७ ॥
अग्नि पेटविल्या पाहे । हविर्द्रव्य निःशेष खाये ।
सवेंचि उपरत होवोनि राहे । लीन होये निजरुपीं ॥ १८ ॥
तेंवी श्रीरामाचा क्रोध । करोनियां रावणाचा वध ।
कार्य साधिलें अगाध । अति आल्हाद पावला ॥ १९ ॥
पुढें कांही कार्य स्थिती । पुसावया स्वामीप्रती ।
विनवूं पाहे विनीतवृत्तीं । तंव निजचित्ती आठवलें ॥ २० ॥
रामें पाहतां कृपादृष्टीं । ब्रह्मा स्रजी ब्रह्मांडकोटी ।
जयाची विक्षेपभृकुटी । सकळ सृष्टी संहारी ॥ २१ ॥
त्या श्रीरामाचें कार्य जाण । म्यां साधिलें आपण ।
ऐसी श्लाघ्यता करील कोण । श्रीरघुनंदनकृतकार्या ॥ २२ ॥
ऐसें विचारोनि चित्तीं । लागिन्नला निजवृत्ती ।
सांडोनि देहाहंकृती । क्रोध निजशांती पावला ॥ २३ ॥
इंद्रे पाठविला रथा । त्यास पूर्वीच रघुनाथ ।
आरुढला नाहीं तेथ । रावणघात पैं करितां ॥ २४ ॥
क्रोध नमूनि रघुपती । स्वयें पावला निजशांती ।
तेणें काळें श्रीराममूर्ती । शोभा अतिदीप्तीं शोभत ॥ २५ ॥
शोभा अति देदीप्यमान । प्रभा नव्हे ते अत्यंत उष्ण ।
अति शीतळ नव्हे जाण । विलक्षण प्रकाश ॥ २६ ॥
त्या प्रकाशातें देखतां । अति उल्लास वाटे चित्ता ।
देहाचें भान सर्वथा । आठवितां नाठवे ॥ २७ ॥
प्रबोधचंद्र रघुपती । नित्य‍उदय त्रिजगतीं ।
उदय अस्त निश्चितीं । अस्त पावती निजतेजें ॥ २८ ॥


तं रावणवधं दृष्ट्वा देवगंधर्वदानवाः ।
जग्मुः स्वैस्वैर्विमानैस्तु कपयंतः शुभाः कथा ॥२॥
अनुरागं च वीर्य च लक्ष्मणस्य च धीमतः ।
पातिव्रत्यं च सीताया हनूमंतः पराक्रमम् ॥३॥
रावणस्य वधं घोरं रामस्य च पराक्रमम् ।
सुयुद्धं वानराणां तु सुग्रीवस्य च मंत्रितम् ॥४॥


ऐसिया रामातें देखून । भ्याला आतुर्बळी दशानन ।
ज्यसी कांपे त्रिभुवन । तो क्षणें रामें निवटिला ॥ २९ ॥

श्रीरामांचा विमानस्थ देवांकडून जयजयकार व रामकथासंकीर्तन :

तेणें आनंदे सुरवर । विमानस्थ खेचर ।
अवघे करिती जयजयकार । हर्षे निर्भर आकाशीं ॥ ३० ॥
देव दानव गंधर्व । अप्सरादि गणसमुदाव ।
यक्षकिन्नरादि सर्व । महदाश्चर्य मानिती ॥ ३१ ॥
सकळमंगलदायक । सकळकलिमलविध्वंसक ।
श्रीरामकथा अलोकिक । वर्णिती देख अति प्रीतीं ॥ ३२ ॥
अतिघोरकर्मा रावण । त्रैलोक्या अजेय पुर्ण ।
तो वधिला न लागतां क्षण । विंधोन बाण श्रीरामें ॥ ३३ ॥
तेथें वाळीची गोष्टी कायसी । कोण गणी हो कबंधासी ।
खर दूषण त्रिशिरा यांसी । वधितां त्यासी वेळु न लगे ॥ ३४ ॥
महाबाहु कुंभकर्ण । विशाळरुप अति दारुण ।
खातां न पुरे त्रिभुवन । वधिला तो बाण विंधोनी ॥ ३५ ॥
बंदी घातली सुरमांदी । बंधूसह वधिला दुर्बद्धी ।
देव सोडविले बंदीं । किर्ति अगाध श्रीरामीं ॥ ३६ ॥
तैसाचि सौ‍मित्र निजसखा । श्रीराम सेवेलागीं देखा ।
तुच्छ केलें शरीरसुखा । आहार तों निःशेख वर्जिला ॥ ३७ ॥
चौदा वर्षे निराहारी । चौदा वर्षे ब्रह्मचारी ।
अति नैष्ठिकव्रतधारी । प्रीति थोरी रामसेवे ॥ ३८ ॥
अनिवार प्रेमथिले । निमेष रामसेवे न टळे ।
तेणें भजनें सामर्थ्य आलें । दुष्टा वधिलें इंद्रजिता ॥ ३९ ॥
चौदा वेळां सुरपती । बांधोनि आणिला निमेषगतीं ।
त्याची क्षणार्धे केली शांती । श्रीरामभक्तिप्रतापें ॥ ४० ॥
तैसाचि सुग्रीव कपिपती । लक्ष्मणें स्थापिला अति प्रीतीं ।
तेणें जीवित्व रघुपतीं । अर्पितां चित्तीं संतोष ॥ ४१ ॥
जेणें वीर रावणासारिखा । खेदक्षीण केला देखा ।
खेदक्षीण केला देखा । आतुर्बळियाचा आवाकां । छेदी नाका कुंभकर्णाच्या ॥ ४२ ॥

तशीच हनुमंताची स्तुती :

सकळांहूनि विचित्र । हनुमंतांचें चरित्र ।
अमल कीर्ति अति सुंदर । जेणें पवित्र त्रिलोक ॥ ४३ ॥
जेणें गांजिलें दशवक्त्रा । लंकेमाजीं केलें क्षत्रा ।
आश्वासिली सीता सुंदरा । युक्ति कपींद्रा अनिवारा ॥ ४४ ॥
न लागतां निमेषमात्र । एकलेनि वीरें सत्वर ।
शिळीं बुजोनियां सागर । सैन्य परपार पावविलें ॥ ४५ ॥
आणोनियां द्रोणाद्री । वांचविला सौ‍मित्री ।
अहिरावणाची करोनि बोहरी । स्वामी झडकरी सोडविला ॥ ४६ ॥
अगाध हनुमंताची कीर्ती । जेणें पावन त्रिजगती ।
तैसेचि सकळ जुत्पती । अगाध कीर्ती श्रीरामीं ॥ ४७ ॥
युद्ध करितां समरांगणीं । शिरें दुधड होती रणीं ।
पुच्छें बांधितां वेंटाळूनी । सवेचि रणीं मिसळती ॥ ४८ ॥
सीता माउली पतिव्रता । अवतार धरी सुरकार्यार्था ।
प्रबल छळितां लंकानाथा । नाहीं चित्ता विक्षेप ॥ ४९ ॥
श्रीरामवियोगें व्रतस्थ । फळ मूळ जळ समस्त ।
सर्वथा नातळे चित्त । सावचित्त रामभजनीं ॥ ५० ॥
श्रवणीं नित्य रामकथा । एकरुप होतां श्रोता वक्ता ।
सबाह्य स्वानंदसुखावस्था । श्रवण करितां रामाचें ॥ ५१ ॥
वाचेंसी नित्य रामगुण । वर्णितांचि आनंद पूर्ण ।
राक्षसीसी समाधान । देहाचें भान विसरल्या ॥ ५२ ॥
जानकीपासीं राखण असतां । विसरल्या निजक्रूरता ।
श्रीरामप्रेमें सदा डुल्लतां । समाधिअवस्था राक्षसींसी ॥ ५३ ॥
जानकीचे निजसंगती । तृणादिसकळ वनस्पती ।
आदिकरोनि पाषाणजाती । राम जपती अनिमेष ॥ ५४ ॥
जानकीचेनि धर्मे तेथें । आन न दिसे सर्वार्थें ।
राम भासे जेथें तेथें । निजरुपें पाहतांचि ॥ ५५ ॥
ऐसी एकांएकांची ख्याती । नामें पावन त्रिजगती ।
एवढी रामभक्ताची कीर्ती । तो रघुपती केंवी वर्णवे ॥ ५६ ॥
ऐसी श्रीरामाची गुणकीर्ती । आणि रामसेवकांची ख्याती ।
स्वर्गी वर्णीत सुरपती । निजधामाप्रती स्वयें गेले ॥ ५७ ॥

इंद्रसारथी मातलीकडून रामांस नमन व तो स्वर्गास जाण्याची आज्ञा विचारतो :

इंद्रसारथी विचक्षण । सुवर्णबंदी देदीप्यमान ।
रथाखालीं उतरोन । श्रीरघुनंदन नमियेला ॥ ५८ ॥
प्रांजळि होऊन विनवित । नमोनियां रघुनाथ ।
होवोनियां अति विनीत । आज्ञा पुसत स्वर्गगमना ॥ ५९ ॥
परिसोनियां रघुनंदन । अत्यादरें संतोषोन ।
गंभीर गिरा प्रसन्नवदन । मधुर वचन अनुवादे ॥ ६० ॥
काय कृपेसीं आले कोंभ । कीं अमृता निघाली जीभ ।
लावण्याचें निजवालभ । तैसी शोभा शब्दांची ॥ ६१ ॥


राघवेणाभ्यनुज्ञाते मातलिः शक्रसारथिः ।
दिव्यं तु रथमास्थाय दिवमेवाभ्यपात ह ॥५ ॥

रामांकडून मातलीची पूजा व इंद्राला निरोप :

अत्यादरें रघुपती । पूजोनियां शक्रसारथी ।
इंद्राप्रति विनंती । अति प्रीतीं सांगत ॥ ६२ ॥
तूं लोकपाळांचा राजा । तुझेनि सुखी विश्व प्रजा ।
निवटावया राक्षसराजा । संभाळा माझा तुंवा केला ॥ ६३ ॥
तुवां पाठविला रथ । शस्त्रास्त्रांसीं समवेत ।
तेणें बळें लंकानाथ । निमेषार्धांत निवटिला ॥ ६४ ॥
तुम्हीं अनुग्रह कराल ज्यासीं । तो रंकही राज्यपदासीं ।
सुखें चढे अनायासीं । सकळ भोगांसी भोगित ॥ ६५ ॥
अनुग्रहाचें बळ दारुण । तेणें निवटिला दशानन ।
काय तुमचें व्हावें उत्तीर्ण । म्हणोनि लोटांगण मौनेंचि ॥ ६६ ॥
ऐसें सांगतां मातलीसीं । येरु विस्मित मानसीं ।
राम स्तवितो इंद्रासी । जो या विश्वासीं जीवन ॥ ६७ ॥
ज्याची विक्षेपभ्‍रुकुटी । तळा आणि सकळ सृष्टी ।
तो इंद्राचा उपकार पोटीं । कृपेसाठीं वाहतसे ॥ ६८ ॥
अत्यादरें मातलीसी । वस्त्रें भूषणें देवोनि त्यासी ।
बोळवितां अति प्रीतींसीं । येरें साष्टांगेंसीं नमियेला ॥ ६९ ॥


परिष्वज्य च सुग्रीवं लक्ष्मणेनाभिनंदितः ।
पूज्यमानो हरिगणैराजगाम सुरालयम् ॥६॥

मातली श्रीरामांचा व सर्व लहानथोर वानरगणांचा निरोप घेतो :

करोनियां प्रदक्षिणा । मातलि लागला रामचरणा ।
तैसेंचि नमिलें लक्ष्मणा । सुग्रीवही जाणा नमियेला ॥ ७० ॥
रावणाचे मुखें जाण । सर्वगत रघुनंदन ।
जाणोनियां संपूर्ण । नमी वानरगण रामरुपें ॥ ७१ ॥
हनुमान आदि समग्र । जुत्पती जे कां लहानथोर ।
नमूनियां वेगवत्तर । जयजयकार पैं केला ॥ ७२ ॥
नमन करोनि सकळांसी । आरुढोनियां रथासीं ।
हर्षे गर्जत नामेंसीं । स्वधामासी तो गेला ॥ ७३ ॥
इंद्र होवोनि शरणागत । श्रीरामा पाठविला रथ ।
तें देखोनि अत्यद्‍भुत । आश्चर्य मानित सकळिक ॥ ७४ ॥
निवटिलिया रावण । खवळोनि वानरगण ।
विध्वंसावें लंकाभुवन । तंव रामशासन दुर्धर ॥ ७५ ॥
शिष्टाईचे वेळी अंगदें येथें । मंडपातें आणिलें होतें ।
तो परतोनि मागुतें । श्रीरामें तेथें पाठविला ॥ ७६ ॥
येणेचि भयें वानरगण । न पाहती लंकाभुवन ।
तंव देखोनियां बिभीषण । रघुनंदन बोलत ॥ ७७ ॥
ते श्रीरामाज्ञा असतां । वानरातें अनवाळी करितां ।
क्रोधें झालिया दंडिता । मग राकिता पैं कैंचा ॥ ७८ ॥

श्रीराम लक्ष्मणाला बिभीषणास अभिषेक करण्याची आज्ञा देतात :

ऐकें बापा लक्ष्मणा । दुष्टा निर्दाळिले रावणा ।
आतां निजभक्ता बिभीषणा । लंकाभुवना अभिषेकीं ॥ ७९ ॥
जेणें त्रासिले महर्षी । बंदी घातलें सुरवरांसी ।
त्या वधिलें रावणासी । आतां बिभीषणासी अभिषेकीं ॥ ८० ॥
जेणें हरिलें जानकीसी । आणि मारिलें जटायूसी ।
त्या वधिलें लंकेशासी । बिभीषणासी अभिषेकीं ॥ ८१ ॥
हित सांगतां प्रीतीसीं । लाता हाणितल्या बंधूसी ।
त्या निवटिलें रावणासी । बिभीषणासी अभिषकीं ॥ ८२ ॥


सौ‍मित्रिं सत्वसंपन्नं रामो लक्ष्मणमब्रवीत् ।
बीभषिणममुं सौ‍म्य लंकायामभिषेचय ॥७॥
अनुरक्तं च भक्तं च तथा पूर्वोपकारिणम् ।
एष मे परमः कामो यदहं रावणानुजम् ॥८॥
लंकायां सौ‍म्य पश्येयमभिषिक्तं बिभीषणम् ॥९॥

बिभीषणाला राज्याभिषेक करणे हे आपले व्रताचरण असे राम सांगतात :

सौ‍मित्रा बंधु लक्ष्मणा । सत्वसंपन्न बिभीषणा ।
करावोनियां मंगलस्नाना । सिंहासना अभिषेकीं ॥ ८३ ॥
आमचे मित्रत्वालागीं जाण । स्वकुळ निर्दाळिलें आपण ।
महामोहाचें आयतन । तो अहंरावण मारविला ॥ ८४ ॥
आमचे भक्तीलागीं वहिलें । जेणें सर्वस्व अर्पिलें आपुलें ।
तया बिभीषणा पहिलें । अभिषेकिलें पाहिजे ॥ ८५ ॥
हेंचि आम्हां निजव्रत । हेचि परम आचरित ।
हेंचि अनुष्ठान समस्त । जें शरणागत स्थापावा ॥ ८६ ॥
हाचि आम्हां पुरुषार्थ । हाचि आम्हां इत्यर्थ ।
हाचि आम्हां सिद्ध्यर्थ । जें शरणागत स्थापावा ॥ ८७ ॥
हाचि आम्हां परमार्थ । हाचि आम्हां भावार्थ ।
येणेंचि आमचा सत्यार्थ । जें शरणागत स्थापावा ॥ ८८ ॥
हा काळवरी नवस । नवसिले होते बहुवस ।
ते उजवावे सावकाश । बिभीषणा स्थापनी ॥ ८९ ॥
माझ्या डोळियांची धणी । सौ‍मित्रा पुरवीं झडकरोनी ।
बिभीषणा अभिषेचूनी । आरुढ सिंहासनीं मज दावीं ॥ ९० ॥
सिंहासनीं शरणागता । आरुढला न देखतां ।
मज होतसे परमावस्था । बोलीं सर्वथा न बोलवे ॥ ९१ ॥
ऐसें बोलतां रघुनाथ । अभिषेकालागीं त्वरित ।
सौ‍मित्र सिद्ध झाला तेथ । हर्षयुक्त स्वानंदे ॥ ९२ ॥

श्रीराम स्वतः अभिषेकाला येणार नाहीत म्हणून बिभीषणाला दुःख :

तें देखोनि बिभीषण । झाला अत्यंत उद्विग्न ।
श्रीराम न येवोनि आपण । सांगे अभिषिंचन सौ‍मित्रा ॥ ९३ ॥
या शब्दाचा कवण हेत । म्हणोनि झाला चिंताकांत ।
अभिषेका न ये श्रीरघुनाथ । म्हणोनि स्फुंदत अति दुःखी ॥ ९४ ॥
कोणासी पुसूं हा विचार । कोण जाणेल अंतर ।
क्षोभावया रघुवीर । काय विचार पैं झाला ॥ ९५ ॥
सांडूनियां रघुनंदन । सर्वथा राज्य न करीं जाण ।
न पाहें मी लंकाभुवन । सुख कोण अभिषेका ॥ ९६ ॥
म्हणोनियां म्लानवदन । अत्यंत झाला बिभीषण ।
ते देखोनियां वायुनंदन । पुसे आपण अति प्रीतीं ॥ ९७ ॥

दुःखित बिभीषणाला मारुतीने त्याची चिंता विचारल्यावरुन बिभीषण कारण सांगतो :

बिभीषणा सर्वज्ञा । समय आला अभिषिंचना ।
आणि दिसतोसी म्लानवदना । हीं विवंचना लक्षेना ॥ ९८ ॥
ऐकोनियां त्याचें वचन । येरें घातलें लोटांगण ।
सद्‌गुरुवीण अंतरज्ञान । जाणता आन असेना ॥ ९९ ॥
ऐकें स्वामी वायुनंदना । रामें आज्ञापिलें लक्ष्मणा ।
जे अभिषेकावें बिभीषणा । तेणें मना अति चिंता ॥ १०० ॥
जरी प्रीति होती चित्तीं । तरी येवोनि रघुपती ।
अभिषेकीचना स्वहस्तीं । तेणे चित्तीं अति चिंता ॥ १ ॥
ऐसें ऐकोनि हनुमंता । अति विस्मय झाला चित्ता ।
पुसावया रघुनाथा । होय विचारिता मारुती ॥ २ ॥
अभिषेकालागीं जाण । त्वरा करितां लक्ष्मण ।
म्लान देखोनि बिभीषण । श्रीरघुनंदन पूसत ॥ ३ ॥
सौ‍मित्रा विलंब कायसा येथ । वेगीं अभिषेकीं शरणागत ।
ऐकोनियां हनुमंत । काय बोलत तें ऐका ॥ ४ ॥

बिभीषणाचें मनोगत मारुतीने अत्यंत परखड शब्दांत
रामांना सांगून स्वतः राज्याभिषेक करण्यास सांगितले :

जो वोळगणा सर्वांगाचा । जो लाडका श्रीरामाचा ।
राम आज्ञाधारक ज्याचा । ऐकें त्याचा वचनार्थ ॥ ५ ॥
भजनाचेनि पडिभरें । सायुज्य जेथें न सरे ।
तो हनुमान अति निष्ठुरें । बोलत उत्तरें रामासीं ॥ ६ ॥
राज्याभिलाष तुझे पोटीं । आणि सौ‍मित्रासी उठाउठीं ।
अभिषेकाची सांगसी गोष्टी । ते न मने सृष्टी श्रीरामा ॥ ७ ॥
अंतरीं लोभाचें ठाणें । बाह्य विरक्ती मिरवणें ।
लौकिकासी जोगावणे । समर्थ करणें कळेना ॥ ८ ॥
राज्यभिलाष बिभीषणा । सर्वथा नाही रघुनंदना ।
तूं आरुढोनि सिंहासना । लंकाभुवना अंगीकारीं ॥ ९ ॥
अनुसरोनि रामासी । जो राज्यातें अभिलाषीं ।
तेणें बुडविलें धर्मासी । अधःपातासी स्वयें गेला ॥ ११० ॥
यालागीं गा रघुनाथा । लंका अंगीकारोनि आतां ।
चरणीं स्थापीं शरणागता । विचार अन्यथा न करावा ॥ ११ ॥
म्हणोनि घातलें लोटांगण । अंगीकारीं सिंहासन ।
अंगीकारीं राजभुवन । विचार आन न करावा ॥ १२ ॥

तू का रागावलास ? श्रीरामाचा प्रश्न :

ऐसें विनवितां हनुमंता । आश्चर्य झालें रघुनाथा ।
सविस्तर वृत्तांत न कळतां । कोण्या अर्था कोपसी ॥ १३ ॥
केंवी माझा लोभ कळला । कोण्या अर्थी कोप आला ।
बिभीषण अव्हेरिला । या बोला मज न साहवे ॥ १४ ॥
प्राण जाईल जावो सुखें । परी बिभीषण असावा सुखें ।
म्हणोनि नवसियेलें अनेकें । मी निजहरिखें नवसित ॥ १५ ॥
बिभीषणा सिंहासनीं । कैं देखेन राजधानीं ।
ऐसें नवसीं अनुदिनीं । प्रतिक्षणीं चिंतित ॥ १६ ॥
ते हनुमंता आजि समस्त । माझे पुरले मनोरथ ।
अभिषेकितां शरणागत । हर्षित चित्त पैं माझें ॥ १७ ॥


वाचादत्तं मनोदत्तं धारादत्तं न दीयते ।
अरण्ये निर्ज्ले देशे दाता भवति सूकरः ॥१०॥

वाग्दानाचें लक्षण, असत्यवाणीचे दुष्परिणाम श्रीराम मारुतीला सांगतात :

एक करिती धारादन । एक करिती मनोदान ।
एक करिती वाग्दान । ऐक लक्षण तयाचें ॥ १८ ॥
मनें मर्मे आणि वचनें । दिधलें दान नेदीं म्हणे ।
सुकर होवोनि वसवी वनें । फळजळाविणे पैं देखा ॥ १९ ॥
आपण तरी प्रत्यक्षते । प्राप्त न होतां लंकेतें ।
अभिषेकिले बिभीषणातें । त्या वचनास केंवी सांडो ॥ १२० ॥
ज्याची प्रतिज्ञा लटकी होये । धरा त्याचा भार न साहे ।
विजयश्री केंवी लाहे । निंद्य होय जगामाजी ॥ २१ ॥
अनृतवादी जे जन । अपत्याचें जीवन ।
विजयश्री आपण । जाणें सांडून तेणें पापें ॥ २२ ॥
अनृतवादियाचे देहीं । तेज सर्वथा नाहीं ।
कळाहीन सदा पाहीं । जग तेंही निंदित ॥ २३ ॥
अनृतवादियाचा प्राण । भाररुप वाहे पवन ।
जीवें जीतां प्रेतचिन्ह । भासे संपूर्ण जगासी ॥ २४ ॥
त्याचें जे कां हृदयाकाश । तमें वसविलें सावकाश ।
परमार्थाचें घर ओस । झालें निःशेष सर्वथा ॥ २५ ॥
सत्यप्रतिज्ञेचे ने नर । ते जैं सांडिती उत्तर ।
तैं स्वर्गस्थ त्यांचे पितर । ते सत्वर पैं खचती ॥ २६ ॥
पापाचें तें अधिष्ठान । नरकाचें तें निजभवन ।
तेथूनि त्यांसी नाहीं निर्गमन । स्वयेंचि जाण निजनरक ॥ २७ ॥

स्वतः लंकेत न जाण्याचे कारण श्रीराम सांगतात :

यालागीं वायुनंदन । सुर्यवंशी राजे जाण ।
एकनिष्ठ सत्यप्रतिज्ञ । धर्मभूषण वंशासीं ॥ २८ ॥
ते वंशीचा दाशरथी । माझें नाम रघुपती ।
तो जैं सांडीं वचनोक्ती । तैं अपकीर्ती जोडिली ॥ २९ ॥
तुम्हासी संदेह निजचित्तीं । तोही कळला निश्चितीं ।
अभिषेका न येचि रघुपती । ऊर्मिलापती पाठवितो ॥ १३० ॥
हाचि सकळांचा भावो । त्याचा ऐका अभिप्रावो ।
लंका दान दिधलें पहा वो । सर्वथा जावों नये तयांत ॥ ३१ ॥
दाता निघे जैं दानांत । त्याचें श्रेय गेलें वाताहत ।
नव्हे स्वार्थ ना परमार्थ । वृथा जीवित लौकिकीं ॥ ३२ ॥
यालागीं श्रीरघुनंदन । लंकेमाजी न ये जाण ।
बिभीषणाचें अभिषिंचन । केलें दर्शन होतांचि ॥ ३३ ॥

तरी अनमान न करिता सर्वांनी मिळून बिभीषणाला अभिषेक करावा :

आतां यावें अभिषिंदना । तैं बाध आला प्रथमवचना ।
आन सर्वथा न करा जाणा । लंकाभुवना न पाहें ॥ ३४ ॥
जीवाचा जीव तूं कपिनायाका । सीताशुद्धि आणिल्या देखा ।
वाळूची करोनि दाविली लंका । वोल देखा गुंतली ते ॥ ३५ ॥
ज्यासीं वोल गुंतली राहे । वृथा त्याचें जिणें काये ।
यश कोठेंचि न लाहे । निंद्य होहे लौकिकीं ॥ ३६ ॥
नजिभक्ताचें क्रीडाभुवन । सर्वथा गुंतो नेदीं जाण ।
वोल सोडवावयालागून । स्वयें लक्ष्मण आज्ञापिला ॥ ३७ ॥
तंव विपरीत झालें तेथ । न कळतांहि हा इत्यर्थ ।
क्षोभलासी तूं हनुमंत । शरणागतही क्षोभला ॥ ३८ ॥

सर्वांच्या गैरसमजामुळे त्यांची राम क्षमा मागतात :

सकळां माझें लोटांगण । क्षमा करावी आपण ।
सकळिकीं लंके जाऊन । बिभीषण अभिषेकावा ॥ ३९ ॥
अकोनियां तें वचन । तटस्थ झाले सकळ जन ।
अगाध श्रीरामाचें ज्ञान । अनवच्छिन्न निर्लोभ ॥ १४० ॥


तथेत्युक्त्वा सुसंहृष्टः सौवर्ण घटमाददे ।
कुंभेन तेन सौ‍मित्रिभ्यषिंचद्विभीषणम् ॥११॥

रामाज्ञेने अभिषेकाची पूर्तता :

ऐकोनि श्रीरामाचें वचन । अति आल्हादें लक्ष्मण ।
मस्त्कांजलि करोनि नमन । अभीषिंचन आरभी ॥ ४१ ॥
आज्ञापितां हनुमंता । अति उल्लास झाला चित्ता ।
सामग्री अति आदरता । होय करिता स्वानंदें ॥ ४२ ॥
नगर शृंगारिलें कोडें । गुढिया मखरें कुंकुमसडे ।
मुक्ताफळांचे सुहाडे । चौक निवाडें शोभती ॥ ४३ ॥
सप्त मृत्तिका सत्वर । सप्त सागरींचें नीर ।
अष्ट पल्लव परिकर । अत्यादरें आणिले ॥ ४४ ॥
प्रेमाथिला सुवर्णकुंभ । उदकें भरुनी स्वयंभव ।
तेचि सहस्रधारा प्रेमवालभ । अति सुलभ अभिषेक ॥ ४५ ॥
सद्विवेक परिकर । तेंचि भद्रपीठ औंदुबर ।
साधूनियां विरक्तिव्याघ्र । चर्म सनखाग्र अनाहत पैं ॥ ४६ ॥
गादी बोधाची सुलक्षण । दैल विरज शोभायमान ।
आरुढावया बिभीषण । सिंहासनसामग्री ॥ ४७ ॥
सौ‍मित्र येवोनि आपण । श्रीरामकृपेचें सिंचन जाण ।
अभिषेकोनि बिभीषण । सिंहासनीं पूर्ण बैसविला ॥ ४८ ॥
चिद्रत्‍नांचे अलंकार । ते लेवविले परिकर ।
चिदंबरें मनोहर । वस्त्रें परिकर शोभती ॥ ४९ ॥
अनन्यप्रीतीचीं सुमनें । गुफोनियां अनुसंधानें ।
शृगारिलें सुमित्रानंदनें । शरणागता शरण्य कृआळू ॥ १५० ॥
सोहंभावाचें नीराजन । कुरवंडी बिभीषण ।
अति प्रीतीं सुमित्रानंदन । ओंवळून सांडित ॥ ५१ ॥
तेणें काळें बिभीषण । भद्रीं अति विराजमान ।
देखोनियां वायुनंदन । करी निंबलोण सर्वस्वें ॥ ५२ ॥
दीपावळी नीराजनें । ओंवाळिती जीवप्राणें ।
देती किराण रामनामें ॥ ५३ ॥
अनन्यगतीचे वाग्जल्प । वर्णितां श्रीरामप्रताप ।
नामें गर्जती अमूप । सत्यसंकल्प श्रीराम ॥ ५४ ॥
देहत्रिकूटनिवासी । वधूनि अहंरावणासी ।
मुक्त करोनि लंकेसी । शरणागतासी स्थापिलें ॥ ५५ ॥
राक्षसमंडळीमाझारीं । बिभीषण सहपरिवारीं ।
शोभता झाला निजगजरीं । कृपेंकरीं रामाचे ॥ ५६ ॥

कृपामूर्ती श्रीरामांमुळे शरणागत सिंहासनस्थ झाला :

राम कृपेचें जीवन । राम कृपेचें अधिष्ठान ।
रामकृपा सनातन । बिभीषण शोभत ॥ ५७ ॥
श्रीराम कृपेचा पुतळा । श्रीराम कृपेचा कोंवळा ।
श्रीराम कृपेचा वहिला । निजराज्य पावला बिभीषण ॥ ५८ ॥
अति प्रीतीं शरण आला । अति प्रीतीं आश्वासिला ।
स्वराज्य देखोनि वहिला । स्वपदीं स्थापिला निजभक्त ॥ ५९ ॥
नगरनागरिकां समस्तां । अति प्रीतीं राक्षसवनितां ।
पुर्णकुंभ जळभरिता । दधि मधु अक्षता सुमन दुर्वा ॥ १६० ॥
लाजा घेवोनि अति प्रीतीं । राक्षसवनिता तेथें येती ।
श्रीरामाची अमल कीर्तीं । ओंवाळिती बिभीषण ॥ ६१ ॥
एका जनार्दना शरण । शरणागत बिभीषण ।
स्वराज्यीं स्थापूनियां पूर्ण । कीर्ती पावन तिहीं लोकीं ॥ ६२ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
बिभीषणराज्यभिषेचनं नाम षट्षष्टितमोऽध्यायः ॥ ६६ ॥
ओंव्या ॥ १६२ ॥ श्लोक ॥ ११ ॥ एवं ॥ १७३ ॥


GO TOP