श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ पञ्चमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामसुग्रीवयोर्मैत्री, श्रीरामेण वालिवधाय प्रतिज्ञाकरणं च - श्रीराम आणि सुग्रीवांची मैत्री तसेच श्रीराम द्वारा वाली वधाची प्रतिज्ञा -
ऋश्यमूकात्तु हनुमान् गत्वा तु मलयं गिरिम् ।
आचचक्षे तदा वीरौ कपिराजाय राघवौ ॥ १ ॥
दोन्ही राघवांना (रामलक्ष्मणांना) ऋष्यमूक पर्वतावर सुग्रीवांच्या निवास-स्थानी बसवून हनुमान् तेथून मलयपर्वतावर गेले. (जे ऋष्यमूक पर्वताचेच एक शिखर आहे.) आणि तेथे वानरराज सुग्रीवांना त्या दोघा रघुवंशी वीरांचा परिचय देतांना याप्रकारे बोलले- ॥१॥
अयं रामो महाप्राज्ञः संप्राप्तो दृढविक्रमः ।
लक्ष्मणेन सह भ्रात्रा रामो ऽयं सत्यविक्रमः ॥ २ ॥
’महाप्राज्ञ ! ज्यांचा पराक्रम अत्यंत दृढ आणि अमोघ आहे ते श्रीराम आपला भाऊ लक्ष्मण यांसह आलेले आहेत.’ ॥२॥
इक्ष्वाकूणां कुले जातो रामो दशरथात्मजः ।
धर्मे निगदितश्चैव पितुर्निर्देशकारकः ॥ ३ ॥
’या रामांचा आविर्भाव इक्ष्वाकुकुळात झालेला आहे. ते महाराज दशरथांचे पुत्र आहेत आणि स्वधर्मापालनसाठी संसारात विख्यात आहेत. आपल्या पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी या वनांत त्यांचे आगमन झाले आहे. ॥३॥
राजसूयाश्वमेधैश्च वह्निर्येनाभितर्पितः ।
दक्षिणाश्च तथोत्सृष्टा गावः शतसहस्रशः ॥ ४ ॥

तपसा सत्यवाक्येन वसुधा येन पालिता ।
स्त्रीहेतोस्तस्य पुत्रोऽयं रामोऽरण्यं समागतः ॥ ५ ॥
’ज्यांनी राजसूय आणि अश्वमेध यज्ञांचे अनुष्ठान करुन अग्निदेवांना तृप्त केले होते, ब्राह्मणांना बरीचशी दक्षिणा (दिली होती) वाटली होती आणि लाखो गायी दान दिल्या होत्या; ज्यांनी सत्यभाषणपूर्वक तपाच्या द्वारा वसुधेचे पालन केले होते; त्याच महाराज दशरथांचे पुत्र हे श्रीराम पित्याद्वारा पत्‍नी कैकेयीस दिल्या गेलेल्या वराचे पालन करण्याच्या निमित्ताने वनात आले आहेत. ॥४-५॥
तस्यास्य वसतोऽरण्ये नियतस्य महात्मनः ।
रावणेन हृता भार्या स त्वां शरणमागतः ॥ ६ ॥
’महात्मा राम मुनिंच्या प्रमाणे नियमाचे पालन करीत दण्डकारण्यात निवास करीत होते. एक दिवस रावणाने येऊन शून्य आश्रमांतून यांची पत्‍नी सीता हिचे अपहरण केले. तिच्या शोधात आपली सहाय्यता घेण्यासाठी ते आपणास शरण आले आहेत. ॥६॥
भवता सख्यकामौ तौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।
प्रतिगृह्यार्चयस्वैतौ पूजनीयतमावुभौ ॥ ७ ॥
’हे दोघे भाऊ राम आणि लक्ष्मण आपल्याशी मैत्री करी इच्छितात. आपण येऊन यांना आपलेसे करावे आणि यांचा यथोचित सत्कार करावा कारण हे दोन्ही वीर आम्हा लोकासाठी परम पूजनीय आहेत.’ ॥७॥
श्रुत्वा हनुमतो वाक्यं सुग्रीवो वानराधिपः ।
दर्शनीयतमो भूत्वा प्रीत्या प्रोवाच राघवम् ॥ ८ ॥
हनुमानाचे हे वचन ऐकून वानरराज सुग्रीव स्वेच्छेने अत्यंत दर्शनीय रूप धारण करून राघवाजवळ आले आणि अत्यंत प्रेमाने म्हणाले- ॥८॥
भवान् धर्मविनीतश्च विक्रांतः सर्ववत्सलः ।
आख्याता वायुपुत्रेण तत्त्वतो मे भवद्गुचणाः ॥ ९ ॥
’प्रभो ! आपण धर्माच्या विषयी उत्तम प्रकारे सुशिक्षित, परम तपस्वी आणि सर्वांवर दया करणारे आहात. पवनपुत्र हनुमानाने माझ्याजवळ आपल्या यथार्थ गुणांचे वर्णन केलेले आहे. ॥९॥
तन्मयैवैष सत्कारो लाभश्चैवोत्तमः प्रभो ।
यत्त्वमिच्छसि सौहार्दं वानरेण मया सह ॥ १० ॥
’भगवन्! मी वानर आहे आणि आपण नर ! माझ्या बरोबर आपण जे मैत्री करू इच्छित आहात त्यात माझाच सत्कार आहे आणि मलाच उत्तम लाभ प्राप्त होत आहे. ॥१०॥
रोचते यदि वा सख्यं बाहुरेष प्रसारितः ।
गृह्यतां पाणिना पाणिर्मर्यादा बध्यतां ध्रुवा ॥ ११ ॥
’जर माझी मैत्री आपल्याला पसंत असेल तर हा माझा हात पसरलेला आहे. आपण यास आपल्या हातात घ्यावे आणि परस्पर मैत्रीचा अतूट संबंध बनून राहावा यासाठी स्थिर मर्यादा बांधून द्यावी.’ ॥११॥
एतत्तु वचनं श्रुत्वा सुग्रीवेण सुभाषितम् ।
स प्रहृष्टमना हस्तं पीडयामास पाणिना ॥ १२ ॥

हृद्यं सौहृदमालंब्य पर्यष्वजत पीडितम् ।
सुग्रीवाचे हे सुंदर वचन ऐकून भगवान् श्रीरामांचे चित्त प्रसन्न झाले. त्यांनी आपल्या हातांनी त्याचा हात पकडून दाबला आणि सौहार्दाचा आश्रय घेऊन अत्यंत आनंदाने शोकपीडित सुग्रीवास हृदयाशी धरले. ॥१२ १/२॥
ततो हनूमान् संत्यज्य भिक्षुरूपमरिंदमः ॥ १३ ॥

काष्ठयोः स्वेन रूपेण जनयामास पावकम् ।
(सुग्रीवाजवळ जाण्यापूर्वी हनुमानांनी पुन्हा भिक्षुरूप धारण केले होते.) श्रीराम आणि सुग्रीवाच्या मैत्रीच्या समयी शत्रुदमन हनुमानांनी भिक्षुरूपास त्यागून आपले स्वाभाविक रूप धारण केले आणि दोन लाकडे घासून अग्नि प्रज्वलित केला. ॥१३ १/२॥
दीप्यमानं ततो वह्निं पुष्पैरभ्यर्च्य सत्कृतम् ॥ १४ ॥

तयोर्मध्ये ऽथ सुप्रीतो निदधे सुसमाहितः ।
त्यानंतर तो अग्नि प्रज्वलित करून त्यांनी फुलांनी अग्निदेवाचे सादर पूजन केले; नंतर एकाग्रचित्त होऊन राम आणि सुग्रीव यांच्यामध्ये साक्षीरूपात त्या अग्निला प्रसन्नतापूर्वक स्थापित केले. ॥१४ १/२॥
ततो ऽग्निं दीप्यमानं तौ चक्रतुश्च प्रदक्षिणम् ॥ १५ ॥

सुग्रीवो राघवश्चैव वयस्यत्वमुपागतौ ।
त्यानंतर सुग्रीव आणि श्रीरामांनी त्या प्रज्वलित अग्निची प्रदक्षिणा केली आणि दोघे एक दुसर्‍याचे मित्र बनले. ॥१५ १/२॥
ततः सुप्रीतमनसौ तावुभौ हरिराघवौ ॥ १६ ॥

अन्योन्यमभिवीक्षंतौ न तृप्तिमुपजग्मतुः ।
यामुळे त्या वानररज आणि राघव दोघांच्या हृदयात फार प्रसन्नता वाटली. ते एक दुसर्‍याकडे पहात असता तृप्त होत नव्हते. ॥१६ १/२॥
त्वं वयस्यो ऽसि मे हृद्यो ह्येकं दुःखं सुखं च नौ ॥ १७ ॥

सुग्रीवो राघवं वाक्यमित्युवाच प्रहृष्टवत् ।
त्या समयी सुग्रीवांनी राघवास प्रसन्नतापूर्वक म्हटले- ’आपण माझे प्रिय मित्र आहात. आज पासून आपणा दोघांचे दुःख आणि सुख एक आहे.’ ॥१७ १/२॥
ततः स पर्णबहुलां छित्त्वा शाखां सुपुष्पिताम् ॥ १८ ॥

सालस्यास्तीर्य सुग्रीवो निषसाद सराघवः ।
असे म्हणून सुग्रीवांनी जास्त पाने आणि फुले असलेली शाल वृक्षांची एक शाखा तोडली आणि ती पसरून ते राघवासह तिच्यावर बसले. ॥१८ १/२॥
लक्ष्मणायाथ संहृष्टो हनुमान् प्लवगर्षभः ॥ १९ ॥

शाखां चंदनवृक्षस्य ददौ परमपुष्पिताम् ।
त्यानंतर पवनपुत्र हनुमानाने अत्यंत प्रसन्न होऊन चंदन वृक्षाची एक खूप फुले लागलेली फांदी तोडून लक्ष्मणांना बसण्यासाठी दिली. ॥१९ १/२॥
ततः प्रहृष्टः सुग्रीवः श्लक्ष्णं मधुरया गिरा ॥ २० ॥

प्रत्युवाच तदा रामं हर्षव्याकुललोचनः ।
नंतर ज्यांचे नेत्र हर्षाने फुललेली होते त्या सुग्रीवांनी हर्षाने त्यासमयी भगवाम् श्रीरामांना स्निग्ध मधुर वाणीमध्ये म्हटले- ॥२० १/२॥
अहं विनिकृतो राम चरामीह भयार्दितः ॥ २१ ॥

हृतभार्यो वने त्रस्तो दुर्गमे तदुपाश्रितः ।
’रामा ! मला घरांतून घालवून देण्यात आलेले आहे आणि भयाने पीडित होऊन मी येथे विचरत आहे. माझी पत्‍नीही माझ्यापासून हिरावून घेतली गेली आहे. मी आतंकित होऊन वनात या दुर्गम पर्वताचा आश्रय घेतला आहे. ॥२१ १/२॥
सो ऽहं त्रस्तो वने भीतो वसाम्युद्‌भ्रांतचेतनः ॥ २२ ॥

वालिना निकृतो भ्रात्रा कृतवैरश्च राघव ।
’राघवा ! माझा मोठा भाऊ वाली याने मला घरांतून घालवून देऊन माझ्याशी वैर धरले आहे. त्याच्या त्रासाने आणि भयाने उद्‌भ्रांत्तचित्त होऊन मी या वनात निवास करीत आहे. ॥२२ १/२॥
वालिनो मे महाभाग भयार्तस्याभयं कुरु ॥ २३ ॥

कर्तुमर्हसि काकुत्स्थ भयं मे न भवेद्यथा ।
’महाभाग ! वालीच्या भयाने पीडित झालेल्या मला सेवकाला आपण अभय-दान द्यावे. काकुत्स्थ ! ज्या योगे मला कुठल्याही प्रकारचे भय राहाणार नाही असे आपण केले पाहिजे.’ ॥२३ १/२॥
एवमुक्तस्तु तेजस्वी धर्मज्ञो धर्मवत्सलः ॥ २४ ॥

प्रत्यभाषत काकुत्स्थः सुग्रीवं प्रहसंनिव ।
सुग्रीवाने असे म्हटल्यावर धर्माचे ज्ञाता, धर्मवत्सल, काकुत्स्थ तेजस्वी रामांनी हसत हसत तेथे सुग्रीवास या प्रकारे उत्तर दिले- ॥२४ १/२॥
उपकारफलं मित्रं विदितं मे माहकपे ॥ २५ ॥

वालिनं तं वधिष्यामि तव भार्यापहारिणम् ।
’महाकपे ! मला माहीत आहे की मित्र उपकाररूपी फल देणारा असतो. मी तुमच्या पत्‍नीचे अपहरण करणार्‍या वालीचा वध करीन. ॥२५ १/२॥
अमोघाः सूर्यसंकाशा ममैते निशिताः शराः ॥ २६ ॥

तस्मिन् वालिनि दुर्वृत्ते निपतिष्यंति वेगिताः ।
कङ्‌कपत्रप्रतिच्छन्ना महेंद्राशनिसंनिभाः ॥ २७ ॥

तीक्ष्णाग्रा ऋजुपर्वाणाः सरोषा भुजगा इव ।
’माझ्या तूणीरात (भात्यात) संगृहित हे सूर्यतुल्य तेजस्वी बाण अमोघ आहेत- यांचा वार व्यर्थ जात नाही. हे अत्यंत वेगवान् आहेत. यांच्यात कंक पक्ष्याच्या पंखाची पिसे लावलेली आहेत, ज्यांनी हे आच्छादित आहेत. यांचा अग्रभाग फार तीक्ष्ण आहे आणि गतीही सरळ आहे. हे रोषाने भरलेल्या सर्पासमान सुटतात आणि इंद्राच्या वज्राप्रमाणे भयंकर प्रहार (आघात) करतात. त्या दुराचारी वालीवर माझे बाण अवश्य पडतील. ॥२६-२७ १/२॥
तमद्य वालिनं पश्य क्रूरैराशीविषोपमैः ॥ २८ ॥

शरैर्विनिहतं भूमौ विकीर्णमिव पर्वतम् ।
’आज पहा, मी आपल्या विषधर सर्पासमान तीक्ष्ण बाणांनी मारून वालीला पृथ्वीवर पाडीन. तो इंद्राच्या वज्राने तुटून पडणार्‍या पर्वतासमान दिसून येईल.’ ॥२८ १/२॥
स तु तद्वचनं श्रुत्वा राघवस्यात्मनो हितम् ।
सुग्रीवः परमप्रीतः सुमहद्वाक्यमब्रवीत् ॥ २९ ॥
आपल्यासाठी परम हितकर हे राघवाचे वचन ऐकून सुग्रीवास फार प्रसन्नता वाटली. ते उत्तम वाणीने म्हणाले- ॥२९॥
तव प्रसादेन नृसिंह वीर
प्रियां च राज्यं च समाप्नुयामहम् ।
तथा कुरु त्वं नरदेव वैरिणं
यथा निहंस्यद्य रिपुं ममाग्रजम् ॥ ३० ॥
’वीरा ! पुरुषसिंहा ! मी आपल्या कृपेने माझी प्रिय पत्‍नी तसेच राज्यास प्राप्त करू शकेन असा प्रयत्‍न करावा. नरदेव ! माझा मोठा भाऊ वैरी झालेला आहे. आपण त्याची अशी अवस्था करावी की तो परत मला मारू शकणार नाही.’ ॥३०॥
सीताकपींद्रक्षणदाचराणां
राजीवहेमज्वलनोपमानि ।
सुग्रीवरामप्रणयप्रसंगे
वामानि नेत्राणि समं स्फुरंति ॥ ३१ ॥
सुग्रीव आणि श्रीरामांच्या या प्रेमपूर्ण मैत्रीच्या प्रसंगी सीतेचे प्रफुल्ल- कमलासारखे, वालीचे सुवर्णासारखे तसेच निशाचरांचे प्रज्वलित अग्निसारखे, डावे डोळे एकाच वेळी लवू लागले. ॥३१॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे पञ्चमः सर्गः ॥ ५ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा पाचवा सर्व पूरा झाला. ॥५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP