॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

सुंदरकांड

॥ अध्याय एकोणचाळीसावा ॥
सागराची श्रीरामांना शरणागती

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

बिभीषणास लंकादान दिल्यावर सर्वांना परमानंद :

बिभीषणासी लंकादान । देवोनियां श्रीरघुनंदन ।
सभा बैसली सावधान । सुप्रसन्न स्वानंदें ॥ १ ॥
वानर करिती गदारोळ । बिभीषणासी सुखकल्लोळ ।
सुग्रीवा उल्लास प्रबळ । सकळ दळ देखोनि ॥ २ ॥
वानरांचे महाभार । करूं येती नमस्कार ।
श्रीरामनामाचा गजर । देती भुभुःकार आल्हादें ॥ ३ ॥

हनुमान व सुग्रीव समुद्र पार करण्याच्या विचारात :

तेथें येवोनि हनुमंत । सुग्रीवासी करी एकांत ।
सीता सोडावयाचा मुख्यार्थ । लंकानाथ वधावया ॥ ४ ॥
समुद्राचिये तीरीं । बैसल्या वानरांच्या हारी ।
कैसेनि जाववेल पैलपारीं । ते विचारीं कपिनाथ ॥ ५ ॥
नद्द्या पर्जन्यें भरोनि येति । तेणें सिंधु प्रवाहे ना क्षितीं ।
उष्णकाळीं नद्द्या सुकती । तेणें अपांपती आटेना ॥ ६ ॥
ऐसा नित्य पूर्णत्वें गंभीर । अगाध अक्षोभ्य सागर ।
आमची सेना तंव वनचर । केंवी परपार पावती ॥ ७ ॥
समुद्रलंघना उपावो । आम्हांसी सर्वथा न दिसे पहाहो ।
तूं तंव वानरांचा महाबाहो । काय उपावो करावा ॥ ८ ॥
बैसोनि वानरें समुद्रतटीं । करिती लांब लांब गोष्टी ।
ते तंव मिथ्या गा चावटी । जावया परतटीं शक्ति नाहीं ॥ ९ ॥

सुग्रीवाची काळजी :

सुग्रीव म्हणे हनुमंता । काय बुद्धि करावी आतां ।
समुद्रलंघनीं तत्वतां । उपाव सर्वथा असेना ॥ १० ॥
कैसेनि वधावें लंकानाथा । कैसेनि आणावी ते सीता ।
सुखी न करवे रघुनाथा । ऐसी अवस्था दिसताहे ॥ ११ ॥
तुज पुसतों अति आप्तता । समुद्रलंघनी उपाव वृथा ।
कार्य न साधे श्रीरघुनाथा । काय म्यां आतां करावें ॥ १२ ॥
कार्य न साधे श्रीरघुनाथा । ऐसें उत्तर ऐकतां ।
स्फुरण आलें हनुमंता । साटोपता उठिला ॥ १३ ॥

हनुमंताचे स्फुरण व बळाचा आविष्कार :

निर्दळावया लंकापती । प्रळयरूद्राची आकृती ।
वेगें वाढिला मारुती । भेणें कांपती सुरवर ॥ १४ ॥
पिंजारिल्या रोमावळी । शेंडी थरथरी समूळीं ।
पुच्छ वाढिंनलें निराळीं । आतुर्बळीं खवळला ॥ १५ ॥
तुम्ही अवघे वानरगण । करा माझें पुच्छग्रहण ।
श्रीरामलक्ष्मणां खांदीं वाहून । जाईन घेऊन लंकेसीं ॥ १६ ॥
बिभीषण शरणागत । त्यासी धरोनि ह्रदयात ।
एकेचि खेपें पैं समस्त । नेईन निश्चित लंकेसीं ॥ १७ ॥
हनुमान आतुर्बळी उद्भट । वाटारिले नेत्रवाट ।
बाहु स्फुरती थरथराट । वळिला साट पुच्छाचा ॥ १८ ॥
देखोनि हनुमंताची शक्ती । सुग्रीव दचकला चित्तीं ।
गजबजिलें जुत्पती । शांत मारूती केंवी होय ॥ १९ ॥

त्यामुळे सर्वांची गजबज, परंतु श्रीरामांकडून त्यांचें सांत्वन :

देखोनि हनुमंताचे त्राण । वेगीं उठिला रघुनंदन ।
त्यास ह्रदयीं आलिंगून । मधुर वचन अनुवादे ॥ २० ॥
समुद्र वापुडे तें कोण । अग्निबाणें कोरडा करीन ।
पायीं नेईन वानरगण । लंकाकंदन करावया ॥ २१ ॥
कायसा रावणाचा पुरूषार्थ । अर्धक्षणें करीन घात ।
ऐसा शांतवोनि हनुमंत । स्वस्थ रघुनाथें बैसविला ॥ २२ ॥

सागराला प्रार्थना करावी अशी बिभीषणाची मार्गदर्शनपर सूचना :

ऐकोनि श्रीरामांचें वचन । सुखावला बिभीषण ।
सुगमेपायें समुद्रतरण । मूळ कारण सांगत ॥ २३ ॥
श्रीरामवाक्य प्रतापपूर्ण । ऐकोनियाम बिभीषण ।
स्वयें घालोनि लोटांगण । कर जोडूनि विनवित ॥ २४ ॥
सोडोनियां अग्निबाण । सिंधु शोषितां न लागे क्षण ।
परी तें नव्हे गा भूषण । अतिदूषण सूर्यवंशा ॥ २५ ॥
सावधान परिसें श्रीरघुनाथा । सांगेन मी समूळ कथा ।
समुद्र पूर्वज तत्वतां । ते मूळानुवार्ता अवधारीं ॥ २६ ॥
तुझे पूर्वज सगर जाण । त्यांचेनि सागर हा निर्माण ।
यालागीं सागर हें अभिधान । देवपुराणा अनुवादे ॥ २७ ॥
पूर्वीं समुद्र काये नव्हता । आवरणोदकीं अति गुप्तता ।
सगरें खाणोनियां तत्वतां । प्रकटार्था आणिला ॥ २८ ॥
सगरापासूनि सागरता । तो तुज पूर्वज तत्वतां ।
कैसेनि त्याच्या करावें घाता । निजवंशस्था समुद्रा ॥ २९ ॥
वेगळें करोनि दशरथा । सागर सातवा प्रपिता ।
ऐसी सूर्यवंशाची कथा । होय सांगता बिभीषण ॥ ३० ॥
समुद्र पूर्वज पूज्य जाण । त्यासीं श्रीराम निघाल्या शरण ।
तो तुज भेटोनि आपण । सागरात्तरण सांगेल ॥ ३१ ॥
तुझा प्रताप श्रीरघुनाथा । समुद्र जाणतो तत्वतां ।
त्या तुज भेटीची परम आस्था । मज सर्वथा कळलीसे ॥ ३२ ॥
तूं तंव प्रतापी रघुराज । सगरवंशीं वंशध्वज ।
समुद्र तुझा निजपूर्वज । करील काज वंशाचें ॥ ३३ ॥
निजपूर्वज सिंधूसीं शरण । रिघतां तुज लाज कोण ।
सुखोपायें समुद्रतरण । स्वयें आपण सांगेल ॥ ३४ ॥
धर्मशीळ सज्ञानता । समूळ निजवंशाची कथा ।
बिभीषणें स्वयें सांगता । श्रीरघुनाथा आल्हाद ॥ ३५ ॥

बिभीषणाची सूचना श्रीरामांना मान्य :

बिभीषणाची जे गोष्टी । ते रूचली श्रीरामाचे पोटीं ।
लक्ष्मणसुग्रीवें लक्षोनि दृष्टी । तेंच जगजेठी अनुवादें ॥ ३६ ॥
सागरासी रिघावें शरण । गोड बोलिला बिभीषण ।
सुग्रीव राजा सखा लक्ष्मण । तुम्हां हें वचन रूचे कीं ॥ ३७ ॥
सुग्रीव आणि लक्ष्मण । वदती वंदोनि श्रीरामचरण ।
बिभीषणवचन अति प्रमाण । तेंचि आपण करावें ॥ ३८ ॥
सत्यवादी बिभीषण । सिंधुपूर्वजासी रिघोनि शरण ।
अनायासें समुद्रतरण । तेंचि आपण करावें ॥ ३९ ॥

त्याप्रमाणे समुद्राचे पूजन व त्रिरात्र अनुष्ठान :

ऐकोनि दोघांचे वचन । रिघावया समुद्रा शरण ।
श्रीराम करी समुद्रपूजन । सुमनचंदनफळमूळें ॥ ४० ॥
रम्य समुद्राचें तटीं । पसरोनि कुशास्तरण दाटी ।
दर्भशयनी श्रीराम जगजेठी । घ्यावया भेटी सागराची ॥ ४१ ॥
तूं आमुचा पूर्वज । आम्ही तुझे वंशज ।
माझें सिद्धी पाववीं काज । शरण तुज अनन्यत्वें ॥ ४२ ॥
ऐसें बोलोनि रघुनंदन । दर्भासनी करी शयन ।
जेंवी पुरिला हुताशन । दैदीप्यमान अग्निहोत्रीं ॥ ४३ ॥
यापरी श्रीरघुनाथ । साधावया निजकार्यार्थ ।
त्रिरात्र सिंधुशरणागत । दिसे निद्रिस्थ सावधत्वें ॥ ४४ ॥
जागृती स्वप्न सुषुप्ती । तुरीयातीत श्रीराममूर्तीं ।
तोही शरण सिंधू शरणार्थी । दिसे प्रतीति सुरनरां ॥ ४५ ॥
ऐसा प्रसुप्त श्रीरामचंद्र । देखोनि तळमळती वानर ।
केव्हां पावों समुद्रपार । दशशिरावधार्थ ॥ ४६ ॥

तरीही समुद्राच्या असहकारामुळे सर्वांना चिंता व हनुमंताचा त्वेष :

अनुलक्षोनि श्रीरघुनाथ । हनुमान निजगुह्य सांगत ।
निद्रा करितांचि येथ । व्यर्थ पुरूषार्थ दिसताहे ॥ ४७ ॥
स्वयें बोलती वानरगण । श्रीरामभातां दुर्धर बाण ।
तरीं कां निघाला शरण । गाढेपण धरोनी ॥ ४८ ॥
हनुमान म्हणे मी निजसेवक । समुद्रतरणीं कायसी अटक ।
पुच्छाग्रीं समग्र कटक । एकीकक उतरीन ॥ ४९ ॥
अंतर्यामीं श्रीरघुनाथ । जाणोनि हनुमंताचें ह्रद्‌गत ।
स्वयें उठिला सावचित्त । निजपुरूषार्थ दावावया ॥ ५० ॥

श्रीरामांचा क्रोध व धनुष्यबाण आणण्याचा आदेश :

तीन दिवस लोटल्यापाठीं । स्वयें समुद्र न येचि भेटी ।
श्रीराम कोपला जगजेठी । रक्तांबरदृष्टी कृतांत ॥ ५१ ॥
आमुचा पूर्वज हा पूर्ण । म्हणोनि सद्भावे रिघालो शरण ।
तंव याचें दुर्जनपण । न येचि आपण भेटीसी ॥ ५२ ॥
याचा वाढवोनि सन्मान । करोनि अर्घ्यपाद्द्यादि पूजन ।
अनन्य भावें रिघता शरण । न येचि आपण भेटीसी ॥ ५३ ॥

श्रीरामांच्या नम्रत्वाचा अनादर, राजांना मार्दव उपयोगी नाही याचा प्रत्यय :

याचें सर्वांगीं गर्व मोठा । अक्षोभ्यत्वें अगाध ताठा ।
यासीं मी लक्ष्मणा सुभटा । लावीन वाटा निधनाचे ॥ ५४ ॥
शरण रिघाल्या पुरूषार्थी । कीर्ति ते होय अपकीर्ती ।
शरण रिघावें अशक्तीं । तें केलियां शक्तिलाभ कैंचा ॥ ५५ ॥
शरण रिघतांचि पाठी । वाढीव होय उफराटी ।
तेथें कायसी यशाची गोष्टी । अपेश वाक्पुटीं जग वदे ॥ ५६ ॥
शरण रिघतांचि बळवंतीं । समूळ पळे यश कीर्ती ।
त्याची कैंची विजयप्राप्ती । अवघे म्हणती अशक्त ॥ ५७ ॥
समुद्र स्वयें अभक्त आपण । यासी मी भक्त रिघालों शरण ।
तंव तेणें गर्व धरिला पूर्ण । केलें उपेक्षण पैं माझें ॥ ५८ ॥
मृदुपणें नाहीं यश कीर्ति । मृदुपणें नाहीं लाभप्राप्ती ।
मृदुपणें नाहीं विजयवृत्ती । जाण निश्चितीं सौमित्रा ॥ ५९ ॥
मृदुत्वें संन्यासीं धरावी शांती । तेणें त्यासी परमार्थप्राप्ती ।
मृदुत्व आम्हां रायांप्रतीं । जाण अपकीर्ति कारण ॥ ६० ॥
अदंड्याचें राजें दंडिती । अदम्यातें राजे दमिती ।
ते राजे जैं शांति धरिती । तेचि अपकीर्ति तयांसी ॥ ६१ ॥
समुद्राचा गर्व पूर्ण । तो नाशीन न लागतां क्षण ।
दे दे माझें धनुष्यबाण । अति दारूण सर्पप्राय ॥ ६२ ॥
सर्प लागल्या उतरे विख । त्याहूनि माझे बाण तीख ।
सुरां असुरां प्राणांतक । जीवातेंही देख जीव घेती ॥ ६३ ॥

श्रीरामांच्या कोपामुळे देवादिकांचा उद्वेग :

ऐसें बोलोनि आपण । कोपें वाहिलें धनुष्यबाण ।
अग्निअस्त्र सज्जोनि आपण । वोढी काढोन चालिला ॥ ६४ ॥
क्षोभला श्रीराम देखोन । स्वर्गीं देव कंपायमान ।
तळमळिती मगर मीन । आलें निधन सिंधुसी ॥ ६५ ॥
समुद्र शोषितां राघव । पाताळीं कांपती दानव ।
दैत्य नाग मानव । धाकती सर्व श्रीरामा ॥ ६६ ॥
बाण पडतां समुद्रजळीं । सप्तपाताळां करील होळी ।
पाताळवासीं कांपती चळीं । श्रीराम महाबळी क्षोभला ॥ ६७ ॥
धनुष्य चढवितां श्रीरामा । धाकें रविचंद्रां काळिमा ।
नक्षत्रें पडती व्योमा । ऋषी स्वधर्मा विसरले ॥ ६८ ॥
शोषितां समुद्राचें पाणी । बाणाग्नि मिळोनि अर्णवाग्नीं ।
दोनी भस्म करिती अवनी । ब्रह्मा मनीं संचिंत ॥ ६९ ॥
ब्रह्मा देखोनि सचिंत । ब्रह्मभुवनीं अति आकांत ।
सिंधुनिर्दळणीं श्रीरघुनाथ । करील अंत सृष्टीचा ॥ ७० ॥
ऐकें सौमित्रा साचार । शोषोनि समुद्राचें नीर ।
पायीं उतरोन वार । निशाचरावधार्थ ॥ ७१ ॥

श्रीरामांचा रौद्रावतार पाहून सागराचे स्त्रीपुत्रांसह आगमन :

धनुष्य ओढितां सत्राण । दोनी वटारिले नयन ।
श्रीराम दिसे काळासमान । वानरगण कांपती ॥ ७२ ॥
क्षोभला देखोनि श्रीरघुनाथ । स्त्रियांपुत्रांसमवेत ।
समुद्रासीं अति आकांत । आला प्राणांत श्रीरामें ॥ ७३ ॥
सुटल्या श्रीरामाचा बाण । त्यातें निवारूं शकेल कोण ।
त्यासी न होतांचि शरण । आलें मरण निश्चित ॥ ७४ ॥
परम कृपाळु श्रीरघुनाथ । स्त्रियांपुत्रांसमवेत ।
स्वयें होवोनि मूर्तिमंत । समुद्राआंत प्रकटला ॥ ७५ ॥
रामनिकट सागरीं । सहस्त्रोर्मि महालहरीं ।
सिंधु प्रकटला त्यांमाझारी । रूपधारी साकार ॥ ७६ ॥
व्दादशनामांकित टिळे । कंठी यज्ञोपवीत रूळे ।
सुपुत्रस्त्रिया कुटुंबमेळे । देखिलें त्या काळें श्रीरामें ॥ ७७ ॥
स्त्रियांपुत्रांसमवेत । समुद्र पायवाटे येत ।
तें देखोनि श्रीरघुनाथ । अति विस्मित स्वयें झाला ॥ ७८ ॥

सागराची मूळ उत्पत्ती ब्रह्मापासून, त्यामुळे
तो ब्राह्मण मानून त्याला श्रीरामांनी वंदन केले :

पूर्वी ब्रह्मयानें केला निर्माण । यालागी सिंधु शुद्ध ब्राह्मण ।
सगरीं पुढें केलें खनन । सागर अभिधान तेणें त्यासी ॥ ७९ ॥
ऐसा ब्राह्मण देखोनि तेथ । कृपाळु तो श्रीरघुनाथ ।
न करीच शरसंपात । व्दिजघात चुकवावया ॥ ८० ॥
बाहेर आलिया ब्राह्मण । मग समुद्रीं सोडूनी बाण ।
श्रीरामें विचारोनि जाण । वोढी काढोन राहिला ॥ ८१ ॥

सागराची श्रीरामांना विनंती :

मग ब्राह्मण उदकाआंतौता । शरण शरण म्हणे श्रीरघुनाथा ।
माझ्या करूं नको घाता । शरण तत्वतां मी आलों ॥ ८२ ॥
कोणें अपमानिलें निजव्दारा । धनवृत्तीं कीं हरिली दारा ।
तें सांगें गा मज रघुवीरा । तुझ्या कैवारा मी करीन ॥ ८३ ॥
आधीं साधीन व्दिजकार्यार्था । मग सोडवीन गा सीता ।
त्रिसत्य सत्य हें रघुनाथा । सांगा मी आतां काय करूं ॥ ८४ ॥
मज श्रीरामा आलिया शरण । तुज कल्पांतीं नाहीं मरण ।
श्रीराम वंदुनी व्दिजाचे चरण । पुसे आपण काय करूं ॥ ८५ ॥
व्दिज म्हणे श्रीरघुनाथा । मी समुद्र शरण आलों आतां ।
सोडोनियां शरसंपाता । माझ्या घाता कां करिसी ॥ ८६ ॥

श्रीरामांचे उत्तर :

तूं माझा पूर्वज सनातन । तुज देवोनि सन्मान ।
तीन दिवस निरंजन । म्यां दर्भशयन सेविलें ॥ ८७ ॥
तुझे आंगीं गर्व पूर्ण । भेटी न देसीच जाणोन ।
आतां वांचवावया निजप्राण । आलों शरण म्हणतोसी ॥ ८८ ॥

न येण्याचे कारण सागर सांगतो :

तुझेनि थोर अपकीर्ति । झाली सूर्यवंशा अपख्याती ।
तेणें क्षोभें गा रघुपती । भेटी निश्चितीं न घेंचि ॥ ८९ ॥
आतां धरिलिया आंगवण । तरी मी घेवों आलों दर्शन ।
तुज गुह्य सांगो आलों आपण । सावधान अवधारीं ॥ ९० ॥
देखता वानरांचिया कोटी । रत्नांजळी घेवोनि मुष्टी ।
अर्पोनि श्रीरामअंगुष्ठी । चरण ललाटीं वंदिलें ॥ ९१ ॥
श्रीराम अवतार पूर्ण । मी जाणतो संपूर्ण ।
पुढती पुढती लोटांगण । पुढती चरण वंदिले ॥ ९२ ॥
श्रीरामा ऐकें सावधदृष्टी । सांगणें आहे गुह्य गोष्टी ।
सूर्यवंशीं कीर्ति लाठी । ते उपराटीं तुवां केली ॥ ९३ ॥

पूर्वजांच्या कीर्तिच्या विरूद्ध घटना घडली :

माझी सूर्यवंशीं उत्पत्ती । जाली असे कैशा रीतीं ।
तेंही सांगेन श्रीरघुपती । सावधवृत्तीं अवधारीं ॥ ९६ ॥
सगरापासाव सागर । हा भागवतीं कथाविस्तार ।
कपिलमुनीश्चरचरित्र । अति विचित्र तिहीं लोकीं ॥ ९७ ॥
तया चरित्राचें पोटीं । कपिल लक्षूनि क्षोभक दृष्टीं ।
सगरवीर सहस्त्र साठी । वाग्वज्रदंष्ट्रीं शापिले ॥ ९८ ॥
बलोन्मत्त साठी सहस्त्र । नाहीं भूतदया अणुमात्र ।
जळत असाल अहोरात्र । हें वाग्वज्र सोडिलें ॥ ९९ ॥
वज्रघात एकातें मारी । वाग्वग्राची त्याहूनि थोरी ।
साठी सहस्त्रां कवळोनि वीरीं । आगी एकसरी लाविली ॥ १०० ॥
वज्रघात येतां दारूण । शूर छेदिती विंधोन बाण ।
वाग्वज्रासीं निवारण । सर्वथा जाण असेना ॥ १०१ ॥
ढळवेना ब्रह्मशापाहातीं । मागें पुढें न चले गती ।
धडधडाटें पैं जळती । अहोरातीं महावीर ॥ १०२ ॥
जळत देखतां सगरांसी । कृपा उपजली मुनीश्वरांसी ।
प्रार्थोनियां कपिलासी । उश्शापासीं मागितलें ॥ १०३ ॥
भगापासूनि उत्पन्नभूत । वंशीं जन्मला भगीरथ ।
तो गंगा आणोनि एथ । सगर समस्त उद्धरील ॥ १०४ ॥
तेचि वंशीं भगीरथ । गंगा आणोनि प्रयत्नयुक्त ।
पूर्वज तारिले गा समस्त । जग पुनीत तेणें केलें ॥ १०५ ॥
ऐसी पूर्वजांची ख्याती । तेचि वंशीं तू रघुपती ।
पुण्य पूज्यत्वें पवित्र कीर्ति । थोर अपकीर्ति तुज आली ॥ १०६ ॥

आपण दोघे बंधु असता सीता गेली याचा खेद सागर व्यक्त करितो :

कळिकाळ घालोनि तोडरीं । दोघे बंधू धनुर्धारी ।
शेखीं बाईल नेली चोरीं । लोकांतरीं अपकीर्ति ॥ १०७ ॥
पाठीची हरविली कांता । लाज लाविली वंशपुरूषार्था ।
थोर अपकीर्ति तुझे माथां । श्रीरघुनाथा बैसली ॥ १०८ ॥
श्रीराम सूर्यवंशस्थ । सीताविरहें रडत रडत ।
ऐसा ऐकोनि वृत्तांत । दुःखाभिभूत मी झालों ॥ १०९ ॥
तुवां सेविल्या दर्भशयन । तेणें क्षोभें मी क्षोभायमान ।
तुझें न घेंचि दर्शन । सत्य जाण श्रीरामा ॥ ११० ॥

श्रीराम ते ऐकून लज्जायमान होतात :

शक्ति असोनि संपूर्ण । अशक्तसम आलासी शरण ।
येणेंही क्षोभें क्षोभायमान । तुझें दर्शन न घेंचि ॥ १११ ॥
सीता नेतां पैं रावण । तेथें न कराचि आंगवण ।
मज पूर्वजचा घ्यावया प्राण । अग्निबाण सज्ज केला ॥ ११२ ॥
ऐकोनि समुद्राचें वचन । श्रीराम झाला लज्जायमान ।
गळों पाहती धनुष्यबाण । स्वेद संपूर्ण चालिला ॥ ११३ ॥

सागर म्हणतो, रावणाने सीता नेल्यावर रडत बसता आणि
मी न आल्याबरोबर धनुष्याला बाण लावता हे विपरीत वाटते :

ऐसें देखोनि श्रीरघुनाथा । समुद्रें चरणीं ठेविला माथा ।
जें मी बोललों उद्धतता । क्षमा तत्वतां मज कीजे ॥ ११४ ॥
अति आवेशें सज्जोनि चाप । मजवरी थरूं नको कोप ।
सिंधु तरणें हें तंव अल्प । कार्य स्वल्प श्रीरामा ॥ ११५ ॥

सागराचा व दशरथाचा पूर्वसंबंध, सगरांना शाप, नंतर भगीरथाने केलेला उद्धार :

मी तंव वंशस्थ कैवारी । दशरथाचा कृतोपकारी ।
तीही कथा निजनिर्धारीं । अवधारीं गा श्रीरामा ॥ ११६ ॥
तारकामययुद्धाआंत । मी आणि दशराथ ।
इंद्रासी साह्य गेलों तेथा । युद्धकंदनार्थ दृढ झाला ॥ ११७ ॥
माझा दैत्यीं करिता घात । साह्य झाला दशरथ ।
दैत्य दमोनि समस्त । मज निर्मुक्त रायें केलें ॥ ११८ ॥
कष्टी करोनि अरिमंडळ । दैत्य निर्दाळिलें सकळ ।
इंद्र सुखावोनि तत्काळ । प्रीतीं भूपाळ पूजिला ॥ ११९ ॥
इंद्रें अत्यंत सुखावोनी । राया दिधला मुकुटमणी ।
आम्हां दोघांतें पूजोनी । अति सन्मानीं गौरविलें ॥ १२० ॥
तोचि मणि दशरथें । अति आवडीं दिधला सीतेतें ।
जे खूण आणिली हनुमंतें । शुद्धि निश्चितें मानावया ॥ १२१ ॥
ऐसा मी दशरथाचा उपकारी । कांहीं नव्हेंचि प्रत्युपकारी ।
तुज मी होईन साहाकारी । सैन्य सागरीं उतरावया ॥ १२२ ॥
सागर श्रीरामा सांगत । पैल तो विश्वकर्म्याचा सुत ।
नळनामा कपि विख्यात । बांधील सेतू समुद्रीं ॥ १२३ ॥
त्यासी पित्याचें वरदान । सेतुकर्मीं हा विचक्षण ।
आज्ञा देवोनि आपण । सेतुबंधन करावें ॥ १२४ ॥

नंतर समुद्र मार्गदर्शन करितो :

तूं तंव वंशस्थ रघुनाथा । मी कृतोपकारी दशरथा ।
ऐसियापरी परम सुह्रदता । करीन साह्यता तें ऐकें ॥ १२५ ॥
मीन महाग्राह न येती तेथ । लहरी शांत करीन समस्त ।
कुवायु वाजेना सेतुबंधांत । ऐसा साह्यार्थ करीन रामा ॥ १२६ ॥

त्याप्रमाणे नळाची सेतुबांधणीच्या कामावर योजना, त्यामुळे नळाला आनंद :

लाहोनि पित्याचें वरदान । नळ करील सेतुबंधन ।
आणिक आहे ऐक चिन्ह । सावधान अवधारीं ॥ १२७ ॥
नळाअंगीं वानरधर्म । सागरीं सांडिले शाळिग्राम ।
कोपोनियां ऋषिसत्तम । शाप परम दिधला ॥ १२८ ॥
माझ्या तीरीं ऋषी बैसोन । करिती स्नानसंध्या अनुष्ठान ।
पुढें मांडोनि शाळिग्राम । ध्यानस्थ होवोन बैसती ॥ १२९ ॥
तेथें नळ कपि येवोन । ऋषींचें शाळिग्राम करीं घेवोन ।
समुद्रामाजी दे टाकोन । ऋषि कोपोन शाप देती ॥ १३० ॥
तुझेनि हातें सागरीं शिळा । न बुडती कदा काळा ।
हाही सेतुबंधनीं नळा । असें आगळा पुरूषार्थ ॥ १३१ ॥
एकोनि समुद्राचें वचन । नळें वंदोनि श्रीरामचरण ।
स्वयें बोलिला गर्जोन । सेतुबंधन करीन मी ॥ १३२ ॥
सिंधु बोलिला सत्य गोष्टी । सेतुबंधनाची हातवटी ।
आहे सामर्थ्य माझे पोटीं । उठाउठीं निर्मीन ॥ १३३ ॥
सिंधु अगाध अत्यंत थोर । सेतु बांधीन मी सत्वर ।
पर्वत आणावया वानर । स्वामीनें सत्वर धाडावें ॥ १३४ ॥
सेतु बांधीन अर्धक्षणें । एकोनि नळाचें बोलणें ।
श्रीराम संतोषला सहस्त्रगुणें । अति सन्मानें प्रीतीं पूजी ॥ १३५ ॥
सवेंचि सिंधूसी अनुवादन । वाक्पुष्पीं प्रीतिपूजन ।
मृदु मंजुळ मधुर वचन । श्रीरघुनंदन सांगत ॥ १३६ ॥

धनुष्यावर जोडलेल्या बाणाचे मरूप्रदेशावर विसर्जन :

तुझ्या कोपाचिये कडाडीं । अग्निबाण लाविला कोदंडीं ।
चाप ओढिलें परम प्रौढी । तो मी न काढीं माघारा ॥ १३७ ॥
सोडोनियां अग्निबाण । सांग कोणाचा घेऊं प्राण ।
माझा बाण अति निर्वाण । सत्य जाण समुद्रा ॥ १३८ ॥
समुद्र म्हणे पश्चिम तीरीं । मरू दैत्य दुराचारी ।
मज पीडितो नानापरी । तो संहारीं येणें बाणें ॥ १३९ ॥
ऐकोनि समुद्राचें वचन । श्रीरामें सोडिला अग्निबाण ।
मरू मारिला न लागतां क्षण । झालें शोषण समुद्राचें ॥ १४० ॥

त्याचे गंभीर परिणाम, पृथ्वीची दयनीय अवस्था

श्रीरामबाणाच्या कल्लोळीं । उदक आटे समूळीं ।
धरा पोळोनि अग्निज्वाळीं । श्रीरामाजवळी आली शरण ॥ १४१ ॥
धरा देखोनियां दीन । वरद वदे श्रीरघुनंदन ।
केला मरूदेश पावन । तेंहि चिन्ह अवधारा ॥ १४२ ॥

धरेचे सांत्वन व तिला वरप्रदान :

धरेसीं सुटलिया जळ । पृथ्वी पिकेल सर्व काळ ।
फळमूळांचा बहु सुकाळ । अति रसाळ सुस्वाद ॥ १४३ ॥
घरोघरीं मागतां नीर । स्त्रिया संतोषें अर्पिती क्षीर ।
गाईंसीं उदक पंचरात्रांतर । तरी अपार क्षीर देती ॥ १४४ ॥
पशूंसीं प्रत्यही नाहीं जीवन । पंच दिवसां उदकपान ।
तरी घृत क्षीर परमान्न । नित्य भोजन घरोघरीं ॥ १४५ ॥
नानापरींच्या दिव्यौषधी । ज्यांच्या अंगीं सुगंध गंधी ।
श्रीरामाचे निजवरदीं । सुखानुवादी मरुदेशीं ॥ १४६ ॥
तिळाचे ठायीं स्नेह पूर्ण । ह्या अर्थाचें नवल कोण ।
अतिथींचें स्नेह पूर्ण । मरूदेशीं जाण घरोघरीं ॥ १४७ ॥
ज्यातें म्हणती मारवाड । तेथें जिवाचे पुरती कोड ।
श्रीरामवरदाचें कैवाड । सुखसुरवाड मरूदेशीं ॥ १४८ ॥

सागराचे आश्चर्य :

देखोनि श्रीरामाची ख्याती । समुद्र आश्चर्य मानी चित्तीं ।
हर्षे वंदोनि श्रीरघुपती । सप्रेम पुढती बोलत ॥ १४९ ॥
सोडोनियां निजशर । वधिला मरू दैत्य दुर्धर ।
पावन केलें मरूकांतार । श्रीरघुवीर कृपाळु ॥ १५० ॥
तुझिया प्रतापापुढें । समुद्र कायसें बापुडें ।
मज सुखी केलें रोकडें । फेडिलें सांकडें दुःखाचें ॥ १५१ ॥
स्वयें राम संतोषोनी । अति प्रीतीं समुद्रपूजनीं ।
आल्हादें बोले हर्षवदनीं । अति सन्मानीं संबोधी ॥ १५२ ॥

श्रीरामांनी सागराचा केलेला सन्मान

जैसा पिता दशरथ । तैसा पूज्य पूर्वज तूं निश्चित ।
सेतुबंधाचा कार्यार्थ । सुगम समस्त तुवां केला ॥ १५३ ॥
तूं दशरथाचा आवडता । त्याहूनि मज पढियंता ।
तुझा उपकार मज तत्वतां । श्रीरघुनाथा थोर झाला ॥ १५४ ॥
ऐकोनि श्रीरामाचें वचन । समुद्र घाली लोटांगण ।
वंदोनि श्रीरामाचे चरण । गेला आपण निजधामा ॥ १५५ ॥
एकाजनार्दना शरण । श्रीराम प्रतापी संपूर्ण ।
समुद्रीं तरतील पाषाण । सेतुबंधन अवधारा ॥ १५६ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडें एकाकारटीकायां
श्रीरामसमुद्रशरणगमनं नाम एकोनचत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥ ३९ ॥
॥ ओव्यां १५६ ॥ श्लोक ३१ ॥ एवं संख्या १८७ ॥



GO TOP