श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ अष्टचत्वारिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
दक्षिणादिग्गतैर्वानरैः सीतानुसन्धानस्य प्रारम्भणम् - दक्षिण दिशेला गेलेल्या वानरांनी सीतेचा शोध करण्यास आरंभ करणे -
सह ताराङ्‌गीदाभ्यां तु गत्वा स हनुमान् कपिः ।
सुग्रीवेण यथोद्‌दिष्टं गन्तुं देशं प्रचक्रमे ॥ १ ॥
तिकडे तार आणि अंगद यांच्यासह हनुमान् एकाएकी सुग्रीवांनी सांगितलेल्या दक्षिण दिशेकडील देशांकडे निघाले. ॥१॥
स तु दूरमुपागम्य सर्वैस्तैः कपिसत्तमैः ।
ततो विचित्य विंध्यस्य गुहाश्च गहनानि च ॥ २ ॥

पर्वताग्रनदीदुर्गान् सरांसि विपुलान् द्रुमान् ।
वृक्षखण्डांश्च विविधान् पर्वतान् वनपादपान् ॥ ३ ॥

अन्वेषमाणास्ते सर्वे वानराः सर्वतोदिशम् ।
न सीतां ददृशुर्वीरा मैथिलीं जनकात्मजाम् ॥ ४ ॥
त्या सर्व श्रेष्ठ वानरांसहित खूप दूरवरचा रस्ता पार करून ते विंध्याचलावर गेले आणि तेथील गुहा, जंगले, पर्वत शिखरे, नद्या, दुर्गम स्थाने, सरोवरे, मोठ मोठे वृक्ष, झाड्या आणि निरनिराळे पर्वत तसेच अन्य वृक्षांमध्येही सर्व बाजूला शोध घेत फिरले परंतु तेथे त्या समास्त वीर वानरांना मैथिली सीरा कुठेही दिसली नाही. ॥२-४॥
ते भक्षयंतो मूलानि फलानि विविधान्यपि ।
अन्वेषमाणा दुर्धर्षा न्यवसंस्तत्र तत्र ह ॥ ५ ॥
ते सर्व दुर्धर्ष वीर नाना प्रकारच्या फल-मूलांचे भोजन करीत सीतेचा शोध घेत आणि जेथे-तेथे मुक्काम करीत. ॥५॥
स तु देशो दुरन्वेषो गुहागहनवान् महान् ।
निर्जलं निर्जनं शून्यं गहनं घोरदर्शनम् ॥ ६ ॥
विंध्यपर्वताच्या आसपासचा महान् देश बर्‍याचशा गुहांनी तसेच घनदाट जंगलांनी भरलेला होता. यामुळे जानकीचा शोध घेण्यात फारच अडचणी होत्या. भयंकर दिसणार्‍या तेथील ओसाड जंगलातून पाणी मिळत नव्हते अथवा कुणी मनुष्यही दिसून येत नव्हता. ॥६॥
तादृशान्यप्यरण्यानि विचित्य भृशपीडिताः ।
स देशश्च दुरन्वेष्यो गुहागहनवान् महान् ॥ ७ ॥
तशा जंगलात शोध करतांना त्या वानरांना अत्यंत कष्ट सहन करावे लागले. तो विशाल प्रदेश अनेक गुहा आणि घनदाट वनांनी व्याप्त होता, म्हणून तेथे अन्वेषणाचे कार्य फारच कठीण प्रतीत होत होते. ॥७॥
त्यक्त्वा तु तं ततो देशं सर्वे वै हरियूथपाः ।
देशमन्यं दुराधर्षं विविशुश्चाकुतोभयाः ॥ ८ ॥
त्यानंतर ते समस्त वानर-यूथपति तो देश सोडून दुसर्‍या प्रदेशात घुसले, जेथे जाणे अधिकच कठीण होते तरीही त्यांना कोठेही कुणापासून ही भय वाटत नव्हते. ॥८॥
यत्र वंध्यफला वृक्षा विपुष्पाः पर्णवर्जिताः ।
निस्तोयाः सरितो यत्र मूलं यत्र सुदुर्लभम् ॥ ९ ॥
तेथील वृक्ष फळे देत नव्हते, त्यांना फुलेही लागत नव्हती आणि त्यांच्या फाद्यांवर पानेही नव्हती. तेथील नद्यांमध्ये पाण्याचे नाव ही नव्हते. कंद, मूळ आदि तर तेथे सर्वथा दुर्लभ होते. ॥९॥
न संति महिषा यत्र न मृगा न च हस्तिनः ।
शार्दूलाः पक्षिणो वापि ये चान्ये वनगोचराः ॥ १० ॥
त्या प्रदेशात रेडे नव्हते, हरणे नव्हती, किंवा हत्ती आणि वाघही नव्हते, पक्षी तसेच वनात विचरणार्‍या अन्य प्राण्यांचाही तेथे अभाव होता. ॥१०॥
न चात्र वृक्षा नौषध्यो न लता नापि वीरुधः ।
स्निग्धपत्राः स्थले यत्र पद्मिन्यः फुल्लपङ्‌क्जाः ॥ ११ ॥

प्रेक्षणीयाः सुगंधाश्च भ्रमरैश्च विवर्जिताः ।
तेथे झाडे, झुडपे नव्हती, किंवा औषधी आणि लताही नव्हत्या. त्या देशांतील पुष्करिणीत स्निग्ध पाने आणि विकसित फुलांनी युक्त कमळे ही नव्हती. म्हणून ती प्रेक्षणीयही नव्हती अथवा तिच्यातून सुगंध पसरत नव्हता आणि तेथे भ्रमरही गुंजारव करीत नव्हते. ॥११ १/२॥
कण्डुर्नाम महाभागः सत्यवादी तपोधनः ॥ १२ ॥

महर्षिः परमामर्षी नियमैर्दुष्प्रधर्षणः ।
पूर्वी तेथे कण्डु नामाने प्रसिद्ध एक महाभाग सत्यवादी आणि तपोधन महर्षि राहात होते, जे फारच अमर्षशील होते- आपल्या प्रति केले गेलेल्या अपराधाला सहन करीत नसत. शौच-संतोष आदि नियमांचे पालन करण्यामुळे त्या महर्षिंना कोणीही तिरस्कृत अथवा पराजित करू शकत नव्हता. ॥१२ १/२॥
तस्य तस्मिन् वने पुत्रो बालको दशवार्षिकः ॥ १३ ॥

प्रणष्टो जीवितांताय क्रुद्धस्तेन महामुनिः ।
त्या वनात त्यांचा एक बालक पुत्र, ज्याचे वय दहा वर्षाचे होते, काही कारणाने मरून गेला त्यामुळे कुपित होऊन ते महामुनि त्या वनाच्या जीवनाचा अंत करण्यासाठी उद्यत झाले होते. ॥१३ १/२॥
तेन धर्मात्मना शप्तं कृत्स्नं तत्र महद्वनम् ॥ १४ ॥

अशरण्यं दुराधर्षं मृगपक्षिविवर्जितम् ।
त्या धर्मात्मा महर्षिनी त्या संपूर्ण विशाल वनास तेथे शाप दिला, ज्यामुळे ते आश्रयहीन दुर्गम तसेच पशु-पक्षीरहित (शून्य) झाले. ॥१४ १/२॥
तस्य ते काननांतांस्तु गिरीणां कंदराणि च ॥ १५ ॥

प्रभवानि नदीनां च विचिन्वंति समाहिताः ।
तत्र चापि महात्मानो नापश्यन् जनकात्मजाम् ॥ १६ ॥
हर्तारं रावणं वापि सुग्रीवप्रियकारिणः ।
तेथे सुग्रीवांचे प्रिय करणार्‍या, त्या मनस्वी वानरांनी त्या वनाच्या सर्व प्रदेशास, पर्वतांच्या कंदरांना, तसेच नद्यांच्या उगम स्थानामध्ये एकाग्रचित्त होऊन अनुसंधान केले परंतु तेथेही त्यांना जनकात्मजा सीतेचा अथवा तिचे अपहरण करणार्‍या रावणाचा काही पत्ता लागला नाही. ॥१५-१६ १/२॥
ते प्रविश्य तं भीमं लतागुल्मसमावृतम् ॥ १७ ॥

ददृशुर्भीमकर्माणं असुरं सुरनिर्भयम् ।
तत्पश्चात् लतांनी आणि झाडीनी व्याप्त असलेल्या दुसर्‍या कुठल्या तरी भयंकर वनात प्रवेश करून त्या हनुमान् आदि वानरांनी भयानक कर्म करणार्‍या एका असुराला पाहिले, ज्याला देवतांच्या कडून काही ही भय नव्हते. ॥१७ १/२॥
तं दृष्ट्‍वा वानरा घोरं स्थितं शैलमिवापरम् ॥ १८ ॥

गाढं परिहिताः सर्वे दृष्ट्‍वा तान् पर्वतोपमम् ।
त्या घोर निशाचराला पहाडासमान समोर उभा असलेला पाहून सर्व वानरांनी आपल्या सैल-ढिल्या वस्त्रांना उत्तम प्रकारे कसून घेतले आणि सर्वच्या सर्व त्या पर्वताकार असुराशी भिडण्यासाठी तयार झाले. ।१८ १/२॥
सोऽपि तान् वान्वानरान् सर्वान् नष्टाः स्थेत्यब्रवीद् बली ॥ १९ ॥

अभ्यधावत सङ्‌क्रुषद्धो मुष्टिमुद्यम्य संगतम् ।
तिकडे तो बलवान् असुरही त्या सर्व वानरांना पाहून म्हणाला - ’अरे ! आज तुम्ही सर्व मारले गेले आहात !’ इतके म्हणून तो अत्यंत कुपित होऊन आवळलेली मूठ उगारूण त्यांच्या कडे धावला. ॥१९ १/२॥
तमापतंतं सहसा वालिपुत्रोऽङ्‌गषदस्तदा ॥ २० ॥

रावणोऽयमिति ज्ञात्वा तलेनाभिजघान ह ।
त्याला एकाएकी आक्रमण करतांना पाहून वालीपुत्र अंगदास वाटले की हाच रावण आहे, म्हणून त्यांनी पुढे होऊन त्याला एक थप्पड मारली. ॥२० १/२॥
स वालिपुत्राभिहतो वक्त्राच्छोणितमुद्वमन् ॥ २१ ॥

असुरो न्यपतद् भूमौ पर्यस्त इव पर्वतः ।
ते तु तस्मिन् निरुच्छ्वासे वानरा जितकाशिनः ॥ २२ ॥

व्यचिन्वन् प्रायशस्तत्र सर्वं ते गिरिगह्वरम् ।
वालीपुत्राने मारल्यावर तो असुर तोंडातून रक्त ओकत, विदीर्ण होऊन पृथ्वीवर पडणार्‍या पहाडाप्रमाणे पृथ्वीवर कोसळला आणि त्याचे प्राणपाखरू उडून गेले. तत्पश्चात् विजयोल्हासाने सुशोभित होणारे वानर प्रायः तेथील सर्व पर्वतीय गुहांमध्ये अनुसंधान करू लागले. ॥२१-२२ १/२॥
विचितं तु ततः सर्वं सर्वे ते काननौकसः ॥ २३ ॥

अन्यदेवापरं घोरं विविशुर्गिरिगह्वरम् ।
जेव्हा तेथील सर्व प्रदेशात शोध घेतला गेला तेव्हा त्या समस्त वनवासी वानरांनी कुठल्यातरी दुसर्‍या पर्वतीय कंदरेत प्रवेश केला, जी पहिल्यापेक्षा ही भयानक होती. ॥२३ १/२॥
ते विचित्य पुनः खिन्ना विनिष्पत्य समागताः ।
एकांते वृक्षमूले तु निषेदुर्दीनमानसाः ॥ २४ ॥
त्यांत ही शोधून शोधून ते थकून गेले आणि निराश होऊन बाहेर आले. नंतर सर्वच्या सर्व एकान्त स्थानात एका वृक्षाखाली खिन्नचित्त होऊन बसले. ॥२४॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे अष्टचत्वारिंशः सर्गः ॥ ४८ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा अठ्ठेचाळीसावा सर्ग पूरा झाला. ॥४८॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP