श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ चतुरधिकशततमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामं प्रति कालेन ब्रह्मणः संदेशस्य कथने श्रीरामेण तस्याङ्‌गीकरणं च -
काळाने श्रीरामचंद्रांना ब्रह्मदेवांचा संदेश ऐकविणे आणि श्रीरामांनी त्याचा स्वीकार करणे -
शृणु राजन् महासत्व यदर्थमहमागतः ।
पितामहेन देवेन प्रेषितोऽस्मि महाबल ॥ १ ॥
महाबली महान्‌ सत्त्वशाली महाराज ! पितामह भगवान्‌ ब्रह्मदेवांनी ज्या उद्देश्याने मला येथे धाडले आहे आणि ज्यांसाठी मी येथे आलो आहे ते सर्व सांगतो, ऐकावे. ॥१॥
तवाहं पूर्वके भावे पुत्रः परपुरञ्जय ।
मायासम्भावितो वीर कालः सर्वसमाहरः ॥ २ ॥
शत्रुनगरीवर बिजय मिळविणार्‍या वीरा ! पूर्वावस्थे मध्ये अर्थात हिरण्यगर्भाच्या उत्पत्तिच्या समयी मी मायेद्वारा आपल्यापासून झालो म्हणून आपला पुत्रच आहे. मला सर्वसंहारकारी काळ म्हणतात. ॥२॥
पितामहश्च भगवान् आह लोकपतिः प्रभुः ।
समयस्ते कृतः सौम्य लोकान् संपरिरक्षितुम् ॥ ३ ॥
लोकनाथ प्रभु भगवान्‌ पितामहांनी सांगितले आहे की, सौम्य ! आपण लोकांच्या रक्षणासाठी जी प्रतिज्ञा केली होती ती पूरी झाली आहे. ॥३॥
सङ्‌क्षिप्य हि पुरा लोकान् मायया स्वयमेव हि ।
महार्णवे शयानोऽप्सु मां त्वं पूर्वमजीजनः ॥ ४ ॥
पूर्वकाळी समस्त लोकांना मायेच्या द्वारे स्वतःच आपल्यात लीन करून आपण महासमुद्राच्या जलात शयन केले होते. नंतर या सृष्टिच्या प्रारंभी सर्वात प्रथम आपण मला उत्पन्न केलेत. ॥४॥
भोगवन्तं ततो नागं अनंतमुदकेशयम् ।
मायया जनयित्वा त्वं द्वौ च सत्त्वौ महाबलौ ॥ ५ ॥

मधुं च कैटभं चैव ययोरस्थिचयैर्वृता ।
इयं पर्वतसम्बाधा मेदिनी चाभवत् तदाही ॥ ६ ॥
यानंतर विशाल फणीने आणि शरीराने युक्त तसेच जलात शयन करणार्‍या अनंत संज्ञक नागाला मायेच्या द्वारा प्रकट करून आपण दोघा महाबली जीवांना जन्म दिलात, ज्यांची नावे होती मधु आणि कैटभ. त्यांच्या अस्थि-समूहांनी भरलेली ही सर्व पर्वतांसहित पृथ्वी तात्काळ प्रकट झाली, जिला मेदिनी म्हटले गेले. ॥५-६॥
पद्मे दिव्येऽर्कसङ्‌काशे नाभ्यामुत्पाद्य मामपि ।
प्राजापत्यं त्वया कर्म मयि सर्वं निवेशितम् ॥ ७ ॥
आपल्या नाभितून सूर्यतुल्य तेजस्वी दिव्य कमळ प्रकट झाले, ज्यामध्ये आपण मलाही उत्पन्न केलेत आणि प्रजेची सृष्टि रचण्याचा सारा कार्यभाग माझ्यावर सोपवलात. ॥७॥
सोऽहं संन्यस्तभारो हि त्वामुपास्य जगत्पतिम् ।
रक्षां विधत्स्व भूतेषु मम तेजस्करो भवान् ॥ ८ ॥
जेव्हा माझ्यावर हा भार दिला गेला तेव्हा मी आपली जगदीश्वराची उपासना करून प्रार्थना केली - प्रभो ! आपण संपूर्ण भूतामध्ये राहून त्यांचे रक्षण करावे. कारण की आपणच मला तेज (ज्ञान आणि क्रियाशक्ति) प्रदान करणारे आहात. ॥८॥
ततस्त्वमपि दुर्धर्षात् तस्माद् भावात् सनातनात् ।
रक्षार्थं विधास्यन् भूतानां विष्णुत्वमुपजग्मिवान् ॥ ९ ॥
तेव्हा आपण माझा अनुरोध स्वीकार करून प्राण्यांच्या रक्षणासाठी अपरिमेय सनातन पुरूषरूपाने जगत्पालक विष्णुंच्या रूपात प्रकट झालात. ॥९॥
अदित्यां वीर्यवान् पुत्रो भ्रातॄणां वीर्यवर्धनः ।
समुत्पन्नेषु कृत्येषु तेषां साह्याय कल्पसे ॥ १० ॥
नंतर आपणच अदितिच्या गर्भातून परम पराक्रमी वामन रूपात अवतार घेतलात. तेव्हांपासून आपण आपला भाऊ इंद्रादि देवतांची शक्ति वाढवता आणि आवश्यकता पडल्यावर त्यांच्या रक्षणासाठी उद्यत राहाता. ॥१०॥
स त्वं उज्जास्यमानासु प्रजासु जगतां वर ।
रावणस्य वधाकाङ्‌क्षी मानुषेषु मनोऽदधाः ॥ ११ ॥
जगदीश्वरा ! जेव्हा रावणाच्या द्वारा प्रजांचा विनाश होऊ लागला, त्यासमयी आपण त्या निशाचराचा वध करण्याच्या इच्छेने मनुष्य शरीरात अवतार घेण्याचा निश्चय केलात. ॥११॥
दश वर्षसहस्राणि दश वर्षशतानि च ।
कृत्वा वासस्य नियमं स्वयमेवात्मना पुरा ॥ १२ ॥
आणि स्वतःच अकरा हजार वर्षांपर्यंत मर्त्यलोकात निवास करण्याचा अवधि निश्चित केला होता. ॥१२॥
स त्वं मनोमयः पुत्रः पूर्णायुर्मानुषेष्विह ।
कालोऽयं ते नरश्रेष्ठ समीपमुपवर्तितुम् ॥ १३ ॥
नरश्रेष्ठ ! आपण मनुष्य लोकात आपल्या संकल्पानेच कुणाच्या पुत्ररूपात प्रकट झाला आहात. या अवतारात आपण आपले जितक्या समयापर्यंतचे आयुष्य निश्चित केले होते, ते पुरे झाले आहे, म्हणून आता आपल्यासाठी हा आम्हां लोकांजवळ येण्याचा समय आला आहे. ॥१३॥
यदि भूयो महाराज प्रजा इच्छस्युपासितुम् ।
वस वा वीर भद्रं ते एवमाह पितामहः ॥ १४ ॥

अथ वा विजिगीषा ते सुरलोकाय राघव ।
सनाथा विष्णुना देवा भवन्तु विगतज्वराः ॥ १५ ॥
वीर महाराज ! जर आणखी अधिक काळ येथे राहून प्रजाजनांचे पालन करण्याची इच्छा असेल तर आपण राहू शकता. आपले कल्याण असो. रघुनंदना ! अथवा जर परमधामात येण्याचा विचार असेल तर अवश्य यावे. आपण विष्णुदेवांच्या स्वधामात प्रतिष्ठित झाल्यावर संपूर्ण देवता सनाथ आणि निश्चिंत होऊन जातील- असे पितामहांनी सांगितले आहे. ॥१४-१५॥
श्रुत्वा पितामहेनोक्तं वाक्यं कालसमीरितम् ।
राघवः प्रहसन् वाक्यं सर्वसंहारमब्रवीत् ॥ १६ ॥
काळाच्या मुखाने सांगितला गेलेला पितामह ब्रह्मदेवांचा संदेश ऐकून राघव हसून त्या सर्वसंहारी काळाला म्हणाले - ॥१६॥
श्रुत्वा मे देवदेवस्य वाक्यं परममद्‌भुतम् ।
प्रीतिर्हि महती जाता तवागमनसम्भवा ॥ १७ ॥
काळा ! देवाधिदेव ब्रह्मदेवांचे हे अद्‌भुत वचन ऐकण्यास मिळाले म्हणून तुमच्या येण्याने मला प्रसन्नता वाटली आहे. ॥१७॥
त्रयाणामपि लोकानां कार्यार्थं मम सम्भवः ।
भद्रं तेऽस्तु गमिष्यामि यत एवाहमागतः ॥ १८ ॥
तीन्ही लोकांच्या प्रयोजनाच्या सिद्धिसाठीच माझा हा अवतार झाला आहे. तो उद्देश आता पूरा झाला आहे, म्हणून तुमचे कल्याण होवो, आता मी जेथून आलो होतो तेथेच येईन. ॥१८॥
हृद्‌गतो ह्यसि सम्प्राप्तो न मे तत्र विचारणा ।
मया हि सर्वकृत्येषु देवानां वशवर्तिनाम् ।
स्थातव्यं सर्वसंहार यथा ह्याह पितामहः ॥ १९ ॥
काळा ! मी मनाने तुझे चिंतन केले होते. त्यास अनुसरूनच तू येथे आला आहेस, म्हणून या विषयी माझा मनांत काहीही विचार नाही आहे. सर्व संहारकारी काळा ! मला सर्व कार्यांमध्ये सदा देवतांचे वशवर्ती होऊनच राहिले पाहिजे, जसे पितामहांचे कथन आहे. ॥१९॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे चतुरधिकशततमः सर्गः ॥ १०४ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा एकशेंचवथा सर्ग पूरा झाला. ॥१०४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP