[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ षट्चत्वारिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
परिव्राजकरूपेण रावणस्य सीतायाः पार्श्वे गमनं तस्याः परिचयं ज्ञातुं तां प्रति प्रश्नः सीतया आतिथ्याय तस्य निमन्त्रणं च -
रावणाचे साधुवेषात सीतेजवळ जाऊन तिचा परिचय विचारणे आणि सीतेने आतिथ्यासाठी त्यास आमंत्रित करणे -
तया परुषमुक्तस्तु कुपितो राघवानुजः ।
स विकाङ्‌क्षन् भृशं रामं प्रतस्थे नचिरादिव ॥ १ ॥
सीतेने कठोर वचने बोलल्यावर कुपित झालेले लक्ष्मण श्रीरामांना भेटण्याची इच्छा बाळगून तात्काळच तेथून निघाले. ॥१॥
तदासाद्य दशग्रीवः क्षिप्रमन्तरमास्थितः ।
अभिचक्राम वैदेहीं परिव्राजकरूपधृक् ॥ २ ॥
लक्ष्मण निघून गेल्यावर रावणाला संधी मिळाली म्हणून तो संन्यासाचा वेष धारण करून शीघ्रच वैदेही सीतेच्या समीप गेला. ॥२॥
श्लक्ष्णकाषायसंवीतः शिखी छत्री उपानही ।
वामे चांसेऽवसज्याथ शुभे यष्टिकमण्डलू ॥ ३ ॥
त्याने शरीराभोवती स्वच्छ भगव्या रंगाचे वस्त्र गुंडाळलेले होते. त्याच्या मस्तकावर शिखा, हातात छत्री आणि पायात खडावा होत्या. त्याने डाव्या खांद्यावर दंड ठेवला होता आणि त्यामध्ये कमण्डलू लटकवून ठेवला होता. ॥३॥
परिव्राजकरूपेण वैदीहीमन्ववर्तत ।
तामाससादातिबलो भ्रातृभ्यां रहितां वने ॥ ४ ॥
अत्यंत बलवान रावण त्या वनात परिव्राजकाचे रूप धारण करून श्रीराम आणि लक्ष्मण या दोन्ही बंधुच्या विरहित एकटी असलेल्या वैदेही सीतेजवळ गेला. ॥४॥
रहितां चन्द्रसूर्याभ्यां सन्ध्यामिव महत्तमः ।
तामपश्यत् ततो बालां राजपुत्रीं यशस्विनीम् ॥ ५ ॥

रोहिणीं शशिना हीनां ग्रहवद् भृशदारुणः ।
ज्याप्रमाणे सूर्य आणि चंद्रमा यांच्या विरहित संध्येच्या जवळ महान अंधकार उपस्थित होतो त्याप्रकारे तो सीतेच्या निकट गेला. त्यानंतर जसा चंद्रम्याच्या विरहित असलेल्या रोहिणीवर अत्यंत दारूण ग्रह मंगळ अथवा शनैश्चराची दृष्टी पडावी त्या प्रकारे त्या अतिशय क्रूर रावणाने त्या भोळ्या भाबड्‍या यशस्विनी राजकुमारीकडे पाहिले. ॥५ १/२॥
तमुग्रं पापकर्माणं जनस्थानगता द्रुमाः ॥ ६ ॥

संदृश्य न प्रकम्पन्ते न प्रवाति च मारुतः ।
शीघ्रस्रोताश्च तं दृष्ट्‍वा वीक्षन्तं रक्तलोचनम् ॥ ७ ॥

स्तिमितं गन्तुमारेभे भयाद् गोदावरी नदी ।
त्या भयंकर पापाचारीला आलेला पाहून जनस्थानांतील वृक्षांनी हलणे बंद केले आणि वायुचा वेग थांबला. लाल डोळे असलेल्या रावणाला आपल्याकडे दृष्टीपात करतांना पाहून तीव्र गतीने वहाणारी गोदावरी नदी भयामुळे हळू हळू वाहू लागली. ॥६-७ १/२॥
रामस्य त्वन्तरं प्रेप्सुर्दशग्रीवस्तदन्तरे ॥ ८ ॥

उपतस्थे च वैदेहीं भिक्षुरूपेण रावणः ।
रामांचा बदला घेण्याची संधी शोधत असलेला दशमुख रावण त्या समयी भिक्षुरूपाने वैदेही सीतेजवळ येऊन पोहोंचला. ॥८ १/२॥
अभव्यो भव्यरूपेण भर्तारमनुशोचतीम् ॥ ९ ॥

अभ्यवर्तत वैदेहीं चित्रामिव शनैश्चरः ।
त्या समयी वैदेही सीता आपल्या पतिसाठी शोक आणि चिंतेमध्ये बुडून गेलेली होती. त्याच अवस्थेत अभव्य रावण भव्य रूप धारण करून तिच्या समोर उपस्थित झाला. जणु शनैश्चर ग्रहच चित्रा नक्षत्रा समोर जाऊन पोहोचला होता. ॥९ १/२॥
सहसा भव्यरूपेण तृणैः कूप इवावृतः ॥ १० ॥

अतिष्ठत् प्रेक्ष्य वैदेहीं रामपत्‍नीं यशस्विनीम् ।
ज्याप्रमाणे कूप गवतांनी झाकलेला असावा त्याप्रमाणे भव्य रूपाने आपली अभव्यता लपवून रावण एकाएकी तेथे जाऊन पोहोचला आणि यशस्विनी रामपत्‍नी वैदेहीला पाहून उभा राहिला. ॥१० १/२॥
तिष्ठन् सम्प्रेक्ष्य च तदा पत्‍नीं रामस्य रावण ॥ ११ ॥

शुभां रुचिरदन्तोष्ठीं पूर्णचन्द्रनिभाननाम्
आसीनां पर्णशालायां बाष्पशोकाभिपीडिताम् ॥ १२ ॥
त्या समयी रावण तेथे उभा राहूनच रामपत्‍नी सीतेला पाहू लागला. ती फारच सुंदर होती. तिचे दात आणि ओठ ही सुंदर होते, मुख पूर्णचंद्राची शोभा हरण करून घेत होते. ती पर्णशाळेत बसून शोकाने पीडित होऊन अश्रु ढाळीत राहिली होती. ॥११-१२॥
स तां पद्मपलाशाक्षीं पीतकौशेयवासिनीम् ।
अभ्यगच्छत वैदेहीं दुष्टचेता निशाचरः ॥ १३ ॥
तो निशाचर प्रसन्नचित्त होऊन रेशमी पीताम्बराने सुशोभित कमलनयनी वैदेहीच्या समोर गेला. ॥१३॥
दृष्ट्‍वा कामशराविद्धो ब्रह्मघोषमुदीरयन् ।
अब्रवीत् प्रश्रितं वाक्यं रहिते राक्षसाधिपः ॥ १४ ॥
तिला पहाताच कामदेवाच्या बाणांनी घायाळ होऊन राक्षसराज रावण वेदमंत्रांचे उच्चारण करू लागला आणि त्या एकान्त स्थानी विनीतभावाने तिला काही सांगण्यास उद्यत झाला. ॥१४॥
तामुत्तमां त्रिलोकानां पद्महीनामिव श्रियम् ।
विभ्राजमानां वपुषा रावणः प्रशशंस ह ॥ १५ ॥
त्रैलोक्य सुंदरी सीता आपल्या शरीराने कमलविरहित कमलालया लक्ष्मी प्रमाणे शोभून दिसत होती. रावण तिची प्रशंसा करीत म्हणाला- ॥१५॥
रौप्यकाञ्चनवर्णाभे पीतकौशेयवासिनि ।
कमलानां शुभां मालां पद्मिनीव हि बिभ्रती ॥ १६ ॥
उत्तम सुवर्णाप्रमाणे कांति असलेल्या आणि रेशमी पीताम्बर धारण करणार्‍या सुंदरी ! तू कोण आहेस ? तुझे मुख, नेत्र, हात आणि पाय कमलाप्रमाणे आहेत म्हणून तू पद्मिनी प्रमाणे कमलांची सुंदरशी मालाच धारण करीत आहेस. ॥१६॥
ह्रीः श्रीः कीर्तिः शुभा लक्ष्मीरप्सरा वा शुभानने ।
भूतिर्वा त्वं वरारोहे रतिर्वा स्वैरचारिणी ॥ १७ ॥
शुभानने ! तू श्री, ह्री, कीर्ती, शुभस्वरूपा लक्ष्मी अथवा अप्सरा तर नाहीस ना ? अथवा वरारोहे ! तू भूति अथवा स्वेच्छापूर्वक विहार करणारी कामदेवाची पत्‍नी रति तर नाहीस ना ? ॥१७॥
समाः शिखरिणः स्निग्धाः पाण्डुरा दशनास्तव ।
विशाले विमले नेत्रे रक्तान्ते कृष्णतारके ॥ १८ ॥

विशालं जघनं पीनमूरू करिकरोपमौ ।
तुझे दात एकसारखे आहेत. त्यांचे अग्रभाग कुंदकळ्यांप्रमाणे शोभत आहेत. ते सर्वच्या सर्व तकतकीत आणि पांढरे आहेत. तुझे दोन्ही डोळे मोठमोठे आणि निर्मल आहेत. त्यांचे दोन्ही कोपरे लाल आहेत आणि पुतळ्या (बुबुळे) काळी आहेत. कटिचा अग्रभाग विशाल आणि मांसल आहे. दोन्ही जांघा हत्तीच्या सोंडेप्रमाणे शोभत आहेत. ।१८ १/२॥
एतावुपचितौ वृत्तौ संहतौ सम्प्रगल्भितौ ॥ १९ ॥

पीनोन्नतमुखौ कान्तौ स्निग्धौ तालफलोपमौ ।
मणिप्रवेकाभरणौ रुचिरौ ते पयोधरौ ॥ २० ॥
तुझे हे दोन्ही स्तन पुष्ट, गोलाकार आणि परस्परास भिडलेले, प्रगल्भ मोठे, उन्नत मुख असणारे, कमनीय, गुळगुळीत ताडफळासमान आकाराचे, परम सुंदर आणि श्रेष्ठ मणिमय आभूषणांनी विभूषित आहेत. ॥१९-२०॥
चारुस्मिते चारुदति चारुनेत्रे विलासिनि ।
मनो हरसि मे रामे नदीकूलमिवाम्भसा ॥ २१ ॥
सुंदर हास्य, रूचिर दंतपंक्ती आणि मनोहर नेत्र असणार्‍या विलासिनी रमणी ! तू आपल्या रूप सौंदर्याने माझ्या मनाला, नदी आपल्या जलाने आपल्या तटाचे अपहरण करते त्याप्रमाणे हरण करून घेत आहेस. ॥२१॥
करान्तमितमध्यासि सुकेशी संहतस्तनि ।
नैव देवी न गन्धर्वी न यक्षी न च किन्नरी ॥ २२ ॥
तुझी कंबर इतकी बारीक आहे की मुठीत येईल. केस तुकतुकीत आणि मनोहर आहेत. दोन्ही स्तन एकमेकास भिडलेले आहेत. सुंदरी ! देवता, गंधर्व, यक्ष अथवा किन्नर जातीच्या स्त्रियांमध्ये कुणीही तुझ्यासारखी नाही आहे. ॥२२॥
नैवंरूपा मया नारी दृष्टपूर्वा महीतले ।
रूपमग्य्रं च लोकेषु सौकुमार्यं वयश्च ते ॥ २३ ॥

इह वासश्च कान्तारे चित्तमुन्माथयन्ति मे ।
सा प्रतिक्राम भद्रं ते न त्वं वस्तुमिहार्हसि ॥ २४ ॥
पृथ्वीवर तर अशी रूपवती स्त्री मी आजच्या पूर्वी कधी पाहिलेलीही नाही. कोठे तुझे हे तीन्ही लोकात सर्वांहून सुंदर रूप, सुकुमारता आणि नव अवस्था आणि कोठे या दुर्गम वनात निवास ! ह्या सर्व गोष्टी लक्षात येताच माझ्या मनाला अस्वस्थ करून टाकतात. तुझे कल्याण होवो. येथून तू निघून जा. तू येथे राहाण्यास योग्य नाहीस. ॥२३-२४॥
राक्षसानामयं वासो घोराणां कामरूपिणाम् ।
प्रासादाग्राणि रम्याणि नगरोपवनानि च ॥ २५ ॥

सम्पन्नानि सुगन्धीनि युक्तान्याचरितुं त्वया ।
ही तर इच्छेनुसार रूप धारण करणार्‍या भयंकर राक्षसांची राहण्याची जागा आहे. तू तर रमणीय राजमहालात, समृद्धिशाली नगरात आणि सुगंधयुक्त उपवनात निवास केला पाहिजेस आणि विचरण केले पाहिजेस. ॥२५ १/२॥
वरं माल्यं वरं गन्धं वरं वस्त्रं च शोभने ॥ २६ ॥

भर्तारं च वरं मन्ये त्वद्युक्तमसितेक्षणे ।
शोभने ! तोच पुरुष श्रेष्ठ आहे, तोच गंध उत्तम आहे आणि तेच वस्त्र सुंदर आहे जे तुझ्या उपयोगात आणले जाते. काळे भोर नेत्र असणार्‍या सुंदर स्त्रिये ! मी त्यालाच श्रेष्ठ पति मानतो ज्याला तुझा सुखद संयोग प्राप्त होतो. ॥२६ १/२॥
का त्वं भवसि रुद्राणां मरूतां वा शुचिस्मते ॥ २७ ॥

वसूनां वा वरारोहे देवता प्रतिभासि मे ।
पवित्र स्मित आणि सुंदर अंगे असणार्‍या देवी ! तू कोण आहेस ? मला तर तू रूद्राशी, मरूद्‍गणांशी अथवा वसुंशी संबंध ठेवणारी देवी आहेस असे वाटत आहे. ॥२७ १/२॥
नेह गच्छन्ति गन्धर्वा न देवा न च किन्नराः ॥ २८ ॥

राक्षसानामयं वासः कथं नु त्वमिहागता ।
येथे गंधर्व, देवता तसेच किन्नर येत जात नाहीत. हे राक्षसांचे निवासस्थान आहे; मग तू येथे कशी काय आली आहेस ? ॥२८ १/२॥
इह शाखामृगाः सिंहा द्वीपिव्याघ्रमृगा वृकाः ॥ २९ ॥

ऋक्षास्तरक्षवः कङ्‌काः कथं तेभ्यो न बिभ्यसे ।
येथे वानरे, सिंह, चित्ते, व्याघ्र, मृग, लांडगे, अस्वले, वाघ आणि कंक (गिधाडे आणि पक्षी) राहातात. तुला त्याचे पासून भय कसे वाटत नाही ? ।२९ १/२॥
मदान्वितानां घोराणां कुञ्जराणां तरस्विनाम् ॥ ३० ॥

कथमेका महारण्ये न बिभेषि वरानने ।
वरानने ! या विशाल वनामध्ये वेगवान आणि भयंकर मदमस्त गजराजांच्या मध्ये एकटी राहात असता तू भयभीत कशी होत नाहीस ? ॥३० १/२॥
कासि कस्य कुतश्च त्वं किं निमित्तं च दण्डकान् ॥ ३१ ॥

एका चरसि कल्याणि घोरान् राक्षससेवितान् ।
कल्याणमयि देवी ! सांग तर तू कोण आहेस ? कोणाची आहेस ? आणि कोठून येवून काय कारणाने या राक्षससेवित घोर दण्डकारण्यात एकटी विचरण करीत आहेस ? ॥३१ १/२॥
इति प्रशस्ता वैदेही रावणेन महात्मना ॥ ३२ ॥

द्विजातिवेषेण हि तं दृष्ट्‍वा रावणमागतम् ।
सर्वैरतिथिसत्कारैः पूजयामास मैथिली ॥ ३३ ॥
वेषभूषेने महात्मा बनून आलेल्या रावणाने जेव्हां वैदेही सीतेची याप्रकारे प्रशंसा केली तेव्हा ब्राह्मण वेषाने तेथे आलेल्या रावणाला पाहून मैथिलीने अतिथि- सत्कारास उपयोगी सर्व सामग्रीच्या द्वारा त्याचे पूजन केले. ॥३२-३३॥
उपनीयासनं पूर्वं पाद्येनाभिनिमन्त्र्य च ।
अब्रवीत् सिद्धमित्येव तदा तं सौम्यदर्शनम् ॥ ३४ ॥
प्रथम बसावयास आसन दिले, पाद्य निवेदन केले. त्यानंतर वरून सौम्य दिसणार्‍या त्या अतिथिला भोजनासाठी निमंत्रण देऊन म्हटले- ब्रह्मन्‌ ! भोजन तयार आहे; ग्रहण करावे. ॥३४॥
द्विजातिवेषेण समीक्ष्य मैथिली
समागतं पात्रकुसुम्भधारिणम् ।
अशक्यमुद् द्वेष्टुमुपायदर्शना-
न्न्यमन्त्रयद् ब्राह्मणवत् तथागतम् ॥ ३५ ॥
तो ब्राह्मणाच्या वेषात आला होता; कमण्डलु आणि भगवी वस्त्रे धारण केलेली होती. ब्राह्मण वेषाने आलेल्या अतिथिची उपेक्षा असंभव होती. त्याच्या वेषभूषेत ब्राह्मणत्वाचा निश्चय करविणारी चिन्हे दिसून येत होती म्हणून त्या रूपात आलेल्या त्या रावणाला पाहून मैथिलीने ब्राह्मणास योग्य सत्कार करण्यासाठीच निमंत्रित केले. ॥३५॥
इयं बृसी ब्राह्मण काममास्यता-
मिदं च पाद्यं प्रतिगृह्यतामिति ।
इदं च सिद्धं वनजातमुत्तमं
त्वदर्थमव्यग्रमिहोपभुज्यताम् ॥ ३६ ॥
ती म्हणाली - ब्राह्मणा ! ही चटई आहे, यावर इच्छानुसार बसून जावे. हे पाय धुण्यासाठी जल आहे हे ग्रहण करावे आणि हे वनात उत्पन्न झालेले उत्तम फल- मूल आपल्यासाठीच तयार करून ठेवण्यात आले आहे, येथे शान्तभावाने त्याचा उपयोग करावा. ॥३६॥
निमन्त्र्यमाणः प्रतिपूर्णभाषिणीं
नरेन्द्रपत्‍नीं प्रसमीक्ष्य मैथिलीम् ।
प्रसह्य तस्या हरणे दृढं मनः
समर्पयामास वधाय रावणः ॥ ३७ ॥
अतिथिसाठी सर्व काही तयार आहे असे म्हणून सीतेने जेव्हा त्यास भोजनासाठी निमंत्रित केले तेव्हा रावणाने सर्व संपन्नम्‌ म्हणणार्‍या राजराणी मैथिलीकडे पाहिले आणि आपल्याच वधासाठी त्याने ह्ट्टाने सीतेचे हरण करण्याच्या निमित्ताने मनात दृढ निश्चय केला. ॥३७॥
ततः सुवेषं मृगयागतं पतिं
प्रतीक्षमाणा सहलक्ष्मणं तदा ।
निरीक्षमाणा हरितं ददर्श त-
न्महद् वनं नैव तु रामलक्ष्मणौ ॥ ३८ ॥
त्यानंतर सीता शिकार खेळण्यासाठी गेलेल्या लक्ष्मणासहित आपल्या सुंदर वेषधारी पति श्रीरामचंद्रांची प्रतीक्षा करू लागली. तिने चारी बाजूस दृष्टी टाकली परंतु तिला सर्व बाजूस हिरवेगार विशाल वनच दिसून आले. श्रीराम आणि लक्ष्मण नजरेस आले नाहीत. ॥३८॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे षट्चत्वारिंशः सर्गः ॥ ४६ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा सेहेचाळीसावा सर्ग पूरा झाला. ॥४६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP