[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ एकादशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
पञ्चाप्सरतीर्थस्य माण्डकर्णिमुनेश्च कथा नानाश्रमेषु श्रीरामप्रभृतीनां सुतीक्ष्णस्याश्रमे समागमनं, तत्र किञ्चित् कालं स्थित्वा मुनेराज्ञयागस्त्यभ्रातुरगस्तस्य चाश्रमयोर्गमनमगस्त्यप्रभावस्य च वर्णनम् - पञ्चाप्सर तीर्थ तसेच माण्डकर्णि मुनिची कथा, विभिन्न आश्रमात हिंडून श्रीराम आदिंचे सुतीक्ष्णांच्या आश्रमास येणे, तेथे काही काळ राहून त्यांच्या आज्ञेने अगस्त्यांचे भाऊ तसेच अगस्त्यांचे आश्रमात जाणे तसेच अगस्त्यांच्या प्रभावाचे वर्णन -
अग्रतः प्रययौ रामः सीता मध्ये सुशोभना ।
पृष्ठतस्तु धनुष्पाणिर्लक्ष्मणोऽनुजगाम ह ॥ १ ॥
त्यानंतर पुढे पुढे श्रीराम चालत होते. मध्ये परम सुंदर सीता चालत होती आणि तिच्या मागे हातात धनुष्य घेऊन लक्ष्मण चालू लागले. ॥१॥
तौ पश्यमानौ विविधाञ्शैलप्रस्थान् वनानि च ।
नदीश्च विविधा रम्या जग्मतुः सह सीतया ॥ २ ॥
सीतेसह हे दोन्ही भाऊ निरनिराळ्या प्रकारची पर्वतीय शिखरे, वने तसेच नाना प्रकारच्या रमणीय नद्यांना पाहात पुढे जात राहिले. ॥२॥
सारसांश्चक्रवाकांश्च नदीपुलिनचारिणः ।
सरांसि च सपद्मानि युक्तानि जलजैः खगैः ॥ ३ ॥
त्यांनी पाहिले काही नद्यांच्या तटावर सारस आणि चक्रवाक विचरत होते. आणि काही ठिकाणी फुललेल्या कमळांनी आणि जलचर पक्ष्यांनी युक्त सरोवरे शोभून दिसत होती. ॥३॥
यूथबद्धांश्च पृषतान् मदोन्मत्तान् विषाणिनः ।
महिषांश्च वराहांश्च नागांश्च द्रुमवैरिणः ॥ ४ ॥
काही ठिकाणी चितकबरी हरणे कळप बनवून चालली होती, तर कोठे कोठे मोठमोठ्या शिंगाचे मदमस्त रेडे तसेच मोठमोठे सुळे असलेली (जंगली) रानडुकरे आणि वृक्षांचे वैरी दंतार हत्ती दिसून येत होते. ॥४॥
ते गत्वा दूरमध्वानं लंबमाने दिवाकरे ।
ददृशुः सहिता रम्यं तटाकं योजनायुतम् ॥ ५ ॥
दूरपर्यंत प्रवास केल्यावर जेव्हा सूर्य अस्ताचलास जाऊ लागला तेव्हा त्या तिघांनी एकाच वेळी - समोर एक मोठाच सुंदर तलाव असून त्याची लांबी-रूंदी एक योजनाची असावी असे भासत असल्याचे पाहिले. ॥५॥
पद्मपुष्करसम्बाधं गजयूथैरलङ्‌कृतम् ।
सारसैर्हंसकादम्बैः सङ्‌कुलं जलजातिभिः ॥ ६ ॥
ते सरोवर लाल आणि श्वेत कमळांनी भरलेले होते. त्यांच्यात क्रीडा करणार्‍या हत्तींच्या झुंडीच्या झुंडी त्याची शोभा वाढवीत होत्या. तसेच सारस, राजहंस आणि कलहंस आदि पक्षी तसेच जलात उत्पन्न होणारे मत्स्य आदि जंतुंनी ते व्याप्त दिसून येत होते. ॥६॥
प्रसन्नसलिले रम्ये तस्मिन् सरसि शुश्रुवे ।
गीतवादित्रनिर्घोषो न तु कश्चन दृश्यते ॥ ७ ॥
स्वच्छ जलांनी भरलेल्या त्या रमणीय सरोवरात गाण्या बजावण्याचा शब्द ऐकू येत होता, परंतु कोणी दिसून येत नव्हते. ॥७॥
ततः कौतूहलाद् रामो लक्ष्मणश्च महारथः ।
मुनिं धर्मभृतं नाम प्रष्टुं समुपचक्रमे ॥ ८ ॥
तेव्हा श्रीरामांनी आणि महारथी लक्ष्मणांनी कुतुहलाने आपल्या बरोबर आलेल्या धर्मभृत नामक मुनिंना विचारवयास आरंभ केला - ॥८॥
इदमत्यद्‌भुतं श्रुत्वा सर्वेषां नो महामुने ।
कौतूहलं महज्जातं किमिदं साधु कथ्यताम् ॥ ९ ॥
’महामुने ! हा अत्यंत अद्‍भुत संगीताचा ध्वनी ऐकून आम्हा सर्व लोकांना फारच कुतुहल होत आहे. हे काय आहे ते चांगल्या प्रकारे सांगावे.’ ॥९॥
तेनैवमुक्तो धर्मात्मा राघवेण मुनिस्तदा ।
प्रभवं सरसः क्षिप्रमाख्यातुमुपचक्रमे ॥ १० ॥
श्रीरामचंद्रांनी या प्रकारे विचारल्यावर धर्मात्मा धर्मभृत नामक मुनिनी ताबडतोबच त्या सरोवराचा प्रभाव वर्णन करण्यास आरंभ केला- ॥१०॥
इदं पञ्चाप्सरो नाम तटाकं सार्वकालिकम् ।
निर्मितं तपसा राम मुनिना माण्डकर्णिना ॥ ११ ॥
श्रीरामा ! हे पञ्चाप्सर नामक सरोवर आहे, जे सर्वदा अगाध जलाने भरलेले राहात असते. माण्डकर्णि नामक मुनिंनी आपल्या तपाच्या द्वारा हे निर्माण केले होते. ॥११॥
स हि तेपे तपस्तीव्रं माण्डकर्णिर्महामुनिः ।
दशवर्षसहस्राणि वायुभक्षो जलाश्रये ॥ १२ ॥
’महामुनि माण्डकर्णिने एका जलाशयात राहून केवळ वायुचा आहार करून दहा हजार वर्षेपर्यंत तीव्र तपस्या केली होती. ॥१२॥
ततः प्रव्यथिताः सर्वे देवाः साग्निपुरोगमाः ।
अब्रुवन्वचनं सर्वे परस्परसमागताः ॥ १३ ॥
’त्या समयी अग्नि आदि सर्व देवता त्याच्या तपाने अत्यंत व्यथित झाल्या आणि आपापसात भेटून त्या सर्वच्या सर्व या प्रकारे म्हणू लागल्या. ॥१३॥
अस्माकं कस्यचित् स्थानमेष प्रार्थयते मुनिः ।
इति संविग्नमनसः सर्वे तत्र दिवौकसः ॥ १४ ॥
’असे कळून येत आहे की हे मुनि आपल्यापैकी कुणाचे तरी स्थान घेऊ इच्छित आहेत. असा विचार करून त्या सर्व देवता मनातल्या मनात उद्विग्न झाल्या. ॥१४॥
ततः कर्तुं तपोविघ्नं सर्वदेवैर्नियोजिताः ।
प्रधानाप्सरसः पञ्च विद्युच्चलितवर्चसः ॥ १५ ॥
’तेव्हा त्यांच्या तपस्येत विघ्न आणण्यासाठी संपूर्ण देवतांची पाच प्रधान अप्सरांना नियुक्त केले, ज्यांची अङ्‌गकांती विद्युत समान चञ्चल होती. ॥१५॥
अप्सरोभिस्ततस्ताभिर्मुनिर्दृष्टपरावरः ।
नीतो मदनवश्यत्वं सुराणां कार्यसिद्धये ॥ १६ ॥
’तदनंतर ज्यांनी लौकिक आणि पारलौकिक धर्माधर्माचे ज्ञान प्राप्त केले होते, त्या मुनींना त्या पाच अप्सरांनी देवतांचे कार्य सिद्ध करण्यासाठी कामाच्या अधीन करून टाकले. ॥१६॥
ताश्चैवाप्सरसः पञ्च मुनेः पत्‍नीत्वमागताः ।
तटाके निर्मितं तासां तस्मिन्नन्तर्हितं गृहम् ॥ १७ ॥
’मुनिंच्या पत्‍नी बनलेल्या त्याच पाच अप्सरा येथे राहात आहेत. त्यांना राहण्यासाठी या तलावाच्या आत घर बनविलेले आहे जे पाण्यात लपलेले आहे. ॥१७॥
तथैवाप्सरसः पञ्च निवसन्त्यो यथासुखम् ।
रमयन्ति तपोयोगान् मुनिं यौवनमास्थितम् ॥ १८ ॥
’त्या घरात सुखपूर्वक राहाणार्‍या त्या पाच अप्सरा तपस्येच्या प्रभावाने युवावस्थेला प्राप्त झालेल्या मुनिंना आपल्या सेवेने संतुष्ट करीत असतात. ॥१८॥
तासां संक्रीडमानानामेष वादित्रनिःस्वनः ।
श्रूयते भूषणोन्मिश्रो गीतशब्दो मनोहरः ॥ १९ ॥
’क्रीडा-विहारात दंग असलेल्या त्या अप्सरांच्याच वाद्यांचा हा ध्वनी ऐकू येत आहे जो भूषणांच्या झंकाराच्या आवाजात मिसळलेला आहे. त्याच बरोबर त्यांच्या गीताचाही मनोहर शब्द कानावर पडत आहे.’ ॥१९॥
आश्चर्यमिति तस्यैतद् वचनं भावितात्मनः ।
राघवः प्रतिजग्राह सह भ्रात्रा महायशाः ॥ २० ॥
आपल्या भावासह महायशस्वी राघवांनी त्या भावितात्मा महर्षिचे हे कथन’ ही तर मोठी आश्चर्याची गोष्ट आहे’ असे म्हणून स्वीकारले. ॥२०॥
एवं कथयमानः स ददर्शाश्रममण्डलम् ।
कुशचीरपरिक्षिप्तं ब्राह्म्या लक्ष्म्या समावृतम् ॥ २१ ॥
या प्रकारे बोलणार्‍या श्रीरामचंद्रांना एक आश्रम मण्डल दिसून आले जेथे सर्व बाजूस कुश आणि वल्कल वस्त्रे पसरलेली होती. तो आश्रम ब्राह्मी लक्ष्मी (ब्रह्मतेजा) ने प्रकाशित झाला होता. ॥२१॥
प्रविश्य सह वैदेह्या लक्ष्मणेन च राघवः ।
तदा तस्मिन् स काकुत्स्थः श्रीमत्याश्रममण्डले ॥ २२ ॥

उषित्वा स सुखं तत्र पूज्यमानो महर्षिभिः ।
वैदेही सीता तसेच लक्ष्मणासह त्या तेजस्वी आश्रममण्डलात प्रवेश करून काकुत्स्थ श्रीरामांनी त्या समयी सुखपूर्वक निवास केला. तेथील महर्षिंनी त्यांचा मोठा आदर-सत्कार केला. ॥२२ १/२॥
जगाम चाश्रमांस्तेषां पर्यायेण तपस्विनाम् ॥ २३ ॥

येषामुषितवान् पूर्वं सकाशे स महास्त्रवित् ।
त्यानंतर महान अस्त्रांचे ज्ञाते श्रीरामचंद्र पाळीपाळीने त्या सर्वतपस्वी मुनींच्या आश्रमात गेले. ज्यांच्याकडे ते पूर्वीही गेले होते. त्यांच्याकडे ही ते (त्यांची भक्ती पाहून) दुसर्‍यांदा जाऊन राहिले. ॥२३ १/२॥
क्वचित् परिदशान् मासानेकसंवत्सरं क्वचित् ॥ २४ ॥

क्वचिच्च चतुरो मासान् पञ्च षट् च परान् क्वचित् ।
अपरत्राधिकान् मासानध्यर्धमधिकं क्वचित् ॥ २५ ॥

त्रीन् मासानष्टमासांश्च राघवो न्यवसत् सुखम् ।
कोठे दहा महिने, कोठे वर्षभर, कोठे चार महिने, कोठे पाच अथवा सहा महिने, कोठे याहूनही अधिक समय (अर्थात सात महिने) कोठे त्याहूनही अधिक (आठ महीने) कोठे अर्धा महीना अधिक अर्थात साडे आठ महिने, कोठे तीन महीने आणि कोठे आठ आणि तीन अर्थात अकरा महिन्या पर्यत श्रीरामचंद्रांनी सुखपूर्वक निवास केला. ॥२४-२५ १/२॥
तथा संवसतस्तस्य मुनीनामाश्रमेषु वै ॥ २६ ॥

रमतश्चानुकूल्येन ययुः संवत्सरा दश ।
या प्रकारे मुनिंच्या आश्रमावर राहात आणि अनुकूलता मिळून आनंदाचा अनुभव करीत त्यांची दहा वर्षे निघून गेली. ॥२६ १/२॥
परिसृत्य च धर्मज्ञो राघवः सह सीतया ॥ २७ ॥

सुतीक्ष्णस्याश्रमपदं पुनरेवाजगाम ह ।
याप्रकारे सर्वत्र हिंडून फिरून धर्माचे ज्ञाते भगवान श्रीराम सीतेसह परत सुतीक्ष्णांच्या आश्रमावर परत आले. ॥२७ १/२ ॥
स तमाश्रममागम्य मुनिभिः प्रतिपूजितः ॥ २८ ॥

तत्रापि न्यवसद् रामः किञ्चित् कालमरिंदमः ।
शत्रूंचे दमन करणार्‍या श्रीरामांनी त्या आश्रमात येऊन तेथे राहाणार्‍या मुनींच्या द्वारा सन्मानित होऊन तेथे ही काही कालपर्यंत ते राहिले. ॥२८ १/२ ॥
अथाश्रमस्थो विनयात् कदाचित् तं महामुनिम् ॥ २९ ॥

उपासीनः स काकुत्स्थः सुतीक्ष्णमिदमब्रवीत् ।
त्या आश्रमात राहात असतां श्रीरामांनी एक दिवस महामुनि सुतीक्ष्णांच्या जवळ बसून विनीत भावाने म्हटले - ॥२९ १/२॥
अस्मिन्नरण्ये भगवन्नगस्त्यो मुनिसत्तमः ॥ ३० ॥

वसतीति मया नित्यं कथाः कथयतां श्रुतम् ।
नतु जानामि तं देशं वनस्यास्य महत्तया ॥ ३१ ॥
’भगवन् ! मी प्रतिदिन वार्तालाप करणार्‍या लोकांच्या तोंडून असे ऐकले आहे की याच वनात कोठे तरी मुनिश्रेष्ठ अगस्त्यांचा निवास असतो. परंतु या वनाच्या विशालतेमुळे मी त्या स्थानास जाणत नाही. ॥३०-३१॥
कुत्राश्रमपदं रम्यं महर्षेस्तस्य धीमतः ।
प्रसादार्थं भगवतः सानुजः सह सीतया ॥ ३२ ॥

अगस्त्यमभिगच्छेयमभिवादयितुं मुनिम् ।
मनोरथो महानेष हृदि संपरिवर्तते ॥ ३३ ॥
’त्या बुद्धिमान महर्षींचा सुंदर आश्रम कोठे आहे ? मी लक्ष्मण आणि सीतेसह भगवान अगस्त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्या मुनीश्वरांना प्रणाम करण्याच्या उद्देशाने त्यांच्या आश्रमावर जाईन - हा महान मनोरथ माझ्या हृदयात सारखा घोळत राहिला आहे. ॥३२-३३॥
यदहं तं मुनिवरं शुश्रूषेयमपि स्वयम् ।
इति रामस्य स मुनिः श्रुत्वा धर्मात्मनो वचः ॥ ३४ ॥

सुतीक्ष्णः प्रत्युवाचेदं प्रीतो दशरथात्मजम् ।
मी इच्छितो की मी स्वतः ही मुनिवर अगस्त्यांची सेवा करावी. धर्मात्मा श्रीरामांचे हे वचन ऐकून सुतीक्ष्ण मुनि अत्यंत प्रसन्न झाले आणि त्या दशरथनंदनास या प्रकारे म्हणाले - ॥३४ १/२॥
अहमप्येतदेव त्वां वक्तुकामः सलक्ष्मणम् ॥ ३५ ॥

अगस्त्यमभिगच्छेति सीतया सह राघव ।
दिष्ट्या त्विदानीमर्थेऽस्मिन् स्वयमेव ब्रवीषि माम् ॥ ३६ ॥
’रघुनंदन ! मी ही लक्ष्मणासह आपणास हेच सांगू इच्छित होतो की आपण सीतेसह महर्षि अगस्त्यांच्या जवळ जावे. सौभाग्याची गोष्ट आहे की या समयी आपण स्वतःच मला तेथे जाण्याविषयी विचारत आहात. ॥३५-३६॥
अयमाख्यामि ते राम यत्रागस्त्यो महामुनिः ।
योजनान्याश्रमात् तात याहि चत्वारि वै ततः ।
दक्षिणेन महाञ्छ्रीमान् अगस्त्य भ्रातुराश्रमः ॥ ३७ ॥
’श्रीरामा ! महामुनि अगस्त्य जेथे राहातात त्या आश्रमाचा पत्ता मी आत्ता आपल्याला सांगतो. तात ! या आश्रमापासून चार योजने दक्षिणेस चालून जा. तेथे आपल्याला अगस्त्यांच्या भावाचा फार मोठा आणि सुंदर आश्रम (दिसेल) मिळेल. ॥३७॥
स्थलीप्रायवनोद्देशे पिप्पलीवनशोभिते ।
बहुपुष्पफले रम्ये नानाविहगनादिते ॥ ३८ ॥

पद्मिन्यो विविधास्तत्र प्रसन्नसलिलाशयाः ।
हंसकारण्डवाकीर्णाश्चक्रवाकोपशोभिताः ॥ ३९ ॥
’तेथील वनाची भूमि प्रायः समतल आहे. तसेच पिप्पलीचे वन त्या आश्रमाची शोभा वाढवीत आहे. तेथे फुले आणि फळे यांची विपुलता आहे. नाना प्रकारच्या पक्ष्यांच्या कलरवाने गुंजत असलेल्या त्या रमणीय आश्रमाजवळ नाना प्रकारची कमलमण्डित सरोवरे आहेत, जी स्वच्छ जलाने भरलेली आहेत. हंस आणि कारण्डव आदि पक्षी त्यात सर्वत्र पसरलेले आहेत तसेच चक्रवाक त्याची शोभा वाढवीत आहेत. ॥३८-३९॥
तत्रैकां रजनीं व्युष्य प्रभाते राम गम्यताम् ।
दक्षिणां दिशमास्थाय वनखण्डस्य पार्श्वतः ॥ ४० ॥

तत्रागस्त्याश्रमपदं गत्वा योजनमन्तरम् ।
रमणीये वनोद्देशे बहुपादपशोभिते ॥ ४१ ॥
’श्रीरामा ! आपण एक रात्र त्या आश्रमात राहून प्रातःकाली त्या वनखण्डाच्या किनार्‍याने दक्षिण दिशेकडे जावे. या प्रकारे एक योजन पुढे गेल्यावर अनेकानेक वृक्षांनी सुशोभित वनाच्या रमणीय भागात अगस्त्य मुनींचा आश्रम दिसेल.’ ॥४०-४१॥
रंस्यते तत्र वैदेही लक्ष्मणश्च त्वया सह ।
स हि रम्यो वनोद्देशो बहुपादपसंयुतः ॥ ४२ ॥
तेथे वैदेही सीता आणि लक्ष्मण आपल्या बरोबर सानंदाने विचरण करतील, कारण की बहुसंख्य वृक्षांनी सुशोभित तो वनप्रांत फारच रमणीय आहे. ॥४२॥
यदि बुद्धिः कृता द्रष्टुमगस्त्यं तं महामुनिम् ।
अद्यैव गमने बुद्धिं रोचयस्व महामते ॥ ४३ ॥
’महामते ! जर आपण महामुनि अगस्त्यांच्या दर्शनाचा निश्चित विचार केला असेल तर आजच तेथील यात्रा करण्याचा ही निश्चय करावा.’ ॥४३॥
इति रामो मुनेः श्रुत्वा सह भ्रात्राभिवाद्य च ।
प्रतस्थेऽगस्त्यमुद्दिश्य सानुजः सह सीतया ॥ ४४ ॥
मुनींचे हे वचन ऐकून भावासहित श्रीरामचंद्रांनी त्यांना प्रणाम केला आणि सीता तसेच लक्ष्मणासह अगस्त्यांच्या आश्रमाकडे जाण्यास निघाले. ॥४४॥
पश्यन् वनानि रम्याणि पर्वतांश्चाभ्रसंनिभान् ।
सरांसि सरितश्चैव पथि मार्गवशानुगान् ॥ ४५ ॥
मार्गात लागलेली विचित्र विचित्र वने, मेघमालाप्रमाणे भासणार्‍या पर्वतमाला, सरोवरे आणि सरितांना पहात ते पुढे चालले होते. ॥४५॥
सुतीक्ष्णेनोपदिष्टेन गत्वा तेन पथा सुखम् ।
इदं परमसंहृष्टो वाक्यं लक्ष्मणमब्रवीत् ॥ ४६ ॥
या प्रकारे सुतीक्ष्णांनी सांगितलेल्या मार्गाने सुखपूर्वक चालता चालतांना श्रीरामचंद्रांनी अत्यंत हर्षाने भरून जाऊन लक्ष्मणाला ही गोष्ट सांगितली - ॥४६॥
एतदेवाश्रमपदं नोनं तस्य महात्मनः ।
अगस्त्यस्य मुनेर्भ्रातुर्दृश्यते पुण्यकर्मणः ॥ ४७ ॥
’सुमित्रानंदन ! निश्चितच हा पुण्यकर्मांचे अनुष्ठान करणार्‍या महात्मा अगस्त्य मुनींच्या भावाचा आश्रम दिसून येत आहे. ॥४७॥
यथा हीमे वनस्यास्य ज्ञाताः पथि सहस्रशः ।
सन्नताः फलभारेण पुष्पभारेण च द्रुमाः ॥ ४८ ॥
’कारण की सुतीक्ष्णांनी जसे सांगितले होते त्यास अनुसरून या वनाच्या मार्गात फुले आणि फळांच्या भाराने लावलेले हजारो परिचित वृक्ष शोभून दिसत आहेत. ॥४८॥
पिप्पलीनां च पक्वानां वनादस्मादुपागतः ।
गन्धोऽयं पवनोत्क्षिप्तः सहसा कटुकोदयः ॥ ४९ ॥
’या वनांतील पिकलेल्या पिप्पलींचा हा गंध वायुने प्रेरित होऊन एकाएकी इकडे आला आहे ज्यायोगे कटु रसाचा उदय होत आहे. ॥४९॥
तत्र तत्र च दृश्यन्ते सङ्‌क्षिप्ताः काष्ठसञ्चयाः ।
लूनाश्च पथि दृश्यंते दर्भा वैदूर्यवर्चसः ॥ ५० ॥
’जेथे तेथे लाकडांचे ढीग लावलेले दिसून येत होते आणि वैडूर्य मण्याच्या समान रंगाचे कुश (दर्भ) कापून ठेवलेले दृष्टिगोचर होत होते. ॥५०॥
एतच्च वनमध्यस्थं कृष्णाभ्रशिखरोपमम् ।
पावकस्याश्रमस्थस्य धूमाग्रं सम्प्रदृश्यते ॥ ५१ ॥
’हे पहा ! जंगलाच्या मध्ये आश्रमांतील अग्निचा धूर वर जातांना दिसून येत आहे ज्याचा अग्रभाग काळ्या मेघांच्या वरील भागासारखा प्रतीत होत आहे. ॥५१॥
विविक्तेषु च तीर्थेषु कृतस्नाना द्विजातयः ।
पुष्पोपहारं कुर्वन्ति कुसुमैः स्वयमर्जितैः ॥ ५२ ॥
येथील एकांत आणि पवित्र तीर्थात स्नान करून आलेले ब्राह्मण स्वतः वेचून आणलेल्या फुलांनी देवतांसाठी पुष्पोपहार अर्पित करीत आहेत. ॥५२॥
ततः सुतीक्ष्णस्यवचनं यथा सौम्य मया श्रुतम् ।
अगस्त्यस्याश्रमो भ्रातुर्नूनमेष भविष्यति ॥ ५३ ॥
’सौम्य ! मी सुतीक्ष्णांच्या कडून जसे कथन ऐकले होते त्यास अनुसरून हा निश्चितच अगस्त्यांच्या भावाचा आश्रम असेल. ॥५३॥
निगृह्य तरसा मृत्युं लोकानां हितकाम्यया ।
यस्य भ्रात्रा कृतेयं दिक्‍शरण्या पुण्यकर्मणा ॥ ५४ ॥
’यांचेच भाऊ पुण्यकर्मा अगस्त्यांनी समस्त लोकांच्या हिताच्या कामनेने मृत्युस्वरूप वातापि आणि इल्वलाचे वेगपूर्वक दमन करून या दक्षिण दिशेत वसती करण्यास वा इथे आश्रय घेण्यास योग्य (भयरहित) बनविले आहे. ॥५४॥
इहैकदा किल क्रूरो वातापिरपि चेल्वलः ।
भ्रातरौ सहितावास्तां ब्राह्मणघ्नौ महासुरौ ॥ ५५ ॥
’एका समयाची गोष्ट आहे. येथे क्रूर स्वभावाचा वातापि आणि इल्वल - हे दोघे भाऊ एकत्रच राहात होते. ते दोन्ही महान असुर ब्राह्मणांची हत्या करणारे होते. ॥५५॥
धारयन् ब्राह्मणं रूपमिल्वलः संस्कृतं वदन् ।
आमन्त्रयति विप्रान् स्म श्राद्धमुद्दिश्य निर्घृणः ॥ ५६ ॥

भ्रातरं संस्कृतं कृत्वा ततस्तं मेषरूपिणम् ।
तान् द्विजान् भोजयामास श्राद्धदृष्टेन कर्मणा ॥ ५७ ॥
’निर्दय इल्वल ब्राह्मणाचे रूप धारण करून संस्कृत बोलत जात असे आणि श्राद्धासाठी ब्राह्मणांना निमंत्रण देऊन येत असे. नंतर मेषाचे (जीवशाक) रूप धारण करणार्‍या आपल्या भावाचा - वातापिचा संस्कार करून श्राद्ध कल्पोत विधिने ब्राह्मणांना खाऊ घालित असे.’ ॥५६-५७॥
ततो भुक्तवतां तेषां विप्राणामिल्वलोऽब्रवीत् ।
वातापे निष्क्रमस्वेति स्वरेण महता वदन् ॥ ५८ ॥
’ते ब्राह्मण जेव्हा भोजन करीत असत तेव्हा इल्वल उच्च स्वराने बोलत असे - ’वातापि ! बाहेर ये’. ॥५८॥
ततो भ्रातुर्वचः श्रुत्वा वातापिर्मेषवन्नदन् ।
भित्त्वा भित्त्वा शरीराणि ब्राह्मणानां विनिष्पतत् ॥ ५९ ॥
’भावाचे ते बोलणे ऐकून वातापि मेंढ्या प्रमाणे ’में में’ करीत त्या ब्राह्मणांचे पोट फाडफाडून बाहेर येत असे. ॥५९॥
ब्राह्मणानां सहस्राणि तैरेवं कामरूपिभिः ।
विनाशितानि संहत्य नित्यशः पिशिताशनैः ॥ ६० ॥
या प्रकारे इच्छेनुसार रूप धारण करणार्‍या त्या मांसभक्षी असुरांनी प्रतिदिन मिळून हजारों ब्राह्मणांचा विनाश करून टाकला. ॥६०॥
अगस्त्येन तदा देवैः प्रार्थितेन महर्षिणा ।
अनुभूय किल श्राद्धे भक्षितः स महासुरः ॥ ६१ ॥
’त्या समयी देवतांच्या प्रार्थनेवरून महर्षि अगस्त्यांनी श्राद्धात शाक रूपधारी त्या महान असुराला जाणून - बुजून भक्षण केले. ॥६१॥
ततः सम्पन्नमित्युक्त्वा दत्त्वा हस्तेऽवनेजनम् ।
भ्रातरं निष्क्रमस्वेति चेल्वलः समभाषत ॥ ६२ ॥
’तदनंतर श्राद्धकर्म संपन्न झाले आहे, असे म्हणून ब्राह्मणांच्या हातात अवनेजनाचे जल देऊन इल्वलाने भावाला संबोधित करून म्हटले - ’बाहेर निघ’. ॥६२॥
स तं तथा भाषमाणं भ्रातरं विप्रघातिनम् ।
अब्रवीत् प्रहसन् धीमानगस्त्यो मुनिसत्तमः ॥ ६३ ॥
’या प्रकारे भावाला बोलावणार्‍या त्या ब्राह्मणघाती असुरास बुद्धिमान मुनिश्रेष्ठ अगस्त्यांनी हसून म्हटले - ॥६३॥
कुतो निष्क्रमितुं शक्तिर्मया जीर्णस्य रक्षसः ।
भ्रातुस्ते मेषरूपस्य गतस्य यमसादनम् ॥ ६४ ॥
’ज्या जीवशाक रूपधारी तुझा भाऊ राक्षसास मी खाऊन पचवून टाकले आहे. तो तर आता यमलोकात जाऊन पोहोंचला आहे. आता त्याच्यात बाहेर निघण्याची शक्ती कोठे आहे ? ’ ॥६४॥
अथ तस्य वचः श्रुत्वा भ्रातुर्निधनसंश्रितम् ।
प्रधर्षयितुमारेभे मुनिं क्रोधान्निशाचरः ॥ ६५ ॥
’भावाचा मृत्यु सूचित करणारे मुनिचे ते वचन ऐकून त्या निशाचराने क्रोधपूर्वक त्यांना मारून टाकण्याच्या उद्योगास आरंभ केला. ॥६५॥
सोऽभ्यद्रवद् द्विजेंद्रं तं मुनिना दीप्ततेजसा ।
चक्षुषानलकल्पेन निर्दग्धो निधनं गतः ॥ ६६ ॥
त्याने जसा द्विजराज अगस्त्यांवर हल्ला केला त्याचक्षणी उद्दिप्त तेज असणार्‍या त्या मुनिनी आपल्या अग्नितुल्य दृष्टीने त्या राक्षसास दग्ध करून टाकले. या प्रकारे त्याचा मृत्यु झाला. ॥६६॥
तस्यायमाश्रमो भ्रातुः तटाकवनशोभितः ।
विप्रानुकम्पया येन कर्मेदं दुष्करं कृतम् ॥ ६७ ॥
’ब्राह्मणांवर कृपा करून ज्यांनी हे दुष्कर कर्म केले होते; त्याच महर्षि अगस्त्यांच्या भावाचा हा आश्रम आहे; जो सरोवर आणि वनाने सुशोभित होत आहे.’ ॥६७॥
एवं कथयमानस्य तस्य सौमित्रिणा सह ।
रमस्यास्तं गतः सूर्यः सन्ध्याकालोऽभ्यवर्तत ॥ ६८ ॥
श्रीरामचंद्र लक्ष्मणासह या प्रकारे गप्पागोष्टी करीत होते; इतक्यातच सूर्यदेवांचा अस्त झाला आणि संध्येचा समय झाला. ॥६८॥
उपास्य पश्चिमां सन्ध्यां सह भ्रात्रा यथाविधि ।
प्रविवेशाश्रमपदं तमृषिं चाभ्यवादयत् ॥ ६९ ॥
तेव्हा भावासह विधिपूर्वक सायं-संध्योपासना करून श्रीरामांनी आश्रमात प्रवेश केला आणि त्या महर्षिंच्या चरणीं मस्तक नमविले. ॥६९॥
सम्यक्प्रतिगृहीतस्तु मुनिना तेन राघवः ।
न्यवसत् तां निशामेकां प्राश्य मूलफलानि च ॥ ७० ॥
मुनिनी त्यांचा यथावत आदर-सत्कार केला. सीता आणि लक्ष्मणसहित श्रीराम तेथे फल-मूल खाऊन एक रात्र त्या आश्रमात राहिले. ॥७०॥
तस्यां रात्र्यां व्यतीतायामुदिते रविमण्डले ।
भ्रातरं तमगस्त्यस्य आमंत्रयत राघवः ॥ ७१ ॥
ती रात्र सरल्यावर जेव्हा सूर्योदय झाला तेव्हा श्रीरामचंद्रांनी अगस्त्यांच्या भावाचा निरोप घेतांना म्हटले- ॥७१॥
अभिवादये त्वां भगवन् सुखमस्म्युषितो निशाम् ।
आमन्त्रये त्वां गच्छामि गुरुं ते द्रष्टुमग्रजम् ॥ ७२ ॥
’भगवन् ! मी आपल्या चरणी प्रणाम करीत आहे. येथे रात्रभर अत्यंत सुखाने राहिलो आहे. आता आपले मोठे भाऊ मुनिवर अगस्त्यांचे दर्शन करण्यासाठी जाईन; म्हणून आपल्याकडून आज्ञा इच्छित आहे.’ ॥७२॥
गम्यतामिति तेनोक्तो जगाम रघुनन्दनः ।
यथोद्दिष्टेन मार्गेण वनं तच्चावलोकयन् ॥ ७३ ॥
तेव्हा महर्षिंनी म्हटले, ’फार चांगले, जावे’. या प्रकारे महर्षिची आज्ञा मिळवून भगवान श्रीराम सुतीक्ष्णांनी सांगितलेल्या मार्गाने वनाची शोभा पहात पहात पुढे निघाले. ॥७३॥
निवारान् पनसान् सालान् वञ्जुलांस्तिनिशांस्तथा ।
चिरिबिल्वान् मधूकांश्च बिल्वानथ च तिन्दुकान् ॥ ७४ ॥

पुष्पितान् पुष्पिताग्राभिर्लताभिरुपशोभितान् ।
ददर्श रामः शतशस्तत्र कान्तारपादपान् ॥ ७५ ॥

हस्तिहस्तैर्विमृदितान् वान्वानरैरुपशोभितान् ।
मत्तैः शकुनिसङ्‌घैश्च शतशः प्रतिनादितान् ॥ ७६ ॥
श्रीरामांनी तेथे मार्गामध्ये नीवार (जलकदंब), फणस, साल, अशोक, तिनीश, चिरिबिल्ब, महुआ, बेल, तेंदू, तसेच आणखीही शेकडो जंगली वृक्ष पाहिले. जे फुलांनी भरलेले होते तसेच फुललेल्या लतांनी परिवेष्टित होऊन फार शोभून दिसत होते. त्यापैकी काही वृक्षांना हत्तींनी आपल्या सोंडेने तोडून मुडवून टाकले होते. आणि बर्‍याचशा वृक्षांवर बसलेल्या वानरांमुळे त्यांची शोभा वाढली होती. शेकडो मत्त पक्षी त्यांच्या फाद्यांवर किलबिलाट करीत होते. ॥७४-७६॥
ततोऽब्रवीत् समीपस्थं रामो राजीवलोचनः ।
पृष्ठतोऽनुगतं वीरं लक्ष्मणं लक्ष्मिवर्धनम् ॥ ७७ ॥
त्या समयी कमलनयन श्रीरामांनी आपल्या पाठोपाठ येणार्‍या शोभावर्धक वीर लक्ष्मणास जे त्यांच्या निकटच होते या प्रकारे म्हटले - ॥७७॥
स्निग्धपत्रा यथा वृक्षा यथा क्षान्ता मृगद्विजाः ।
आश्रमो नातिदूरस्थो महर्षेर्भावितात्मनः ॥ ७८ ॥
’येथील वृक्षांची पाने जसे ऐकले होते त्याप्रमाणेच सुंदर आहेत. तसेच पशु आणि पक्षी क्षमाशील आणि शांत आहेत. या वरून कळून येत आहे की त्या भावितात्मा (शुद्ध अंतःकरणाच्या) महर्षि अगस्त्यांचा आश्रम येथून अधिक दूर नाही आहे.’ ॥७८॥
अगस्त्य इति विख्यातो लोके स्वेनैव कर्मणा ।
आश्रमो दृश्यते तस्य परिश्रान्तश्रमापहः ॥ ७९ ॥
’जे आपल्या कर्मानेच संसारात ’अगस्त्य’ नामाने विख्यात झालेले आहेत, त्यांचाच हा आश्रम दिसून येत आहे; जो थकलेल्या - भागलेल्या पथिकांचा थकवा दूर करणारा आहे. ॥७९॥
प्राज्यधूमाकुलवनश्चीरमालापरिष्कृतः ।
प्रशान्तमृगयूथश्च नानाशकुनिनादितः ॥ ८० ॥
’या आश्रमाचे वन यज्ञ-याग संबंधी अधिक धूराने व्याप्त आहे. चीरवस्त्रांच्या पंक्ती याची शोभा वाढवीत आहेत. येथील मृगांच्या झुंडी सदा शांत राहात आहेत. तसेच या आश्रमात नाना प्रकारच्या पक्ष्यांचे कलरव गुंजत राहात आहेत. ॥८०॥
निगृह्य तरसा मृत्युं लोकानां हितकाम्यया ।
दक्षिणा दिक् कृता येन शरण्या पुण्यकर्मणा ॥ ८१ ॥

तस्येदमाश्रमपदं प्रभावाद् यस्य राक्षसैः ।
दिगियं दक्षिणा त्रासाद् दृश्यते नोपभुज्यते ॥ ८२ ॥
’ज्या पुण्यकर्मा महर्षि अगस्त्यांनी समस्त लोकांच्या हितकामनेने मृत्युस्वरूप राक्षसांचे वेगपूर्वक दमन करून या दक्षिण दिशेला शरण येण्यास योग्य बनविले तसेच ज्यांच्या प्रभावाने राक्षस या दक्षिण दिशेला केवळ दूरून भयभीत होऊन पहात असतात, हिचा उपभोगही करीत नाही; त्यांच्याच हा आश्रम आहे.’ ॥८१-८२॥
यदाप्रभृति चाक्रान्ता दिगियं पुण्यकर्मणा ।
तदाप्रभृति निर्वैराः प्रशान्ता रजनीचराः ॥ ८३ ॥
’पुण्यकर्मा महर्षि अगस्याने जेव्हापासून दक्षिणदिशेतील या स्थानी पदार्पण केले आहे तेव्हापासून येथील निशाचर वैररहित आणि शांत झाले आहेत. ॥८३॥
नाम्ना चेयं भगवतो दक्षिणा दिक्‌प्रदक्षिणा ।
प्रथिता त्रिषु लोकेषु दुर्धर्षा क्रूरकर्मभिः ॥ ८४ ॥
’भगवान अगस्त्यांच्या महिम्यामुळे या आश्रमाच्या आस-पास निर्वैरता आदि गुणांच्या संपादनात समर्थ तसेच क्रुरकर्मा राक्षसांसाठी दुर्जय झाल्याने ही संपूर्ण दिशा नामानेही तीन्ही लोकात ’ दक्षिणा’च म्हटली गेली; याच नावाने विख्यात झाली तसेच हिला ’अगस्त्यांची दिशा’ ही म्हणतात. ॥८४॥
मार्गं निरोद्धुं सततं भास्करस्याचलोत्तमः ।
निदेशं पालयंस्तस्य विन्ध्यशैलो न वर्धते ॥ ८५ ॥
’एकदा पर्वतश्रेष्ठ विंध्य सूर्याचा मार्ग रोखण्यासाठी वाढला होता, परंतु महर्षि अगस्त्यांच्या सांगण्यावरून तो नम्र झाला. तेव्हा पासून आजपर्यंत निरंतर त्यांच्या आदेशाचे पालन करीत तो कधीही वाढत नाही. ॥८५॥
अयं दीर्घायुषस्तस्य लोके विश्रुतकर्मणः ।
अगस्त्यस्याश्रमः श्रीमान् विनीतमृगसेवितः ॥ ८६ ॥
’ते दिर्घायु महात्मा आहेत. त्यांचे कर्म (समुद्रशोषण आदि कार्य) तीन्ही लोकांमध्ये विख्यात आहेत. त्याच अगस्त्यांचा हा शोभासंपन्न आश्रम आहे; जो विनीत मृगांनी सेवित आहे. ॥८६॥
एष लोकार्चितः साधुः हिते नित्य रतः सताम् ।
अस्मानधिगतानेष श्रेयसा योजयिष्यति ॥ ८७ ॥
’हे महात्मा अगस्त्य संपूर्ण लोकांच्या द्वारा पूजित तथा सदा सज्जनांच्या हितात मग्न राहाणारे आहेत. आपल्याजवळ आलेल्या आम्हा लोकांना आपल्या आशीर्वादाने कल्याणाचे भागी बनवतील. ॥८७॥
आराधयिष्याम्यत्राहमगस्त्यं तं महामुनिम् ।
शेषं च वनवासस्य सौम्य वत्स्याम्यहं प्रभो ॥ ८८ ॥
’सेवा करण्यात समर्थ सौम्य लक्ष्मणा ! येथे राहून मी त्या महामुनि अगस्त्यांची आराधना करीन आणि वनवासाचे शेष दिवस येथेच राहून घालवीन.’ ॥८८॥
अत्र देवाः सगन्धर्वाः सिद्धाश्च परमर्षयः ।
अगस्त्यं नियताहाराः सततं पुर्यपासते ॥ ८९ ॥
’देवता, गंधर्व, सिद्ध आणि महर्षि येथे नियमित आहार करून सदा अगस्त्य मुनींची उपासना करतात. ॥८९॥
नात्र जीवेन्मृषावादी क्रूरो वा यदि वा शठः ।
नृशंसः पापवृत्तो वा मुनिरेष तथाविधः ॥ ९० ॥
’हे असे प्रभावशाली मुनि आहेत की यांच्या आश्रमात कुणी खोटे बोलणारा, क्रूर, शठ, नृशंस अथवा पापाचारी मनुष्य जिंवतच राहू शकत नाही.’ ॥९०॥
अत्र देवाश्च यक्षाश्च नागाश्च पतगैः सह ।
वसन्ति नियताहारा धर्ममाराधयिष्णवः ॥ ९१ ॥
’येथे धर्माची आराधना करण्यासाठी देवता, यक्ष, नाग आणि पक्षी नियमित आहार करून निवास करीत असतात. ॥९१॥
अत्र सिद्धा महात्मानो विमानैः सूर्यसंनिभैः ।
त्यक्त्वा देहान् नवैर्देहैः स्वर्याता परमर्षयः ॥ ९२ ॥
’या आश्रमावर आपल्या शरीराचा त्याग करून अनेकानेक सिद्ध, महात्मा, महर्षि नूतन शरीरांसह सूर्यतुल्य तेजस्वी विमानांच्या द्वारा स्वर्गलोकास प्राप्त झाले आहेत. ॥९२॥
यक्षत्वममरत्वं च राज्यानि विविधानि च ।
अत्र देवाः प्रयच्छन्ति भूतैराराधिताः शुभैः ॥ ९३ ॥
’येथे सत्कर्मपरायण प्राण्यांच्या द्वारा आराधित झालेल्या देवता त्यांना यक्षत्व, अमरत्व तसेच नाना प्रकारची राज्ये प्रदान करतात. ॥९३॥
आगताः स्माश्रमपदं सौमित्रे प्रविशाग्रतः ।
निवेदयेह मां प्राप्तमृषये सीतया सह ॥ ९४ ॥
’सौमित्र ! आता आम्ही आश्रमावर येऊन पोहोचलो आहोत. तुम्ही प्रथम प्रवेश करा आणि महर्षिंना सीतेसह माझ्या आगमनाची सूचना द्या.’ ॥९४॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे एकादशः सर्गः ॥ ११ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकी निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा अकरावा सर्ग पूरा झाला. ॥११॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP