श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। सप्तचत्वारिंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
स्वपुत्रान् मरुद्‌गणान् देवलोके रक्षितुमिन्द्रं प्रति दितेरनुरोधः, इन्द्रेण तदाज्ञायाः स्वीकरणं दितितपोवन एवेक्ष्वाकुपुत्रेण विशालेन राज्ञा विशालाभिधायाः नगर्या निर्माणं तत्रत्येन तात्कालिकेन राज्ञा सुमतिना विश्वामित्रस्य सत्कारः - दितिचा आपल्या पुत्रांना मरुद्‍गण बनवून देवलोकांत ठेवून घेण्यासाठी इंद्राला अनुरोध, इंद्रद्वारा त्याची स्वीकृति, दितिच्या तपोवनामध्ये इक्ष्वाकुपुत्र विशाल द्वारा विशाला नगरीची निर्मिति तथा तेथील तत्कालीन राजा सुमतिद्वारा विश्वामित्र मुनींचा सत्कार -
सप्तधा तु कृते गर्भे दितिः परमदुःखिता ।
सहस्राक्षं दुराधर्षं वाक्यं सानुनयाब्रवीत् ॥ १ ॥
इंद्रद्वारा आपल्या पुत्राचे सात तुकडे केले गेले आहेत हे जाणल्यावर देवी दितिला फार दुःख झाले. ती दुर्धर्ष वीर सहस्राक्ष इंद्राला अनुनयपूर्वक म्हणाली - ॥ १ ॥
ममापराधाद् गर्भोऽयं सप्तधा शकलीकृतः ।
नापराधो हि देवेश तवात्र बलसूदन ॥ २ ॥
'देवेश ! बलसूदन ! माझ्याच अपराधामुळे या गर्भाचे सात तुकडे झाले आहेत. यात तुझा काही दोष नाही. ॥ २ ॥
प्रियं तु त्वत्कृतमिच्छामि मम गर्भविपर्यये ।
मरुतां सप्त सप्तानां स्थानपाला भवन्तु ते ॥ ३ ॥
या गर्भाला नष्ट करण्याच्या निमित्ताने तू जे क्रूरतापूर्ण कर्म केले आहेस, ते तुझ्यासाठी आणि माझ्यासाठीही ज्याप्रकारे प्रिय होईल, ज्या प्रकारे त्याचा कल्याणकारक परिणाम तुझ्या आणि माझ्यासाठी होईल असा उपाय मी करू इच्छिते. माझ्या गर्भाचे ते सात खण्ड सात व्यक्ति होऊन सातही मरुद्‌गणांच्या स्थानांचे पालन करणारे होवोत. ॥ ३ ॥
वातस्न्धा इमे सप्त चरन्तु दिवि पुत्रक ।
मारुता इति विख्याता दिव्यरूपा ममात्मजाः ॥ ४ ॥
'मुला ! हे माझे दिव्यरूपधारी पुत्र, 'मरुत्' नामाने प्रसिद्ध होऊन आकाशात जे सुविख्यात सात वातस्कंध** आहेत, त्यात विचरण करोत. ॥ ४ ॥ [**आवह, प्रवह, संवह, उद्वह, विवह, परिवह आणि परावह - हे सात मरुत् आहेत. यांनाच सात वातस्कंध म्हणतात]
ब्रह्मलोकं चरत्वेक इन्द्रलोकं तथापरः ।
दिव्यवायुरिति ख्यातस्तृतीयोऽपि महायशाः ॥ ५ ॥
हे जे सात मरुत् सांगितले आहेत, ते साता-साताचे गण आहेत. या प्रकारे एकोणपन्नास मरुत् समजावे. यांच्यापैकी जो प्रथम गण आहे तो ब्रह्मलोकात विचरो, दुसरा इंद्रलोकात विचरण करो आणि तिसरा महायशस्वी मरुत् गण दिव्य वायुच्या नामाने विख्यात होऊन अंतरिक्षात वहात राहो. ॥ ५ ॥
चत्वारस्तु सुरश्रेष्ठ दिशो वै तव शासनात् ।
सञ्चरिष्यन्ति भद्रं ते कालेन हि ममात्मजाः ॥ ६ ॥

त्वत्कृतेनैव नाम्ना वै मारुता इति विश्रुताः ।
'सुरश्रेष्ठ ! तुझे कल्याण होवो ! माझ्या शेष चार पुत्रांचे गण तुझ्या आज्ञेने समयानुसार सर्व दिशांमध्ये संचार करतील. तुम्हीच ठेवलेल्या नामाने (तुम्ही जे 'मा रुदः' म्हणून त्यांना रडण्याचे थांबण्यास सांगितले होते, त्याच 'मा रुदः' या शब्दामुळे) ते सर्वच्या सर्व मारुत म्हणून संबोधले जातील. मरुत् नावानेच त्यांची प्रसिद्धि होईल.' ॥ ६ १/२ ॥
तस्यास्तद् वचनं श्रुत्वा सहस्राक्षः पुरंदरः ॥ ७ ॥

उवाच प्राञ्जलिर्वाक्यमितीदं बलनिसूदनः ।
दितिचे हे वचन ऐकून बल नामक दैत्याला मारणार्‍या सहस्राक्ष इंद्राने हात जोडून म्हटले - ॥ ७ १/२ ॥
सर्वमेतद् यथोक्तं ते भविष्यति न संशयः ॥ ८ ॥

विचरिष्यन्ति भद्रं ते देवरूपास्तवात्मजाः ।
"माते ! तुझे कल्याण होवो ! तू जसे सांगितलेस ते सर्व तसेच होईल यात संशय नाही. तुझे हे पुत्र देवरूप होऊन विचरतील. ॥ ८ १/२ ॥
एवं तौ निश्चयं कृत्वा मातापुत्रौ तपोवने ॥ ९ ॥

जग्मतुस्त्रिदिवं राम कृतार्थाविति नः श्रुतम् ।
' श्रीरामा ! त्या तपोवनात असा निश्चय करून ती दोघे माता-पुत्र, दिति आणि इंद्र, कुतकृत्य होऊन स्वर्गलोकास निघून गेली असे आम्ही ऐकले आहे. ॥ ९ १/२ ॥
एष देशः स काकुत्स्थ महेन्द्राध्युषितः पुरा ॥ १० ॥

दितिं यत्र तपःसिद्धामेवं परिचचार सः ।
'काकुत्स्थ ! हा तोच देश आहे जेथे पूर्वकाली देवराज इंद्राने तपसिद्ध दितिची परिचर्या केली होती. ॥ १० १/२ ॥
इक्ष्वाकोस्तु नरव्याघ्र पुत्रः परमधार्मिकः ॥ ११ ॥

अलम्बुषायामुत्पन्नो विशाल इति विश्रुतः ।
तेन चासीदिह स्थाने विशालेति पुरी कृता ॥ १२ ॥
'पुरुषसिंह ! पूर्वकाली महाराज इक्ष्वाकुचे एक परम धर्मात्मा पुत्र होते, जे विशाल नावाने प्रसिद्ध झाले. त्यांचा जन्म अलम्बुषेच्या गर्भापासून झाला होता. त्यांनी या स्थानावर विशाला नावाची पुरी वसविली होती. ॥ ११-१२ ॥
विशालस्य सुतो राम हेमचन्द्रो महाबलः ।
सुचन्द्र इति विख्यातो हेमचन्द्रादनन्तरः ॥ १३ ॥
'श्रीरामा ! विशालच्या पुत्राचे नाव होते हेमचंद्र, जो अत्यंत बलवान् होता. हेमचंद्रांचे पुत्र सुचंद्र नावाने विख्यात झाले. ॥ १३ ॥
सुचन्द्रतनयो राम धूम्राश्व इति विश्रुतः ।
धूम्राश्वतनयश्चापि सृञ्जयः समपद्यत ॥ १४ ॥
श्रीरामचंद्रा ! सुचंद्राचे पुत्र धूम्राश्व आणि धूम्राश्वांचे पुत्र सृंजय झाले. ॥ १४ ॥
सृञ्जयस्य सुतः श्रीमान् सहदेवः प्रतापवान् ।
कुशाश्वः सहदेवस्य पुत्रः परमधार्मिकः ॥ १५ ॥
सृंजयाचे प्रतापी पुत्र सहदेव झाले. सहदेवांच्या परम धर्मात्मा पुत्राचे नाव कुशाश्व होते. ॥ १५ ॥
कुशाश्वस्य महातेजाः सोमदत्तः प्रतापवान् ।
सोमदत्तस्य पुत्रस्तु काकुत्स्थ इति विश्रुतः ॥ १६ ॥
कुशाश्वांचे महातेजस्वी पुत्र सोमदत्त झाले आणि सोमदत्तांचे पुत्रही काकुत्स्थ नामाने विख्यात झाले. ॥ १६ ॥
तस्य पुत्रो महातेजाः सम्प्रत्येष पुरीमिमाम् ।
आवसत् परमप्रख्यः सुमतिर्नाम दुर्जयः ॥ १७ ॥
काकुत्स्थांचे महातेजस्वी पुत्र सुमति नावाने प्रसिद्ध आहेत. जे परम कान्तिमान आणि दुर्जय वीर आहेत. तेच यावेळी या पुरीत निवास करीत आहेत. ॥ १७ ॥
इक्ष्वाकोस्तु प्रसादेन सर्वे वैशालिका नृपाः ।
दीर्घायुषो महात्मानो वीर्यवन्तः सुधार्मिकाः ॥ १८ ॥
महाराज इक्ष्वाकुंच्या प्रसादाने विशालाचे सर्व नरेश दीर्घायु, महात्मा, पराक्रमी आणि परम धार्मिक होत आले आहेत. ॥ १८ ॥
इहाद्य रजनीमेकां सुखं स्वप्स्यामहे वयम् ।
श्वः प्रभाते नरश्रेष्ठ जनकं द्रष्टुमर्हसि ॥ १९ ॥
'नरश्रेष्ठ ! आजची रात्र आपण येथेच सुखपूर्वक विश्राम करू. नंतर उद्या प्रातःकाळी येथून निघून तुम्ही मिथिलेमध्ये राजा जनकाचे दर्शन कराल. ॥ १९ ॥
सुमतिस्तु महातेजा विश्वामित्रमुपागतम् ।
श्रुत्वा नरवरश्रेष्ठः प्रत्यागच्छन्महायशाः ॥ २० ॥
नरेशांमध्ये श्रेष्ठ, महातेजस्वी, महायशस्वी राजा सुमति, विश्वामित्र आपल्या पुरीच्या समीप आले आहेत असे जाणून सामोरे जाऊन त्यांचे स्वागत करण्यास स्वतः आले. ॥ २० ॥
पूजां च परमां कृत्वा सोपाध्यायः सबान्धवः ।
प्राञ्जलिः कुशलं पृष्ट्‍वा विश्वामित्रमथाब्रवीत् ॥ २१ ॥
आपले पुरोहित आणि बंधुबांधव यांच्यासह राजाने विश्वामित्रांची उत्तम प्रकारे पूजा करून, हात जोडून त्यांचा कुशल समाचार विचारला आणि त्यांना या प्रकारे म्हटले - ॥ २१ ॥
धन्योऽस्म्यनुगृहीतोऽस्मि यस्य मे विषयं मुने ।
सम्प्राप्तो दर्शनं चैव नास्ति धन्यतरो मया ॥ २२ ॥
'मुने ! मी धन्य आहे. आपला माझ्यावर मोठा अनुग्रह आहे. कारण आपण स्वतः माझ्या राज्यात येऊन मला दर्शन दिले आहे. यावेळी माझ्यावाचून अधिक धन्य पुरुष दुसरा कोणी नाही. ॥ २२ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे सप्तचत्वारिंशः सर्गः ॥ ४७ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा सत्तेचाळीसावा सर्ग समाप्त झाला. ॥ ४७ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP