[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। अष्टादशाधिकशततमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
सीतानसूयासंवादोऽनसूयया सीतायै प्रेमोपहारस्य दानमनसूयया पृष्टया सीतया तां प्रति स्वीयस्वयंवरवृत्तान्तस्य वर्णनम् -
सीता अनसूया संवाद, अनसूयेने सीतेला प्रेमोपहार देणे तसेच विचारल्यावरून सीतेने तिला आपल्या स्वयंवराची कथा ऐकविणे -
सा त्वेवमुक्ता वैदेही त्वनसूयानसूयया ।
प्रतिपूज्य वचो मन्दं प्रवक्तुमुपचक्रमे ॥ १ ॥
तेजस्विनी अनसूयेने या प्रकारे उपदेश केल्यावर कुण्याच्याही प्रति दोषदृष्टी न ठेवणर्‍या वैदेही सीतेने तिच्या वचनांची भूरि भूरि प्रशंसा करून हळू हळू या प्रकारे सांगायला प्रारंभ केला - ॥ १ ॥
नैतदाश्चर्यमार्यायां यन्मां त्वमनुभाषसे ।
विदितं तु ममाप्येतद् यथा नार्याः पतिर्गुरुः ॥ २ ॥
"देवि ! आपण संसारातील स्त्रियांत सर्वश्रेष्ठ आहात. आपल्या मुखाने अशा गोष्टी ऐकणे काही आश्चर्याची गोष्ट नाही. पति हाच नारीचा गुरु आहे. या विषयात जसा आपण उपदेश केला आहे, ती गोष्ट मला पहिल्यापासूनच विदित आहे." ॥ २ ॥
यद्यप्येष भवेद् भर्ता ममार्ये वृत्तिवर्जितः ।
अद्वैधमत्र वर्तव्यं तथाप्येष मया भवेत् ॥ ३ ॥
’माझे पतिदेव जरी अनार्य (चरित्रहीन), तसेच जीविकेच्या साधनांच्या रहित (निर्धन) असते, तरीही मी कुठल्याही प्रकारे द्विधा न होता त्यांच्या सेवेत रत राहिले असते. ॥ ३ ॥
किं पुनर्यो गुणश्लाघ्यः सानुक्रोशो जितेन्द्रियः ।
स्थिरानुरागो धर्मात्मा मातृवत्पितृवत्प्रियः ॥ ४ ॥
मग ज्यावेळी हे आपल्या गुणांच्या कारणानेच सर्वांच्या प्रशंसेस पात्र आहेत, तर मग त्यांच्या सेवेबद्दल काय सांगावे ? हे श्रीरघुनाथ परम दयाळु, जितेंद्रिय, दृढ अनुराग ठेवणारे, धर्मात्मा आणि माता-पित्यासमान प्रिय आहेत. ॥ ४ ॥
यां वृत्तिं वर्तते रामः कौसल्यायां महाबलः ।
तामेव नृपनारीणामन्यासामपि वर्तते ॥ ५ ॥
’महाबलि श्रीराम आपली माता कौसल्या हिच्या प्रति जसे आचरण करतात तसेच महाराज दशरथांच्या इतर राण्यांशीही करतात. ॥ ५ ॥
सकृद् दृष्टास्वपि स्त्रीषु नृपेण नृपवत्सलः ।
मातृवद् वर्तते वीरो मानमुत्सृज्य धर्मवित् ॥ ६ ॥
’महाराज दशरथांनी एक वेळही ज्या स्त्रियांना प्रेमदृष्टीने पाहिले आहे, त्यांच्या प्रतीही ते पितृवत्सल, धर्मज्ञ वीर श्रीराम मान सोडून मातेप्रमाणे आचरण करतात. ॥ ६ ॥
आगच्छन्त्याश्च विजनं वनमेवं भयावहम् ।
समाहितं मे श्वश्र्वा च हृदये यत् स्थिरं मम ॥ ७ ॥
’जेव्हा मी पतिबरोबर निर्जन वनांत येऊ लागले, त्यावेळी माझी सासू कौसल्या यांनी मला जो कर्तव्याचा उपदेश दिला होता, तो माझ्या हृदयात जशाच्या तसा स्थिरभावाने अंकित आहे. ॥ ७ ॥
पाणिप्रदानकाले च यत् पुरा त्वग्निसन्निधौ ।
अनुशिष्टं जनन्या मे वाक्यं तदपि मे धृतम् ॥ ८ ॥
’पूर्वी माझ्या विवाहसमयी अग्निच्या साक्षीने मातेने मला जी शिकवण दिली होती तीही मला चांगल्या प्रकारे आठवत आहे. ॥ ८ ॥
न विस्मृतं तु मे सर्वं वाक्यै स्वैर्धर्मचारिणि ।
पतिशुश्रूषणान्नार्यास्तपो नान्यद् विधीयते ॥ ९ ॥
’धर्मचारिणी ! या शिवाय माझ्या अन्य स्वजनांनी आपल्या वचनांच्या द्वारे जो जो उपदेश केला आहे तोही मी विसरलेली नाही. स्त्रीसाठी पतिच्या सेवेच्या अतिरिक्त दुसर्‍या कुठल्याही तपाचे विधान नाही आहे. ॥ ९ ॥
सावित्री पतिशुश्रूषां कृत्वा स्वर्गे महीयते ।
तथावृत्तिश्च याता त्वं पतिशुश्रूषया दिवम् ॥ १० ॥
’सत्यवानाची पत्‍नी सावित्री, पतिची सेवा करूनच स्वर्गलोकात पूजित होत आहे. तिच्याप्रमाणेच आचरण करणार्‍या आपण (अनसूयादेवी) ही पतीच्या सेवेच्या प्रभावानेच स्वर्गलोकात स्थान प्राप्त केलेले आहे. ॥ १० ॥
वरिष्ठा सर्वनारीणामेषा च दिवि देवता ।
रोहिणी न विना चन्द्रं मुहूर्तमपि दृश्यते ॥ ११ ॥
’संपूर्ण स्त्रियांमध्ये श्रेष्ठ ही स्वर्गाची देवी रोहिणी पतिसेवेच्या प्रभावनेच एका मुहूर्तासाठीही चंद्रम्यापासून विलग होताना दिसत नाही. ॥ ११ ॥
एवंविधाश्च प्रवराः स्त्रियो भर्तृदृढव्रताः ।
देवलोके महीयन्ते पुण्येन स्वेन कर्मणा ॥ १२ ॥
’या प्रकारे दृढतापूर्वक पातिव्रत्य धर्माचे पालन करणार्‍या बर्‍याचशा साध्वी स्त्रिया आपल्या गुणकर्माच्या बळाने देवलोकात आदर प्राप्त करीत आहेत." ॥ १२ ॥
ततोऽनसूया संहृष्टा श्रुत्वोक्तं सीतया वचः ।
शिरसाऽऽघ्राय चोवाच मैथिलीं हर्षयन्त्युत ॥ १३ ॥
त्यानंतर सीतेचे बोलणे ऐकून अनसूयेला अतिशय हर्ष झाला. तिने सीतेचे मस्तक हुंगले आणि नंतर त्या मैथिलीचा हर्ष वाढवीत या प्रकारे म्हटले - ॥ १३ ॥
नियमैर्विविधैराप्तं तपो हि महदस्ति मे ।
तत् संश्रित्य बलं सीते छन्दये त्वां शुचिस्मिते ॥ १४ ॥
उत्तम व्रताचे पालन करणार्‍या सीते ! मी अनेक प्रकारच्या नियमांचे पालन करून फार मोठी तपस्या संचित केली आहे. त्या तपोबलाचाच आश्रय घेऊन मी तुला इच्छेनुसार वर मागण्यासाठी सांगत आहे. ॥ १४ ॥
उपपन्नं च युक्तं च वचनं तव मैथिलि ।
प्रीता चास्म्युचितां सीते करवाणि प्रियं च किम् ॥ १५ ॥
मैथिली सीते ! तू फारच उत्तम आणि युक्तियुक्त वचने बोलली आहेस. ते ऐकून मला फार संतोष झाला आहे, म्हणून सांग बरे मी तुझे कोणते प्रिय कार्य करू ? ॥ १५ ॥
तस्यास्तद् वचनं श्रुत्वा विस्मिता मन्दविस्मया
कृतमित्यब्रवीत् सीता तपोबलसमन्विताम् ॥ १६ ॥
तिचे हे कथन ऐकून सीतेला फार आश्चर्य वाटले. ती तपोबलसंपन्न अनसूयेला मंद मंद हसत म्हणाली - "आपण आपल्या वचनांच्याद्वारेच माझे सर्व प्रिय केले आहे, आता आणखी काही करण्याची आवश्यकता नाही आहे. ॥ १६ ॥
सा त्वेवमुक्ता धर्मज्ञा तया प्रीततराभवत् ।
सफलं च प्रहर्षं ते हन्त सीते करोम्यहम् ॥ १७ ॥
सीतेने असे म्हटल्यवर धर्मज्ञ अनसूयेला फार प्रसन्नता वाटली. ती म्हणाली - सीते ! तुझ्या निर्लोभीपणामुळे मला जो विशेष हर्ष झाला आहे (अथवा तुझ्या ठिकाणी असलेल्या लोभाच्या अभावामुळे तुझ्यात सदा जो आनंदोत्सव भरलेला दिसतो) त्याला मी अवश्य सफल करीन. ॥ १७ ॥
इदं दिव्यं वरं माल्यं वस्त्रमाभरणानि च ।
अङ्‌गरागं च वैदेहि महार्हमनुलेपनम् ॥ १८ ॥

मया दत्तमिदं सीते तव गात्राणि शोभयेत् ।
अनुरूपमसंक्लिष्टं नित्यमेव भविष्यति ॥ १९ ॥
’हा सुंदर दिव्य हार, हे वस्त्र, हे आभूषण, हा अंगराग आणि हे बहुमूल्य अनुलेपन मी तुला देत आहे. वैदेही सीते ! मी दिलेल्या या वस्तु तुझ्या अंगांची (गात्रांची) शोभा वाढवतील. या सर्व तुझ्याच योग्य आहेत. आणि सदा उपयोगात आणल्या गेल्या तरी सदा निर्दोष आणि निर्विकार राहतील. ॥ १८-१९ ॥
अङ्‌गरागेण दिव्येन लिप्ताङ्‌गी जनकात्मजे ।
शोभयिष्यसि भर्तारं यथा श्रीविष्णुमव्ययम् ॥ २० ॥
’जनककिशोरे ! हा दिव्य अंगराग अंगाला लावून तू, ज्याप्रमाणे लक्ष्मी अविनाशी भगवान् विष्णुंची शोभा वाढविते, त्याप्रमाणे आपल्या पतिला सुशोभित करशील." ॥ २० ॥
सा वस्त्रमङ्‌गरागं च भूषणानि स्रजस्तथा ।
मैथिली प्रतिजग्राह प्रीतिदानमनुत्तमम् ॥ २१ ॥

प्रतिगृह्य च तत् सीता प्रीतिदानं यशस्विनी ।
श्लिष्टाञ्जलिपुटा तत्र समुपास्त तपोधनाम् ॥ २२ ॥
अनसूयेच्या आज्ञेने धीर स्वभावाच्या यशस्विनी मिथिलेशकुमारी सीतेने ते वस्त्र, अंगराग, आभूषण, आणि हार यांना तिच्या प्रसन्नतेची परम उत्तम भेट समजून त्यांचा स्वीकार केला. तो प्रेमोपहार ग्रहण करून ती दोन्ही हात जोडून त्या तपोधन अनसूयेच्या सेवेत बसून राहिली. ॥ २१-२२ ॥
तथा सीतामुपासीनामनसूया दृढव्रता ।
वचनं प्रष्टुमारेभे कथां काञ्चिदनुप्रियाम् ॥ २३ ॥
त्यानंतर या प्रकारे आपल्या निकट बसलेल्या सीतेला, दृढतापूर्वक उत्तम व्रताचे पालन करणार्‍या अनसूयेने काही परम प्रिय कथा ऐकविणासाठी या प्रकारे विचारण्यास प्रारंभ केला - ॥ २३ ॥
स्वयंवरे किल प्राप्ता त्वमनेन यशस्विना ।
राघवेणेति मे सीते कथा श्रुतिमुपागता ॥ २४ ॥
"सीते ! या यशस्वी राघवेंद्राने तुला स्वयंवरात प्राप्त केले होते ही गोष्ट माझ्या ऐकण्यात आली आहे. ॥ २४ ॥ "
तां कथां श्रोतुमिच्छामि विस्तरेण च मैथिलि ।
यथानुभूतं कार्त्स्न्येन तन्मे त्वं वक्तुमर्हसि ॥ २५ ॥
’मैथिली ! मी तो वृत्तांत सविस्तर ऐकू इच्छिते. म्हणून जे काही ज्या प्रकारे घडले ते सर्व विस्तारपूर्वक मला सांग." ॥ २५ ॥
एवमुक्ता तु सा सीता तापसीं धर्मचारिणीम् ।
श्रूयतामिति चोक्त्वा वै कथयामास तां कथाम् ॥ २६ ॥
तिने या प्रकारे आज्ञा दिल्यावर सीतेने त्या धर्मचारिणी तापसी अनसूयेला म्हटले - ’माते ! ऐकावे.’ असे म्हणून तिने ती कथा सांगण्यास आरंभ केला. ॥ २६ ॥
मिथिलाधिपतिर्वीरो जनको नाम धर्मवित् ।
क्षत्रकर्मण्यभिरतो न्यायतः शास्ति मेदिनीम् ॥ २७ ॥
"मिथिला जनपदाचे वीर राजा ’जनक’ नामाने प्रसिद्ध आहेत. ते धर्माचे ज्ञाते आहेत, म्हणून क्षत्रियोचित कर्मात तत्पर राहून न्यायपूर्वक पृथ्वीचे पालन करीत आहेत. ॥ २७ ॥ "
तस्य लाङ्‌गलहस्तस्य कर्षतः क्षेत्रमण्डलम् ।
अहं किलोत्थिता भित्त्वा जगतीं नृपतेः सुता ॥ २८ ॥
’एका वेळची गोष्ट आहे. ते यज्ञाच्या योग्य क्षेत्राला हातात नांगर घेऊन नांगरत होते, त्याच वेळी मी पृथ्वी दुभंगून प्रकट झाले. या एवढ्या गोष्टीनेच मी राजा जनकांची कन्या झाले. ॥ २८ ॥
स मां दृष्ट्‍वा नरपतिर्मुष्टिविक्षेपतत्परः ।
पांसुकुण्ठितसर्वाङ्‌गीं विस्मितो जनकोऽभवत् ॥ २९ ॥
’ते राजे त्या क्षेत्रात मुठीत औषधी घेऊन पेरत होते. इतक्यांत त्यांची दृष्टी माझ्यावर पडली. माझ्या सार्‍या अंगावर धूळ माखलेली होती. त्या अवस्थेत मला पाहून राजा जनकांना विस्मय वाटला. ॥ २९ ॥
अनपत्येन च स्नेहादङ्‌कमारोप्य च स्वयम् ।
ममेयं तनयेत्युक्त्वा स्नेहो मयि निपातितः ॥ ३० ॥
त्या समयी त्यांना दुसरे काही संतान नव्हते म्हणून स्नेहवश त्यांनी स्वतः मला मांडीवर घेतले आणि ’ही माझी मुलगी आहे’ असे म्हणून माझ्यावर आपल्या हृदयांतील सारे प्रेम उधळले. ॥ ३० ॥
अन्तरिक्षे च वागुक्ता प्रतिमामानुषी किल ।
एवमेतन्नरपते धर्मेण तनया तव ॥ ३१ ॥
’त्यावेळी आकाशवाणी झाली, जी स्वरूपतः अमानवी भाषेत सांगितली गेली होती (अथवा माझ्या विषयी प्रकट झालेली ती वाणी अमानुषी, दिव्यहोती). आकाशवाणी अशी होती - ’नरेश्वर ! तुमचे कथन ठीक आहे. ही कन्या धर्मतः तुमचीच पुत्री आहे.’ ॥ ३१ ॥
ततः प्रहृष्टो धर्मात्मा पिता मे मिथिलाधिपः ।
अवाप्तो विपुलामृद्धिं मामवाप्य नराधिपः ॥ ३२ ॥
’ही आकाशवाणी ऐकून माझे धर्मात्मा पिता मिथिलानरेश फार प्रसन्न झाले. माझी प्राप्ती झाल्याने त्या नरेशाला जणू कुठली तरी फार मोठी समृद्धिच प्राप्त झाली होती. ॥ ३२ ॥
दत्ता चास्मीष्टवद्देव्यै ज्येष्ठायै पुण्यकर्मणे ।
तया सम्भाविता चास्मि स्निग्धया मातृसौहृदात् ॥ ३३ ॥
’त्यांनी पुण्यपरायण ज्येष्ठ राणी जी त्यांना अधिक प्रिय होती, तिच्या हाती मला दिले. त्या स्नेहमयी महाराणीने मातृसमुचित सौहार्द्राने माझे लालन पालन केले. ॥ ३३ ॥
पतिसंयोगसुलभं वयो दृष्ट्‍वा तु मे पिता ।
चिन्तामभ्यगमद् नो वित्तनाशादिवाधनः ॥ ३४ ॥
’जेव्हां पित्याने पाहिले की माझी अवस्था विवाहयोग्य झाली आहे तेव्हां यामुळे ते फार चिंतेत पडले. ज्याप्रमाणे कमावलेल्या धनाचा नाश झाल्याने निर्धन मनुष्यास फार दुःख होते त्याप्रकारे ते माझ्या विवाहाच्या चिंतेने फार दुःखी झाले. ॥ ३४ ॥
सदृशाच्चापकृष्टाच्च लोके कन्यापिता जनात् ।
प्रधर्षणमवाप्नोति शक्रेणापि समो भुवि ॥ ३५ ॥
’संसारात कन्येच्या पित्याला, मग तो भूतलावर इंद्रतुल्य का असेना , वरपक्षाच्या लोकांकडून, ते आपल्या बरोबरीचे अथवा आपल्याहून कमी योग्यतेचे का असेनात, अपमान सहन करावा लागतो. ॥ ३५ ॥
तां धर्षणामदूरस्थां संदृष्यात्मनि पार्थिवः ।
चिन्तार्णवगतः पारं नाससादाप्लवो यथा ॥ ३६ ॥
हा अपमान सहन करण्याची वेळ आपल्यासाठी फारच समीप आली आहे असे पाहून राजे चिंतेच्या समुद्रात बुडून गेले. जसे नौकारहित मनुष्य पार पोहोचू शकत नाही, त्याप्रकारे माझे पिताही चिंतामुक्त होऊ शकत नव्हते. ॥ ३६ ॥
अयोनिजां हि मां ज्ञात्वा नाध्यगच्छत् स चिन्तयन् ।
सदृशं चाभिरूपं च महीपालः पतिं मम ॥ ३७ ॥
’मी अयोनिजा कन्या आहे हे समजून ते भूपाल माझ्यासाठी योग्य आणि परम सुंदर पतिचा विचार करू लागले, पण कुठल्याही निश्चयाप्रत पोहोचू शकले नाहीत. ॥ ३७ ॥
तस्य बुद्धिरियं जाता चिन्तयानस्य संततम् ।
स्वयंवरं तनूजायाः करिष्यामीति धीमतः ॥ ३८ ॥
’सदा माझ्या विवाहाच्या चिंतेत पडून राहणार्‍या त्या महाराजांच्या मनांत एक दिवस हा विचार उत्पन्न झाला की मी धर्मतः आपल्या कन्येचे स्वयंवर करीन. ॥ ३८ ॥
महायज्ञे तदा तस्य वरुणेन महात्मना ।
दत्तं धनुर्वरं प्रीत्या तूणी चाक्षय्यसायकौ ॥ ३९ ॥
’त्याच सुमारास त्यांच्या एका महान् यज्ञात प्रसन्न होऊन महात्मा वरुणांनी त्यांना एक श्रेष्ठ धनुष्य तसेच अक्षय बाणांनी भरलेले दोन तरकस (भाते) दिले. ॥ ३९ ॥
असंचाल्यं मनुष्यैश्च यत्‍नेनापि च गौरवात् ।
तन्न शक्ता नमयितुं स्वप्नेष्वपि नराधिपाः ॥ ४० ॥
’ते धनुष्य इतके भारी होते की कोणत्याही मनुष्याने पूर्ण ताकद लावून प्रयत्‍न केला तरी तो त्याला हलवूही शकत नसे. भूमंडलावरील कोणताही नरेश स्वप्नांतही त्या धनुष्यास वाकविण्यास असमर्थ होता. ॥ ४० ॥
तद्धनुः प्राप्य मे पित्रा व्याहृतं सत्यवादिना ।
समवाये नरेन्द्राणां पूर्वमामन्त्र्य पार्थिवान् ॥ ४१ ॥
’ते धनुष्य मिळताच माझ्या सत्यवादी पित्याने प्रथम भूमंडलावरील राजांना आमंत्रित करून त्या नरेशांच्या समूहात जाहीर केले - ॥ ४१ ॥
इदं च धनुरुद्यम्य सज्यं यः कुरुते नरः ।
तस्य मे दुहिता भार्या भविष्यति न संशयः ॥ ४२ ॥
जो मनुष्य या धनुष्याला उचलून त्यावर प्रत्यञ्चा चढवील, माझी पुत्री सीता त्याची पत्‍नी होईल यात संशय नही. ॥ ४२ ॥
तच्च दृष्ट्‍वा धनुःश्रेष्ठं गौरवाद् गिरिसन्निभम् ।
अभिवाद्य नृपा जग्मुरशक्तास्तस्य तोलने ॥ ४३ ॥
’आपल्या जडपणामुळे पहाडासारख्या प्रतीत होणार्‍या त्या श्रेष्ठ धनुष्यास पाहून उपस्थित असलेले राजे जेव्हां त्यास उचलण्यासही समर्थ झाले नाहीत, तेव्हां त्यास प्रणाम करून ते सर्व निघून गेले. ॥ ४३ ॥
सुदीर्घस्य तु कालस्य राघवोऽयं महाद्युतिः ।
विश्वामित्रेण सहितो यज्ञं द्रष्टुं समागतः ॥ ४४ ॥

लक्ष्मणेन सह भ्रात्रा रामः सत्यपराक्रमः ।
विश्वामित्रस्तु धर्मात्मा मम पित्रा सुपूजितः ॥ ४५ ॥
’त्यानंतर दीर्घकाळाने हे महातेजस्वी राघव सत्यपराक्रमी राम आपला भाऊ लक्ष्मणास बरोबर घेऊन विश्वामित्रांच्या बरोबर माझ्या पित्याचा यज्ञ पाहण्यासाठी मिथिलेस आले होते. त्या समयी माझ्या पित्याने धर्मात्मा विश्वामित्र मुनिंचा फार आदर सत्कार केला. ॥ ४४-४५ ॥
प्रोवाच पितरं तत्र राघवौ रामलक्ष्मणौ ।
सुतौ दशरथस्येमौ धनुर्दर्शनकाङ्‌क्षिणौ ।
धनुर्दर्शय रामाय राजपुत्राय दैविकम् ॥ ४६ ॥
’तेव्हां विश्वामित्र माझ्या पित्याला म्हणाले - ’राजन् ! हे दोन्ही रघुकुलभूषण श्रीराम आणि लक्ष्मण , महाराज दशरथांचे पुत्र आहेत आणि आपल्या त्या दिव्य धनुष्याचे दर्शन करू इच्छितात. आपण आपले ते देवप्रदत्त धनुष्य राजकुमार श्रीरामांना दाखवावे.’ ॥ ४६ ॥
इत्युक्तस्तेन विप्रेण तद् धनुः समुपानयत् ।
तद् धनुर्दर्शयामास राजपुत्राय दैविकम् ॥ ४७ ॥
’विप्रवर विश्वामित्रांनी असे म्हटल्यावर पिताश्रीने ते दिव्य धनुष्य मागविले आणि राजकुमार श्रीरामांना दाखविले. ॥ ४७ ॥
निमेषान्तरमात्रेण तदानम्य महाबलः ।
ज्यां समारोप्य झटिति पूरयामास वीर्यवान् ॥ ४८ ॥
’महाबली आणि परम पराक्रमी श्रीरामांनी डोळे लवतात न लवतात एवढ्या वेळात त्या धनुष्यावर प्रत्यञ्चा चढवली आणि तात्काळ त्याला कानापर्यंत खेचले. ॥ ४८ ॥
तेनापूरयता वेगान्मध्ये भग्नं द्विधा धनुः ।
तस्य शब्दोऽभवद् भीमः पतितस्याशनेर्यथा ॥ ४९ ॥
’त्यांच्या प्रत्यञ्च्या खेंचण्याच्या वेगामुळे ते धनुष्य मध्येच तुटून गेले आणि क्षणात त्याचे दोन तुकडे झाले. ते दुभंगले त्यावेळी असा भयंकर शब्द झाला की जणु काय तेथे वज्रच तुटून पडले आहे की काय. ॥ ४९ ॥
ततोऽहं तत्र रामाय पित्रा सत्याभिसंधिना ।
उद्यता दातुमुद्यम्य जलभाजनमुत्तमम् ॥ ५० ॥
’तेव्हां माझ्या सत्यप्रतिज्ञ पित्याने जलाचे उत्तम पात्र घेऊन श्रीरामांच्या हाती मला देण्याचा उद्योग केला. ॥ ५० ॥
दीयमानां न तु तदा प्रतिजग्राह राघवः ।
अविज्ञाय पितुश्छन्दमयोध्याधिपतेः प्रभोः ॥ ५१ ॥
’त्यासमयी आपले पिता अयोध्या नरेश दशरथांचा अभिप्राय जाणल्याशिवाय श्रीरामांनी, राजा जनकांनी देऊनही माझे ग्रहण केले नाही. ॥ ५१ ॥
ततः श्वशुरमामन्त्र्य वृद्धं दशरथं नृपम् ।
मम पित्रा त्वहं दत्ता रामाय विदितात्मने ॥ ५२ ॥
’त्यानंतर माझे वृद्ध श्वशुर राजा दशरथांची अनुमति घेऊन पित्याने आत्मज्ञानी श्रीरामांना माझे दान केले. ॥ ५२ ॥
मम चैवानुजा साध्वी ऊर्मिला प्रियदर्शना ।
भार्य्यार्थे लक्ष्मणस्यापि दत्ता पित्रा मम स्वयम् ॥ ५३ ॥
त्यानंतर पित्याने स्वतःच माझी लहान बहीण साध्वी परम सुंदरी ऊर्मिलेला लक्ष्मणाच्या पत्‍नीरूपाने त्यांच्या हाती देऊन टाकले. ॥ ५३ ॥
एवं दत्तास्मि रामाय तथा तस्मिन् स्वयंवरे ।
अनुरक्तास्मि धर्मेण पतिं वीर्यवतां वरम् ॥ ५४ ॥
’अशा प्रकारे त्या स्वयंवरात पित्याने मला श्रीरामांच्या हाती सोपविले होते. मी धर्मास अनुसरून आपले पति , बलवानात श्रेष्ठ श्रीरामांच्या ठिकाणी सदा अनुरक्त राहात आहे." ॥ ५४ ॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे अष्टादशाधिकशततमः सर्गः ॥ ११८ ॥
या प्रकारे श्रीवाल्मिकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा एकशे अठरावा सर्ग पूरा झाला ॥ ११८ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP